Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री गजानन महाराज विजय ग्रंथ (21 अध्याय)

Webdunia
गजानन विजय ग्रंथ

अध्याय १
 
॥ श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी उदारकीर्ती । जयजयाजी प्रतापज्योती । जयजयाजी हे गणपती ! । गौरीपुत्रा मयूरेश्वरा ! ॥१॥ कार्यारंभीं तुझें स्मरण । करित आले जन । मोठमोठाले विद्वान । साधुसंत सत्पुरुष ॥२॥ तुझ्या कृपेची अगाध शक्ति । विघ्नें अवघीं भस्म होतीं । कापुसाचा पाड किती । अग्नीपुढें दयाघना ! ॥३॥ म्हणून आदरें वंदना । करीतसे मी तुझ्या चरणां । सुरस करवी पद्मरचना । दासगणूच्या मुखानें ॥४॥ मी अज्ञान मंदमती । नाहीं काव्यव्युत्पत्ति । परी तूं वास केल्या चित्तीं । कार्य माझें होईल हें ॥५॥ आतां आदि माया सरस्वती । जी ब्रह्माची होय प्रकृती । जी कविवरांची ध्येयमूर्ती । ब्रह्मकुमारी शारदा ॥६॥ त्या जगदंबेकारण । असो माझें साष्टांग नमन । मी लेंकरुं आहें अजाण । अभिमान माझा धरावा ॥७॥ तुझ्या कृपेची अगाध थोरी । पांगळाही चढे गिरी । मुका सभेमाझारीं । देई व्याख्यान अस्खलित ॥८॥ त्या तुझ्या कीर्तीला । कमीपणा न आणी भला । साह्य दासगणूला । ग्रंथरचनेस करी या ॥९॥ आतां हे पुराणपुरुषा । पांडुरंगा पंढरीशा । सच्चिदानंदा रमेशा । "पाहि माम्" दिनबंधो ॥१०॥ तूं सर्वसाक्षी जगदाधार । तूं व्यापक चराचर । कर्ता करविता सर्वेश्वर । अवघे कांहीं तूंच तूं ॥११॥ जग, जन आणि जनार्दन । तूंच एक परिपूर्ण । सगुण आणि निर्गुण । तूंच कीं रे मायबापा ॥१२॥ ऐसा तुझा अगाध महिमा । जो न कळे निगमागमा । तेथें काय पुरुषोत्तमा । या गणूचा पाड असे ॥१३॥ रामकृपा जेव्हां झाली । तेव्हां माकडां शक्ति आली । गोप तेही बनले बली । यमुनातीरीं गोकुळांत ॥१४॥ तुझी कृपा व्हाया जाण । नाहीं धनाचें प्रयोजन । चरणीं होतां अनन्य । तूं त्यातें साह्य करिशी ॥१५॥ ऐसा संतांनीं डांगोरा । तुझा पिटला रमावरा । म्हणून आलों तुझ्या द्वारां । आतां विन्मुख लावूं नको ॥१६॥ हें संतचरित्र रचावया । साह्य करी पंढरीराया । माझ्या चित्तीं बसोनिया । ग्रंथ कळसा नेई हा ॥१७॥ हे भवभवान्तक भवानीवरा । हे नीलकंठा गंगाधरा । ओंकाररुपा त्र्यंबकेश्वरा । वरदपाणी ठेवा शिरीं ॥१८॥ तुझें साह्य असल्यावर । काळाचाही नाहीं दर । लोखंडासी भांगार । परीस करुन ठेवीतसे ॥१९॥ तुझी कृपा हाच परीस । लोखंड मी गणूदास । साह्य करी लेंकरास । परतें मजला लोटूं नको ॥२०॥ तुला अशक्य कांहीं नाहीं । अवघेंच आहे तुझ्या ठाईं । लेंकरासाठीं धांव घेई । ग्रंथ सुगम वदवावया ॥२१॥ माझ्या कुळीची कुलदेवता । कोल्हापुरवासिनी जगन्माता । तिच्या पदीं ठेवितों माथा । मंगल व्हाया कारणें ॥२२॥ हे दुर्गे तुळजे भवानी । हे अपर्णे अंबे मृडानी । ठेवी तुझा वरदपाणी । दासगणूच्या शिरावर ॥२३॥ आतां वंदन दत्तात्रया । पाव वेगीं मसीं सदया । गजाननचरित्र गाया । प्रसादासह स्फूर्ति दे ॥२४॥ आतां शांडिल्यादि ऋषीश्वर । वसिष्ठ गौतम पाराशर । ज्ञाननभीं जो दिनकर । त्या शंकराचार्या नमन असो ॥२५॥ आतां अवघ्या संतमहंता । नमन माझें सर्वथा । दासगणूच्या धरुन हाता । ग्रंथ करवा लेखन ॥२६॥ गहिनी निवृत्ति ज्ञानेश्वर । श्रीतुकाराम देहूकर । हे भवाब्धीचें तारुं थोर । त्या श्रीरामदासा नमन असो ॥२७॥ हे शिर्डिकर सांई समर्था । वामनशास्त्री पुण्यवंता । दासगणूसी अभय आतां । तुमचें असो द्या संत हो ॥२८॥ तुम्हां अवघ्यांच्या कृपेनें । मी हें करीन बोलणें । दासगणू मी तुमचें तान्हें । कठोर मजविषयीं होऊं नका ॥२९॥ जी कां खरी माया असते । तीच बोलाया शिकविते । तुमचें माझें असें नातें । मायलेंकापरी हो ॥३०॥ लेखणी काढी अक्षर । परी तो तिच्यांत नाहीं जोर । ती निमित्तकारण साचार । लेखनरुपी कार्याला ॥३१॥ दासगणू लेखणी येथ । तुम्ही धारण करा ती अवघे संत । ग्रंथरचना रसभरित । हीच आहे प्रार्थना ॥३२॥ आतां श्रोते सावधान । संतकथेचें करा श्रवण । करोनिया एकाग्र मन । निजकल्याण व्हावया ॥३३॥ संत हेच भूमिवर । चालते बोलते परमेश्वर । वैराग्याचे सागर । दाते मोक्षपदाचे ॥३४॥ संत हेच सन्नीतीची । मूर्ति होय प्रत्यक्ष साची । संत भव्य कल्याणाची । पेठ आहे विबुध हो ॥३५॥ त्या संतचरित्रास । श्रवण करा सावकाश । आजवरी ना कवणास । संतांनीं या दगा दिला ॥३६॥ ईश्वरी तत्त्वांचे वाटाडे । संत हेची रोकडे । हे अमोघ ज्ञानाचे ते गाडे । भरले असती प्रत्यक्ष ॥३७॥ संतचरणीं ज्याचा हेत । त्याचा ऋणी रुक्मिणीकांत । आतां मलरहित करा चित्त । गजाननचरित्र ऐकावया ॥३८॥ भरतखंडामाझारीं । संत झाले बहुतापरी । ही न पर्वणी आली खरी । अवांतर देशाकारणें ॥३९॥ जंबुद्वीप हें धन्य धन्य । आहे पहिल्यापासोन । कोणत्या सुखाची ही वाण । येथें न पडली आजवरी ॥४०॥ याचें हेंच कारण । या भूमीस संतचरण । अनादि कालापासोन । लागत आले आहेत कीं ॥४१॥ नारद, ध्रुव, कयाधूकुमर । उद्धव, सुदामा, सुभद्रावर । महाबली अंजनीकुमर । अजातशत्रू धर्मराजा ॥४२॥ शंकराचार्य जगद्गुरु । जे पदनताचे कल्पतरु । जे अध्यात्मविद्येचे मेरु । याच देशीं झाले हो ॥४३॥ मध्व-वल्लभ-रामानुज । याचा ऋणी अधोक्षज । ज्यानें धर्माची राखिली लाज । निज सामर्थ्य दावोनिया ॥४४॥ नरसीमेहता तुलसीदास । कबीर कमाल सुरदास । गौरंग-प्रभूच्या लीलेस । वर्णन करावें कोठवरी ? ॥४५॥ राजकन्या मिराबाई । तिच्या भक्तीस पार नाहीं । जिच्यासाठीं शेषशायी । प्राशिता झाला विषातें ॥४६॥ गोरख-मच्छेंद्र जालंदर । जे का योगयोगेश्वर । ज्यांचा नवनाथ भक्तिसार । ग्रंथ असे लीलेचा ॥४७॥ ज्यांनीं नुसतीच हरिभक्ति । करुन साधिला श्रीपती । ते नामा नरहरी सन्मति । जनी कान्हो संतसखू ॥४८॥ चोखा-सावता-कूर्मदास । दामाजीपंत पुण्यपुरुष । ज्यांच्या कारणें वेदरास । गेला महार होऊन हरी ॥४९॥ मुकुंदराज जनार्दन । बोधला निपट निरंजन । ज्यांचीं चरित्रें-गायन । केलीं मागें महिपतींनीं ॥५०॥ म्हणून त्यांचीं नांवें येथ । मी न साकल्यें आतां देत । नुसते सांगतों वाचा ग्रंथ । भक्तिविजय भक्तमाला ॥५१॥ त्यानंतर जे जे झाले । त्या त्या संतां मी गाइले । ग्रंथ असती तीन केले । ते पहा म्हणजे कळेल कीं ॥५२॥ त्या संतांच्या तोडीचा । संत श्रीगजानन साचा । या अवतारी पुरुषाचा । प्रभाव खचित लोकोत्तर ॥५३॥ मीं जीं मागें गाईलीं । संतचरित्रें असतीं भलीं । तीं सारांशरुपें सांगितलीं । त्रय ग्रंथातून विबुध हो ॥५४॥ आतां हें सांगोपांग । चरित्र कथितों ऐका चांग । मम सुदैवें आला योग । हें चरित्र रचण्याचा ॥५५॥ जो प्रथमतांच मी पाहिला । आकोटासन्निध संत भला । तोच मागें राहिला । त्याचें ऐका कारण ॥५६॥ माळा आधीं ओविती । मग मेरुमणी जोडिती । तीच आजी झाली स्थिति । ह्या चरित्र रचण्याची ॥५७॥ शेगांव नामें वर्हाडांत । ग्राम आहे प्रख्यात । खामगांव नामें तालुक्यांत । व्यापार चाले जेथ मोठा ॥५८॥ ग्राम लहान साचार । परि वैभव त्याचें महाथोर । ज्याचें नांव अजरामर । झालें साधूमुळें जगत्रयीं ॥५९॥ त्या शेगांव सरोवरीं भलें । गजानन कमल उदया आलें । जें सौरभें वेधितें झालें । या अखिल ब्रह्मांडा ॥६०॥ हा शेगांव खाणीचा । हिरा गजानन होय साचा । प्रभाव त्या अवलियाचा । अल्पमतीनें वाणितों मी ॥६१॥ तें आतां अवधारा । गजाननचरणीं प्रेम धरा । येणें तुमचा उद्धार खरा । होईल हें विसरुं नका ॥६२॥ गजाननचरित्र मेघ थोर । तुम्ही श्रोते अवघे मोर । चरित्ररुपीं वर्षतां नीर । नाचाल वाटे निःसंशय ॥६३॥ शेगांवचे पौरवासी । परम भाग्याचे निश्चयेंसी । म्हणून लाधले तयांसी । गजानन हें संतरत्न ॥६४॥ जेव्हां करावें लागे पुण्य । तेव्हांच लाभती संतचरण । संतश्रेष्ठ देवाहून । येविषयीं शंका नसे ॥६५॥ रामचंद्र पाटलांनीं । केली माझी विनवणी । पंढरी क्षेत्रीं येऊनी । कार्तिकीच्या वारीला ॥६६॥ माझा मनीं हेत होता । गावें गजानन-चरित्रा । परी त्याची तत्त्वतां । संगत नाहीं लागली ॥६७॥ त्या माझ्या वासनेची । पूर्तता करण्यासाठीं । केली रामचंद्राची । योजना या समर्थें ॥६८॥ खर्या संताचें धोरण । न कळे कोणालागोन । महापुरुष गजानन । आधुनिक संत चूडामणी ॥६९॥ या महापुरुषाचा । ठावठिकाण कोणचा । वा पत्ता त्यांच्या जातीचा । इतिहासदृष्टया न लागे कीं ॥७०॥ जेवीं ब्रह्माचा ठावठिकाण । न कळे कोणालागून । ते ब्रह्मास पाहून । निश्चय त्याचा करणें असे ॥७१॥ जो कां हिरा तेजमान । पूर्णपणें असे जाण । तेज त्याचें पाहोन । ज्ञाते तल्लीन होती कीं ॥७२॥ तेथ त्या हिर्याची । खाण आहे कोणाचि । हे विचारीं आणण्याची । गरज मुळीं राहात नसे ॥७३॥ ऐन तारुण्याभीतरीं । गजानन आले शेगांवनगरीं । शके अठराशाभीतरीं । माघ वद्य सप्तमीला ॥७४॥ कोणी कोणी म्हणती जन । श्रीसमर्थांचें जें कां स्थान । त्या सज्जनगडाहून । या देशीं आले हे ॥७५॥ परियाला पुरावा । सबळ ऐसा नाहीं बरवा । परी कांहीं तरी असावा । अर्थ त्याच्या म्हणण्यांत ॥७६॥ लोक अवघे भ्रष्ट झाले । नाना यातनें गांजले । त्यांच्यासाठीं वाटतें केलें । कौतुक ऐसें समर्थांनीं ॥७७॥ जगाचा करण्या उद्धार । गजाननरुपें अवतार । धरुन आले महीवर । पुन्हां समर्थ सिद्धयोगी ॥७८॥ कोणत्याही कलेवरी । योगीपुरुष प्रवेश करी । ऐसा प्रकार भूमीवरी । जगद्गुरुंनीं केला असे ॥७९॥ गोरख जन्मला उकिरड्यांत । कानीफा गजकर्णांत । चांगदेव नारायण डोहांत । योनीवांचून प्रगटले ॥८०॥ तैसेंच येथें कांहींतरी । झालें असावें निर्धारी । गजाननासी अंगें सारीं । होतीं योगाचीं अवगत ॥८१॥ हें त्यांच्या लीलेवरुन । पुढें कळेल तुम्हां लागून । योगाचें अगाध महिमान । त्याची सरी न ये कोणा ॥८२॥ शेगांवीं माघमासीं । वद्य सप्तमी ज्या दिवशीं । हा उदय पावला ज्ञानराशी । पदनतातें तारावया ॥८३॥ त्या वेळची तुम्हां कथा । सांगतों मी ऐका आतां । एक भाविक गृहस्थ होता । नाम ज्याचें देविदास ॥८४॥ हा देविदास सज्जन । पातूरकरांचा वंशज जाण । शाखा ज्यांची माध्यंदिन । मठाधिपती होता तो ॥८५॥ त्याच्या एका मुलाची । ऋतुशांति होती साची । त्यानिमित्त भोजनाची । तयारी होती त्याचे घरा ॥८६॥ उष्टया पत्रावळी रस्त्यावर । टाकिल्या होत्या साचार । घराचिया समोर । त्या देविदास विप्राच्या ॥८७॥ तो गजानन समर्थसिद्धयोगी । बसले होते तया जागीं । एक बंडी होती अंगीं । जुन्या पुराण्या कापडाची ॥८८॥ कोणत्याहि उपाधीचें । नांव नव्हतें जवळीं साचें । पात्र पाणी प्यावयाचें । होता एक भोपळा ॥८९॥ कच्ची चिलीम हातांत । जी होती तयांची स्वकृत । कुंभाराच्या भट्टीप्रत । जिनें नव्हतें पाहिलें ॥९०॥ नासाग्र दृष्टि मुद्रा शांत । तपोबल अंगीं झळकत । प्राचीच्या वालरवीवत् । वर्णन किती करावें ॥९१॥ मूर्ति अवघी दिगंबर । भाव मावळला आपपर । आवडनिवड साचार । राहिली न जवळी जयाच्या ॥९२॥ ती समर्थांची स्वारी । बैसोनिया रस्त्यावरी । शोधन पत्रावळीचे करी । केवळ निजलीलेनें ॥९३॥ शीत पडल्या दृष्टीप्रत । तें मुखीं उचलुनी घालीत । हें करण्याचा हाच हेत । ’अन्नपरब्रह्म’ कळवावया ॥९४॥ कां कीं गर्जोन सांगे श्रुती । अन्न हेंच ब्रह्म निगुती । "अन्नम् ब्रह्मेति" ऐसी उक्ती । उपनिषदांठायीं असे ॥९५॥ त्याची पटवावया खण । शितें वेंचती दयाघन । त्याचा सामान्य जनांलागून । भावार्थ तो कळला नसे ॥९६॥ बंकटलाल आगरवाला । होता रस्त्यानें चालला । त्यानें हा प्रकार पाहिला । आपल्या त्या स्नेह्यासह ॥९७॥ दामोदरपंत कुलकर्णी । त्यांच्या स्नेह्याचें नांव जाणी । दोघे तो प्रकार पाहोनी । आश्चर्यचकित जाहले ॥९८॥ आणि एकमेकांप्रत । बोलूं लागले ऐसें सत्य । कीं याची करणी विपरीत । वेडयापरी दिसतसे ॥९९॥ हा अन्नार्थी जरी असतां । तरी पात्र मागून घेता । देवीदासही यातें देता । कां कीं तोही सज्जन ॥१००॥

द्वारीं आलेला याचक । लावी ना सुज्ञ परत देख । कांहीं न चाले तर्क । कृतीवरुनी याच्या ह्या ॥१॥ बंकटलाल म्हणे पंतासी । ऐसेच उभें रस्त्यासी । आपण राहूं यत्कृतीसी । अजमावयाकारणें ॥२॥ खरे साधु पिशापरी । जगीं वागती वरवरी । ऐसी व्यासाची वैखरी । बोलली आहे भागवतांत ॥३॥ कृतीनें हा दिसे वेडा । परी वाटे ज्ञानगाडा । वा विमल ज्ञानाचा हुडा । असावा कीं प्रत्यक्ष ॥४॥ ऐसा विचार परस्पर । करुं लागले साचार । रत्न असतां समोर । पारखी तोच जाणे त्या ॥५॥ पंथें हजारों लोक गेले । परी न कोणी पाहिले । या दोघांवांचून भले । याचा विचार कर हो ! ॥६॥ हिरे गारा एक्या ठायीं । मिसळल्या असती जगा ठायीं । पारखी तो निवडून घेई । गार टाकून हिर्यातें ॥७॥ प्रथमता तो पुढें झाला । बंकटलाल आगरवाला । गजाननासी विचारण्याला । विनयानें येणें रीतीं ॥८॥ ह्या पत्रावळीच्या शोधना । कां हो करितां कळेना । क्षुधा असेल आपणां । तरी तरतूद करुं अन्नाची ॥९॥ त्यानें ऐसें विचारिलें । परि न उत्तर मिळालें । नुसतें वरी पाहिलें । उभयतांच्या मुखाकडे ॥११०॥ तो सतेज कांती मनोहर । दंड गर्दन पिळदार । भव्य छाती दृष्टि स्थिर । भृकुटी ठायीं झाली असे ॥११॥ निजानंदीं रंगलेला । ऐसा योगी पाहिला । मौनेंच नमस्कार केला । चित्तीं संतोष पावोनिया ॥१२॥ देविदासबुवासी । सांगूं लागले प्रेमेंसी । तुम्ही पात्र वाढून वेगेंसी । आणा एक बाहेर ॥१३॥ देविदासें तैसें केलें । पक्वान्नांनीं भरलेलें । पात्र आणून ठेविलें । द्वारासमोर स्वामीपुढें ॥१४॥ ठेविलेल्या पात्रावरी । भोजना बैसली समर्थस्वारी । चवी न कशाची अंतरीं । अणुमात्र उरली असे ॥१५॥ अनुपम ब्रह्मरसाला । जो पिऊन तृप्त झाला । तो कां मागतो गुळवण्याला । मिटक्या मारीत बैसेल ? ॥१६॥ जो सार्वभौम नृपवर । झाला असे साचार । अशा नरासी जहागीर । मिळाल्यासी प्रेम नुपजे ॥१७॥ अवघीं पक्वान्नें एक केलीं । आवडनिवड नाहीं उरली । जठराग्नीची तृप्ति केली । दोन प्रहरच्या समयाला ॥१८॥ बंकटलाल तें पाहून । पंतासी करी भाषण । ह्या वेडा म्हणालों आपण । ती निःसंशय झाली चुकी ॥१९॥ सुभद्रेसाठीं द्वारकेला । अर्जुन ऐसाच वेडा झाला । व्यवहाराचा विसर पडला । करुं लागला भलभलतें ॥१२०॥ तैसाच हा ज्ञानजेठी । मुक्तिरुप सुभद्रेसाठीं । वेडा झाला कसवटी । याची आतां घेणें नको ॥२१॥ धन्य आपुलें शेगांव । दृष्टी पाहिला योगीराव । "निरिच्छा" हा जहागीरगांव । दिला हरीनें जयाला ॥२२॥ सूर्य माध्यान्हीं आला । भाग भूमीचा तप्त झाला । पांखरें हीं आश्रयाला । जाऊन बैसलीं वृक्षावरी ॥२३॥ ऐशा भर उन्हांत । हा बैसला आनंदांत । हा ब्रह्मची होय साक्षात् । भय ना कशाचें उरलें या ॥२४॥ हा जेवळा यथेच्छपणीं । तुंब्यामध्यें नाहीं पाणी । तें पंता या लागुनी । आपण देऊं आणून ॥२५॥ पुसूं लागले दामोदर । तुंब्यामध्यें नाहीं नीर । मर्जी असल्या हा चाकर । पाणी द्याया तयार असे ॥२६॥ ऐसे शब्द ऐकिले । समर्थांनीं हास्य केलें । उभयतांसी पाहून वदले । तें ऐका सांगतों ॥२७॥ तुम्हां गरज असेल जरी । तरी आणून घाला वारी । एक ब्रह्म जगदांतरीं । ओतप्रोत भरलें असें ॥२८॥ तुम्ही आम्ही भेद तेथ । नाहीं उरला यत्किंचित । परी जगव्यवहार सत्य । आचरिला पाहिजे ॥२९॥ अन्न भक्षिलें देहानीं । म्हणून त्या पाहिजे पाणी । हा व्यवहार चतुरांनीं । अवश्य पाहिजे जाणिला ॥१३०॥ म्हणून तुमच्या चातुर्यासी । गरज असल्या तुम्हां साची । तरतूद करा पाण्याची । म्हणजे अवघें संपलें ॥३१॥ हें भाषण ऐकतां । दोघे हर्षले तत्त्वतां । बंकटलाल म्हणे पंता । आपुलें आहे भाग्य धन्य ॥३२॥ पाणी आणण्या दामोदर । घरांत गेले साचार । तों इकडे प्रकार । काय घडला तो ऐका ॥३३॥ कूपाचिया शेजारीं । हाळ होता निर्धारीं । जेथें जनावरें सारीं । पीत होतीं पाण्याला ॥३४॥ तेथें जाऊन पाणी प्याले । तृप्ततेचे ढेकर दिले । तों इतक्यांत घेऊन आले । पंत पाणी गडव्यांत ॥३५॥ हां हां तें गढूळ पाणी । समर्था न लावा वदनीं । तें जनावरालागुनी । योग्य आहे प्यावया ॥३६॥ मीं हें पहा आणिलें नीर । गोड निर्मळ थंडगार । वासित केलें साचार । वाळा घालून यामध्यें ॥३७॥ ऐसें भाषण ऐकतां । महाराज वदले तत्त्वतां । व्यावहारिक अवघ्या कथा । ह्या न सांगा आम्हां तुम्ही ॥३८॥ हें अवघें चरचर । ब्रह्में व्याप्त साचार । तेथें गढुळ,निर्मळ वासित नीर । हे न भेद राहिले ॥३९॥ पाणी तरी तोच आहे । निर्मळ गढुळ तोच पाहे । सुवास कुवास दोन्ही हें । रुप त्याचें निःसंशय ॥१४०॥ पिणाराही वेगळा । त्यापासून ना निराळा । ईश्वराची अगाध लीला । ती कळे या नरजन्मीं ॥४१॥ तें दिलें टाकून । व्यवहारीं गोविलें मन । यांचेंच करा सदा मनन । कशापासून जग झालें ॥४२॥ ऐसी ऐकतां समर्थवाणी । दोघे गेले गहिंवरोनी । अनन्यभावें समर्थचरणीं । लोळावया तयार झाले ॥४३॥ तो त्यांचा जाणोन हेत । महाराज निघाले पळत पळत । वायूच्या त्या गतिप्रत । अडथळा जगीं कोण करी ? ॥४४॥ यापुढील कथा पाही । निवेदन होईल द्वितीयाध्यायीं । अवधान द्यावें लवलाही । त्या श्रवण करावया ॥४५॥ हा गजाननविजय ग्रंथ । आल्हादवो भाविकांप्रत । हेंच विनवी जोडोन हात । ईश्वरासी दासगणू ॥१४६॥ श्रीहरिहरार्पणमस्तु॥ शुभं भवतु ॥ ॥ इति प्रथमोऽध्यायः समाप्तः ॥

अध्याय २
 
॥ श्रीगणेशाय नमः ॥ जयजय अज अजिता सर्वेश्वरा । हेचंद्रभागातटविहारा । पूर्णब्रह्मा रुक्मिणीवरा । दीनबंधो पाहि माम् ॥१॥ तुझ्या वशिल्यावांचून । अवघेंच देवा आहे शीण । कुडीमाजीं नसल्या प्राण । कोण विचारी मढयातें ॥२॥ सरोवराची दिव्य शोभा । तोयामुळें पद्मनाभा । रसभरीत आंतला गाभा । टरफलातें महत्त्व आणी ॥३॥ तुझी कृपा त्याच परी । शरणांगतातें समर्थ करी । पाप ताप दैन्य वारी । हेंच आहे मागणें ॥४॥ मागले अध्यायीं झालें कथन । समर्थ गेले निघून । तेणें बंकटलाला लागून । हुरहूर वाटूं लागली ॥५॥ गोड न लागे अन्नपाणी । समर्थांचा ध्यास मनीं । न हाले दृष्टीपासोनी । गजाननाचें रुप तें ॥६॥ जिकडे पहावें तिकडे भास । होवो लागला त्यांचा खास । याचें नांव श्रोते ध्यास । उग्या नसती पोरचेष्टा ॥७॥ चुकलेल्या धेनूची । वत्स शुद्धि करी साची । तैसी बंकटलालाची । स्थिति झाली विबुध हो ! ॥८॥ हें हितगुज सांगावया । जागा नव्हती कोठें तया । वडिलांपासीं बोलावया । छाती त्याची होईना ॥९॥ ऐशा रीति चित्तीं भलें । विचाराचें काहूर झालें । शेगांव अवघें धुंडाळिलें । परी न पत्ता लागला ॥१०॥ घरीं येतां वडील पुसती । भवानी राम सन्मती । बाळा तुझी आज वृत्ती । का रे झाली चंचळ ॥११॥ चित्तीं उत्साह दिसेना । वदनीं दिसे म्लानपणा । ऐशा असह्य यातना । होती कशाच्या सांग मज ? ॥१२॥ तूं पोर्‍या तरणा ज्वान । नाहीं कशाची तुला वाण । ऐसें साच असोन । चिंतातुर दिसतोसी ॥१३॥ किंवा शरीरीं कांहीं व्याधी । होतसे ती सांग आधीं । चोरुन पुत्र ठेवी न कधीं । गोष्ट कोणती पित्याला ॥१४॥ कांहीं तरी सांगून । केलें पित्याचें समाधान । पुन्हा शोधाकारण । फिरुं लागला शेगांवीं ॥१५॥ बंकटलालाचे शेजारीं । एक होते सदाचारी । घरीं होती जमेदारी । परी अभिमान नसे त्याचा ॥१६॥ ते देशमुख रामाजीपंत । वयानें वृद्ध अत्यंत । बंकटलालानें इत्यंभूत । हकीकत त्यांना निवेदिली ॥१७॥ ते बोलले बंकटलाला । तुझा वृत्तान्त मी ऐकिला । तूं जो पुरुष कथिसी मला । तो योगी असावा कोणीतरी ॥१८॥ योग्यावांचुनी ऐशा क्रिया । मिळती न कोठें पाहावया । पूर्वसुकृता वांचोनिया । होणें न दर्शन अशाचें ॥१९॥ तूं घेतलें दर्शन । जन्म तुझा धन्य धन्य । भेटतां ते तुजलागून । ने मलाही दर्शना ॥२०॥ ऐशा स्थितींत दिवस चार । गेले निघून साचार । बंकटलालासी तीळभर । विसर न पडे तयाचा ॥२१॥ गोविंदबुवा टाकळीकर । होते एक कीर्तनकार । ज्यांच्या कीर्तनीं शारंगधर । प्रसन्नचित्त होतसे ॥२२॥ लौकिक यांचा वर्‍हाडांत । होता मोठया प्रमाणांत । ते आले फिरत फिरत । कीर्तन कराया शेगांवीं ॥२३॥ शंकराच्या मंदिरीं । झाली कीर्तनाची तयारी । धांवो लागल्या नरनारी । कीर्तन ऐकायाकारणें ॥२४॥ बंकटलालही तेथें आला । कीर्तन श्रवणासाठीं भला । मध्यें शिंपी भेटला । पितांबर नाम ज्याचें ॥२५॥ हा शिंपी पितांबर । भोळां भाविक होता फार । त्यासी समर्थाचा समाचार । बंकटलालें कथन केला ॥२६॥ दोघे कीर्तना चालले । तों अवचित समर्थ पाहिले । मागल्या बाजूस बसलेले । फरसावरी तेधवां ॥२७॥ मग कशाचें कीर्तन । गेले उभयतां धांवून । जेवीं द्रव्य-घटातें पाहून । कृपण जाय हपापोनी ॥२८॥ वा चातकातें स्वातिघन । वा मोरासी मेघदर्शन । किंवा तो रोहिणीरमण । चकोर पाहातां आनंदें ॥२९॥ तैसें उभयतांसी झालें । दूर उभे राहिले । विनयानें बोलूं लागले । कांहीं आणूं का खावया ? ॥३०॥ महाराज बोलले त्यावरी । तुला गरज असेल जरी । आण झुणकाभाकरी । माळणीच्या सदनांतून ॥३१॥ बंकटलालें सत्वरीं । चून अर्धी भाकरी । आणोन ठेविली हातावरी । तया योगेश्वराच्या ॥३२॥ चून भाकरी खात खात । वदले पितांबरासी समर्थ । जा जावोनी ओढयाप्रत । तुंबा भरोनी आण पाणी ॥३३॥ पितांबर बोले गुरुराया । ओढयास पाणी अल्प सदया । पाण्यांत तुंबा बुडावया । मुळीं नाहीं अवसर ॥३४॥ इतुकें असून तें पाणी । खराब केलें गुरुंनीं । तेवीं जाणार्‍या येणार्‍यांनीं । नाहीं पिण्याच्या योग्य तें ॥३५॥ मर्जी असल्या दुसरीकडून । पाणी आणितों तुंबा भरुन । तैं बोलले गजानन । दुसरें पाणी आम्हां नको ॥३६॥ नाल्याचेंच आण पाणी । आंत तुंबा बुडवोनी । उगीच ओंजळी-ओंजळींनीं । तुंब्यांत पाणी भरुं नको ॥३७॥ तुंबा घेऊन पितांबर । तात्काळ गेला नाल्यावर । तुंबा भरेल ऐसें नीर । कोठें न त्यानें पाहिलें ॥३८॥ तळवे पदाचे भिजतील । इतुकेंच तेथें होतें जल । करुन हातांची ओंजळ । तुंब्यांत पाणी भरणें नसे ॥३९॥ ऐसी झाली आड विहीर । चिंतावला पितांबर । हिय्या करुन अखेर । तुंवें स्पर्श केला जला ॥४०॥ तों ऐसें झालें अघटीत । तुंबा ठेवावा जेथ जेथ । तो बुडे तेथ तेथ । खळगा पाहून ओढयाला ॥४१॥ नाल्याचें घाण जीवन । तुंब्यांत स्फटिकासमान । आल तैसें पाहोन । शिंपी चित्तीं चकित झाला ॥४२॥ तो म्हणे ही ऐशी स्थिति । कीं आज झाली निश्चिती । ती योगेश्वराची साच शक्ति । संशय येथें धरणें नको ॥४३॥ तुंबा आणून ठेविला । योगेश्वराचे सान्निध्याला । त्याचा समर्थें स्वीकार केला । झुणकाभाकर सेविल्यावर ॥४४॥ बंकटलालासी सुपारी । मागते झाले साक्षात्कारी । अरे माळिणीच्या भाकरीवरी । माझी सेवा करतोस कां ? ॥४५॥ काढ सुपारी खिशांतून । फोडोन देई मजकारण । तें ऐकतां समाधान । बंकटलालास झालें बहु ॥४६॥ सुपारीच्या बरोबरी । दोन पैसे हातावरी । ठेवितां झाला व्याघ्रांबरी । दुदंडी तांब्याचे ॥४७॥ खडकु दुदंडी व्याघ्रांबरी । हीं मुसलमानी नाणीं सारीं । चालत होतीं व्यवहारीं । तया वर्‍हाड प्रांतांत ॥४८॥ पैशाप्रती पाहून । महाराज बोलले हांसोन । काय व्यापारी समजून । मजला तूं हें अर्पिसी ? ॥४९॥ हें नाणें तुमचें व्यवहारीं । मला न त्याची जरुरी । भावभक्ति नाण्यावरी । संतुष्ट मी रहातसे ॥५०॥ तें तुझ्याजवळ होतें । म्हणून भेटलों पुन्हां तूंतें । याचा विचार चित्तातें । करी म्हणजे कळेल ॥५१॥ जा आतां कीर्तन । दोघे जाऊन करा श्रवण । मी लिंबापाशीं बैसोन । कथा त्याची ऐकतों ॥५२॥ दोघे कीर्तनाप्रती आले । महाराज लिंबापाशीं बैसले । गोविंदबुवांचें सुरु झालें । आरंभींचें निरुपण ॥५३॥ निरुपणासी भागवतीचा । घेतला होता एक साचा । श्लोक एकादश स्कंधाचा । हंसगीतामधील ॥५४॥ बुवांनीं पूर्वार्धा विशद केलें । त्याचा उत्तरार्ध समर्थ वदले । तें ऐकोन घोटाळले । गोविंदबुवा मनांत ॥५५॥ हा उत्तरार्ध वदणारा । पुरुष अधिकारी दिसतो खरा । जा त्या घेऊन मंदिरा । या हो कीर्तनश्रवणास ॥५६॥ बंकटलाल पितांबर । आणिक मंडळी निघाली इतर । समर्थासी साचार । कीर्तनासी आणावया ॥५७॥ केली विनंती अवघ्यांनीं । श्रोते अती विनयांनीं । परी बसल्या जागेपासोनी । मुळीं न महाराज हलले हो ॥५८॥ गोविंदबुवा अखेर । येवोन जोडीते झाले कर । कृपा करावी एक वार । चला शिवाच्या मंदिरीं ॥५९॥ तुम्ही साक्षात्‌ शंकर । बरें न बसणें बाहेर । धन्यावांचून मंदिर । शून्य साच समर्था ॥६०॥ पूर्वजन्मींचें पुण्य भलें । माझें आज उदेलें । म्हणून हे दृष्टी पडले । साक्षात् चरण शिवाचे ॥६१॥ कीर्तनाची फलप्राप्ती । झाली आज मजप्रती । वेळ न करा गुरुमूर्ती । चला मंदिरीं माझ्यासवें ॥६२॥ ऐसें गोविंदबुवा बोलतां । समर्थ वदलें तत्त्वतां । ठेवी एकवाक्यता । भाषणीं गोविंदा लवमात्र ॥६३॥ तूं इतक्यांत प्रतिपादिलें । अवघें ईश्वरें व्यापिलें । आंत बाहेर कांहीं न उरलें । मग हा ऐसा हट्ट कां ? ॥६४॥ जें जें जयानें सांगावें । तें तें त्यानें आचरावें । शब्दच्छलासी न करावें । साधकानें केव्हांही ॥६५॥ भागवताचा श्लोक सांगसी । आणि त्याच्या विरुद्ध वागसी । कथेकर्‍याची रीत ऐसी । बरवी नव्हे गोविंदा ॥६६॥ पोटभर्‍या कथकेरी । तूं न व्हावें भूमीवरी । जा कीर्तन समाप्त करी । मी येथून ऐकतों ॥६७॥ बुवा कीर्तनीं परत आले । गर्जोन अवघ्यां बोलले । तुमच्या शेगांवीं अमोल आलें । रत्‍न हें त्या सांभाळा ॥६८॥ हें न शेगांव राहिलें । पंढरपूर खचीत झालें । चालते बोलते येथ आले । साक्षात्‌ हे पांडुरंग ॥६९॥ यांची तरतूद ठेवावी । सेवा यांची करावी । यांची आज्ञा मानावी । वेदवाक्यापरी हो ॥७०॥ तरीच तुमचें कल्याण । होईल निःसंशय करुन । अनायासें हें निधान । जोडलें त्या दवडूं नका ॥७१॥ कीर्तन अवघें सांग झालें । लोक आपुल्या घरां गेले । बंकटलाल घरीं आले । चित्तीं हर्ष मावेना ॥७२॥ आपल्या सन्माननीय पित्यासी । हकीकत कथिली प्रेमेंसी । बाबा आपुल्या घरासी । गजानन आणा हो ! ॥७३॥ पुत्रानें जें कथन केलें । तें भवानीरामें ऐकिलें । आणि प्रेमें ऐसें वदलें । तूंच ये त्या घेऊन ॥७४॥ पित्याची मिळाली संमती । बंकटलाल हर्षें अती । म्हणे कधीं भेटेल गुरुमूर्ती । मजला सदनीं आणावया ॥७५॥ पुढें माणिक चौकांत । चौथे दिवशीं सद्‌गुरुनाथ । भेटले बंकटलाला प्रत । अस्तमानाचे समयाला ॥७६॥ दिनपति अस्ता गेला । इकडे बोधसूर्य उदेला । माणिक चौक प्राचीला । बंकटलालाच्या भाग्यानें ॥७७॥ गुराखी घेऊन धेनूस । येऊं लागले ग्रामास । समर्थांच्या आसपास । गाई जमूं लागल्या ॥७८॥ त्या वाटले नंदसुत । आला येथें साक्षात । वृक्षावरी करितात । पक्षी किलकिलाट आनंदें ॥७९॥ दिवाबत्तीची तयारी । दुकानदार करिती खरी । अशा वेळीं आला घरीं । घेऊन बंकट महाराजा ॥८०॥ पित्यानें मूर्ति पाहातां क्षणीं । अती आनंद झाला मनीं । नमन साष्टांग केलें चरणीं । पाटावरी बैसविलें ॥८१॥ आणि विनविलें जोडोन होत । कांहीं भोजन करा येथ । तुम्ही साक्षात् पार्वतीकांत । प्रदोष वेळीं आला या ॥८२॥ शिव आराधन प्रदोषकालीं । घडेल तो भाग्यशाली । ऐसी आहे ऐकिली । स्कंदपुराणीं गोष्ट म्यां ॥८३॥ ऐसें म्हणोन आणिलें । बिल्वपत्र तात्काळ भलें । समर्थांच्या ठेविलें । परमभक्तीनें मस्तकीं ॥८४॥ करा येथें भोजन । ऐसें गेलों बोलून । परी स्वयंपाकाकारण । अवधी आहे कांहींसा ॥८५॥ स्वयंपाक होईपर्यंत । हे न थांबले जरी येथ । तरी प्रदोषकालीं पार्वतीकांत । गेला उपासी घरांतूनी ॥८६॥ त्यास करुं कैसी तोड । ऐसें संकट पडलें जड । जनसमुदाय प्रचंड । जमला मौज पाहावया ॥८७॥ विचार केला अखेरीं । दुपारच्या पुर्‍या आहेत घरीं । त्याच ठेवोन तबकांतरीं । पुढें ठेवूं समर्थांच्या ॥८८॥ ते अवघेच जाणती । कपट नाहीं माझ्या चित्तीं । भावें भेटतो उमापती । ऐसा आहे सिद्धान्त ॥८९॥ मी शिळें अवर्जुन । यास घालीत नाहीं अन्न । शिवाय पक्क्या रसोईकारण । शिळें म्हणणें उचित नसे ॥९०॥ चिंतिल्याप्रमाणें तयारी । तात्काळ त्यानें केली खरी । आणून ठेविलें समोरी । तबक एक समर्थांच्या ॥९१॥ पुर्‍या बदाम खारका । केळीं मोसंबीं मुळे देखा । भालाप्रती लाविला बुका । कंठीं घातिला पुष्पहार ॥९२॥ गुरुमूर्ति प्रसन्न चित्तें । अवघे झाले सेविते । जें जें पडेल पात्रातें । तें तें खाती भराभर ॥९३॥ उदरीं सुमारें तीन शेर । अन्न सांठविलें साचार । तेथेंच राहिले रात्रभर । श्रीगजानन महाराज ॥९४॥ बंकटलालें दुसरे दिवशीं । मंगल स्नान समर्थांसी । घातलें असे अतिहर्षी । तो न थाट वर्णवे ॥९५॥ घागरीं सुमारें शंभर । उष्णोदकाच्या साचार । पाणी घालती नारीनर । मन मानेल ऐशा रीतीं ॥९६॥ कुणी शिकेकाई लाविती । कुणी साबण घेऊन हातीं । समर्थांतें घासीती । पदकमळ आवडीनें ॥९७॥ कोणी दवना कोणी हीना । कोणी चमेली तेल जाणा । कोणी बेलियाच्या मर्दना । करुं लागले निजहस्तें ॥९८॥ अंगराग नानापरी । त्यांचें वर्णन कोण करी । बंकटलालाचिया घरीं । उणें नव्हतें कशाचे तें ॥९९॥ स्नानविधि संपला । पितांबर तो नेसविला । अति सन्मानें बैसविला । योगिराज गादीवरी ॥१००॥ भालीं गंध केशरी । गळ्यांत हार नानापरी । कोणी तुळशीमंजरी । वाहूं लागले शिरावर ॥१॥ नैवेद्य नानापरीचे । झाले समर्थार्पण साचे । भाग्य त्या बंकटलालाचें । खचित आलें उदयाला ॥२॥ तें बंकटलालाचें घर । झालें द्वारका साचार । तया दिनीं सोमवार । वार शिवाचा होता हो ॥३॥ अवघ्या मंडळींनीं आपुले । मनोरथ ते पूर्ण केले । एक मात्र त्यांतून उरले । इच्छाराम शेटजी ॥४॥ हा चुलत बंधु बंकटाचा । होता भाविक मनाचा । भक्त असे शंकराचा । त्यासी ऐसें वाटलें ॥५॥ आज आहे सोमवार । मसी उपास साचार । घरां प्रत्यक्ष शंकर । चालते बोलते आलेच कीं ॥६॥ त्यांची पूजा अस्तमानीं । यथासांग करोनी । करुं पारणा ऐसी मनीं । इच्छा त्यानें धरली असे ॥७॥ तों झाला अस्तमान । मावळलासे नारायण । इच्छारामें केलें स्नान । प्रदोष वेळा लक्षुनी ॥८॥ पूजासाहित्य घेऊन । साधु जे कां गजानन । त्यांचें केलें पूजन । परम प्रेमें करोनी ॥९॥ आणि विनंती केली वरी । झालें आहे दुपारीं । आपुलें तें भोजन जरी । परी आतां कांहीं खावें ॥११०॥ आपण जेवल्यावांचून । मी नाहीं घेणार अन्न । आहे मजला उपोषण । सोमवारचें गुरुराया ! ॥११॥ अवघ्या भक्तांचा हेत पुरला । माझा मात्र राहिला । तो पाहिजे पुरविला । तुम्ही कृपा करुन ॥१२॥ जन कुतूहल दृष्टींनीं । पाहूं लागले तया स्थानीं । इच्छाराम तो घेवोनी । नैवेद्य आला परातींत ॥१३॥ आंबेमोहर तांदळाचा । दोन मुदी भात साचा । नानाविध पक्वान्नांचा । थाट केला तयानें ॥१४॥ जिलबी राघवदास मोतीचूर । करंज्या अनारसे घीवर । शाखांचे नाना प्रकार । वर्णन करावे कोठवरी ? ॥१५॥ अगणित चटण्या कोशिंबिरी । वाडगा दह्याचा शेजारीं । तुपाची ती वाटी खरी । आदनाच्या सव्य भागा ॥१६॥ चार मनुष्यांचें अन्न । ऐसा नैवेद्य परिपूर्ण । समर्थांपुढें आणून । ठेवला इच्छारामानें ॥१७॥ पाहोन त्या नैवेद्यासी । महाराज बोलले आपणासी । खातो खातो अहर्निशीं । ऐसें बोलसी गणप्पा ॥१८॥ खा हें आतां अवघें अन्न । अघोर्‍या न करी अनमान । पाहों आले अवघे जन । तुझ्या अघोर वृत्तीला ॥१९॥ महाराज भोजना बैसले । अन्न अवघें पार केलें । पात्रीं न कांहीं ठेविलें । मीठ लिंबू तेंही पाहा ॥१२०॥ आग्रहाचा प्रकार । काय होतो अखेर । हें दावण्या साचार । कौतुक केलें गुरुवरें ॥२१॥ खणाणून उलटी झालि । खाल्ल्या अन्नाची ती भली । ऐसीच गोष्ट होती केली । श्रीरामदासें एकदां ॥२२॥ खिरीची झाली वासना । रामदासाचीया मना । तिची खोड मोडण्या जाणा । आकंठ खीर प्याले कीं ॥२३॥ उलटीं होतां परत । ती भक्षूं लागले सद्‌गुरुनाथ । श्रीरामदासस्वामी समर्थ । वासनेसी जिंकावया ॥२४॥ तैसें लोकाग्रहाला । घालावयासी शीघ्र आळा । हा उलटीचा प्रकार केला । अंगीं बळ असूनिया ॥२५॥ सत्‌पुरुषाचें आचरण । पुढील पिढीला साधन । होतें कराया संरक्षण । निसर्गाच्या धर्माचें ॥२६॥ तेंच समर्थें येथें केलें । लोकांलागीं सुचविलें । आग्रह करणें न चांगलें । तो विपरीत फळ देई ॥२७॥ असो उलटी झाल्यावरी । जागा केली साफ सारी । नेवोन बैसविले पहिल्या परी । स्नान घालोन महाराजा ॥२८॥ नरनारी दर्शनें घेती । महाराजांची आनंदवृत्ती । तों भजन करण्याप्रती । दिंडया आल्या दोन तेथें ॥२९॥ आवाज ज्यांचे सुस्वर । खडे पहाडी मनोहर । विठ्ठलाचा नामगजर । करुं लागले आवडीनें ॥१३०॥ इकडे महाराज आसनीं । होते ते वदले वदनीं । भजनाचिया मिषांनीं । "गणगण गणांत बोते" ॥३१॥ हेंच सर्वदा त्यांचें भजन । करिती टिचक्या वाजवून । ऐसा झाला आनंद जाण । रात्रभरीं ते ठायां ॥३२॥ ’गण गण’ हें त्यांचें भजन । हमेशा चाले म्हणून । लोकांनीं दिलें अभिधान । गजानन हें तयाला ॥३३॥ जो स्वयमेव ब्रह्म झाला । नांवरुप कोठून त्याला ? । नामरुपाचा गलबला । प्रकृतीच्या आश्रयास ॥३४॥ अस्ति-भाति-प्रिया ठायीं । योगेश्वर निमग्न राही । त्या आनंदा न वर्णवे कांहीं । त्याची उपमा त्यालाच असे ॥३५॥ आषाढीसी पंढरपूर । वा सिंहस्थीं गोदातीर । वा कुंभमेळ्यासी साचार । गर्दी होते हरिद्वारीं ॥३६॥ त्यापरि शेगांवांत । बंकटलालाच्या घरांत। लांबलांबून असंख्यात । जन येती दर्शना ॥३७॥

स्वामी समर्थ गजानन । हेच विठ्ठल नारायण । निश्चय विटेस ठेवून । पाय उभे राहिले ॥३८॥ त्यांचें वचन गोदातीर । आनंद हा हरिद्वार । गजबजलें शेगांव नगर । सदन राऊळ बंकटाचें ॥३९॥ जो ब्रह्मपदा पोंचला । जात कोठून उरली त्याला ? । सूर्याचिया प्रकाशाला । अवघेंच आहे सारखें ॥१४०॥ नित्य यात्रा नवी येई । समाराधना होती पाही । त्यांतें वाणितां शेषही । थकून जाईल निःसंशय ॥४१॥ तेथें माझा पाड कोण । मी कीटकासमान । अवघें वदे गजानन । निमित्त करुन माझ्या मुखा ॥४२॥ समर्थांची दिनचर्या । सांगतों थोडी या ठायां । अगाध त्यांचें चरित्र गाया । मज पामरा मती नसे ॥४३॥ कधीं करावें मंगलस्नान । कधीं हाळांत जाऊन । कधीं कधीं प्राशन । करावें गढूळ जलाचें ॥४४॥ त्यांच्या दिनचर्येचा । नियम नव्हता एक साचा । प्रकार वायूच्या गतीचा । न ये ठरवितां कोणासी ॥४५॥ चिलमीवरी प्रेम भारी । ती लागे वरच्यावरी । नव्हती आसक्ति तिच्यावरी । तें केवळ कौतुक ॥४६॥ असो आतां पुढीलाध्याया । भाव ठेवा ऐकावया । आली पर्वणी साधावया । वेळ करुं नका हो ! ॥४७॥ हें श्रीगजाननचरित्र । आदर्श होवो भाविकांप्रत । हेंच विनवी जोडोन हात । दासगणू ईशातें ॥१४८॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ ॥ इति द्वितीयोऽध्यायः समाप्तः ॥

अध्याय ३
 
॥ श्रीगणेशाय नमः ॥ जय जय सच्चिदानंदा श्रीहरी । कृपा करावी लौकरी । तुम्ही पदनताच्या वरी । कधीं न कठोर झालांत ॥१॥ तूं करुणेचा सागर । तूं दीन जनाचें माहेर । तूं भक्तासी साचार । कल्पतरु वा चिंतामणी ॥२॥ ऐसा तुझा अगाध महिमा । संत गाती राघवा रामा । दासगणूसी पुरुषोत्तमा । पावा वेळ करुं नका ॥३॥ असो बंकटलाला घरीं । राहाते झाले साक्षात्कारी । दीन दुबळ्यांचे कैवारी । श्रीगजानन महाराज ॥४॥ लांबलांबोनी भक्त येती । समर्थांतें वंदिती । मधु तेथें माशा जमती । न लगे करणें आमंत्रण ॥५॥ एके दिनी काय झालें । तें आतां सांगतों वहिलें । महाराज होते बसलेले । निजासनीं आनंदांत ॥६॥ ती प्रभातीची होती वेळा । प्राची प्रांत ताम्र झाला । पक्षी किलकिलाटाला । करुं लागले वृक्षावर ॥७॥ कुक्कुटाचे होती स्वप्न । मंदशीत वाहे पवन । वृद्ध करिती नामस्मरण । शय्येवरी बैसोनिया ॥८॥ उदयाचलीं नारायण । येऊं पाहे हर्षें करुन । तेणें तम पलायन । करुं लागला कंदरीसी ॥९॥ परम भाविक सुवासिनी । रत सडासंमार्जनीं । वत्स धेनूस पाहोनी । तोडूं लागलीं चर्‍हाटें ॥१०॥ ऐशा त्या रम्य वेळेस । एक साधु शेगांवास । येतां झाला दर्शनास । श्रीगजानन साधूच्या ॥११॥ तो भिकार गोसावी । मानमान्यता त्याची राहावी । कोठोनिया सांगा बरवी । श्रीमंताच्या मंडळींत ? ॥१२॥ भगवी चिंधी डोक्यास । झोळी वाम बगलेस । होती एक नेसण्यास । फाटकीसी लंगोटी ॥१३॥ मृगाजिनाचा गुंडाळा । पाठीवरी होता भला । ऐसा गोसावी बैसला । कोपर्‍यांत एकीकडे ॥१४॥ दर्शनासी भीड फार । होवो लागली साचार । अशा स्थितींत मिळणार । सवड कशी त्या गोसाव्यास ? ॥१५॥ तों ठायींच बैसोन । करुं लागला चिंतन । म्हणे समर्थाचे चरण । दृष्टि पडणें कठीण मला ॥१६॥ समर्थांचा लौकिक भला । मी काशींत ऐकला । आवडीनें नवस केला । भांग स्वामीस अर्पिण्याचा ॥१७॥ तो मम हेतु मनांत । जिरुन जाया पाहे येथ । या श्रीमान मंडळींत । माझ्या नवसास कोण पुसे ? ॥१८॥ गांजाचें नांव काढितां । लोक मजला देतील लाथा । मी तो आलों फेडण्याकरितां । नवस गांजाचा शेगांवीं ॥१९॥ माझ्या नवसाची ती मात । सांगू तरी कवणाप्रत ? । येथें एकही ना दिसत । प्रेमी या शांभवीचा ॥२०॥ जी वस्तु ज्या आवडे खरी । तिचाच तो नवस करी । आणि मानी सर्वतोपरी । हीच वस्तु उत्तम ॥२१॥ ऐसे नाना विचार । गोसावी करी साचार । झाला होता परम आतुर । दर्शन घ्याया समर्थांचें ॥२२॥ तें त्याचें मनोगत । जाणते झाले समर्थ । बोलते झाले इतरांप्रत । आणा काशीचा गोसावी ॥२३॥ तो पहा त्या कोपर्‍याला । आहे बिचारा दडून बसला । हें ऐकतां आनंद झाला । गोसाव्यास परमावधी ॥२४॥ आणि बोलला मनांत । त्रिकालज्ञ हे खरेच संत । मी जें बोललों मनांत । तें सर्व यांनीं जाणलें ॥२५॥ ज्ञानेश्वरींत षष्ठाध्यायीं । जी गोष्ट कथिली पाही । कीं स्वर्गलोकीच्या कथा त्याही । समजतात योगीवरा ॥२६॥ त्याचें आलें प्रत्यंतर । मला येथें साचार । धन्य धन्य हा साधुवर । त्रिकालज्ञ महात्मा ॥२७॥ न बोलतां माझा नवस । जाणतील हे पुण्य पुरुष । त्याचें प्रत्यंतर यावयास । अवधी उरला थोडका ॥२८॥ मंडळींनीं गोसाव्याला । पुढें आणोन उभा केला । तों महाराज वदले तयाला । काढ झोळीची पोटळी ॥२९॥ जी तीन महिनेपर्यंत । रक्षण केलीस झोळींत । त्या पोटळीचें आज येथ । होवो दे गा पारणें ॥३०॥ गोसावी पदीं लागला । गहिंवर त्यासी दाटला । गडबडा लोळूं लागला । बालकापरी स्वामीपुढें ॥३१॥ महाराज म्हणती गोसाव्यास । पुरे आतां उठोन बैस । पोटोळीच्या बुटीस । काढ बाहेर झोळीच्या ॥३२॥ नवस केलास ते वेळीं । नाहीं लाज वाटली । आणि आतां कां ही लाविली । चाळवाचाळवी निरर्थक ॥३३॥ गोसावी होता महा धूर्त । तो बोलला भीत भीत । जोडुनीया दोन्ही हात । ऐसें नम्र वाणीनें ॥३४॥ मी बुटी काढितों । नवस आपुला फेडितों । परि मागणें मागतों । एक तें द्या दीनाला ॥३५॥ आठवण माझ्या बुटीची । नित्य राहावी आपणा साची । हीच इच्छा मानसींची । आहे ती पूर्ण करा ॥३६॥ तुम्हां बुटीचें प्रयोजन । नाहीं हें मी जाणतों पूर्ण । परी बालकाची आठवण । राहाया बुटी स्वीकारा ॥३७॥ भक्त जी जी इच्छा करीत । ती ती ज्ञाता पुरवीत । अंजनीचा वृत्तान्त । आणा मनीं आपुल्या ॥३८॥ अंजनी होती वानरी । तिनें प्रार्थिला त्रिपुरारी । कीं तुम्हीं यावें माझ्या उदरीं । वानर होऊन शंकरा ! ॥३९॥ तें हरानें मानिलें । महारुद्र पोटीं आले । अंजनीचे पुरविले । मनोरथ चंद्रमौळींनीं ॥४०॥ तेथें शंकराकारण । आड ना आलें वानरपण । तेवीं माझ्या बुटीची आठवण । राहाया तीतें स्वीकारा ॥४१॥ त्यांतून तुम्ही कर्पूरगौर । साक्षात् आहां शंकर । म्हणून बुटीचा अव्हेर । करुं नको दयाळा ! ॥४२॥ ज्ञानवल्ली शंकरानें । म्हटलें आहे इजकारणें । ही इतरा आणील उणें । परि भूषण तुम्हांला ॥४३॥ महाराज किंचित्‌ घोटाळले । परि अखेर होय म्हणाले । माय पुरवी बालक-लळे । वेडेवांकुडे असले जरी ॥४४॥ गोसाव्यानें बुटी काढिली । हातावरी घेवोन धुतली । चिलमींत घालून पाजिली । पुण्यपुरुष गजानना ॥४५॥ ऐसा बुटीचा वृत्तान्त । काथलीसे कारणासहित । तो आणून ध्यानांत । विचार करणें प्रत्येकीं ॥४६॥ कांहीं दिवस राहोन । गेला गोसावी निघोन । आपणां धन्य मानोन । रामेश्वराकारणें ॥४७॥ ऐसी गांजाची पडली प्रथा । ते ठायीं तत्त्वतां । परी व्यसनाधीनता । नच आली समर्थांतें ॥४८॥ पद्मपत्राचियेपरी । ते अलिप्त होते निर्धारी । नये कोणास त्याची सरी । खरेंच अती थोर ते ॥४९॥ वेदऋचा अस्खलित । उदात्त-अनुदात्त स्वरांसहित । कधीं म्हणाव्या मुखीं सत्य । कधीं त्यांचें नांव नसे ॥५०॥ वेदाक्षरें पडतां श्रवणीं । साशंक व्हावें वैदिकांनीं । याच एका अनुमानीं । गजानन होते ब्राह्मण ॥५१॥ कधीं गवयासमान । अन्य अन्य रागांतून । एकच पदातें गाऊन । दाखवावें निजलीलें ॥५२॥ चंदन चावल बेलकी पतीया । प्रेम भारी या पदा ठाया । ते आनंदांत येवोनिया । वरच्यावरी म्हणावें ॥५३॥ कधीं गणगणाचें भजन । कधीं धरावें नुसतें मौन । कधीं राहावें पडून । शय्येवरी निचेष्टित ॥५४॥ कधीं वागावें पिशापरी । कधीं भटकावें कांतारीं । कधीं शिरावें जाऊन घरीं । एखाद्याच्या अवचीत ॥५५॥ असो त्या शेगांवांत । जानराव देशमुख विख्यात । होता त्याचा प्राणान्त । व्हावयाचा समय आला ॥५६॥ व्याधी शरीरीं वळावली । शक्ति पार निघून गेली । प्रयत्‍नांची कमाल केली । वैद्यांनीं ती आपुल्या ॥५७॥ नाडी पाहोन अखेर । आप्ता कळविला समाचार । प्रसंग आहे कठीण फार । नसे आशा वांचण्याची ॥५८॥ आम्हीं प्रयत्‍न केले अती । परी यश ना आलें तिळरती । यांना आतां घोंगडयावरती । काढोन ठेवा हेंच बरें ॥५९॥ तें ऐकतां अवघे आप्त । दुःख करती अत्यंत । जानरावा आम्हां प्रत । सोडून तूं जाऊं नको ॥६०॥ तुझ्याप्रीत्यर्थ नवस केले । नाना दैवतांलागीं भले । परी न कोणी पावले । हाय हाय रे दुर्दैवा ॥६१॥ वैद्यानें टेकिले हात । प्रयत्‍न झाले कुंठित । आतां अखेरच्या यत्‍नाप्रत । करोन पाहूं एक वेळा ॥६२॥ बंकटलालाचिये घरीं । आहेत एक साक्षात्कारी । यांच्या योगें शेगांव नगरी । झाली प्रती पंढरपूर ॥६३॥ साधूनें आणिल्या मनांत । काय एक नाहीं होत । सच्चिदानंदबाबाप्रत । ज्ञानेश्वरानें उठविलें ॥६४॥ त्याचें पाहूं प्रत्यंतर । जा जा कोणी जोडा कर । नका करुं रे उगा उशीर । वेळ अंतसमायाची ॥६५॥ तें ऐकोनी एक आप्त । आला बंकटसदनाप्रत । जानरावाची हकीकत । बंकटलाला कथन केली ॥६६॥ जानराव देशमुखाचा । समय अंतकाळाचा । आला आहे जवळी साचा । म्हणून आलों तुम्हांकडे ॥६७॥ महाराजांचें चरणतीर्थ । द्या कृपा करोनी मजप्रत । तें तीर्थ नोहे अमृत । होईल वाटे जानरावा ॥६८॥ बंकटलाल म्हणे त्यावरी । ही गोष्ट न माझ्या करीं । तुम्ही करावी अत्यादरीं । विनवणी आमुच्या वडिलाला ॥६९॥ जसें त्यानें सुचविलें । तैसें आप्तें तात्काळ केलें । भवानीरामा विनविलें । द्याया तीर्थ समर्थांचें ॥७०॥ भवानीराम सज्जन । होता मनाचा दयाळु पूर्ण । दुसर्‍याचें दुःख ऐकून । सज्जन तेच विव्हळ होती ॥७१॥ प्याल्यामध्यें भरुन पाणी । समर्थांच्या लाविलें चरणीं । आणि केली विनवणी । तीर्थ देतो जानरावा ॥७२॥ समर्थें तुकाविली मान । तीर्थ पाजिलें नेऊन । जानरावाकारण । घरघर घशाची बंद झाली ॥७३॥ हात हालवूं लागला । किंचित् डोळा उघडीला । उतार पडूं लागला । तीर्थप्रभावें देशमुखासी ॥७४॥

