सारे काही झाल्यावर जानकी काकू शेजारी-पाजारी हळदी-कुंकवासाठी गेल्या. आई घराबाहेर पडायची मुले वाटच बघत असावीत. मुलांनी कणगीवरील लक्ष्मीचा मुखवटा बाजूला काढला आणि भराभर कणगीतील लाडू-करंज्या काढून घेतल्या. तेवढय़ात ‘आई आली’ कोणीतरी एकाने सांगितले. मुलांची धांदल उडाली. त्यांनी गडबडीने लक्ष्मीचा मुखवटा कणगीवर ठेवला तो पलीकडे तोंड करून. आणि मुले पसारही झाली.
इकडे काकू आत य ऊन पाहतात तो लक्ष्मीने तोंड फिरवलेले. ते पाहून त्या घाबरून बेशुद्धच पडल्या. शेजारी-पाजारी जमा झाले. मुलांना हे कळताच मुले घरात येऊन रडू लागली. आई, उठ आम्हीच लाडू घेऊन मुखवटा ठेवला, असे म्हटलवर थोडय़ा वेळाने काकू एकदाच शुद्धीवर आल्या. पण आजही आपण शुध्दीवर आलोत का? याचा विचार करावा लागेल.
ही घटना ग्रामीण भागात जुन्या काळात घडली असली तरी आजही ग्रामीण आणि शहरी भागातही असंख्य स्त्रिया महालक्ष्मीचा सण म्हणजे फार कडक, थोडे काही चुकले तर आपले वाईट होईल, या भीतीपोटी वागत असतात. लहान ङ्कुलांनाही लाडू न देणारी जानकीकाकू आणि आजच्या स्त्रियांमध्ये फारसा फरक पडलेला नाही.
वास्तविक महालक्ष्मी, चैत्रातली वसंतगौर ही स्त्रीचीच रूपे आहेत. या गौरींसाठी केलेले गोड-धोड पदार्थ आधी घरातील मुलांना तर द्यालाच हवेत किंवा थोडे बाजूला काढून तरी ठेवालाच हवेत. घरातल्या मुला-बाळांना नाराज करून कसली देवी प्रसन्न होणार आहे? महाहालक्ष्मी ही स्त्रियांचेच प्रतीक आणि शेवटी ती एक मूर्तीपूजा आहे. मूर्तीपूजेला किती भ्यायचे? मूर्ती हे प्रतीक आहे, हे मान्य केले तरी प्रतिकाच्या किती आहारी जाचे याचा विचार आजच्या स्त्रियांनी केलाच पाहिजे. जानकीकाकूंनी केल्या तशा अनेक चुका इतरही स्त्रियांकडून महालक्ष्मीच्या सणाच्यावेळी घडतात. मन निर्मळ असेल, सगळ्यांना वेळेवर खायला-प्यायला देऊन समाधानाने गौरीचा सण केला तर तो खूपच आनंद देणारा सण ठरेल.
स्त्रियांमध्ये भक्तिभावना तीव्र असते. त्यातच भर म्हणून दुर्दैवाने काही घरातले पुरुषही महालक्ष्मीबाबत काही वेगळे करायचे म्हटले तर ‘काही वेडे-वाकडे घडले तर काय कराचे’ असे बोलत असतात. तेव्हा महालक्ष्मीची भीती न बाळगता आनंदाने, सर्वाना विशेषत: लहान मुले, घरातील वृद्ध यांना खायला-प्यायला घालून सण साजरा करा. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील सूक्षम फरक ओळखाला शिका. देवता जशा सगुण साकार आहेत तशा त्या निगरुण निराकारही आहेत, हा मुद्दा येथे महत्त्वाचा वाटतो.
सुनिता कुलकर्णी