Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Goa Elections 2022 : गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांकडून भाजप सोडण्याचा इशारा

Webdunia
रविवार, 23 जानेवारी 2022 (10:59 IST)
गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शनिवारी  पक्षाचा राजीनामा देण्याचा इशारा दिला. पुढच्या महिन्यातच गोव्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत लक्ष्मीकांत पार्सेकरांना भाजपनं उमेदवारीचं तिकीट दिलं नाहीय.
 
65 वर्षीय लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी एएनआयशी बोलताना म्हटलं की, "आता पक्षात राहू इच्छित नाही. संध्याकाळपर्यंतच राजीनामा देईन."
 
लक्ष्मीकांत पार्सेकर हे गोवा विधानसभेसाठी भाजपनं तयार केलेल्या जाहीरनामा समितीचे प्रमुख आहेत. शिवाय, पार्सेकर हे भाजपच्या कोअर कमिटीचे सदस्यही आहेत. लक्ष्मीकांत पार्सेकर 2014 ते 2017 मध्ये गोव्याचे मुख्यमंत्री होते.
 
काँग्रेसमधून भाजपात आलेल्या दयानंत सोपते यांना भाजपनं मांद्रेम विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिलंय. लक्ष्मीकांत पार्सेकर हे याच जागेवरून 2002 ते 2017 पर्यंत आमदार होते.
दयानंद सोपते यांनी 2017 साली काँग्रेसचे उमेदवार म्हणून पार्सेकरांना पराभूत केलं होतं. त्यानंतर 2019 साली सोपते भाजपमध्ये दाखल झाले.
 
"सध्या मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. माझं पुढचं पाऊल काय असेल, याचा निर्णय मी नंतर घेईन," असं पार्सेकर म्हणाले.
 
उत्पल पर्रिकरांची भाजपला सोडचिठ्ठी, पणजीतून अपक्ष लढणार
गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. उत्पल पर्रिकर हे पणजी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष लढणार आहेत.
गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 34 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मनोहर पर्रिकरांच्या राजकीय वारसदारीवर हक्क सांगणारे त्यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांना भाजपने उमेदवारी नाकारली होती.
 
पणजीतून विधानसभेची उमेदवारी मागणाऱ्या उत्पल यांना भाजपनं कोणतंच आश्वासन दिलं नव्हतं आणि त्यानंतर शिवसेनेसह 'आप'पर्यंत सगळे पर्रिकरांच्या मागं उभं राहण्याची भाषा करु लागले.
 
मनोहर पर्रिकरांनी ज्या पणजी शहरातल्या विधानसभा जागेवरुन निवडणूक लढवली, त्या जागेसाठी त्यांनी भाजपाकडे तिकीट मागितलं होतं. मात्र पणजीमधून बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी दिली आहे.
 
'मुलगा आहे म्हणून भाजपात तिकिट मिळत नाही'
गोव्याच्या निवडणुकीची भाजपाची जबाबदारी महाराष्ट्रातले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. फडणवीस सातत्यानं गोव्यात तळ ठोकून आहेत.
 
जेव्हा उत्पल पर्रिकरांच्या तिकिटाच्या मागणीबद्दल त्यांना विचारलं गेलं, तेव्हा त्यांनी म्हटलं होतं, "मनोहरभाईंनी गोव्यामध्ये भारतीय जनता पार्टी रुजवण्याकरता भरपूर काम केलं आहे. पण मनोहरभाईंचा किंवा एका नेत्याचा मुलगा आहे म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये तिकिट मिळत नाही.
 
त्यांचं कर्तृत्व असेल तर त्यांचा विचार होतो. त्यामुळे त्यांच्यासंदर्भातला जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो काही मी घेऊ शकत नाही. आमचं जे संसदीय मंडळ आहे, तेच त्याविषयी निर्णय घेऊ शकतं."
मनोहर पर्रिकरांचा मुलगा आहे म्हणून असलेल्या राजकीय वजनापोटी उत्पल यांना तिकिट मिळणार नाही हे तर भाजपानं स्पष्ट केलं होतं. .
 