तो पाहतां प्रकार । आनंदले नारीनर । सत्पुरुषाचा अधिकार । आला कळून सर्वांसी ॥७५॥ मग औषधी बंद केली । तीर्थीं भिस्त ठेविली । ज्या-योगीं लाभती झाली । आरोग्यता जानरावा ॥७६॥ आठ दिवसांमाझारीं । जानराव झाला पहिल्यापरी । भवानीरामाचीये घरीं । आला दर्शना समर्थांच्या ॥७७॥ पहा संतांचें चरणतीर्थ । साधनांत झालें अमृत । संत न ते साक्षात्‌ । देव कलीयुगीचे ॥७८॥ येथें एक ऐसी शंका । उत्थान पावे सहज देखा । श्रीगजाननासारिखा संत होता शेगांवीं ॥७९॥ मग तो तेथें असतांना । गेलें न पाहिजे कोणी जाणा । यमाजी पंताचीया सदना । परि हाच आहे कुतर्क ॥८०॥ संत मृत्यु ना टाळिती । निसर्गाप्रमाणें वागती । परि संकटांतें वारिती । अगांतुक असल्यास ते ॥८१॥ सच्चिदानंदबाबासी । ज्ञानेशें उठविलें नेवाशासी । परि ते अखेर आळंदीसी । देह ठेविते झाले हो ॥८२॥ याचें रहस्य इतुकेंचि आहे । हें गंडांतर टाळिती पाहे । तें टाळणें कांहींच नोव्हे । अशक्य संत पुरुषाला ॥८३॥ मृत्यूचे तीन प्रकार । आहेत जगीं साचार । त्यांचीं नांवें क्रमवार । देतों तुम्हांकारणें ॥८४॥ आध्यात्मिक आधिभौतिक । आणि तिसरा तो आधिदैविक । त्या तिघांमाजीं बलिष्ठ देख । आध्यात्मिक मृत्यु असे ॥८५॥ आधिभौतिकाची तयारी । कुपथ्यानें होते खरी । नाना प्रकारच्या शरीरीं । व्याधि निर्माण होतात ॥८६॥ त्यांचा जोर झाल्यावर । मृत्यु येतो अखेर । त्या मृत्यूचा परिहार । करितां येतो औषधीनें ॥८७॥ मात्र औषधी देणारा । शास्त्रज्ञ असला पाहिजे पुरा । औषधीचा पसारा । आहे अवगत जयासी ॥८८॥ एसा वैद्य भेटल्यास । आधिभौतिकाचा होय नाश । तैसे आधिदैविकास । नवस सायास घालविती ॥८९॥ हें गंडांतर रुपाचें । मृत्यु दोन प्रकारचे । भौतिक आणि दैविक साचे । हे आहेत ख्यात जगीं ॥९०॥ मृत्यु जो कां आध्यात्मिक । तो कवणाच्यानें न टळे देख। पाहा अर्जुनाचा बालक । कृष्णासमक्ष पडला रणीं ॥९१॥ तैसा जानरावाचा । मृत्यु गंडांतर स्वरुपाचा । होता तो टाळिला साचा । समर्थतीर्थ देवोनिया ॥९२॥ म्हणजे गंडांतरा कारण । निवारिती साधुचरण । तेंच आलें घडोन । शेगांवामाझारीं ॥९३॥ कांहीं मृत्यु नवसांनीं । टाळिता येती या जनीं । परी तो नवस श्रद्धेनीं । केला पाहिजे विबुध हो ! ॥९४॥ श्रद्धा पूर्ण असल्यावरी । तीच मृत्यु टाळी खरी । श्रद्धाच अवघ्या माझारीं । सर्व बाजूंनीं श्रेष्ठ असे ॥९५॥ चरणतीर्थ साधूचें । तेंही टाळी मृत्यु साचे । वरील दोन प्रकारचे । परी तो साधु पाहिजे ॥९६॥ साधू असल्या वेषधारी । ऐसी न होय गोष्ट खरी । माती न होय कस्तूरी । हें ध्यानीं असूं द्या ॥९७॥ षड्‌विकार धुतल्याविना । अंगीं साधुत्व येईना । आणि साधूविण होईना । अघटित कृत्य केव्हांही ॥९८॥ म्हणून बहुरुप्याकारण । जपणें आहे अवश्य जाण । उगीच पाहून पिवळेपण । सोनें पितळेस मानूं नका ॥९९॥ गजानन नव्हते वेषधारी । ते पूर्ण साक्षात्कारी । म्हणून तीर्थानें झाली बरी । व्याधि जानरावाची ॥१००॥ देशमुख बरा झाल्यावर । भंडारा घातिला थोर । साधुप्रीत्यर्थ साचार । बंकटलालाचिये घरीं ॥१॥ तीर्थें देशमुख बरा झाला । परी स्वामीशीं पेंच पडला । त्यांनीं मनासी विचार केला । तो ऐका येणेंरितीं ॥२॥ कडकपणा धरल्याविना । ही उपाधी टळेना । स्वार्थसाधु प्रापंचिकांना । साधुत्वाची चाड नसे ॥३॥ त्या दिवसापासून । आणूं लागलें अवसान । स्वामी महाराज दयाघन । वरपांगी कडक झाले ॥४॥ हा त्यांचा कडकपणा । असह्य झाला इतरांना । परी त्यांच्या भक्तांना । कांहीं न त्याचें वाटलें ॥५॥ जेवीं नरसिंह अवतार । इतरांसी वाटला क्रूर । परी कयाधूचा कुमार । मुळीं न भ्याला त्या रुपा ॥६॥ वाघीण इतरा भयंकर । परी तिचें जें का असेल पोर । तें तिच्याच अंगावर । निर्भयपणें क्रीडा करी ॥७॥ असो आतां गोष्ट दुसरी । सांगतों मी तुम्हां खरी । कस्तुरीच्या शेजारीं । बसल्या माती मोल पावे ॥८॥ चंदनाचा शेजार । असला थोडा बहुत हिवर । वासित होतो साचार । हा न्याय निसर्गाचा ॥९॥ वासित हिवर झालेला । चंदन मानील आपणाला । तरी त्याच्या फजितीला । पारावार न राही पुढें ॥११०॥ जेथें ऊंस निपजतो । तेथेंच निवडुंग उगवतो । जेथें मोगरा वाढतो । तेथेंच येतो पिंगूळ ॥११॥ जेथें साधु सज्जन । तेथेंच मैंद निर्माण । हिरे गारा एकवटून । खाणीमाजी राहाती ॥१२॥ स्थान एक म्हणून । किंमत नाहीं समान । तेज हिर्‍याचें हिर्‍यालागून । भूषवी न गारेला ॥१३॥ गार ती गारची राही । पायाखालीं तुडविली जाई । ऐसी स्थिति कधीं न येई । अमोलिक हिर्‍याला ॥१४॥ श्रीगजाननाचे सन्निध । ऐसाच होता एक मैंद । संतसेवा हाच मद । अंगीं ज्याच्या भरला असे ॥१५॥ तो सेवा करी वरी वरी । भाव निराळा अंतरीं । मिठाई पेढे सावरी । समर्थांच्या नांवावर ॥१६॥ भक्तगणांस ऐसे म्हणे । मी समर्थकृपेचें पोसणें । प्रत्येक काम माझ्याविणें । होत नाहीं ये ठायां ॥१७॥  कल्याण समर्थांचा । अत्यंत आहे आवडीचा । कधीं न खालीं जावयाचा । शब्द माझा त्यांच्यापुढें ॥१८॥ चिलीम त्यांची मीच भरी । खाण्यापिण्याची तयारी । निजांगें मीच करी । अत्यंत मी आवडीचा ॥१९॥ ऐसें लोकांस सांगतसे । आपला सवरात करीतसे । त्या अधमाचें नांव असें । माळी विठोबा घाटोळ ॥१२०॥ महाराज स्वयमेव शंकर । हा बनला नंदिकेश्वर । हमेशा करी गुरगुर । आल्या गेल्या भक्तांवरी ॥२१॥ तें अंतर्ज्ञानांनीं । जाणिलें सर्व समर्थांनीं । कौतुक केलें एके दिनीं । तें ऐका विबुध हो ॥२२॥ परस्थ कांहीं मंडळी । शेगांवीं दर्शना आली । तों मूर्ति होती निजलेली । समर्थांची शय्येवर ॥२३॥ हिय्या कुणाचा होईना । जागे करण्या समर्थांना । मंडळीस होती जाणा । त्वरा पुढें जाण्याची ॥२४॥ ते कुजबुज करुं लागले । विठोबाला विनविते झाले । विठोबा आम्हां पाहिजे गेलें । येथून आतांच परगांवा ॥२५॥ काम निकडीचें आहे फार । कैसा करावा विचार । महाराज तों शय्येवर । असती निद्रिस्त जाहले ॥२६॥ त्यांचें दर्शन घेतल्याविना । आमचा पाय निघेना । हें अवघड काम होईना । तुझ्यावांचून ये ठायीं ॥२७॥ तूं समर्थांच्या शिष्यांत । मुख्य धोरणी महा धूर्त । तुला आम्ही जोडितों हात । एवढें काम करावें ॥२८॥ ऐशा त्या स्तुतींनीं । विठोबा फुगून गेला मनीं । त्यानें जाऊन तत्‌क्षणीं । महाराजांस उठविलें ॥२९॥ मंळळींचें काम झालें । परी संकट ओढवलें । घाटोळ विठोबावरी भले । कर्म जैसें तैसें फल ॥१३०॥ समर्थांच्या हातीं काठी । एक होती भली मोठी । तीच त्यांनीं घातली पाठीं । त्या विठोबा माळ्याच्या ॥३१॥ म्हणती बेटा माजून गेला । आपुली स्थिति विसरला । या लुच्च्यानें आरंभीला । उघड उघड व्यापार कीं ॥३२॥ मला लावितो उपाधी । घंटे आणून बांधितो मठीं । घुमारे घाली कधीं कधीं । ऐसा अती नीच हा ॥३३॥ त्या घुमर्‍याचें बक्षीस । घे मी देतों तुला खास । तुजवरी केल्या कृपेस । होईन प्रभूचा अपराधी ॥३४॥ सोमला साखर मानूं नये । विषा जवळ करुं नये । तस्करासी लेखूं नये । निजकंठींचा ताईत ॥३५॥ ऐशा रीतीं ठोकला । छडयाखालीं घाटोळाला । विठोबा तो पळाला । पुनः न आला मागुती ॥३६॥ खरे जे कां असती संत । ते ते ऐसेंच करितात । ढोंगी मात्र जातात । अशाचिया करांमध्यें ॥३७॥ म्हणजे अधिकारावांचून । ढोंगी बैसती होऊन । संत नादीं लावण्या जन । ऐसे प्रकार किती तरी ॥३८॥ मतलबी त्यांना साथ देती । उदो उदो त्यांचा करिती । भलभलते सांगताती । साक्षात्कार ढोंग्यांचे ॥३९॥ तेणें दोघांचें काम होई । अपार पैसा मिळविला जाई । परी ही प्रथा बरी नाहीं । समाज जाईल रसातळा ॥१४०॥ खरे जे कां असती संत । ईश्वराचे निःसीम भक्त । त्यांना न मुळीं आवडत । सान्निध्य त्या षंढाचें ॥४१॥ पतिव्रतेसी शेजार । कसबिणीचा कां पटणार ? । सोन्याप्रती अलंकार । काय शोभती कथलाचे ? ॥४२॥ संत शठातें राखिती । परी न त्याला महत्त्व देती । ती जगांतील एक व्यक्ति । कृतकर्म भोगण्या आली असे ॥४३॥ ऐसें मानसीं समजून । त्याविषयीं धरिती मौन । जेवीं निवडुंगालागून । स्थान भूमी देते हो ॥४४॥ मोगरा निवडुंग आणि शेर । हीं जमीनीचीं लेंकरं । परि किंमतीचा प्रकार । निरनिराळा तो तिघांचा ॥४५॥ मोगर्‍याचें संरक्षण । करिती निवडुंगाचें दहन । चिलटांसाठीं बांधून । शेर ठेविती दारावरी ॥४६॥ तेवीं संत भूमिपरी । रक्षण अवघ्यांचें करिती जरी । किंमतीमाजीं ठेविती परी । गुणांप्रमाणें भेद पाहा ॥४७॥ नशीब विठोबा घाटोळाचें । अति खडतर होतें साचें । पाय लाभून साधूचें । दैवें दूर झालें कीं ॥४८॥ जरी तो ना ढोंग करिता । तरी योग्यतेप्रती चढता । संतांची ती योग्यता । त्यानें मुळीं ना जाणिली ॥४९॥ कल्पवृक्षाच्या तळवटीं । बसून इच्छिली गारगोटी । वा मागितली करवंती । कामधेनूपासून ॥१५०॥ ऐसें न कोणी करावें । संतापासीं राहून बरवें । तेथें विचारा ठेवावें । अहर्निशीं जागृत ॥५१॥ हा दासगणूविरचित । श्रीगजाननविजय ग्रंथ । तारक होवो भवाब्धींत । अवघ्या भाविकांकारणें ॥१५२॥ श्रीहरिहरापर्णमस्तु ॥ शुभं भवतु ॥ ॥ इति तृतीयोऽध्यायः समाप्तः ॥

अध्याय ४
॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा । नीलकंठा गंगाधरा । महाकाल त्र्यबंकेश्वरा । श्रीओंकारा पाव मशी ॥१॥  आणि रुक्मिणीशा । एक तत्त्व आहां खास । तोय वारी म्हटल्यास । काय जलीं भेद होतो ? ॥२॥
तैसी तुमची आहे स्थिती । तंतोतंत जगत्पति । जैसी ज्याची मानेल मति । तैसा तो तुज बाहत ॥३॥ नन्यभावें बाहतां । तूं पावसी आपुल्या भक्तां । माता न धरी निष्ठुरता । आपल्या वत्साविषयीं कधीं ॥४॥ मी तुझें अजाण लेंकरुं । नको माया पाताळ करुं । तूं साक्षात् कल्पतरु । इच्छा पूर्ण करी हरा ॥५॥ कटलालाचे घरांत । असतां स्वामी समर्थ । प्रकार एक अघटीत । आला ऐसा घडोनी ॥६॥ शाख शुद्ध पक्षासी । अक्षयतृतीयेचिया दिवशीं । पितरार्थ उदककुंभासी । देती श्राद्ध करोनिया ॥७॥ अक्षयतृतीयेचा दिवस । वर्‍हाडांतील लोकांस । विशेष वाटे प्रत्येकास । मोठा सण मानिती हा ॥८॥  दिवशीं काय झालें । तें पाहिजे श्रवण केलें । महाराज पोरांत बैसले । कौतुकें लीला करावया ॥९॥ लकां म्हणती गजानन । चिलीम द्यावी भरुन । तंबाखूची मजकारण । विस्तव वरी ठेवोनिया ॥१०॥ सकाळपून ऐसाच बसलों । चिलीम मुळीं नाहीं प्यालों । त्यामुळें हैराण झालों । भरा चिलीम मुलांनो ! ॥११॥ ऐसी आज्ञा ऐकतां भली । पोरें अवघीं आनंदलीं । चिलीम भरुं लागलीं । तंबाखू आंत घालुनिया ॥१२॥ विस्तवाचा तपास केला । तो न सदनीं मिळाला । कां कीं चूल पेटण्याला । अवकाश होता विबुध हो ॥१३॥ पोरें चित्तीं विचार करिती । आपापसांत निश्चिती । कशी करावी यासी युक्ति । विस्तव पाहिजे चिलिमीला ॥१४॥ मुलें पाहून चिंतातुर । बंकट करी मधुरोत्तर । अरे जानकीराम सोनार । आहे वेटाळीं * आपुल्या ॥१५॥
त्याच्याकडे तुम्ही जावें । विस्तवासी मागून घ्यावें । दुकान तें चालण्या बरवें । विस्तव लागतो आधीं त्या ॥१६॥ आधीं पेटते बागेसरी । त्याच्यापुढें दुकानदारी । ही सोनाराची रीत खरी । आहे ठावें कीं तुम्हांला ॥१७॥ पोरांनीं तें ऐकिलें । जानकीरामाकडे आले । विस्तव मागूं लागले । समर्थांच्या चिलमीस ॥१८॥ जानकीराम रागावला । लेंकरासी बोलता झाला । अक्षयतृतियेच्या सणाला । दे न कोणा विस्तव मी ॥१९॥ पोरें म्हणालीं त्यावर । जोडोनी आपले दोन्ही कर । नको करुं हा अविचार । विस्तव पाहिजे समर्थाला ॥२०॥ महाराज श्रीगजानन । देवाचेही देव जाण । त्यांच्या चिलमीकारण । विस्तव हा जातसे ॥२१॥ साधुप्रती कांहीं देतां । तेथें अशुभाचि नसे वार्ता । उगीच व्यावहारिक कथा । सांगत आम्हां बसूं नको ॥२२॥ आम्ही आहों मुलें लहान । तूं मोठा आमच्याहून । ऐसें साच असून । हें न कैसें कळे तुला ? ॥२३॥ विस्तव तूं देशील जरी । भाग्य येईल तुझ्या घरीं । चिलीम पिऊन तृप्त जरी । झाला गजानन महाराज ॥२४॥ तें सोनारें न ऐकिलें । अद्वातद्वा भाषण केलें । ज्याचें जवळ मरण आलें । त्याचे पाय खोलाकडे ॥२५॥ सोनार म्हणे बालकांसी । गजानन कशाचा पुण्यराशी ? । त्या चिलमीबहाद्दरासी । साधु म्हणून सांगूं नका ! ॥२६॥ गांजा तमाखू पीत बसतो । नग्न गांवांत हिंडतो । वेडयापरी चाळे करितो । पितो पाणी गटाराचें ॥२७॥ जात गोत नाहीं त्याला । ऐशा वेडयापिशाला । मी साधु मानण्याला । नाहीं मुळीं तयार ॥२८॥ बंकटलाल खुळावला । नादीं त्याच्या लागला । नाहीं देत विस्तवाला । मी तयाचे चिलमीसी ॥२९॥ तो आहे ना साक्षात्कारी । मग विस्तव कशाला पाहिजे तरी ? । आपुल्या कर्तृत्वें कां न करी । विस्तवातें निर्माण ? ॥३०॥ साधु नाथ जालंदर । पीत होते चिलीम फार । परी विस्तवासाठीं घरघर । ना हिंडले कदा ते ॥३१॥ जा जा उभे न राहा येथ । विस्तव ना मिळे तुम्हांप्रत । नाहीं मला किंमत । त्या तुमच्या पिशाची ॥३२॥ पोरें विन्मुख परत आलीं । महाराजांसी निवेदिली । हकीकत जी कां झाली । सोनाराचे दुकानांत ॥३३॥ ती ऐकतां हास्यवदन । करिते झाले दयाघन । नाहीं आपणां प्रयोजन । मुळींच त्याच्या विस्तवाचें ॥३४॥ ऐसें म्हणोन घेते झाले । चिलीम आपुल्या हातीं भले । बंकटलालासी बोलले । काडी एक वरती धरी ॥३५॥ बंकट म्हणे गुरुराया । थोडें थांबा परम सदया । विस्तव देतों करुनिया । काडी घासून आतां मी ॥३६॥ काडी घासल्यावांचूनी । कदां न प्रगटे अग्नि । म्हणून केली विनवणी । ती मनास आणा समर्था ॥३७॥ महाराज बोलले त्यावर । उगी न करी चरचर । नुसती काडी धरणें वर । तिला मुळींच घासूं नको ॥३८॥ बंकटलालें तैसें केलें । नुसत्या एका काडीस धरिलें । चिलमीचिया वरती भले । समर्थ-आज्ञा म्हणून ॥३९॥ तों काय झाला प्रकार । ऐका तुम्ही श्रोते चतुर । प्रगट झाला वैश्वानर । काडी नुसती धरतां वरी ॥४०॥ काडीप्रती विस्तवाचा । अंशही नव्हता साचा । हा प्रभाव शक्तीचा । महाराजांच्या लोकोत्तर ॥४१॥काडी तैसीच राहिली । चिलीम तीही पेटली । कशाचीही नाहीं उरली । जरुर खर्‍या साधूला ॥४२॥

याचें नांव साधुत्व । उगीच नव्हतें थोतांड मत । आतां सोनाराचे घरांत । काय झालें तें ऐका ॥४३॥ या अक्षयतृतियेला । मान विशेष चिंचवण्याला । जेवीं वर्षप्रतिपदेला । महत्त्व निंब फुलांचें ॥४४॥ असो भोजना बैसली पंगत । चिंचवणें वाढलें द्रोणांत । तों प्रकार ऐसा अघटीत । घडून आला तो ऐका ॥४५॥ त्या चिंचवण्यामाझारीं । अळ्या दिसल्या नानापरी । बुजबुजाट झाला भारी । किळस वाटली सर्वांला ॥४६॥ लोक उठले पात्रांवरुन । अवघ्या अन्नातें टाकून । सोनार बसला अधोवदन । कारण कांहीं उमजेना ॥४७॥ चिंचवण्याच्या संगें भलें । अवघें अन्न वायां गेलें । मग त्या कोडें उमगलें । ऐसें व्हाया मीच कारण ॥४८॥ मी न साधूंसी विस्तव दिला । त्याचा प्रत्यय तात्काळ आला । गजाननाची अगाध लीला । मीं न खचित जाणिली ॥४९॥ गजानन जान्हवी नीर । मीं त्या मानिलें थिल्लर । गजानन राजराजेश्वर । मीं त्या भिकारी मानिलें ॥५० त्रिकालज्ञ गजानन । मीं त्या मानिलें वेडा पूर्ण ।कल्पतरुकारण । मीं बाभळ मानिली ॥५१॥ गजानन हा चिंतामणी । मीं लेखिली गार जाणी । गजानन हा कैवल्यदानी । मी ढोंगी मानिला हो ॥५२॥ हाय हाय रे दुर्दैवा । त्वां कैसा साधिला दावा । माझ्या हातून संतसेवा । होवो ना तूं दिलीस ॥५३॥ मसी असो हा धिक्कार । मी भारभूत साचार । जन्म पावलों भूमीवर । द्वय पायांचा पशु मी ॥५४॥ आज माझ्या भाग्यकाळीं । बुद्धि कशी चळती झालि । सुयोगाचि दवडिली । वेळ आलेली म्यां करें ॥५५॥ कांहीं असो आतां जाऊं । समर्थांचे पाय पाहूं । पदीं त्यांच्या अनन्य होऊं । क्षमा मंतूची मागावया ॥५६॥ ऐसा विचार करुनी । सवें घेऊन चिंचवणी । बंकटलालाच्या सदनीं । आला हकीकत सांगावया ॥५७॥ अहो शेटजी बंकटलाला । आज माझा घात झाला । पाहा या चिंचवण्याला । आंत किडे पडले बहु ॥५८॥ माणसें उठलीं उपोषित । तेणें झाला श्राद्धघात । हें ऐसें व्हावया कृत्य । माझा मीच कारण असे ॥५९॥ आज सकाळीं चिलिमीला । मीं नाहीं विस्तव दिला । पोरें मागत असतां मला । समर्थांच्या चिलिमीस्तव ॥६०॥ त्याचेंच हें आहे फळ । चिंचवणी नासलें सकळ । तें ऐकून बंकटलाल । बोलूं लागला येणें रितीं ॥६१॥ तुम्हीं न चिंचोके पाहिले । ते असतील किडलेले । म्हणून हे नासते झाले । तुमचें चिंचवणी वाटे मला ॥६२॥ सोनार म्हणे ऐसी शंका । शेटजी तुम्ही घेऊं नका । नवी चिंच होती देखा । मग चिंचोके किडके कसे ? ॥६३॥ जी मीं चिंच फोडिली । तिचीं टरफलें अजून पडलीं । चिंचोक्यांची रास झाली । मर्जी असल्या पाहा चला ॥६४॥ आतां इतुकीच विनंती । आहे शेटजी तुम्हांप्रती । मला नेऊन पायांवरतीं । घाला शीघ्र समर्थांच्या ॥६५॥ क्षमा मंतूची मागेन । अनन्यभावें करुन । साधु दयेचे परिपूर्ण । सागर मूळचेच आहेत कीं ॥६६॥ समर्थांपुढें भीत भीत । जानकीराम गेला त्वरित । घातलें त्यानें दंडवत । अष्टांगेंसी समर्था ॥६७॥ आणि म्हणाला दयाघना ! । तुला येवो माझी करुणा । मीं अपराध केले नाना । त्यांची क्षमा करावी ॥६८॥ तूं साक्षात् उमानाथ । नांदसी या शेगांवांत । ज्यांची होती मजला भ्रांत । ती त्वां आज निवटीली ॥६९॥ माझे अपराधरुपीं अवघें तृण । जाळी कृपाकृशानें * करुन । समर्था आजपासोन । मी न टवाळी तुझी करी ॥७०॥ जी शिक्षा आज केली । तेवढीच मजसी पुरे झाली । तूं अनाथांचा आहेस वाली । आतां अंत पाहूं नको ॥७१॥ महाराज बोलले त्यावर । खोटें न सांगे तिळभर । तुझें चिंचवणी आहे मधुर । किडे न पडले त्यामध्यें ॥७२॥ तें ऐकतां अवघ्यांनीं । पाहिलें तें चिंचवणी । पहिला प्रकार मावळोनी । गेला होता तेधवां ॥७३॥ अवघ्यांप्रती आश्चर्य झालें । समर्थांचें महत्त्व कळलें । 
हां हां म्हणतां पसरलें । वृत्त हें त्या गांवामध्यें ॥७४॥ ज्यांच्या त्यांच्या तोंडीं मात । हीच निघूं लागली सत्य । कस्तुरीचा नाहीं येत । वास झांकाया कवणातें ॥७५॥ चंदुमुकीन नांवाचा । गृहस्थ एक शेगांवाचा । निःसीम भक्त समर्थांचा । त्याची कथा ऐका ही ॥७६॥ श्रोते ज्येष्ठ मासांत । सभोंवार बसले भक्त । अति आदरें जोडोन हात । दृष्टि ठेवून पायावरी ॥७७॥ कोणी आंबे कापिती । कोणी फोडी हातांत देती । कोणी पंख्यानें घालिती । वारा समर्थांकारणें ॥७८॥ कोणी वांटिती खडीसाखर । कोणी गळ्यांत घालिती हार । कोणी चंदन थंडगार । लाविती अंगीं साधूच्या ॥७९॥ तयीं महाराज म्हणाले चंदूला । हे आंबे नकोत मला । दोन कान्होले उतरंडीला । आहेत तुझ्या ते आण जा ॥८०॥ चंदू बोले कर जोडून । आतां कान्होले कोठून ? । इच्छा असल्या तळून । ताजे आणितों गुरुराया ॥८१॥ तईं महाराज वदले वाचें । नाहीं कारण ताज्याचें । पाहिजेत तुझ्या उतरंडीचे । कान्हवले मज खावया ॥८२॥ जा वेळ करुं नको । उगीच सबबी सांगूं नको । गुरुपाशीं बोलूं नको । खोटें वेडया यत्किंचित् ॥८३॥ त्या मुकिनचंदूप्रती । लोक आघे बोलती । जा ये पाहून शीघ्रगती । खोटी न होय संतवाणी ॥८४॥ चंदू घराप्रती गेला । कांतेस पुसूं लागला । दोन कान्हवले उतरंडीला । आहेत काय रंभोरु ? ॥८५॥ तैं बोले अंगना । होऊन गेला एक महिना । आतां कान्हवले आपुल्या सदना । मिळतील कशाचे ? ॥८६॥ अक्षयतृतीया दिवशीं भले । कान्हवले मीं पतिराया केले । ते न आतां राहिले । संपून गेले त्याच दिनीं ॥८७॥ मर्जी असल्या नवे करितें । समर्थास्तव तळून देतें । ही पहा मी ठेवितें । कढई नाथा चुलीवर ॥८८॥ तुम्ही थांबा क्षणभर । सामान अवघें तयार । नको पाहाण्या बाजार । कान्हवल्याच्या साहित्यासी ॥८९॥ चंदू बोले त्यावरी । ताजे नकोत सुंदरी । जे तूं उतरंडी माझारीं । दोन ठेविले तेच दे ॥९०॥ समर्थांनीं ऐसेंच कथिलें । तेंच मी तुज निवेदिलें । आठवण करुन चांगलें । पाहा कांहीं येधवां ॥९१॥ ऐसे ऐकतां पतिवचन । कांता गेली घोटाळून । करुं लागली शोधन । कान्हवल्याचे चित्तांतरीं ॥९२॥ कान्हवल्यांचा शोध करितां । आठवण झाली तत्त्वतां । उघड म्हणे थांबा नाथा । सत्य गिरा समर्थांची ॥९३॥ दोन कान्हवले होते उरले । ते मी उतरंडीस ठेविले । त्यांचें स्मरण नाहीं उरलें । सगळ्या महिन्यांत मजलागीं ॥९४॥ त्यास महिना होऊन गेला । असेल बुरसा वरी आला । ते खाण्याच्या उपयोगाला । राहिले नसतील अणुमात्र ॥९५॥ ऐसें बोलून तात्काळ उठली । उतरंड सर्व धांडोळली । कान्हवले ते ठेवलेली । कळशी होती खापराची ॥९६॥ आंत जों पाहिलें न्याहाळून । तों दृष्टी पडले तिच्या दोन । कान्हवले जे सुकोन । गेले होते थोडके ॥९७॥ बुरसा मुळींच नाहीं आला । श्रोते त्या कान्हवल्याला । बट्टा संतवाणीला । नाहीं लागला कधीं जगीं ॥९८॥ कान्हवल्यातें पाहोन । उभयतांचें हर्षलें मन । धन्य साधु गजानन । महा समर्थ सिद्धयोगी ॥९९॥ चंदू कान्हवले घेऊन आला । समर्थांसी अर्पिता झाला । लोक करती आश्चर्याला । त्याच्या कृतीतें पाहून ॥१००॥ लोक म्हणती गजानन । खचित असती त्रिकालज्ञ । भूत भविष्य वर्तमान । यांसी अवघे कळतसे ॥१॥ चंदूच्या त्या कान्हवल्यांसी । सेविते झाले पुण्यराशी । राम शबरीच्या बोरांसी । जेवीं झाला भक्षिता ॥२॥ शेगांवच्या दक्षिणेसी । चिंचोली गांव परियेसी । तेथील एक रहिवासी । माधव नामें विप्र होता ॥३॥ वय ज्याचें साठावर । अवयव झाले क्षीण फार । तरुणपणीं संसार । हेंच होतें ब्रह्म ज्याचें ॥४॥ प्रारब्धाच्या पुढारी । कोण जातो भूमिवरी ? । ब्रह्मदेवें जीं कां खरीं । लिहिलीं अक्षरें तेंच होय ॥५॥
माधवासी न कोणी उरले । कांतापुत्र मरुन गेले । म्हणून विरक्त जाहलें । मन तयाचें संसारीं ॥६॥ जी का होती चीजवस्त । ती अवघी केली फस्त । म्हणे आतां माझी गत । होईल कैशी देवदेवा ? ॥७॥ म्यां हमाधुमीचा संसार केला । तो आतां अवघा निमाला । आठविलें कधीं नाहीं तुला । एक क्षणही दीनबंधो ! ॥८॥ आतां माझा वाली कोण ? । दीनदयाळा तुजवांचून । माझें हें अरण्यरोदन । तुजविण देवा कोण ऐके ? ॥९॥ ऐसा अनुताप धरुन पोटीं । शेगांवीं आला शेवटीं । गजाननाच्या द्वारवंटीं । हट्ट धरुन बैसला ॥११०॥ आरंभिलें उपोषण । अन्नपाण्यातें त्यागून । वदनीं वदे नारायण । खंड न पडे तयाला ॥११॥ ऐशापरी एक गेला । दिवस परी नाहीं उठला । तईं महाराज वदले तयाला । हें करणें उचित नसे ॥१२॥ हेंच हरीचें नामस्मरण । कां न केलें मागें जाण । प्राण देहातें सोडून । जातां वैद्य बोलाविसी ! ॥१३॥ तरुणपणीं ब्रह्मवारी । म्हातारपणीं करिसी नारी । अरे वेळ गेल्यावरी । नाहीं उपयोग साधनाचा ॥१४॥ जें करणें तें वेळेवर । करावें कीं साचार । घर एकदां पेटल्यावर । कूप खणणें निरर्थक ! ॥१५॥ ज्या कन्यापुत्रांसाठीं । तूं केलीस आटाआटी । ते अवघे गेले शेवटीं । टाकोनिया तुजलागीं ॥१६॥ अशाश्वताचें पोषण । केलें शाश्वता विसरुन । त्या कर्माचीं तुजलागून । फळें भोगणें भाग असे ॥१७॥ तीं फळें भोगिल्याविना । सुटका तुझी होईना । दे हा टाकून हट्टीपणा । विवेक कांहीं करी मनीं ॥१८॥
तें न माधवें ऐकिलें । हट्टासि ना सोडिलें । यत्‍न लोकांचे वायां गेले । त्यासी भोजन घालण्याचे ॥१९॥ शेगांवचा कुलकर्णी । करुं लागला विनवणी । भोजनास चला सदनीं । अन्नाविण राहूं नका ॥१२०॥ तेंही म्हणणें माधवाला । नाहीं पटलें तसाच बसला । समर्थांच्या सान्निध्याला । नाम घेत हरीचें ॥२१॥ रात्र झाली दोन प्रहर । तमें आक्रमिलें अंबर । निशीचा तो शब्द किर्र । होऊं लागला वरच्यावरी ॥२२॥ आसपास कोणी नाहीं । ऐसें पाहून केलें कांहीं । कौतुक तें लवलाही । स्वामी गजाननांनीं ॥२३॥ रुप धरिलें भयंकर । दुसरा यमाजी भास्कर । आ पसरुन माधवावर । धांवून आले भक्षावया ॥२४॥ तेणें माधव पळाला । घेऊन आपला जीव भला । धडकी भरली चित्ताला । छाती उडे धडधड ॥२५॥ बुडबुडा आला तोंडासी । शब्द फुटेना वाचेसी । ऐशा पाहोन स्थितीसी । समर्थें धरिलें सौम्य रुप ॥२६॥ आणि बोलले गर्जोन । हेंच कां तुझें धीटपण । तूं काळाचें भक्ष्य जाण । असाच खाईल काळ तुला ॥२७॥ त्याची चुणूक दाखविली । पुढची स्थिति जाणविली । तेथें पळाया नाहीं उरली । यमलोकांत जागा तुला ॥२८॥ माधव ऐसें ऐकतां । झाला विनयें बोलतां । यमलोकाची नको वार्ता । तेवढी माझी टाळा हो ॥२९॥ नको नको हें जीवित । द्या धाडून वैकुंठांत । हीच विनंति आपणांप्रत । महाराज माझी शेवटची ॥१३०॥ यमलोकीं जें दिसणार होतें । तें तुम्हीं दाविलें येथें । आतां या लेंकरातें । यमलोकीं धाडूं नका ॥३१॥ माझ्या पातकाच्या राशी । आहेत जरी बहुवशी । परी त्या जाळणें तुम्हांसी । नाहीं मुळीं अशक्य ॥३२॥ कांहीं सुकृत पदरीं होतें । म्हणून पाहिलें तुम्हांतें । संतभेटी ज्याला होते । यमलोक ना तयासी ॥३३॥
ऐसें ऐकतां भाषण । समर्थें केलें हास्यवदन । महापतीता पावन । साधूच एक करिती कीं ॥३४॥ श्रीमन्नारायण नारायण । ऐसेंच माधवा करी भजन । जवळ आलें तुझें मरण । आतां गाफील राहूं नको ॥३५॥ किंवा अजून वांचण्याची । आस आहे तुला साची । ती असल्यास आयुष्याची । वाढ तुझ्या करितों मी ॥३६॥ माधव म्हणे गुरुराया । नको मला आयुष्य सदया । ओखटी ही प्रपंचमाया । त्यांत पुन्हां गोवूं नको ॥३७॥ तथास्तु ऐसें महाराज वदले । तूं जें मागसी तें मीं दिलें । आतां तुला नाहीं उरलें । जन्मास येणें भूमीवर ॥३८॥ ऐशा रीतीं दोघांचा । संवाद गुप्त स्वरुपाचा । झाला त्या वर्णण्या वाचा । नाहीं माझी समर्थ ॥३९॥ इहलोकीचें देहभान । माधवाचें निमालें जाण । कित्येक बोलूं लागले जन । उपवासें फिरलें मस्तक ॥१४०॥ म्हणून वेडेचार करी । जनकल्पना नानापरी । उठत्या झाल्या त्या अवसरीं । त्या किती म्हणून वर्णाव्या ? ॥४१॥ असो माधवाचें देहावसान । समर्थासन्निध झालें जाण । चुकलें त्याचें जन्ममरण । गजाननाच्या कृपेनें ॥४२॥ असो एक्या समयीं भली । समर्थांसी इच्छा झाली । ती त्यांनीं निवेदिली । आपुल्या शिष्यवर्गातें ॥४३॥ वैदिक ब्राह्मण बोलवा । मंत्रजागर येथें करवा । वेदश्रवणें देवदेवा । आनंद होतो अतिशय ॥४४॥ पन्हें पेढे बरफी खवा । भिजल्या डाळीस मीठ लावा । एकेक रुपया तो द्यावा । घनपाठी ब्राह्मणातें ॥४५॥ ऐसें भाषण ऐकिलें । शिष्य विनवूं लागले ।
ऐसे वैदिक नाहीं उरले । या आपुल्या शेगांवीं ॥४६॥ सांगाल तो करुं खर्च । परी अडचण आहे हीच । ब्राह्मण मिळविण्याचि साच । आमचा उपाय यातें नसे ॥४७॥ महाराज म्हणाले त्यावरी । करा उद्यां तयारी । ब्राह्मण धाडील श्रीहरी । तुमच्या वसंतपूजेला ॥४८॥ मग काय विचारितां । अवघे हर्षले तत्त्वतां । झाली तयारी हां हां म्हणतां । रुपये शंभर झाले जमा ॥४९॥ सामान सर्व आणिलें । चंदनाचें उटणें केलें । आंत केशर कालविलें । तैसाच आणखी कापुर ॥१५०॥ दोन प्रहरचे समयाला । ब्राह्मण आले शेगांवाला । जे पदक्रम जटेला । जाणत होते विबुध हो ! ॥५१॥ थाटांत वसंतपूजा झाली । ब्राह्मण मंडली आनंदली । दक्षिणा घेऊनी गेली । अन्य ग्रामाकारणें ॥५२॥ संतांच्या जें मनीं येत । तें तें पुरवी रमानाथ । कमी न पडे यत्किंचित । ऐसा प्रभाव संतांचा ॥५३॥ बंकटलाल प्रतिवर्षी । व्रत हें चालवी अतीहर्षी । अजून परी शेगांवासी । वंशज त्याचे करिती हें ॥५४॥
हा दासगणूविरचित । गजाननविजय नामें ग्रंथ । साधकासी दावो पथ । विमलशा हरिभक्तीचा ॥१५५॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ ॥ इति चतुर्थोऽध्यायः समाप्तः ॥

अध्याय ५
॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे अज अजित अद्वया । सच्चिदानंदा करुणालया । दासगणू लागला पायां । आतां अभय असूं दे ॥१॥ मी हीन दीन पातकी नर । नाहीं कोणता अधिकार । सर्व बाजूंनीं लाचार । आहें मी देव देवा ॥२॥ परी अत्यंत हीनावरी । थोर सर्वदा कृपा करी । पाहा अंगीं लाविली खरी । विभूति श्रीशंकरानें ॥३॥ तो हीनांचा हीनपणा । थोरा न आणि कमीपणा । हें जाणोन नारायणा । गणू हा ठेवा संग्रहीं ॥४॥ सर्व लाड लेंकराचे । माता ती पुरवि साचे । आहे दासगणूचें । ओझें सर्व तुझ्या शिरीं ॥५॥ जैसें करशील तैसें करी । परी दया असूं दे अंतरीं । देवा तुझ्या बळावरी । दासगणूच्या सार्‍या उडया ॥६॥ गजानन असतां शेगांवीं । यात्रा येई नित्य नवी । ती कोठवरी वर्णावी ? । पार न लागे तियेचा ॥७॥ महिमा तो वाढला फार । म्हणून गजानन साधुवर । ती उपाधी करण्या दूर । भटकूं लागले काननीं ॥८॥ महिना महिना तिकडेच राहावें । वाटेल तेथेंच बैसावें । कोणाशीं न उमगूं द्यावें । चरित्र आपुलें येतुलेंही ॥९॥ श्रोते एका समयासी । महाराज पिंपळगांवासी । गेले तेथें गोष्ट कैसी । झाली ते अवधारा ॥१०॥ त्या पिंपळगांवच्या शिवारांत । होतें एक अरण्यांत । शंकराचें मंदिर सत्य । जुनें पुराणें हेमाडपंती ॥११॥ ऐशा त्या मंदिरीं । येते झाले साक्षात्कारी । बैसले शिवाच्या गाभारीं । लावोनिया पद्मासन ॥१२॥ गुराखी त्या गांवचे । आपापले कळप गुरांचे । घेऊनिया निघाले साचे । अस्तमानीं गांवाकडे ॥१३॥ मंदिरापुढें तत्त्वतां । एक लहान ओढा होता । तेथें पाणी पाजण्याकरितां । गुरें गुराखी पातले ॥१४॥ कोणी सहज मंदिरांत । गेले वंदण्या शिवाप्रत । तों तेथें पाहोन समर्थ । आश्चर्यचकित जाहले ॥१५॥ मुलें म्हणती या मंदिरीं । कोणी न पाहिला आजवरी । पुरुष बसलेला निर्धारी । अस्तमानाचे समयाला ॥१६॥ कांहीं गुराखी बाहेर आले । इतरां बोलावूं लागले । कांहीं तेथेंच बैसले । सत्पुरुषाचे समोर ॥१७॥ परी साधु बोलेना । डोळे मुळींच उघडीना । याचें कारण कळेना । त्या गुराखी अर्भकांसी ॥१८॥ कोणी म्हणती थकलेला । हा साधु दिसतो भला । शक्ति मुळीं नुरली त्याला । बोलावयाकारणें ॥१९॥ कोणी म्हणती उपवासी । असावा निश्चयेसी । थोडी भाकर तयासी । देऊं आपण खावया ॥२०॥ ऐसें म्हणून भाकर । धरली मुखासमोर । भाविक मुळचीं गुराखी पोरें । हलवूं लागलीं समर्थाला ॥२१॥ परी साधु हालेना । मुखीं शब्द बोलेना । म्हणून सार्‍या गुराख्यांना । नवल वाटलें विशेष ॥२२॥ गुराखी आपसांत बोलती । याची मुळीं ना कळे स्थिती । जरी मेला म्हणावा निश्चिती । तरी आहे बसलेला ॥२३॥ अंग ना झालें थंडगार । ऊन आहे साचार । यावरुन हा जिवंत नर । आहे आहे शंका नको ॥२४॥ कोणी म्हणे असेल भूत । मायावी रुप दावित । कोणी म्हणे हें तर सत्य । शिवापुढें ना भूत येई ॥२५॥ कोणी म्हणती स्वर्गीचा । देव हा असावा साचा । लाभ त्याच्या दर्शनाचा । झाला आपणां हेंच भाग्य ॥२६॥ याचें आतां पूजन । करुं अवघे आपण । जा स्नानालागून । पाणी आणा ओढयाचें ॥२७॥ पोरें गेलीं ओढयावरी । गेळ्यामध्यें आणिलें वारी । परमभावें पायांवरी । घालिते झाले समर्थांच्या ॥२८॥ कोणी वन्यपुष्पें आणिलीं । माळ त्यांची तयार केली । कंठामध्यें घातिली । गुराख्यांनीं साधूच्या ॥२९॥ कोणी कांदाभाकर । नैवेद्यार्थ साचार । दिली ठेवून समोर । एका वडाच्या पानावरी ॥३०॥ गुराख्यांनीं केलें नमन । आदरें भाव धरुन । कांहीं वेळ केलें भजन । पुढें बसून समर्थांच्या ॥३१॥ ऐसा आनंद चालला । तों गुराखी एक बोलला । अरे वेळ बहु झाला। चला आतां गांवाकडे ॥३२॥ दिवस गेला मावळून । कां न आलीं रानांतून । मुलें गुरांना घेऊन । ऐसें लोक म्हणतील कीं ॥३३॥ कदाचित्‌ आपणांसी । पाहण्या येतील काननासी । तान्ही वांसरें घरांसी । लागलीं असतील हुंबरावया ॥३४॥ या साधूची हकीकत । आपण सांगूं गांवांत । शहाण्या वडील माणसांप्रत । म्हणजे येईल कळून कीं ॥३५॥ तें अवघ्यांसी मानवलें । गुराखी सर्व निघून गेले । गांवामाजीं कळविलें । मंदिराचें अवघे वृत्त ॥३६॥ पुढें श्रोते प्रातःकाळीं । आली गांवची मंडळी । समर्थांसी पाहाण्या भली । गुराख्यांच्या बरोबर ॥३७॥ जैसा काल होता बसला । तैसाच आतां पाहिला । भाकरीसी ना स्पर्श केला । ती जशीच्या तशीच आहे कीं ॥३८॥ म्हणूं लागले गांवकरी । हा योगी पुरुष कोणी तरी । आहे बैसला मंदिरीं । सांप्रत या शंकराच्या ॥३९॥ कोणी ऐसें बोलले । शिव पिंडीच्या बाहेर आले । आपणां दर्शन द्याया भले । चला नेऊं या गांवांत ॥४०॥ हा समाधी उतरील । तेव्हां कांहीं बोलेल । ती उतरण्या आहे वेळ । त्याला त्रास देऊं नका ॥४१॥ बंगाल देशीं जालंदर । बारा वर्षें झाले स्थिर । समाधीच्या जोरावर । गर्तेमाजीं ख्यात हें ॥४२॥ ऐसी भवति न भवति झाली । एक पालखी आणविली । त्यांत उचलून ठेविली । समर्थांची मूर्ति पाहा ॥४३॥ ग्रामांतील नारीनर । अवघे होते बरोबर । पुढें वाजंत्र्यांचा गजर । होत होता विबुध हो ! ॥४४॥ मधून मधून तुळशीफुलें । पौर टाकीत होते भले । समर्थाचें अंग झालें । गुलालानें लाली लाल ॥४५॥ घंटाघडयाळें वाजती । लोक अवघे भजन करिती । जय जय योगिराज मूर्ति । ऐसें उंच स्वरानें ॥४६॥ मिरवणूक आली गांवांत । मारुतीच्या मंदिरांत । बसविले आणून सद्‌गुरुनाथ । एका भव्य पाटावरी ॥४७॥ तोही दिवस तैसाच गेला । मग लोकांनीं विचार केला । आपण करुं स्तवनाला । उपाशी बसून याच्यापुढें ॥४८॥ ऐसा जो तो विचार करिती । तों आले देहावरती । गजानन श्रीसद्‌गुरुमूर्ति । मुगुटमणी योग्यांचे ॥४९॥ मग काय विचारतां । आनंद झाला समस्तां । प्रत्येक स्त्रीपुरुष ठेवी माथा । स्वामीचिया चरणांवरी ॥५०॥ नैवेद्याची धूम झाली । ज्यानें त्यानें आणिलीं । पात्रें तीं वाढून भलीं । मारुतीच्या मंदिरांत ॥५१॥ त्या अवघ्यांचा स्वीकार । समर्थें केला थोडाफार । हाळोपाळींत साचार । ही वार्ता श्रुत झाली ॥५२॥ पुढें दुसर्‍या मंगळवारीं । पिंपळगांवचे गांवकरी । आले बाजारा निर्धारीं । शेगांवाकारणें ॥५३॥ ते शेगांवच्या लोकांसी । सहज बोलले प्रेमेसी । आमच्याही गांवासी । आला एक अवलिया ॥५४॥ अवलिया थोर अधिकारी । प्रत्यक्ष आहे श्रीहरी । धन्य पिंपळगांव नगरी । पाय लागले साधूचे ॥५५॥ आम्ही तया योगीवरा । कोठें न जाऊं देऊं खरा । निधि चालत आला घरा । त्यातें कोण दवडी हो ? ॥५६॥ शेगांवचे बाजारांत । जिकडे तिकडे हीच मात । बंकटलाला झालें श्रुत । वर्तमान तें अवलियाचें ॥५७॥ बंकटलाल पत्‍नीसहित । गेला पिंपळगांवांत । समर्थासी जोडोन हात । विनवूं लागला नानापरी ॥५८॥ आतां येतो म्हणून । निघून गेलात आपण । त्यास झाले पंधरा दिन । याचा विचार करा हो ॥५९॥ गुरुराया तुम्हांवीण । भणभणीत दिसे सदन । शेगांवचे अवघे जन । चिंतातुर झाले हो ॥६०॥ गाडी आणिली आपणांसाठीं । चला शेगांवीं ज्ञानजेठी । मायलेका होणें तुटी । हें कांहीं बरें नसे ॥६१॥ कित्येक दयाळा आपुले भक्त । राहिले असती उपोषित । त्या शेगांव शहरांत । नित्य दर्शन घेणारे ॥६२॥ म्ही न आल्या शेगांवीं । मी ही तनु त्यागीन वरवी । आमुची सांगा पुरवावी । आळ कोणी गुरुवर्या ? ॥६३॥ बंकटलाल ऐसें वदले । महाराज गाडीवरी बसले । शेगांवासी निघाले । पिंपळगांवा सोडून ॥६४॥ जैसा मागें गोकुळाला । न्याया कृष्णा अक्रूर आला । तैसा बंकटलाल भासला । अक्रूर पिंपळगांवातें ॥६५॥ पिंपळगांवच्या लोकांप्रती । बंकटलाल समजाविती । नका होऊं दुःखित चित्तीं । जाती न कोठें लांब साधु ॥६६॥ वाटेल तेव्हां दर्शना यावें । हेतु आपुले पुरवावे । जेथल्या तेथें असूं द्यावें । या अमोल मूर्तीला ॥६७॥ बहुतेक पिंपळगांवाचा । बंकटलाल साहुकार साचा । मनोभंग साहूचा । करण्या कुळांची छाती नसे ॥६८॥ चुरमुर्‍याचे लाडू खात । पिंपळगांव बसलें स्वस्थ । महाराज बसून गाडींत । जाऊं लागले शेगांवा ॥६९॥ पथीं जातां गुरुमूर्ति । बोलली बंकटलालाप्रती । ही का साहूची होय रीति । माल दुसर्‍याचा बळें न्यावा ! ॥७०॥ मशी यावया तुझ्या घरीं । भय वाटतें अंतरीं । तुझ्या घरचि नाहीं बरी । रीत हें मी पाहतों ॥७१॥ लक्ष्मी जी लोकमाता । महाविष्णूची होय कांता । जिची असे अगाध सत्ता । तिलाही त्वां कोंडिलें ॥७२॥ तेथें माझा पाड कोण ? । म्हणून गेलों पळोन । जगदंबेचे पाहून । हाल माझें चित्त भ्यालें ॥७३॥ ऐसें ऐकतां हंसूं आलें । बंकटलालाप्रती भलें । विनयानें भाषण केलें । तें ऐका सावचित्तें ॥७४॥ बंकट बोले गुरुनाथा । माझ्या कुलपा न भ्याली माता । आपुला वास तेथें होता । म्हणून झाली स्थीर ती ॥७५॥ जेथें बाळ तेथें आई । तेथें दुज्याचा पाड काई ? । आपुल्या पायापुढें नाहीं । मला धनाची किंमत ॥७६॥ तेंच माझें धन थोर । म्हणून आलों इथवर । माझें न उरलें आतां घर । तें सर्वस्वीं आपुलें ॥७७॥ घरमालकाकारण । शिपाई आडवी कोठून ? । जैसें तुमचें इच्छील मन । तैसेंच तुम्ही वागावें ॥७८॥ इतकीच माझी विनंती । शेगांवीं असो वस्ती । धेनू काननातें जाती । परी येती घरीं पुन्हां ॥७९॥ तसेंच तुम्हीं करावें । अवघ्या जगां उद्धरावें । परी आम्हां न विसरावें । शेगांवीं यावें वरचेवर ॥८०॥ ऐसी समजूत घालून । शेगांवीं आणले गजानन । तेथें कांहीं दिवस राहून । निघून गेले पुनरपि ॥८१॥ ती ऐकावी तुम्ही कथा । सांगतों मी इथें आतां। अडगांव नामें ग्राम होता । एक तया वर्‍हाड प्रांतीं ॥८२॥ त्या ग्रामाकारण । जाया निघाले दयाघन । प्रातःकाळीं चुकवून । नजर शेगांवकरांची ॥८३॥ महाराजांची चालगती । वायुचिया समान होती । अंजनी-तनय मारुती । आला काय वाटे पुन्हां ॥८४॥ मास होता वैशाख । सोळा कलांनीं तपे अर्क । क्वचित्‌ कोठें न राहिलें उदक । ऐसा प्रखर उन्हाळा ॥८५॥ माध्यान्हीच्या समयाला । अकोली गांवापासी आला । हा योगयोगेश्वर साधु भला । गजानन महाराज ॥८६॥ तों काय घडलें वर्तमान । समर्थांसी लागली तहान । करिती चौफेर अवलोकन । तों उदक कोठें दिसेना ॥८७॥ अंगावाटे चालल्या धारा । घामाच्या त्या एकसरा । अधरोष्ठ तो सुकला खरा । उदकाविण समर्थांचा ॥८८॥ ऐशा दुपारच्या अवसरीं । भास्कर नामें शेतकरी । घालीत होता पाळी खरी । आपुल्या त्या शेताला ॥८९॥ शेतकर्‍याची पाहतां स्थिति । हें अवघ्यांत मुख्य असती । कृषीवल हा निश्चिती । अन्नदाता जगाचा ॥९०॥ अंगीं ऐसें मोठेंपण । परी सोशी यातना दारुण । बिचार्‍यांना ऊन ताहान । सोसणें भाग असे कीं ॥९१॥ त्या अकोलीच्या शिवारांत । जलाचें दुर्भिक्ष्य अत्यंत । एक वेळा मिळेल घृत । परि अभाव पाण्याचा ॥९२॥ आपणांतें प्यावयासी । भास्करानें शेतासी । आणिलें खापराच्या घागरीसी । उदक होतें गांवांतून ॥९३॥ पाठीसी ती भाकर । डोईं जलाची घागर । ऐसा होता प्रकार । शेतामाजीं येण्याचा ॥९४॥ ती घागर झुडुपाखालीं । होती भास्करें ठेविली । त्या ठिकाणीं स्वारी आली । भास्करा जल मागावया ॥९५॥ समर्थ म्हणती भास्कराला । तहान लागली मला । पाणी दे बा प्यावयाला । नाहीं ऐसें म्हणूं नको ॥९६॥ पुण्य पाणी पाजण्याचें । आहे बापा थोर साचें । पाण्यावांचून प्राणाचें । रक्षण होणें अशक्य ॥९७॥ धनिक पाणपोया घालिती । हमरस्त्याच्या पथावरती । याचें कारण शोध चित्तीं । म्हणजे येईल कळोन ॥९८॥ भास्कर बोले त्यावर । तूं नंगा धूत दिगंबर । तुला दांडग्या पाजितां नीर । पुण्यलाभ कशाचा ? ॥९९॥ अनाथ-पंगू-दुबळ्यांसाठीं । त्या पुण्याच्या शोभती गोष्टी । वा जो समाजहितासाठीं । झटे त्यासी साह्य करा ॥१००॥ ऐसें शास्त्राचें आहे वचन । तुझ्यासारख्या मैंदाकारण । आम्ही पाजितां जीवन । तें उलटें पाप होय ॥१॥ भूतदयेच्या तत्त्वें भला । सर्प कोणी कां पोसला ? । वा जागा चोरटयाला । देती सदनीं काय कोणी ? ॥२॥ तूं भीक मागून घरोघर । केलेंस पुष्ट शरीर । भारभूत साचार । झालास आपुल्या कृतीनें ॥३॥ मीं माझ्यासाठीं घागर । आणिली सकाळीं डोक्यावर । त्या आयत्या पिठावर । रेघोटया तूं ओढूं नको ॥४॥ तुला ना देणार पाणी । नको करुं रे विनवणी । जा जा करी येथोनी । काळें आपलें चांडाळा ॥५॥ तुझ्यासारिखे निरुद्योगी । जन्मले आमच्यांत जागजागीं । म्हणून झालों अभागी । आम्ही चहूं खंडांत ॥६॥ हें भास्कराचें भाषण । समर्थांनीं ऐकून । थोडें करुनी हास्यवदन । निघोन गेले तेथोनिया ॥७॥ थोडया दूर अंतरावर । एक होती साच विहीर । तिकडे धांव अखेर । घेतली स्वामीरायांनीं ॥८॥ स्वामी तिकडे जाऊं लागतां । भास्कर झाला बोलतां । उच्च स्वरें वेडया वृथा । तिकडे कशाला जातोस ? ॥९॥ ती कोरडी ठणठणीत । आहे विहीर जाण सत्य । पाणी या एक कोसांत । नाहीं कोठें जाण पिशा ॥११०॥ समर्थ बोलले त्यावरी । ही सत्य तुझी वैखरी । विहिरींत पाणी नाहीं जरी । परी करितों प्रयत्‍न ॥११॥ तुझ्यासारखे बुद्धिमान । जलनिं होती हैराण । तें मी नयनीं पाहून । स्वस्थ ऐसा बसलों जरी ॥१२॥ तरी समाजहितासाठीं । काय मी केली सांग गोष्टी । साह्य होतो जगजेठी । हेतु शुद्ध असल्यावर ॥१३॥ समर्थ आले विहिरीपाशीं । तों थेंब नाहीं तियेशीं । हताश होऊन वृक्षापाशीं । बसले एका दगडावर ॥१४॥ डोळे मिटून केलें ध्यान । चित्तीं सांठविला नारायण । जो सच्चिदानंद दयाघन । दीनोद्धार जगद्‌गुरु ॥१५॥ समर्थ म्हणती देवदेवा । हे वामना वासुदेवा । प्रद्युम्ना राघवा । हे विठ्ठला नरहरी ! ॥१६॥ देवा ही आकोली । पाण्यावांचून त्रस्त झाली । वोलही ना राहिली । कोठेंच देवा विहिरींतून ॥१७॥ मानवी यत्‍न अवघे हरिले । म्हणून तुजला प्रार्थिलें । पाव आतां जगन्माउले । पानी दे या विहिरीला ॥१८॥ तुझी करणी अघटीत । जें न घडें तें घडविसी सत्य । मांजरें जळत्या आव्यांत । पांडुरंगा ! तूं रक्षिलीं ॥१९॥ प्रल्हाद भक्त करण्या खरा । स्तंभीं प्रगटलास जगदोद्धारा । बारा गांव वैश्वानरा । भक्षिलें त्वां गोकुळांत ॥१२०॥ कर नखाग्रीं धरिला गिरी । तूंच कीं रे मुरारी । तुझ्या कृपेची न ये सरी । जगत्रयीं कवणास ॥२१॥ दामाजीपंत ठाणेदार । त्याच्यासाठीं झालास महार । चोख्यासाठीं ओढीलीं ढोरं । पांखरें रक्षिलीं माळ्याचीं ॥२२॥ उपमन्यूसाठीं भला । क्षीरसमुद्र तुवां दिला । तहान नामदेवाला । मारवाडांत लागली जैं ॥२३॥ तैं तुम्ही कौतुक केलें । निर्जलता प्रांतीं भलें । नाम्यासाठीं भरविलें । जल हें आण ध्यानांत ॥२४॥ ऐसें विनवितां ईश्वरा । विहिरीलागीं फुटला झरा । उफाळ्याचा साजिरा । विहीर भरली क्षणामध्यें ॥२५॥ साह्य झाल्या जगन्नाथ । काय एक ना तें होत । ईश्वरी सत्ता अगाध सत्य । जें ना घडे तेंच घडवी ॥२६॥ तेथ पाणी समर्थ प्याले । तें भास्करानें पाहिलें । चित्त त्याचें घोटाळलें । कांहीं नच चाले तर्क त्याचा ॥२७॥ वर्षें झालीं द्वादश । जल नाहीं या विहिरीस । तिलाच एका घटकेस । यानें जलमय केली कीं ॥२८॥ यावरुन हा कोणीतरी । खचित आहे साक्षात्कारी । बळेंच फिरतो पिशापरी । हें आतां समजलें ॥२९॥ शेतीचें काम सोडून । भास्कर आला धांवून । धरितां झाला दृढ चरण । मुखें स्तोत्र आरंभिलें ॥१३०॥ हे नरदेहधारी परमेश्वरा । हे दयेच्या सागरा । लेंकरासी कृपा करा । अर्भक मी तुमचें असें ॥३१॥ तुम्हांतें ना जाणून । मी बोललों टाकून । आतां पस्तावा झाला पूर्ण । क्षमा त्याची करा हो ॥३२॥ टाकून बोलतां गौळणी । रागावला ना चक्रपाणी । दयाळा बाह्य वेषांनीं । तुझ्या मजला ठकविलें ॥३३॥ त्याचें तूंच निरसन । केलें चमत्कार दाखवून । भगवंताचें देवपण । कृतीनेंच कळलें कीं ॥३४॥ तैसा तुझा अधिकार । केवढा तरी आहे थोर । तें कळलें साचार । या जलाच्या कृतीनें ॥३५॥ कांहीं असो सद्‌गुरुनाथा । मी न सोडी तुम्हां आतां । लेंकरानें भेटतां । माये कोठें न रहावें कीं ॥३६॥ खोटी ही प्रपंच माया । आले आज कळोनिया । आतां परते न लोटा या । दीना अर्भकाकारणें ॥३७॥

