गणेशाची विविध रूपे, अवतार आपणास ज्ञात आहेत. दगडूशेठ, एकदंत, पंचमुखी, दशभुजा, त्रिशुंडी, धुंडीविनायक अशा अनेक नावांनी गणपती परिचित आहे. पण, सांगलीतील प्रसिध्द गणपती पंचायतन संस्थान ट्रस्टच्या गणेशोत्सवात 'चोर गणपती' चे अनोखे रूप आपणास पहावयास मिळते. चोर गणपती म्हणताच आपण अचंबित झालात ना... हे कसले रूप.. ज्याचे नाव घेतल्याशिवाय आपणाकडे शुभकार्यास सुरूवात होत नाही, तो संकट निवारक गणेश चोर कसा असेल... हे कोडे न उलगडणारे आहे... अशी शंका आपल्या मनात आली असेल.. हो ना.. पण, यात एवढे गोंधळून जाण्यासारखे काहीच नाही. चोर गणपती म्हणजे हळूच, चोर पावलांनी येऊन बसणारा गणपती.
सांगली नगरीचे आराध्यदेवत असणा-या श्री गणपती मंदिरातील पंचायतन संस्थानचा गणेशोत्सव संपूर्ण महाराष्ट्राचे आकर्षण आहे. लाखो भाविकांच्या जनसागरात संपन्न होणा-या या गणेशोत्सवास दीडशेहून अधिक वर्षाची परंपरा आहे. 1844 पासून सुरू झालेला संस्थान गणेशोत्सव आजही तेवढ्याच दिमाखात साजरा करण्यात येतो. 'चोर गणपती' गणपती हे या गणेशोत्सवाचे खास आकर्षण.
गणपती मंदिरातील संस्थान गणशोत्सवाची सुरूवात 'चोर' गणपतीच्या आगमनाने होते. भाद्रपद प्रतिपदेला मंदिरातील या गाभार्यात दोन्ही बाजूस चोर गणपतीच्या मूर्ती विधीपूर्वक बसविल्या जातात. मग येथून पंचमीपर्यत अर्थात पाचव्या दिवसांपर्यत विविध कार्यक्रमांनी उत्सव साजरा करण्यात येतो. चोर गणपतीचा सभामंडप विद्युत रोषणाईने झगमगून गेलेला असतो.
तशी या गणपतीची अख्यायिका वगैरे नाही. गणपती उत्सवाची चाहूल लागण्यासाठी तसेच वातावरण निर्मिती एवढाच या मागचा संदर्भ. या चोर गणपतीची मूर्ती कागदाच्या लगद्यापासून तयार केली आहे. सुरूवातीपासून म्हणजे सुमारे दीडशे वर्षापासून त्यांचे जतन करण्यात आले आहे. पण, या मूर्ती पाहिल्यास त्या कागदी लगद्याच्या आहेत, असे जाणवणार देखील नाही. नुकतीच रंगरंगोटी करण्यात आल्याने या मूर्ती अधिक आकर्षक दिसत आहे.
चोर गणपती बसताच सांगली व परिसरात वातावरण गणेशमय होऊन जाते. मंदिरात भाविकांची गर्दी वाढू लागते. खास करून चोर गणपती पहाण्यासाठी भाविक व पर्यटक हजेरी लावतात. पंचमीला उत्सवमूर्तींची जोरदार मिरवणूकीने विसर्जन होताच चोर गणपतीही पुढील वर्षापर्यत गावाला जातात.
- किरण जोशी
पुढील लेख