Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चंद्रकांत पाटील म्हणजेच 'पाटीलभाऊ' गुजरात भाजपाचे अध्यक्ष कसे झाले?

Webdunia
बुधवार, 30 नोव्हेंबर 2022 (20:04 IST)
चंद्रकांत रघुनाथ पाटील हे नवसारीचे खासदार आहेत. भाजप वर्तुळात ते सीआर पाटील म्हणून तर निकटवर्तीयांमध्ये CR म्हणून प्रसिद्ध आहेत. काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचे नेते सी.आर. पाटील यांना 'पाटीलभाऊ' म्हणतात आणि त्यांच्यावर सतत टीका करत राहातात. भाऊ म्हणजे मूळचे मराठी आहेत आणि त्यांनी गुजराती नेतृत्वाला बाजूला सारले अशी ते टीका करतात.
 
पोलीसवाला नेता
सीआर पाटील यांचा जन्म 1955 साली महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातील पिंपरी आक्राऊट गावी झाला. त्यावेळी जळगाव मुंबई प्रांताचा भाग होता. 1960 साली भाषावार प्रांतरचनेत महाराष्ट्र आणि गुजरात अशी राज्यं निर्माण झाली. पाटील यांचे कुटुंबीय गुजरातला रवाना झाले.
 
सीआर पाटील यांनी आपलं प्राथमिक शिक्षण दक्षिण गुजरातमधून पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी सुरत इथल्या आयटीआय अर्थात इंडस्ट्रिअल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या संस्थेतून सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केला.
 
भाजपने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार सीआर पाटील आपले वडील आणि त्यांच्या जवळच्या लोकांप्रमाणे गुजरात पोलिसांमध्ये भरती झाले. प्रलंबित खटले आणि पोलीस कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी यांच्यासाठी सीआर पाटील यांनी पोलीस पर्सनल युनियन स्थापण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना अपयश आलं आणि त्यांना कामावरून निलंबित करण्यात आलं.
 
काही दिवसात त्यांनी राजीनामा दिला. 25 डिसेंबर 1989 रोजी अटल बिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत सीआर पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. योगायोग म्हणजे वाजपेयी आणि सीआर पाटील यांचा वाढदिवस एकाच दिवशी येतो.
 
सुरत भाजपचे खजिनदार म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. मात्र, निवडणुकांच्या राजकारणात येण्यासाठी त्यांना दोन दशकं प्रतीक्षा करावी लागली.
 
पाटील यांच्याप्रमाणे जसपाल सिंग, भावन भारवड, जेठा भारवड यांनीही राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी खाकी वर्दी सोडली होती.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी सख्य
राजकारणात प्रवेश केल्यानंतर सीआर पाटील यांनी काशीराम राणा यांच्या मदतीने माणसांचं जाळं विणलं, असं ज्येष्ठ पत्रकार जगदीश आचार्य सांगतात. सुरतमधील सी. आर. खरा आणि काशीराम राणा यांच्यासोबत काम केल्यामुळे पाटील यांची भाजपच्या वर्तुळात विशेष ओळख होती.
 
ते पुढे सांगतात, "राणा हे दक्षिण गुजरातमधलं प्रस्थ होतं. नरेंद्र मोदी गट आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल गट या शीतयुद्धात सीआर पाटील मोदी समर्थक म्हणून वावरले. काही महिन्यांनंतर कांशीराम राणा भाजपमधून बाहेर पडले आणि त्यांनी गुजरात परिवर्तन पक्षात प्रवेश केला. केशुभाई पटेल आणि गोरधन झडाफिया यांनी या पक्षाची स्थापना केली होती. 2014 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्ष भाजपमध्ये विलीन करण्यात आला."
 
2009 मध्ये लोकसभा-विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि लोकसभेसाठी नवसारी मतदारसंघ झाला. भाजपने या मतदारसंघातून पाटील यांना उमेदवारी दिली. भाजपप्रणित एनडीएला पराभवाला सामोरं जावं लागलं, पण सीआर पाटील निवडून आले आणि खासदार झाले.
 
गणेश उत्सव आणि गोविंदा कमिटी असे सणांचे उपक्रम त्यांनी सुरू केले. मराठा पाटील समाज मंडळ, महाराष्ट्रीयन विकास मंडळ, छत्रपती शिवाजी स्मारक समिती अशा संघटनांच्या माध्यमातून मराठीभाषिक जनतेत त्यांनी लोकप्रियता प्राप्त केली.
 