भास्करासी समर्थ म्हणती । ऐसा न होई दुःखित चित्तीं । आतां घागर डोक्यावरती । गांवांतून आणूं नको ॥३८॥ तुझ्यासाठीं हें जीवन । विहिरींत केलें निर्माण । आतां कशाची नुरली वाण । मग का प्रपंच टाकिशी ? ॥३९॥ पाणी आलें तुझ्याकरितां । बगीचा तो लाव आतां । भास्कर म्हणे गुरुनाथा । हें आमीष दावूं नका ॥१४०॥ माझा निश्चय हीच विहीर । कोरडी ठणठणीत साचार । होती दयाळा आजवर । थेंब नव्हता पाण्याचा ॥४१॥ ती विहीर फोडण्याला । तुम्हीच हा प्रयत्‍न केला । साक्षात्काराचा लाविला । सुरुंग खडक फोडावया ॥४२॥ तेणें हा फुटला खडक । भावाचें लागलें उदक । आतां मला निःशंक । भक्तिपंथाचा लावीन मी ॥४३॥ वृत्तीच्या मेदिनी ठायीं । फळझाडें तीं लावीन पाही । सन्नीतीची माझे आई । तुझ्या कृपेंकरुन ॥४४॥ सत्कर्माचीं फुलझाडें । लावीन मी जिकडे तिकडे । हे क्षणैक बैलवाडे । यांचा संबंध आतां नको ॥४५॥ पहा श्रोते संतसंगति । क्षणैक घडतां भास्कराप्रती । केवढी झाली उपरति । याचा विचार करा हो ॥४६॥ खर्‍या संताचें दर्शन । आगळें सर्व साधनांहून । तुकारामें केलें वर्णन । "संतचरणरजा" चे अभंगीं ॥४७॥ तो अभंग पहावा । चित्तीं विचार करावा । आणि त्याचा अनुभव घ्यावा । निजहिताकारणें ॥४८॥ पाणी लागलें विहिरीस । ही वार्ता आसपास । पसरतां जन दर्शनास । धांवूं लागले स्वामीच्या ॥४९॥ मधूचा लागतां सुगावा । जैशा मक्षिका घेती धांवा । वा साखरेचा पाहून रवा । मुंग्या येती धांवून ॥१५०॥ तैसे श्रोते तेथ आले । लोक अपार मिळाले । विहिरीचें पाणी पाहिलें । पिऊन त्यांनीं तेधवां ॥५१॥ उदक निर्मळ शीत मधुर । गोड अमृताहून फार । करुं लागले जयजयकार । गजाननाचा लोक सारे ॥५२॥ असो पुढें भास्करासहित । अडगांवासी न जातां परत । महाराज आले शेगांवांत । श्रीगजानन सिद्धयोगी ॥५३॥ स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ । होवो जगासी आदर्शभूत । संतमहिमा जाणावया ॥१५४॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ ॥इति पंचमोऽध्यायः समाप्तः ॥

अध्याय ६
 
॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे परममंगला श्रीहरी । तुझी कृपा झालियावरी । अशुभ अवघें जातें दुरी । हा अनुभव संतांचा ॥१॥ त्या संतवाक्यीं भरंवसा । मी ठेवून श्रीनिवासा । मंगलाची धरुन आशा । तुझ्या दारीं पातलों ॥२॥ 
 
आतां विन्मुख लावल्यास । त्याचा तुला लागेल दोष । आणि बट्टा वाक्यास । लागेल कीं संतांच्या ॥३॥ म्हणोन हे माधवा ! । अभिमान माझा धरावा । रोष कधीं ना करावा । या अजाण लेंकरावर ॥४॥ बालकांचें हीनपण 
 
। मातेलागीं दूषण । हें मनांत आणून करणें असेल तें करी ॥५॥ असो बंकटलाला घरीं । राहिली समर्थांची स्वारी । तयीं अपूर्व एक घडली खरी । गोष्ट श्रोते ती ऐका ॥६॥ गांवाचिया दक्षिणेस । बंकटलालाच्या मळ्यास ।
महाराज गेले एक दिवस । कणसें मक्याचीं खावया ॥७॥ बहुत मंडळी बरोबरी । कणसें खाया आली खरी । विहिरीपासीं तयारी । केली कणसें भाजण्याची ॥८॥ विहीर होती धनत्तर । पाणी जिला अपरंपार । गर्द छायेचे वृक्ष 
 
थोर । जवळ होते चिंचेचे ॥९॥ आगटया पेटल्या एकसरां । आजमासें हो दहा बारा । तेणें डोंब झाला खरा । गगनोदरीं धूमाचा ॥१०॥ त्यायोगें ऐसे झाले । आग्या मोहोळ लागलेलें । चिंचवृक्षावरी भलें । त्याच्या माशा 
 
उठल्या कीं ॥११॥ त्या माशा उठतां क्षणीं । मंडळी गेली पळोनी । कणसें ठिकाणच्या ठिकाणीं । मक्याचीं तीं राहिलीं हो ॥१२॥ त्या आग्या मोहोळांच्या मक्षिका । पसरल्या अवघ्या मळ्यांत देखा । घोंगडयाचा करुन बुरखा 
 
। कोणी गेले पळून ॥१३॥ प्राणापरी आवडती । वस्तु नसे हो कोणती । अशा वेळीं समर्थमूर्ति । आसनीं होती निर्धास्त ॥१४॥ ते नाहीं पळून गेले । आसनीं आपल्या स्वस्थ बसले । विचार करुं लागले । निजचित्तीं माश्यांचा ॥१५॥ माशी तरी मीच झालों । मोहोळ तेंही मीच बनलों । कणसें खाया मीच आलों । कणसें तेंही रुपें माझीं ॥१६॥ ऐशा विचारें आनंदांत । महाराज राहिले डोलत । अंगावरी असंख्यात । माशा येऊन बैसल्या ॥१७॥ वाटे पासोडी माश्यांची । समर्थ पांघरले साची । योग्यता ब्रह्मनिष्ठाची । काय वर्णन करावी ? ॥१८॥ माशा चावती वरच्यावरी । परी न तो पर्वा करी । त्यांचे कांटे शरीरीं । बोचले असती असंख्यात ॥१९॥ यासी झाला एक प्रहर । भक्त झाले चिंतातुर । बंकटलालाचें अंतर । दुःखें व्याकुळ झालें हो ॥२०॥ कोठून बुद्धि झाली मला । येथ आणिलें समर्थाला । कणसें मक्याचीं खावयाला । मंडळीच्या समवेत ॥२१॥ अशा समर्थालागून । दुःख द्याया मीच कारण । झालों हें कां शिष्यपण । माझे हाय रे दुर्दैवा ! ॥२२॥ बंकटलालानें तयारी । पुढें येण्याची केली खरी । हें जाणोन अंतरीं । कौतुक केलें समर्थानें ॥२३॥ जीवांनो ! जा निघोन । बसा मोहोळीं जाऊन । माझ्या बंकटाकारण । तुम्हीं न कोणीं चावावें ॥२४॥ जमलेल्या मंडळींत । बंकट हाच निःसीम भक्त । जो माझ्याप्रीत्यर्थ । येत आहे धांवोनिया ॥२५॥ ऐसें म्हणतां माशा गेल्या । मोहोळावरी जाऊन बैसल्या । बंकटलालानें पाहिल्या । त्या आपल्या निजदृष्टीं ॥२६॥ महाराज त्या पाहोनी । बोलते झाले हांसोनी । वा खूप केलीस मेजवानी । आम्हांसी तूं माश्यांची ॥२७॥ अरे ते जीव विषारी । बैसले माझ्या अंगावरी । माझ्यापासून झाले दुरी । लड्डूभक्त येधवां ॥२८॥ याचा करी विचार । संकट आल्या कोणावर । कोणी न साह्य करणार । एका ईश्वरावांचुनी ॥२९॥ जिलबी पेढे बरफी खाती । माशा आल्या पळून जाती । ऐशी जयांची आहे कृति । ते स्वार्थी भक्त निःसंशय ॥३०॥ बंकटलाल मधुरोत्तर । करितां झाला त्यावर । महाराज आणवूं कां सोनार । कांटे माश्यांचे काढवया ! ॥३१॥ महापापी मी गुरुराया । तुम्हांलागीं त्रास द्याया । आणवितां झालों या ठायां । माशा किती डसल्या तरी ! ॥३२॥ गांधी अगणित अंगावर । उठल्या तुमच्या साचार । याचा व्हावया परिहार । उपाय सांगा कोणता ? ॥३३॥ बंकटलालाचें ऐकिलें । वचन महाराज बोलते झाले । अरे यांत ना कांहीं अधिक घडलें । डसणें स्वभाव माश्यांचा ॥३४॥ मला त्याची मुळींच बाधा । होणार नाहीं जाण कदा । त्या माशीरुप सच्चिदानंदा । म्यां जाणलें म्हणोन ॥३५॥ माशी तरी तोच झाला । तोच आहे माझा पुतळा । पाण्यानेंच पाण्याला । काय दुखवितां येईल ? ॥३६॥

हें ऐकतां ब्रह्मज्ञान । बंकटलाल धरी मौन । कांटे काढण्यालागून । बाहिलें त्यानें सोनारा ॥३७॥ सोनार चिमटे घेऊन आले । देहास शोधूं लागले । कोठें आहेत कांटे रुतले । मक्षिकेचे पहावया ॥३८॥ महारज वदले तयांना । काय ह्या वंध्यामैथुना । करितसा तुमच्या नयनां । कांटे ते ना दिसतील ॥३९॥ त काढण्या चिमटयाची । गती नाहीं मुळींच साची । साक्ष ती ह्या गोष्टीची । मीच दावितों तुम्हांला ॥४०॥ ऐसें म्हणून कौतुक केलें । वायूलागीं रोधून धरिलें । तों कांटे अवघे वरी आले । रुतलेल्या स्थलांतून ॥४१॥ तो पाहतां प्रकार । लोक आनंदले फार । कळून आला अधिकार । श्रीगजाननस्वामीचा ॥४२॥ पुढें कणसें भाजलीं । अवघ्यांनीं तीं ग्रहण केलीं । अस्तमानीं निघून आली । मंडळी निजगृहातें ॥४३॥ असो पुढें एक वेळा । महाराज गेले अकोटाला । आपुल्या बंधूस भेटण्याला । श्रीनरसिंगजीकारणें ॥४४॥ हा कोतश्या अल्लीचा । शिष्य मराठा जातीचा । कंठमणी विठ्ठलाचा । भक्‍तिबलानें झाला असे ॥४५॥ त्या नरसिंगजीचें चरित्र । मीं भक्‍तलीलामृतांत । वर्णिलें आहे इत्यंभूत । आतां तें सांगणें नको ॥४६॥ हें आकोट नामें नगर । शेगांवाहून साचार । आहे अठरा कोसांवर । ईशान्येला परियेसी ॥४७॥ मनोवेगाचा सजवून वारु । निघते झाले सद्‌गुरु । जे पदनताचे कल्पतरु । श्रीगजानन महाराज ॥४८॥ अकोटाच्या सान्निध्यासी । एका निबिडतरशा अरण्यासी । नससिंग राहे अहर्निशीं । एकान्तवास सेवावया ॥४९॥ हें निर्जन अवघें अरण्य । महा भयकंर दारुण । निंब अश्‍वत्थ रातांजन । वृक्ष जेथें उदेले ॥५०॥ लता त्या नाना जाती । वृक्षा वेढून बैसल्या असती । ण वाढलें भूमीवरती । सर्प वारुळीं असंख्यात ॥५१॥ ऐशा त्या अरण्यांत । नरसिंगजी जाऊन बसत । म्हणून आले अवचित । समर्थ त्यासी भेटावया ॥५२॥ सारखा भेटे सारख्यासी । पाणीच मिळें पाण्याशीं । विजातीय द्रव्यासी । समरसता होणें नसे ॥५३॥ गजाननासी पाहिलें । तेणें चित्त आनंदलें । मी नरसिंगजीचें भलें । तो प्रेमा न वर्णवे कीं ॥५४॥ एक हरी एक हर । चालते बोलते परमेश्‍वर । एक राम एक कुमर । वसुदेवदेवकीचा ॥५५॥ एक मुनि वसिष्ठ । एक पाराशर ऋषि श्रेष्ठ । एक जान्हवीचा कांठ । एक तट गोदेचा ॥५६॥ एक हिरा कोहिनूर । एक कौस्तुभ साचार । एक वैनतेय एक कुमर । सती वानरी अंजनीचा ॥५७॥ दोघे भेटले एकमेकां । दोघा आनंद सारखा । बैसते झाले आसनीं एका । हितगुज तें करावया ॥५८॥ अनुभव ते आपापले । एकमेकां कथिते झाले । नरसिंगा, तूं उत्तम केलें । प्रपंचांत राहिलास ॥५९॥ मीं त्याग केला तयाचा । स्वीकार करुन योगाचा ।  सच्चिदानंद तत्त्वाचा । करिता झालों विचार ॥६०॥ या योगाच्या क्रियेंत । गोष्टी होती अघटीत । ज्यांचा मुळीं न लागे अंत । या सामान्य लोकांला ॥६१॥ त्या गोष्टी लपवावया । पिसा बनलों जगा ठायां । उपाधी ते नासावया । वेड बळेंच पांघरलों ॥६२॥ तत्त्व जाणण्याकारण । मार्ग कथिले आहेत तीन । कर्म, भक्ति, योग म्हणून । शास्त्रकारांनीं शास्त्रांत ॥६३॥ फल या तिन्ही मार्गांचें । एकचि आहे अखेरीचें । परी बाह्य स्वरुप त्यांचें । भिन्न भिन्न असें कीं ॥६४॥ योगी योगक्रियेचा । जरी अभिमान वाही साचा । तरी तयासी तत्त्वाचा । खर बोध ना होईल ॥६५॥ योगक्रियावरुन । अलिप्त रहावें तयापासून । कमलपत्रासमान । तरीच तत्त्व कळून ये ॥६६॥ याचपरी प्रपंचाची । स्थिति नरसिंगा आहे साची । आसक्ति कन्यापुत्रांची । मुळींच राहतां कामा नये ॥६७॥ गार पाण्यांत राहते । परी न पाणी शिरुं देते । सेंच वागती साचें । या प्रपंचामाझारीं ॥६८॥ यापरी त्वां रहावें । अपेक्षारहित असावें । चित्तांतून ना ढळूं द्यावें । सच्चिदानंद ईशाला ॥६९॥ म्हणजे कांहींच अशक्य नाहीं । तूं, मी आणि शेषशायी । एकरुप आहों पाही । जन जनार्दन भिन्न नसे ॥७०॥ नरसिंग म्हणती बंधुराया ! । आलास मसी भेटावया । ही तुझी केवढी दया । उपमा याला देण्या नसे ॥७१॥ प्रपंच मुळीं अशाश्वत । त्याची काय किंमत । दुपारच्या सावलीप्रत । कोण सांग खरे मानी ? ॥७२॥ तूं कथिलें जयापरी । तैसा वागेन भूवरीं । मी जाण वरच्यावरी । अशीच भेटी द्यावी तुवां ॥७३॥ देह-प्रारब्ध जयाचें । असेल ज्या जातीचें । तेंच आहे व्हावयाचें । लोकाचारी निःसंशय ॥७४॥ तुम्हां आम्हांकारणें । जें का धाडिलें ईशानें । तेंच आहे आपणां करणें । निरालसपणें भूमीवरी ॥७५॥ आतां विनंति इतुकीच खरी । व्यावहारिक भेट वरच्यावरी । देत जावी साजिरी । मी धाकटा बंधु तुझा ॥७६॥ नंदीग्रामा राहिला भरत । रघुपतीची वाट पहात । तैसाच मी या आकोटांत । राहून पाहतों वाट तुझी ॥७७॥ तुला येथें यावया । अशक्य कांहीं नाहीं सदया । अवघ्या आहेत योगक्रिया । अवगत तुला पहिल्यापून ॥७८॥ पद न लावितां पाण्याप्रत । योगी भरधांव वरुनी पळत । क्षणामाजीं फिरुन येत । शोधून अवघ्या त्रिभुवना ॥७९॥ ऐसें हितगुज उभयतांचें । रात्रभरी झालें साचें । भरतें आलें प्रेमाचें । दोघांचिया संगमीं ॥८०॥ खरे खरे जे का संत । तेथें हेंच घडून येत । दांभिकांचीं होतात । भांडणें पाहून एकमेकां ॥८१॥ दांभिक म्हणूं नये गुरु । ते अवघे पोटभरु । पुरामाजीं फुटकें तारुं । तारण्यासी समर्थ नसे ! ॥८२॥ दांभिकांचा बोलबाला । जरी होतो जगीं भला । तरी त्यागणें आहे त्याला । निवडूनिया श्रोते हो ! ॥८३॥ संतत्व नाहीं मठांत । संतत्व नाहीं विद्वत्तेंत। संतत्व नाहीं कवित्वांत । तेथें स्वानुभव पाहिजे ॥८४॥ दांभिक मुलाम्याचें सोनें । त्याला सांगा काय घेणें । गृहिणी म्हणून ठेवणें । काय कसबीण सदनांत ? ॥८५॥ ही संतजोडी साक्षात्कारी । दांभिकतेची साच वैरी । नांदे ज्याच्या सदैव घरीं । सन्नीति सदाचार ॥८६॥ नरसिंगजीस भेटण्या जाण । काननीं आले गजानन । ऐसें कळलें वर्तमान । गुराखीद्वारें आकोटाला ॥८७॥ तें कळतां आनंदले । लोक धावूं लागले । नारळ घेऊन निघाले । पाहाया द्वय संतांसी ॥८८॥ एकमेकां ऐसें म्हणती । चला चला रे सत्वर गती । गोदा आणि भागीरथी । संगम पावली काननांत ॥८९॥ त्या भेटरुप प्रयागासी । जाऊं आपण स्नानासी ।  महोदयपर्वणीसी । साधून घेऊं चला हो ॥९०॥ तों इकडे काय झालें । गजानन आधींच निघून गेले । नरसिंगासी पुसून भले । भेट ना झाली पौरांसी ॥९१॥ पुढें एकदां गजानन । करीत असतां भ्रमण । दर्यापुराच्या सन्निध जाण । येते जाहाले शिष्यांसह ॥९२॥ दर्यापुराच्या शेजारीं । शिवर गांव निर्धारी । असे चंद्रभागेच्या तीरीं । व्रजभूषणा वास जेथें ॥९३॥ श्रोते ही चंद्रभागा । पंढरीची नाहीं बघा । ही लहानशी एक गंगा । पयोष्णीला मिळणारी ॥९४॥ या शिवर गांवांत । व्रजभूषण नामें पंडित । चार भाषा अवगत । होत्या श्रोते जयाला ॥९५॥ कीर्ति ज्याच्या विद्वत्तेची । वर्‍हाडीं पसरली साची । याला भक्ति भास्कराची । आत्यंतिक असे हो ॥९६॥ प्रत्यहीं चंद्रभागेवर । स्नान करी साचार । उदयास येतां दिनकर । अर्घ्य त्यासी देतसे ॥९७॥ पंच पंच उषःकाला । व्रजभूषण उठे भला । सारुन प्रातर्विधीला । अरुणोदयीं स्नान करी ॥९८॥ तेंही शीतोदकांनीं । ऐसा कर्मठ परी ज्ञानी । मानमान्यता विद्वज्जनीं । ज्याची होती विशेष ॥९९॥ त्या शिवरगांवाला । योगीराज फिरत आला । वाटे तपाचें द्यावयाला । फल त्या व्रजभूषणासी ॥१००॥ चंद्रभागेच्या वाळवंटीं । हा बैसला ज्ञानजेठी । समोर नदीचिया कांठीं । आले व्रजभूषण स्नानाला ॥१॥ ती प्रभातीची वेळा पाही । प्रकाशिल्या दिशा दाही । क्कुटाचा आवाज येई । वरचेवरी ऐकावया ॥२॥ चातक भारद्वाज पांखरें । जाऊं लागलीं अत्यादरें । भास्करासी सामोरे । पूर्व दिशा लक्षून ॥३॥ भास्कराचा उदय होतां । तम निमाला हां हां म्हणतां । जैसा सभेस पंडित येतां । मूर्ख जाती उठोनी ॥४॥ ऐशा त्या सुप्रभातीं । वाळवंटीं गुरुमूर्ति । बैसली होती निश्चिती । ब्रह्मानंदीं डोलत ॥५॥ सवें शिष्य अपार । बसले होते मंडलाकार । ते शिष्य नव्हते किरणें थोर । त्या गजाननभास्कराचीं ॥६॥ तईं व्रजभूषण तत्त्वतां । झाला सूर्यासी अर्घ्य देतां । तो हा पुढें ज्ञानसविता । त्यानें पाहिला प्रत्यक्ष ॥७॥ सूर्याप्रमाणें सतेज कांति । अजानुबाहू निश्चिती । दृष्टि नासाग्राच्या वरती । स्थिर जयाची झाली असे ॥८॥ ऐसा पुरुष पाहतां क्षणीं । व्रजभूषण हर्षला मनीं । संध्यासामान घेऊनी । आला धांवून जवळ त्यांच्या ॥९॥ अर्घ्य दिलें पायांवरी । गजाननाच्या सत्वरीं । प्रदक्षणाही अखेरी । त्यानें घातली तयाला ॥११०॥ मित्राय नमः सूर्याय नमः । भानवे नमः खगाय नमः । ऐसीं नांवें घेऊन पाहा । घातले द्वादश नमस्कार ॥११॥ शेवटीं आरती ओवाळिली । गजाननासी आदरें भली । न्यूनता ती नाहीं पडली । कशाचीही त्या ठायां ॥१२॥ प्रार्थनापूर्वक नमस्कार । साष्टांग केला अखेर । मुखानें तें स्तवन थोर । महाराजाचें चाललें ॥१३॥ माझ्या तपाचरणाचें । फळ आजि मिळालें साचें । दर्शन दिव्य पायाचें । आज झालों धन्य मी ॥१४॥ नभोदरींच्या भास्कराला । देत होतों अर्घ्य भला । तों आज प्रत्यक्ष पाहिला । ज्ञाननिधि योगेश्वर ॥१५॥ (श्लोक) हे पूर्णब्रह्म जगचालक ज्ञानराशी । ऐसें युगायुगीं किती अवतार घेसी ? । झाल्यास दर्शने तुझें भवरोगचिंता । नासे गजाननगुरो, मज पाव आतां ॥१॥ ऐसी प्रार्थना करुन । संपविलें त्यानें स्तवन । योगेश्वरें या आलिंगन । दृढ दिधलें त्या दोन्ही करें ॥१६॥ माय जैसी लेंकराला । प्रेमें धरी पोटाला । तेवीं व्रजभूषणाला । धरिते झाले महाराज ॥१७॥ 
मस्तकावरी ठेविला कर । आशीर्वाद दिधला थोर । सर्वदा तुझा जयजयकार । होईल बाळा व्रजभूषणा ! ॥१८॥ कर्ममार्ग सोडूं नको । विधी निरर्थक मानूं नको । मात्र त्यांत होऊं नको । लिप्त बाळा केव्हांही ॥१९॥ आचरुन कर्मफल । टाकितां भेटतो घननीळ । त्याच्या अंगीं न लागे मळ । या कर्माचा केव्हांही ॥१२०॥ तूं आतां आपुल्या सदनीं । माझे बोल ठेवी मनीं । प्रत्यहीं माझें तुला ध्यानीं । होत जाईल दर्शन ॥२१॥ ऐसें म्हणून प्रसाद दिला । श्रीफलाचा श्रोते भला । त्या व्रजभूषण पंडिताला । महाराज आले शेगांवीं ॥२२॥ ह्या शेगांवाचें होतें नांव । पूर्वकालीं शिवगांव । अपभ्रंशें लाधला ठाव । शेगांव या शब्दाला ॥२३॥ तेंच हल्लीं प्रचलीत । आहे बुधहो वर्‍हाडांत । सतरा पाटील होते सत्य । ह्या एकाच ग्रामाला ॥२४॥ महाराज शेगांवासी आले । परी न स्थिर राहिले । हमेशा ते भटकत फिरले । मनास येईल त्या स्थला ॥२५॥ आकोट अकोलें मलकापूर । नांवें सांगावीं कुठवर ? । चांदण्यांची न होणार । मोजदाद कोणाही ॥२६॥ ज्येष्ठ आषाढ महिना गेला । पुढें श्रावण मास आला । उत्सव होता सुरुं झाला । मारुतीच्या राऊळांत ॥२७॥ हें मारुतीचें मंदिर । शेगांवीं भव्य साचार । पाटील मंडळी थोर थोर । होती या भक्त देवाची ॥२८॥ पेंडीलागीं जैसा आळा । तेवीं पाटील गांवाला । जें जें कांहीं आवडे त्याला । तिकडे लोकांचा कल होई ॥२९॥ चाले उत्सव महिनाभर । अभिषेक पोथी कीर्तन गजर । अन्नदानाशीं येई पूर । अवघे लोक तृप्त होती ॥१३०॥ उत्सवाचा पुढारी । खंडू पाटील निर्धारी । जो गांवचा कारभारी । होता उदार मनाचा ॥३१॥ श्रोते हें पाटीलपण । आहे वाघाचें पांघरुण । तें जो घेई त्याला जन । भिऊं लागती सहजची ॥३२॥ गांव करी तें राव न करी । ऐशी मराठी भितरीं । म्हण एक आहे साजरी । ती यथातथ्य असे ॥३३॥ त्या मारुई मंदिरासी । आले गजानन पुण्यराशी । श्रावणाच्या आरंभासी । उत्सव श्रीचा पाहावया ॥३४॥ बोलले बंकटलालासी । मी आतां या मंदिरासी । राहीन जाणा अहर्निशीं । त्याचा शोक करुं नको ॥३५॥ गोसावी संन्यासी फकीर । यांना कायमचें राहण्या घर । योग्य नाहीं साचार । तुम्हां प्रापंचिकाचें ॥३६॥ मी परमहंस संन्यासी । आतां राहातों मंदिरासी । तूं बोलाविशी ज्या दिवशीं । तेवढयापुरता येईन तेथ ॥३७॥ हें अंतरींचें गुह्य तुला । कथन केलें बंकटलाला । स्वामी शंकराचार्याला । भ्रमण करणें भाग आलें ॥३८॥गोसावी मच्छिंद्र जालंदर । हेही राहिले निरंतर । प्रापंचिकाचें वगळून घर । काननामाजीं वृक्षातळीं ॥३९॥ छत्रपती राजा शिवाजी । जो रणबहादूर वीरगाजी । ज्यानें हिंदूची रक्षिली बाजी । दंडून दुष्ट यवनांना ॥१४०॥ त्या शिवाजीचें प्रेम फार । होतें रामदासावर । परी सज्जनगडावर । स्वामी होते वस्तीला ॥४१॥ याचा विचार करावा । हट्ट मुळीं ना धरावा । माझ्या म्हणण्यास मान द्यावा । यांत कल्याण तुझें असे ॥४२॥निरुपाय होऊन अखेर । देता झाला रुकार । तो बंकटलाल सावकार । गजाननाचें म्हणण्याला ॥४३॥ मंदिरीं स्वामी समर्थ येतां । हर्ष झाला समस्तां । भास्कर पाटील शुश्रूषेकरितां । जवळ राही निरंतर ॥४४॥ हा दासगणूविरचित । गजाननविजय नामें ग्रंथ । मुमुक्षूला दावो पथ । संतचरणसेवेचा ॥१४५॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ ॥ इति षष्ठोऽध्यायः समाप्तः ॥
 

अध्याय ७
॥ श्रीगणेशाय नमः ॥ जय जयाजी राघवा रामा । जय जयाजी मेघःश्यामा । संतजनांच्या विश्रामा । सीतापते दाशरथे ॥१॥ तुझ्या कृपेनें वानर । बलिष्ठ झाले भूमीवर । ज्यांनीं रावणाचा चक्काचूर । केला देवा लंकेवरी ॥२॥ तुझी कृपा झाल्या पाही । तो सर्वदा होतो विजयी । जें जें इच्छील तें तें नेई । काम आपलें तडीला ॥३॥ भूपतीचा वशीला । ज्यातें देवा ! लाधला । तो वंद्य होतो दिवाणाला । नीच कितीही असला जरी ॥४॥ ऐशा अमोघ कृपेला । होईन कां मी योग्य भला । याचा जों मीं विचार केला । तों ऐसें आलें कळोन ॥५॥ नाहीं ज्ञान नाहीं भक्ति । खरीखुरी हे श्रीपती । ऐसी आहे माझी स्थिति । शोचनीय पांडुरंगा ॥६॥ मन सदा आशाळभूत । तें ना कदा स्थिर होत । नाना विकल्प मनांत । येऊं लागती वरच्यावरी ॥७॥ मग ऐशा पातक्याला । केवि लाधावा वशीला । तुझा सांग जगत्पाला । हें व्यावहारिक म्हणणें असे ॥८॥ तुला आवडी पातक्याची । मनापासून आहे साची । ऐसी साक्ष पुराणाची । आहे कीं दीनबंधो ॥९॥ पुण्यवानाचें तारण । केल्या न कांहीं नवल जाण । जो पातक्यालागून । उद्धरीतसे तोच मोठा ॥१०॥ या जगतीं तुझ्याहून । मोठा नाहीं कोणी आन । देवा मम पातकालागून । किमपि आतां पाहूं नको ॥११॥ रक्षी आपला मोठेपणा । मज सांभाळी नारायणा । दासगणू शरण चरणा । आतां उपेक्षा करुं नका ॥१२॥ हा मारुतीचा उत्सव । करीत होता अवघा गांव । याचा पुढारी खंडेराव । पाटील गणेशकुळीचा ॥१३॥ हें पाटीलघराणें जाण । आहे अति पुरातन । घरचें धन कनकसंपन्न । पसारा थोर शेतीचा ॥१४॥ पूर्वीपासून यांच्या घरीं । संत-सेवा होती खरी । आली भाग्यें जमेदारी । मग काय विचारितां ? ॥१५॥ महादाजी पाटलास । दोन मुलगे औरस । थोरल्या त्या पुत्रास । नांव असे कडताजी ॥१६॥ कुकाजी तो धाकटा । पंढरीचा भक्त निका । गोमाजीचा उपदेश देखा । होता या घराण्यातें ॥१७॥ पाटील कडताजी कारण । मुलगे होते सहाजण । कुकाजी नुसता भाग्यवान । पुत्र नव्हता त्याचे कुशीं ॥१८॥ कडताजी पावतां मरण । साही मुलांचें संगोपन । कुकाजीनें केलें जाण । जन्मदात्या बापापरी ॥१९॥ कुकाजीच्या अमदानींत । भरभराट झाली बहुत । अष्टसिद्धि सदनांत । वाटे नांदूं लागल्या ॥२०॥ पाटील कुकाजीनंतर । खंडू करी कारभार । याच्या पुढें साचार । कांहीं न चाले कोणाचें ॥२१॥ या खंडू पाटलाप्रती । पांच बंधु निश्चिती । गणपती नारायण मारुती । हरी आणि कृष्णाजी ॥२२॥ आधींच पाटील जमेदार । सत्ता हातीं साचार । पैशाचा तो निघे धूर । जयाचिया सदनामध्यें ॥२३॥ बंधु सारे तालीम करिती । दांडपट्टे खेळती । कुस्तीचा तो षोक अती । होता हरी पाटलास ॥२४॥ उत्सव नांवास मारुतीचा । तरी जयजयकार पाटलाचा । म्हणतील तो शब्द त्यांचा । झेलणें भाग रयतेला ॥२५॥ नेहमीं कटकटी मारामार्‍या । शेगांवांत होती खर्‍या । पाटील एक्या मापीं सार्‍या । लोकांप्रती मोजितसे ॥२६॥ हा सज्जन साधुसंत । हें न ज्यांच्या मनीं येत । वाटेल त्या बोलती सत्य । अद्वातद्वा यथामती ॥२७॥ असो पाटीलबंधूंनीं । राउळांत येऊनी । महाराजातें हेटाळणी । करण्याचें तें सुरुं केलें ॥२८॥ कोणी म्हणावें पिश्यागण्या । खातोस का ताककण्या ? । ऐशा गोष्टी अति उण्या । त्यांनीं कराव्या समर्थासी ॥२९॥ कोणी म्हणावें खेळ कुस्ती । आम्हांसवें निश्चिती । तुला लोक बोलती । योगयोगेश्वर म्हणोन ॥३०॥ त्याचें दाव प्रत्यंतर । ना तरी आम्ही देऊं मार । याचा करी विचार । बर्‍या बोलानें येधवां ॥३१॥ त्यांचे बोल ऐकावें । समर्थांनीं न उत्तर द्यावें । अवघें हंसण्यावारी न्यावें । कोप न धरावा यत्किंचित्‌ ॥३२॥ ऐसा उर्मट प्रकार । मंदिरीं चाले निरंतर । म्हणून पाटील भास्कर । समर्थासी ऐसें वदला ॥३३॥ नका महाराज येथें राहूं । चला आकोलीं ग्रामा जाऊं । हीं पाटील पोरें माजलीं बहु । यांचा नको संबंध ॥३४॥ हे शक्तीनें माजलें । लक्ष्मीनें धुंद झाले । सत्तेपुढें कांहीं न चाले । येथें यांची पाटीलकी ॥३५॥ गजानन बोलले त्यावरी । भास्करा थोडा दम धरी । ही पाटील मंडळी सारी । आहेत माझे परम भक्त ॥३६॥ मात्र विनयाप्रती थारा । यांच्यापाशीं नाहीं जरा । शोधुनि पहा अंतरा । त्यांच्या म्हणजे कळेल तुज ॥३७॥ हीं पोरें पाटलाचीं । माझीं लेंकरें आहेत साचीं । कृपा आहे संतांची । यांच्या कुळावर भास्करा ॥३८॥ जमेदारा उर्मटपण । हेंच आहे भूषण । काय वाघाचें तें वजन । असावें सांग गाईपरी ? ॥३९॥ तलवारीला मऊपणा । मुळीं उपयोगी नाहीं जाणा । अग्नीनें तो थंडपणा । सांग धरावा कवण्या रीती ? ॥४०॥ गेल्यावरी कांहीं काळ । हा उर्मटपणा जाईल । पावसाळ्याचें गढूळ जल । हिंवाळ्यांत निवळ होई ॥४१॥ एके दिवशीं पाटील हरी । आला मारुतीच्या मंदिरीं । महाराजाला धरुन करीं । म्हणे कुस्ती करी माझ्यासवें ॥४२॥ तुला कुस्तींत करीन चीत । चाल जाऊं तालमींत । उगे न बैसे ऐसें म्हणत । गण गण गणांत बोते ॥४३॥ तुझें प्रस्थ माजलें बहु । तें खरें खोटें आज पाहूं । मला पाडसी तरी देऊं । तुला मोठें बक्षीस ॥४४॥ तें समर्था मानवलें । दोघें तालमीमध्यें गेले । समर्थांनीं कौतुक केलें । तें आतां परियेसा ॥४५॥ खालीं बसले गजानन । उठीव आतां मजलागून । असलास जरी पैलवान । तरी साच करशील हें ॥४६॥ हरी पाटील उठवावया । लागला यत्‍न करावया । परी ते अवघे गेले वायां । हालेनात समर्थ मुळीं ॥४७॥ घामाघूम तनु झाली । शक्तीची ती कमाल केली । पेच झाले निर्बळी । समर्थांसी झुंजतां ॥४८॥ हरी म्हणे मनांत । हा केवढा तरी सशक्त ? । अचल ऐसा पर्वत । याच्यापुढें येईल उणा ॥४९॥ हा किडकिडीत दिसतो जरी । शक्ति याची गजापरी । खोडया आमुच्या नानापरी । आजवरी यानें सहन केल्या ॥५०॥ त्याचें हेंच कारण । हा गजापरी बलवान । आम्ही जंबुकासमान । म्हणून नाहीं रागावला ॥५१॥ जंबुकाच्या चेष्टेला । गजपती न मानी भला । श्वानाचिया भुंकण्याला । व्याघ्र दे ना किंमत ॥५२॥ कांहीं असो याच्या पायीं । आतां ठेवणें आली डोई । आजपर्यंत मी नाहीं । कवणासीही नमन केलें ॥५३॥ समर्थ म्हणाले हरीला । आतां बक्षिस द्या आम्हांला । ना तरी चीत मजला । तुवां करावें कुस्तींत ॥५४॥ कुस्ती हा मर्दानी । षोक श्रेष्ठ सर्वांहुनी । कृष्ण बलरामें बालपणीं । ऐशाच कुस्त्या केल्या रे ! ॥५५॥ मुष्टिक आणि चाणूर । मल्लविद्येनें परमेश्वर । वधिता झाला साचार । जे देहरक्षक कंसाचे॥५६॥ पहिली संपत्ति शरीर । दुअरें तें घरदार । तिसरीचा तो प्रकार । आहे धनमानाचा ॥५७॥ तुझ्याप्रमाणें पूतनारी । पाटील होता यमुनातीरीं । गोकुळींचीं पोरें सारीं । त्यानें केलीं सशक्त ॥५८॥ तैसें तुवां करावें । शरीरबला वाढवावें । ना तरी हें सोडावें । पाटील नांव आपुलें ॥५९॥ हेंच बक्षीस द्यावें मज । ना तरी कुस्ती करी आज । येणें रिती उतरला माज । समर्थांनीं हरीचा ॥६०॥ हरी म्हणे समर्थांस । आपुली कृपा असल्यास । शेगांवच्या लेंकरांस । सशक्त करितां येईल कीं ॥६१॥ ऐसें धूर्तपणाचें बोलणें । केलें पाटील हरीनें । जे मुळांत असती शहाणे । त्यांना शाळा नको कीं ॥६२॥ असो त्या दिवसापासून । हरीने दिलें सोडून । अद्वातद्वा भाषण । करणें पुण्यपुरुषाशीं ॥६३॥ ही पाहोनि त्याची कृति । इतर बंधु बोलती । हरी तूं त्या जोगडयाप्रति । कां भितोसी कळेना ॥६४॥ आपण पाटलाचे कुमार । या गांवींचे जमेदार । तें तूंच कां रे ठेविशी शिर । पदीं त्या नागव्याच्या ॥६५॥ त्या पिशाचें थोतांड । गांवीं माजलें उदंड । त्याचा पाहिजे काढिला दांड । लोकां सावध करावया ॥६६॥ ऐसें न जरी आपण केलें । तरी लोक अवघे होतील खुळे । पाटलाचें कर्तव्य भलें । गांवा हुशार करण्याचें ॥६७॥ मैंद साधूचे वेष घेती । वेडयावांकडया कृत्या करिती । बाया बापडया भोंदिती । याचा करी विचार ॥६८॥ सोन्या कस लाविल्याविना । न कळे रे सोनेपणा । तुकारामाचा शांतपणा । कळून आला उंसानें ॥६९॥ ज्ञानेश तेव्हां साधु कळला । जेव्हां रेडा बोलला । परीक्षेविण कवणाला । अस्थानीं मान देऊं नये ॥७०॥ चाल परीक्षा तयाची । आज आपण करुं साची । मोळी घेऊन ऊंसाची । मंदिरांत पातले ॥७१॥ हरी न कांहीं बोलला । इतरांनीं प्रश्न केला । अरे पिशा या ऊंसाला । खातोस कां तूं सांग हें ? ॥७२॥ जरी ऊंस खाण्याची । इच्छा असेल तुला साची । तरी एक अट आमुची । आहे ती तूं मान्य करी ॥७३॥ आम्ही ऊंसाचे करुं प्रहार । तुझ्या येधवां अंगावर । त्याचे वळ ना उठले जर । तरीच योगी मानूं तुला ॥७४॥ ऐसें भाषण ऐकिलें । महाराज कांहीं न बोलले । लेंकरांचे बालिश चाळे । मनीं न आणी सुज्ञ कदा ॥७५॥ मारुती म्हणाला त्यावर । अरे हा भ्याला साचार । ऊंसाचा तो खाण्या मार । हा कांहीं तयार नसे ॥७६॥ मग म्हणाला गणपती । अरे मौन हीच संमती । त्यानें दिधली आपणाप्रति । आतां काय पहातां ? ॥७७॥ तें दोघां तिघां मानवलें । ऊंस करीं घेतले । समर्थांसी मारण्या भले । आले चढून अंगावर ॥७८॥ तें पाहतां नारीनर । मंदिरीं जे होते इतर । ते पळूं लागले भराभर । भास्कर तेवढा जवळ असे ॥७९॥ भास्कर म्हणे पोरांसी । नका मारुं समर्थांसी । या ऊंसानें आज दिवशीं । हें कांहीं बरें नव्हे ॥८०॥ तुमचा पाटील-कुळांत । जन्म झाला आहे सत्य । तुमचें असावें दयाभूत । अंतःकरण दीनांविषयीं ॥८१॥ हे महासाधु तुम्हांसी । जरी न वाटतील मानसीं । तरी हीन दीन लेखून यासी । द्यावें सोडून हेंच बरें ॥८२॥ अरे शूर जे का शिकारी । ते चाल करिती वाघावरी । उगीच बंदूक घेऊनि करीं । न मारिती नाकतोडा ॥८३॥ मारुतीनें जाळिली । रावणाची लंका भली । उगीच नाहीं चाल केली । झोंपडया पाहून दुबळ्यांच्या ॥८४॥ यावरी म्हणती पोरें । तुमचें भाषण ऐकिलें सारें । गांवींचे लोक अत्यादरें । योगयोगेश्वर म्हणती या ॥८५॥ म्हणून त्याचा पहाया योग । येथें आलों आम्ही चांग । यांत न घ्यावा तुम्ही भाग । पहा मौज दुरुनी ॥८६॥ ऊंस घेऊन हातांत । मारुं लागले समर्थांप्रत । जैशा का झोडितात । ओंब्या शेतीं कृषीवल ॥८७॥ परि न महाराज डगमगले । मुलां पाहून हंसत बसले । कोठेंही ना उमटले । वळ त्यांच्या अंगावर ॥८८॥

तें पहातां पोरें भ्यालीं । चरणीं त्यांच्या लागलीं । म्हणती खराच आहे बली । हा योगयोगेश्वर ॥८९॥ महाराज म्हणती पोरांला । मुलांनो ! तुमच्या करांला । असेल अती त्रास झाला । मारण्यानें मजलागीं ॥९०॥ त्या श्रमाचा करण्या नास । काढून देतों इक्षुरस । तुम्हांलागीं प्यावयास । या बसा माझ्यापुढें ॥९१॥ ऐसें म्हणून घेतला । एक ऊंस करीं भला । हातानेंच पिळून त्याला । रस काढिला पात्रामध्यें ॥९२॥ त्या ऊंसांची अवघी मोळी । समर्थांनीं पहा पिळिली । आणि प्यायाकारणें दिली। रस नव्हाळी पोरांस ॥९३॥ श्रीगजानन पुण्य पुरुष । चरकावांचून काढिला रस । तें पाहातां बालकांस । अति आनंद जाहला ॥९४॥ लोक म्हणती ही योगशक्ति । दंतकथा मुळीं नसती । योगें जी का प्राप्त होती । त्या शक्तीला च्युति नसे ॥९५॥ पौष्टिक पदार्थें शक्ति येते । परी न ऐशी कायम टिकते । सशक्त आपुल्या राष्ट्रातें । करणें असल्या योग शिका ॥९६॥ हेंच तत्त्व सुचवावयासी । त्या पाटील अर्भकांशीं । करें काढून रसाशीं । दाविते झाले श्रोते हो ॥९७॥ समर्थांसी वंदून । गेलीं पोरें निघून । खंडू पाटलाकारण । वर्तमान श्रुत केलें ॥९८॥ दादा आपुल्या गांवांत । गजानन ईश्वर साक्षात्‌ । त्याचा आज आम्हांप्रत । आला आहे प्रत्यय ॥९९॥ ऐसें म्हणून कथिली सारी । हकीकत त्याला खरी । ती ऐकतां अंतरीं । खंडू पाटील चकित झाला ॥१००॥ मग तोही दर्शनाला । समर्थांच्या येऊं लागला । परी मार्दव वाणीला । मुळीं नव्हतें यत्किंचित्‌ ॥१॥ गण्या, गजा ऐसें म्हणे । पाटील समर्थाकारणें । अरे तुरे हें बोलणें । होतें दोन ठिकाणीं ॥२॥ प्रेम आत्यंतिक जें काई । तेथें ऐसें घडून येई । आई लेंकरांमाजी होई । भाषण अरेतुरेचें ॥३॥ हा एक प्रकार झाला । आतां दुसरा राहिला । तोही सांगतों ऐका भला । सावधान चित्तानें ॥४॥ नोकर चाकर हीन दीन । यांच्या सवें जें भाषण । करिती संभावित जन । तेंही एकेरी स्वरुपाचें ॥५॥ अरे तुरे म्हणण्याची । संवय पाटला पडे साची । कां कीं रयत गांवचीं । लेकरें त्याचीं निःसंशय ॥६॥ श्रोते याच संवयीनें । खंडू पाटील गण्या म्हणे । श्रीसमर्थांकारणें । कांहीं न दुसरें कारण ॥७॥ गण्या गण्या म्हणे वाणी । परी प्रेम उपजे अंतःकरणीं । पहा नारळालागुनी । वर करवंटीं खोबरें आंत ॥८॥ याच न्यायें तयाचा । परिपाठ होता बोलण्याचा । वृद्धापकाळ कुकाजीचा । झाला म्हणून कारभार करी ॥९॥ कुकाजी तो एके दिवशीं । बोलतां झाला खंडूशीं । तूं जातोस प्रतिदिवशीं । महाराजांच्या दर्शना ॥११०॥ सांगतोस मला साक्षात्कारी । गजानन एक भूमीवरी । मग का रे तुझी वैखरी । मुग्ध होते त्याच्या पुढें ॥११॥ तुला नाहीं पोरबाळ । माझा झाला वृधापकाळ । नातवंडाचे बोल खेळ । पाहूं दे मज डोळ्यानें ॥१२॥ आज विनंती करी त्यांना । स्वामी समर्थ गजानना । म्हणावें त्या करुन करुणा । पोर एखादें द्या मज ॥१३॥ तो खरा साधु असल्या सत्य । पुरतील तुझे मनोरथ । आणि माझाही अवघा हेत । तडीस जाईल त्यायोगें ॥१४॥ साधु पुरुषा अशक्य कांहीं । जगत्रयीं या उरलें नाहीं । संतलाभाचा करुन घेई । कांहीं आपणां उपयोग ॥१५॥ तें खंडूतें मानवलें । एके दिवशीं बोलणें केलें । मारुतीच्या मंदिरीं भलें । तें ऐका येणें रितीं ॥१६॥ अरे गण्या माझा चुलता । वृद्ध झाला आहे आतां । इच्छा उपजली त्याच्या चित्ता । नातवंड तें पाहण्याची ॥१७॥ तुला लोक साधु म्हणती । दर्शन केल्या तुजप्रती । इच्छा मनींच्या पूर्ण होती । ऐसें लोक सांगतात ॥१८॥ त्याचें दावी प्रत्यंतर । उगा नको करुं उशीर । तुझ्या पायीं ज्याचें शिर । तो कां रहावा निपुत्रिक ? ॥१९॥ ऐसें भाषण ऐकिलें । महाराज त्याशीं बोलले । आज हें उत्तम घडून आलें । त्वां याचना केली आम्हां ॥१२०॥ सत्ता धन तुझ्या हातीं । तूं प्रयत्‍नवादी असशी निगुती । मग विनंती आम्हांप्रति । कां करितोस कळेना ? ॥२१॥ धन आणि बलापुढें । अवघेंच म्हणशी बापुडें । मग कां रे हें न घडे । साह्यें धनबालच्या ॥२२॥ तुझी भव्य आहे शेती । गिरण्या दुकानें पेढया अती । तुझें न कोणी मोडती । जन शब्द या वर्‍हाडांत ॥२३॥ मग त्या ब्रह्मदेवाला । कां न आज्ञा करिशी भला ? । आपणां पुत्र द्यावयाला । हेंच कोडें पडलें मज ॥२४॥ खंडू करी भाषण । ही गोष्ट ना यत्‍नाधीन । पिकें पाण्यापासून । येती जरी जगामध्यें ॥२५॥ तरी पाडणें पाणी । मानवाच्या न करी जाणी । दुष्काळांत जमिनी । पडती उताण्या ख्यात हें ॥२६॥ मात्र पाणी पडल्यावर । कर्तृत्व आपुलें चालवी नर । तैसाच हाही प्रकार । तेथें न गती मानवाची ॥२७॥ खंडू पाडील ऐसें बोलतां । हंसूं आलें समर्था । तूं केलीस याचना आतां । मजकारणें पोराची ॥२८॥ याचना म्हणजे मागणें भीक । हें तूं आज केलें देख । तुला होईल बालक । भिक्या नांव ठेव त्याचें ॥२९॥ पुत्र देणें माझ्या करीं । सर्वतोपरी नाहीं जरी । परी मी विनंती करीन खरी । तुझ्यासाठीं परमेश्वरा ॥१३०॥ तो ऐकेल माझी भीड । त्याला न हें कांहीं जड । तूं घरचा आहेस धड । रस आंब्याचा द्विजां घाली ॥३१॥ हें मम मानी प्रमाण वचन । पुत्र होईल तुजकारण । आम्ररसाचें भोजन । दरसाल घाली ब्राह्मणां ॥३२॥ हें खंडुनें ऐकिलें । घरीं येऊन सांगितलें । कुकाजीसी निवेदिलें । मंदिरींचें वर्तमान ॥३३॥ हें ऐकतां कुकाजीस । आनंद झाला बहुवस । तो कांहीं लोटतां दिवस । समर्थ वचन झालें खरें ॥३४॥ कांता खंडू पाटलाची । गंगाबाई नांवाची । गर्भिणी झाली साची । नवमास पूर्ण झाले ॥३५॥ तिजलागीं पुत्र झाला । खंडू पाटील आनंदला । कुकाजीच्या हर्षाला । पारावार कांहीं नसे ॥३६॥ त्यानें दह्र्म केला बहू । गरीबां दिले गूळ गहूं । पेढे-बर्फीचा दिला खाऊ । गांवांतील अर्भकांना ॥३७॥ थाटांत झालें बारसें । भिकू नांव ठेविलेंसें । पुढें बाळ वाढला असे । शुक्लपक्षीच्या इंदूपरी ॥३८॥ आम्ररसाचें भोजन । दिलें ब्राह्मणांकारण । तो सांप्रदाय अजून । शेगांवांत चालत असे ॥३९॥ पुण्यपुरुषाची वैखरी । कोठून होईल असत्य तरी । पाटलाच्या ओसरीवरी । बाळ रांगूं लागला ॥१४०॥ हा बोलबाला पाटलाचा । देशमुखां पटला न साचा । शेगांव हा दुफळीचा । गांव पहिल्यापासून ॥४१॥ एक फळी देशमुखांची । एक फळी पाटलांची । अंतःकरणें एकमेकांचीं । मुळीं होतीं अशुद्ध ॥४२॥ प्रत्येक आपुल्या डावांत । एकमेकांचा करण्या घात । सदा इच्छिती मनांत । लेश नसे प्रेमाचा ॥४३॥ शास्त्री दोन मंत्री दोन । शस्त्री दोन तंत्री दोन । एकमेकांपुढें श्वान । येतां गुरगुर रोकडी ॥४४॥ तैसें झालें शेगांवांत । पाटील आणि देशमुखांत । छत्तिसाचा आंकडा सत्य । झाला न होईल त्रेसष्टाचा ॥४५॥ पुढें गोष्ट झाली ऐशी । कुकाजी झाले स्वर्गवासी । पाहूनिया नातवंडासी । भीमातटीं पंढरींत ॥४६॥ तेणें खंडूचें उद्विग्न मन । गेलें सहज होऊन । तो म्हणे छत्र पूर्ण । माझें आज ढासळलें ॥४७॥ ज्या चुलत्याच्या जिवावरी । मी निर्भय होतों भूमिवरी । तो आधार माझा श्रीहरी । कां रे नेलास काढून ? ॥४८॥ ऐशी संधि पाहून । बालंट आणायाकारण । पाटलावरी सवड पूर्ण । मिळाली देशमुखमंडळीला ॥४९॥ तो वृत्तान्त अष्टमांत । सांगेन श्रोते तुम्हांप्रत । ही जमेदारी खाण सत्य । आहे प्रत्यक्ष द्वेषाची ॥१५०॥ हा दासगणूविरचित । गजाननविजयनामें ग्रंथ । परिसा श्रोते सावचित्त । कुतर्कातें सोडोनिया ॥१५१॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ ॥ इति सप्तमोऽध्यायः समाप्तः ॥

अध्याय ८
॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे वसुदेवदेवकीनंदना । हे गोपगोपीमनरंजना । हे दुष्टदानवमर्दना । श्रीहरी पाव मातें ॥१॥ तुझ्या प्राप्तीचें साधन । कर्मादिकांचें अनुष्ठान । परा भक्तीचें सेवन । करण्या आहे अपात्र मी ॥२॥ तुझीं ज्ञानदात्रीं शास्त्रें सारीं । गीर्वाण भाषेभीतरीं । त्यांचें सांग करुं हरी । सेवन तें कवण्या रीतीं ॥३॥ गीर्वाणाचा नसे गंध । त्यांतून माझी मती मंद । कमलांतील मकरंद । बेडुकाला मिळतो कसा ? ॥४॥ अन्नदानें तुझी प्राप्ति । जरी करुन घेऊं श्रीपती । तरी धनाचा अभाव निश्चिती । दारिद्रय पदरीं बांधिलें त्वां ॥५॥ जरी करुं मी तीर्थयात्रा । तरी सामर्थ्य नाहीं गात्रां । तशांतही अंधत्व आतां । आलें आहे दृष्टीतें ॥६॥ ऐसा सर्व बाजूंनीं । मी हीनदीन चक्रपाणी । दारिद्रयाचे मनीच्या मनीं । जाती जिरोनी मनोरथ ॥७॥ हें व्यावहारिक दृष्टया खरें जरी । परी तुझी कृपा झाल्यावरी । स्वानंदाच्या सागरीं । पोहत राहे अहोरात्र ॥८॥ तुझ्या कृपेचें महिमान । आगळें आहे सर्वांहून । घनाच्या पाण्यालागून । दाम देण्याची गरज नसे ॥९॥ मेघांनीं आणिल्या मनांत । तळीं विहिरी भरतात । निवळ खडकास फुटतात । पाट पाण्याचे पांडुरंगा ! ॥१०॥ ऐशा त्या तव कृपेचा । दासगणू हा भुकेला साचा । घास एखादा तरी त्याचा । घाल माझ्या मुखांत ॥११॥ तेणें मी तृप्त होईन । अवघ्या सुखातें पावेन । अमृताचा लाभतां कण । रोग सारे दूर होती ॥१२॥ असो मागील अध्यायीं । देशमुख पाटलाठायीं । मुक्कामातें दुफळीबाई । येऊन बसली हें ऐकिलें ॥१३॥ जेथ जेथ ही नादे दुफळी । तेथ तेथ ही करी होळी । अवघ्या सुखाची रांगोळी । इच्या पायीं होतसे ॥१४॥ क्षयरोग तो शरीराला । वा दुफळी रोग समाजाला । नेतसे यमसदनाला । प्रयत्‍न पडती लुळे तेथ ॥१५॥ असो तळ्याचिया कांठावर । देशमुखांचा एक महार । करुं लागला चरचर । या खंडूपाटलापुढें ॥१६॥ पाटील गांवीचा अधिकारी । पाटील गांवीची पांढरी । कांहीं कामावरुन खरी । कुरबुर झाली उभयतांत ॥१७॥ तो असे मर्‍या महार । देशमुखांचा ज्याला जोर । तो बोलला उणें उत्तर । खंडू पाटलाकारणें ॥१८॥ पाटील वदला त्यावरी । तुझी रीत ही नाहीं बरी । गरीबानें पायरी । आपली कधीं सोडूं नये ॥१९॥ उणीं उत्तरें बोलण्याचा । अधिकार आहे देशमुखाचा । तुझ्यासारख्या नकटयाचा । नाहीं हें आण मनीं ॥२०॥ तरी महार ऐकेना । करुं लागला चेष्टा नाना । त्याच्या ऐकोनी भाषणा । पाटील खवळला मानसीं ॥२१॥ बाचाबाचीचें कारण । होतें अति क्षुल्लक जाण । कागद ठाण्यालागून । पाठवणें होते पाटलाला ॥२२॥ तो टप्पा न्यावयासी । सांगितलें होतें महारासी । कीं तूं असाच जा अकोल्यासी । तहशिलींत टप्पा द्याया हा ॥२३॥ तें ऐकोनी वदला महार । मी न हा टप्पा नेणार । देशमुखाच्या आश्रितावर । तुमचा डोळा हमेशा ॥२४॥ कांहीं असो आज दिनीं । मी टप्पा न जाय घेवोनी । तुझ्या हुकुमालागुनी । बोंबा शिमग्याच्या समजतों मी ॥२५॥ ऐसें वदनीं बोलला । हावभावही तैसा केला । मूठ वळुनी हात नेला । त्यानें आपल्या मुखापुढें ॥२६॥ ती त्याची पाहूनि कृती । खंडू पाटील कोपला चित्तीं । भरीव वेळूची काठी होती । पाटलाच्या हातांत ॥२७॥ त्याच काठीचा केला प्रहार । महाराचिया हातावर । पाटील मूळचा जोरदार । त्यानें रागें केला प्रहार हा ॥२८॥ त्या प्रहारें करुनी । हात गेला मोडूनी । महार बेशुद्ध होवोनी । पडता झाला भूमीवर ॥२९॥ पाटील दुसर्‍या महाराला । गेले टप्पा द्यावयाला । तों इकडे वृत्तान्त कैसा झाला । तो आतां सांगतों ॥३०॥ तो महार त्याच्या आप्तांनीं । नेला उचलून देशमुखसदनीं । मोडला हात हें पाहूनि । देशमुख ते संतोषले ॥३१॥ वा ! वा ! छान गोष्ट झाली । आपणां कुरापत काढण्या भली । ही अनायासें संधी आली । ती उपयोगी न दवडणें ॥३२॥ त्यांनीं त्या महारासी । तात्काळ नेलें कचेरीसी । समाजविलें अधिकार्‍यासी । खोटेंनाटें विबुध हो ॥३३॥ कोठेंही दोन पक्षांत । वांकडें आल्या यत्किंचित् । कांटयांचेच होतात । नायटे ते अवलोका ॥३४॥ फिर्याद त्या महाराची । पुस्तकांत नोंदली साची । आज्ञा झाली अधिकार्‍याची । पाटील पकडून आणावया ॥३५॥ शेगांवीं झाली पुकार । उद्यां आहे पडणार । पाटलाच्या पदीं थोर । बेडी करीं हातकडया ॥३६॥ खंडू पाटला समजलें । धाबें त्याचें दणाणलें । तोंडचें पाणी पळालें । झाला अति चिंतातुर ॥३७॥ ज्या शेगांवीं मी वाघापरी । वागत होतों आजवरी । तेथेंच कां हा श्रीहरी । प्रसंग आणिला बेंडीचा ॥३८॥ अब्रुदारास अपमान । वाटे मरणाहून मरण । बंधु गेले घाबरुन । कांहीं विचार सुचेना ॥३९॥ खंडू हताश होऊन बसला । तों एक विचार सुचला त्याला । श्रीगजानन महाराजाला । सांकडें हें घालावें ॥४०॥ त्या साधूचे वांचून । या संकटाचें निरसन । करणारा न कोणी आन । राहिला या वर्‍हाडीं ॥४१॥ लौकिकीं यत्‍न करण्याला । बंधु गेले अकोल्याला । खंडू पाटील नीट आला । समर्थांकडे रात्रीस ॥४२॥ येतांच केला नमस्कार । शिर ठेविलें पायांवर । महाराज आला कठीण फार । प्रसंग तो माझ्यावरी ॥४३॥ सरकारी कामानिमित्त । मी एका महाराप्रत । तळ्यापाशीं ताडिलें सत्य । करांतील काठीनें ॥४४॥ त्याचा ऐसा परिणाम झाला । कांटयाचा नायटा केला । देशमुख मंडळींनीं भला । माझें अहित करण्यास ॥४५॥ त्यानिमित्त कैद मला । होण्याचा उद्यां प्रसंग आला । समर्था माझ्या इज्जतीला । तुजवीण कोण रक्षील ? ॥४६॥ उद्यां येतील राजदूत । मला येथूनि नेण्याप्रत । बेडी ठोकोनि पायांत । ऐसें आज ऐकिलें ॥४७॥ त्यापेक्षां गुरुवरा । गळा माझा येथेंचि चिरा । ही घ्या तलवार देतों करां । वेळ करुं नका हो ॥४८॥ अब्‍रुदाराकारण । बेइज्जत हेंच मरण । अपराध माझा त्यांतून । अति अल्प दयाळा ॥४९॥ त्या अपराधरुपी खडयाचा । हा डोंगर झाला साचा । अभिमान माझ्या अब्रूचा । धरा समर्था ये काळीं ॥५०॥ जयद्रथाच्या वेळेला । अग्निकाष्ठ भक्षिण्याला । होता अर्जुन तयार झाला । केवळ आपुल्या अब्रूस्तव ॥५१॥ तेथें भगवंतानें भली । अब्रू त्याची रक्षण केली । प्रभूनें वस्त्रें नेसविलीं । द्रौपदीला सभेंत ॥५२॥ तेवीं मम अब्रूही पांचाळी । देशमुख कौरवांनीं आणिली । नग्न करण्यासाठीं भली । तिचें करा हो रक्षण ॥५३॥ ऐसें वदून समर्थाला । पाटील रडूं लागला । आसवांचा तो चालला । पूर नेत्रांवाटें हो ! ॥५४॥ घरचीं माणसें चिंतातुर । आधींच झालीं होतीं फार । नाहीं त्यांच्या शोका पार । तो सांगावा कोठवरी ? ॥५५॥ इकडे समर्थांनीं भले । दोन्ही हातीं कवटाळिलें । खंडू पाटला हृदयीं धरिलें । त्याचें सांत्वन करावया ॥५६॥ अरे ! कामकर्त्या पुरुषाप्रत । ऐशीं संकटें येतात । वरच्यावरी जाण सत्य । त्याची चिंता वाहूं नको ॥५७॥ स्वार्थदृष्टि बळावतां । ऐसेंच होतें तत्त्वतां । खर्‍या नीतीची ती वार्ता । अणुमात्र त्या कळत नसे ॥५८॥ तुम्ही पाटील देशमुख दोघेजण । एका जातीचे असून । एकमेकांचें नुकसान । स्वार्थें करुं पाहतां ॥५९॥ मागें कौरवपांडवांत । स्वार्थेंच आला विपट सत्य । परि पांडवांचा पक्ष तेथ । न्यायें खरा होता कीं ॥६०॥ म्हणून पांडवांकारणें । साह्य केलें भगवंतानें । सत्यासाठीं मारणें । भाग पडलें कौरवांना ॥६१॥ जा भिऊं नकोस तिळभर । बेडी न तुशीं पडणार । किती जरी केला जरी केला जोर । देशमुखानें आपला ॥६२॥ तेंच पुढें खरें झालें । पाटील निर्दोषी म्हणून सुटले । जें कां संतमुखावाटें आलें । तें न खोटें होई कधीं ॥६३॥ पाटील मंडळी उत्तरोत्तर । भजूं लागली साचार । कोणा नाहीं आवडणार । अमृत तें सेवावया ? ॥६४॥ पुढें खंडू पाटलानें । करुन विनंति प्रेमानें । नेलें रहायाकारणें । समर्थाला निजगृहीं ॥६५॥ असतां पाटील सदनांत । गजाननस्वामी समर्थ । ब्राह्मण आले अवचित । दहापांच तैलंगी ॥६६॥ तैलंगी विद्वान असती । कर्मठ वेदावरी प्रीती । परी धनाचा लोभ चित्तीं । राही ज्यांच्या विशेष ॥६७॥ तें कांहीं मिळेल म्हणून । समर्थाकडे आले जाण । तयीं होते पांघरुण । घेऊन समर्थ निजलेले ॥६८॥ त्यांना जागे करण्याप्रत । ब्राह्मण म्हणूं लागले मंत्र । जटेचे ते स्वरासहित । अति उच्च स्वरानें ॥६९॥ मंत्र म्हणण्यांत चूक झाली । ती न त्यांनीं दुरुस्त केली । म्हणून आसनीं उठून बसली । गजाननाची स्वारी पहा ॥७०॥ आणि ऐसें वदले ब्राह्मणांला । तुम्ही कशासाठीं वैदिक झालां । हीनत्व वेदविद्येला । आणूं नका रे निरर्थक ॥७१॥ ही न विद्या पोटाची । मोक्षदात्री आहे साची । वा डोईस बांधल्या शालीची । किंमत कांहीं राखा हो ॥७२॥ मी म्हणतों ऐसें म्हणा । खरे स्वर मनीं आणा । उगीच भोळ्या भाविकांना । सोंग आणून नाडूं नका ॥७३॥ जी ऋचा ब्राह्मणांनीं । म्हणण्या सुरुं केली जाणी । तोच अध्याय समर्थांनीं । धडधड म्हणून दाखविला ॥७४॥ चूक न कोठें म्हणण्यांत । शब्दोच्चार स्पष्ट सत्य । वाटे वसिष्ठ मूर्तिमंत । वेद म्हणण्या बसला असे ॥७५॥ तेलंगी तें ऐकून चकित झाले । अधोवदन बैसले । मुख वरी करण्या आपुलें । भय मनीं वाटलें त्यां ॥७६॥ सूर्य उदय झाल्यावर । त्याच्यापुढें कां होणार । दीपांचा तो जयजयकार । त्यांची किंमत अंधारीं ॥७७॥ विप्र म्हणती आपुल्या मनीं । हा पिसा कशाचा महाज्ञानी । चारी वेद याच्या वदनीं । नांदतात प्रत्यक्ष ॥७८॥ हा विधाताच होय दुसरा । शंका येथें नुरली जरा । हा असावा ब्राह्मण खरा । जातीनें कीं निःसंशय ॥७९॥ परमहंस दीक्षा याची । वार्ता न उरली बंधनाची । कोणत्याही प्रकारची । हा जीवन्मुक्त सिद्धयोगी ॥८०॥ कांहीं पुण्य होतें पदरीं । म्हणून मूर्ति पाहिली खरी । हा वामदेव याला दुसरी । उपमा न ती द्यावया ॥८१॥ असो खंडू पाटलाकडून । त्या ब्राह्मणांलागून । देते झाले दयाघन । रुपया रुपया दक्षिणा ॥८२॥ ब्राह्मण संतुष्ट झाले । अन्य गांवां निघून गेले । महाराजही कंटाळले । उपाधीला गांवच्या ॥८३॥ श्रोते खर्‍या संताप्रत । उपाधी ना असे पटत । दांभिकाला मात्र । भूषण होतें तियेचें ॥८४॥ गांवाचिया उत्तरेला । एक मळा सान्निध्याला । या मळ्यांत भाजीपाला । होत होता बहुवस ॥८५॥ एक शिवाचें मंदिर । तेथें होतें साचार । लिंबतरुंची थंडगार । छाया होती ते ठायीं ॥८६॥ हा कृष्णाजी पाटलाचा । मळा होता मालकीचा । हा कृष्णाजी खंडुजीचा । सगळ्यांत शेवटला भाऊ असे ॥८७॥ त्या मळ्यांत महाराज आले । शिवालयासन्निध बसले । एका ओटयावरी भले । निंबतरुच्या छायेंत ॥८८॥ समर्थ म्हणाले कृष्णाजीसी । मी आलों तुझ्या मळ्यासी । कांहीं दिवस राहावयासी । या श्रीशंकरासन्निध ॥८९॥ हा भोलानाथ कर्पूरगौर । नीलकंठ पार्वतीवर । हा राजराजेश्वर । आहे अवघ्या देवांचा ॥९०॥ तो तुझ्या मळ्यांत रमला । म्हणून मींही विचार केला । येथें येण्याचा तो भला । दे साउली करुन ॥९१॥ तें वाक्य ऐकिलें । सहा पत्रे आणविले । ओटयावरी छप्पर केलें । कृष्णाजीनें तात्काळ ॥९२॥ समर्थांनीं वास केला । म्हणून मला क्षेत्र झाला । राजा जाय जया स्थला । मीच होते राजधानी ॥९३॥ महाराजांचे बरोबर । होता पाटील भास्कर । सेवा करण्या निरंतर । दुसरा तुकाराम कोकाटया ॥९४॥ खाण्यापिण्याची तरतूद सारी । निजांगें कृष्णाजी पाटील करी । समर्थ ते जेवल्यावरी । तो प्रसाद घेत असे ॥९५॥ असो गजानन असतां मळ्यांत । गोष्ट घडली अद्‌भुत । येते झाले फिरत फिरत । दहा वीस गोसावी ते ठायां ॥९६॥ समर्थांचा बोलबाला । त्यांनीं आधींच होता ऐकिला । म्हणूनि त्यांनीं तळ दिला । येऊनि या मळ्यामध्यें ॥९७॥ गोसावी म्हणती पाटलासी । आम्ही आहों तीर्थवासी । जातों रामेश्वरासी । भागीरथीला घेऊन ॥९८॥ गंगोत्री जम्नोत्री केदार । हिंगलाज गिरनार डाकुर । ऐशीं क्षेत्रें अपार । पाहिलीं पायीं फिरुनी ॥९९॥ ब्रह्मगिरी गोसाव्याचे । आम्ही शिष्य आहों साचे । महाराजही आमुचे । आहेत सांप्रत बरोबर ॥१००॥