'पर्रिकरांच्या जागेवर गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांना तिकिट का?'
"देवेंद्र फडणवीस हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि सध्याचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्या प्रतिक्रियेवर मी काही मत मांडण्याची गरज नाही. पण गेली 34 वर्षं भाईंबरोबर (मनोहर पर्रिकर) जे कार्यकर्ते होते ते माझ्यासोबत आहेत," उत्पल पर्रिकरांनी देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेबद्दल पत्रकारांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं होतं.
 
"जे सध्या गोव्याच्या राजकारणात चाललं आहे ते मला मान्य होण्यासारखं नाही. प्रामाणिकपणा, चारित्र्य याला काही किंमत देणार नाही आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांना तुम्ही मनोहर पर्रिकरांनी प्रतिनिधित्व केलेल्या मतदारसंघात तिकिट देणार? या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि हे केवळ पणजीपुरतं नाही आहे. गोव्यात सगळीकडेच जे चाललं आहे ते मान्य होण्यासारखं नाही," त्यांनी म्हटलं होतं.
 
पणजीची वारसदारी
सध्या इथं अंतान्सिओ ऊर्फ बाबुश मॉन्सेराटे आमदार आहेत.
 
2019मध्ये मनोहर पर्रिकरांचं निधन झाल्यावर जी पोटनिवडणूक झाली तेव्हा मॉन्सेराटे हे कॉंग्रेसचे उमेदवार होते आणि निवडूनही आले. पण त्याच वर्षी जे 10 कॉंग्रेसचे आमदार फुटून भाजपाला जाऊन मिळाले, त्यात मॉन्सेराटेही होते.
 
मनोहर पर्रिकर यांचं निधन झाल्यावर त्यांच्या कुटुंबात उमेदवारी देणार का अशी चर्चा होती आणि उत्पल यांचंही नाव होतं. पण उत्पल हे मनोहर पर्रिकर सक्रीय असतांना राजकारणापासून लांब राहिले. ते स्वत: इंजिनिअर आहेत आणि जवळपास दहा वर्षं नोकरीसाठी अमेरिकेत होते.
 
नंतर ते परत आले. पण पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून सिद्धार्थ कुंकेळीकर यांना तिकिट दिलं गेलं. त्यांचा या जागेवर अधिकारही होता कारण 2017 मध्ये जेव्हा मनोहर पर्रिकर केंद्रातून परत गोव्यात आले तेव्हा कुंकेळीकरांना त्यांच्यासाठी पणजीची जागा राजीनामा देऊन मोकळी केली.
 
उत्पल यांना भाजपा डावलतं आहे असं दिसताच विरोधी पक्ष त्यांच्यासाठी सरसावले होते. एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न ते करताहेत. एका बाजूला 'पर्रिकरां'ना आपल्याकडे ओढायचं आणि दुसरीकडे 'पर्रिकरां'ना डावललं म्हणून भाजपाला खिंडीत गाठायचं.
 
'उत्पल अपक्ष उभे राहिले, तर कोणीही उमेदवार देऊ नयेत'
शिवसेना खासदार संजय राऊत यासाठी सर्वांत पुढे होते.
 
"मनोहर पर्रिकर हे गोव्याचे प्रमुख नेते होते. गोव्याच्या विकासात त्यांचं मोठं योगदान होतं. पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाशी भाजपानं ज्या प्रकारचं वैर घेतलं आहे, ते काही कोणाच्या मनाला पटत नाही, जरी आम्ही वेगवेगळ्या राजकीय पक्षांतले असलो तरीही," संजय राऊत सोमवारी (17 जानेवारी) माध्यमांशी बोलतांना म्हटलं होतं.
 
एवढं म्हणून राऊत थांबले नाहीत. उत्पल पर्रिकरांनी धाडस दाखवावं असं म्हणतांनाच जर ते अपक्ष म्हणून उभारले तर त्यांच्याविरुद्ध कोणीही उमेदवार देऊ नये असंही आवाहन राऊत यांनी केलं.
 
"मला खात्री आहे की उत्पल पर्रिकरांना भाजपाला उमेदवारी द्यावी लागेल. ज्याप्रकारे आम्ही सगळे त्यांच्या मागे उभे राहिलो आहे ते पाहता भाजपाला उत्पल यांचा विचार करावाच लागेल. पण जर तसं झालं नाही आणि ते अपक्ष लढणार असतील तर सर्व विरोधी राजकीय पक्षांनी त्यांच्या मागे उभं रहावं अशी आमची भूमिका आहे. 'आम आदमी पार्टी' ,'तृणमूल', कॉंग्रेस, 'गोवा फॉरवर्ड पार्टी' यांच्यासह कोणीही त्यांच्याविरुद्ध उमेदवार देऊ नये," संजय राऊत यांनी म्हटलं होतं.
 