कोरोना काळात लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यावेळी त्यांनी पुढाकार घेऊन या भागातील स्थलांतरित कामगारांना त्यांच्या राज्यात म्हणजेच ओडिशा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहार इथे परत पाठवलं. सुरतच्या विमानतळाचा प्रश्न अनेक वर्ष घोळत पडला होता. सीआर पाटील यांनी तो प्रश्न मार्गी लावला. कंपन्यांचे मालक ते कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार असा सीआर पाटील यांचा जनसंग्रह आहे. सीआर पाटील स्वत: शेतकरी आणि उद्योगपती आहेत. मीडिया उद्योगसमूहातही त्यांचा वावर आहे. स्थानिक वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीचे ते मालक आहेत.
 
लोकप्रिय पाटील
2014 निवडणुकांवेळी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. त्यावेळी पाटील नवसारी मतदारसंघातून उमेदवार होते.
 
ज्येष्ठ पत्रकार अजय नायक यांनी सीआर पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीचा उंचावणारा आलेख जवळून पाहिला आहे.
 
"2014 निवडणुकांवेळी मी त्यांच्याबरोबर मतदारसंघात फिरलो आहे. लोकांशी त्यांचे असलेले संबंध अनुभवले होते. हा जनतेचा नेता असल्याचं मला जाणवलं. ते त्यांच्या मतदारसंघात लोकप्रिय आहेत. मोदी लाटेत पाटील 5,58,000 पेक्षाही जास्त मताधिक्याने निवडून आले. भाजपने दिलेल्या माहितीनुसार सर्वाधिक मताधिक्यासह निवडून येणाऱ्या उमेदवारांमध्ये सीआर पाटील तिसऱ्या स्थानी होते. अव्वल स्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी, दुसऱ्या स्थानी गाझियाबाद मतदारसंघातून व्ही.के. सिंग तर तिसऱ्या स्थानी सीआर पाटील होते."
 
नायक पुढे सांगतात की, पक्षाच्या तसंच समाजातील सर्व कडूगोड प्रसंगांमध्ये ते सहभागी होतात. काही वर्षांपूर्वी एका सार्वजनिक कार्यक्रमात मी त्यांना भेटलो. तो एक छोटेखानी समारंभ होता परंतु तरीही पाटील त्यात सहभागी झाले होते.
 
हा माझा दिवसातला 22 वा कार्यक्रम असल्याचं पाटील यांनी रात्री 9 वाजता सांगितलं. त्यातूनच त्यांचं नेटवर्किंग आणि लोकसंग्रह याची कल्पना आली. ISO सर्टिफिकेट मिळवणाऱ्या पहिल्या काही संस्थांमध्ये पाटील यांच्या ऑफिसचा समावेश होतो.
 
PRS Legislative Research या खासदारांच्या कामगिरीचं मूल्यमापन करणाऱ्या वेबसाईट्सनुसार 15व्या लोकसभेत पाटील यांची लोकसभेतली उपस्थिती 78 टक्के आहे. 16व्या लोकसभेत त्यांची लोकसभेतली उपस्थिती 91 टक्के होती. राष्ट्रीय सरासरी 80 टक्के होती. गुजरातमधील खासदारांची सरासरी उपस्थिती 84 टक्के होती. त्यांनी सहा डिबेट्समध्ये भाग घेतला.
 
17व्या लोकसभेत पाटील यांची सदनातील उपस्थिती 95 टक्के होती. राष्ट्रीय सरासरी 84 टक्के आहे. गुजरातच्या खासदारांची उपस्थिती 92 टक्के होती. सध्याच्या कार्यकाळात त्यांनी सहा डिबेट्समध्ये सहभाग नोंदवला आहे. 2019 निवडणुकांमध्ये त्यांनी 6,89,000 च्या मताधिक्याने विजय मिळवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या मताधिक्यापेक्षाही पाटील यांना जास्त मतं होती.
 
16व्या आणि 17व्या लोकसभा निवडणुकांवेळी भाजपने गुजरातमध्ये 26पैकी 26 जागा जिंकल्या होत्या.
 
झेपावे दक्षिणेकडे
1980 मध्ये केशुभाई पटेल यांच्या रुपात पाटीदार समाजाचे नेते गुजरात भाजपचे पहिले अध्यक्ष होते. शंकरसिंह वाघेला यांनी उत्तर गुजरातमध्ये तर काशीराम राणा यांनी दक्षिण गुजरातमध्ये पक्ष रुजवला.
 
1991 मध्ये काशीराम राणा यांची गुजरात भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाली. 1996 पर्यंत तेच अध्यक्षपदी होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात राणा टेक्सटाईल खात्याच्या मंत्रीपदी होते. भाजपमधून बाहेर पडल्यानंतर वाघेला यांनी राष्ट्रीय जनता पक्षाची स्थापना केली आणि ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले.
 