हे महासाधु ब्रह्मगिरी । ज्यांचा बंदा गुलाम हरी । ती मूर्ति आली घरीं । तुझ्या पूर्वभाग्यानें ॥१॥ शिरापुरीचें अयाचित । आम्हां द्यावें तुम्ही त्वरित । लागे जो ओढण्याप्रत । गांजा तोही पुरवावा ॥२॥ तीन दिवस येथें राहूं । चौथे दिवशीं येथून जाऊं । पाटील नका कष्टी होऊं । साधून घ्या ही पर्वणी ॥३॥ तुम्ही पोशिला मळ्यांत । वेडा पिसा नंगाधूत । मग आम्हां देण्या अयाचित । मागें पुढें कां पाहतां ? ॥४॥ गाढवासी पोशिती । गाईस लाथा मारिती । ते का म्हणावें सन्मती । पहा विचार करुन ॥५॥ आम्ही गोसावी वैराग्यभरित । जाणतों अवघा वेदान्त । मर्जी असल्या मळ्यांत । या पोथी ऐकावया ॥६॥ कृष्णाजी म्हणे त्यावरी । उद्यां घालीन शिरापुरी । आज आहेत भाकरी । त्याच जाव्या घेऊन ॥७॥ जितुका गांजा ओढाल । तितुका तेथेंच मिळेल । तेथें चालता बोलता कंठनीळ । बसला आहे पत्र्यामध्यें ॥८॥ दोन प्रहराची वेळा खरी । घेतल्या चूण भाकरी । मळ्यांत घेउनि विहिरीवरी । बसले गोसावी भोजना ॥९॥ समर्थांच्या समोरी । एका छपराभीतरीं । गोसाव्यांनीं लाविली खरी । आपआपलीं कडासनें ॥११०॥ त्यांचा जो होतो महंत । ब्रह्मगिरी नामें सत्य । तो भगवद्गीतेप्रत । वाचूं लागला अस्तमानीं ॥११॥ गोसावी श्रवणा बैसले । गांवांतूनही कांहीं आले । पोथी ऐकावया भले । त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची ॥१२॥ "नैनं छिन्दन्ति" हा श्लोक । निरुपणाचा होता देख । ब्रह्मगिरी पक्का दांभिक । स्वानुभवाचा लेश नसे ॥१३॥ निरुपण त्याचें ऐकिलें । गांवकर्‍यास नाहीं पटलें । ते आपसांत बोलूं लागले । हा नुसता शब्दच्छल ॥१४॥ सारे पोथी ऐकिल्यावरी । येऊन बसले पत्र्याभीतरीं । गजाननाच्या समोरी । संतदर्शन घ्यावया ॥१५॥ लोक म्हणती छपराला । निरुपणाचा भाग झाला । येथें पत्र्यास बैसला । स्वानुभवाचा पुरुष हा ॥१६॥ तेथें ऐकला इतिहास । येथें पाहिला प्रत्यक्ष पुरुष । या भाषणें गोसाव्यास । राग आला कांहींसा ॥१७॥ अवघे गोसावी गांजा प्याया । बसले होते घेऊनिया । त्या पत्र्याचिया ठायां । चालली चिलीम गांजाची ॥१८॥ पत्र्यांत पलंगाच्या वरी । बसली होती समर्थस्वारी । चिलीम भरुन वरच्यावरी । प्याया देई भास्कर ॥१९॥ त्या चिलिमीच्या विस्तवाची । ठिणगी पलंगीं पडली साची । ती पडतांना कोणाची । दृष्टि न गेली तिच्यावर ॥१२०॥ कांहीं वेळ गेल्यावर । निघूं लागला धूर । पलंग पेटला अखेर । एकदम चहूं बाजूंनीं ॥२१॥ तो प्रकार पाहतां । भास्कर बोले सद्‌गुरुनाथा । पलंग सोडा शीघ्र आतां । या खालीं उतरुन ॥२२॥ लाकडें हीं पलंगाचीं । आहेत कीं सागाचीं । तीं न आतां विझायाचीं । पाण्यावांचून दयाळा ॥२३॥ तयीं समर्थ बोलले वाचें । भास्करा अग्नि विझविण्याचें । कारण नाहीं तुला साचें । जल मुळींच आणूं नको ॥२४॥ अहो महाराज ब्रह्मगिरी । या बैसा पलंगावरी । तुम्हां आहे अवगत खरी । भगवद्गीता साकल्यें ॥२५॥ त्याच्या परीक्षेची वेळ । आणिली हरीनें तात्काळ । ब्रह्मा न जाळी अनळ । याचा प्रत्यय दाखवा ॥२६॥ "नैनं छिन्दन्ति" श्लोकावर । व्याख्यान केलें एक प्रहर । आतां कां मानितां दर । या पलंगीं बसण्याचा ? ॥२७॥ जा भास्करा लौकरी । ब्रह्मगिरीला करीं धरी । आणून बसवी अत्यादरीं । या जळत्या पलंगास ॥२८॥ ऐशी आज्ञा होतां क्षणीं । भास्कर गेला धांवोनी । ब्रह्मगिरीचा सव्य पाणी । धरिला त्यानें निजकरें ॥२९॥ भास्कराचें शरीर । धिप्पाड सशक्‍त पिळदार । तो गोसावि त्याच्या समोर । शोभूं लागला घुंगुरडें ॥१३०॥ पलंग पेटला चौफेर । ज्वाळा निघूं लागल्या थोर । परी महाराज आसनीं स्थिर । हलले मुळीं न इतकेंही ॥३१॥ श्री प्रल्हाद कयाधूसुत । उभा केला अग्नींत । हें लिहिलें पुराणांत । श्रीव्यासांनीं भागवतीं ॥३२॥ त्या लिहिल्या गोष्टीचें । प्रत्यंतर दाविलें साचें । मळ्यामाजीं कृष्णाजीचें । श्रीगजानन साधूंनीं ॥३३॥ ब्रह्मगिरी म्हणे भास्कराशीं । मला न न्या पलंगापाशीं । महाराजांच्या अधिकाराशीं । मीं नाहीं जाणितलें ॥३४॥ तें न मानी भास्कर । ओढीत आणिला फरफर । उभा केला समोर । आपल्या सद्‌गुरुरायाच्या ॥३५॥ ’नैनं दहति पावक ।’ हें खरें करुन दावा वाक्य । ऐसें बोलतां महाराज देख । गोसावी परम घाबरला ॥३६॥ गोसावी म्हणे भीत भीत । मी पोटभर्‍या आहे संत । शिरापुरी खाण्याप्रत । मी झालों गोसावी ॥३७॥ माझ्या अपराधाची क्षमा । साच करी शांतिधामा । केला खटाटोप रिकामा । गीताशास्त्र शिकण्याचा ॥३८॥ तुला पिसा मी म्हणालों । आतां पस्तावा पावलों । मी दांतीं तृण धरुन आलों । शरण तुला अभय दे ॥३९॥ शेगांवच्या जनांनीं । केली समर्थां विनवणी । आपणा अग्नीपासूनी । भय नाहीं हें खरें ॥१४०॥ तरी महाराज आमच्याकरितां । खालीं यावें लवकर आतां । अशा स्थितींत पाहतां । तुम्हां आम्हां धडकी भरे ॥४१॥ म्हणून आमच्यासाठीं । उतरा खालीं ज्ञानजेठी ॥ गोसावी झाला हिंपुटी । तो न कांहीं बोलला ॥४२॥ लोक विनंतीस द्याया मान । खालीं उतरले गजानन । तो पलंग पडला कोसळून । एक पळही न लागलें त्या ॥४३॥ अवघाच होता जळला । जो भाग शेष उरला । तो लोकांनीं विझविला । साक्ष दावण्या इतरांसी ॥४४॥ ब्रह्मगिरी पायीं लागला । निरभिमान अवघा झाला । स्पर्श होता गंगाजला । मल कोठूनी राही तेथ ? ॥४५॥ मग मध्यरात्रीच्या समयाला । ब्रह्मगिरीस बोध केला । आजपासून चेष्टेला । तूं या सोडून देईं रे ॥४६॥ ज्यांनीं राख लावावी । त्यांनीं उपाधी दूर ठेवावी । अनुभवावीण न सांगावी । गोष्ट कोणा निरर्थक ॥४७॥ नुसतें शब्दपांडित्य । माजलें जगीं अतोनात । तेणेंच आहे झाला घात । आपुल्या या संस्कृतीचा ॥४८॥ गोसावी मच्छिंद्र जालंदर । गोरख गहिनी साचार । ज्ञानेश्वराचा अधिकार । किती म्हणून सांगावा ॥४९॥ स्वानुभवाचे झाले यती । श्रीशंकराचार्य निश्चितीं । प्रपंचीं राहून ब्रह्मस्थिति । अनुभविली एकनाथांनीं ॥१५०॥ स्वामी समर्थ ब्रह्मचारी । हेही ब्रह्मसाक्षात्कारी । होऊन गेले भूमीवरी । यांचीं चरित्रें आणी मना ॥५१॥ उगीच खाया शिरापुरी । भटकूं नको भूमीवरी । सार न तयामाझारीं । येतुलेंही गवसणार ॥५२॥ ऐसा बोध ऐकिला । ब्रह्मगिरी विरक्त झाला । प्रातःकाळींच उठोन गेला । कोणा न भेटतां शिष्यांसह ॥५३॥ ही गोष्ट दुसर्‍या दिवशीं । कळली अवघ्या गांवासी । जो तो आला पाहावयासी । मळ्यांत जळलेल्या पलंगातें ॥५४॥ हा दासगणूविरचित । गजाननविजय नामें ग्रंथ । तारो भाविकां भवाब्धींत । हेंचि इच्छी दासगणू ॥१५५॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ ॥इति अष्टमो‍ऽध्यायः समाप्तः ॥ 

अध्याय ९
॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे सगुण स्वरूपा रुक्मिणीवरा । हे चंद्रभागातटविहारा । श्रीसंतवरदा शारंगधरा । पतितपावना दयानिधे ॥१॥ लहानावांचून मोठ्याचा । मोठेपणा न टिके साचा । पतिताविण परमेश्वराचा । बोलबाला होणें नसे ॥२॥ आम्ही आहों पतित । म्हणून तुला म्हणतात । पावनकर्ता रुक्मिणीकांत । हें आतां विसरूं नको ॥३॥ परिस लोहाला सोनें करी । म्हणुनी त्याचें महत्त्व भूमीवरी । ओहोळ पोटीं घे गोदावरी । म्हणून म्हणती तीर्थ तिला ॥४॥ याचा विचार करावा । चित्तीं आपुल्या माधवा । दासगणूला हात द्यावा । बुडूं न द्यावें कोठेंही ॥५॥ असो गोविंदबुवा टाकळीकर । एक हरिदास होता थोर । तो कराया कीर्तनगजर । शेगांवासी पातला ॥६॥ तेथें शिवाचें मंदिर । पुरातन होतें साचार । ज्याचा केला जीर्णोध्दार । मोटे नामक सावकारें ॥७॥ अलिकडच्या श्रीमंताला । मदिराचा कंटाळा । मोटारी क्लब बायसिकला । यांचें प्रेम बहु असे ! ॥८॥ तैसा न मोटे सावकार । श्रीमंत असून भाविक फार । त्यानेंच हा जीर्णोध्दार । केला असे मंदिराचा ॥९॥ म्हणोन मोट्याचें मंदिर । वदूं लागले नारीनर । आतां पुढचा प्रकार । काय झाला तो ऎका ॥१०॥ त्या मोट्याच्या मंदिरीं । उतरले टाकळीकर कथेकरी । त्यांचा घोडा समोरी । बांधिला होता मंदिराच्या ॥११॥ घोडा अतिद्वाड होता । कोणासही मारी लाथा । समोरून कोणी येतां । त्यास चावे कुत्र्यासम ॥१२॥ तोडी चर्‍हाटें वरच्यावरी । स्थिर न राहे क्षणभरी । कधीं कधीं कांतारीं । त्यानें जावें पळोन ॥१३॥ खिंकाळे रात्रंदिवस । वाईट खोड्या बहुवस । आल्या होत्या मुक्कामास । श्रोते तया घोड्याच्या ॥१४॥ लोखंडाच्या सांखळ्या । होत्या त्यासी बांधण्या केल्या । त्या या समयीं राहिल्या । टाकळीमाजी विसरून ॥१५॥ चर्‍हाटानें कसा तरी । घोडा मंदिरासामोरी । बांधूनिया कथेकरी । निजले जाऊन शय्येला ॥१६॥ रात्र झाली दोन प्रहर । तमें आक्रमिलें अंबर । दिवाभीतांचे घुत्कार । होऊं लागले वृक्षावरी ॥१७॥ टिटव्या ' टी टी ' शब्द करिती । वाघुळें भक्ष्या धुंडिती । पिंगळे बसुनि वृक्षांवरती । किलबील करूं लागले ॥१८॥ सामसुम जिकडे तिकडे । बंद झालीं कवाडें । कोठेंही ना दृष्टि पडे । एकही माणूस रस्त्यांनीं ॥१९॥ ऎशा रात्रसमयास । श्रीगजानन पुण्यपुरुष । घोडा बांधल्या ठायास । येते झाले सहजगतीं ॥२०॥ जे जे कोणी द्वाड असती । त्यांना सुधारण्याप्रती । साधुपुरुष अवतार घेती । ईशाज्ञेनें भूमीवर ॥२१॥ औषधाचें प्रयोजन । रोगा निवारण्याकारण । तेवीं द्वाडाचें द्वाडपण । साधुसंत निवारिती ॥२२॥ असो गजानन घोड्यापासी । आले रात्रसमयासी । जाऊनी निजले अति हर्षीं । चहूं पायांत घोड्याच्या ॥२३॥ मुखें भजन चाललें होतें । ' गणी गण गणांत बोते ' । या सांकेतिक भजनातें । जाणण्या कोण समर्थ हो ? ॥२४॥ त्या सूत्ररूप भजनाचा । अर्थ ऎसा वाटतो साचा । गणी या शब्दाचा । अर्थ मोजी हाच असे ॥२५॥ जीवात्मा म्हणजे गण । तो ब्रह्माहून नाहीं भिन्न । हें सुचवावया कारण । गणांत हा शब्द असे ॥२६॥ बोते हा शब्द देखा । अपभ्रंश वाटे निका । बोते हा शब्द ऎका । तेथें असावा निःसंशय ॥२७॥ बाया शब्दें करून । घेतलें पाहिजे मन । तें हें आहे सर्वनाम । शब्दाऎवजीं आलेलें ॥२८॥ म्हणजे मना समजे नित्य । जीव हा ब्रह्मास सत्य । मानूं नको तयाप्रत । निराळा त्या तोचि असे ॥२९॥ ' गिणगिण गिणांत बोते ' । कोणी ' गणी गण गणांत बोते , । ऎशीं आहेत दोन मतें । या भजनाविषयीं शेगांवीं ॥३०॥ त्यासी न आपुलें प्रयोजन । आपणा कथेसी कारण । महाराज निजले येऊन । चौपायांत घोड्याच्या ॥३१॥ वरील भजन मुखानें । चाललें होतें आनंदानें । वाटे या भजनरूप सांखळीनें । घोडा बांधूनीं टाकिला ॥३२॥ गोविंदबुवांच्या अंतरीं । धास्ती होती जबर खरी । म्हणून तो वरच्यावरी । उठून पाहे वारूला ॥३३॥ तो ठाण्यावरी घोडा शांत । ऎसें पडता दृष्टीप्रत । गोविंदबुवांच्या चित्तांत । अति नवल वाटलें ॥३४॥ तों आपुल्या मनीं म्हणे । हें ऎसें झालें कशानें । का कांहीं आजारानें । व्याप्त झाला घोडा हा ॥३५॥ म्हणूनी राहिला शांत । हें न काहीं कळों येत । हा ऎसा आजपर्यंत । नाहीं कधीच स्थिरावला ॥३६॥ हें काय आहे तें पहाया गेलें । तों एक माणूस दिसलें । चोहोंपायांत निजलेले । त्या द्वाड घोड्याच्या ॥३७॥ अति निकट येऊनी । पाहूं लागले निरखुनी । तों दिसले कैवल्यदानी । तेथें गोविंदबुवाला ॥३८॥ ते म्हणाले मनांत । घोडा कां झाला शांत । हें कळलें कारणासहीत । मजलागीं येधवां ॥३९॥ समर्थांच्या सहवासें । घोडा शांत झालासे । जेथें कस्तुरी तेथें नसे । दुर्गंधाला थारा कदा ॥४०॥ समर्थांच्या पायांवरी । गोविंदबुवानें अत्यादरीं । शिर ठेविलें निर्धारीं । अष्टभाव दाटले ॥४१॥

मुखें करूं लागलें स्तवन । आपण खरेच गजानन । विघ्नांचे करितसा कंदन । याचा प्रत्यय आज आला ॥४२॥ माझा घोडा द्वाड अती । सर्वही ज्याला भीती । तेथेंच आलात गुरुमूर्ती । हरण्या त्याचा द्वाडपणा ॥४३॥ ह्या घोड्याच्या अचाट खोडी । चालतां मध्येंच मारी उडी । क्षणक्षणा मागल्या झाडी । हा दुगण्या महाराजा ! ॥४४॥ मी गेलों होतों कंटाळून । म्हणूण बाजारालागून । गेलों विकाया कारण । परी न कोणी घेई या ॥४५॥ फुकटही लागलो द्याया । परी न कोणी तयार घ्याया । त्यावरी आपण केली दया । हें झालें फार बरें ॥४६॥ आम्हां कथेकर्‍याचें । घोडें पाहिजे गरीब साचें । घरामाजीं धनगराचें । नाहीं वाघ कामाचा ॥४७ ऎसा झाला प्रकार । घोडें झाले गरीब फार । जडजीवांचा उध्दार । करण्यास स्वामी अवतरले ॥४८॥ घोड्यास म्हणाले, " आतां गड्या । करूं नकोस खोड्या । त्या तेथेंच रोकड्या । द्याव्या अवघ्या सोडून ॥४९॥ तूं शिवाच्या समोरीं । याचा विचार कांहीं करी । वागत जावें बैलापरी । त्रास न देई कवणातें " ॥५०॥ ऎसें त्यासी बोलून । निघून गेले दयाघन । कृपाकटाक्षें करून । पशूही ज्यानें आकळिला ॥५१॥ असो श्रोते दुसरे दिवशीं । मळ्यांत असतां पुण्यराशी । आले गोविंदबुवा दर्शनासी । घोड्यावरी बैसून ॥५२॥ घोडा गोविंदबुवांचा । शेगांवासी ठाऊक साचा । कोश अवघ्या खोड्यांचा । भीत होते त्यासी जन ॥५३॥ तो मळ्यांत आलेला पाहून । लोक बोलले त्याकारण । गोविंदबुवा ही घेऊन । पीडा कशास येथें आला ॥५४॥ मुलें बायका मळ्यांत । आहेत पहा वावरत । तुमचा घोडा करील घात । सहज लीलेनें कवणाचा ॥५५॥ गोविंदबुवा त्यास वदले । तुमचें म्हणणें मीं ऎकिलें । माझ्या घोड्यास शहाणें केले । काल रात्रीं समर्थांनी ॥५६॥ त्यानें खोड्या दिल्या टाकून । झाला गोगलगाईसमान । आतं भ्यावयाचें कारण । कांहीं न उरलें कोणाशीं ॥५७॥ चिंचेखालीं उभा केला । टाकळीकरांनी घोडा भला । चर्‍हाटावांचूनी राहिला । उभा तो एक प्रहर ॥५८॥ भाजीपाला कोवळा घांस । मळ्यांत होता विशेष । परी ना लाविलें त्यास । तोंड घोड्यानें एकाही ॥५९॥ पाहा संताची केवढी शक्ति । पशूही आज्ञेंत वागती । पत्र्यांत आरंभिली स्तुती । गोविंदबुवांनीं समर्थांची ॥६०॥ श्लोक ( पृथ्वी वृत्त ) अचिंत्य जगताप्रती कृति तुझी न कोणा कळे । असो खलहि केवढा तव-कृपें सुमार्गी वळे ॥ उणें पुढति ये तुझ्या खचित रत्नचिंतामणी । शिरीं सतत माझिया वरदहस्त ठेवा झणीं ॥१॥ ऎसी स्तुती करून । गेले गोविंदबुवा निघून । घोड्यास आपल्या घेऊन । टाकळी ग्रामाकारणें ॥६१॥ प्रत्येक दिनीं शेगावीं । यात्रा येई नवी नवी । कांहीं तरी धरून जीवीं । हेतु आपल्या श्रोते हो ॥६२॥ त्या यात्रेकरू मंडळींत । बाळापूरचे दोन गृहस्थ । आले कांहीं धरून हेत । समर्थांच्या दर्शना ॥६३॥ पथीं जातां एकमेकां । बोलूं लागले ऎसें देखा । पुढल्या वारीस गांजा सुका । येऊं आपण घेऊन ॥६४॥ कां कीं या गांजावर । समर्थांचे प्रेम फार । तो आपण आणिला जर । तरी कृपा होईल त्यांची ॥६५॥ लोक आणती बर्फी खवा । आपण गांजा नेऊं बरवा । गांठ धोत्रां बांधून ठेवा । ना तरी विस्मृति होईल ॥६६॥ पुढल्या वारीस दोघेजण । आले दर्शनाकारण । परि गेले विसरोन । गांजा तो आणावया ॥६७॥ शिर ठेवितां पायांवरी । आठवण त्यांना झाली खरी । कीं नाहीं आणिला बरोबरी । गांजा तो आपण ॥६८॥ आतां पुढल्या वारीसी । दुप्पट आणूं गांज्यासी । ऎसें बोलून मानसीं । दर्शन घेऊन गेले हो ॥६९॥ पुढल्या वारीस तेंच झालें । गांजा आणण्याचे विसरले । कर जोडून मात्र बसले । स्मृति नसे गांजाची ॥७०॥ तै स्वामीं म्हणाले भास्करासी । पाहा जगाची रीत कैसी । गांठ मारून धोतरासी । विसरती जिन्नस आणावया ॥७१॥ जातीनें आहेत ब्राह्मण । तेच आपुलें भाषण । करिती आपण होऊन । खोटें पहा सर्वांशीं ॥७२॥ ब्राह्मणांचे भाषण । कदा नसावें अप्रमाण । या तत्त्वालागून । न जाणती चांडाळ ते ॥७३॥ द्विजें निजधर्म सोडिला । आचार विचार सांडिला । ह्यामुळें श्रेष्ठत्वाला । ते मुकले सांप्रत ॥७४॥ बेटे मनीं नवस करिती । आणि हात हालवित येथें येती । अशानें कां पूर्ण होती । त्यांच्या मनींचे मनोरथ ? ॥७५॥ बोलण्यांत पाहिजे मेळ । चित्त असावें निर्मळ । तरीच तो घननीळ । कृपा करितो भास्करा ॥७६॥ हे शब्द त्या दोघांसी । अती लागले मानसीं । पाहूं लागले एकमेकांसी । कुतूहल दृष्टीनें ॥७७॥ पाहा केवढें अगाध ज्ञान । आहे यांचें परिपूर्ण । हा जगत्चक्षु गजानन । सूर्यापरीच असे हो ॥७८॥ आपण नवस केला मनीं । तो जाणिला समर्थांनी । आतां येऊं घेऊनी । चला गांजा गांवांतून ॥७९॥ ऎसा विचार करून उठले । गांवांत जाऊं लागले । गांजा आणावयाला भले । तैं महाराज वदले त्या ॥८०॥ आतां शिळ्या कढीप्रत । कां हा उगा आणितां ऊत । सार नाहीं किमपि यांत । मी न हपापलो गांज्याला ॥८१॥ आतां आपण गांजाप्रत । नका जाऊं पेठेंत । मेळ हमेशा बोलण्यांत । ठेवा तुम्ही आपुल्या ॥८२॥ लबाडाचे न हेतु पुरती । ही खूणगांठ बांधा चित्तीं । तुमचें काम झाल्यावरती । मर्जी असल्या गांजा आणा ॥८३॥ पुढील आठवड्यांत तुमचें काम । होईल जा अत्युत्तम । परी कदा न चुकावा नेम । पांच वार्‍या येथील करा ॥८४॥ कां कीं हा येथें स्थिर । आहे मृडानीपती कर्पूरगौर । ज्याच्या कृपेनें कुबेर । जगीं झाला धनपती ॥८५॥ जा नमस्कार त्यासी करा । गांजा आणावया न विसरा । परमार्थात खोटें जरा । बोलूं नये मानवांनी ॥८६॥  ऎसा उपदेश ऎकून । महाराजांशीं वंदून । घेतलें शिवाचें दर्शन । आणी गेले बाळापुरा ॥८७॥ पुढील आठवड्यामाजी भले । काम त्यांचें फत्ते झालें । तेही गांजा घेऊन आले । शेगावांत वारीला ॥८८॥ त्या बाळापुरची दुसरी कथा । तुम्ही ऎका श्रोते आतां । बाळकृष्ण नामें होता । बाळापुरांत रामदासी ॥८९॥ कांता त्याची पुतळाबाई । परम भाविक होती पाही । दरवर्षी वारीस जाई । पायीं सज्जनगडातें ॥९०॥ पति-पत्नीचा विचार एक । पौष मासीम निघती देख । ओझ्यासाठीं घोडें एक । घेऊनिया बरोबरी ॥९१॥ कुबडी कंथा दासबोध । सवें हें सामान अति शुध्द । साधुत्वाचा नव्हता मद । तयासी कीं चढलेला ॥९२॥ मार्गी चालतां ग्रामांतरीं । प्रत्यहीं झोळी फिरवी खरी । त्या झोळीच्या भिक्षेवरी । नैवेद्य करी रामाला ॥९३॥ पौष वद्यांत बाळापूर । सोडी नवमीला साचार । असे कांता बरोबर । पुतळाबाई नाम जिचें ॥९४॥ बाळकृष्णबुवा हातीं । चंदनाच्या चिपळ्या असती । पुतळाबाई करी साथी । झांज हातीं घेऊन ॥९५॥ रघुपतीचा नामगजर । करी पंथानें निरंतर । शेगांव खामगांव मेहेकर । देऊळगांवराजा पुढें ॥९६॥ आनंदीस्वामीस जालनापुरीं । वंदुनिया जांब नगरीं । जाय तेथें मात्र करी । तीन दिवस मुक्काम ॥९७॥ कां कीं तें ठिकाण । समर्थांचे जन्मस्थान । पुढें दिवर्‍यास येऊन । वंदन करी गोदेला ॥९८॥ पुढें बीड आंबेजोगाईचे । मोहोरी बेलेश्वर स्वामीचे । पट्टशिष्य समर्थांचे । डोमगांवीं कल्याण ॥९९॥ नरसिंगपूर पंढरपूर । नातेपोतें शिंगणापूर । वाई आणि सातारा । असे जे गडाच्या पायथ्याशीं ॥१००॥ माघ वद्य प्रतिपदेला । तो येऊन पहुचे भला । श्रीसज्जनगडाला । नवमीच्या त्या उत्सवासी ॥१॥ यथाशक्तिप्रमाणें । ब्राह्मणभोजन करावें त्यानें । श्रीस्वामीसमर्थांकारणें । खरा खराच रामदासी ॥२॥ ऎसे रामदासी आतां । होणें कठीण सर्वथा । दासनवमीचा उत्सव होता । परत जाई त्याच मार्गें ॥३॥ ऐसा क्रम चालला । बहुत दिवस त्याचा भला । साठ वर्षें देहाला । गेलीं त्याच्या उलटुन ॥४॥ माघ वद्य द्वादशीस । सोडून सज्जनगडास । निघावें परत जावयास । त्यानें आपुल्या बाळापुरा ॥५॥ असो वद्य एकादशीसी । बसला समर्थ समाधींपासीं । आले दुःखाश्रु लोचनासी । शब्द न त्यासी बोलवे ॥६॥ हे रामदास स्वामी समर्था ! । हे गुरुराया पुण्यवंता ! । माझें शरीर थकलें आतां । वारी न पायीं होईल ॥७॥ जरी बसून वाहानातें । येऊं सज्जनगडातें । तरी तेंही कठीण देसतें । मजलागीं दयाळा ॥८॥ नेम चालला आजवर । आतां पडूं पाहे अंतर । परमार्थासी शरीर । निकोप आधीं पाहिजे ॥९॥ तरीच सर्व घडे कांहीं । हे रामदासा माझे आई । हें म्हणण्याची जरूर नाहीं । आपण सर्व जाणतसा ॥११०॥ ऐशी प्रार्थना करून । निजला शय्येस जाऊन । तों प्रभातकाळीं पडलें स्वप्न । बाळकृष्णबुवाला ॥११॥ स्व्प्नीं म्हणाले रामदास । ऐसा न होई हताश । नको येऊं येथून खास । या सज्जनगडातें ॥१२॥ माझी कृपा तुझ्यावरी । माझा उत्सव बाळापुरीं । करावा तूं आपल्या घरीं । मी येईन नवमीला ॥१३॥ तुला द्याया दर्शन । हें मानीं प्रमाण वचन । आपल्या शक्तीस पाहून । परमार्थ तो आचरावी ॥१४॥ ऐसें स्वप्न पाहिलें । बाळकृष्ण आनंदले । कांतेसह परत आले । बाळापुरास आपुल्या घरीं ॥१५॥ पुढें श्रोते दुसरे वर्षी । काय झालें माघमासीं । त्या बाळापुरासी । तें आतां अवधारा ॥१६॥ माघ वद्य प्रतिपदेस । समर्थांच्या उत्सवास । आरंभ बाळापुरास । बाळकृष्णांनीं घरीं केला ॥१७॥ दासबोधाचें वाचन । रात्रीस हरिकीर्तन । दोन प्रहरीं ब्राह्मणभोजन । धूपार्ती अस्तमानाला ॥१८॥ बाळकृष्णाच्या मनांत । विचार हाची घोळत । पाहूं कसे येतात । स्वामी समर्थ नवमीसी ॥१९॥ बाळकृष्णाच्या वचनांनी । केली गांवकर्‍यांनीं । आपापसांत वर्गणी । उत्सवा साह्य करावया ॥१२०॥ ऐसा थात बाळापुरा । नव दिवस झाला खरा । नववे दिवशीं दोन प्रहरा । अघटित आलें घडून ॥२१॥ श्रीगजानन साक्षात्कारी । श्रोते तया बाळापुरीं । उभे राहिले दोन प्रहरीं । नवमी तिथी लक्षून ॥२२॥ बाळकृष्णाच्या द्वारांत । रामाभिषेक चालला आंत । लोक झाले विस्मित । गजाननासी पाहूनिया ॥२३॥ म्हणूं लागले बुवासी । उठा उठा हो वेगेसी । तुमच्या दासनवमीसी । द्वारीं पातलें गजानन ॥२४॥ त्यावरी बुवा म्हणाले । गजानन आले बरें झालें । त्याही संतांचे लागले । पाय माझ्या घरासी ॥२५॥ परी आजच्या दिनीं साची । मी वाट पाहतों समर्थांची । त्या सज्जनगड निवासियाची । आतूर होऊन ये ठायां ॥२६॥ त्यांचा मसी करार आहे । मी नवमीला येईन पाहे । ती वाणी असत्य नोहे । ऐसा माझा भरवंसा ॥२७॥ इकडे स्वामी गजानन । द्वारीं उभे राहून । जय जय रघुवीर म्हणोन । श्लोक बोलुं लागले ॥२८॥ श्लोक - अहिल्या शिळा राघवें मुक्त केली । पदीं लागतां दिव्य होऊनि गेली ॥ अशी वाणी ऐकतां उठली । स्वारी बाळकृष्णाची ॥२९॥ पाहाती जों येऊन द्वारीं । तों गजाननाची नग्न स्वारी । आजानुबाहु साजिरी । उभी निजानंदामध्यें ॥१३०॥ करण्या गेला नमस्कार । तों रामदास दिसले साचार । हातीं कुबडी जटाभार । रुळत होता पाठीवरी ॥३१॥ भालीं त्रिपुंड उभा साचा । होता गोपीचंदनाचा । नेसलेल्या लंगोटीचा । रंग होता हिरमुजी ॥३२॥ ऎसें रूप पाहिलें । बाळकृष्णा भरतें आलें । प्रेमाचें तें श्रोते भले । नयनी संचले आनंदाश्रु ॥३३॥ तों सवेंच दिसती गजानन । त्याच्या नेत्रांकारण । कुबडी लंगोटी कांहींच न । त्रिपुंड शिरींचा जटाभार ॥३४॥ पुनः त्यानें हताश व्हावें । तों रामदास स्वामी दिसावे । पुनः जों निरखून पाहावें । तों मागुती गजानन ॥३५॥ ऐसी स्थिती झाली खरी । सिनेमाच्या खेळापरी । घोटाळलासे अंतरी । कोडें कांहींच उमगेना ॥३६॥ मग म्हणाले गजानन । रामदासासी प्रेमें करून । नको गांगरूं देऊं मन । तुझा समर्थ मीच असे ॥३७॥ मागें बापा गडावरी । माझीच वस्ती होती खरी । आतां शेगांवाभीतरीं । राहिलों येऊन मळ्यांत ॥३८॥ तुला सज्जनगडीं दिलें वचन । कीं दासनवमीस येईन । मी बाळापुरालागून । ह्यांचे स्मरण आहे का ? ॥३९॥ त्या वचनाची पूर्तता । करण्यास येथें आलों आतां । दे सोडोन अवघी चिंता । मीच आहे रामदास ॥१४०॥ शरीररूपी वस्त्रास । तूं किंमत देतोस । आणि आत्म्याला विसरतोस । याला काय म्हणावें ? ॥४१॥ श्लोक आहे गीतेठायीं । " वासांसि जीर्णानि " तो पाही । ऎसी मुळीं ना भ्रमिष्ट होई । चाल पाटीं बसवी मला ॥४२॥ बाळकृष्णाचा धरून हात । गजानन आले घरांत । एका मोठ्या पाटीं स्थित । स्वामी गजानन जाहले ॥४३॥ बाळापुरीं पुकार झाली । गजानन आल्याची ती भली । मंडळीं धांवू लागलीं । दर्शन घ्याया पायांचे ॥४४॥ रामदासी अवघ्या दिवसभर । करीत राहिला विचार । शेवटीं रात्र होतां तीन प्रहर । स्वप्न पडलें बाळकृष्णा ॥४५॥ अरे गजानन माझीच मूर्ति । हल्लीं तुमच्या वर्‍हाडप्रांतीं । संशय मुळीं ना धरी चित्तीं । तो धरितां बुडशील ॥४६॥ मी तोच समजून । करी गजाननाचें पूजन । गीतेचें हें आहे वचन । " संशयात्मा विनश्यति "॥४७॥ ऐसें स्वप्न पडल्यावरी । बाळकृष्ण तोषला भारी । मस्तक ठेविलें अत्यादरीं । गजाननाचें पायांवर ॥४८॥ महाराज आपुली लीला । मी ना समर्थ जाणण्याला । तो घोटाळा उकलिला । तुम्ही स्वप्न देऊन ॥४९॥ नवमी माझी सांग झाली । न्यूनता न कांहीं उरली । अर्भकावरी कृपा केली । तेणें धन्य झालों मी ॥१५०॥ आतां कांहीं दिवस । राहा या बाळपुरास । हीच आहे मनीं आस । ती पूर्ण करा हो ॥५१॥ महाराज म्हणाले त्यावर । ऐक माझा विचार । कांहीं दिवस गेल्यावर । येईन मी बाळापुरा ॥५२॥ भोजनोत्तर निघून गेले । स्वामी शेगांवासी भले । रस्त्यानें न कोणा दिसले । क्षणांत पोंचलें शेगांवीं ॥५३॥ स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ । सुखद होवो भाविकांप्रत । हेंचि इच्छी दासगणू ॥१५४॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ ॥ इति नवमो॓ऽध्यायः समाप्तः ॥

अध्याय १०
 
॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे अरुपा अव्यया । पूर्णब्रह्मा पंढरीराया । सज्जनाच्या विसाविया । मजला परते लोटूं नको ॥१॥ देवा हा दासगणू । नको परक्याचा आतां म्हणूं । माझ्या पातकाचा नको आणूं । विचार चित्तीं नारायणा ॥२॥ माझ्या करें न झालें पुण्य । हें ठाउकें मजलागून । फाय काय तुला वदन । दावण्या मी योग्य नसे ॥३॥ ऐसी स्थिति आहे जरी । परि देवा कृपा करी । ओहळास गोदावरी । पोटीं आपल्या घेतसे ॥४॥ तैसें तुवां करावें । दुःख अवघें निवारावें । पातकाला न उरुं द्यावें । माझ्या ठायीं यत्किंचित्‌ ॥५॥ तूं आणिल्या मनांत । अवघेंच कांहीं घडून येत । रंकाचाही राव होत । तुझा लाधतां वशीला ॥६॥ असो एकदां पुण्यराशी । गेले उमरावतीसी । जाऊन उतरले सदनासी । आत्माराम भिकाजीच्या ॥७॥ हा आत्माराम भिकाजी-सुत । उमरावतीचा असे प्रांत । मोठा अधिकार हातांत । होता त्याच्या विबुध हो ॥८॥ कायस्थ प्रभू याची जात । हा संतांचा प्रेमी अमित । सदाचारसंपन्न गृहस्थ । गृहस्थाश्रमीं वर्ततसे ॥९॥ त्याच्या घरीं समर्थ गेले । ते त्यानें सांग पूजिले । मंगलस्नान घातिलें । उष्णोदकानें गजानना ॥१०॥ उटणीं नाना प्रकारचीं । अंगा लाविलीं साचीं । वृत्ति आनंदली त्याची । संतसहवासें तेधवां ॥११॥ कर्वतीकांठी उमरेडचा । धोतरजोडा नेसविला साचा । भालीं केशरी गंधाचा । भव्य तिलक लाविलासे ॥१२॥ कंठामाजीं पुष्पहार । नैवेद्याचे नाना प्रकार । दक्षिणेसी शंभर । रुपये त्यानें ठेविले ॥१३॥ धूप, दीप आरती झाली । पुष्पांजली समर्पिली । दर्शनालागीं दाटी झाली । उमरावतीच्या लोकांची ॥१४॥ प्रत्येका ऐसें वाटावें । समर्थ आपल्या घरीं न्यावें । यथासांग करावें । पूजन त्यांचें येणें रितीं ॥१५॥ इच्छा ऐसी बहुतां झाली । परी थोडक्याची मनीषा पुरली । सदनीं पाऊलें लागण्या भलीं । पुण्य पाहिजे बलवत्तर ॥१६॥ तें ज्यांच्यापासीं होतें । समर्थ गेले तेथें तेथें । कां कीं साधूस अवघें कळतें । अंतर्ज्ञानें करुन ॥१७॥ गणेश श्रीकृष्ण खापर्डे । उमरावतीचे गृहस्थ बडे । वकीलींत ज्यांच्यापुढें । ढीग रुपयांचे पडती कीं ॥१८॥ दादासाहेब यांप्रत । म्हणत होते वर्‍हाडांत । हा सज्जन भाविक अत्यंत । ब्राह्मण शुक्लयजुर्वेदी ॥१९॥ त्यानें विनंति करितां खरी । महाराज गेले त्याच्या घरीं । तेथें ही झाली याचपरी । समर्थांची पूजा हो ! ॥२०॥ गणेश आप्पा म्हणूनी । होता लिंगायतवाणी । चंद्राबाई कामिनी । त्याची परम भाविक असे ॥२१॥ ती बोलली पतीला । हा साधु पाहिजे नेला । कसेंही करुन घराला । पाहा विनंति करुन ॥२२॥ आपुलें निष्पाप असल्या मन । याच्या आगमनें करुन । होईल आपलें पवित्र सदन । भाविकाचा देव असे ॥२३॥ गणेश आप्पा म्हणे तिला । वेड लागलें आहे तुला । हा सदनीं साधु न्यावयाला । वशिला पाहिजे बलवत्तर ॥२४॥ पाहा खापडर्यालागुनी । हा साधु न्यावया सदनीं । श्रम पडले ते आण ध्यानीं । उगा हट्ट धरुं नको ॥२५॥ चंद्राबाई म्हणे नाथा । हें न पटे माझ्या चित्तां । सांगे माझी मनदेवता । सदनीं साधु येतील हो ॥२६॥ तुम्ही करा हो त्यांना नुसती । सदनीं येण्यास विनंति । गरीबावरी असते प्रीति । संतांची ती विशेष ॥२७॥ परि आप्पा बोलेना । छाती त्याची होईना । बोलावयासी निजसदना । श्रीगजानन साधुतें ॥२८॥ महाराज वदले अखेर । गणेश आप्पाचा धरुन कर। तुझें किती आहे सदन दूर । तेवढें सांग मला ? ॥२९॥ तुझ्या सदनीं वाटतें यावें । कांहीं वेळ बसावें । अरे चित्तीं असेल तें बोलावें । भीड न धरितां कवणाची ॥३०॥ ऐसें महाराज बोलतां । गणेश आप्पाचिया चित्ता । हर्ष झाला तत्त्वतां । तो न शब्दें बोलवे ॥३१॥ समर्थांस नेऊन सदनीं । पूजा केली उभयतांनीं । आपुला संसार त्यांचे चरणीं । अर्पण केला तात्काळ॥३२॥ असो ऐशा पूजा अमित । झाल्या उमरावतींत । त्या प्रत्येक पूजेप्रत । एक गृहस्थ हजर असे ॥३३॥ तो आत्माराम भिकाजीचा । नात्यानें हा होता भाचा । राहणार मुंबई शहरींचा । तारमास्तर असे कीं ॥३४॥ तो रजा घेऊन भला । उमरावतीस होता आला । भेटण्या आपुल्या मामाला । बाळाभाऊ नाम ज्याचें ॥३५॥ त्या बाळाभाऊकारण । समर्थांचें लागलें ध्यान । म्हणे ऐशा साधूचे चरण । सोडून कुठें जाऊं नये ॥३६॥ प्रपंच अवघा अशाश्वत । त्यांत कशाला गोवूं चित्त । केला आजपर्यंत । तोच आतां पुरे झाला ॥३७॥ कांहीं असो आजपून । मी न सोडी त्याचे चरण । अमृताला टाकून । विष प्याया कोणी जावें ? ॥३८॥ म्हणून प्रत्येक पूजेला । बाळाभाऊ हजर भला । होता बुध हो राहिला । दुसरें न कांहीं कारण ॥३९॥ असो कांहीं दिवसांनीं । शेगांवीं आले परतोनी । मळ्यासी न जातां जाणी । आले मंदिरीं मोठयाच्या ॥४०॥ त्या मंदिराच्या पूर्वेस । एक जागा होती ओस । गजानन पुण्य पुरुष । येऊन बसला ते ठायां ॥४१॥ बातमी महाराज आल्याची । कृष्णा पाटला कळली साची । त्यांनीं जागा मळ्याची । सोडिली हें समजलें ॥४२॥ म्हणून आला धांवत । त्या ओस जागेवरी सत्य । महाराजा करुन दंडवत । अधोवदन बैसला ॥४३॥ डोळ्यांतून वाहे पाणी । खंड त्याला नसे जाणी । वस्त्र टाकलें भिजवोनी । त्या अश्रूंनीं छातीचें ॥४४॥ तैं महाराज वदले पाटलाला । ऐसा कां रे रडसी भला ? । शोक कोणता तुला झाला ? । तें वेगें सांग मज ॥४५॥ पाटील बोले त्यावर । जोडोन आपले दोन्ही कर । महाराज मळ्याचा अव्हेर । कां हो आज केलांत हा ? ॥४६॥ ऐसा अक्षम्य कोणता । अपराध झाला सांगा आतां । माझ्याकडून ज्ञानवंता । मी लेकरुं आपुलें असे ॥४७॥ ही देशमुखाच्या बाजूची । जागा आहे बघा साची । एका माळ्याच्या मालकीची । येथें तुम्ही राहूं नका ॥४८॥ मळ्यांत मर्जी नसेल जरी । तरी चला राहात्या घरीं । तें खालीं करितों सत्वरीं । तुम्हांसाठीं दयाळा ॥४९॥ कां कीं तुम्हांवांचून । मला न कांहीं प्रिय आन । हें कळलें वर्तमान । अवघ्या पाटील मंडळीतें ॥५०॥ तेही तेथें धांवून आले । महाराजा विनवूं लागले । निजसदना या या भले । हरी आणि नारायणा ॥५१॥ महाराज बोलले तयासी । मी जो या जागेसी । येऊन बसलों आज दिवशीं । तें तुमच्या हितास्तव ॥५२॥ तें पुढें येईल कळोन । आतां न करा भाषण । वाद दोघांचें निर्मूलन । करील हें विसरुं नका ॥५३॥ जितके जगीं जमेदार । तितके न करिती विचार । मागचा पुढचा साचार । हेंच उणें त्यांच्या ठायीं ॥५४॥ जा बंकटलालासी पाहून आणा वेगेसीं । मी सोडितां तत् गृहासी । तो नाहीं रागावला ॥५५॥ तें कां हें त्यासी विचार । माझी कृपा तुमच्यावर । आहे ती न ढळणार । कोणत्याही कारणांनीं ॥५६॥ बंकटलालही आला तेथ । घालूं लागला समजूत । यांच्या मर्जीविरुद्ध मळ्यांत । तुम्ही यांना नेऊं नका ॥५७॥ माझ्या घरुन जेव्हां आले । तेव्हां सांगा मीं काय केलें । आपण आहोंत त्यांचीं बाळें । ते सारखे अवघ्यांना ॥५८॥ सखाराम आसोलकार । आहे मनाचा उदार । तो जागा देण्यास इन्‌कार । करणार नाहीं वाटतें ॥५९॥ सखाराम देईल जागा । पुढचें करुं आपण बघा । म्हणजे अवघ्यांस यांत भागा । घेतां येईल सहजची ॥६०॥ समेट अवघ्यांचा होऊनी । मठ बांधिला त्या ठिकाणीं । परशराम सावजींनीं । मेहेनत घेतली विशेष ॥६१॥ समर्थांच्या बरोबर । निस्सीम भक्त होते चार । भास्कर, बाळाभाऊ, पितांबर । उमरावतीचा गणेश आप्पा ॥६२॥ रामचंद्र गुरव त्याचपरी । राहात होता बरोबरी । हे पांच पांडव श्रीहरी । गजानन शोभूं लागले ॥६३॥ वृत्ति बाळाभाऊची । अतिविरक्त झाली साची । पर्वा न त्यानें नौकरीची । केली यत्किंचित्‌ आपुल्या ॥६४॥ पत्रें येती वरच्यावरी । बाळाभाऊस येण्या घरीं । परी परिणाम अंतरीं । कांहींच त्याच्या होईना ॥६५॥ भास्कर म्हणे गुरुराया । हा सोकला पेढे खाया । म्हणून ना इच्छी जाया । आपल्यापासून कोणीकडे ॥६६॥ तुम्ही द्यावा यातें मार । म्हणजेच हा जवळ करील घर । रत्‍न चौदावें पाहिल्याबिगर । हा येथून हलणें नसे ॥६७॥ लकडीवांचून माकड । पाहा न होई कधीं धड । मोठमोठाले ते पहाड । भिऊं लागती वज्राला ॥६८॥ एकदां बळेंच घालवून । दिलें बाळाभाऊकारण । परी तो आला परतून । राजीनामा देवानिया ॥६९॥ बाळाभाऊ शेगांवासी । येतां भास्कर बोलला त्यासी । कां रे आम्हां त्रास देसी ? । येथें येऊन वरच्यावर ॥७०॥ ओढाळ बैल हिरव्यावर । पाहे पडाया निरंतर । त्यास जरी दिला मार । तरी तो येई तेथ पुनः ॥७१॥ तैसी लोचटा तुझी कृति । तंतोतंत निश्चिति । झाली जयाला विरक्ति । त्यानेंच येथें यावें रे ॥७२॥ हें अहंकाराचें भाषण । समर्था न खपलें जाण । त्यांनीं भास्कराचें अज्ञान । निवटाया कृत्य केलें ऐसें ॥७३॥ एका गृहस्थाच्या हातीं । भली थोरली छत्री होती । ती गजाननें घेऊनी हातीं । बाळास झोडूं लागले ॥७४॥ मारतां मारतां मोडली । बुध हो छत्री भली । मग एक मोठी घेतली । भरीव काठी वेळूची ॥७५॥ तिनें मारणें सुरुं केलें । तें पाहतां लोक भ्याले । कांहीं कांहीं पळून गेले । सोडून त्या मठाला ॥७६॥ परी बाळाभाऊ तसाच पडला । समर्थांच्या पुढें भला । कैक म्हणती असेल मेला । तो या अशा मारानें ॥७७॥ भास्करही झाला चिंतातुर । बाळाभाऊचा पाहून मार । परी समर्थांच्या समोर । बोलण्या छाती होईना ॥७८॥ तीही काठी मोडली खरी । बाळाभाऊच्या पाठीवरी । मग तो कंटाळून अखेरीं । तुडवूं लागले तयाला ॥७९॥ जैसा का तो कुंभार । माती तुडवितो साचार । तैसाच केला प्रकार । महाराजांनीं तुडविण्याचा ॥८०॥ मठीं हा प्रकार चालला । शिष्यसमुदाय पळत सुटला । कोणी गेले बोलावण्याला । त्यांच्या आवडीच्या मंडळीस ॥८१॥ बंकटलाल कृष्णाजी । धांवूनी आले मठामाजीं । समर्थ हात धरण्या राजी । कोणी तयार होईना ॥८२॥ बंकटलाल म्हणे भीत भीत । समर्था हा आपुला भक्त । पुरें झालें याप्रत । आतां ऐसें तुडवणें ॥८३॥ ऐसें ऐकतां भाषण । समर्थ वदले हांसून । हें असंबद्ध भाषण । कां करितां कळेना ॥८४॥ मी न बाळासी मारिलें । नाहीं तयासी तुडविलें । निरखून पहा चांगलें । म्हणजे येईल कळोनी ॥८५॥ महाराज म्हणाले बाळासी । ऊठ वत्सा वेगेसी । या आलेल्या मंडळीसी । आंग तुझें दाखिव ॥८६॥ ऐसी आज्ञा होता भला । बाळाभाऊ उठून बसला । लोक त्याच्या अंगाला । पाहूं लागले निरखून ॥८७॥ तों वळाचें नांव नाहीं । कोठेंही न लागलें कांहीं । तो पहिल्यापरीच होता पाही । निमग्न आपुल्या आनंदांत ॥८८॥ त्यायोगें भास्कराला । बाळाभाऊचा अधिकार कळला । मग तोही ना पुन्हां बोलला । वेडेंवांकुडें बाळासी ॥८९॥ सोनें कसासी उतरतें । तेव्हांच त्याची किंमत कळते । आश्चर्य झालें समस्तांतें । तो प्रकार पाहून ॥९०॥ सुकलाल नामें आगरवाला । होता बाळापुराला । श्रोते त्याच्या आगराला । गाय एक द्वाड होती ॥९१॥ तिनें गांवांत फिरावें । मुलांमाणसां तुडवावें । सशक्तांसी हुंदाडावें । शिंगानें कीं आपुल्या ॥९२॥ वाटेल त्याच्या दुकानांत । गाईनें शिरावें अवचित । धान्याचिया टोपल्यांत । तोंड आपुलें खुपसावें ॥९३॥ वाटेल तितुकें यथेच्छ खावें । राहिलेलें नासावें । तेल तुपाचें लवंडावें । पिंप अंगाच्या धक्क्यानें ॥९४॥ घरीं बांधून ठेवितां । चर्‍हाटें तोडी हां हां म्हणतां । सांखळीसी आणिली लघुता । बांधतां त्या गाईनें ॥९५॥ ती गाय नोव्हे वाघीण । बाळापुराकारण । लोक गेले कंटाळून । त्रास सोसितां तियेचा ॥९६॥ गाभण मुळींच होईना । कास कधींच करीना । कोंडून ठेवितां राहीना । घरामाजीं कोठेंही ॥९७॥ लोक म्हणती सुकलालाला । दे या खाटकास गाईला । किंवा मारुन टाका तिला । तूंच गोळी घालून ॥९८॥ सुकलाल म्हणे लोकांसी । तुम्हीच मारुन टाका तिसी । वाटेल त्या प्रयत्‍नासी । करुन या विबुध हो ॥९९॥ एका पठाणानें तिला । मारण्याचा यत्‍न केला । गोळी भरुन बंदुकीला । टपून बैसला होता हो ॥१००॥