एकीकडे शिवसेनेची भूमिका तर दुसरीकडे गोव्यातला महत्त्वाचा पक्ष बनलेल्या 'आप'नं पण पर्रिकरांना आपल्या जवळ ओढण्याचे संकेत दिले.
 
रविवारी (16 जानेवारी) अरविंद केजरीवाल गोव्यात होते. उत्पल पर्रिकरांना 'आप'मध्ये घेणार का असं विचारल्यावर म्हणाले," अगोदर उत्पल पर्रिकरांना 'आप'मध्ये यायचं आहे का ते विचारा मग मी सांगेन. त्यांचं स्वागत जरुर होईल, पण त्यांना यायचं आहे का?"
 
'पर्रिकरांचा मुलगा बंड करतो, हा नैतिक पेच'
गोव्यातल्या भाजपासमोर दोन मुख्य प्रश्न आहेत. एक म्हणजे भाजपासाठी पर्रिकरांच्या मुलानं टोकाची भूमिका घेणं हे किती धोक्याचं आहे? दुसरा, उत्पल पर्रिकर खरंच टोकाची भूमिका घेतील का?
 
"भाजपासाठी ही एका प्रकारे नैतिक आणि भावनिक कोंडी झाली आहे. म्हणजे पर्रिकरांचा मुलगासुद्धा आज बंड करतो, त्याला भाजपा आपला वाटत नाही, हा संदेश राज्यभर जाणं हा भाजपासमोरचा कठिण प्रश्न आहे. निवडणुकीच्या गणितात पणजी मतदारसंघात ते एकदम ताकदवान आहेत आणि त्यांना आत्मविश्वासही आहे. पण पर्रिकर विरोधात जाणं हा पेच आहे," असं गेली अनेक वर्षं गोव्याचं राजकारण जवळून बघणारे राजकीय पत्रकार प्रमोद आचार्य यांना वाटतं.
 
उत्पल पर्रिकर सध्या तरी भूमिका सोडणार नाही असंही त्यांना वाटतं. "सध्या तरी उत्पल पर्रिकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत आणि तिकिट दिलं नाही तर ते अपक्ष म्हणून उभे राहू शकतात. त्यांनी तशी तयारी ठेवली आहे आणि त्यादृष्टीनं ते कामही करताहेत. भाजपा त्यांना समजावण्याचा पूर्ण प्रत्यत्न करेल, पण त्यांना तिकिट देण्याच्या मात्र पक्षाचा मूड नाही. बाकीच्या मतदारसंघात याचा काय परिणाम होईल याचाही त्यांना अंदाज घ्यावा लागेल," प्रमोद आचार्य म्हणतात.
 

संबंधित माहिती

पंतप्रधान मोदी यांची सभा शिवतीर्थावर सभेतून उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका

मोशी होर्डिंग कोसळल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

iQOO Z9x 5G: सर्वात स्वस्त गेमिंग स्मार्टफोन उत्तम वैशिष्ट्येसह लॉन्च

महाराष्ट्र गद्दारांना कधीच माफ करणार नाही म्हणत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

स्वातीनंतर आता बिभव कुमारने तक्रार नोंदवली, म्हणाले केजरीवालांना अडकवणं मालिवाल यांचा हेतू

मनिका बत्रा आणि शरथ कमल पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला आणि पुरुष संघाचे नेतृत्व करतील

Russia-Ukrain War: रशिया युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षां विरोधात अपप्रचार करत असण्याचा अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेचा दावा

भाजपने रचला संपूर्ण कट, घटनेच्या वेळी केजरीवाल घरी नव्हते स्वातीचे आरोप खोटे असल्याचा अतीशी म्हणाल्या

IPL 2024 MI vs LSG: आज रोहित MI साठी खेळणार शेवटचा सामना, चाहत्यांचा प्रतिक्रिया व्हायरल

MI vs LSG : मुंबईच्या पलटनचा लखनौशी सामना, लखनौ सामना जिंकण्याच्या प्रयत्नात, प्लेइंग 11 जाणून घ्या

पुढील लेख
Show comments