नंतर वाघेला यांनी स्वत:चा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. ते युपीए सरकारच्या काळात राणा यांच्याप्रमाणे टेक्सटाईल खात्याचे मंत्री झाले.
 
भौगोलिकदृष्ट्या गुजरात राज्याचे चार भाग पडतात. उत्तर, दक्षिण, मध्य आणि सौराष्ट्र असे हे चार प्रांत आहेत. गेल्या दोन दशकांपासून सौराष्ट्रमधील भाजप नेत्यांची गुजरात भाजपच्या अध्यक्षपदी निवड होते. वजूभाई वाला (ओबीसी, राजकोट), आरसी फाल्डू (पाटीदार, जामनगर), पुरुषोत्तम रुपाला (पाटीदार, अम्रेली), विजय रुपानी (जैन, राजकोट) आणि जितू भाई वाघानी (पाटीदार, भावनगर) अशी ही परंपरा आहे. वजूभाई सध्या कर्नाटकचे राज्यपाल आहेत तर रुपानी गुजरातचे मुख्यमंत्री आहेत.
 
क्षत्रिय, पाटीदार, ओबीसी हा जातीय तिढा सोडवण्यासाठीच पाटील यांची नियुक्ती करण्यात आल्याचं ज्येष्ठ पत्रकार कौशिक मेहता सांगतात. पाटील यांची नियुक्ती केवळ राजकीय अभ्यासकांना नव्हे तर भाजपमधील अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का आहे. दक्षिण गुजरातमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांवेळी पाटीदार समाजाच्या मुद्याला काटशह देण्यात पाटील यांनी निर्णायक भूमिका बजावली आहे.
 
पाटील यांच्यासमोरील आव्हानं
पाटील यांनी सौराष्ट्र लॉबीकडून सूत्रं स्वीकारली आहेत. या समाजाचंही प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. ते ओबीसी, पाटीदार, क्षत्रिय अशा कोणत्याही समाजाचे नेते नाहीत. गुजरातच्या राजकारणात या तीन घटकांची भूमिका मोलाची राहिली आहे.
 
राज्यात आणि पक्षांतर्गत संरचनेत अनेक बदल प्रलंबित आहेत. वर्ग आणि जातीआधारित समीकरणं लक्षात घेऊन गुजरात भाजपची नव्याने घडी बसवण्याचं आव्हान पाटील यांच्यासमोर आहे.
 
आठ जागांसाठी पोटनिवडणुका होत आहेत. नगरपालिका, जिल्हा आणि पंचायत निवडणुका नजीकच्या काळात होणार आहेत. या आव्हानासाठी गुजरात भाजपला बळ देण्याचं काम पाटील यांच्या खांद्यावर आहे. राज्यस्तरीय नेता म्हणून त्यांना ओळख प्रस्थापित करावी लागेल.
 
नायक सांगतात, 2017 निवडणुकांवेळी पाटील यांच्या संघटनात्मक कौशल्याचा भाजपला फायदा झाला. 2019 लोकसभा निवडणुकीत त्यांनी याची पुनरावृत्ती केली. पक्षाची मतंही वाढली. आगामी निवडणुकांमध्ये भाजप विश्वासाने त्यांच्यावर राज्याची धुरा सोपवू शकते.
Published By -Smita Joshi

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अनेक महिने खराब होणार नाही मिठाई, या सोप्या टिप्स अवलंबवा

Healthcare Tips : दिवाळीच्या काळात दमा रुग्णांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी टिप्स

आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर दिवाळीत हे नक्की खरेदी करा

दिवाळीचे साप्ताहिक राशिभविष्य, जाणून घ्या या आठवड्यात कोणत्या राशींवर देवी लक्ष्मीची कृपा असेल 28 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2024

दिवाळीत या जीवांना पाहणे शुभ मानले जाते, जाणून घ्या काय महत्त्व

सर्व पहा

नवीन

मी कधीही महिलेचा अपमान केला नाही राजकीय कारणावरून वाद निर्माण केला गेला, अरविंद सावंतांनी मागितली माफी

भारतीय लष्कराचे मोठे यश, अनंतनागमध्ये 2 विदेशी दहशतवादी ठार

विचारधारेच्या विरोधात गेले....एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

धक्कादायक : नातवाने केला वृद्ध आजीवर लैंगिक अत्याचार

मलिककार्जुन खरगे यांच्या वक्तव्याला एकनाथ शिंदे यांचे प्रत्युत्तर

पुढील लेख
Show comments