तें कसें काय कोण जाणे । कळलें गाईकारणें । तिनें येऊन शिंगानें । पठाण पाडिला उताणा ॥१॥ मी परगांवा नेऊन । दिली होती सोडून । परी ती आली परतून । त्याला सांगा काय करुं ॥२॥ ऐसें ऐकतां लोक म्हणती । आतां याला एक युक्ति । गोविंदबुवाचा घोडा म्हणती । समर्थानें गरीब केला ॥३॥ तूंही या गाईला । घेऊन जा शेगांवाला । अर्पण करी समर्थाला । म्हणजे अवघें संपलें ॥४॥ साधूस गाय दिल्याचें । पुण्य तुला लाभेल साचें । आणि संकट आमुचें । टळेल बापा त्यायोगें ॥५॥ तें अवघ्यांस मानवलें । गाय नेण्याचें ठरविलें । तिला धरण्यासाठीं केले । प्रयत्‍न नानापरीचे ॥६॥ एकही यत्‍न नाहीं फळला । शेवटीं एक्या पटांगणाला । हरळकुंद्याचा ढीग केला । सरकी ठेवली शेजारीं ॥७॥ ती खायालागून । गाय आली धांवून । ती येतां फांस टाकून । धरिली दहावीस जणांनीं ॥८॥ साखळदंडानें बांधून पुरी । गाय घातली गाडीवरी । आणिली शेगांवा भीतरीं । गजाननासी द्यावया ॥९॥ जवळ शेगांव जसें जसें । येऊं लागलें तसें तसें । स्वभावांत पडलासे । त्या गाईच्या पालट ॥११०॥ समर्थांपुढें येतांक्षणीं । गाय झाली दीनवाणी । तिनें लोचनीं आणून पाणी । पाहिलें त्या पुण्यपुरुषा ॥११॥ महाराज म्हणाले अवघ्यांना । हा काय तुमचा मूर्खपणा । गाईस ऐशा यातना । देणें कांहीं बरें नव्हे ॥१२॥ चारही पाय बांधलेत । गळां साखळदंड लाविलेत । शिंगांचीही तीच गत । केली चर्‍हाटें काथ्याच्या ॥१३॥ ऐसा मोठा बंदोबस्त । शोभतसे वाघिणीप्रत । ही गाय बिचारी साक्षात् । तिला न ऐसें करणें बरें ॥१४॥ अरे खुळ्यांनो, ही गाय । अवघ्या जगाची आहे माय । तिला बांधिलें हाय हाय । केवढा कठीण प्रसंग आला ॥१५॥ तिला आतांच करा मुक्त । ती न हुंदाडी कोणाप्रत । परी लावण्या तिला हात । छाती कोणाची होईना ॥१६॥ जो तो पाहून मागें सरे । तेथ समर्थ आले त्वरें । आपुल्या त्या पुनीत करें । बंधनें तोडिलीं धेनूचीं ॥१७॥ बंधनें अवघीं तुटतां भलीं । गाय गाडीच्या खालीं आली । पुढले पाय टेकिती झाली । समर्थां वंदन करावया ॥१८॥ खालीं घालूनिया मान । प्रदक्षिणा त्या केल्या तीन । समर्थांचे दिव्य चरण । चाटूं लागली जिभेनें ॥१९॥ ऐसा प्रकार तेथें झाला । तो अवघ्यांनीं पाहिला । समर्थांच्या प्रभावाला । शेषही वर्णूं शकेना ॥१२०॥ समर्थ म्हणाले धेनूस । बाई कोणा न द्यावा त्रास । तूं या सोडून मठास । कोठेंही जाऊं नको ॥२१॥ ऐसा घडतां प्रकार । अवघ्यांनीं केला जयजयकार । उच्च स्वरानें त्रिवार । समर्थांच्या नांवाचा ॥२२॥ बाळापूरची मंडळी । बाळापुरा निघून गेली । गाय तेथेंच राहिली । शेगांवासी मठामध्यें ॥२३॥ त्या दिवसापासून । ठावे न तिला चर्‍हाट जाण । सुज्ञ धेनूचे अवघे गुण । तिच्या ठायीं पातले ॥२४॥ अजून त्या शेगांवातें । तिची संतती नांदते । जे कांहीं वदती ब्रह्मवेत्ते । तेंच येतें घडोन ॥२५॥ असो एक कारंज्याचा । लक्ष्मण घुडे नांवाचा । विप्र वाजसनीय शाखेचा । धनकनक संपन्न असे ॥२६॥ त्यासी रोग झाला पोटांत । उपाय केले अत्यंत । परि न आला गुण किंचित्‌ । खर्च सारा व्यर्थ गेला ॥२७॥ त्यानें समर्थांची कीर्ति । कर्णोपकर्णी ऐकिली होती । म्हणून सहपरिवारें सत्वर गती । आला शेगांवाकारणें ॥२८॥ रोगव्यथेनें चालवेना । श्रोते तया लक्ष्मणा । दोघांतिघांनीं उचलून जाणा । आणिले त्या मठांत ॥२९॥ करण्या नुसता नमस्कार । असमर्थ होतें शरीर । त्याच्या कुटुंबानें पदर । समर्थांपुढें पसरिला ॥१३०॥ आणि म्हणाली दयाघना ! । मी आपली धर्मकन्या । माझ्या पतीच्या यातना । हरण कराव्या आपण ॥३१॥ अमृताचें दर्शन । होतां कां यावें मरण । माझ्या कुंकवालागून । टिकवा हीच विनंती ॥३२॥ त्या वेळीं समर्थस्वारी । आंबा खात होती खरी । तोच फेकिला अंगावरी । त्या लक्ष्मणकांतेच्या ॥३३॥ जा दे हा पतीस खाया । व्याधि त्याची बरी व्हाया । तूं शोभसी त्यास जाया । पति-भक्ति-परायण ॥३४॥ यापुढें न कांहीं वदले । चिलीम ओढूं लागले । श्रीगजाननस्वामी भले । आपुल्या मठांत शेगांवीं ॥३५॥ भास्कर म्हणे ’अहो बाई । आतां न बसा ये ठाईं । आपल्या पतीस लवलाही । घेऊन जा कारंज्यातें ॥३६॥ प्रसाद आंब्याचा जो कां तुला । समर्थ-करीं प्राप्त झाला । तोच घाली खावयाला । आपुल्या पतीकारणें ॥३७॥ यानें तुझें होईल काम । गुण येईल अत्युत्तम । लक्ष्मणासी आराम । होईल आंबा खातांच’ ॥३८॥ बाई घेऊन आंब्याला । येती झाली कारंज्याला । प्रसाद खाऊं घातला । आंब्याचा आपल्या पतीस ॥३९॥ निजगृहीं जोडपें आलें । आप्त पुसूं लागले । शेगांवांत काय घडलें । तें सांगावें साकल्यें ॥१४०॥ बाईनें अवघें वर्तमान । कळविलें लोकांलागून । आंब्याचा तो प्रसाद म्हणून । दिला समर्थें मजलागीं ॥४१॥ आणि आज्ञा केली वरी । खाऊं घाला अत्यादरीं । आंबा प्रसाद निजकरीं । आपुल्या त्या पतीला ॥४२॥ त्याप्रमाणें मींही केलें । आज सकाळीं खाऊं घातलें। हें वैद्यांनीं जईं ऐकिलें । तईं त्या वाटलें वाईट ॥४३॥ अहो बाई तुम्ही काय । केलेंत हें हाय हाय । आंबा हेंच कुपथ्य होय । या पोटांतील रोगाला ॥४४॥ माधवनिदानीं हेंच कथिलें । सुश्रुतांनींही वर्णिलें । निघंटानें कथन केलें । शारंगधर म्हणे ऐसेंच ॥४५॥ तुम्ही तो प्रसाद दिलेला । पाहिजे होता भक्षण केला । पत्‍नीचें पुण्य पतीला । उपयोगीं पडतसे ॥४६॥ ऐसें वैद्य बोलले । आप्त अवघे घाबरले । जे ते टोचूं लागले । लक्ष्मणाच्या पत्‍नीस ॥४७॥ परी झालें अघटित । लक्ष्मणाचें पोट सत्य । रेच होऊन अकस्मात । मऊ होऊन गेलें हो ॥४८॥ शौच्यावाटें व्याधि गेली । हळुंहळूं शक्ति आली । पहिल्या परीच होती झाली । प्रकृति लक्ष्मणाची ॥४९॥ निसर्गाच्या बाहेरी । वैद्यशास्त्र कांहीं न करी । तेथें उपयोगी पडे खरी । कृपा देवसंतांची ॥१५०॥ लक्ष्मण बरा झाल्यावर । आला शेगांवीं सत्वर । म्हणे महाराजा माझें घर । पाय लावून पवित्र करा ॥५१॥ मी आलों त्याचसाठीं । चला कारंज्यास ज्ञानजेठी । मला न करा हिंपुटी । नाहीं ऐसें म्हणूं नका ॥५२॥ आग्रह त्याचा विशेष पडला । महाराज गेले कारंज्याला । तेधवां होते संगतीला । शंकर-भाऊ पितांबर ॥५३॥ घरीं नेऊन पूजा केली । दक्षिणा ती निवेदिली । अवघी संपत्ति आपुली । आहे मी कोण देणार ? ॥५४॥ परी एका ताटांत । कांहीं रुपये ठेविले सत्य । महाराज बघून त्याप्रत । ऐशा रितीं बोलले ॥५५॥ म्हणशी माझें कांहीं न उरलें । मग हे रुपये कोठून आणिले ? । लक्ष्मणा ऐसे चाळे । दांभिकपणाचे करुं नको ॥५६॥ मला दिले तूं आपलें घर । आतां उघडीं अवघीं दारें । फेकून देई रस्त्यावर । अवघीं कुलपें येधवां ॥५७॥ लक्ष्मण कांहीं न बोलला । मौन धरुन बैसला । परी समर्थें आग्रह धरिला । खजिन्याचें दार उघडी ॥५८॥ भीत भीत मोकळें द्वार । केलें त्यानें अखेर । खजिन्याच्या उमर्‍यावर । स्वतः जाऊन बैसला ॥५९॥ आणि म्हणाला महाराज यावें । वाटेल तें घेऊन जावें । ऐसें बोलला जरी बरवें । परी अन्यभाव अंतरींचा ॥१६०॥ हें त्याचें दांभिकपण । समर्था आलें कळोन । बहुरुप्याचें राजेपण । कोठून टिके बाजारीं ? ॥६१॥ जैसें कडू वृंदावन । वरुन पाहतां दिसे छान । परी अंतरीं कडवटपण । पूर्ण त्याच्या भरलें असे ॥६२॥ सोडून त्याच्या घरासी । उपासी निघाले पुण्यरासी । दांभिकाच्या सदनासी । संत न होती तृप्त कदा ॥६३॥ तेथें त्याच्या घराची । वा धनदौलतीची । गरज समर्था नव्हती साची । ते वैराग्याचे सागर ॥६४॥ परी तो जें कांहीं बोलला । त्याचा सत्यपणा पाहिला । खोटेंपणाचा राग आला । म्हणून गेले उठोन ॥६५॥ जातां जातां बोलले । माझें माझें म्हणसी भलें । भोग आतां त्याचीं फळें । माझा उपाय त्यास नसे ॥६६॥ मी कृपा करावया । आलों होतों या ठायां । याहीपेक्षां दुप्पट द्याया । परी तें न तुझ्या प्रारब्धीं ॥६७॥ तेंच पुढें झालें सत्य । एका सहा महिन्यांत । अवघी लक्ष्मी झाली फस्त । त्या भिक्षेची वेळ आली ॥६८॥ म्हणून श्रोते परमार्थांत । खोटेपणा न खपे किंचित् । याचसाठीं हें चरित्र । समर्थें घडून आणिलें ॥६९॥ श्रीगजानन चिंतामणी । त्या गार काय शोभा आणी ? । वा सुवर्णालागुनी । भूषवावें का कथिलानें ? ॥१७०॥ स्वस्ति श्रीदासगणूविरचित । श्रीगजाननविजय नामें ग्रंथ । सदा भाविक परिसोत । निज कल्याण व्हावया ॥१७०॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ इति दशमोऽध्यायः समाप्तः ॥१०॥

अध्याय ११
 
॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे ओंकाररुपा पशुपती । हे भवानीवरा दक्षिणामूर्ति । ब्रह्मांडांत जितुक्या विभूति । तितकीं रुपें तुझीं देखा ॥१॥ तुझें रुप जें निराकार । जेणें हें व्यापक चराचर । जें सर्वस्वीं आधार । अविद्या माया प्रकृतीला ॥२॥ तें स्वरुप जाणावया । अशक्य आहे देवराया । म्हणून तूं करण्या दया । सगुण रुपें धरलींस ॥३॥ जैसें ज्याला वाटत । तैसें तो तुला भाग देत । नामामुळें तुजप्रत । भिन्नत्व ये ना कधींही ॥४॥ शैव तुला शिव म्हणती । ब्रह्म बोलती वेदान्ती । रामानुजांचा सीतापती । वैष्णवांचा विष्णू तूं ॥५॥ उपासनेप्रमाणें । नांवें मिळालीं तुजकारणें । परी तूं अभिन्नपणें । सर्वांठायींच गवससी ॥६॥ तूं सोमनाथ विश्वेश्वर । हीम केदार ओंकार । क्षिप्रातटाकीं साचार । महांकाल तूंच कीं ॥७॥ नागनाथ वैजनाथ । घृष्णेश्वर वेरुळांत । त्र्यंबक तुला म्हणतात । गोदावरीच्या तटाकीं ॥८॥ तूं भीमाशंकर । मल्लिकार्जुन रामेश्वर । तूं गोकर्णरुपी शंकर । तूं महादेव शिंगणापुरीं ॥९॥ त्या अवघ्यांकारण । असो माझें साष्टांग नमन । माझ्या त्रितापांचें हरण । शीघ्र करी दीनबंधो ॥१०॥ देवा तुम्ही कुबेराला । क्षणांत धनपती केला । मग माझ्याविषयीं कां हो पडला । प्रश्न तुम्हांसी गिरिजापते ? ॥११॥ बाळकृष्णाच्या सदनासी । समर्थ आले दुसरे वर्षी । त्या बाळापुरासी । दासनवमीकारणें ॥१२॥ सुकलाल बाळकृष्ण । या बाळापुरालागून । निःसीम भक्त होते दोन । त्यांची सरी न ये कोणा ॥१३॥ या वेळीं बरोबर । होते पाटील भास्कर । बाळाभाऊ, पितांबर । गणू, जगदेव, दिंडोकार ॥१४॥ उत्सव दासनवमीचा । सांग झाला तेथ साचा । दैवयोग भास्कराचा । तेथेंच आला ओढवून ॥१५॥ एक कुत्रें पिसाळलेलें । भास्करा येऊन चावलें । तेणें लोक इतर भ्याले । म्हणती आतां हा पिसाळलेला ॥१६॥ उपाय अवघे व्यावहारिक । भास्करासी केले देख कोणी म्हणती निःशंक । डाँक्‍टरा धाडा बोलवणें ॥१७॥ भास्कर म्हणे ते अवसरीं । वैद्याची ना जरुर खरी । माझा डाँक्टर आसनावरी । बैसला आहे गजानन ॥१८॥ त्याचकडे मजला न्यावें । वृत्त अवघें कळवावें । ते सांगतील तें ऐकावें । आपला हेका करुं नका ॥१९॥ गजाननाचे समोर । आणिला पाटील भास्कर । बाळाभाऊनें समाचार । अवघा समर्थांस श्रुत केला ॥२०॥ तो अवघा ऐकून । महाराज वदले हांसून । हत्या, वैर आणि ऋण । हें कोणासी चुकेना ॥२१॥ सुकलालच्या गाईठायीं । द्वाडपणा जो होता पाही । तो या भास्करें लवलाही । शेगांवीं दवडिला ॥२२॥ तें तिचें द्वाडपण । कुत्रें येथें झालें जाण । तेंच चावलें येऊन । या पाटील भास्कराला ॥२३॥ तिचा हरण्या द्वाडपणा । मशीं यानें केली प्रार्थना । इचें प्यावया दूध जाणा । ऐसा भास्कर मतलबी ॥२४॥ दूध पितां वाटलें गोड । आतां कां रे चाललें जड । नको पडदा ठेवूंस आड । वांचवूं कां मी सांग तुला ? ॥२५॥ हें कुत्रें निमित्त झालें । तुझें आयुष्य मुळींच सरलें । आतां पाहिजे प्रयाण केलें । तूं या सोडून मृत्युलोकां ॥२६॥ जरी इच्छा असेल मनीं । वांचण्याची तुजलागुनी । तरी तुझें मी यापासुनी । रक्षण वेडया करीन ॥२७॥ परी ती होईल उसनवारी । जन्ममृत्यूची बाळा खरी या अशाश्वताच्या बाजारीं । देणें घेणें चालत ॥२८॥ बोल आतां झडकर । काय तुझा विचार । ऐसी कधीं ना येणार । पर्वणी ती जाण तुला ॥२९॥ भास्कर बोले त्यावरी । मी अजाण सर्वतोपरी । जें असेल अंतरीं । आपुल्या तेंच करावें ॥३०॥ लेंकुराचें अवघें हित । माता एक तें जाणत । ऐसें एक्या अभंगांत । श्रीतुकोबा बोलले ॥३१॥ मी आपलें लेंकरुं । म्हणून विनंती कशास करुं ? । तूं अवघ्या ज्ञानाचा सागरु । अवघें कांहीं कळतें तुला ॥३२॥ ऐसें ऐकतां भाषण । संतोषले गजानन । खर्‍याप्रती समाधान । खरें बोलतां होतसे ॥३३॥ कोणी म्हणाले गुरुराया । भास्करासी वांचवा सदया । या कुत्र्यापासूनिया । तो आपुला भक्त असे ॥३४॥ महाराज म्हणती त्याकारण । हेंच तुझें अज्ञान । अरे वेडया जन्ममरण । हीच मुळीं भ्रांति असे ॥३५॥ जन्मे न कोणी, मरे न कोणी । हें जाणावयालागुनी । परमार्थाचा उपाय जाणी । शास्त्रकारें कथन केला ॥३६॥ त्याचा उपयोग करावा । मोह समूळ सोडावा । प्रारब्धभोग भोगावा । निमुटपणें हेंच बरें ॥३७॥ संचित-प्रारब्ध-क्रियमाण । हें भोगल्यावांचून । या बद्ध जीवालागून । सुटका होणें मुळींच नसे ॥३८॥ पूर्वजन्मीं जें करावें । तें या जन्मीं भोगावें । आणि तें भोगण्यासाठीं यावें । जन्मा हा सिद्धान्त असे ॥३९॥ या जन्मीं जें करावें । तें पुढच्या जन्मास उरवावें । असे किती सांग घ्यावे । फेरे जन्ममृत्यूचे ? ॥४०॥ पूर्वजन्मीचें उर्वरित । भास्कराचें न उरलें सत्य । तो अवघ्यापून झाला मुक्त । मोक्षास जायाकारणें ॥४१॥ म्हणून आग्रह करुं नका । मार्ग त्याचा आडवूं नका । काय भास्करासारखा । भक्तराणा जन्मे पुन्हां ॥४२॥ पूर्वजन्मीचें याचें वैरी । कुत्रें होतें निर्धारीं । म्हणून तें या बाळापुरीं । चावतें झालें भास्करास ॥४३॥ त्यानें अवघा आपुला । डाव येथें साधिला । तैसा जरी शेष उरला । द्वेष मनीं भास्कराच्या ॥४४॥ तरी तो त्याचा द्वेष । कारण पुढील जन्मास । कारण होईल भास्करास । दावा आपुला उगवावया ॥४५॥ म्हणून पूर्वजन्मींचें वैर सरलें । आतां न कांहीं शेष उरलें । या भासकराकारण भलें । अवघ्या उपाधि निरसल्या ॥४६॥ आतां मी इतकेंच करितों । दोन महिने वांचवितों । याला न पिसाळूं देतों । श्वानविषापासून ॥४७॥ तें न मीं केलें जरी । हा जन्मास येईल पुन्हां परी । दोन महिने भूमिवरी । उरलें आयुष्य भोगावया ॥४८॥ ऐसें ज्ञान ऐकिलें । तें कित्येकांस नाहीं पटलें । मात्र बाळाभाऊ आनंदले । त्या बोधातें ऐकुनी ॥४९॥ भास्करा, तूं धन्य धन्य । संतसेवा केलीस पूर्ण । चुकलें तुझें जन्ममरण । काय योग्यता वानूं तुझी ? ॥५०॥ ऐसा प्रकार झाल्यावरी । मंडळी आली शेगांवनगरीं । भास्कर बोले मधुरोत्तरीं । महाराजांच्या भक्तगणां ॥५१॥ बाळापूरची हकीकत । सांगे प्रत्येका इत्यंभूत । माझी विनंती जोडून हात । हीच तुम्हां भास्कर म्हणे ॥५२॥ महाराज लाधले शेगांवा । याचा विचार करावा । या कीर्तीचा अमोल्य ठेवा । सांभाळा स्मारक करुन ॥५३॥ त्यांना स्मारकाची जरुर नाहीं । ते पुढीलांसाठीं पाही । तें स्मारक साक्षी देई । त्यांच्या अमोल साधुत्वाची ॥५४॥ पाहा आळंदीस ज्ञानेश्वर । समर्थ सज्जनगडावर । पवित्र केलें देहूनगर । त्या तुकोबारायानें ॥५५॥ त्यांचीं स्मारकें त्या त्या ठायां । ठेविलीं भव्य करुनिया । तोच पथ अनुसराया । तुम्हीं झटावें मनापून ॥५६॥ ऐसें प्रत्येका सांगत । भास्कर राहिला निवांत । परी त्याच्या मनांत । ऐसें आलें एकदां ॥५७॥ हे मला हो हो म्हणती । माझी ऐकून विनंती । परी शंका येत चित्तीं । हो म्हणण्याची यांची मला ॥५८॥ त्यानें एकदां ऐसें केलें । अवघ्या लोकांस मिळविलें एक्या ठायीं मठांत भले । महाराजांच्या अपरोक्ष ॥५९॥ बंकटलाल पाटील हरी । मारुती चंद्रभान कारभारी । जो खंडुजीच्या दुकानावरी । होता कारभार करीत ॥६०॥ श्रीपतराव वावीकर । ताराचंद साहुकार । आणिक मंडळी होती इतर । नांवें कुठवर सांगावीं ? ॥६१॥आ मिळवूनिया त्या लोकांला । भास्करें पदर पसरीला । माझा आतां संबंध उरला । दोन महिनेच तुमच्याशीं ॥६२॥ माझ्या मनीं ऐशी आस । समर्थांचें स्मारक खास । भव्य व्हावें वर्‍हाडास । या शेगांवामाझारी ॥६३॥ तुम्ही हें करितों म्हणा । तेणें आनंद माझ्या मना । होऊन सुखें करीन गमना । मी वैकुंठाकारणें ॥६४॥ संतसेवा कधींही । अनाठाईं जाणार नाहीं इच्छा जयाची ज्या ज्या होई । त्या, त्या संत पुरविती ॥६५॥ स्मारक ऐसें करावें । अवघ्यांनींच वाखाणावें । पाहून त्या डोलावें । प्रत्येकानें आपुल्या मनीं ॥६६॥ ऐसेंच स्मारक करण्याची । शपथ वाहा समर्थांची । ही विनंति अखेरची । माझी ती मान्य करा ॥६७॥ तें अवघ्यांनीं कबूल केलें । भास्कराचें स्थीरावलें । यायोगें तें चित्त भलें । रुखरुख मनाची संपली ॥६८॥ उत्तरोत्तर आनंदवृत्ती । भास्कराची वाढत होती । जैसीं लेंकुरें आनंदती । पुढील सणाच्या आशेनें ॥६९॥ माघ वद्य त्रयोदशीस । महाराज वदले भास्करास । चाल त्र्यंबकेश्वरास । जाऊं आपण शिवरात्रीला ॥७०॥ तो त्र्यंबकराजा कर्पूरगौर । भवभवांतक भवानीवर । जो आहे झाला स्थीर । श्रीगोदावरीच्या तटातें ॥७१॥ तें ज्योतिर्लिंग मनोहर । करी पातकाचा संहार । नको करुंस आतां उशीर । जाऊं गंगास्नानाला ॥७२॥ भास्करा, त्या त्र्यंबकेश्वरीं । पहाड एक ब्रह्मगिरी । जेथें औषधी नानापरी । बहुसाल असती उगवलेल्या ॥७३॥ त्या ब्रह्मगिरीवर स्थित । आहेत पहा गहनीनाथ । ज्यांना आहेत अवगत । गुणधर्म औषधीचे ॥७४॥ वेडया कुत्र्याच्या विषावरी । तेथें औषधी आहे खरी । तिचा उपयोग सत्वरीं । करुन पाहूं येधवां ॥७५॥ भास्कर म्हणे गुरुनाथा । आतां औषधी कशाकरतां ? । तुमची आहे अगाध सत्ता । औषधीहून आगळी ॥७६॥ आपुल्या कृपेनें भलें । विष बाळापुरींच निमालें । आयुष्याचे आहेत उरले । दोन महिने आतां कीं ॥७७॥ म्हणून वाटे मजप्रती । शेगांवींच राहूं गुरुमूर्ती । त्र्यंबकेश्वरा आम्हांप्रती । तुहीच आहांत साक्षात्‌ ॥७८॥ गोदावरी तुमचे चरण । तेथेंच मी करी स्नान । अन्य तीर्थाचें प्रयोजन । मला न आतां राहिलें ॥७९॥ ऐसी ऐकतां त्याची वाणी । समर्थ वदले हांसोनी । हें जरी खरें जाणी । तरी तीर्थमहिमा मानावा ॥८०॥ चाल नको करुं उशीर । पाहूं तो त्र्यंबकेश्वर बाळाभाऊ पीतांबर । यांसही घे बरोबरी ॥८१॥ मग ती मंडळी निघाली । शेगांवाहून भली । शिवरात्रीस येती झाली । त्र्यंबकेश्वराकारणें ॥८२॥ कुशावर्ती केलें स्नान । घेतलें हराचें दर्शन । गंगाद्वारां जाऊन । पूजन केलें गौतमीचें ॥८३॥ वंदिली माय निलांबिका । तेवीं गहनी निवृत्तिनाथ देखा । तेथून आले नाशिका । गोपाळदासास भेटावया ॥८४॥ हा गोपाळदास महंत । काळ्या रामाच्या मंदिरांत । धुनी लावूनी द्वारांत । पंचवटीच्या बसलासे ॥८५॥ राममंदिरासमोर । एक पिंपळाचा होता पार । शिष्यांसहित साधुवर । तेथें जाऊन बैसले ॥८६॥ गोपाळदासास आनंद झाला । बोलले जवळच्या मंडळीला । आज माझा बंधु आला । वर्‍हाडांतून गजानन ॥८७॥ जा घ्या त्यांचें दर्शन । अनन्यभावें करुन । माझी ही भेट म्हणून । नारळसाखर त्यांसी द्या ॥८८॥ हा हार घाला कंठांत । तो मी एक साक्षात् । देह भिन्न म्हणून द्वैत । आम्हां उभयतीं मानूं नका ॥८९॥ शिष्यांनीं तैसेंच केलें । दर्शन घ्याया अवघे आले । कंठामाजीं घातिले । दिलेल्या पुष्पहाराला ॥९०॥ नारळ आणि खडीसाखर । ठेविली स्वामीसमोर ती पाहून गुरुवर । ऐसें बोलले भास्कराला ॥९१॥ हा प्रसाद अवघ्यांस वाटी । परी न होऊं देई दाटी । माझ्या बंधूची झाली भेटी । आज या पंचवटींत ॥९२॥ माझें येथील काम झालें । आतां नाशकाचें राहिलें । म्हणून पाहिजे तेथें गेले । धुमाळ वकीलाच्या घरा ॥९३॥ महाराज आले नाशकांत । लोक दर्शना जमले बहुत । बारीक सारीक गोष्टी अमित । तेथें असतां जहाल्या ॥९४॥ त्या अवघ्या सांगतां । विस्तार होईल उगीच ग्रंथा । म्हणून देतों संक्षेप आतां । त्याची क्षमा करा हो ॥९५॥ तेथें राहून कांहीं दिवस । महाराज आले शेगांवास । तो अडगांवीं नेण्यास । श्यामसिंग पातला ॥९६॥ त्यानें आग्रह केला फार । समर्थें दिलें उत्तर । रामनवमी झाल्यावर । येऊं आम्ही अडगांवा ॥९७॥ आतां तूं जावें परत । उगा न पडे आग्रहांत । श्यामसिंग मुळींच भक्त । निःसीम होता समर्थांचा ॥९८॥ तो आला तैसा परत गेला । आपुल्या त्या अडगांवाला । पुन्हां श्रोते येतां झाला । रामनवमीस शेगांवीं ॥९९॥ उत्सव करुन शेगांवांत । समर्थांना शिष्यांसहित । आला घेऊन अडगांवांत । हनुमानजयंतीकारणें ॥१००॥ अडगांवीं असतां समर्थस्वारी । चमत्कार झाले नानापरी । एके दिवशीं दोन प्रहरीं । भास्कर लोळविला फुपाट्यांत ॥१॥ छातीवरी बैसून । भास्करा केलें ताडन । लोक पहाती दुरुन । परी जवळी कोणी जाईना ॥२॥ बाळाभाऊ जवळ होता । तो म्हणाला सद्‌गुरुनाथा । भास्करासी सोडा आतां । बेजार झाला उन्हानें ॥३॥ तैं म्हणाला भास्कर । बाळाभाऊ न जोडा कर । माझा हा साक्षात् ईश्वर । काय करील तें करुं दे ॥४॥ लोकांसी वाटती चापटया दिल्या । मला होतात गुदगुल्या । अनुभवाच्या गोष्टी भल्या । अनुभवीच जाणती ॥५॥ पुढें घेऊन भास्करासी । महाराज आले बिर्‍हाडासी । त्या अडगांव ग्रामासी । उतरलेल्या ठिकाणास ॥६॥ बाळाभाऊस बोलले । अवघे आतां दोन उरले । भास्कराचे दिवस भले । पंचमीला जाईल तो ॥७॥ आज मीं जें केलें कृत्य । ताडनाचें रानांत । तें कां हें तुजप्रत । आलें असेल कळोनी ॥८॥ तुजला या भास्करानीं । मारविलें होतें छत्रीनीं । शेगांवीं माझ्या करांनीं । तें आहे कां ध्यानांत ? ॥९॥ तें क्रियमाण नासावया । त्यास मीं मारिलें ये ठायां । ह्या एकाच गोष्टीवांचूनिया । अन्य नव्हता हेत कांहीं ॥११०॥ उत्सव पूर्ण झाल्यावर । त्या अडगांवींचा साचार । काय घडला प्रकार । तो आतां परियेसा ॥११॥ उत्सवाचा काला झाला । वद्य पंचमी दिवस आला । एक प्रहर दिवसाला । समर्थ म्हणती भास्करासी ॥१२॥ भास्करा तुझें प्रयाण । आज दिवशीं आहे जाण । पद्मासन घालून । पूर्वाभिमुख बैसावें ॥१३॥ चित्त अवघें स्थिर करी । चित्तीं सांठवावा हरी । वेळ आली जवळ खरी । आतां सावध असावें ॥१४॥ इतर जनांकारण । म्हणूं लागले करा भजन । "विठ्ठल विठ्ठल नारायण" । ऐसें उच्च स्वरानें ॥१५॥ हा तुमचा बंधु भला । जातो आज वैकुंठाला । त्याच्या करा पूजनाला । माळ बुक्का वाहून ॥१६॥ भास्करें घातलें पद्मासन । नासाग्रीं दृष्टि ठेवून । वृत्ति अवघ्या केल्या लीन । अंतर्मुख होऊनियां ॥१७॥ भक्त भास्करा पूजिती । माळा बुक्का वाहती । तें कौतुक पाहाती । समर्थ दूर बैसून ॥१८॥ भजन झालें एक प्रहर । माध्यान्हीस आला दिनकर । महाराजांनीं ’हरहर’ । शब्द केला मोठयानें ॥१९॥ त्यासरसा प्राण गेला । भास्कराचा वैकुंठाला । संतांनीं हातीं धरिलें ज्याला । तो पाहुणा हरीचा ॥१२०॥ लोक पुसती महाराजास । कोठें करणें समाधीस । या भास्कराच्या शरीरास । कोठें न्यावें ठेवावया ? ॥२१॥ समर्थ अवघ्यांस सांगती । द्वारकेश्वर जो पशुपती । ज्याच्या सन्निध आहे सती । तेथें ठेवा भास्कराला ॥२२॥ ऐसी आज्ञा होतां क्षणीं । विमान बांधिलें लोकांनीं । केळीचे खांब लावुनी । चहुं बाजूंस विबुध हो ॥२३॥ आंत ठेविलें कलेवर । पुढें भजनाचा होय गजर । मिरवीत आणिला भास्कर । द्वारकेश्वराचीयापासी ॥२४॥ सांगविधि समाधीचा । ते ठायीं झाला साचा । लोक म्हणती महाराजांचा । परम भक्त गेला हो ॥२५॥ दुसरे दिवसापासून । समाधीच्या सन्निध जाण । होऊं लागलें अन्नदान । गोरगरीबांकारणें ॥२६॥ स्थान द्वारकेश्वराचें । अडगांवाच्या सन्निध साचें । अंतर एक मैलाचें । गांवापासून उत्तरेस ॥२७॥ जागा द्वारकेश्वराची । परमरमणीय होती साची । झाडी चिंचवृक्षांची । होती विशेष ते ठायां ॥२८॥ निंब अश्वत्थ मांदार । आम्र वट औदुंबर । ऐसे वृक्ष होते इतर । शिवाय कांहीं फुलझाडें ॥२९॥ अडगांव अकोलीच्या मध्यंतरीं । हें ठिकाण निर्धारी । तेथें समाधि दिधली खरी । समर्थांनीं भास्कराला ॥१३०॥ दहा दिवस अन्नदान । झालें याचें वर्णन । तुम्ही नुकतेंच केलें श्रवण । संतभंडारा नांव ज्याचें ॥३१॥ चिंचवृक्षांच्या सावलींत । जेवाया बसे पंगत । तयीं कावळे अतोनात । त्रास देऊं लागले ॥३२॥ काव काव ऐसें करिती । द्रोण पात्रीचे उचलून नेती । मलोत्सर्ग तोही करिती । जेवणारांच्या अंगावर ॥३३॥ योगें लोक त्रासले । कावळ्यांस हाकूं लागले । भिल्लांनीं ते तयार केले । तीरकमटे त्या मारावया ॥३४॥ तईं बोलले गजानन । अवघ्या लोकांलागून । नका मारुं त्याकारण । अपराध त्यांचा कांहीं नसे ॥३५॥ या भंडार्‍यांत येण्याचा । हेतु इतकाच आहे त्यांचा । प्रसाद आपणा भास्कराचा । इतरांपरी मिळावा ॥३६॥ कां कीं हा भास्कर । वैकुंठीं गेला साचार । हा पितृलोकावर । नाहीं मुळींच राहिला ॥३७॥ दहा दिवसपर्यंत । प्राण अंतरिक्षांत । राहे परिभ्रमण करित । सपिंडी होता जाय पुढें ॥३८॥ त्या अकराविया दिवशीं । बली देती कावळ्याशीं । काक जेव्हां स्पर्शेल त्यासी । तेव्हांच प्राण जातो पुढें ॥३९॥ त्या बलीदानाचें । कारण भास्करा नुरलें साचें । म्हणून या कावळ्यांचें । पित्त गेलें खवळून ॥१४०॥ आत्मा या भास्कराचा । मुळींच मुक्त झाला साचा । तो पाहुणा वैकुंठीचा । झाला आहे येधवां ॥४१॥ या सोमसूर्य लोकाचें । कारण त्यासी नुरलें साचें । म्हणून पिंडदानाचें । नुरलें पाहा प्रयोजन ॥४२॥ जयाला न ऐसीं गती । त्याच्यासाठीं पिंड देती । कावळ्यांची वाट पाहाती । पिंड ठेवून कलशावर ॥४३॥ म्हणून कावळे रागावले । त्यांनीं हें जाणीतलें । भास्करानें गमन केलें । एकदम वैकुंठ लोकाला ॥४४॥ म्हणून आम्हां प्रसाद त्याचा । मिळूं द्या या भंडार्‍याचा । ऐसा विचार कावळ्यांचा । दिसतो या कृतीनें ॥४५॥ तुम्ही त्यांस मारुं नका । मीच तया सांगतों देखा । अहो जिवांनो ! माझें ऐका । गोष्ट आतां सांगतों जी ॥४६॥ तुम्ही उद्यांपासोन । वर्ज्य करा हें ठिकाण । ना तरी भास्करालागून । येईल माझ्या कमीपणा ॥४७॥ आज प्रसाद घेऊन । तुम्ही तृप्त व्हा अवघेजण । मात्र उद्यांपासून । या स्थळासी येऊं नका ॥४८॥ ऐसें महाराज बोलले । तें भाविकांसी अवघें पटलें । परि कुत्सित जे कां बसले । होते त्या मंडळींत ॥४९॥ ते एकमेकांलागुनी । म्हणते झाले हांसोनी । ही गजाननानें केली वाणी । अस्थानीं कीं निरर्थक ॥१५०॥ पक्षी कुठें कां वागतात । मानवाच्या आज्ञेंत ? । पाहूं याची प्रचीत । उद्यां मुद्दाम येऊनी ॥५१॥ हे वेडे कांहीं बोलती । भाविका नादीं लाविती । आपलें स्तोम माजविती । संतत्वाचें निरर्धक ॥५२॥ अहो साजेल तें बोलावें । जें कां पचेल तेंच खावें । उसनें न कधीं आणावें । अवसान तें अंगांत ॥५३॥ दुसरे दिवशीं ते कुत्सित । मुद्दाम पाहाया आले तेथ । तों एकही ना दृष्टीप्रत । पडला त्यांच्या कावळा ॥५४॥ मग मात्र चकित झाले । समर्थांसी शरण आले । बारा वर्षें तेथ भले । कावळे न आले श्रोते हो ॥५५॥

चौदा दिवस झाल्यावरी । गजानन फिरले माघारीं । येते झाले शेगांव नगरीं । आपल्या उर्वरित शिष्यांसह ॥५६॥ श्रोते त्या शेगांवांत । एक गोष्ट घडली अघटित । ती ऐका सावचित्त । सांगतों मी येधवां ॥५७॥ होतें साल दुष्काळाचें । म्हणून एका विहिरीचें । काम चाललें खोदण्याचें । सुरुंगातें लावून ॥५८॥ विहीर दोन पुरुषावर । गेली खोल साचार । खडक काळा लागला थोर । गती खुंटली पहारीची ॥५९॥ म्हणून भोकें करुन । आंत दारु ठासून । सुरुंगांच्या साह्यें करुन । काम फोडण्याचें सुरुं झालें ॥१६०॥ चारी बाजूंस भोकें चार । केलीं पहारीनें तयार । दारु ठासिली अखेर । आंत दोर्‍या घालुनी ॥६१॥ एरंड पुंगळ्या पेटवून । सोडल्या चारी दोर्‍यांतून । तों मध्येंच बसल्या अडकून । दोर्‍याचीया गांठीवरी ॥६२॥ पुंगळी खालीं जाईना । दारुस विस्तव लागेना । पाणी दम धरीना । आलें जवळी सुरुंगाच्या ॥६३॥ तैं कामावरचा मिस्तरी । विचार करी अंतरीं । सुरुंगास लागल्या वारी । सुरुंग वायां जाईल कीं ॥६४॥ म्हणून गणू जवर्‍याला । मिस्तरी तो बोलला । तूं उतरुन विहिरीला । पुंगळ्या थोडया सरकीव ॥६५॥ आणि तूं येईं लौकर वरी । पुंगळ्या जातील तोंवरी । बाराचिया शेजारी । म्हणजे काम होईल ॥६६॥ त्या पुंगळ्या सरकावण्यासी । कोणी न धजे जावयासी । म्हणून या गणू जवर्‍यासी । मिस्तरीनें दटाविलें ॥६७॥ काय करितो बिचारा । दारिद्रय होतें ज्याच्या पदरां । त्याच्यावरी चाले जोरा । यज्ञास बळी बोकडाचा ॥६८॥ या गणू जवर्‍याची । निष्ठा समर्थावरी साची । आज्ञा होतां मिस्तरीची । गणू आंत उतरला ॥६९॥ एक पुंगळी सरकविली । ती तात्काळ तळा गेली । दारुप्रती जाऊन भिडली । गणू आंत सांपडला ॥१७०॥ दुसरीस जों घाली हात । पुंगळी सरकवण्याप्रत । तों पहिला सुरंग उडाला सत्य । मग काय विचारतां ? ॥७१॥ गणू म्हणे विहिरींतून । समर्था ये धांवून । माझें आतां रक्षण । तुझ्यावीण कोण करी ? ॥७२॥ विहिरीमाजीं धुराचा । डोंब झाला होता साचा । दुसरा सुरुंग पेटण्याचा । अवधि उरला थोडका ॥७३॥ तों गणू जवर्‍या भली । कपार हातां लागली । त्या कपारींत बैसली । स्वारी गणू जवर्‍याची ॥७४॥ एकामागून एकांनीं । पेट घेतला सुरुंगांनीं । उडाले सुरुंग ऐसे तिन्ही । दगड अपार निघाले ॥७५॥ छिन्न भिन्न शरीर । झालें असेल साचार । डोकावून पाहाती नारीनर । आंत गणू जवर्‍याला ॥७६॥ तो कोठें दिसेना । जनाच्या नाना कल्पना । दगडाप्रमाणें गणू जाणा । उडाला असेल बाहेर ॥७७॥ त्याचें आसमंत भागांत । कोठें तरी असेल प्रेत । पडलेलें त्या शोधण्याप्रत । माणूस कोणी पाठवा ॥७८॥ मिस्तरीचा शब्द ऐकिला । आंतून गणू बोलला । अहो मिस्त्री नाहीं मेला । गणू आहे विहिरींत ॥७९॥ गजाननाच्या कृपेनीं । मी वांचलों या ठिकाणीं । बसलों आहे दडोनी । या पहा कपारींत ॥१८०॥ परी कपारीच्या तोंडाला । धोंडा एक मोठा पडला । त्यामुळें बाहेर मला । येतां येत नाहीं कीं ॥८१॥ गणूचे शब्द ऐकिले । लोक अवघे आनंदले । लोक खालीं उतरले । तो धोंडा काढावया ॥८२॥ दहापांच जणांनीं । धोंडा सरकविला पहारींनीं । गणूस बाहेर काढूनी । घेऊन आले वरते त्या ॥८३॥ वरतीं येतांच गांवांत । गणू गेला पळत पळत । समर्थांच्या मठांत । दर्शन त्यांचें घ्यावया ॥८४॥ गणू दर्शना येतांक्षणीं । बोलले त्या कैवल्यदानी । गण्या कपारींत बैसोनी । किती धोंडे उडविलेस ? ॥८५॥ त्यांत मोठा धोंडा तुला । रक्षण्यास येऊनी बैसला । कपारीच्या तोंडाला । म्हणून तूं वांचलास ॥८६॥ पुन्हां ना ऐसें साहस करी । पुंगलीवरुन सुटल्यापरी । मधेंच तिला जाऊन करीं । कशाही प्रसंगीं धरुं नये ॥८७॥ जा तुझें गंडांतर । आज निमालें साचार । गणूप्रती पाहाया इतर । लोक आले गांवींचे ॥८८॥ गणू म्हणे सद्‌गुरुनाथा । सुरुंग चारी पेटतां । तूंच मला देऊन हातां । कपारींत बैसविलें ॥८९॥ म्हणून मी वांचलों । तुझे पाय पाहाया आलों । ना तरी असतों मेलों । विहिरीमाजीं गुरुराया ! ॥१९०॥ ऐसें गजाननकृपेचें । महिमान आहे थोर साचें । तें साकल्य वर्णण्याचें । मसीं नाहीं सामर्थ्य ॥९१॥ श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ । आल्हादवो भाविकांप्रत । हेंच इच्छी दासगणू ॥१९२॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ ॥ इति एकादशोऽध्यायः समाप्तः ॥

अध्याय १२
 
॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे गणाधीशा गणपती । मयुरेश्वरा विमलकीर्ति । माझ्या हृदयीं करून वस्ती । ग्रंथ कळसास नेई हा ॥१॥ तूं ज्ञानबुध्दीचा दाता । तूं भक्तमनोरथ पुरविता । विघ्ननगातें संहारिता । तूंच एक गणराया ॥२॥ तूं साक्षात् चिंतामणी । चिंतिलेलें देशी जाणी । आपुल्या भक्तांलागूनी । ऐसें पुराणें म्हणतात ॥३॥ माझ्या मनींची अवघी चिंता । लयास नेई एकदंता । लंबोदरा पार्वतीसुता । भालचंद्रा सिंदुरारे ॥४॥ असो बच्चुलाल अग्रवाला । होता एक आकोल्याला । धन-कनक- संपन्न भला । मनाचाही उदार जो ॥५॥ त्यानें हकिकत कारंज्याची । म्हणजे लक्ष्मण पंत धुड्याची । कर्णोपकर्णी ऐकली साची । तेणें साशंक जहाला ॥६॥ तें खरें खोटें पहाण्यास । विचार करी चित्तास । तों एके समयास । महाराज आले अकोल्याला ॥७॥ येऊन बच्चुलाला घरीं । बैसते झाले ओट्यावरी । कीं गजानन साक्षात्कारी । भक्त आपुला जाणून ॥८॥ बच्चुलाला आनंद झाला । तो समर्थांसी ऐसें वदला । आज गुरुराया वाटतें मला । आपली पूजा करावी ॥९॥ ऐसें ऐकतां भाषण । समर्थेम तुकविली मान । जें साक्षात् असें चिन्ह । श्रोते संमती दिल्याचें ॥१०॥ बच्चुलालानें तयारी । तात्काळ केली ओट्यावरी । षोडशोपचारेम अत्यादरीं । पूजन त्यानें आरंभिलें ॥११॥ प्रथमतः घातलें मंगलस्नान । नानाविध उटणीं लावून । मग करविलें परिधान । वस्त्र पीतांबर जरीचा ॥१२॥ शालजोडी अंगावरी । बहुमोल घातली काश्मीरी । एक जरीचा रुमाल शिरीं । अभ्रेस्मी आणून बांधिला ॥१३॥ गोफ घातिला गळ्यांत । सलकडीं तीं हातांत । कराच्या दाही बोटांत । मुद्रिका घातल्या नानापरी ॥१४॥ बहुमोल हिर्‍याची । वामकरीं घातिली पौची । रत्नजडित कंठ्याची । कंठीं शोभा विशेष ॥१५॥ जिलबी राघवदास पेढे । नैवेद्यास ठेविले पुढे । त्रयोदश गुणी ठेविले विडे । एक्या लहान तबकांत ॥१६॥ अष्टगंध अर्गजा अत्तर । सुवासिक लाविलें फार । त्यानें अवघ्या अंगभर । गुलाबपानी शिंपडीलें ॥१७॥ एका सुवर्णाच्या ताटीं । दक्षिणा ठेविली शेवटीं । ती होती फार मोठी । रुपये होन मोहोरांची ॥१८॥ बेरीज करतां दहा हजार । येईल ती साचार । ऐशी दक्षिणा होती थोर । किती करूं वर्णन तिचें ॥१९॥ श्रीफल पुढें ठेवून । विनयें केलें भाषण । महाराज माझें इच्छी मन । राममंदिर बांधावया ॥२०॥ या माझ्या ओट्यावरी । अडचण होतसे भारी । मंडप तो घातला जरी । उत्सवासी गुरुराया ॥२१॥ त्या माझ्या मनोरथा । पूर्ण करी ज्ञानवंता । ऐसें म्हणून ठेविला माथा । अनन्य भावें पायांवरी ॥२२॥ त्यावरी साधु गजानन । देते झाले आशीर्वचन । श्रीजानकीजीवन । तुझा करील पूर्ण हेतू ॥२३॥ असो आज तूं हें काय केलें ? । मला पोळ्याचा बैल बनविलें । हे अलंकार घालून भले । याचें काय कारण ? ॥२४॥ मी न बैल पोळ्याचा । अथवा घोडा दसर्‍याचा । मला या दागदागिन्यांचा । काय सांग उपयोग ? ॥२५॥ अरे हें अवघें विष । मला नको त्याचा स्पर्श । या नसत्या उपाधीस । माझ्या मागें लावूं नको ॥२६॥ अथवा तूं मोठा श्रीमान् । हें दाखवाया कारण । केलेंस कां हें प्रदर्शन । सांग मसी बच्चुलाला ? ॥२७॥ जें आवडतें जयासी । तेंच द्यावें तयासी । मी वेडापिसा संन्याशी । नागवा फिरतों गांवभर ॥२८॥ हें अवघें तुझें तुला । लखलाभ असो बच्चुलाला । तुम्हां प्रापंचिकाला । या द्रव्याची जरूर ॥२९॥ माझा यजमान भीमातटीं । उभा विटेसी जगजेठी । तो काय माझ्यासाठीं । हें वैभव द्याया तयार नसे ? ॥३०॥ ऐसें म्हणून काढिले । दागिने अंगावरचे भले । चहूं बाजूंस फेकियले । वस्त्रांचीही तीच गती ॥३१॥ दोन पेढे खाऊन । निघून गेले गजानन । हा प्रकार अवलोकून । केला शोक अकोल्यांत बहुतांनीं ॥३२॥ त्यांत कांहीं कारंज्याचे । लोक हजर होते साचे । ते म्हणती आपुल्या वाचें । अभागी आमुचा लक्ष्मण ॥३३॥ त्यानें बच्चुलालापरी । पुजन केलें आपुल्या घरीं । परी कचरला अंतरीं । मोह धनाचा धरून ॥३४॥ वरघडीचें भाषण । केलें विनय दाखवून । ते कां समर्थाकारण । समजणें अशक्य आहे हो ? ॥३५॥ जेवीं पूजा दांभिकांची । शब्दमयी असते साची । पूर्तता महावस्त्राची । होती त्यांची अक्षतेनें ॥३६॥ ' शर्कराखंडखाद्यानि ' । ऐसें म्हणोनिया वदनीं । कुचका दाणा आणोनी । ठेवी पुढें भुईमुगाचा ! ॥३७॥ अशा दांभिक पूजनाचें । फलही त्याच स्वरूपाचें । वाटोळें लक्ष्मणाचें । याच कृतीनें झालें हो ॥३८॥ हा बच्चुलाल धन्य धन्य । जैसें केलें भाषण । तैसेंच ठेविलें वर्तन । जवाहून न आगळें ॥३९॥ आतां याच्या वैभवाला । ओहोट हा ना शब्द उरला । संतकृपा झाली ज्याला । तो सुखीच राहातसे ॥४०॥ बच्चुलालांनीं तपास । केला अवघ्या अकोल्यास । परी न लागला थांग त्यास । समर्थांचा कोठेंही ॥४१॥ असो एक पितांबर नांवाचा । शिष्य शिंपी जातीचा । होता गजानन महाराजांचा । शेगांवीं मठामध्यें ॥४२॥ त्यानें सेवा बहुत केली । तपश्चर्या फळा आली । एके दिनीं ऐसी झाली । गोष्ट ऐका मठांत ॥४३॥ फाटकें तुटकें धोतर । नेसला होता पितांबर । तें पाहून गुरूवर । ऐशा रीतीं बोलले ॥४४॥ अरे तुझें नांव पितांबर । नेसण्या न धडकें धोतर । ढुंगणास पाहाती नारीनर । तें तरी झांक वेड्या ! ॥४५॥ नांव म्हणे सोनुबाई । हातीं कथलाचाही वाळा नाहीं । नांव पाहतां गंगाबाई । आणि तडफडे तहानेनें ॥४६॥ तशांतलाच प्रकार । आहे तुझा साचार । हें फाटकें धोतर । पोतेर्‍यांच्या उपयोगी ॥४७॥ तेंच नेसून बैससी । ढुंगण जगाला दाविसी । हा घे दुपेटा देतों तुसी । नेसावयाकारणें ॥४८॥ तो न करितां अनमान । राहे बाळा नेसून । यासी नको सोडूं जाण । कोणी काहीं केलें तरी ॥४९॥ पितांबरा दुपेटा नेसला । हें असह्य झालें इतरांना । भाऊच घातकी भावाला । होतो स्वार्थ दृष्टीनीं ॥५०॥ तो वेडावांकडा प्रकार । कशास बोलूं साचार । गटाराचें उघडितां द्वार । घाण मात्र सुटते हो ॥५१॥ श्रीगजानन स्वामीप्रत । शिष्य होते असंख्यांत । परी अधिकारी तयांत । दोही हातांच्य बोटांइतके ॥५२॥ पाहा श्रोते कांतारीं । वृक्ष असती नानापरी । त्यांतून क्वचित् कोठें तरी । नजरेस पडती चंदनतरु ॥५३॥ त्यापरीच होते येथें । त्यांच्या शिष्यमंडळीतें । काहीं शिष्य पितांबरातें । टोचूं लागले निरर्थक ॥५४॥ हेंच कां तुझें शिष्यपण । वस्त्र करिसी परिधान । जें कां समर्थाकारण । ल्यावयाच्या उपयोगी ॥५५॥ तुझी भक्ति कळून आली । तूं खुशालचंद अससी मुळीं । तूं राहूं नको ये स्थळीं । अपमान करण्या सद्गुरुचा ॥५६॥ तैं पितांबर म्हणाला । मी न गुरूचा अपमान केला । उलट मान ठेविला । आज्ञा ऐकून तयांची ॥५७॥ वस्त्र हें मज त्यांनीं दिलें । नेसावया सांगितलें । तेंच मीं हो परिधान केलें । ही कां झाली अवज्ञा ? ॥५८॥ ऐसी भक्ती न भक्ती झाली । शिष्यांत तेढ माजली । ती मिटवाया माव केली । ऐशा रीतीं गजाननें ॥५९॥ पितांबरास म्हणती गुरुवर । तूं येथून जावें दूर । जाणतें मूल झाल्यावर । आई त्याला दूर ठेवी ॥६०॥ माझी कृपा आहे खरी । हे पितांबरा तुजवरी । जा हिंडून भूमीवरी । पदनतासी तारावें ॥६१॥ डोळ्यांत आसवें आणून । करूनिया साष्टांग नमन । मागें पाहे फिरफिरून । सोडून जातां मठासी ॥६२॥ पितांबर आला कोंडोलीसी । बसला वनांत आंब्यापासी । चिंतन चाललें मानसीं । निजगुरुचें सर्वदा ॥६३॥ तेथें होता रात्रभर । उदया येतां दिनकर । जाऊन बसला झाडावर । मुंगळ्यांचिया त्रासानें ॥६४॥ अवघ्या आम्रवृक्षावरी । मुंग्या मुंगळे होते भारी । लहान थोर फांद्यांवरी । आला पितांबर जाऊन ॥६५॥ परी निर्भय ऐसें सांपडेना । स्थान तयासी बसण्या जाणा । हेंच कृत्य गुराख्यांना । कौतुकास्पद वाटलें ॥६६॥ ते म्हणाले आपसांत । हा माकडापरि कां रे फिरत? । ह्या वृक्षावरी सत्य । हें कांहीं कळेना ॥६७॥ लहान सान फांदीला । हा निर्भयपणें फिरून आला । परी नाहीं खालीं पडला । हेंच आहे आश्चर्य ! ॥६८॥ दुसरा म्हणाला यांत कांहीं । आश्चर्य वाटण्याजोगें नाहीं । श्रीगजाननाच्या शिष्यांठायीं । ऐसें सामर्थ्य असतें रे ॥६९॥ यावरून हा त्यांचा । शिष्य असावा खचित साचा । चला हा येथ आल्याचा । वृतान्त सांगूं गांवांत ॥७०॥ गोपमुखें वृत्त कळलें । कोंडोलीचे लोक आले । आम्रवृक्षापासीं भले । कोण आले तें पहावया ॥७१॥ म्हणाले पौरवासी नर । हा ढोंगी असावा साचार । बळेंच करितो वेडेचार । गजाननाच्या शिष्यापरी ॥७२॥ शिष्य गजानन महाराजांचा । भास्कर पाटील होता साचा । झाला नुकताच अंत त्याचा । अडगांव नामें ग्रामांत ॥७३॥ समर्थांचे शिष्य । येथें येतील कशास ? । वळें करण्या उपवास । सोडून बर्फी पेढ्याला ॥७४॥ पुसून एकदां यास पहावें । तो काय म्हणतो तें ऐकावें । मग खरें खोटें ठरवावें । उगीच तर्क नाहीं बरा ॥७५॥ एक मनुष्य पुढें झाला । पितांबरासी पुसूं लागला । तूं कोण कोठील कशास आला ? । गुरू तुझा कोण असे ? ॥७६॥ पिंतांबर बोले त्यावर । मी शेगांवचा रहाणार । मी शिंपी पितांबर । शिष्य गजानन स्वामींचा ॥७७॥ त्यांची आज्ञा मजलागून । करण्या झाली पर्यटण । म्हणून येथें येऊन । वृक्षापासी बैसलों ॥७८॥ तों आंब्याच्या मुळाशीं । मुंगळे होते बहुवसी । म्हणून बसलों फांदीसी । वृक्षावरी जाऊन ॥७९॥ ऐसें ऐकतां तद्भाषण । लोक कोपले दारूण । अरे मोठ्याचें नांव सांगून । चेष्टा ऐशा करूं नको ॥८०॥ काय म्हणे मी राजाची । राणी आवडती आहे साची । खळगी भरण्या पोटाची । आले मजूरी करावया ॥८१॥ देशमुख त्या गांवींचा । शामराव नामें साचा । तो बोलला ऐसी वाचा । अरे सोंगाड्या ऐक हें ॥८२॥ स्वामी समर्थ गजानन । प्रत्यक्ष आहे भगवान । त्यांचें नांव सांगून । बट्टा त्यांना लावूं नको ॥८३॥ अरे वेड्या एक्या काळीं । त्यांनीं ऐसी कृति केली । ऋतु नसतां आणवलीं । फळें आम्र-वृक्षाला ॥८४॥ त्यांनीं फळें आणवलीं । तूं नुसतीं पाने आण भलीं । नाहीं तरी या स्थलीं । तुझी न धडगत लागेल ! ॥८५॥ हा बळीराम पाटलाचा । वृक्ष वठलेला आंब्याचा । तो पर्णयुक्त करी साचा । आमच्या देखत ये काळीं ॥८६॥ ऐसें न जरी करशील । तरी मार खाशील । खरा असल्यास होशील । वंद्य आम्हांकारणें ॥८७॥ कां कीं शिष्य सद्गुरुचे । कांहीं अंशीं निघती साचे । बापा त्यांच्याच तोडीचे । हा आहे न्याय जगीं ॥८८॥ नको करूं उशीर । हा आंबा करी हिरवागार । तें ऐकतां पितांबर । गेला असे घाबरून ॥८९॥ बोलला ऐसें नाडूं नका । माझी सारी कथा ऐका । एका खाणींत निघती देखा । हिरे आणि गारा हो ॥९०॥ तैसाच मी गार परी । गजानन शिष्यांभितरीं । बोललों नाहीं वैखरी । यत्किंचित खोटें हो ॥९१॥ गारेवरून खाणीस । नाहीं येत जगीं दोष । मी निज गुरूच्या नांवास । चोरून कैसें ठेवावें ? ॥९२॥ शामराव म्हणे त्यावर । नको करूं चरचर । संकट शिष्यांस पडतां थोर । ते धांवा करिती सद्गुरुंचा ॥९३॥ मग तो शिष्य त्यांचा जरी । नसला कृतीनें अधिकारी । तरी सद्गुरूचा प्रभाव करी । साह्य त्या आपुल्या शिष्यांस ॥९४॥ ऐसी झाली आड-विहीर । पितांबरासी साचार । झाला बिचारा चिंतातुर । कांहीं न सुचे तयासी ॥९५॥ त्या वठलेल्या झाडापासी । मिळाले अवघे पौरवासी । काय होतें तें पहावयासी । मुलें बायकांसमवेत ॥९६॥ निरुपाय होऊनी अखेर । पितांबरानें जोडिलें कर । स्तवन मांडिलें अपार । आपुल्या सद्गुरुरायाचें ॥९७॥ हे स्वामी समर्थ गजानना ! । ज्ञानांबरीच्या नारायणा । पदनताच्या रक्षणा । धांव आतां ये काळीं ॥९८॥ माझ्यामुळें दोष तुला । येऊं पहातो भक्तपाला । आपुल्या ब्रीदासाठीं पाला । आणीव आम्रवृक्षासी ॥९९॥ माझी भिस्त तुझ्यावरी । पाव मातें लवकरी । नातरी आली पाळी खरी । मजला येथें मरण्याची ॥१००॥ प्रल्हाद खरा करण्याला । स्तंभीं नरहरी प्रगटला । जनी चढवितां सुळाला । त्याचें पाणी जहालें ॥१॥ जनीचा भार देवावर । माझा आहे तुजवर । संतदेवांत अंतर । मुळींच नाहीं राहिलें ॥२॥ देव तेची असती संत । संत तेची देव साक्षात् । मला लोक म्हणतात । शिष्य गजाननाचा ॥३॥ माझें कांहीं महत्त्व नाहीं । तें अवघें तुझ्याठायीं । पुष्पामुळें किंमत येई । जगीं सूत्राकारणें ॥४॥ तूं पुष्प मी आहे सूत । तूं कस्तुरी मी माती सत्य । तुझ्यामुळें आलें येथ । संकट हें माझ्यावरी ॥५॥ आतां न माझा अंत पाही । गुरुराया ! धांव घेई । या वठलेल्या वृक्षाठायीं । आणि पर्णे कोमल ॥६॥ लोकांस म्हणे पीतांबर । करा सद्गुरूचा नामगजर । जय जय गजानन साधुवर । शेगांवच्या अवलिया ॥७॥ लोक अवघे गजर करती । तों पालवी फुटली वृक्षाप्रती । जन नयनीं पाहती । त्या अगाध कौतुकाला ॥८॥ कोणी म्हणती असेल स्वप्न । तें जें पडलें आपणांलागून । पहा चिमटा घेऊन । आपुल्याला करांनीं ॥९॥ चिमटे घेऊन पाहाती । तों निमाली स्वप्नभ्रांति । यावरी कोणी ऐसें म्हणती । ही नजरबंदी असेल ! ॥११०॥ गारुड्याच्या खेळांत । वाद्या होती सर्प सत्य । खापर्‍या असून दृष्टीप्रत । त्याचे रुपये दिसती कीं ॥११॥ तोही भ्रम निमाला । तोडून पहातां पर्णाला । फांदीवाटें तात्काळ आला । चीक शुभ्रसा बाहेर ॥१२॥ मग मात्र खात्री झाली । वाळल्या वृक्षा पालवी फुटली । श्रीगजानन माऊली । खरीच आहे महासंत ॥१३॥ आतां पितांबराविशीं । शंका न धरणें मानसीं । चला घेऊन गांवासी । हा त्यांचा शिष्य असे ॥१४॥ याच्यायोगें करून । कधीं तरी गजानन । येतील कोंडोलीकारण । वांसरासाठीं गाय जसी ॥१५॥ तें अवघ्यांस मानवले । पितांबरासी मिरवीत नेलें । ऐसें जेव्हां दिव्य झालें । तेव्हां भाव उदेला ॥१६॥ जैसा समर्थांनीं आपुला । शिष्य डोमगांवीं पाठविला । कल्याण नामें करून भला । कल्याण करण्या जगाचें ॥१७॥ तैसेंच केलें गुरुवरें । श्रीगजाननें साजिरें । उदेंलें हें भाग्य खरें । त्या कोंडोली गांवचें ॥१८॥ श्रोते अजूनपर्यंत । तो आंबा आहे कोंडोलीत । इतरांपेक्षां असंख्यांत । फळे येती तयाला ॥१९॥ त्या पितांबराचे भजनीं । कोंडोली गांव लागला जाणी । जेथें जाईल हिरकणी । तेथें ती मोल पावे ॥१२०॥

