गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता प्रचार करण्यावर सर्व राजकीय पक्षांचा भर वाढत चालला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने घातलेल्या निर्बंधांमुळे सर्वच उमेदवार आता घरोघरी जाऊन प्रचार करताना पाहायला मिळत आहेत. यातच गोव्याचे राजकारणही तापताना दिसत आहे. भाजपने गोव्याला स्थिर सरकार दिले आहे. गोव्यातील जनता भाजपवर अजिबात नाराज नाही, असा दावा भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मी गोव्यातील राजकारण बदलायला नाही तर, भाजप आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना मदत करायला आलो आहे, असेही त्यांनी सांगितले.
एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना तिकीट देण्याच्या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले की, सर्वच पक्षांमध्ये असे उमेदवार आढळून येतील. भाजपने उमेदवारी दिलेल्यांमध्ये बहुतांश जणांवर राजकीय स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. आंदोलने, पोलीस स्थानकाला घेराव अशा प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गोव्याचा इतिहास पाहता ५ वर्षाच्या कालावधीत ७ मुख्यमंत्री झालेले पाहिले आहेत. मात्र, गेल्या १० वर्षांपासून भाजपने गोव्याला स्थिर सरकार दिले आहे. गोव्यातील कोणताही समाज भाजपवर नाराज नाही, असे सांगत गोव्यातील मुख्यमंत्री प्रमोद सावंत सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप करण्यात आले. मात्र, कुणीही त्या आरोपांसंदर्भात पुरावे देऊ शकलेले नाही. यापूर्वी गोव्यात भ्रष्टाचार फोफावला होता. परंतु, भाजप सरकार आल्यापासून चित्र बदलले असल्याचा मोठा दावा फडणवीस यांनी केला आहे.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांची उणीव कायम जाणवेल. मनोहर पर्रिकरांसारखा दुसरा व्यक्ती होणे नाही. पर्रिकरांची कमतरता भरून काढणे हे मोठे आव्हान आहे. मात्र, विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत चांगले काम करत आहे. पर्रिकरांनी आखून दिलेल्या मार्गावर चालण्याचे काम भाजप आणि प्रमोद सावंत सरकार करत आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.