मठ पितांबराचा । कोंडोलींत झाला साचा । आणि अंतही तयाचा । ते ठायीं झाला हो ॥२१॥ आतां इकडे शेगांवांत । महाराज आपुल्या मठांत । एके दिनीं उद्विग्न चित्त । होऊनिया बैसले ॥२२॥ शिष्य त्याचें कारण । पुसूं लागले कर जोडून । महाराज आपुलें मन । कां हो अस्थिर जाहलें ? ॥२३॥ तैं महाराज वदले लोकांला । आमचा कृष्णा पाटील गेला । जो चिकणसुपारी आम्हांला । रोज आणून देत असे ॥२४॥ त्याची झाली आठवण । राम त्याचा मुलगा लहान । आतां सुपारी चिकण । कोण देतो या ठायां ? ॥२५॥ राम थोर झाल्यावरी । करील माझी चाकरी । म्हणून मी या मठांतरीं । आतां ना तयार राहावया ॥२६॥ ऐसें महाराज बोलतां । जनांलागीं लागली चिंता । महाराजांचा विचार आतां । दिसतो येथून जाण्याचा ॥२७॥ म्हणून कसेंही करून । जाऊं न द्यावें त्याकारण । चला आपण धरूं चरण । महाराजांचे येवेळां ॥२८॥ ऐसा विचार मिळून केला । मंडळी आली मठाला । श्रीपतराव बंकटलाला । ताराचंद मारुती ॥२९॥ मंडळींनीं धरिलें चरण । महाराज आम्हां सोडून । तुम्ही आपुलें ठिकाण । राहण्याचें अन्य करूं नये ॥१३०॥ तुमची इच्छा असेल जेथ । तेथेंच राहा शेगांवांत । परी सोडण्याचें मनांत । ग्राम हें आणूं नका ॥३१॥ तैं महाराजवाणी निघाली । तुमच्या गांवांत आहे दुफळी । मला कोणाची जागा मुळीं । नको येथें रहावया ॥३२॥ जी कोणाची नसेल । ऐसी जागा जरी द्याल । तरीच राहणें होईल । माझें या शेगांवीं ॥३३॥ ऐसी गोष्ट ऐकिली । तेव्हां मंडळीं चिंतावली । समर्थांनीं आज्ञा केली । मोठ्या पेंचाची आपणां ॥३४॥ कोणाच्या जागेंत । राहाण्या तयार नाहींत । सरकार यांच्या प्रीत्यर्थ । जागा ती देईल कशी ? ॥३५॥ भूषण आपल्या साधूचें । सरकारास नाहीं साचें । बंकटलाल बोलला वाचें । ऐसें संकट घालूं नका ॥३६॥ सरकार धार्मिक कृत्याला । जागा देईल हा न उरला । भरवंसा तो आम्हांला । हें राज्य परक्याचें ॥३७॥ म्हणून आम्हांपैकीं कोणाची । जागा घ्या मागून साची । आहे तयारी आमुची । ती तुम्हां द्यावयास ॥३८॥ समर्थें केलें भाषण । काय हें तुमचें अज्ञान । जमिनीची मालकी पूर्ण । आहे सच्चिदानंदाची ॥३९॥ राजे कित्येक भूमीवरी । आजवरी झाले तरी । जागा कशाची सरकारी । इचा मालक पांडुरंग ॥१४०॥ व्यवहारदृष्ट्या मालकपण । येतें राजालागून । त्याचें नाहीं भूषण । तुम्ही प्रयत्न करा जा ॥४१॥ जागा मिळेल प्रयत्न करितां । पुढें नका बोलूं आतां । हरी पाटलाच्या हातां । यश येईल निःसंशय ॥४२॥ हरी पाटलाकडे आली । मंडळी ती अवघी भली । त्याच्या सल्ल्यानें मागितली । जागा अर्ज करून ॥४३॥ बुलढाण्याचा सर्वाधिकारी । साहेब होता नामें ' करी ' । त्यानें एक एकर जागा खरी । अर्जावरून दिली असे ॥४४॥ आणि ऐसें म्हणाला । तुम्ही दोन एकरास्तव अर्ज केला । परी मी तुर्त तुम्हांला । एक एकर देतसे ॥४५॥ तुम्ही एक वर्षांत । जागा केल्या व्यवस्थित । तुमचा मी पुरवीन हेत । जागा आणिक देऊनिया ॥४६॥ तो ठराव सरकारचा । आहे दप्तरीं नमूद साचा । समर्थांच्या वाणीचा । प्रभाव खचित लोकोत्तर ॥४७॥ मग हरी पाटील बंकटलाला । निघते झाले वर्गणीला । द्रव्यनिधी क्षणांत जमला । आणि काम झाले सुरूं ॥४८॥ यापुढील अवघें वृत्त । येईल पुढल्या अध्यायांत । सत्पुरुषाचा पुरविण्या हेत । देव राहे तत्पर सदा ॥४९॥ विठू पाटील डोंगरगांवचा । लक्ष्मण पाटील वाडेगांवचा । जगु आबा शेगांवचा । हे पुढारी वर्गणीचे ॥१५०॥ श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ । ऐका श्रोते सावचित्त । निजकल्याण व्हावया ॥१५१॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ ॥ इति द्वादशोध्यायः समाप्तः ॥

अध्याय १३
 
॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे संतवरदा श्रीधरा । हे दयेच्या सागरा । हे गोपगोपीप्रियकरा । तमालनीळा पाव हरी ॥१॥ तुझें ईशत्व पाहण्याकरितां । जेव्हां झाला विधाता । गाई-वासरें चोरितां । यमुनातटीं गोकुळांत ॥२॥ तेव्हां तूं निजलीलेंकरुन । गाई वासरें होऊन । ब्रह्मदेवाकारण । आपलें ईशत्व दाविलें ॥३॥ दुष्ट ऐशा कालियाला । यमुनेमाजीं तुडवून भला । रमणकद्वीपा धाडिला । गोप निर्भय करण्यास ॥४॥ तेवीं माझ्या दुर्दैवा । तुडवूनी या वासुदेवा । दासगणू हा करावा । निर्भय सर्व बाजूंनीं ॥५॥ मी अजाणभक्त तुझा हरी । परी देवा कृपा करी । मी आहे अनाधिकारी । योग्य न तुझ्या कृपेस ॥६॥ ऐसें जरी आहे सत्य । परी नको पाहूंस अंत । माझी चिंता वार त्वरित । आपुल्या कृपाकटाक्षें ॥७॥ आतां श्रोते सावधान । बंकट, हरी, लक्ष्मण । विठू जगदेवादि मिळून । गेले वर्गणी जमवावया ॥८॥ भाविकांनीं वर्गणी दिली । कुत्सितांनीं कुटाळी केली । वर्गणीची कांहो पडली । जरुर तुमच्या साधूस्तव ॥९॥ गजानन म्हणतां महासंत । जें न घडे तें घडवीत । मग त्यांच्या मठाप्रत । वर्गणी ही कशाला ? ॥१०॥ कुबेर त्यांचा भंडारी । मग कशास फिरतां दारोदारीं ? । चिठ्ठी कुबेराच्यावरी । करा म्हणजे काम झालें ॥११॥ ऐसें ऐकतां भाषण । जगदेव बोलला हांसोन । या भिक्षेचें कारण । आहे तुमच्या बर्‍यासाठीं ॥१२॥ श्रीगजाननासाठीं । नको बांधणें मठ-मठीं । ह्या अवघ्या आटाआटी । तुमचें कल्याण व्हावयास ॥१३॥ स्वामी गजाननाचा । त्रैलोक्य हाचि मठ साचा । अवघीं वनें हा बगीचा । पलंग ज्यांचा मेदिनी ॥१४॥ अष्टसिद्धि दासीपरी । राबताती ज्याच्या घरीं । तो न तुमची पर्वा करी । त्याचें वैभव निराळें ॥१५॥ सविता सूर्यनारायण । त्यासी दीप कोठून । प्रकाश देऊं शकेल जाण । प्रतिकार करण्या तमाचा ॥१६॥ तो मुळींच प्रकाशमयी । त्याला दीपाचें काज नाहीं । हलकारा तो कोठून होई । सार्वभौमा भूषविता ? ॥१७॥ इच्छा ऐहिक वैभवाची । असते मानवांप्रति साची । ती आहे व्हावयाची । पूर्ण या पुण्यकृत्यानें ॥१८॥ रोग बरा करण्या भली । औषधाची योजना केली । प्राणासाठीं नसे झाली । ती हें ध्यानीं धरा हो ॥१९॥ रोग भय शरीरास । नाहीं मुळींच प्राणास । जन्ममरण हेंही त्यास । नाहीं मुळीं राहिले ॥२०॥ तैसी तुमची सुसंपन्नता । रक्षण व्हाया सर्वथा । पुण्यरुप औषधी आतां । मिळणें भाग आहे कीं ॥२१॥ संपन्नता हें शरीर । रोग त्याचें अनाचार । त्याचा नाश होणार । या पुण्यरुप औषधीनें ॥२२॥ म्हणून पुण्यसंचय करा । कुतर्क ना चित्तीं धरा । पुण्य मेदिनीमाजीं पेरा । करा आपुल्या संपत्तीचा ॥२३॥ वीज पेरितां खडकावर । तें वायां जातें साचार । त्यास कधीं ना येणार । मोड हें ध्यानीं धरावें ॥२४॥ अनाचार दुर्वासना । हे खडक असती जाणा । तेथें टाकिल्यावरी दाणा । तो किडे पांखरें भक्षिती ॥२५॥ संतसेवेसमान । कोणतें नाहीं पुण्य आन । स्वामी सांप्रत गजानन । मुगुटमणी संतांचे ॥२६॥ संतकार्यास कांहीं देतां । अगणित होतें सर्वथा । एक दाणा टाकितां । मेदिनीमाजीं कणीस होतें ॥२७॥ त्या कणसास दाणे येती । एकाचेच बहुत होती तीच पुण्याची आहे स्थिति । हें बुध हो विसरुं नका ॥२८॥ ऐसें बोलतां साचार । कुटाळ झालो निरुत्तर । खरें तत्त्व असल्यावर । कुंठित गती तर्काची ॥२९॥ नेता असल्या वजनदार । वर्गणी ती जमे फार । क्षुल्लकाच्यानें न होणार । कार्य कधीं वर्गणीचें ॥३०॥ असो मिळाल्या जागेवरी । कोट बांधिला सत्वरीं । झटूं लागले गांवकरी । मग वाण कशाची ? ॥३१॥ बांधकाम कोटाचें । चालतां शेगांवीं साचें । दगड चुना रेतीचें । सामान गाडया वाहती ॥३२॥ त्या वेळीं समर्थस्वारी । होती जुन्या मठावरी । त्यांनीं विचार अंतरीं । ऐशा रीतीं केला हो ॥३३॥ आपण येथें बसल्याविणें । काम न चाले झपाटयानें । म्हणून कौतुक समर्थानें । केलें कसें तें परियेसा ॥३४॥ एका रेतीच्या गाडीवरी । समर्थांची बसली स्वारी । तो गाडीवान झाला दूरी । महार होता म्हणून ॥३५॥ तयीं महाराज वदले तयास । कां रे खालीं उतरलास ? । आम्हां परमहंसास । विटाळाची बाधा नसे ॥३६॥ महार बोले त्यावरी । महाराज तुमच्या शेजारीं । मी न बसे गाडीवरी । तें आम्हां उचित नसे ॥३७॥ मारुती रामरुप झाला । परी रामासन्निध नाहीं बसला । तो उभाच पहा राहिला । कर जोडूनी रामापुढें ॥३८॥ बरें बापा तुझी मर्जी । त्यास हरकत नाहीं माझी । बैलांनों, नीट चला आजी । गाडीवाल्यामागून ॥३९॥ बैल तैसे वागले । नाहीं कशास बुजाले । गाडीवाल्यावांचून आले । नीट सांकेतिक स्थलास ॥४०॥ समर्थ खालीं उतरले । मध्यभागीं येऊन बसले । तेथेंच हल्लीं काम झालें । त्यांच्या भव्य समाधीचें ॥४१॥ ही जागा शेगांवांत । आहे दोन नंबरांत । त्रेचाळीस पंचेचाळीस । सातशें सर्व्हे नंबराच्या ॥४२॥ महाराज बसले ज्या ठिकाणीं । तीच यावी मेदिनी । मध्यभागा म्हणूनी । हें करणें भाग पडलें ॥४३॥ त्या दोन नंबरांतून । जागा थोडथोडी घेऊन । साधिला तो मध्य जाण । ऐसे चतुर कारभारी ॥४४॥ एक एकराचा हुकूम झाला । परी बांधकामाच्या वेळेला समाधिमध्य साधण्याला । जागा थोडी पडली कमी ॥४५॥ त्यासाठीं म्हणून । अकरा गुंठे जास्त जाण । जमीन ती घेऊन । बांधकाम चालविलें ॥४६॥ पुढार्‍यांच्या होतें मनीं । वचन दिलें अधिकार्‍यांनीं । आणिक एक एकर तुम्हांलागुनी । काम पाहून जागा देऊं ॥४७॥ यास्तव केलें धाडस । अकरा गुंठे घेण्यास । परी तें गेलें विकोपास । एका दुष्टाच्या बातमीमुळें ॥४८॥ यामुळें पुढारी । थोडे घाबरले अंतरीं । त्यांत जो पाटील होता हरी । तो बोलला समर्था ॥४९॥ अकरा गुंठे जागेचा । तपास करावया साचा । एक जोशी नांवाचा । आला असे अधिकारी ॥५०॥ हांसत हांसत पाटलाला । समर्थानें शब्द दिला । जागेबद्दल जो कां झाला । दंड तुम्हां तो माफ होईल ॥५१॥ त्या अधिकारी जोशाप्रती । समर्थानें दिली स्फूर्ती । चाललेल्या प्रकरणावरती । शेरा त्यांनीं मारिला ॥५२॥ कीं हा दंड झालेला । विनाकारण आहे भला । दंड गजानन संस्थेला । परत द्यावा म्हणून ॥५३॥ मी करुन आलों चौकशी । जाऊन त्या शेगांवासी । या घडलेल्या प्रकारासी । दंड होणें उचित नाहीं ॥५४॥ म्हणून तो माफ केला । ऐसा हुकूम जेव्हां आला । तैं हरी पाटलाला । आनंद झाला विशेष ॥५५॥ तो म्हणे समर्थांचें । वाक्य ना खोटें व्हावयाचें । मजवरी किटाळ महाराचें । येऊन गेलें नुकतें एक ॥५६॥ त्या वेळीं महाराजांनीं । भिऊं नकोस म्हणोनी । तुझ्या एकाही केसालागुनी । धक्का न त्याचा बसेल ॥५७॥ तेंच खरें अखेर । घडून आलें साचार । तैसाच हाही प्रकार । आज दिनीं झालासे ॥५८॥ समर्थवाक्य खोटें झालें । ऐसें कोणी न कधीं ऐकिलें । असो शेगांवाचे लागले । लोक भजनीं स्वामींच्या ॥५९॥ आतां नव्या जागेंत आल्यावर । जे कांहीं घडले प्रकार । म्हणजे समर्थांचे चमत्कार । ते आतां वर्णितों ॥६०॥ मेहेरकरच्या सान्निध्याला । सवडद नामें ग्राम भला । त्या गांवींचा एक आला । गंगाभारती गोसावी ॥६१॥ यास होता महारोग । कुजून गेलें अवघें अंग । उरली न पडल्यावांचून भेग । जागा दोन्ही पायांला ॥६२॥ करपद बोटें झडून गेलीं । तनूप्रती चढली लाली । कानाच्या सुजल्या पाळी । कंडू सुटला तनूतें ॥६३॥ म्हणून गंगाभारती । त्या महारोगा त्रासला अती । समर्थांची ऐकोन कीर्ति । शेगांवासी पातला ॥६४॥ श्रोते त्या गोसाव्याप्रत । लोक आडवूं लागले बहुत । तुला रक्तपिति आहे सत्य । तूं न जावें दर्शना ॥६५॥ महाराज दिसतील ऐशा ठायीं । उभा राहून दर्शन घेई । कधींही ना जवळ जाई । त्यांचे चरण धरावया ॥६६॥ हा स्पर्शजन्य रोग फार । म्हणून वैद्य डाँक्‍टर । सांगती याचा विचार । तूं आपल्या मनीं करी ॥६७॥ परी एके दिनीं गंगाभारती । चुकवून अवघ्या लोकांप्रती । येता झाला सत्वर गतीं । प्रत्यक्ष दर्शन घ्यावया ॥६८॥ डोई ठेवितां पायावर समर्थांनीं चापट थोर । मारिली त्याच्या डोक्यावर ।अति जोरानें विबुध हो ॥६९॥ म्हणून तो उभा ठेला । समर्थास न्याहाळूं लागला । स्वामींनीं त्याचे थोबाडाला । दोन्ही करें ताडिलें ॥७०॥ फडाफड मारिल्या मुखांत । आणिक वरती एक लाथ । खाकरोनी बेडक्याप्रत । थुंकले त्याच्या तनूवरी ॥७१॥ तोच त्यांनीं मानिला । समर्थांचा प्रसाद भला । बेडका होता जो कां पडला । तयाचीया अंगावर ॥७२॥ तो त्यानें घेऊन करीं । चोळून अवघ्या शरीरीं । लाविता झाला मलमापरी । आपुल्या सर्व अंगास ॥७३॥ तो प्रकार पाहतां । एक कुटाळ तेथें होता । तो गोसाव्यासी बोलतां । झाला पहा येणें रीति ॥७४॥ आधींच शरीर नासलें । तुझें आहे बापा भलें । त्यावरी यांनीं टाकिलें । या अमंगळ बेडक्यातें ॥७५॥ तो तूं प्रसाद मानिला । अवघ्या अंगातें चोळिला । जा लावून साबणाला । धुऊन टाकी सत्वर ॥७६॥ हे ऐसे वेडेपीर । विचरुं लागतां भूमीवर । त्यांशीं अंधश्रद्धेचे नर । साधु ऐसें मानिती ! ॥७७॥ त्याचा परिणाम ऐसा होतो । अविधि कृत्यांस ऊत येतो । तो येतां सहज जातो । समाज तो रसातळां ॥७८॥ यासी तुझेंच उदाहरण । तूं औषध घेण्याचें सोडून । आलास कीं रे धांवून । या वेडयापिशापाशीं ॥७९॥ गोसावी तें ऐकतां । हंसूं लागला सर्वथा । म्हणे तुम्ही येथेंच चुकतां । याचा करा विचार ॥८०॥ अमंगळ साधूपाशीं । कांहीं न राहतें निश्चयेंसी । कस्तुरीच्या पोटाशीं । दुर्गंधी ना वसे कदा ॥८१॥ तुम्हां दिसला बेडका । तो हा प्रत्यक्ष मलम देखा । कस्तुरीच्या सारखा । सुवास येतो यालागीं ॥८२॥ तुम्हां संशय असल्यास । पहा माझ्या अंगास । हात लावूनिया खास । म्हणजे कळून येईल कीं ॥८३॥ त्यांत थुंक्याचें नांव नाहीं । अवघी औषधी आहे पाही । मी इतुका वेडा नाहीं । बेडक्यास मलम मानणारा ॥८४॥ तुझा त्याशीं संबंध नव्हता । म्हणून बेडका दिसला तत्त्वतां । समर्थांची योग्यता । त्वां न मुळीं जाणिली ॥८५॥ त्याचें पहाण्या प्रत्यंतर । चाल जाऊं एकवार । स्नान केलेल्या जागेवर । वेळ आतां करुं नको ॥८६॥ समर्थ स्नान प्रतिदिवशीं । करतील ज्या जागेसी । थल्या ओल्या मातीसी । मी लावितों निजांगा ॥८७॥ ऐसा संवाद तेथें झाला । दोघे गेले स्नानस्थला । तो कुटाळासी आला । अनुभव गोसाव्यापरीच ॥८८॥ मृत्तिका स्नानस्थलाची । दोघांनींही घेतली साची । तों गोसाव्याच्या हातींची । बसली औषधी होऊन ! ॥८९॥ कुटाळाच्या हातांत । ओलीच माती आली खचित ! । दुर्गंधीही किंचित्‌ । येत होती तियेला ॥९०॥ तो प्रकार पाहतांक्षणीं । कुटाळ घोटाळला मनीं । कुत्सित कल्पना सोडूनी । शरण गेला समर्था ॥९१॥ असो कोणी गोसाव्यातें । जवळ बसूं देत नव्हतें । हा दूर बसून भजनातें । करी स्वामीपुढें नित्य ॥९२॥ आवाज गंगाभारतीचा । पहाडी गोड मधुर साचा । अभ्यास होता गायनाचा । त्या गंगाभारतीला ॥९३॥ ऐसे पंधरा दिवस गेले । रोगाचें स्वरुप पालटलें । लालीनें तें सोडिलें । जयाचिया अंगाला ॥९४॥ चाफे झाले पूर्ववत्‌ । भेगा पदींच्या निमाल्या समस्त । दुर्गंधीचा मोडला त्वरित । ठाव त्याचा श्रोते हो ॥९५॥

गोसाव्याचें ऐकून भजन । होई संतुष्ट समर्थमन । प्रत्येक जिवाकारण । गायन हें आवडतें ॥९६॥ बायको गंगाभारतीची । अनुसूया नांवाची । ती शेगांवीं आली साची । न्याया निज पतीला ॥९७॥ संतोषभारती कुमार । होता तिच्याबरोबर । येऊन पतीस जोडिले कर । चला आतां गांवातें ॥९८॥ तुमची व्याधी बरी झाली । ती मीं दृष्टीं पाहिली । समर्थ साक्षात्‌ चंद्रमौळी । आहेत हेंच खरें असें ॥९९॥ मुलगा तेंच बोलला । म्हणे बापा गांवीं चला । पुसून गजानन महाराजाला । येथें राहणें पुरें झालें ॥१००॥ गंगाभारती म्हणे त्यावर । मला नका जोडूं कर । आजपासून साचार । मी तुमचा खचित नाहीं ॥१॥ ही अनाथाची माउली । स्वामी गजानन येथे बसली । त्यानें माझी उतरली । धुंदी चापट मारुन ॥२॥ राख लाविली अंगाप्रत । आणि चित्त तुझें संसारांत । केलीस विटंबना बहुत । या भगव्या वस्त्राची ॥३॥ ऐसें संकेतें बोलले । थापटया मारुन जागें केलें । आतां डोळे उघडिले । संसाराचा संबंध नको ॥४॥ हे संतोषभारती कुमारा । तूं तुझ्या आईस नेईं घरा । येथें नकोस राहूं जरा । सवडद जवळ करावें ॥५॥ हिचें जीवमान जोंवरी । तोंवरी हिची सेवा करी । ही तुझी माय खरी । हिला अंतर देऊं नको ॥६॥ मातोश्रीची करितां सेवा । तो प्रिय होतो वासुदेवा । पुंडलिकाचा ठेवावा । इतिहास तो डोळ्यांपुढें ॥७॥ मी येतां सवडदांत । पुन्हां रोग होईल पूर्ववत्‌ । म्हणून त्या आग्रहांत । तुम्हीं न पडावें दोघांनीं ॥८॥ आजवरी तुमचा होतों । आतां देवाकडे जातों । नरजन्माचा करुन घेतों । कांहीं तरी उपयोग ॥९॥ हा वायां गेल्या खरा । नराचा जन्म साजिरा । चुकेल चौर्‍यांशींचा फेरा । ऐसें साच सांगितलें ॥११०॥ समर्थकृपेनें निश्चिती । झाली मलाही उपरती । या परमार्थखिरींत माती । टाकूं नका रे मोहाची ॥११॥ ऐसें सांगून कुटुंबाला । मुलांसह सवडदाला । दिले धाडून राहिला । आपण तसाच शेगांवीं ॥१२॥ पदपदांतरें समर्थांचीं । आवडीनें म्हणावीं साची । त्यास कला गायनाची। येत होती विबुध हो ॥१३॥ प्रत्यहीं तो अस्तमाना । एकतारा घेऊन जाणा । समर्थांच्या सन्निधाना । बैसून भजन करीतसे ॥१४॥ ऐकून त्याचें भजन । इतरांचेंही हर्षें मन । वस्तु अशीच आहे गान । रंजविणारी सर्वांतें ॥१५॥ हा गंगाभारती बरा झाला । रोगाचा पत्ता मोडला । मलकापुरास पुढें गेला । गजाननाच्या आज्ञेनें ॥१६॥ असो एकदां पौषमासीं । झ्यामसिंग आला शेगांवासी । बोलतां झाला समर्थांसी । माझ्या गांवास चला हो ॥१७॥ मम भाच्याच्या गृहाला । अडगांवीं नेण्याला । मी आलों होतों आपणांला । तयीं आपुला करार ॥१८॥ ऐसा होता समर्था । मी नाहीं येत आतां । नको करुं आग्रह वृथा । पुढें मागें येईन ॥१९॥ त्याला दिवस झाले बहुत । आतां चला मुंडगांवांत । मी आहें आपुला भक्त । माझी इच्छा पूर्ण करा ॥१२०॥ मुडंगांवात माझे घरीं । कांहीं दिवस राहा तरी । मी अवघी करुन तयारी । न्याया आलों आपणा ॥२१॥ झ्यामसिंगाबरोबर । मुंडगांवीं आले साधुवर । दर्शना लोटले नारीनर । तो न आनंद वर्णवे ॥२२॥ झ्यामसिंगानें भंडारा । घातिला असे थोर खरा । मुंडगांव झालें गोदातीरा । दुसरें कीं हो पैठण ॥२३॥ पैठणामाजी एकनाथ । मुंडगांवीं गजानन संत । भजनी दिंडया अमित । आल्या भजन करावया ॥२४॥ आचारी लागले स्वैपांका । अर्धा स्वैंपाक झाला निका । तैं महाराज बोलले देखा । ऐसें झ्यामसिंगासी ॥२५॥ झ्यामसिंगा, आज चतुर्दशी । मुळींच आहे रिक्त तिथी । भोजनाच्या पंक्ती । पौर्णिमेला होऊं दे ॥२६॥ झ्यामसिंग बोलला यावर । स्वयंपाक झाला तयार । लोक जमले आहेत फार । आपला प्रसाद घ्यावया ॥२७॥ स्वामींनीं केलें बोलणें । तुझें व्यवहार दृष्टीनें । योग्यपरी हें न माने । त्या जगदीश्वराला ॥२८॥ झ्यामसिंगा, हें अन्न । न येईल उपयोगाकारण । तुम्हां प्रापंचिकालागून । आपलेंच व्हावें वाटतें ॥२९॥ पंक्ती बसल्या भोजना । तों एका एकी आकाश जाणा । भरुन आलें गर्जना । होऊं लागली मेघाची ॥१३०॥ चमके वीज माथ्यावरी । झंझावात सुटला भारी । कडकडा ती कांतारीं । लागलीं झाडें मोडावया ॥३१॥ घटकेंत पाणी पाणी झालें । अन्न अवघें वाया गेलें । मग झ्यामसिंगानें विनविलें । महाराजास येणें रीतीं ॥३२॥ आतां महाराज उद्यां तरी । मुळीं न व्हावें आजच्या परी । हिरमुष्टी होऊन बसली खरी । अवघी मंडळी गुरुराया ॥३३॥ निवाराया पर्जन्याला । हा नव्हे पावसाळा । आगांतुक बेटा आला । आमचा नाश करावया ॥३४॥ आतां पाऊस पडेल । तरी शेतीचें होईल । वाटोळें तें पाहा सकळ । मग म्हणतील लोक ऐसें ॥३५॥ झ्यामसिंगे केलें पुण्य । हा भंडारा घालून । तें भोंवलें आम्हांलागून । वा खूप तर्‍हा पुण्याची ॥३६॥ तैं महाराज म्हणाले झ्यामसिंगा ! । ऐसा सचिंत होसी कां गा । तुला न उद्यां देईल दगा । हा पर्जन्य कधींही ॥३७॥ आतांच मी वारितों त्यासी । ऐसें बोलोन आकाशासी । पाहूं लागला पुण्यराशी । तों आभाळ फांकलें ॥३८॥ मेघ क्षणांत निघून गेले । सर्व ठायीं ऊन पडलें । हें एका क्षणांत झालें । अगाध सत्ता संताची ॥३९॥ दुसरें दिवशीं पौर्णिमेला । थोर भंडारा पुन्हां झाला । तो नियम चालला । अजून या मुंडगांवीं ॥१४०॥ झ्यामसिंगानें आपुली । इस्टेट सर्व अर्पण केली । महाराजांचे चरणीं भली । त्या मुंडगांव ग्रामांत ॥४१॥ लोक त्या मुंडगांवांत । समर्थाचे झाले भक्त । पुंडलीक भोकरे म्हणूनी त्यांत । एक जवान पोर्‍या असे ॥४२॥ हा उकिरडया नामक कुणब्याचा । पुत्र एकुलता एक साचा । भक्त झाला महाराजांचा । ऐन तारुण्यामाझारीं ॥४३॥ हें उकीर्डा नाम वर्‍हाडांत । पोर नसल्या वांचत । लोक नवसें ठेवितात । ऐसा प्रघात त्या प्रांतीं ॥४४॥ तें पेंटय्या तेलंगणांत । केर पुंजा महाराष्ट्रांत । तैसा उकीर्डा वर्‍हाडांत । नांव ठेविती बालकाचें ॥४५॥ हा पुंडलिक वद्य पक्षासी । करावया वारीसी । येत नियमें शेगांवासी । घ्याया दर्शन समर्थांचें ॥४६॥ जैसें कां ते वारकरी । वद्यपक्षामाझारीं । जाती इंद्रायणीचे तीरीं । देहू आळंदी गांवाला ॥४७॥ तैसाच हा वर्‍हाडांत । वारी वद्यपक्षांत । करी येऊन शेगांवांत । परम भावभक्तीनें ॥४८॥ असो एकदां वर्‍हाडांत । रोग ग्रंथिक सन्निपात । बळावला अत्यंत । गांव बाहेर पडलें कीं ॥४९॥ या तापांत ऐसें होतें । प्रथमतां थंडी वाजते । अंग ज्वरानें तप्त होतें । डोळे होती लाल बहु ॥१५०॥ आणि कोठें तरी सांध्यावर । ग्रंथि उठे सत्वर । ती होतां करी जोर । वात तिच्या मागुनी ॥५१॥ मग रोगी बरळतसे । शुद्धि न कांहीं राहातसे । तलखी अंगाची होत असे । बेशुद्ध होई क्षणक्षणां ॥५२॥ पूर्वीं हा रोग विपरीत । नव्हता भरतखंडांत । त्याचा वास युरोपांत । होता मोठया प्रमाणीं ॥५३॥ ती सांथ इकडे आली । गांवोगांव पसरली । त्याच्या प्रतिकारा सोडून दिलीं । लोकांनीं तीं घरेंदारें ॥५४॥ त्या दुर्धर सांथीची स्वारी । आली पाहा मुंडगांवावरी। तों पुंडलिकाची आली वारी । शेगांवास निघाला ॥५५॥ कसकस त्याला घरींच आली । परी ती त्यानें चोरिली । शेगांवाची वाट धरली । आपुल्या पित्यासमवेत ॥५६॥ येतां पांच कोसांवर । शरीरासी भरला ज्वर । एक पाऊल भूमीवर । तयाच्यानें टाकवेना ॥५७॥ गांठ उठली बगलेंत । हैराण झाला रस्त्यांत । ऐसें पाहून पुसे तात । कां रे पुंडलिका ऐसें करिशी ? ॥५८॥ पुंडलिक म्हणे बापाला । बाबा मशीं ताप आला । गोळा एक कांखेला । उठला आहे येधवां ॥५९॥ शक्ति सारी क्षीण झाली । आतां मशीं न चालवे मुळीं । काय करुं ही राहिली । वारी हायरे दुर्दैवा ॥१६०॥ हे स्वामी दयाघना ! । वारीस खंड पाडी ना । दाव तुझ्या दिव्य चरणा । भक्त वत्सला कृपानिधी ॥६१॥ वारी सांग झाल्यावर । मग येऊं दे खुशाल ज्वर । जरी सांडलें शरीर । तरी न त्याची पर्वा मला ॥६२॥ माझा पुण्यठेवा हीच वारी । ती रक्षण आतां करी । ही सांथ झाली वैरी । नाश तिचा करावयातें ॥६३॥ शरीरसामर्थ्य जोंवर । परमार्थ घडे तोंवर । बापही झाला चिंतातुर । ती मुलाची पाहून स्थिति ॥६४॥ तोही रडूं लागला । हा एकुलता एक पुत्र मला । देवा न दिवा नेईं भला । हा माझ्या वंशाचा ॥६५॥ उकिर्डा म्हणे पुत्रास । गाडीघोडे बसावयास । आणूं का या समयास । तुला बाळा बसावया ॥६६॥ पुंडलीक वदे तयावरी । झाली पाहिजे पायींच वारी। उठत बसत कसें तरी । जाऊं चला शेगांवा ॥६७॥ मध्येंच मृत्यु आल्यास । शव तरी ने शेगांवास । नको करुं शोकास । हेंच आतां सांगणें ॥६८॥ बसत उठत पुंडलिक आला । अति कष्टें शेगांवाला । पाहून स्वामी समर्थाला । घातलें त्यानें दंडवत ॥६९॥ तों समर्थांनीं माव केली । एका हातानें दाबिली । कांख त्यांनींच आपुली । अति जोर करोनिया ॥१७०॥ आणि केलें मधुरोत्तर । पुंडलिका, तुझें गंडांतर | टळलें आतां तिळभर । चिंता त्याची करुं नको ॥७१॥ तैसें महाराज वदतां क्षणीं । पुंडलिकाची गांठ जाणी । गेली जागच्या जागीं जिरोनी । ताप तोही उतरला ॥७२॥ कंप अशक्‍ततेनें । राहिला देहाकारणें । करीं पुंडलिकाच्या मातेनें । आणिला नैवेद्य वाढून ॥७३॥ घांस त्या नैवेद्याचे । समर्थें घेतां दोन साचें । कांपरें तें पुंडलिकाचें । गेलें बंद होवोनिया ॥७४॥ पुंडलिक झाला पूर्ववत् । अशक्‍तता राहिली किंचित् । हें गुरुभक्‍तीचें फळ सत्य । उघडा डोळे अंधांनो ! ॥७५॥ गुरु योग्य असल्यावरी । वायां न जाई सेवा खरी । कामधेनु असल्या घरीं । कां न इच्छा पुरतील ? ॥७६॥ सांग करुन वारीला । पुंडलिक गेला मुंडगांवाला । हें जो चरित्र वाची भला । त्याचें टळेल गंडांतर ॥७७॥ संतचरित्र ना कहाणी । अनुभवाची खाण जाणी । मात्र अविश्वास मनीं । संतकथेचा न यावा हो ॥७८॥ श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ । सुखद होवो भाविकांप्रत । हेंच देवा मागणें ॥१७९॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ ॥ इति त्रयोदशोऽध्यायः समाप्तः ॥

अध्याय १४
 
॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे कौसल्यात्मज रामराया । हे रघुकुलभूषणा करुणालया । सीतापते करा दया । आतां या लेंकरासी ॥१॥ ताटिका त्वां उध्दरली । अहिल्या शिळा सजीव केली । शबरीची पुरवली । इच्छा तूं दशरथे ॥२॥ भक्तरक्षणा कारण । सोडिलें नृपसिंहासन । वानर केलेसे बलवान् । केवळ आपल्या कृपेनें ॥३॥ शिळा तरल्या सागरीम । तुझ्या नामें रावणारी । बसविलास गादीवरी । भक्त आपला बिभीषण ॥४॥ जो जो आला शरण पदा । तुझ्या कीं हे आनंदकंदा । दैन्य, दुःख, आपदा । त्याच्या त्वां वारिल्यास ॥५॥ हें मनीं आणावें । दासगणूस सांभाळावें । बालकानें धांवावें । जननिविण कोणाकडे ? ॥६॥ तूं जननी जनिता सद्गुरु । तूं भक्तांना कल्पतरु । भवनदीचें भव्य तारूं । तूंच कीं रे रामराया ! ॥७॥ एक खेडेगांवचा । रहिवासी मेहकर तालुक्याचा । बंडूतात्या नांवाचा । ब्राह्मण होता विबुध हो ॥८॥ हा बंडूतात्या ब्राह्मण । सदाचारसंपन्न उदार होतें ज्याचें मन । गृहस्थाश्रम चालवी ॥९॥ श्रोते या प्रपंचांत । संकटें येती अतोनात । परी नाहीं पहा सुटत । लोभ त्याचा मानवा ॥१०॥ या बंडूतात्या घरीं । पाहुणे येती वरच्यावरी । तो अवघ्यांची साच करी । सरबराई निजांगें ॥११॥ ऐसा क्रम चालला । संचय अवघा संपला । आली पाळी बिचार्‍याला । कर्ज काढणें साहूचें ॥१२॥ घरदार पडलें गहाण । अगणित झालें तया ऋण । लोकांप्रती दावण्या वदन । लाज वाटूं लागली ॥१३॥ विकावया न कांहीं उरलें । सदन अवघें साफ झालें । भांडेंकुंडें तेंही गेलें । काय विपत्ती वर्णावी ? ॥१४॥ तगादे करिती सावकार । शिपाई धाडून वरच्यावर । भागवण्यासी दोन प्रहर । अडचण पडूं लागली ॥१५॥ कांता बोले टाकून । मुलें करिती अपमान । पत गेली उडून । उसनें न कोणी देती हो ॥१६॥ ऐशा तापें तापला । जीव द्याया तयार झाला । पैसा संपतां प्रपंचाला । कांहीं नसे किंमत ॥१७॥ जें सुखाचें वाटे स्थान । तेंच दुःखाचें निकेतन । संपून गेल्यावरी धन । सहज होतें न्याय हा ॥१८॥ बंडूतात्या विचार करी । जीव कोठें देऊं तरी । अफू खाऊन मरूं जरी । तरी ती घ्याया पैसा नसे ॥१९॥ जरी जाऊन विहिरीवरी । जीव हा मी देऊं तरी । तितुक्यांत कोणी येऊन वरी । जरी मला काढल्यास ॥२०॥ जीवही ना जाईल । उलटी फजीती होईल । सरकार शिक्षा देईल । आत्महत्यारा म्हणून मला ॥२१॥ यापेक्षां हिमालया । जावे वाटे जीव द्याया । आत्महत्येचा ते ठायां । दोषही ना लागेल ॥२२॥ ऐसा करूनि विचार । पडला घराच्या बाहेर । अखेरचा तो नमस्कार । केला त्यानें प्रपंचाला ॥२३॥ एक लंगोटी घातली । राख अंगा लाविली । तयानें ही युक्ति केली । ओळख आपुली बुजवावया ॥२४॥ श्रोते अब्रुदारासी । जननिंदेचें मानसीं । भय वाटे अहर्निशीं । हें सकळांसी ठाऊक ॥२५॥ बंडूतात्या म्हणे मनीं । हे दीनदयाळा चक्रपाणी । अवकृपा मजलागोनी । कां रे ऐसी केलीस ? ॥२६॥ तुझ्यावरी विश्वास माझा । पूर्ण होता अधोक्षजा । तूं रंकाचा करिसी राजा । ऐसें ऐकिलें पुराणीं ॥२७॥ तें सर्व खोटें झालें । प्रत्ययासी माझ्या आलें । व्यर्थ कवींनी रंगविलें । चरित्र तुझें नारायणा ॥२८॥ आतां जीव देतों परी । तुझ्यावरी मी श्रीहरी । याचा विचार कांहीं करी । हत्या नको घेऊं मम ॥२९॥ ऐसें मनीं बोलला । तिकिट घ्याया लागला । तों एक भेटला । विप्र त्यासी स्टेशनांत ॥३०॥ आतांच हरिद्वाराचें । तिकीट नको घेऊं साचें । घेऊन दर्शन संतांचें । मग जावें हरिद्वारा ॥३१॥ आपल्या वर्‍हाड प्रातांत । श्रीगजानन महासंत । आहेत अवतरले सांप्रत । त्यांच्या दर्शना जाय तूं ॥३२॥ संतदर्शन आजवरी । वायां न गेलें भूमीवरी । उगीच त्रासून अंतरीं । भलतें कांहीं करूं नको ॥३३॥ ऐसें बोलतां ब्राह्मण । तात्या गेला गोंधळून । म्हणे हा मनुष्य कोण ? । अवचित मसी भेटला ॥३४॥ किंवा यानें ओळखिलें । मी बंडूतात्या म्हणून भलें । कांहीं न माझा तर्क चाले । पुसुं तरी याते कसा ? ॥३५॥ कांहीं असो शेगांवासी । जाऊन वंदूं समर्थांसी । ऐसें बोलून मानसीं । शेगांवासी पातला ॥३६॥ दर्शना गेला ब्राह्मण । तों महाराज वदले हांसून । कां रे देशी जाऊन प्राण । हिमालयासी बंडूतात्या ॥३७॥ अरे आत्महत्या करूं नये । हताश कदापि होऊं नये । प्रयत्न करण्या चुकूं नये । साध्य वस्तु साधण्यास ॥३८॥ आतां जरी दिलास प्राण । प्रपंचाशीं त्रासून । तरी येशील घेऊन । जन्म पुन्हां ते भोगावया ॥३९॥ नको जाऊं हिमालया । गंगेमाजी प्राण द्याया । परत आपुल्या घरीं जाया । वेळ वेड्या करूं नको ॥४०॥ तिकीट घेतां जो भेटला । स्टेशनावरी ब्राह्मण तुला । ओळखिलें का सांग त्याला ? । तो कोण होता हें कांहीं ॥४१॥ जा आतां घरीं परत । राहूं नको लवही येथ । बापा तुझ्या मळ्यांत । आहे एक म्हसोबा ॥४२॥ त्या म्हसोबाच्या पूर्वेसी । बाभुळीच्या झाडापासी । खोदून पहा मेदिनीसी । दोन प्रहर रात्रीला ॥४३॥ काम जमीन खोदण्याचें । तूंच एकटा करी साचें । खालीं तीन फुटांचें । द्रव्य तुजला सांपडेल ॥४४॥ त्यांतून थोडें कर्जदारां । देऊनी ऋणमुक्त होई खरा । नको सोडूंस बायकापोरां । उसनें वैराग्य वाहूं नको ॥४५॥ ऐसे बोलतां गजानन । आनंदला तो ब्राह्मण । आला खर्ड्यास परतून । राख पुसून अंगाची ॥४६॥ रात्रीचिया वेळेला । मळ्यांत म्हसोबापासी आला । बाभूळीखालीं लागला । जमीन खोदाया कारण ॥४७॥ तों तीन फुटांवर । लागली श्रोते घागर । एक तांब्याची साचार । वेळणी होती जिच्या मुखा ॥४८॥ त्या तांब्याच्या घागरींत । मोहरा सोन्याच्या चार शत । पडल्या त्याच्या दृष्टीप्रत । मग काय विचारितां ? ॥४९॥ करीं घागर घेऊनिया । लागला तेथेंच नाचावया । जय जय गजानन गुरुराया । ऐसें मुखें बोलून ॥५०॥ त्याच द्रव्यें करून । फेडिलें त्यानें अवघें ऋण । मळा होता पडला गहाण । तोही आणिला सोडवोनी ॥५१॥ घडी बसली प्रपंचाची । ही गजाननकृपेनें साची । वृत्ति बंडूतात्याची । गेली अती आनंदून ॥५२॥ जेवीं मृत्यूची घटकां भरतां । अमृतकलश यावा हातां । वा सागरामाजीं बुडतां । तारूं दृष्टीस पडावें ॥५३॥ बंडूतात्यास तैसें झालें । दुःखाचे ते दिवस सरले । मग त्यानें पुढें केलें । येणें पहा शेगांवा ॥५४॥ दानधर्म तेथें केला । मोठ्या प्रमाणामाजीं भला । गजाननाच्या पदीं झाला । लीन अनन्यभावानें ॥५५॥ तई महाराज वदले त्यासी । आम्हांस कां रे वंदिसी ? । ज्यानें दिला आहे तुसी । द्रव्यघट तो वंदी तया ॥५६॥ आतां तरी येथून । खर्च करावा सांभाळून । उगे न करी उधळेंपण । त्यांत नसे सार कांहीं ॥५७॥ जन सुखाचे सोबती । निर्वाणीचा श्रीपती । त्याची सदैव करी भक्ती । तो न उपेक्षी कदा तुला ॥५८॥ ऐसा उपदेश ऐकिला । समर्थांसी वंदून भला । बंडूतात्या गांवास गेला । आपुल्या अती आनंदें ॥५९॥ एकेकालीं सोमवती । पर्व आले निश्चिती । जी कां अमावस्या येती । सोमवारीं ती सोमवती हो ॥६०॥ या सोमवतीचें महिमान । पुराणांत केलें कथन । या दिवशीं नर्मदास्नान । अवश्य म्हणती करावें ॥६१॥ म्हणून शेगांवची मंडळी । नर्मदेस जाया तयार झाली । तयारी त्यांनीं अवघी केली । पडशा वगैरे भरून ॥६२॥ मार्तंड पाटील बंकटलाल । मारुती चंद्रभान बजरंगलाल । यांनीं केला एक मेळ । ओंकारेश्वरीं जाण्याचा ॥६३॥ बंकटलाल म्हणे अवघ्यांसी । आपण जातों नर्मदेसी । घेऊं सांगातें महाराजांसी । स्नान कराया नर्मदेचें ॥६४॥ चौघे मठामाजीं आले । समर्थां विनवूं लागले । ओंकारेश्वरीं गुरुमाऊले । चला आमुच्या समवेत ॥६५॥ तुम्ही असल्याबरोबर । काळाचाही नाहीं दर । घाला आम्हांस पायांवर । त्या ओंकारेश्वराच्या ॥६६॥ हा अधिकार मातेविना । नाहीं पाहा इतरांना । आमुची विनंती हीच चरणा । न्यावें आम्हा नर्मदेसी ॥६७॥ तुम्ही आल्यांवांचून । आम्ही न हालूं येथून । बालहट्टालागून । जननी तीच पुरवीतसे ॥६८॥ महाराज म्हणाले तयासी । आहे नर्मदा माझ्यापाशीं । उगीच त्रास द्यायासी । जाऊं कशाला तिला मग ? ॥६९॥ मी या मठांत बैसुन । करीन नर्मदेचें स्नान । तुम्ही या सारे जाऊन । श्रीओंकारेश्वराला ॥७०॥ तेथें राजा पूर्वकालीं । मान्धाता भाग्यशाली । होऊन गेला महाबली । दिगंत ज्याची कीर्ति असे ॥७१॥ श्रीशंकराचार्य गुरुवर । यांनीं कराया जगदोध्दार । तेथेंच दीक्षा साचार । परमहंसाची घेतली ॥७२॥ जा जा तुम्ही तया स्थला । भेटा माझ्या नर्मदेला । मात्र नेऊं नका मला । उगाच आग्रह करून ॥७३॥ आतां पर्वाचें प्रयोजन । नाहीं राहिलें मजलागून । ऐसें ऐकतां चवघेजण । घट्ट धरिती पायांला ॥७४॥ कांही असो तेथवरी । चला आमुच्या बरोबरी । लगेच येऊं माघारी । स्नान करूनी नर्मदेचें ॥७५॥ महाराज म्हणाले ठिक ठिक । तुम्हीं दिसतां दांभिक । नर्मदेचें आहे उदक । या आपुल्या विहिरीमध्यें ॥७६॥ तिला टाकून आपण । तेथें कराया गेलों स्नान । तरी राग येईल दारुण । माझ्या त्या नर्मदेला ॥७७॥ म्हणून सांगतों तुम्हींच जावें । मला न आग्रहा करावें । माझें वचन मानावें । यांत तुमचें कल्याण ॥७८॥ मग मारुती चंद्रभान । करूं लागला भाषण । आम्ही घेतल्यावांचुन । आपणां न जाऊं कीं ॥७९॥ समर्थ म्हणाले मी तेथ । आल्य होईल विपरीत । मग तुम्ही दोष मात्र । देऊं नये आम्हांला ॥८०॥ ऐसें मठांत बोलणें झालें । अवघें ओंकारेश्वरा आले । पर्वासाठीं मिळाले । लोक तेथें अपार ॥८१॥ नर्मदेचे अवघे घाट । स्त्रीपुरुषांनी भरले दाट । मुंगीलाही नसे वाट । जाया हराच्या मंदिरीं ॥८२॥ कोणी स्नानास उतरले । कोणी संकल्प ऐकूं लागले । कोणी घेऊन बेलफुलें । जाऊं लागले मंदिरांत ॥८३॥ कोणी बर्फी पेढे खवा । बसून खाऊं लागले मेवा । थव्यामागें लागला थवा । तेथें भजनकर्‍यांचा ॥८४॥ पर्व संपेपर्यंत । अभिषेकाची मंदिरांत । गर्दी झाली अत्यंत । शब्द कोणाचा कोणा न कळे ॥८५॥ रम्यशा त्या ओंकारीं । समर्थाची बैसली स्वारी । पद्मासन घालूनी कांठावरी । त्या महानदीच्या नर्मदेच्या ॥८६॥ चौघे दर्शन घेऊन आले । समर्था विनवूं लागले । आतां पाहिजे सोडिलें । जाणें सडकेनें आपणा ॥८७॥ कां कीं भीड झाली फार । गाड्या मोडती वरचेवर । बैल गाडीचे बुजार । आहेत आपुल्या त्यांतूनी ॥८८॥ खेडीघाट स्टेशनाला । जाण्यायेण्याचा करार केला । गाडीवाल्यानें तो भला । न सांगतां गुण बैलांचे ॥८९॥ ते बसतां आले कळून । आपण होतां म्हणून । पोंचलों येथे येऊन । बैल द्वाड गाडीचे ॥९०॥ परत बसून गाडींत । जाणें न निर्भय वाटत । म्हणून या नावेंत । बसून जाऊं स्टेशनाला ॥९१॥ गर्दी झाली रस्त्यांनी । नदींतून जाऊ शांतपणीं । ऐसेंच केलें कित्येंकांनीं । त्या पाहा नावा चालल्यात ॥९२॥ तुम्हांस वाटेल तेंच करा । आम्हां न कांहीं विचारा । मी वचनांत गुंतलों खरा । तुम्ही बसाल तेथें येऊं ॥९३॥ ऐसें समर्थ बोलले । त्यांच्यासवें नावेंत बैसलें । गर्दीतून जाऊं लागले । खेडीघाट स्टेशनाला ॥९४॥ तों नदींत मध्यंतरीं । नाव आदळली खडकावरी । फळी फुटून गेली सारी । तिच्या बुडाची एक हो ॥९५॥ छिद्र पडलें आरपार । येऊं लागलें आंत नीर । नावाड्यानें सत्वर । नदींत उड्या टाकिल्या ॥९६॥ परी महाराज निर्धास्त होते । ' गिनगिन गणांत बोते ' । ऐसें भजन मुखातें । चाललें होतें अखंड ॥९७॥ मार्तंड बजरंग मारुती । घाबरून गेले अती । उडूं लागली धडधडा छाती । बंकटलालाची विबुध हो ॥९८॥ चवघे समर्थां बोलले । आम्ही अपराधी आहों भले । आम्हीं न तुमचें ऐकिलें । शेगांवांत दयाळा ॥९९॥ त्याचें दिलें आम्हां फळ । तुम्ही आज तात्काळ । नर्मदाच झाली काळ । आम्हांलागीं बुडवावया ॥१००॥ गुरुराया आपुली वाणी । वेदतुल्य मानूं येथूनी । वांचवा या संकटातूनीं । शेगांव दृष्टी पडूं द्या ॥१॥ ऐसें जों ते बोलतात । तों निंम्यावरी पाण्यांत । नाव बुडाली लोटत लोटत । एक फर्लांग गेली हो ॥२॥ कांहीं लोक बोलती ऐसें । मेली हीं पांच माणसें । आतां यांचा भरवंसा नसे । अथांग पाणी नर्मदेला ॥३॥ तई म्हणाले गजानन । नका होऊं हैराण । तुमच्या जीवालागून । धक्का न लावी नर्मदा ॥४॥ ऐसें म्हणून स्तवन केलें । नर्मदेचें त्यांनी भलें । हे चवघे बैसले । हात जोडून नावेंत ॥५॥ श्लोक ( अनुष्टुप छंद ) नर्मदे मंगले देवी । रेवे अशुभनाशिनी । मंतु क्षमा करी यांचा । दयाळू होऊनी मनीं ॥ ऐसें स्तवन चाललें । तों आंतील पाणी निघून गेलें । नर्मदेनें लाविलें । आपुल्या करास त्या छिद्रा ॥६॥ नाव श्रोते पहिल्यापरी । आली जलाचिया वरी । नावेच्या बरोबरी । होती प्रत्यक्ष नर्मदा ॥७॥ ळणीचा धरला वेष । मस्तकावरी कुरळ केश । भिजविलें जियेच्या वस्त्रास । कंबरेपर्यंत जलानें ॥८॥ नौका कांठास लागली । अवघ्यांनी ती पाहिली । आश्चर्यचकित मुद्रा केली । पाहून तळीच्या छिद्राला ॥९॥ ही बाई होती म्हणून । आमुचे हे वांचले प्राण । बाई आपण कोठील कोण ? । हें कांहीं सांगा हो ॥११०॥ सोडा वस्त्र बिजलेलें । आम्ही नवें देतों भलें । तईं नर्मदेनें पहा केलें । ऐशा रीतीनें भाषण ॥११॥ मी ओंकार कोळ्याची कन्यका । माझें नांव नर्मदा ऐका । आम्हां परिपाठ आहे देखा । ओलें वस्त्र नेसण्याचा ॥१२॥ मी ओलीच राहतें निरंतर । माझेंच रूप आहे नीर । ऐसें बोलून नमस्कार । करून गेली गजानना ॥१३॥ क्षणामाजीं नाहींसी । झाली ती नर्मदेसी । वीज चमकून आकाशीं । घनीं जैसी लीन होते ॥१४॥ तों पहातां प्रकार । चवघे आनंदले फार । कळला स्वामींचा अधिकार । नर्मदा आली दर्शना ॥१५॥ बंकट विचारी खोदून । समर्था ही स्त्री कोण ? । तें सांगावें फोडून । गुप्त कांहीं ठेवूं नका ॥१६॥ तईं महाराज वदले तत्त्वतां । तुम्हीं जे कां विचारितां । तो कथिला आहे गाथा । नर्मदेनें तुम्हांस ॥१७॥ कोळी जो का ओंकार । तोच हा ओंकारेश्वर । माझेंच रूप आहे नीर । ऐसें नर्मदा वदलीना ? ॥१८॥ अरे ती प्रत्यक्ष नर्मदा । संशय तेथें न घ्यावा कदा । संकटामाजीं देतें सदा । हात ती आपुल्या भक्तातें ॥१९॥ म्हणून तिचा जयजयकार । करा मोठ्यानें एक वार । जय जय नर्मदे निरंतर । ऐसेंच रक्षण अंबे करी ॥१२०॥

ऐसें ऐकतां वचन । बंकटलालादि चवघे जण । समर्थांचे दिव्य चरण । वंदूं लागलें क्षणक्षणां ॥२१॥ परत आले शेगांवांत । ज्यांना त्यांना हीच मात । होऊनिया हर्षभरित । सांगूं लागले विबुध हो ॥२२॥ सदाशिव रंगनाथ वानवळे । एक्या गृहस्थासमवेत भले । शेगांवांत येते झाले । महाराजांच्या दर्शना ॥२३॥ या सदाशिवाकारण । टोपण नांव तात्या जाण । हे माधवनाथाचे छात्रगण । चित्रकूटच्या होते हो ॥२४॥ या माधवनाथाप्रत । योगांगे होतीं अवगत । ज्यांचा शिष्यगण माळव्यांत । आहे मोठ्या प्रमाणीं ॥२५॥ सदाशिव आले शेगांवाला । जेव्हां श्रीच्या दर्शनाला । तेव्हां महाराज भोजनाला । बसले होते मठांत ॥२६॥ सदाशिवासी पाहून । माधवाची झाली आठवण । गजाननाकारण । संत संता जाणती ॥२७॥ वानवळे येतांक्षणीं । महाराज बोलले मोठ्यांनीं । अरे नाथाच्या शिष्यालागुनी । बसवा आणून माझ्यापुढें ॥२८॥ त्यांचे गुरु माधवनाथ । गेले जेवून इतक्यांत । मठीं माझ्या समवेत । तों हे दोघे पातले ॥२९॥ थोडा वेळ आधीं जरी । हे आले असते तरी । भेट त्यांच्या गुरूची खरी । यांना येथें मठांत ॥१३०॥ आतां हे मागून आले । गुरु त्यांचे निघून गेले । विडा न घेतां भले । त्याची करूं पुर्तता ॥३१॥ वानवळ्यासी आलिंगन । देते झाले दयाघन । पोरें बंधूंचीं म्हणून । ऐसा तो संतप्रेमा ॥३२॥ रीतिप्रमाणें सत्कार केला । वानवळ्याचा शेगांवाला । जातांना त्या निरोप दिला । समर्थांनीं येणे रीतिं ॥३३॥ तुम्ही माधवनाथाला । असेच जा भेटण्याला । त्यांचा येथें राहिला । विडा तो त्या द्यायास ॥३४॥ मी म्हणतों तेंच सांगा । पदरचें न घाला बघा । आमच्या वाक्यामाजीं उगा । फरक तुम्ही करूं नये ॥३५॥ म्हणा " साथे भोजन हुवा । विडा तुम्हारा याही रहा । तो आम्ही आणिला पाहा । नाथां तुम्हां द्यावयास " ॥३६॥ हें सारें बोलणें । ऐकलें त्या वानवळ्यानें । घेऊन विड्याचीं दोन पानें । गमन करितां जाहला ॥३७॥ माधवनाथा हकीकत । त्यानें कथिली इत्थंभूत । महाराज आपण शेगांवांत । आला होता कां ते दिनीं ? ॥३८॥ गजानन जें बोललें । तैसेंच आहे जाहलें । भोजनसमयीं त्यांनीं केलें । स्मरण माझें तीच भेट ॥३९॥ ऐशा रीतिं एकमेकां । आम्हीं भेटतों सदैव देखा । येथें शंका घेऊं नका । स्मरण तीच भेट होय ॥१४०॥ त्यांचा माझा एक प्राण । शरीरे हीं मात्र भिन्न भिन्न । हें आहे खोल ज्ञान । तें न इतक्यांत कळे तुम्हां ॥४१॥ बरें झालें आणिला । आमुचा विडा तुम्हीं भला । जो होता राहिला । शेगांवीं शिष्य हो ॥४२॥ पानें देतां वानवळ्यांनीं । तीं भक्षिलीं नाथांनीं । खलबत्त्यांत कुटुनीं । थोडा प्रसाद दिला त्याला ॥४३॥ संतभेटी होती कैसी । हें चांगदेवपासष्टीसी । सांगते झाले ज्ञानराशीं । श्रीज्ञानेश्वर महाराज ॥४४॥ ती पासष्टी मनीं आणा । म्हणजे ह्या कळतील खुणा । स्वानुभवाच्या ठायीं जाणा । वाव न तर्काकारणें ॥४५॥ योगी वाटेल तेथोनी । भेटे एकमेकांलागूनी । भेट ठायीच बैसोनी । होतें त्याचें कौतुक हें ॥४६॥ शेख महंमद श्रीगोंद्यांत । तुकाराम होते देहूंत । आग लागतां मंडपाप्रत । देहूमाजीं कीर्तनाच्या ॥४७॥ ती श्रीशेख महंमदांनीं । विझविली श्रीगोंद्यांत बैसुनी । हें महिपतीनें लिहूनी । ठेविलें भक्तिविजयांत ॥४८॥ जाऊन हळी खेड्यांत । विहिरींत बुडतां पाटीलसुत । वांचविलें देऊन हात । महाराज माणिकप्रभूंनीं ॥४९॥ खरा योगी असल्याविना । ऐसें कौतुक होईना । हें न साधे दांभिकांना । त्यांनीं गप्पाच माराव्या ॥१५०॥ योग अवघ्यांत बलवत्तर । त्याची न ये कोणां सर । करणें असल्या राष्ट्रोध्दार । त्याचा अवलंब करा हो ॥५१॥ श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ । ऐकोत सदा प्रेमळ भक्त । निष्ठा ठेवून ग्रंथावरी ॥१५२॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ ॥ इति चतुर्दशोध्यायः समाप्तः ॥

अध्याय १५
 
॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे कश्यपात्मज वामना । हे बटुरुपधारी नारायणा । तूं बलीच्या घेऊन दाना । कृतार्थ त्याला केलेंस ॥१॥ राज्य मृत्युलोकीचें । घेतलें त्वां जरी साचें । तरी दिलें पाताळाचें । राज्य बलीकारणें ॥२॥ आंवळा घेऊन नारळ दिला । तुम्ही त्या पुण्यवंत बलीला । आणि त्याच्या भक्तीस्तव झाला । द्वारपाळ द्वारीं तुम्ही ॥३॥ या मन्वंतरानंतर । बलीच आहे होणार । देवांचा राजराजेश्वर । देवा तुझ्या वरानें ॥४॥ एक घटकेंत अनंता । चहूं वेदांच्या संहिता । पठण केल्या बुद्धिमत्ता । केवढी तुझी अगाध तरी ! ॥५॥ अवघ्यां तुझ्या अवतारीं । हा सोंवळा अवतार श्रीहरी । कोणाचाही भूमीवरी । वध न तुम्ही केलांत ॥६॥ शत्रुमित्राच्या घरीं दिवा । ये अवतारीं लाविला बरवा । देव आणि दानवा । तूं वंद्य सारखाच ॥७॥ देव तेही आनंदविले । राक्षस तेही रक्षिलें । आपलें ईशत्व सांभाळिलें । याच अवतारीं देवा तूं ॥८॥ तुला माझा नमस्कार । असो वामना वारंवार । मस्तकीं ठेवा वरद कर । तुम्ही दासगणूच्या ॥९॥ टिळक बाळ गंगाधर । महाराष्ट्राचा कोहिनूर । दूरदृष्टिचा सागर । राजकारणीं प्रवीण जो ॥१०॥ निज स्वातंत्र्याच्यासाठीं । ज्यानें अनंत केल्या खटपटी । ज्याची धडाडी असे मोठी । काय वर्णन तिचें करुं ? ॥११॥ करारी भीष्मासमान । आर्य महीचें पाहून दैन्य । सतीचे झाला घेतां वाण । भीड न सत्यांत कोणाची ॥१२॥ वाक्‌चातुर्य जयाचें । बृहस्पतीच्या समान साचें । धाबें दणाणें इंग्रजांचें । पाहून ज्याच्या लेखाला ॥१३॥ कृति करुन मेळविली । ज्यानें लोकमान्य ही पदवी भली । ती न कोणी त्यांना दिली । ऐसा होता बहाद्दर ॥१४॥ तो एके वेळीं अकोल्याला । शिवजयंतीच्या उत्सवाला । लोकाग्रहें येतां झाला । व्याख्यान द्याया कारणें ॥१५॥ झाली तयारी उत्सवाची । त्या अकोल्यामध्यें साची । मोठमोठाल्या विद्वानांची । गेली गडबड उडून ॥१६॥ दामले, कोल्हटकर, खापर्डे । आणखी विद्वान्‌ बडेबडे । जमते झाले रोकडे । तया अकोल्या ग्रामासी ॥१७॥ अध्यक्ष त्या उत्सवाचे । नेमिले होते टिळक साचे । नांव ऐकतां टिळकांचें । वर्‍हाड सारें आनंदलें ॥१८॥ शिवरायाची जयंती । याच्या आधींच या प्रांतीं । झाली पाहिजे होती । त्याचें कारण ऐसें पहा ॥१९॥ शिवाजीची जन्मदात्री । जी वीरमाता जिजा सती । ती वर्‍हाडीच आपुली होती । सिंधखेडीं जन्म जिचा ॥२०॥ त्या वीरगाजी शिवाजीला । जिनें पोटीं जन्म दिला । वर्‍हाडमहाराष्ट्र एक झाला । या सतीच्या कर्तृत्वें ॥२१॥ माता होती वर्‍हाडी । पिता महाराष्ट्री शहाजी गडी । अवघ्या दंपत्यांत ही जोडी । खचित होती अनुपम ॥२२॥ आधींच उत्सव शिवाजीचा । जो कलिजा महाराष्ट्राचा । आणखी वरी अध्यक्ष त्याचा । टिळक बाळ गंगाधर ॥२३॥ आधीं एक महिना तयारी । उत्सवाची चालली खरी । ज्याच्या त्याच्या अंतरीं । आनंद होत चालला ॥२४॥ अध्यक्ष उपाध्यक्श निवडले । स्वयंसेवक तयार झाले । तईं कईकांचें म्हणणें पडलें । ऐशा रीतिं विबुध हो ॥२५॥ या शिवजयंती उत्सवाला । आणा शेगांवचे महाराजाला । श्रीस्वामी समर्थ गजाननाला । म्हणजे दुधांत साखर पडेल कीं ॥२६॥ शिवाजीच्या राष्ट्रोद्धारा । आशीर्वाद होता खरा । समर्थांचा साजिरा । म्हणून तडीस गेला तो ॥२७॥ टिळकांचें राजकारण । हेंच जिजाई-हृदय-रत्‍न । त्याला पाहिजे आशीर्वचन । समर्थंचि विबुध हो ॥२८॥ ते कित्येकां पसंत पडलें । कित्येकांस नाहीं रुचलें । ज्यां न रुचले ते बोलले । उघड उघड येणें रीतिं ॥२९॥ तो शेगांवाचा अवलिया । कशास आणितां ये ठायां । तो कांहीं तरी करुनियां । विक्षोभ करील सभेचा ॥३०॥ फिरेल नागवा सभेंत । "गिण गिण गणांत" ऐसा म्हणत । मारील वाटे कदाचित्‌ । तो लोकमान्याला ॥३१॥ कांहीं लोक बोलले । हें न म्हणणें चांगलें । गजाननाचीं पाउलें । लागलीं पाहिजेत सभेला ॥३२॥ त्याचें जें कां वेडेपण । तें आहे वेडयाकारण । जे कोणी विद्वान् सज्जन । त्यासी न वदती वेडयापरी ॥३३॥ खरेखुरे राष्ट्रोद्धारक । जरी टिळक असतील एक । तरी महाराज निःशंक । सभेसी येतील ये ठायां ॥३४॥ खर्‍याखोटयाची परीक्षा । साधूच हे करिती देखा । म्हणून सांगतों भिऊं नका । त्यांना आमंत्रण देण्यास ॥३५॥ ऐसी भवति न भवति झाली । मंडळी शेगांवास आली । आमंत्रण तें द्याया भली । सभेचें श्रीगजानन ॥३६॥ येतांच दादा खापडर्यासी । बोलते झाले पुण्यराशी । आम्ही येऊं सभेसी । तुमच्या शिवाजी उत्सवाच्या ॥३७॥ वेडयापरी न तेथें करुं । जागींच बसून मौन धरुं । सुधारकांचा कधीं न करुं । मनोभंग मनाचा ॥३८॥ करावयासी राष्ट्रोद्धार । योग्य बाळ गंगाधर । याच्या परी न होणार । राष्ट्रप्रेमी पुरुष पुढें ॥३९॥ स्नेही त्या टिळकाचा । अण्णा पटवर्धन नांवाचा । शिष्य नरसिंहसरस्वतीचा । आळंदीचा असे जो ॥४०॥ त्या दोघां पुरुषां पाहाण्यास । आम्ही येऊं अकोल्यास । तें ऐकतां खापर्डयास । अती आनंद जाहला ॥४१॥ पाहा पाहा कोल्हटकरा । वर्‍हाडप्रांताचा ज्ञानहिरा । यानें वृत्तान्त जाणिला सारा । जो का झाला अकोल्यांत ॥४२॥ यावरुन संतांचें । ज्ञान केवढें अगाध साचें । खर्‍या राष्ट्रपुरुषाचें । प्रेम यांना पाहा किती ! ॥४३॥ बोलावयाची आपणांस । जरुर पडली कांहीं न खास । तेच होऊन आपणांस । येतो म्हणून म्हणाले ॥४४॥ मुहूर्त या उत्सवाला । अती उत्तम लागला । चला वंदून समर्थाला । आपण जाऊं अकोल्यास ॥४५॥ खापर्डे कोल्हटकर । निघून गेले साचार । आला आठ दिवसांवर । सभेचा तो दिवस पाहा ॥४६॥ वर्‍हाड सारें आनंदलें । ज्यांना त्यांना वाटलें । कधीं टिळकांचीं पाउलें । पाहूं आम्ही अकोल्यांत ॥४७॥ शके अठराशें तिसासी । ती सभा होती वैशाखमासीं । वर्‍हाडप्रांतीं अकोल्यासी । उभारिलेल्या मंडपांत ॥४८॥ सण अक्षय्यतृतीयेचा । वर्‍हाडप्रांतीं महत्त्वाचा । परी समुदाय जनांचा । मिळता झाला प्रचंड ॥४९॥ तोच अखेरीचा दिन । त्या सभेचा होता जाण । लोक आले लांबलांबून । लोकमान्यांसी पहावया ॥५०॥ शिवाय श्रोते त्या दिवशीं । महाराज येणार सभेसी । ऐसी खबर लोकांसी । आधींच होती विबुध हो ॥५१॥ मंडप चिकार भरुन गेला । जो तो पाहूं लागला । म्हणती कां हो सभेला । अजूनी न आले महाराज ॥५२॥ परी ते सभा भरण्याआधीं । येऊन बसले मंडपामधीं । साधु आपल्या वाणीस कधीं । असत्यता न येऊं दे ॥५३॥ सभेमाजीं उच्च स्थानीं । बसले होते कैवल्यदानी । गादीस लोडा टेकूनी । जीवनमुक्त साधुवर ॥५४॥ सिंहासनाच्या अग्रभागा । टिळकास दिली होती जागा । त्यांच्या सन्निध बसले बघा । अण्णासाहेब पटवर्धन ॥५५॥ श्रीकृष्णाचा नंदन । गणेश ज्याचें नामाभिधान । खापर्डे कुलाचा कुलभूषण । एक्या बाजूस टिळकाच्या ॥५६॥ दामले कोल्हटकर त्या ठायीं । भावे व्यकंटराव देसाई । सभेचे पुढारी पाही । चमकत होते ते ठायां ॥५७॥ आणिक व्याख्याते विद्वानेतर । बसले होते सभोंवार । त्यांचें वर्णन कोठवर । करावें मी एक्या मुखें ॥५८॥ सभेलागीं आरंभ झाला । हेतु प्रथम निवेदिला । मग व्याख्यानसिंह उठला । टिळक बोलावयातें ॥५९॥ "दिवस आजचा धन्य धन्य । आहे पहा हो सज्जन । स्वातंत्र्यासाठीं ज्यानें प्राण । खर्चिले आपुले पूर्वकालीं ॥६०॥ त्या धनुर्धर योध्याची । वीर गाजी शिवाजीची । जन्म-जयंति आहे साची । म्हणून आपण मिळालों ॥६१॥ त्या रणगाजी शिवाजीला । रामदासें हातीं धरिला । म्हणून त्याचा बोलबाला । झाला भरतखंडामध्यें ॥६२॥ तेवींच आज येथें झालें । आशिर्वाद द्याया आले । श्रीगजानन साधु भले । आपुलीया सभेस ॥६३॥ म्हणून शिवाजीचे परी । सभा यशस्वी होवो खरी । अशाच सभेची जरुरी । आहे सांप्रत राष्ट्राला ॥६४॥ स्वातंत्र्यसूर्य मावळला । दास्यत्वाचा काळोख पडला । स्वातंत्र्य नाहीं जगीं ज्याला । तो समाज प्रेतवत् ॥६५॥ यासाठीं म्हणून । आहे करणें प्रयत्‍न । ज्या शिक्षणेंकरुन । राष्ट्रप्रेम वाढेल हो ॥६६॥ ऐसें शिक्षण पुढिल्यांप्रती । देणें भाग निश्चिती । तें शिक्षण हा भूपती । देईल कां हो अर्भकांला ?" ॥६७॥ ऐसें टिळक म्हणाले । महाराज आसनीं उठून बसले । गर्जून त्रिवार बोलले । नाहीं नाहीं ऐसें पहा ॥६८॥ आवेशाच्या भरांत । बोलले गंगाधरसुत । जें बोलणें किंचित् । टोचून होतें राजाला ॥६९॥ त्या भाषणाचा रोख भला । समर्थांनीं जाणिला । आणि हांसत हांसत शब्द केला । ऐशा रीतिं श्रोते हो ॥७०॥

अरे अशानेंच पडतात । काढण्या दोन्ही दंडांप्रत । ऐसें बोलून गणगणांत । भजन करुं लागले ॥७१॥ सभा निर्विघ्न पार पडली । टिळकांची वाहवा झाली । खरें झालें त्याच सालीं । समर्थांचें भाकित ॥७२॥ भूपतीनें टिळकाला । एकशें चोवीसाखालीं धरिला । दोर्‍या पडल्या दंडाला । आला प्रसंग शिक्षेचा ॥७३॥ राजसत्तेचिया पुढें । कोणाचेंही न चाले घोडें । वकील होते बडे बडे । ते झटूं लागले टिळकास्तव ॥७४॥ प्रेमी मंडळी टिळकांची । जी कां होती जिव्हाळ्याची । त्यांनीं पारमार्थिक उपायाची । केली योजना एक अशी ॥७५॥ दादासाहेब खापर्डे । हेही होते गृहस्थ बडे । ते उमरावतीहून मुंबईकडे । जाऊं लागले खटल्यास्तव ॥७६॥ अकोल्याच्या स्टेशनावरी । कोल्हटकरास मधुरोत्तरीं । बोलते झाले ऐशापरी । तें थोडकें सांगतों ॥७७॥ तुम्ही जावें शेगांवासी । समर्था विनंती करा ऐसी । सोडवा बाळ टिळकासी । प्रसंग मोठा दुर्धर ॥७८॥ मीच गेलों असतों तेथें । परी मी जातों मुंबईतें । तुम्ही जाऊन शेगांवातें । विनंती करा महाराजा ॥७९॥ लगेंच बसला गाडींत । कोल्हटकर टिळक-भक्त । येतां झाला शेगांवांत । स्वामी गजाननाकडे ॥८०॥ तईं महाराज मठातें । निज आसनीं निजून होते । तीन दिवस जहाले पुरते । परी न उठले यत्किंचित्‌ ॥८१॥ कोल्हटकरहि तोंवरी । बसला मठाभीतरीं । जो का असेल बिगारी । तो न ऐसें वागे कदा ॥८२॥ कळकळ टिळकाविषयींची । कोल्हटकरा पूर्ण साची । कमाल त्यानें चिकाटीची । केली असे आपुल्या ॥८३॥ जाळावांचून नाहीं कड । मायेवांचून नाहीं रड । ऐसी आहे एक जाड । म्हण मराठी भाषेमध्यें ॥८४॥ चवथें दिवशीं समर्थ उठले । कोल्हटकरास बोलते झाले । तुम्ही अलोट प्रयत्‍न केले । परी न फळ येईल त्या ॥८५॥ अरे छत्रपती शिवाजीला । रामदासाचा वशिला । होता परी तो कैद झाला । बादशाही अमंलांत ॥८६॥ सज्जनास त्रास झाल्याविना । राज्यक्रांति होईना । कंसाचा तो मनीं आणा । इतिहास म्हणजे कळेल ॥८७॥ ही मी देतों भाकर । ती खाऊं घाला लवकर । टिळकांप्रती अंतर । यांत कांहीं करुं नका ॥८८॥ या भाकरीच्या बळावरी । तो मोठी करील कामगिरी । जातो जरी फार दूरी । परी न त्याला इलाज ॥८९॥ ऐसें ऐकतां उत्तर । साशंक झाले कोल्हटकर । समर्था करुन नमस्कार । भाकर करीं घेतली ॥९०॥ ती नेऊन मुंबईला । घातली टिळकास खायाला । वृत्तान्त तोही कथन केला । अथपासून इतिवरी ॥९१॥ तो ऐकून लोकांप्रत । टिळक बोलले हंसत हंसत । स्वामींचें तें अगाध सत्य । ज्ञान आहे खचित पहा ॥९२॥ यश तुमच्या प्रयत्‍नासी । नाहीं निश्चयेंसी । आपुली बाजू रक्षण्यासी । सरकार न्याया पाळीन ना ॥९३॥ जेव्हां स्वार्थाचा संबंध नसतो । तेव्हां न्याय आठवतो । हा जगाचा सिद्धान्त तो । होईल खोटा कोठूनी ? ॥९४॥ माझ्या हातें कामगिरी । मोठी होणार आहे खरी । ऐशी समर्थांची वैखरी । बोलली हें गूढ एक ॥९५॥ भूत भविष्य वर्तमान । जाणताती साधुजन । आपण मनुष्य सामान्य । पाहूं पुढें काय होतें ॥९६॥ प्रसाद म्हणून भाकरी । ती कुसकरुन भक्षिली खरी । दंत न मुखाभीतरीं । परी प्रसाद टाकवेना ॥९७॥ झाली शिक्षा टिळकास । नेलें ब्रह्मदेशीं मंडाल्यास । तेथें जन्मला गीतारहस्य । गीतेवरील ग्रंथ त्यांचा ॥९८॥ हीच मोठी कामगिरी । झाली त्यांच्या हस्तें खरी । मान जगत्‌-गुरुपरी । मिळता झाला टिळकांतें ॥९९॥ या गीताशास्त्रावर । टीका झाल्या अपार । त्या सांगूं तरी कोठवर ? । मति नाहीं दासातें ॥१००॥ बुध हो प्रत्येक आचार्यांनीं । कालमानातें पाहूनी । केली गीतेची मांडणी । जगदोद्धार करावया ॥१॥ कोणीं लाविली अद्वैतपर । कोणीं लाविली द्वैतपर । कोणीं लाविली कर्मपर । त्याच एका गीतेला ॥२॥ हीच मोठी कामगिरी । त्यांच्या हस्तें झाली खरी । या कामाची नये सरी । कोणत्याही कृत्यातें ॥३॥ येणेंच बाळ गंगाधर । जगतीं होतील अजरामर । कीर्ति त्यांची दूरवर । पसरवील ग्रंथ हा ॥४॥ स्वातंत्र्य जरी मिळविलें असतें । तरी न ऐशी कीर्ति टिकते । पहा करुन चित्तातें । पूर्णपणें विचार ॥५॥ त्यांत फारसें नाहीं सार । तो व्यवहार लौकिकीं ॥६॥ गीताशास्त्राचें तसें नाहीं । तें मोक्षपदा प्रती देई । आणि समाजाची बसवी पाही । विस्कळीत घडी हें ॥७॥ यावच्चंद्रदिवाकर । पुरुष बाळ गंगाधर । चिरंजीव निरंतर । राहील कीर्तिरुपानें ॥८॥ असो करवीर कोल्हापुरीचा । द्विज चित्‌पावन जातीचा । श्रीधर गोविंद नांवाचा । काळे उपनांव जयाचें ॥९॥ तो गरिबीच्या स्थितींत । गेला इंग्रजी शाळेंत । आंग्‍लविद्या शिकण्याप्रत । मँट्रिक परीक्षा पास झाला ॥११०॥ पुढें काँलेजांत गेला । परी इन्टर नापास झाला । म्हणून फिरत राहिला । वर्तमानपत्रें वाचीत ॥११॥ तों केसरी पत्रांत । वाचलें ओयामा टोगो चरित्र । तेणें त्याच्या मनांत । वृत्ति एक उठली अशी ॥१२॥ आपण जावें विलायतेला । यंत्रविद्या ही शिकण्याला । उगे भार भूमीला । होण्यामाजीं अर्थ काय ? ॥१३॥ टोगो यामा दोघेजण । प्रथमतः ज्ञान संपादून । अभ्युदयाकारण । जपान आणीते जहाले ॥१४॥ तैसें आपण करावें । मायभूमीस उद्धरावें । ऐसा विचार त्याच्या जीवें । घेतला परी इलाज ना ॥१५॥ द्रव्याची न लागे संगत । कोणीही ना करी मदत । घरची गरीबी अत्यंत । काय करितो बिचारा ॥१६॥ तो आपल्या मित्रासी । आला भेटण्या भंडार्‍यासी । जो मन्‍रो हायस्कुलासी । होता एक शिक्षक ॥१७॥ त्यासी विचार आपुला । श्रीधरानें कळविला । तोही त्याला पसंत पडला । परी पैशाची वाट काय ? ॥१८॥ मित्रा, एक पैशाविणें । कांहीं नाहीं जगीं होणें । दरिद्रयानें मनींच करणें । मनोराज्य बापा रे ॥१९॥ चाल जाऊं गांवाला । आपुल्या जन्मभूमीला । त्या करवीर कोल्हापुराला । इकडे उन्हाळा विशेष ॥१२०॥ दोघे बसले गाडींत । समर्थांची ऐकून कीर्त । उतरते झाले शेगांवांत । साधु कैसा तो पहावया ॥२१॥ पोस्टमास्तराच्या दारीं । सामान ठेविलें सत्वरीं । आतुरता मोठी अंतरीं । समर्थाला पहाण्याची ॥२२॥ दोघे आले मठांत । समर्थां केलें दंडवत । बसते झाले जोडून हात । स्वामीचिया सन्मुख ॥२३॥ मनोदय श्रीधराचा । समर्थांनीं जाणिला साचा । म्हणाले उगीच परदेशाचा । विचार वेडया करुं नको ॥२४॥ अवघेंच कांहीं आहे येथ । अर्थ ना भौतिक शास्त्रांत । सेवी अध्यात्मविद्येप्रत । म्हणजे कृतार्थ होशील तूं ॥२५॥ त्यायोगें विचारक्रांति । श्रीधराच्या झाली चित्तीं । कोल्हापूरची एक व्यक्ती । आठवली या समयास त्या ॥२६॥ ते स्वामी कुंभारगल्लीचे । होते कोल्हापुरीचे । बोलणें याच परीचें । होतें हमेशा भक्तांसी ॥२७॥ तैसेच हेही गुरुमूर्ती । भक्तांसवें भाषण करिती । याचा उलगडा चित्तीं । कांहींच माझ्या होईना ॥२८॥ ऐसें श्रीधर आणितां मनीं । महाराज वदले गर्जोनी । हिंदुस्थाना सोडूनी । उगाच कोठें जाऊं नको ॥२९॥ अगणित करावें पुण्य । तेव्हांच होतें येथें जनन । या भौतिक शास्त्राहून । योगशास्त्र समर्थ असें ॥१३०॥ तें योगशास्त्र येतें ज्याला । तो न मानी या भौतिकाला । योगशास्त्राहून भला । अध्यात्मविचार श्रेष्ठ असे ॥३१॥ तो जमल्यास करुन पाही । कोठें न आतां जाई येई । ऐसें समर्थ बोलतां पाही । श्रीधर चित्तीं आनंदला ॥३२॥ पश्चिमेचा मावळला । तोंच पूर्वेकडे आला । विचार-सूर्य त्याचा भला । श्रीधरा सुखी करण्यास ॥३३॥ एक संतावांचून । विचाराचें परिवर्तन । कोणी न करुं शके आन । सत्य एक त्यांनाच कळे ॥३४॥ महाराज म्हणाले या ठायीं । तुझा अभ्युदय होईल पाही । कांता वाट पहाते गेहीं । तुझी कोल्हापुराला ॥३५॥ जा आतां मित्रांसहित । आपुल्या कोल्हापुराप्रत । तेंच पुढें झालें सत्य । श्रीधर लौकिका चढले हो ॥३६॥ श्रीधर बी.ए.एम्‌.ए. झाले । प्रिन्सिपाँल त्या नेमिलें । शिवपुरीं काँलेजाशीं भले । सिंद्याचिया राज्यांत ॥३७॥ संत साक्षात्‌ ईश्वर । चालते बोलते भूमीवर । त्यांच्या कृपेचा आधार । जया मिळे तोच मोठा ॥३८॥ पहा काळे श्रीधराला । दर्शनाचा योग आला । म्हणून वृत्तींत फरक पडला । खरें तेंच शोधावया ॥३९॥ हें पीक संतांचें । याच देशीं यावयाचें । वृक्ष नंदनवनीचें । अन्य ठायीं न येती हो ॥१४०॥ स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ । दावो सर्वदा सत्पथ । परम भाविकांकारणें ॥१४१॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ ॥ इति पंचदशोऽध्यायः समाप्तः ॥ 

अध्याय १६
॥ श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी परशुधरा । हे जमदग्नीच्या कुमारा । परशुरामा परमेश्वरा । आतां उपेक्षा करूं नको ॥१॥ तूं सहस्त्रार्जुनातें दंडून । केलें द्विजांचें संरक्षण । ब्राह्मणांचा अपमान । सहन झाला नाहीं तुला ॥२॥ आतां मात्र डोळे मिटिसी । कां रे देवा ब्राह्मणांविशीं ? । काय आहे लागली तुसी । गाढ निद्रा येधवां ॥३॥ म्हणून डोळे मिटूं नका । स्वस्थ ऐसें बसूं नका । आणीबाणीचा प्रसंग देखा । आहे हरी सांप्रत ॥४॥ तुझ्या वशिल्यावांचून । अवघीं कृत्यें आहेत शीण । आर्यसंस्कृतीचें रक्षण । होणें नाहीं तुझ्याविण ॥५॥ गजाननमाया अघटित । कोण जाणें तिजप्रत । महाराजांचा एक भक्त । पुंडलिक नामें मूंडगांवीं ॥६॥ हा शेगांवची करी वारी । समर्थाविषयीं प्रेम भारी । हमेश त्यांचें चिंतन करी । एकाग्रशा मनानें ॥७॥ त्याच गांवीं भागाबाई । एक ठाकरीण होती पाही । निष्ठा तिची एक्याही । ठिकाणासीं बसत नसे ॥८॥ ती दांभिक होती फार । सदा दंभाचा बाजार । भरवून भोंदी नारीनर । हाच धंदा तियेचा ॥९॥ ती बोलली पुंडलिकाला । तुझा जन्म वाया गेला । कां कीं तूं नाहीं केला । सद्गुरु तो आपणांतें ॥१०॥ गजाननाच्या वार्‍या करिसीं । सद्गुरु त्याला मानिसी । परी त्यानें सांग तुसी । मंत्र कानीं कथिला कां ? ॥११॥ अरे विधीवांचून । गुरु न होत कधीं जाण । शेगांवचा गजानन । वेडापिसा साच असे ॥१२॥ तुझा ताप बरा झाला । म्हणून तूं मानिसी त्याला । या काकतालीयन्यायाला । बळी पुंडलिका पडूं नको ॥१३॥ ' गिन गिन गणातें ' हें भजन । पिशापरी आचरण । कोणाचेंही खाई जाण । ऐसा मुळीं भ्रष्ट तो ॥१४॥ म्हणून तुला सांगतें । चाल अंजनगांवातें । केजाजीच्या शिष्यातें । आपण दोघे गुरु करूं ॥१५॥ उद्यां त्यांचें कीर्तन । अंजनगांवीं असे जाण । तें ऐकावया कारण । उठून जाऊं प्रातःकाळीं ॥१६॥ गुरु असावा महाज्ञानी । चातुर्य-शास्त्र-चिंतामणी । गुरु असावा परमगुणी । भक्तिपथातें दावितां ॥१७॥ यांतील लक्षण एकही । गजाननाच्या नसे ठायीं । म्हणून वेळ न करी कांहीं । चाल अंजनगांवांतें ॥१८॥ तो भोकरे पुंडलिक । होता मनाचा भाविक । भागीच्या भाषणें देख । चित्त त्याचें घोटाळलें ॥१९॥ त्यानें ऐसा विचार केला । उदईक अंजनगांवाला । जाऊं कीर्तन ऐकण्याला । पुढचा विचार पुढें करूं ॥२०॥ ऐसा विचार करून । भागीसी बोलला जाण । अंजनगांवालागून । चाल येतों तुझ्यासवें ॥२१॥ दोघांचा विचार झाला । पुंडलिक रात्रीं स्वस्थ निजला । तों तीन प्रहर रात्रीला । काय घडलें तें ऐका ॥२२॥ पुंडलिकाच्या समोर । एक पुरुष दिगंबर । उभा राहिला साचार । थेट समर्थांच्या परी ॥२३॥ पुरुष म्हणे रे पुंडलिका । अंजनगांवासी जातोस कां ? । गुरु करायातें निका । त्या भागीच्या सल्ल्यानें ॥२४॥ जातोस तरी जावें त्वरित । त्याचें नांव काशीनाथ । तेथें जातां फिटेल भ्रांत । तुझी वेड्या निश्चयें ॥२५॥ कानांत कांहीं बोलला । म्हणून कां तो गुरु झाला । लोक कानगोष्टीला । किती तरी करतात ॥२६॥ मग ते एकमेकांचे । काय गुरु होती साचे । नादीं दंभाचाराचे । त्वां पुंडलिका पडूं नये ॥२७॥ तूं इकडे करी कान । मंत्र देतों तुजकारण । ' गण गण ' ऐसें बोलून । महाराज स्तब्ध जहाले ॥२८॥ आणखी काय आहे आस । ती मी आज पुरवीन खास । ऐसे ऐकतां पुंडलिकास । आनंद अति जाहला ॥२९॥ पाहूं लागला निरखून । स्वप्नीं त्या पुरुषालागून । तों पाहिलें गजानन । शेगांवचे स्वामी पहा ॥३०॥ पुंडलिक म्हणे गुरुराया । पादुका द्या ह्या मला सदया । नित्य पूजा करावया । यावीण आणखी आस नसे ॥३१॥ बरें उद्या दोन प्रहर । दिवस येतां साचार । पादुकांची पूजा कर । ह्या मी दिधल्या घेई तुला ॥३२॥ पादुका त्या घ्यावयाला । स्वप्नीं पुंडलिक उठून बसला । तोंच आली तयाला । साक्षात् जागृति श्रोते हो ॥३३॥ जागा होऊनी सभोंवार । पाहूं लागला साचार । तो कोणीच दिसेना अखेर । नाहीं पत्ता पादुकांचा ॥३४॥ उलगडा कांहीं होईना । संशय मनींचा जाईना । म्हणे स्वामींच्या भाषणा । बाट न लागला आजवरी ॥३५॥ स्वप्नीं येऊन दर्शन । त्यांनीं दिलें मजकारण । कशी भागी ठाकरीण । तेंही स्वप्नीं कथन केलें ॥३६॥ तैसेंच उद्यां दोन प्रहरीं । पादुकांची पूजा करी । ऐसें बोलले साक्षात्कारी । त्याचा समजूं काय अर्थ ? ॥३७॥ किंवा नव्या पादुका करून । म्यां करावें पूजन । ऐसें त्यांचें आहे मन । हें कांहीं कळेना ॥३८॥ मी पदींच्या मागितल्या । पादुका त्या होत्या भल्या । त्याच त्यांनीं मसी दिल्या । मग नव्या घेऊं कशास ? ॥३९॥ ऐसें नाना तर्क करी । पुंडलिक आपल्या अंतरीं । तों इतक्यांत आली घरीं । भागी ठाकरीण बोलावण्या ॥४०॥ अंजनगांवीं चाल आतां । मोक्ष गुरू करण्याकरितां । दिसूं लागला आहे आतां रस्ता । अरुणोदयाचे प्रकाशें ॥४१॥ पुंडलिक म्हणे भागाबाई । मी कांहीं येत नाहीं । मर्जी असल्यास तूंच जाई । अंजनगांवाकारणें ॥४२॥ मीं जो एकदां गुरु केला । श्रीगजानन महाराजाला । तो न आतां सोडी भला । हाच माझा निश्चय ॥४३॥ तें ऐकतां भागाबाई । अंजनगांवास गेली पाही । आतां मुंडगांवाचें ठाईं । काय झालें तें ऐका ॥४४॥ झ्यामसिंग रजपूत । गेला होता शेगांवांत । दर्शन स्वामींचें घेण्याप्रत । दोन दिवस याच्या आधीं ॥४५॥ तो जेव्हां मूंडगावाला । येण्या परत निघाला । तईं बाळाभाऊला । ऐसें बोलले महाराज ॥४६॥ या पादुका पुंडलिकासी । द्याया देई याच्यापासी । समर्थ आज्ञा होतां ऐसी । तैसेंच केलें बाळानें ॥४७॥ करीं घेऊन पादुका । झ्यामसिंगास बोलला देखा । भोकरे जो का पुंडलिका । तुमच्या गांवींचा असे हो ॥४८॥ त्यास ह्या द्या नेऊन । करायासी पूजन । तें झ्यामसिंगें ऐकून । पादुका घेतां जहाला ॥४९॥ झ्यामसिंग आला मुंडगांवांत । तों पुंडलिक भेटला वेशींत । पुसूं लागला त्याप्रत । कुशलवृत्त समर्थांचें ॥५०॥ प्रसाद मला द्यावयासी । कांहीं दिला का तुम्हांपासी ? । हें ऐकतां झ्यामसिंगासी । महदाश्चर्य वाटलें ॥५१॥ सवें घेऊन पुंडलिकाला । झ्यामसिंग घेऊन घरीं गेला । खोदून विचारूं लागला । तूं ऐसें कां विचारिलें ? ॥५२॥ पुंडलिकानें स्वप्नाची । गोष्ट त्याला कथिली साची । ती ऐकतां झ्यामसिंगाची । भ्रांति नष्ट झाली हो ॥५३॥ लगेच पादुका काढिल्या । पुंडलिकाच्या हातीं दिल्या । त्याच अजून आहेत भल्या । मुंडगांवांत त्याच्या घरीं ॥५४॥ दोन प्रहरीं पूजन । पुंडलिकानें केलें जाण । मनोभावें करून । त्या प्रसादी पादुकांचें ॥५५॥ पहा श्रोते खरें संत । सांभाळिती आपुलें भक्त । आडमार्गानें किंचित्‍ । जाऊं न देती तयांला ॥५६॥ निज भक्ताचे मनोरथ । समर्थ कैसे पुरवितात । तें येईल ध्यानांत । या कथेतें ऐकतां ॥५७॥ एक माध्यंदिन ब्राह्मण । कवर राजाराम म्हणून । होता धंदा करून । अकोल्यांत सराफीचा ॥५८॥ सोने चांदी भुसार । घेणें देणें साचार । मध्यम प्रतीचा सावकार । हा राजाराम कवर असे ॥५९॥ या राजारामाप्रती । महाराजाची होती भक्ती । म्हणून त्याची संतती । मानूं लागली समर्था ॥६०॥ या कवराकारण । दोन पुत्र होते जाण । गोपाळ त्र्यंबक म्हणून । लव्हांकुशांसारिखे ॥६१॥ कनिष्ठ पुत्र त्र्यंबकाप्रती । भाऊस व्यवहारीं बोलती । तो हैद्राबादेप्रती । गेला डाँक्टरी शिकावया ॥६२॥ लहानपणापासून । भाऊस होतें देवध्यान । म्हणजे त्र्यंबकालागून । हें येथें विसरूं नका ॥६३॥ कांहीं संकट पडल्यावरी । तो समर्थांचा आठव करी । राहून त्या भागानगरीं । मुसा नदीच्या कांठाला ॥६४॥ एवंच भाऊ भक्तिमान । होता लहानपणापासून । त्याचें दैवत गजानन । स्वामी शेगांवग्रामींचें ॥६५॥ तो सुटीमाजीं आला घरीं । इच्छा उपजली अंतरीं । जाऊनिया शेगांवनगरीं । जेवूं घालावें महाराजा ॥६६॥ पदार्थ त्यांच्या आवडीचे । करोनिया सर्व साचे । परी हें कैसें व्हावयाचें ? । हाच विचार पडला कीं ॥६७॥ भाऊ म्हणे गुरुनाथा । काय तरी करूं आतां । मरून गेली माझी माता । लहानपणींच दयाळा ॥६८॥ घरीं माझें नाही कोणी । एक बंधूची कामिनी । जिचें नांव आहे नानी । स्वभाव तापट तियेचा ॥६९॥ माझ्या आहे ऐसें मनीं । आपण करावी मेजवानी । आपुल्या आवडीचे करोनी । पदार्थ सारे गुरुराया ! ॥७०॥ भाकरी ती ज्वारीची । कांदा भाजी आंबाड्याची । ऊन पिठलें हिरवी मिर्ची । ऐसें तयार करावें ॥७१॥ हे पदार्थ करण्याला । सांगूं कसा मी भावजईला ? । हट्ट एक करण्याला । माता तेंच स्थान असे ॥७२॥ ऐसा विचार करीत । भाऊ राहिला निवांत । तों कांहीं कामानिमित्त । नानी आली ते ठायां ॥७३॥ नानी दिराला बोलली । चिंता कशाची लागली ? । मुखश्री ती म्लान झाली । तुमची कशानें ये वेळां ? ॥७४॥ भाऊ वदे दीनवाणी । काय तुला सांगूं वहिनी ? । माझे जे कां आले मनीं । विचार ते ये वेळां ॥७५॥ पूर्ण सत्तेवांचून । मनोरथ ना होती पूर्ण । म्हणून तुला सांगून । काय करणें आहे गें ॥७६॥ नानी म्हणे त्यावर । सांगून पहा एकवार । तूं माझा धाकटा दीर । मशीं पडदा ठेवूं नये ॥७७॥ ज्येष्ठ भ्राता पित्यापरी । तत् कांता माय खरी । मानिली पाहिजे साजिरी । तें तुम्ही जाणतसा ॥७८॥ तें ऐकून भाऊ हंसला । नानीप्रती बोलता झाला । नानी माझ्या मनाला । आज ऐसें वाटतें ॥७९॥ गजाननाच्या आवडीचे । सर्व पदार्थ करून साचे । आहेत मला न्यावयाचे । त्यांना द्याया शेगांवीं ॥८०॥ तें तूं जरी करशील । तरी तुलाही लागेल । पुण्य आणि होईल । काम माझें त्यायोगें ॥८१॥ तें ऐकतां बोले नानी । दिराप्रती हास्यवदनीं । यासाठींच कां हो मनीं । सचिंत तुम्हीं बैसलात ? ॥८२॥ सांगा आहे काय कारणें । मजला स्पष्ट शब्दानें ? । कांहीं ना आपुल्या गेहीं उणें । कृपेनें गजाननाच्या ॥८३॥ मग भाऊनें सर्व कांहीं । निवेदन केलें तिला पाही । तीही लागली लवलाही । आनंदानें स्वयंपाका ॥८४॥ भाजी चून भाकर । हिरव्या मिरच्या ओंजळभर । ठेविल्या आणून समोर । आपुल्या त्या दिराच्या ॥८५॥ भाकरी तीन, कांदे तीन । हरभर्‍याचें चून जाण । लोणी ठेविलें माखून । प्रत्येक त्या भाकरीला ॥८६॥ नानी म्हणाली दिराला । जा आतां शेगांवाला । वेळ थोडका राहिला । आहे पाहा गाडीस ॥८७॥ ती गाडी चुकल्यावरी । वाया जाईल तयारी । भोजनाच्या वेळेवरी । गेलांत तरी उपयोग ॥८८॥ ऐसेम नानीं बोलतां । भाऊ निघाला तत्त्वतां । पुसूनियां आपुल्या ताता । येतां झाला स्टेशनासी ॥८९॥ तों गाडी बाराची । निघूनियां गेली साची । तेणें चित्तवृत्ति भाऊची । होती झाली शोकाकुल ॥९०॥ अति हिरमोड त्याचा झाला । पाणी आलें लोचनांला । म्हणे महाराज कां हो केला । अव्हेर माझा ये कालीं ? ॥९१॥ मी मुळींच हीन दीन । कोठून घडावें मला पुण्य ? । आम्हां कावळ्यांकारण । लाभ केवीं मानसाचा ॥९२॥ अक्षम्य ऐसी कोणती । चुकी झाली माझ्या हातीं । म्हणून माझी गुरुमूर्ति । गाडी चुकली ये वेळां ? ॥९३॥ हाय हाय हे दुर्दैवा ! । त्वां माझा साधिला दावा । माझ्या करीं गुरुसेवा । घडूं न दिली आज तूं ॥९४॥ ही माझी शिदोरी । ऐशीच आज राहिली जरी । नाहीं करणार भोजन तरी । सत्य सत्य त्रिवाचा ॥९५॥ गुरुराया कृपारासी । नका उपेक्षूं लेंकरासी । ही शिदोरी सेवण्यासी । यावें धांवून सत्वर ॥९६॥ थोर आपुला अधिकार । क्षणांत पहातां केदार । मग या या येथवर । कां हो अनमान करितसां ? ॥९७॥ मी न आज्ञा तुम्हां करितों । प्रेमानें हांका मारितों । म्हणूनियां हा न होतो । अपमान तुमचा यत्किंचित् ॥९८॥ तीन घंटे अजून । अवकाश गाडीकारण । तोंवरी आपुलें भोजन । होईल ऐसें वाटतें ॥९९॥ ऐसा विचार करीत । तेथेंच बैसला उपोषित । चतुर्थ प्रहरीं शेगांवांत । आला तिहीच्या गाडीनें ॥१००॥ कवर गेला दर्शना । तईं तो योगीराणा । न करितां भोजना । बसला होता आसनीं ॥१॥ नैवेद्याची अतोनात । ताटें होतीं मठांत । पक्वान्नांनीं परिप्लुत । तीं वर्णावी कोठवरी ? ॥२॥ कोणाच्या जिलब्या घीवर । कोणाचा तो मोतीचूर । कोणाची ती नुसती खीर । श्रीखंड पुर्‍या कोणाच्या ॥३॥ परी त्या नैवेद्याला । समर्थांनीं ना स्पर्श केला । वरच्यावरी ताटाला । बाळा आणून ठेवीं पुढें ॥४॥ आणि म्हणे हें करा ग्रहण । गेला एक वाजून । आपुलें न झाल्या जेवण । प्रसाद भक्तां मिळतो कसा ? ॥५॥ त्यांची ते वाट पाहती । करण्या आपणां विनंति । त्यांची नसे होत छाती । म्हणून मी बोललों ॥६॥ तैं महाराज म्हणती थांब जरा । आग्रह नको करूंस खरा । आज भोजन चौथे प्रहरा । माझें होणार आहे रे ॥७॥ मर्जी असल्यास थांबावें । ना तरी खुशाल जेवावें । नैवेद्य घेऊनि घरा जावें । पर्वा नाही त्याची मला ॥८॥ ऐसा प्रकार तेथें झाला । तों इतुक्यांत भाऊ आला । समर्थ पाहतां आनंदला । भाऊ आपल्या मानसीं ॥९॥ दुरावलेली माय जेवीं । बाळकें दृष्टि पहावी । झालें असे पहा तेवीं । भाऊ कवराकारणें ॥११०॥ समर्थासी नमस्कार । केला साष्टांग साचार । उभा राहिला जोडोनी कर । वाट पाहत आज्ञेची ॥११॥ त्या भाऊस पाहून । समर्थें केलें हास्यवदन । बरेंच दिलेंस आमंत्रण । ही कां वेळ जेवण्याची ? ॥१२॥ तुझ्या भाकेंत गुंतलों । मी उपोषित राहिलों । नाहीं अजून जेवलों । आण तुझी शिदोरी ॥१३॥ ऐसें महाराज बोलतां । हर्षलासे कवर चित्ता । म्हणे काय करूं गुरुनाथा । गाडी चुकली बाराची ॥१४॥ कवरास म्हणे बाळाभाऊ । आतां नको दुःखित होऊं । काय आणलें आहेस पाहूं ? । समर्थासी जेवावया ॥१५॥ ऐसें ऐकतां सत्वरीं । कांदे भाजी भाकरी । कवरानें ठेविल्या समोरी । स्वामी गजाननाच्या ॥१६॥ त्यांतील भाकरी दोन । समर्थें केल्या भक्षण । एकीची तो प्रसाद म्हणून । अवघ्या भक्तां वांटिली ॥१७॥ तो प्रकार पहातां । आश्चर्य झालें समस्तां । कळली स्वामींची योग्यता । खरेच भक्तवत्सल ते ॥१८॥ जेवीं हस्तिनापुरांत । भगवंतानें ठेविला हेत । सोडून पक्वानाप्रत । विदुराच्या हुलग्यांवरी ॥१९॥ तैसेंच येथें आज झालें । आमचें पक्वान्न नाहीं रुचलें । भाकरीवरी गुंतलें । चित्त कवराच्या स्वामींचें ॥१२०॥ भाऊंनीही घेतला । सनर्थप्रसाद शेगांवला । सद्भाव येथें उदेला । तेथें ऐसेंच होणार ॥२१॥

समर्थ बोलले कवरासी । जा आतां अकोल्यासी । पास होशील पुढचे वर्षी । तूं डाँक्टरी परीक्षेंत ॥२२॥ भाऊ म्हणे गुरुराया । आपुली असूं द्यावी दया । यांविण दुसरें मागावया । मी न आलों ये ठाया ॥२३॥ आपुले हे दिव्य चरण । हेंच माझें धनमान । सर्वदा घडो चिंतन । आपल्या दिव्य मूर्तीचें ॥२४॥ ऐसें बोलून अकोल्याला । भाऊ कवर निघून गेला । समर्थ आपल्या भक्ताला । नुपेक्षिती कधींही ॥२५॥ शेगांवींचा राहणार । तुकाराम शेगोकार । एक होता भाविक नर । कृषिकर्म करीतसे ॥२६॥ घरची गरीबी होती खरी । काम करोनी शेतांतरीं । अस्तमानाचे अवसरीं । दर्शना यावें मठांत ॥२७॥ चिलीम द्यावी भरून । घ्यावें पदाचें दर्शन । कांहीं वेळ बसून । जावें पुन्हां शेतांतें ॥२८॥ ऐसा नित्यक्रम तयाचा । बहुत दिवस चालला साचा । घाला विचित्र दैवाचा । तो न कोणा सोडितसे ॥२९॥ जें जें असेल दैवांत । तें तें श्रोते घडून येत । एके दिनीं शेतांत । असतां तुकाराम आपुल्या ॥१३०॥ तों एक आला शिकारी । बंदुक ज्याच्या खांद्यावरी । नेम धरून ससे मारी । छरे घालून बंदुकींत ॥३१॥ ती प्रभातीची होती वेळा । सूर्य नुकतां उदयाला । तुकाराम होता बसला । आपल्या शेंती शेकत ॥३२॥ तों त्याच्या मागें कुपाटिला । एक होता बसलेला । ससा शुभ्र तोचि पडला । शिकार्‍याच्या दृष्टीसी ॥३३॥ त्याची शिकार करण्या भली । शिकार्‍यानें आपुली । नेम धरून झाडिली । खांद्यावरील बंदुक ॥३४॥ त्यायोगें ससा मेला । एक छरा लागला । त्या तुकाराम माळ्याला । कानामागें अवचित ॥३५॥ छरा मोठा जोरदार । मस्तकीं शिरला अखेर । थकले अवघे डाँक्टर । प्रयोग करून त्याचेवरी ॥३६॥ कांहीं केल्या निघेना । छरा तो डाँक्टरांना । होऊं लागल्या यातना । तुकारामासी अतिशय ॥३७॥ मस्तक दुखे अहोरात्र । निद्रा न लागे किंचित । नवस सायास केले बहुत । परी गुण येईना ॥३८॥ ऐशाही अवस्थेंत । यावें त्यानें मठांत । एके दिवशीं तो समर्थांचा एक भक्त । ऐसें बोलला तयाला ॥३९॥ डाँक्टर वैद्य सोडा आतां । साधूचिया सेवेपरता । नाहीं उपाय कोणता । उत्तम या जगामध्यें ॥१४०॥ कृपा त्यांची झाल्यास । चुकेल हा तुझा त्रास । झाडीत जा आसपास । या मठाच्या नित्य तूं ॥४१॥ तेव्हां सेवा ही घडेल । पुण्य़ तेंही लाधेल । कृपा झाल्या होशील । त्रासापासून मोकळा ॥४२॥ मात्र आपुल्या पित्यावरी । दांभिकतेनें हें ना करी । शुध्द भाव अंतरीं । सर्वकाळ धरावा ॥४३॥ तें तुकारामासी मानवलें । झाडणें त्यानें सुरूं केलें । अवघ्या मठास ठेविलें । स्वच्छ त्यानें आरशापरी ॥४४॥ ऐसीं चौदा वर्षें झालीं । तुकारामाई सेवा भली । तईं गोष्ट घडून आली । ऐशा रीतिं श्रोते हो ॥४५॥ झाडतां झाडतां कानांतून । छरा पडला गळून । जैसी कांती भोकरांतून । दावितां सुटे आंठोळी ॥४६॥ तैसें साच येथें झालें । छरा पडतां थांबलें । दुखावयाचें मस्तक भलें । ऐसा प्रभाव सेवेचा ॥४७॥ ही सेवा झाडण्याची । अखेरपर्यंत केली साची । प्रचीतिवीण कवणाची । परमार्थीं न निष्ठा बसे ॥४८॥ ती एकदां बसल्यावर । मग मात्र होते स्थिर । संतसेवा महाथोर । हे भाविक जाणती ॥४९॥ स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ । तारक होवो भाविकांप्रत । भवसिंधुमाझारीं ॥१५०॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ ॥ इति षोडशोऽध्यायः समाप्तः ॥

अध्याय १७
 
॥ श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी महामंगला । जयजयाजी भक्तपाला । जयजयाजी तमालनीला । पतितपावन नरहरे ॥१॥ हिरण्यकश्यपु महाक्रूर । सज्जनाचा शत्रू थोर । तयाचें तूं फाडून उदर । मरण त्याचें साधिलें ॥२॥ प्रल्हादरक्षणासाठीं । तूं जन्मलास स्तंभापोटीं । रुप अनुपम जगजेठी । धारण तें करुन ॥३॥ दांत दाढा भयंकर । आयाळ रुळे मानेवर । नेत्र जेवीं खदिरांगार । ब्रह्मांड जाळूं पहाती ॥४॥ त्या भयंकर रुपाची । भीति नसे  साची । पिलें जेवीं वाघिणीचीं । अंगावर खेळती तिच्या ॥५॥ तुम्हां पाहून देवराया । लक्ष्मी न धजे पुढें यावया । ऐशा स्थितींत लागला पाया । भक्त तुझा नरहरे ॥६॥ तूं भक्तवत्सल लक्ष्मीकांत । ऐसें सांगत आले संत । पुरविशी भक्‍तमनोरथ । नाहीं न त्यासी म्हणसी कदा ॥७॥ त्या आपुल्या ब्रीदासी । जाग आतां हृषीकेशी । दासगणू लागला पायांसी । अभय असूं दे पांडुरंगा ॥८॥ गजाननाचे परम भक्त । होते कांहीं अकोल्यांत । तयाचीया सदनाप्रत । हमेशा यावें समर्थांनीं ॥९॥ चापडगांवचे बापु कृष्ण । खटाऊ शेटचें कुटुंब जाण । गोडू लालाचा नंदन । बच्चुलाल नाम ज्याचें ॥१०॥ जीजीबाई पंडित । आणीकही होते बहुत । त्यांचीं नांवें तुम्हांप्रत । किती सांगूं विबुध हो ॥११॥ एके वेळीं अकोल्यांत । आले गजानन स्वामी समर्थ । खटाऊच्या गिरणींत । मुक्काम त्यानें ठेविला ॥१२॥ एक भक्त मलकापुरीं । विष्णूसा नामें निर्धारी । त्याच्या वाटलें अंतरीं । समर्थ आणावें मलकापुरा ॥१३॥ त्यानें आमंत्रणाचा वशिला । भास्कराच्या द्वारें लाविला । हाच भास्कर होता झाला । समाधिस्थ अडगांवीं ॥१४॥ तो त्या वेळीं होता जवळ । करी कारभार अंगें सकळ । विष्णूसाला होतें बळ । याच भास्कर पाटलाचें ॥१५॥ भास्कर म्हणे मलकापुरीं । चला समर्था लवकरी । भक्त विष्णूसाच्या घरीं । बोलावण्यास आला तो ॥१६॥ मनोरथ येथील भक्तांचे । तुम्हीं पुरविले असती साचे । आतां मलकापुरीचे । लोक वाट पहाती ॥१७॥ तईं समर्थ म्हणाले भास्करा । सध्यांच मी मलकापुरा । येत नाहीं जाण खरा । तूं आग्रह करुं नको ॥१८॥ फार आग्रह करशील । तरी फजीत पावशील । याचा विचार करी खोल । मी न बोललों कांहीं तरी ॥१९॥ दोरीसी दिधल्या फार ताण । ती मध्येंच तुटतसे जाण । मी न हलणार येथून । तूं या फंदांत पडूं नको ॥२०॥ भास्कर बोले त्यावरी । कांहीं असो मलकापुरीं । चला विष्णूसाचे घरीं । हीच विनंति गुरुराया ! ॥२१॥ मी तुमचा लाडका । मसी धक्का देऊं नका । मी भरंवसा दिला देखा । तुम्हां घेऊनि येण्याचा ॥२२॥ ती प्रतिज्ञा माझी पुरी । तुम्हीं करावी आज खरी । चला आतां स्टेशनावरी । गाडींत बसायाकारणें ॥२३॥ ऐसा आग्रह करुन । घेऊन आला गजानन । मलकापुराकारण । न्यावयासी श्रोते हो ! ॥२४॥ भास्करानें विनवणी । स्टेशनमास्तरा करोनी । बारा जणांचा डबा त्यांनीं । खाली करविला संतास्तव ॥२५॥ महाराज तैसेंच बैसले । ते न कांहीं बोलले । जागेवरुन नाहीं उठले । गाडी सुटेपर्यंत ॥२६॥ तों गाडी सुटण्याचा । घंटा झाला अखेरीचा । डोळा चुकवून भास्कराचा । लीला केली ऐशा रीतीं ॥२७॥ जो डबा मोकळा केला । तो त्यांनीं सोडून दिला । योगीराज जाऊन शिरला । बायकांच्या डब्यामध्यें ॥२८॥ आधींच मूर्ति दिगंबर । स्त्रिया घाबरल्या असती फार । त्यांनीं वर्दी अखेर । दिली असे पोलिसाला ॥२९॥ पोलिसाचा अधिकारी । तेथें आला सत्वरीं । महाराजाला धरुन करीं । खालीं ओढूं लागला ॥३०॥ अरे वेडया नंग्या पीरा । अक्कल कैसी तुज ना जरा । बायकांच्या डब्यांत खरा । येऊन कैसा बैसलास ? ॥३१॥ हिसडा देऊन त्याच्या हाता । तेथेंच बसले तत्त्वतां । अधिकार्‍याची भीति चित्ता । मुळीं न त्यांच्या वाटली ॥३२॥ मग तो अधिकारी भला । स्टेशन मास्तराकडे गेला । म्हणे डब्यापासीं आतां चला । बायकाच्या माझ्यासवें ॥३३॥ दोघे डब्याजवळ आले । तों मास्तरानें पाहिलें । योगीराज बसलेले । बायकांच्या डब्यांत ॥३४॥ मास्तर पोलिसाच्या अधिकार्‍याला । ऐशा रीतीं बोलला । तुम्ही जाऊं द्यावें याला । याच डब्यांत बसून ॥३५॥ हा आहे संत थोर । चालता बोलता ईश्वर । याच्या हातें न होणार । गुन्हा तो केव्हांही ॥३६॥ तें ऐकून अधिकारी । बोलता झाला ऐशापरी । मी दिली आहे तार खरी । येविषयीं वरिष्ठाला ॥३७॥ आतां माझ्या हातांत । कांहीं न राहिलें यत्किंचित । मीं वर्दी दिली तुम्हांप्रत । तुम्ही वाटेल तें करा ॥३८॥ स्टेशनमास्तरांनीं । आपली टोपी काढूनी । बहु आदर दाखवोनी । विनंती केली महाराजा ! ॥३९॥ तुम्हीं खालीं उतरावें । माझें एवढें ऐकावें । कायद्याचें आणावें । प्रयोजन आपुल्या मानसीं ॥४०॥ महाराज उतरले खालतीं । पुढें खटला भरला त्यांचेवरती । कायद्याप्रमाणें निश्चिती । जठार साहेबासमोर ॥४१॥ त्यांनीं फिर्याद घेतली । त्याची तारीख नेमली । शेगांवावरती भली । चौकाशीची श्रोते हो ! ॥४२॥
17

बापुसाहेब जठार । आले शेगांवाच्यावर । डाक बंगल्यांत झाले स्थिर । करण्या चौकशी खटल्याची ॥४३॥ व्यकंटराव देसाई । अकोल्याचे होते पाही । तेही आले ते ठाईं । कांहीं कामानिमित्त ॥४४॥ महाराजांच्या खटल्याची । गांवीं पुकार झाली साचि । म्हणून मंडळी शेगांवाची । फार मिळाली बंगल्यावर ॥४५॥ तैं देसाई म्हणती जठरास । आज कोणता खटला विशेष । तुम्हांपुढें आहे खास । म्हणून मिळाले लोक हे ॥४६॥ जठार म्हणाले त्यातें । याचें कारण तुम्हांतें । कैसें न कळलें ? वाटतें । हेंच मला आश्चर्य ! ॥४७॥ तुमचे स्वामी गजानन । नंगे फिरती म्हणून । पोलिसांनीं भरुन । हा खटला पाठविला ॥४८॥ त्या खटल्याची चौकशी । होणार आहे आज दिवशीं । म्हणून वाटतें ऐसें मसी । लोक हे जमले असावेत ॥४९॥ हें ऐकतां भाषण । व्यकंटराव झाले खिन्न । बोलते झाले कर जोडून । खटला हा न चालवावा ॥५०॥ श्रीगजानन साधूची। योग्यता आहे थोर साची । मी मूर्ति भगवंताची । आहे पाहा प्रत्यक्ष ॥५१॥ तो विदेही पुरुष जाणा । बंधन त्याला कशाचें ना । तो योग्यांचा योगीराणा । वंदनीय अवघ्यांतें ॥५२॥ खटला भरला हीच केली । पोलिसांनीं चूक भली । ती पाहिजे दुरुस्त झाली । आज आपुल्या करानें ॥५३॥ जठार म्हणती वकिलाला । तुम्ही जाणतां कायद्याला । याचा पाहिजे होता केला । विचार तो पोलिसांनीं ॥५४॥ कारकुना म्हणती बोलावणें । धाडा गजाननाकारणें। तें ऐकून एक त्यानें । जवान पोलिस पाठविला ॥५५॥ तो येऊन समर्थासी । म्हणे चला आतां कचेरीसी । अधिकार्‍यानें तुम्हांसी । मज धाडिलें बोलावण्या ॥५६॥ बर्‍या बोलानें चलावें । फजितीस ना करुन घ्यावें । ना तरी मला लागेल न्यावें । तुमच्या हाता धरुन ॥५७॥ तईं वदले गजानन । आम्ही न उठूं येथून । तुझें पहातों शिपाईपण । ये धरीं माझ्या करा ॥५८॥ शिपायाचा हात धरिला । तो ना सुटे किमपि त्याला । रक्तप्रवाह बंद झाला । त्या दाबाच्या योगानें ॥५९॥ हातासी लागली कळ । जीव झाला व्याकुळ । करुं लागला तळमळ । शिपाई तो त्याच ठाईं ॥६०॥ शिपायासी वेळ झाला । म्हणून पाठविलें वकिलाला । त्या व्यंकटराव देसायाला । समर्थासी आणावया ॥६१॥ जठार म्हणती तुम्हीं जावें । समर्थासी घेऊन यावें । लोकांसी न जमूं द्यावें । बंगल्याभोंवतीं निरर्थक ॥६२॥ इतक्यांत आला समाचार । पोलिसाचा धरला कर । बसविला एक्या जागेवर । महाराजांनीं सहज लीलें ॥६३॥ मग देसाई तेथें आले । त्यांच्या भक्तासी बोलले । या वेळीं नेसविलें । पाहिजे समर्थां धोतर ॥६४॥ ऐसी सल्ला मिळतांक्षणीं । धोतर नेसविलें भक्तांनीं । तें टाकिलें सोडोनी । समर्थांनीं रस्त्यांत ॥६५॥ गेले नागवे कचेरीस । सवें होतां भास्करशिष्य । जठारांनीं पाहतां त्यास । दिली खुर्ची बसावया ॥६६॥ या महाराज बसा येथ । तुम्ही नागवे गांवांत । कां फिरतां सदोदित । हें कांहीं बरें नव्हे ॥६७॥ नागवें फिरणें हाच गुन्हा । कायद्यांनीं ठरविला जाणा । म्हणून विनंति आपणा । द्या हें सोडून नंगेपण ॥६८॥ ऐसें जठारांचें भाषण । घेतलें स्वामींनीं ऐकून । आणि केलें हास्य वदन । उत्तर त्यासी द्यावया ॥६९॥ तुला काय करणें यासीं । चिलीम भरावी वेगेंसी । उगीच नसत्या गोष्टीशीं । महत्त्व न यावें निरर्थक ॥७०॥ तें ऐकतां भाषण । जठार गेले विरघळोन । जनरीतीचें याला भान । मुळींच नाहीं राहिलें ॥७१॥ हा वृषभदेव भागवतीचा । किंवा शुकाचार्य साचा । किंवा वामदेवाचा । हा दुसरा अवतार ॥७२॥ हा निजानंदीं सदा रत । खचित आहे जीनन्मुक्त । नये लावितां याप्रत । गुन्हा विचारें केव्हांही ॥७३॥ जेवीं अग्नीचा अग्नीपणा । अग्नि सोडीत नसे जाणा । परी अग्निहोत्र्यांना । कुंडांत ठेवणें भाग त्यासी ॥७४॥ अग्निदेव म्हणोन । ठेविल्या कुंडावांचून । तो करील दग्ध सदन । हा दोष त्याचा नसे ॥७५॥ तैसें याचें नागवेपण । आहे अग्निचे समान । म्हणून याचा शिष्यगण । आहे अपराधी येविषयीं ॥७६॥ वस्त्ररुपी कुंडाठायीं । जरी हा ठेविला असतां पाही । तरी हरकत नव्हती कांहीं । सर्वांस सुखद होतें तें ॥७७॥ ऐसा विचार पूर्ण केला । जठरांनीं चित्तीं भला । आणि हुकूम फर्माविला । त्यांनीं पुढीलप्रमाणें ॥७८॥ महाराज मूळचे जीवन्मुक्त । त्या ठेवणें व्यवस्थित । भास्कराचें काम सत्य । होतें न तें केलें त्यांनीं ॥७९॥ म्हणून मीं भास्कराला । पांच रुपये दंड केला । ऐसा खटल्याचा निकाल झाला । जठारापुढें शेगांवीं ॥८०॥ समर्थ म्हणाले भास्करासी । पुन्हा ऐशा आग्रहासी । करशील कां सांग मशीं । निज फजिती करुन घ्याया ? ॥८१॥ भास्कर कांहीं न बोलला । मौन धरुन राहिला । तेथोन मंडळींनीं केला । ऐशा प्रकारें विचार ॥८२॥ समर्थासी अग्निरथीं । न बसवा येथून कल्पांतीं । विनाकारण कटकटी होती । तें कांहीं बरें नव्हे ॥८३॥ हा क्रम कित्येक दिवस । चालला असे शेगांवास । भक्त बैलाच्या गाडीस । बसवूं लागले महाराजा ॥८४॥ या रीतीं अकोल्यासी । आले एकदां पुण्यराशी । बापुरावाच्या सदनासी । जाऊनियां उतरले ॥८५॥ याच वेळीं यवन जातीचा । साधु महताबशा नांवाचा । होता कुरुम गांवीं साचा । मूर्तिजापुरा सन्निध ॥८६॥ त्यानें बापुरावाप्रती । सांगितलें होतें ऐशा रीतीं । जेव्हां समर्थ अकोल्यास येती । तेव्हां आम्हां कळवावें ॥८७॥ अकोल्यांत आल्यावर । श्रीगजानन साधुवर । बापुरावानें सत्वर । मनुष्य धाडिला कुरुमासी ॥८८॥ तों ऐशा रीतीं घडून आलें । महातबशा येण्या निघाले । अकोल्यास याया भले । समर्थासी भेटावया ॥८९॥ अकोल्याचा मनुष्य । मध्यें भेटला रस्त्यास । जो आला होता न्यावयास । महताबशाकारणें ॥९०॥ तो मनुष्य भेटतांक्षणीं । कीं पुसूं लागले मधुरवचनीं । त्या मनुष्यालागुनी । महताबशा श्रोते हो ! ॥९१॥ तूं न जावें कुरुमाला । बैस आमच्या गाडीला । आपण जाऊं स्टेशनाला । मीच आहे महताबशा ॥९२॥ पाहा संत आल्याचें वर्तमान । कळलें संतालागून । कोणी न सांगतां जाण । त्रिकालज्ञ ते खरोखरी ॥९३॥ महताबशाच्या संगातें । दोन चार यवन होते । अवघे येऊन सदनातें । उतरले बापुरावाच्या ॥९४॥ दुसरे दिवशीं प्रातःकाळा । महताबशा होता जेथें बसला । महाराज आले तया स्थळा । निजलीलें करुन ॥९५॥ महताबशाचे धरुन केंस । समर्थांनीं ताडिलें त्यास । त्या ताडण्याचा उद्देश । हाच होता विबुध हो ! ॥९६॥ यवनजातींत जन्मून । कांहीं न केला उपयोग जाण । यवनाचें आंडदांडपण । नाहीं अजून गेलें रे ॥९७॥ या आडदांडपणांनीं । तत्त्वघात होईल जाणी । मृत्युलोकींचे अवघे प्राणी । चिंताग्रस्त होतील ॥९८॥ तुझें महताब आहे नांव । त्याची काय आठवण ठेव । दोषरुपी तमा वाव । तुझ्यापुढें मिळूं नये ॥९९॥ हा द्वेषरुपी अंधार । वाढत चालला वरचेवर । याची नाहीं तुला खबर । म्हणून तुजला ताडिलें ॥१००॥  ऐसा मिळतां इशारा । महताबशातें तोषला खरा । साधूच साधूच्या अंतरा । जाणताती निःसंशय ॥१॥ जेव्हां महताबशा तें ताडिलें । तईं संगतीचे यवन भले । कावरेबावरे होते झाले । तो प्रकार पाहून ॥२॥ महताबशा बोलला त्यासी । तुम्ही न राहावें । आम्हांपासीं । जावें निघून कुरुमासी । हेंच आहे उत्तम ॥३॥ शेख कडू शिवाय जाण । गेले चौघे निघून । तो द्यावयासी आमंत्रण । बच्चुलाल पातला ॥४॥ म्हणे उद्यां दयाघना ! । यावें तुम्हीं भोजना । या दासाचिया सदना । हीच आहे विनंति ॥५॥ दुसरे दिवशीं तांग्यांत । बसवूनी समर्थाप्रत । मोठया थाटांनीं मिरवीत । निज सदना आणिलें ॥६॥ परी समर्थ तांग्याखालीं । उतरले नाहींत मुळीं । तेणें मंडळी चिंतावली । म्हणे कां ना उतरती हे ॥७॥ तसाच तांगा नेला परत । बापुरावाच्या सदनाप्रत । मंडळी पडली घोटाळ्यांत । समर्थें ऐसें कां केलें ? ॥८॥ काल आमंत्रण घेतलें । आज तांग्याखालीं न उतरले । याचें कारण शोधिते झाले । आपापल्या बुद्धीनें ॥९॥ त्यात होता एक धूर्त । तो बोलला अवघ्यांप्रत । मला समजलें इंगित । या गोष्टीचें ये वेळां ॥११०॥ महताबशाला वगळीलें । म्हणून महाराज नाहीं उतरले । भोजनाचें कां न केलें । महताबशाला आमंत्रण ॥११॥ आतां घेऊन दोघांसी । बसून एका तांग्यासी । म्हणजे ते निश्चयेंसी । उभयतांही येतील ॥१२॥ तेंच वाक्य खरें झालें । दोघांलाही मिरवीत नेलें । महताबशाला उतरविलें । मंदिराजवळील थेटरांत ॥१३॥ श्रीरामाच्या मंदिरीं । गजाननाची उतरली स्वारी । परी तेही गेले अखेरी । उठोनियां थेटरांत ॥१४॥ अवघ्यांचीं झालीं भोजनें । मग महताबशा लोकांस म्हणे । मला तुम्ही तिकिट देणें । पंजाबचें काढून ॥१५॥ तैं शेख कडू बोलला । त्या महताबशा फकिराला । तुम्ही कुरुमच्या मशीदीला । टाकून कैसें जातां हो ? ॥१६॥ ती मशीद बांधून । पंजाबाशीं जावें आपण । काम अर्धें टाकून । जाणें उचित नसे तुम्हां ॥१७॥ महताब शेख कडूशीं । बोलता झाला प्रेमेशीं । आग्रह करुं नका मशी । ये वेळीं निरर्थक ॥१८॥ गजाननाचा हुकूम झाला । मजसी पंजाबांत जाण्याला । आतां एक क्षणही या स्थळा । मी न राहूं शके हो ॥१९॥ समर्थाच्या कृपेंकरुन । मशिदीचें काम पूर्ण । होईल हें माझें वचन । सत्य तुम्ही मानावें ॥१२०॥ धर्माविषयीं द्वैत । संताठाईं नसतें सत्य । तें अवघ्यां धर्माप्रत । समसमान मानिती ॥२१॥ खुळें देऊळ मशिदीची । तुम्ही नका वाढवूं साची । ती वाढतां दोघांची । आहे हानि होणार ॥२२॥ सामान देऊळ मशिदीचें । एकची आहे साचें । आकारानें भिन्नत्व त्याचें । मानून भांडूं नये हो ॥२३॥ यवन तेवढा खुदाचा । आणि हिंदु काय भूताचा ? । पोक्त विचार करा याचा । मनुष्यपण टिकवावया ॥२४॥ तरीच होईल कल्याण । हिंदु आणि मुसलमान । हीं एकाच देवापासून । निर्माण असती जाहले ॥२५॥ धर्म बापा ज्याचा त्यांनीं । प्रिय मानावा प्राणाहूनी । परी विधर्म्यांच्या ठिकाणीं । अलोट प्रेम धरावें ॥२६॥ हें न झालें जोंवरी । सौख्य लांब तोंवरी । जा मशीद होईल पुरी । गजाननाच्या कृपेनें ॥२७॥ महताबशा निघून गेले । पुनः न इकडे परत आले । या गोष्टीचें पाहिजे केलें । मनन हिंदुयवनांनीं ॥२८॥ पाहा महताबशाला जरी । ताडिते झाले साक्षात्कारी । परी द्वेष नव्हता अंतरीं । प्रेम अलोट होतें हो ॥२९॥ शाहालागीं घेतल्या । विना । भोजना न गेला योगीराणा । हे मुद्दे मनीं आणा । या गोष्टींचे श्रोते हो ! ॥१३०॥ असो या बापुरावाची । कांता एक होती साची । तिला भानामतीची । बाधा होती विबुध हो ! ॥३१॥ मळवट यावा घटकेंत । घटकेमाजीं कंठीं तात । घटकेमाजीं वस्त्रांप्रत । अग्नी तो लागावा ॥३२॥ बिब्याच्या पाठीवर । फुल्या याव्या अपरंपार । कधीं दांडीवरील चीर । जळून जावें अकस्मात ॥३३॥ या भानामतीच्या त्रासांनीं । ती बापुरावाची कामिनी । क्षीण गेली होवोनी । अन्नपाणी न रुचे तिला ॥३४॥ भानामती काढण्याला । बापुरावें जाणत्याला । आणले बाहून अकोल्याला । परी न झाला उपयोग ॥३५॥ खर्चहि झाला अतोनात । गुण न आला किंचित । अखेर त्यानें जोडिले हात । श्रीगजाननस्वामीला ॥३६॥ महाराज माझ्या कुटुंबाला । भानामतीचा त्रास झाला । केले नाना उपायाला । आतां मात्र कंटाळलों ॥३७॥ तुझीं पाउलें माझ्या घरा । आज लागलीं गुरुवरा ! । तेथेंच कां आसरा । भानामतीस मिळावा ? ॥३८॥ ज्या दरींत पंचानन । बसला आहे येऊन । तेथेंच कां ओरडून । दिमाख दाखवावा कोल्ह्यांनीं ॥३९॥ जेथें कस्तुरी दरवळली । तेथेंच कां हो रहावी भली । गुरुराया ही ओंगळी । घाण भानामतीची ॥१४०॥ ऐसी विनंती ऐकून । गजाननांनीं अवलोकन । केलें निजकृपें करुन । बापुराव कांतेला ॥४१॥ त्यायोगें श्रोते तिची । भानामती निमाली साची । नाहीं किंमत माकडाची । सिंहाचिया पुढें हो ॥४२॥ असो एकदां फिरत फिरत । महाराज आले आकोटांत । नरसिंगजीला भेटण्याप्रत । बंधु आपला म्हणोनी ॥४३॥ त्याच्या मठाशेजारीं । एक विहीर होती खरी । जाऊन त्या विहिरीवरी । बसले गजाननमहाराज ॥४४॥ पाय आंत सोडिले । डोकावून पाहूं लागले । आंतील जलालागीं भले । वरच्यावरी श्रोते हो ॥४५॥ पाहून त्यांची ऐशी कृति । लोक साशंक झाले चित्तीं । नरसिंग महाराज विचारती । अरे हें काय करतोस ! ॥४६॥ गोदा यमुना भागीरथी । तुम्हांसाठीं येथें असती । आणखी तीर्थें आहेत किती । हें पाहातों डोकावून ॥४७॥ तुला त्यांचें घडतें स्नान । मी कां राहूं तसाच जाण ! । या तीर्थांनीं मला स्नान । आज येऊन घालावें ॥४८॥ त्यांनीं स्नान घातल्याविना । मी न येथून हले जाणा । ऐशा ऐकून भाषणा । कैक म्हणाले या रीतीं ॥४९॥ खरोखरी हा आहे पिसा । शेगांव नादीं लागला कैसा ! । जरा थांबा येथेंच बसा । काय करी हा पाहुं पुढें ॥१५०॥ तों विहिरींतील जलाप्रत । उकळ्या उठल्या अगणित । श्रोते एका निमिषांत । विहीर भरली पाण्यानें ॥५१॥ हजारों कारंज्याच्या परी । गजाननाच्या अंगावरी । वर्षूं लागले पहा वारी । त्या विहिरीचें तेधवां ॥५२॥ लोकां म्हणती गजानन । या रे स्नानालागून । नाहीं उरलें प्रयोजन । विहिरीमाजीं उतरण्याचें ॥५३॥ गंगा यमुना गोदावरी । वरता आली आहे खरी । स्नान साधा ये अवसरीं । या पुण्य सरितेचें ॥५४॥ भाविकांनीं केलें स्नान । निंदकांनीं खालीं मान । घातली तो पाहून । प्रकार त्या पाण्याचा ॥५५॥ संत जें जें आणती मनीं । तें तें पुरवी चक्रपाणी। त्यांच्या वाणीलागुनी। असत्यता न दे परमात्मा ॥५६॥ स्नान होतां समर्थ उठले । पाणी पहिल्यापरि झालें । विहिरीच्या त्या तळास गेलें । उकळ्या बंद जाहल्या ॥५७॥ नरसिंगजीसी भेटून । निघून गेले दयाघन । शेगांवासी बैसून । मनोवेगाच्या वारुवरी ॥५८॥ स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ । तारक होवो भवाब्धींत । भाविक भक्तांकारणें ॥१५९॥ शुभं भवतु । श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ ॥ इति सप्तदशोऽध्यायः समाप्तः ॥

अध्याय १८
 
॥ श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी चिद्रिलासा । हे गोविंदा श्रीनिवासा । हे आनंदकंदा परेशा । पाहि माम् दीनबंधो ॥१॥ हे केशवा केशीमर्दना । हे माधवा मधूसुदना । हे पूतनाप्राणशोषणा । पांडुरंगा रुक्मिणीपते ॥२॥ काय माझ्या आहे मनीं । तें तूं जाणसी चक्रपाणी । तेंच का रे तुजलागुनी । बोलून दावूं पद्मनाभा ॥३॥ भक्त जी जी इच्छा करी । ती तूं पुरविसी श्रीहरी । ऐसें पुराणाभीतरीं । आहे वर्ण्न बहुसाळ ॥४॥ म्हणून माझ्या मनोरथा । पूर्ण करा पंढरीनाथा । सोडा मनींची कठोरता । दासगणू हा तुझा असे ॥५॥ अकोटाचे शेजारीं । मुंडगांव नामें एक नगरीं । तेथें बायजा नामें खरी । समर्थाची भक्तीण असे ॥६॥ हळदी माळ्याच्या वंशांत । इचा जन्म झाला सत्य । शिवराम नामें इचा तात । भुलाबाई जननी असे ॥७॥ बायजाचे बाळपणीं । लग्न झालें होतें जाणी । ललाटीं जें विधात्यांनीं । लिहिलें असेल तेंच घडे ॥८॥ बायजा आली तारूण्यांत । गर्भाधान करण्याप्रत । घेऊन गेला तिचा तात । जामाताच्या गृहासी ॥९॥ परी उपयोग नाहीं झाला । जामात षंढ होता भला । तेणें जनकजननीला । शिक झाला अनावर ॥१०॥ बायजेकडे पाहून । जननी करी रोदन । माझ्या बाईचें तारूण्य । वांझ पाहूं राहातें ॥११॥ भुली म्हणे शिवरामासी । बायजा न ठेवा ऐशी । दुसरा नवरा करून इसी । देणें आहे भाग पाहा ॥१२॥ शिवराम म्हणे त्यावर । ऐसा नको सोडूं धीर । हा पुरुषत्वाचा प्रकार । खरा एकदम कळेना ॥१३॥ कांहीं दिवस वाट पाहूं । नको ऐसी अधीर होऊं । बायजासी येथेंच ठेवूं । तिच्या सासुरवाडीला ॥१४॥ नपुसकत्व अधोपरी । आलें असेल त्याला जरी । तें औषधानें होईल दुरी । वाट पाही यास्तव ॥१५॥ ऐसें उभयतां बोलून । बायजासी तेथें ठेवून । आले मुंडगांवाकारण । आपुल्या घरातें ॥१६॥ बायजीचें वय पंधरासोळा । वर्ण काळासावळा । तारुण्यानें मुसमुसला । होता जिचा शरीरभाग ॥१७॥ डोळे नाक पाणीदार । बांधा उंच मनोहर । जिला पाहातां अंतर । कामुकाचें मोहित होई ॥१८॥ तिच्या थोरल्या दिरासी । पाहूनियां बायजासी । इच्छा जाहली मानसीं । संभोग तिचा करावया ॥१९॥ त्यानें प्रयत्न केले नाना । वळवावया तिच्या मना । म्हणूं लागला क्षणक्षणा । ऐसें बायजाकारणें ॥२०॥ हताश ऐशी मुळीं न होई । मीच तुला पतीचे ठायीं । आमरण करीन पाही । तुझें वेडे संगोपन ॥२१॥ झुरणें दे हें सोडून । आनंदित ठेवी मन । वेडे आजपासून । मीच नवरा समज तुला ॥२२॥ ऐसें त्यानें सांगावें । चाळे नाना करावें । कांहीं आमिष दावावें । चित्त तिचें भुलवाया ॥२३॥ परी उपयोग होईना । बायजीच्या न हें येई मना । ती म्हणे हे नारायणा ! । कां रे दैन्य मांडलेंस ? ॥२४॥ बाळपणापासून । ध्याइले मीं तुझे चरण । त्याचेंच कां हें मजलागून । फल दृष्टीं पडावें ? ॥२५॥ जयाचा मीं हात धरिला । तो ना पुरुष कळून आला । दैवयोग समजून चुकला । संसार नशिबीं नाहीं मम ॥२६॥ बरें झालें तुझ्याठायीं । चित्त आतां रमेल पाही । कृपा करीरे शेषशायी । स्पर्श पुरुषाचा न होवो मला ॥२७॥ ज्येष्ठ दीर एके दिवसीं । येता झाला बायजापासीं । आपला हेतु कळविण्यासी । रात्रीचिया समयाला ॥२८॥ तों बायजानें इनकार । करून केलें उत्तर । कैसी लाज तिळभर । नाहीं उरलीं चित्तीं तुझ्या ॥२९॥ तूं माझा ज्येष्ठ दीर । पित्यापरीस साचार । सोडा हा अविचार । स्वैर ऐसा होऊं नको ॥३०॥ ह्या तियेच्या भाषणा । तो ना आणी मुळीं मना । होतां कामाची वासना । नीति विलया जातसे ॥३१॥ अंगावरी टाकण्या हात । जों तो पाही इतक्यांत । तयाचा तो थोरला सुत । माडीवरून पडला हो ॥३२॥ खोक पडली डोक्यासी । बायजेनें धरिलें त्यासी । बसवून आपुल्या मांडीसी । औषध लावूं लागली हो ॥३३॥ बायजा म्हणे ज्येष्ठ दीरा । या गोष्टीचा विचार करा । अभिलाष तो नाहीं बरा । परस्त्रियेचा केव्हांही ॥३४॥ मुलगा पडलेला पाहून । भय पावलें त्याचें मन । अनुताप त्यासी झाला पूर्ण । केलेलिया कर्माचा ॥३५॥ त्यानें नाद सोडिला । सदनीं निवांत राहिला । पुढें शिवराम घेऊन गेला । कन्येस आपुल्या मुंडगांवीं ॥३६॥ भुलाई म्हणे पतीसी । चला जाऊं शेगावांसी । महाराजातें पुसायासी । पुढील भाकीत बायजेचें ॥३७॥ तें मानेलें शिवरामासी । आला घेऊन कन्येसी । महाराजांतें पुसायासी । आपुल्या त्या कांतेसह ॥३८॥ बायजा घातली पायांवर । केली विनंति जोडून कर । कृपा करा या मुलीवर । पुत्र पौत्र द्यावे हिला ॥३९॥ तें समर्थांनीं ऐकिलें । शिवरामासी हांसत वदले । अरे नशिबीं नाहीं लिहिलें । विधात्यानें पुत्र हिच्या ॥४०॥ जेवढे पुरुष जगतांत । तेवढे असती हिचे तात । उगे न पडा फंदांत । लग्न हिचें करण्याच्या ॥४१॥ तें ऐकतां शिवरामाला । अनावर शोक झाला । घेऊन त्या बायजाला । परत आला मुंडगांवीं ॥४२॥ परी त्या समर्थवचनांनी । बायजा आनंदली मनीं । निष्ठा गजाननाच्या चरणीं । जडली तेव्हांपासून ॥४३॥ समर्थांचा एक भक्त । पुंडलिक नामें मुंडगांवांत । त्याच्या संगें शेगांवांत । बायजा येऊं लागली ॥४४॥ पहिल्या प्रथम अडथळा । जननीजनकें नाहीं केला । शेगांवांस जाण्याला । पुंडलिकाचे बरोबर ॥४५॥ त्यांना ऐसें वाटलें । साधुचरण इनें धरिले । तेच तिच्या करतील भले । निजकृपेनें कल्याणा ॥४६॥ पुरुषत्व देतील जामातासी । अशक्य ना कांहीं संतांसी । ऐसा विचार मानसीं । करून राहिले स्वस्थ ते ॥४७॥ पुंडलिकाचे बरोबरी । बायजा जाऊं लागली खरी । तेणें पुकार जगभरी । ऐशा रीतिं जाहली ॥४८॥ हें शेगांवच्या वारीचें । ढोंग आहे दोघांचें । तरुणपणीं मानवाचें । मन परमार्थी लागेना ॥४९॥ बायजा आहे तरणीज्वान । पुंडलिकासीही तारुण्य । यांची वारी विषयभान । हीच आहे निःसंशय ॥५०॥ परस्परें प्रीति जडली । विषयसुखाची नवाळी । गण्या ही युक्ति केली । वाटते या उभयतांनीं ॥५१॥ पुंडलिक जरी माळी असता । तरी हा संबंध योग्य होता । बायजाच्या धरण्या हाता । कां कीं तरुण दोघेही ॥५२॥ पुंडलिक आहे मराठी । ही माळ्याच्या आली पोटीं । म्हणून यांची ताटातुटी । केलीच पाहिजे जातीस्तव ॥५३॥ या दोघांचें अंतर । शुध्द होतें साचार । नव्हता कामाचा विकार । मनीं उत्पन्न जाहला ॥५४॥ भुलाई म्हणे बायजासी । तूं कां कारटे अहर्निशीं । पुंडालिकाच्या घरा जासी । हें कांहीं कळेना ॥५५॥ ऐशा तरुण वयांत । तुम्हां कशाचा परमार्थ ? । कोल्हा न राही उपोषित । उंसाचिया फडामधीं ॥५६॥ वा पाहून बाटुकाला । बैल नाहीं पुढें गेला । कारटे आमुच्या नांवाला । काळें उगें लावूं नको ॥५७॥ भुलाई म्हणे नवर्‍यासी । हिला नका ठेवूं ऐसी । लावून द्यावे मोहतरासी । पाहा पोरगा माळ्याचा ॥५८॥ ही पुंडलिकाच्या घरीं जाते । सदा त्यासी हितगुज करिते । एकमेकां पाहून भरतें । येत दोघां प्रेमाचें ॥५९॥ जाऊं चला शेगांवास । घेऊन या कारटीस । सांगूं अवघे महाराजास । चाळे या बायजीचे ॥६०॥ संतासी अवघें कळतें । ते सन्न्तीचे चाहाते । पोटामाजीं कधीं न निघते । चंदनाच्या दुर्गंधी ॥६१॥ भुला-शिवराम-बायजाबाई । पुंडलीक भोकर्‍या आला तोही । चौघे येऊन लागले पाई । शेगांवीं श्रीसमर्थांच्या ॥६२॥ पुंडलिकासी पाहून । बोलूं लागले दयाघन । कीं बायजा तुझी बहीण । पूर्व जन्मींची पुंडलिका ॥६३॥ लोक निंदा जरी करिती । तरी अंतर न द्यावें इजप्रती । दोघें मिळून करा भक्ति । सच्चिदानंद हरीची ॥६४॥ भुले आपुल्या पोरीस । लावूं नको भलता दोष । हीं बहीण-भाऊ आहेत । मुळींच पूर्वजन्मींचें ॥६५॥ शिवाय या बायजीला । कोठेंहि न नवरा भला । ही न आली करायाला । संसार मुळीं जगामध्यें ॥६६॥ ही राहील ब्रह्मचारी । अशीच गे जन्मवरी । जनाबाई पंढरपुरीं । अशाच रीतीं राहिली गे ॥६७॥ तिनें नामदेव गुरु केला । ही शरण आली आम्हांला । माझ्या जनाबाईला । कोणी ना आतां छळावें ॥६८॥ ऐसें समर्थांचें भाषण । शिवरामानें ऐकून । गेला असे गहिंवरून । शब्द न कांही बोलवे ॥६९॥ घेऊन आपुल्या मुलीला । शिवराम मुंडगांवासी आला । पुढें बायजाच्या वारीला । अडथळा कोणी केला नसे ॥७०॥ महाराज आपुल्या भक्ताप्रत । सदैव रक्षण करितात । ते कसे, ही थोडक्यांत । गोष्ट सांगतों ये ठाई ॥७१॥ भाऊ राजाराम कवर । एक   डाँक्टर । पहा खामगांवावर । दवाखान्याचा अधिकारी ॥७२॥ त्यास दुर्धर फोड झाला । आणविला मोठ्या डाँक्टराला । औषधपाणी करायाला । खामगांवामाझारीं ॥७३॥ बुलढाणा अकोला उमरावती । येथून डाँक्टर आणिले असती । शस्त्रक्रिया करण्याप्रती । त्या भाऊच्या फोडाला ॥७४॥ नाना औषधें पोटांत दिलीं । विविध पोटीसें बांधिलीं । शस्त्रक्रिया ही असे केली । त्या झालेल्या फोडाला ॥७५॥ कशाचा ना उपयोग झाला । फोड वाढुं लागला । वडील बंधूस धाक पडला । त्या भाऊच्या दुखण्याचा ॥७६॥ भाऊ तळमळे शय्येवरी । व्याधि असह्य झाली खरी । शेवटीं त्यानें अंतरीं । विचार ऐसा केला हो ॥७७॥ आतां हाच उपाय । आठवावे सद्गुरुपाय । याविणें दुसरी सोय । कांहीं नसे राहिली ॥७८॥ पडल्या पडल्या जोडी हात । म्हणे धांव धांव हे सद्गुरुनाथ । या लेंकराचा वृथा अंत । किमपि आतां पाहूं नका ॥७९॥ ऐशी श्रोते विनवणी । करूं लागला क्षणोक्षणीं । रात्र गेली उलटोनी । सुमारें समय एकाचा ॥८०॥ तमानें भरलें अंबर । रात्रीचा तो शब्द किर्र । कोल्हे-हुकेनें कांतार । दणाणून गेलें हो ॥८१॥ तो एक दमणी आली । तट्ट्यावरी लागलेली । गाडीस होती जुंपिली । जोडी खिलार्‍या बैलांची ॥८२॥ कंठामाजीं घागरमाळा । वाजूं लागल्या खळखळा । मागें पुढें सोडिला । होतां पडदा दमणीस ॥८३॥ दवाखान्याच्या दारापाशीं । दमणी आली निश्चयेंसी । डाँक्टर पाहात होता तिसी । पडून आपल्या शय्येवर ॥८४॥ तों एक उतरला । ब्राह्मण दमणीला खालीं भला । दार ठोठावूं लागला । डाँक्टराच्या बंगल्याचें ॥८५॥ डाँक्टराच्या बंधूंनीं । दार उघडलें ते क्षणीं । प्रश्न केला कोठूनी । आपण आलांत ये ठायां ? ॥८६॥ ब्राह्मण बोले त्याकारण । माझें गजा नामाभिधान । तीर्थअंगारा घेऊन । शेगांवाहून आलों मी ॥८७॥ डाँक्टर भाऊ कवराला । जो का आहे फोड झाला । हा अंगारा पाठविला । लावण्या त्या फोडासी ॥८८॥ प्यावयासी दिलें तीर्थ । हें घ्या आपुल्या हातांत । मी जातों आतां परत । वेळ न मशी राहावया ॥८९॥ तीर्थअंगारा देऊन । निघून गेला ब्राह्मण । त्या शोधाया कारण । भाऊनें शिपाई पाठविला ॥९०॥ परी न पत्ता लागला । गाडी न दिसली कवणाला । भाऊ मनीं घोटाळला । कशाचा ना तर्क चाले ॥९१॥ फोडास लावितां अंगारा । तो तात्काळ फुटला खरा । येऊं लागला भराभरा । पूं त्या श्रोते फोडांतून ॥९२॥ एक घटका गेल्यावर । पूं गेला निघून पार । पाहा किती आहे जोर । समर्थाच्या अंगार्‍याचा ? ॥९३॥ भाऊस निद्रा लागली । व्याधीं पुढें बरी झाली । हळूहळू शक्ति आली । भाऊ झाला पूर्ववत् ॥९४॥ दर्शना गेला शेगांवास । तों समर्थ वदले ऐसें त्यास । माझ्या गाडीबैलास । नुसता न चारा दिलास तूं ५॥ हें सांकेतिक भाषण । कळलें भाऊलागून । हृदय आलें उचंबळून । त्या भाऊ कवराचें ॥९६॥ त्या रात्रीचा ब्राह्मण । खचित माझा गजानन । लेंकरासाठीं धांवून । खामगांवास आला हो ॥९७॥ कवरें केलें अन्नदान । त्या व्याधीच्या निमित्त जाण । अंतर्ज्ञानी असती पूर्ण । श्रीगजानन अवलिया ॥९८॥ असो एकदां समर्थस्वारी । निघती झाली पंढरपुरीं । त्या श्रीचंद्रभागेतीरीं । विठ्ठलासी भेटावया ॥९९॥ होती मंडळी बरोबर । दिवस वारीचा साचार । स्पेशल गाड्या वरचेवर । जाऊं लागल्या पंढरीला ॥१००॥ जगू आबा पाटील हरी । बापुना व मंडाळी दुसरी । सोडूनिया शेगांव नगरी । नागझरीला आले हो ॥१॥ त्या गांवीं माळावर । आहे एक भुयार । येथें गोमाजी नामें साधुवर । समाधिस्त झालासे ॥२॥ झरे जिवंत पाण्याचे । आसपास त्या माळाचे । आहेत म्हणून गांवाचें । नांव पडलें नागझरी ॥३॥ हा गोमाजी बोवा साचा । गुरु महादाजी पाटलाचा । प्रथम आशीर्वाद झाला साचा । शेगांवींच्या पाटीलवंशा ॥४॥ म्हणून पाटील शेगांवचे । गोमाजीला वंदून साचे । रस्त्यास लागती पंढरीचे । ऐसा त्यांचा परिपाठ ॥५॥ या परिपाठे म्हणून । नागझरीसी येऊन । अग्निरथांत बैसून । निघते झाले पंढरीला ॥६॥ हरीपाटला बरोबरी । समर्थाची होती स्वारी । बापुना आणि दुसरीं । माणसें पांचपन्नास ॥७॥ आषाढ शुध्द नवमीचा । तो दिवस होता साचा । समुदाय वारकर्‍यांचा । येऊं लागला पंढरीसी ॥८॥ 
मेघ दाटले अंबरीं । क्वचित् कोठें भूमीवरी । पर्जन्याची वृष्टी खरी । होऊं लागली श्रोते हो ! ॥९॥ तें भुवैकुंठ पंढरपुर । गजबजून गेलें फार । भरतीं येतां सागर । जेवीं जाय उचंबळोनी ॥११०॥ प्रदक्षणेच्या रस्त्यावरी । टाळांची ती गर्दी खरी । ' जय जय रामकृष्ण हरी ' । भक्त म्हणती उच्च स्वरें ॥११॥ शब्द कवणाचा कवणाला । न ये ऐकावयाला । ऐसा आनंदी आनंद चालला । तो वानूं कोठवर ॥१२॥ नाथ निवृत्ति ज्ञानेश्वर । सांवता गोरा कुंभार । श्रीतुकोबा देहूकर । सोपान मुक्ता जनार्दन ॥१३॥ या संतांच्या पालख्या । पंढरीस आल्या देखा । भक्तांनीं उधळिला बुक्का । आदर करायाकारणें ॥१४॥ त्यायोगें आकाशांत । बुक्क्याचें जणूं झालें छत । सुवास उठला घमघमीत । गर्दी तुळशीफुलांची ॥१५॥ श्रोते त्या समयाला । सम आले पंढरीला । उतरले जाऊन वाड्याला । त्या कुकाजी पाटलाच्या ॥१६॥ हा प्रदक्षणेच्या वाटेवरी । वाडा चौफाळ्याशेजारीं । दर्शनाला भीड खरी । झाली असे राउळांत ॥१७॥ लिस हाताहातावरी । उभे राहिले रस्त्यांतरीं । पथें चालले वारकरी । भजन करीत हरीचें ॥१८॥ एकादशीस साचार । हरी पाटलाबरोबर । बापुनाविना इतर । गेले दर्शना हरीच्या ॥१९॥ बापुना मागें राहिला । तो होता स्नानासी गेला । म्हणून त्यासी वेळ झाला । मंडळी गेली निघून ॥१२०॥ स्नान करून आला घरीं । तों समजलें ऐशापरी । दर्शनासी गेली सारी । आतांच मंडळीं विठ्ठलाच्या ॥२१॥ मग तोही निघाला पळत पळत । दर्शनाचा धरून हेत । राउळाच्या भोंवतीं अमित । गर्दी झाली लोकांची ॥२२॥ मुंगीस वाट मिळेना । तेथें हा बापुना । केवीं जाईल दर्शना । शिवाय गरिबी पदरांत ॥२३॥ बापुना म्हणे मानसीं । हे विठ्ठला हृषीकेशी । कां रे निष्ठुर झालासी ? । मजला देई दर्शन ॥२४॥ तूं सांवत्या माळ्याकारण । अरणीं गेलास धांवून । तेवीं येई राउळांतून । मज भेटाया पांडुरंगा ॥२५॥ ' अरण ' होते आठ कोस । तैसें नव्हें येथें खास । मी मंदिराच्या सान्निध्यास । उभा आहे वाटेवरी ॥२६॥ तुला लोक म्हणतात । तूं अनाथांचा असशी नाथ । मग कां रे देवा मजप्रत । उपेक्षिलें या वेळीं ? ॥२७॥ ऐसा बहुत धांवा केला । शेवटीं बापुना हताश झाला । परत बिर्‍हाडासी आला । अस्तमानाचे समयास ॥२८॥ मुख झालें होतें म्लान । अवघ्या दिवसांचें उपोषण । बापुनाचें अवघें मन । विठ्ठलाकडे लागलें ॥२९॥ शरीर मात्र होतें घरीं । मन मंदिराच्या सभोंवरी । फिरत होतें भिरीभिरी । याचें नांव ध्यास हो ॥१३०॥ बापुनासी पाहून । हंसूं लागले अवघेजण । हा बेटा अभागी पूर्ण । कळून आला आपणां ॥३१॥ शेगांवाहून दर्शना । पंढरीसी आला जाणा । येथें येऊन खेळ नाना । फिरला पाहात गांवामध्यें ॥३२॥ याची दांभिक अवघी भक्ति । यास कशाचा श्रीपती ? । ऐन वेळेला राहती । गैरहजर दुर्दैवी ! ॥३३॥ कोणी म्हणाले बापुनाला । वेदान्त आहे अवघा आला । तो कशाशीं दर्शनाला । जाईल सांगा राउळांत ॥३४॥ त्याचा भगवंत हृदयांत । आहे सर्वदा खेळत । वेदान्त्याचें ऐसें मत । दगडामाजीं काय आहे ? ॥३५॥ आपण वेडे म्हणून । घ्याया गेलों दर्शन । बापुनाचा नारायण । वाटेल तेथें उभा असे ॥३६॥ मग दुसरा म्हणाला । मग हा येथें कशास आला ? । कां शेगांवीं तयाला । भेटला नसता ईश्वर ? ॥३७॥ अहो हे वेदान्ती । लोकां ज्ञान सांगती । शब्द चावटी हमेश करिती । अनुभवाचा लेश नसे ॥३८॥ सगुणोपासना झाल्या पूर्ण । मग होणार आहे ज्ञान । न आल्यासी लहानपण । तरुणपणा येतो कसा ? ॥३९॥ ऐसा उपहास तयाचा । प्रत्येकानीं केला साचा । अवघ्यांपुढें एकट्याचा । टिकाव लागावा कुठूनी ? ॥१४०॥ तो बापुना बसला उपोषित । दातांसी लावूनी दांत । ते होते अवघे पहात । स्वामी निजल्या जागाहून ॥४१॥ गरीबाचें सांकडें । साधूलाच एक पडे । सत्संगती ज्याला घडे । तेच खरे भाग्यवान ॥४२॥ समर्थ म्हणती बापुना । दुःख नको करूंस मना । ये तुला रुक्मिणीरमणा । भेटवितों ये काळीं ॥४३॥ तों महाराज उभे राहिलें । कटीं हात ठेविलें । पाय खालीं जुळविलें । समचरण दावावया ॥४४॥ तुळशीफुलांच्या माळा कंठीं । मूर्ति सांवळी गोमटी । बापुनाच्या पडली दृष्टी । शीर ठेविलें पायांवर ॥४५॥
पुन्हां जो पाहे वरीं । समर्थ दिसले पहिल्यापरी । तेणें बापुनाच्या अंतरीं । अति आनंद जाहला ॥४६॥ धोतर, पागोटें आणि शेला । जो घरीं दृष्टि पडिला । तोच त्यानें पाहिला । दर्शना जातां राउळांत ॥४७॥ इतर म्हणाले महाराजांस । तसेंच दर्शन आम्हांस । होऊं द्या आम्हां आहे आस । पुनरपि श्रीच्या दर्शनाची ॥४८॥ ऐसें ऐकतां भाषण । बोलते झाले गजानन । बापुनासारिखें आधीं मन । तुम्ही करा रे आपुलें ॥४९॥ तें तसें झाल्यावरी । दर्शन घडवीन निर्धारीं । ही दर्शन वस्तु खरी । काय मिळे बाजारांत ? ॥१५०॥ म्हणून ती आणून । देऊं तुम्हांकारण । निष्पाप करा आधीं मन । तरीच पुढचें घडेल हें ॥५१॥

पहा समर्थांनीं बापुनाला । विठ्ठल साक्षात् दाखविला । कुकाजीच्या वाड्याला । संतत्व हा खेळ नसे ॥५२॥ संत आणि भगवन्त । एकरूप साक्षात । गुळाच्या त्या गोडीप्रत । कैसें करावें निराळें ? ॥५३॥ काला घेऊन अखेरी । मंडळी फिरली माघारी । बापुनाच्या अंतरीं । दर्शन तें ठसावलें ॥५४॥ याच पुण्यें करून । पुत्र झाला त्याकारण । रसिक चतुर विद्वान । संतसेवा न जाई वृथा ॥५५॥ पंढरीच्या प्रसादानें । पुत्र झाला त्याकारणें । म्हणूनच नांव त्यानें । ठेविलें नामदेव बालकासी ॥५६॥ कवठे बहादूर गांवाचा । एक माळकरी होता साचा । तो वर्‍हाडप्रांतीचा । म्हणून उतरला वाड्यांत ॥५७॥ तेथें आषाढी द्वादशीसी । मरी आली मुक्कामासी । त्या पंढरपुरक्षेत्रासी । मग काय विचारितां ? ॥५८॥ प्रेतामागें चाले प्रेत । पोलिस शिरती घरांत । यात्रा काढून देण्याप्रत । डाँक्टराच्या हुकुमानें ॥५९॥ वारकर्‍याला ओढिती । गाडीमाजीं बसविती । चंद्रभागेच्या पार करिती । कुर्डुवाडी रस्त्याला ॥१६०॥ हा कवठे बहादूरचा वारकरी । झाला मरीनें आजारी । ढाळ होती वरच्यावरी । उलटी मुळींच थांबेना ॥६१॥ गोळे हातांपायांसी । येऊं लागले बहुवशी । कोण न जाई त्याजपाशीं । शुश्रुषा त्या करावया ॥६२॥ पोलिसभयानें हें वृत्त । कळविलें ना कोणाप्रत । शेगांवीचे समस्त । लोक जाया निघाले ॥६३॥ वाडा घटकेंत मोकळा झाला । हा वारकरी मात्र होता पडला । कठीण काळच्या समयाला । कोणी न येती उपयोगी ! ॥६४॥ लोक सुखाचे सोबती । संकटकालीं अव्हेरिती । तेथें एक रक्षण करती । संत अथवा देव हो ॥६५॥ तो पाहून प्रकार । श्रीगजानन साधुवर । म्हणाले हा ओसरीवर । निजला यास घेऊन चला ॥६६॥ लोक म्हणती गुरुराया ! । हा बहुतेक मेला सदया । याच्या नादीं लागतां वायां । संकट येईल आपणांतें ॥६७॥ पन्नास माणूस बरोबर । आपल्या येधवां साचार । मरीचा तो झाला जोर । सांप्रत या पंढरीसी ॥६८॥ अशा स्थितींत ये ठाई । थांबणें हें कांहीं बरें नाहीं । चला जाऊं लवलाही । चंद्रभागेच्या पलीकडे ॥६९॥ तों महाराज म्हणती अवघ्यांला । तुम्ही कैसें खुळावला ? । आपल्या देशबंधूला । सोडितां हें बरें नव्हे ! ॥१७०॥ ऐसें वाटून जवल गेले । वारकर्‍याला करा धरलें । त्यासी उठून बसविलें । आणि केलें मधुरोत्तर ॥७१॥ चाल बापा ऊठ आतां । जाऊं आपल्या वर्‍हाडप्रांता । वारकरी म्हणे गुरुनाथा ! । आतां वर्‍हाड कशाचें हो ? ॥७२॥ समीप आला माझा अंत । जवळ नाहीं कोणी आप्त । तई म्हणाले सद्गुरुनाथ । वेड्या ! ऐसा भिऊं नको ॥७३॥ तुझें टळलें गंडांतर । ऐसें वदोन ठेविला कर । त्या वारकर्‍याच्या शिरावर । ढाळ उलटी बंद झाली ॥७४॥ वाटूं लागली थोडी शक्ति । उभा राहिला त्वरित गती । संतानें ज्या धरिलें हातीं । त्यातें निजमनें यम नेई कसा ? ॥७५॥ घटकेंत झाला पहिल्यापरी । मंडळीच्या बरोबरी । चंद्रभागेच्या पैलतीरीं । आला समर्थासमवेत ॥७६॥ आनंद झाला फार त्यासी । वंदी समर्थचरणांसी । म्हणे दयाळा काढिलें मशी । दाढेंतून काळाच्या ॥७७॥ ऐसा घडतां चमत्कार । भक्त करिती जयजयकार । आले कुर्डुवाडीवर । निर्धास्तपणें सर्वही ॥७८॥ पंढरीची करून वारी । आली शेगांवाप्रती सारी । मंडळी ती बरोबरी । श्रीगजाननस्वामीच्या ॥७९॥ एक कर्मठ ब्राह्मण । घ्याया आला दर्शन । त्या शेगांवाकारण । श्रीगजाननस्वामींचें ॥१८०॥ तयानें स्वामीची कीर्ति । निजदेशीं ऐकिली होती । म्हणून आला दर्शनाप्रती । फार लांबून त्या ठायां ॥८१॥ सोवळें ओंवळें त्याचें अती । तो होता मध्वमती । खट्टू झाला परम चित्तीं । समर्थासी पाहातां ॥८२॥ व्यर्थ आलों म्हणे येथ । या वेड्यासी वंदण्याप्रत । हा भ्रष्टाचा आहे सत्य । सार्वभौम शिरोमणी ॥८३॥ सोंवळें ओंवळें येथ मेलें । अनाचाराचें राज्य झालें । अशा पिशाला म्हणूं लागले । साधू लोक हाय हाय ॥८४॥ तो तया मठांत । काळें कुत्रें झालें मृत । पडलें होतें त्याचें प्रेत । येण्याजाण्याच्या वाटेवरी ॥८५॥ त्या श्वानातें पाहून । ब्राह्मण झाला मनीं खिन्न । आणूं कसें जीवन । श्वान मध्यें पडला हा ॥८६॥ याला न कोणी उचलीती । गांजा सदैव धुनकिती । या वेड्यातें वंदिताती । " महाराज, महाराज, " म्हणून ॥८७॥ जळो याचें साधुपण । मला बुध्दि कोठून । झाली याचें दर्शन । घ्याया कांहीं कळेना ॥८८॥ त्याचा संशय फेडावया । समर्थ आसन सोडोनियां । येते झाले तया ठायां । जेथें होता ब्राह्मण ॥८९॥ आणि म्हणाले तयाप्रत । पूजा करावी यथास्थित । कुत्रें झालें नाहीं मृत । संशय उगा घेऊं नका ॥१९०॥ तें ऐकून रागावला । निज समर्था बोलूं लागला । अरे नाहीं वेड मला । तुझ्यासम लागलेलें ॥९१॥ कुत्रें मरून झाला प्रहर । त्याचें प्रेत रस्त्यावर । पडलें याचा विचार । तुम्हीं न कोणी केला कीं ॥९२॥ ऐसें बोलतां विप्राला । समर्थांनीं जाब दिला । आम्ही भ्रष्ट आम्हांला । तुमच्यासम ज्ञान नाहीं ॥९३॥ परी खंति न करा तिळभर । पाणी आणाया घागर । घेऊन चलावें सत्वर । माझ्यामागें विप्रवरा ॥९४॥ ऐसें बोलून कुत्र्यापासीं । येते झाले पुण्यराशी । स्पर्श पदाचा करतां त्यासी । कुत्रें बसलें उठोन ! ॥९५॥ तों पाहता चमत्कार । ब्राह्मण झाला निरुत्तर । म्हणे याचा अधिकार । थोर आहे देवापरी ॥९६॥ मी व्यर्थ निंदा केली । योग्यता ना जाणली । ऐसें म्हणून घातली । समर्थाच्या मिठी पायां ॥९७॥ माझे अपराध गुरुवरा ! । आज सारे क्षमा करा । वरदहस्त ठेवा शिरा । मी अनंत अपराधी ॥९८॥ तूंच सोंवळा साचार । एक आहेस भूमीवर । करण्या जगाचा उध्दार । तुम्हां धाडिलें ईश्वरानें ॥९९॥ श्रोते त्याच दिवशीं भली । समाराधना त्यानें केली । कुशंका मनाची पार फिटली । लीन झाला अत्यंत ॥२००॥ प्रसाद घेऊन गेला परत । आपुल्या तो देशाप्रत । समर्थ साक्षात् भगवंत । ऐसी प्रचीति आली तय ॥१॥ स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ । भाविकां लाभो सत्पथ । हेंचि इच्छी दासगणू ॥२०२॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ ॥ इति अष्टादशोऽध्यायः समाप्तः ॥

अध्याय १९
 
॥ श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी आनंदकंदा । जयजयादि अभेदा । माझें नमन तुझ्या पदा । असो सर्वदा अनन्यभावें ॥१॥ हे राघवा रघुपती । पाव आतां शीघ्र गती । माझा अंत पहाशी किती ? । हें कांहीं कळेना ॥२॥
खर्‍या थोरांशी कठोरता । नाहीं शोभत अनंता । याचा विचार कांहीं चित्ता । करा आपुल्या ये काळीं ॥३॥ मी दीनवाणें मारितों हांका । मला दगा देऊं नका । हे जगदीशा जगन्नायका । पावा दासगणूस ॥४॥ महाराज असतां शेगांवांत । विप्र एक काशिनाथ । जो खंडेरावाचा होय सुत । गर्दे उपनांव जयाचें ॥५॥ तो आला दर्शना । समर्थांच्या वंदिले चरणां । मूर्ति पाहून त्याच्या मना । आनंद झाला अतिशय ॥६॥ माझ्या सन्माननीय वडिलानें । जीं जीवन्मुक्‍ताचीं लक्षणें । लिहिलीं अनुभवानें । त्याची प्रत्यक्ष मूर्ति ही ॥७॥ माझें भाग्य धन्य धन्य । म्हणून हें पाहण्या चरण । आलों खामगांवाहून । त्याचें सार्थक झालें कीं ॥८॥ तों समर्थांनीं लीला केली । कोपरखिळी मारिली । काशीनाथाच्या पाठीस भली । आपुल्या परमकृपेनें ॥९॥ जा तुझा हेत पुरला । वाट पाहे तारवाला ।  भाषणें घोंटाळला । काशिनाथ मानसीं ॥१०॥ म्हणे काम ना माझें ये ठाईं । मी न आलों मागण्या कांहीं । तारवाला शिपाई । वाट पहातो काय हें ? ॥११॥ त्याचें गूध कळेना । पुसण्या छाती होईना । निमुटपणें वंदून चरणा । गेला निघून खामगांवीं ॥१२॥ तों तारवाला शिपाई । उभा दारांत होता पाही । तार घेतली घाई घाई । कशाची ती बघण्यास ॥१३॥ तारेंत हा मजकूर । तुमचा केला तक्‍रुर । मुनसफीच्या हुद्दयावर । मोर्शी तालुक्याकारणें ॥१४॥ तें पाहतां आनंदला । कोपरखिळीचा अर्थ कळला । त्या काशिनाथ पंताला । पहा संतांचें ज्ञान कैसें ? ॥१५॥ असो एकदां नागपुरीं । समर्थांची गेली स्वारी । गोपाळ बुटीचीया घरीं । त्याच्या अति आग्रहानें ॥१६॥ ही भोसल्याची राजधानी । पूर्वकालीं होती जाणी । त्या शहराची आज दिनीं । दैना झाली विबुध हो ॥१७॥ स्वातंत्र्यरुपी प्राण गेला । खरा धनी याचक ठरला । परक्यांचा बोलबाला । झाला जया शहरांत ॥१८॥ गज घोडे पालख्या अपार । नाहींशा झाल्या साचार । रस्त्यानें फिरे मोटार । अति जोरानें विबुध हो ॥१९॥ असो हा महिमा काळाचा । नाहीं दोष कवणाचा । वाडा गोपाळ बुटीचा । होता सिताबर्डीवर ॥२०॥ त्या भव्य सदनांत । नेऊन ठेविले सद्‌गुरुनाथ । जैसा वाघ किल्ल्यांत । कोंडोनिया टाकावा ॥२१॥ बुटीचा ऐसा विचार । या ताबर्डीवर । महाराज ठेवावे निरंतर । जाऊं न द्यावें शेगांवा ॥२२॥ अक्रूरानें कृष्णाला । जैसा मथुरेमाजीं नेला । तोच प्रकार येथें झाला । काय वर्णन करावें ? ॥२३॥ शेगांव पडलें भणभणीत । अवघे लोक दुःखित । 
विनविती हरी पाटलाप्रत । महाराज येथें आणा हो ॥२४॥ कुडीमधून गेला प्राण । कोण पुसे तिजलागून ? । तैसें समर्थांवांचून । शेगांव हें प्रेत पहा ॥२५॥ तुम्ही गांवचे जमेदार । करा याचा विचार । बुटी मोठा सावकार । तेथें न आमुचा लाग लागे ॥२६॥ टक्कर हत्तीहत्तींची । होणें आहे योग्य साची । येथें आम्हांसम कोल्ह्याची । नाहीं मुळीं किंमत॥२७॥ जंबुमाळीसी लढायाला । मारुती हाच योग्य ठरला । जिंकावया कर्णाला । झाली योजना अर्जुनाची ॥२८॥ तुम्हीं नागपुराप्रती जावें । समर्थांसी घेऊन यावें । आम्हां अवघ्यांस सुखवावें । हीच आहे विनंति ॥२९॥ इकडे बुटीच्या घरांत । आजुर्दे राहिले संत । जेवीं हस्तिनापुरांत । कृष्ण नाहीं आनंदला ॥३०॥ महाराज म्हणती बुटीसी । जाऊं दे मज शेगांवासी । या आपुल्या भव्य सदनासी । ठेवून आम्हां घेऊं नको ॥३१॥ तें बुटी मुळींच मानीना । समर्था जाऊं देईना । अनागोंदीचा रामराणा । बुटी वाटे निःसंशय ॥३२॥ बुटी भाविक होता जरी । अहंता नव्हती गेली खरी । श्रीमंतीचा गर्व भारी । त्याच्या ठाईं वसतसे ॥३३॥ रोज ब्राह्मणभोजन । समर्थांपुढें सदा भजन । परी शेगांवचे येत जन । बंदी त्या तो करीतसे ॥३४॥ जाऊं न देई दर्शना । शेगांवचे लोकांना । बिगरपरवानगी श्रीमंतसदना । जातां नये कवणासी ॥३५॥ शेगांवचे लोक भले । जरी आणावया गेले । परी न कांहीं उपाय चाले । गेले तसेच आले परत ॥३६॥ इकडे भक्त पाटील हरी । कांहीं मंडळी बरोबरी । घेऊन निघाला नागपुरीं । समर्थासी आणावया ॥३७॥ बसला अग्निरथांत । त्याच वेळीं वदले संत । त्या गोपाळबुटीप्रत । येणें रीतीं तें ऐका ॥३८॥ अरे गोपाळा पाटील हरी । निघाला यावया नागपुरीं । तो येण्याच्या आंत परी । मला येथून जाऊं दे ॥३९॥ तो येथें आल्यावर । शांतता नाहीं राहणार । तो पडला जमेदार । याचा विचार करावा ॥४०॥ तुझ्या धनाच्या जोरावरी । उडया या जाण निर्धारी । तो मनगटाच्या बळावरी । नेईल मजला येथून ॥४१॥ हरी पाटील तेथें आला । शिपायानें अटकाव केला । परी तो न त्यानें मानिला । प्रवेश केला सदनांत ॥४२॥ गोपाळ बुटीचिया घरीं । पंगत होती थोर खरी । पाटील आल्याच्या अवसरीं । आले ब्राह्मण भोजना ॥४३॥ ताटें चांदीचीं अवघ्यांस । शिसमचे पाट बसण्यास । होत्या पातळ पदार्थांस । वाटया जवळ चांदीच्या ॥४४॥ नानाविध पक्वान्नें । होतीं भोजनाकारणें । मध्यभागीं आसन त्यानें । मांडिलें समर्थ बसण्यास ॥४५॥ ऐशी बुटीची श्रीमंती । तिचें वर्णन करुं किती ? । ज्याला कुबेर बोलती । लोक नागपूर प्रांतींचा ॥४६॥ असो हरी पाटील सदनांत । आले समर्था नेण्याप्रत । तो महाराज निघाले धांवत । द्वारीं त्यास भेटावया ॥४७॥ वांसरा गाय पाहून । जैसी येई धांवून । तैसें स्वामी गजानन । पाटलासाठीं धांवले ॥४८॥ चाल हरी शेगांवासी । येथें मुळीं न राहणें मसी । तूं आलास न्यावयासी । हें फार बरें झालें ॥४९॥ समर्थ जाऊं लागले । तें गोपाळानें पाहिलें । अनन्यभावें चरण धरिले । समर्थाचे येऊन ॥५०॥ विक्षेप माझा गुरुराया ! । नका करुं या समया । दोन घांस घेऊनियां । इच्छित स्थला मग जावें ॥५१॥ तैसेंच बुटी पाटलासी । बोलूं लागले विनयेंसी । तुम्ही घेऊन प्रसादासी । जावें हेंच मागणें ॥५२॥ येथें न रहाती महाराज । हें समजून आलें आज । पंक्तींत माझी राखा लाज । तुम्हीच पाटील येधवां ॥५३॥ आतांच समर्थ गेले जरी । लोक उपाशी उठतील तरी । आणि अवघ्या नागपुरीं । टीका माझी होईल पहा ॥५४॥ भोजनें होईपर्यंत । महाराज राहिले तेथ । शेगांवची समस्त । मंडळी पंक्तीस जेवली ॥५५॥ भोजनोत्तर तयारी । निघण्याची ती झाली खरी । दर्शनाची भीड भारी । झाली बुटीच्या वाडयांत ॥५६॥ कुटुंब गोपाळ बुटीचें । जानकाबाई नांवाचें । परम भाविक होते साचें । गृहलक्ष्मीच होती जी ॥५७॥ तिनें केली विनवणी । महाराजांचे चरणीं । माझा हेतु मनींच्या मनीं । बसूं पहातो गुरुराया ! ॥५८॥ तईं महाराज बोलले । तुझ्या मना मीं जाणीतलें । ऐसें म्हणून लाविलें । कुंकूं तिच्या कपाळास ॥५९॥ आणखी एक पुत्र तुला । परम सद्‌गुणी होईल भला । अंतीं जाशील वैकुंठाला । सौभाग्यासह बाळे ! तूं ॥६०॥ ऐसा आशीर्वाद देऊन । निघते झाले दयाघन । त्या सिताबर्डीहून । आले रघूजीच्या घरीं ॥६१॥ हा भोसला राजा रघूजी । उदार मनाचा भक्त गाजी । ज्यानें ठेविला राम राजी । आपुल्या शुद्ध वर्तनें ॥६२॥ त्याचें लौकीकीं राज्य गेलें । जें अशाश्वत होतें भलें । शाश्वत स्वरुपाचें आलें । सद्‌गुरुभक्तीचें राज्य घरा ॥६३॥ उत्तम प्रकारचा आदर । केला राजानें साचार । त्याचा घेऊन पाहुणचार । रामटेकासी गेले पुढें ॥६४॥ तेथें रामाचें दर्शन । घेऊन आले परतून । शेगांवच्या मठा जाण । हरीपाटलासमवेत ॥६५॥ धार-कल्याणचे रंगनाथ । जे थोर साधु मोंगलाईंत । होते ते भेटण्याप्रत । समर्था आले शेगांवीं ॥६६॥ अध्यात्माचीं बोलणीं । सांकेतिक केलीं दोघांनीं । त्याचा भावार्थ जाणण्या कोणी । तेथें नव्हता समर्थ ॥६७॥ श्रीवासुदेवानंद सरस्वती । कर्ममार्गी ज्याची प्रीति । कृष्णातटाका ज्याची महती । माणगांवीं जन्म ज्यांचा ॥६८॥ ते येण्याचे अगोदर । बाळाभाऊस साचार । बोलते झाले गुरुवर । स्वामी गजानन सिद्ध योगी ॥६९॥ अरे बाळा उदयिक । माझा बंधु येतो एक । मजलागीं भेटण्या देख । त्याचा आदर करावा ॥७०॥ तो आहे कर्मठ भारी । म्हणून उद्यां पथांतरीं । चिंध्या न पडूं द्या निर्धारी । अंगण स्वच्छ ठेवा रे ॥७१॥ चिंधी कोठें पडेल जरी । तो कोपेल निर्धारी। जमदग्नीची आहे दुसरी । प्रतिमा त्या स्वामीची ॥७२॥ तो कर्‍हाडा ब्राह्मण । शुचिर्भूत ज्ञानसंपन्न । हें त्याचें कर्मठपण । कवचापरी समजावें ॥७३॥ ऐसें बाळास आदलें दिवशीं । सांगते झाले पुण्यराशी । तों एक प्रहर दिवसासी । स्वामी पातले ते ठायां ॥७४॥ एकमेकांसी पाहतां । दोघे हंसले तत्त्वतां । हर्ष उभयतांच्या चित्ता । झाला होता अनिवार ॥७५॥ एक कर्माचा सागर । एक योगयोगेश्वर । एक मोगरा सुंदर । एक तरु गुलाबाचा ॥७६॥ एक गंगाभागीरथी । एक गोदा निश्चिती । एक साक्षात् पशुपती । एक शेषशायी नारायण ॥७७॥ स्वामी जेव्हां मठांत आले । तेव्हां गजानन होते बैसले । आपल्या पलंगावरी भले । चिटक्या करानें वाजवीत ॥७८॥ स्वामी येतां चिटकी थांबलि । दृष्टादृष्ट दोघां झाली । तैं स्वामींनीं विचारिली । आज्ञा परत जावया ॥७९॥ फार बरें म्हणून । गजाननें तुकविली मान । स्वामी गेले निघून । बाळास कौतुक वाटलें ॥८०॥ बाळा म्हणे गुरुराया । हें दृश्य पाहूनियां । संशय उपजला चित्ता ठायां । त्याची निवृत्ति करा हो ॥८१॥ त्याचा मार्ग अगदीं भिन्न । तुमच्या ह्या मार्गाहून । ऐसें साच असून । तुमचा बंधु कसा तो ? ॥८२॥ ऐसा प्रश्न ऐकिला । समर्थ देती उत्तर त्याला । बरवा प्रश्न बाळा केला । त्वां हा आज आम्हांतें ॥८३॥ ईश्वराकडे जाण्याचे । तीन मार्ग असती साचे । हे तिन्ही मार्ग ज्ञानाचे । गांवा जाऊन मिळतात ॥८४॥ स्वरुपें त्यांचीं भिन्न भिन्न । दिसतीं पाहणारांकारण । तेणें घोटाळा वरितें मन । पाहाणारांचें राजसा ! ॥८५॥ सोंवळें ओंवळें संध्यास्नान । व्रत उपोषणें अनुष्ठान । या कृत्यांलागून । अंगें म्हणावीं कर्माचीं ॥८६॥ हीं अंगें जो आचरी । निरालसपणें खरीं । तोच समजावा भूवरी । ब्रह्मवेत्ता कर्मठ ॥८७॥ अधिक न्यून येथें होतां । कर्ममार्ग न ये हातां । म्हणून विशेष तत्परता । ठेविली पाहिजे आचरणीं ॥८८॥ येथें एवढीच खबरदारी । घ्यावी लागते जाण खरी । परांकारणें दुरुत्तरीं । कदा त्यानें ताडूं नये ॥८९॥ आतां भक्तिमार्गाचें । ऐक हें लक्षण साचें । भक्तिपंथानें जाणाराचें । मन पाहिजे शुद्ध अती ॥९०॥ मलीनता मनाठायीं । अंशेंही राहिल्या पाही । त्याच्या हातां येत नाहीं । भक्तिरहस्य बापा ! रे ॥९१॥ दया प्रेम लीनता । अंगीं पाहिजे तत्त्वतां । श्रवणीं-पूजनीं आस्था । पाहिजे त्याची विशेष ॥९२॥ मुखामाजीं नामस्मरण । करणें हरीस जाणून । ऐशीं अंगें असतीं जाण । या भक्ति-मार्गाला ॥९३॥ या अंगासह जो भक्त करी । त्यालाच भेटे श्रीहरी । भक्तिमार्गाची नये सरी । त्याचा विधि सोपा असे ॥९४॥ परी तो करण्या आचरण । कर्माहून कठीण जाण । जेवीं गगनानें जवळपण । नेत्रालागीं दिसतसे ॥९५॥ आतां योगमार्ग तिसरा । सांगतों मी ऐक खरा । या योगमार्गाचा पसारा । दोघांपेक्षां जास्त असे ॥९६॥ परी हा पसारा निश्चयेंसी । आहे ज्याचा त्याचे पासीं । योगमार्ग साधण्यासी । बाहेरचें न कांहीं लागे ॥९७॥ जेवढें आहे ब्रह्मांडांत । तेवढें आहे पिंडांत । त्या पिंडांतील साहित्य । घेऊन योग साधावा ॥९८॥ आसनें रेचक कुंभक । इडापिंगलेचे भेद देख । धौती मुद्रात्राटक । कळलें पाहिजे मानवां ॥९९॥ कुंडली आणि सुषुम्ना । यांचें ज्ञान पाहिजे जाणा । आधीं योग करणारांना । तरीच तो साधेल ॥१००॥ या तिन्ही मार्गांचें । अंतिम फळ ज्ञान साचें । परी तें ज्ञान प्रेमाचें । *वीण असतां कामा नये ॥१॥ जें जें कृत्य प्रेमावीण । तें तें अवघें आहे शीण । म्हणून प्रेमाचें रक्षण । करणें तिन्ही मार्गांत ॥२॥ काळा गोरा खुजा थोर । कुरुप आणि सुंदर । हे शरीराचे प्रकार । त्याची न बाधा आत्म्यातें ॥३ आत्मा अवघ्यांचा आहे एक । तेथें न पडे कदा फरक । शरीरभेद व्यावहारिक । त्याचें कौतुक कांहीं नसे ॥४॥ तीच या तिन्ही मार्गांची । स्थिति तंतोतंत साची । बाह्य स्वरुपें भिन्न त्यांचीं । परी मूळ कारण एक असे ॥५॥ मुक्कामास गेल्यावर । मार्गाचा न उरे विचार । जो मार्गी चालतो नर । महत्त्व त्याचें त्यास वाटे ॥६॥ पंथ चालण्या आरंभ झाला । परी मुक्कामास नाहीं गेला । अशाचाच होतो भला । तंटा पंथाभिमानानें ॥७॥ या तिन्ही मार्गांचे ते पांथ । मुक्कामीं पोंचल्या होती संत । मग तयांच्या संबंधांत । द्वैत नसे एतुलेंही ॥८॥ वसिष्ठ वामदेव जमदग्नी । अत्री पाराशर शांडिल्य मुनी । हे कर्ममार्गाच्या सेवनीं । मुक्कामासी पोंचले ॥९॥ व्यास, नारद, कयाधू-कुमर । मारुती, शबरी, अक्रूर । उद्धव, सुदामा, पार्थ, विदूर । हे गेले भक्तिमार्गें ॥११०॥ श्रीशंकराचार्य गुरुवर । मच्छिंद्र गोरख जालंदर । हे चढले जिना थोर । या योगमार्गाचा ॥११॥ जो वसिष्ठा लाभ झाला । तोच विदुराच्या पदरीं पडला । तोच मच्छिंद्रानें भोगिला । फळामाजीं फरक नसे ॥१२॥ तीच प्रथा पुढें चालली । येथें न शंका घ्यावी मुळीं । कर्ममार्गाची रक्षिली । बूज श्रीपादवल्लभें ॥१३॥ नरसिंह सरस्वती यतिवर । तैसेच झाले साचार । ठिकाण ज्यांचें गाणगापूर । वाडी औदुंबर ख्यात जगीं ॥१४॥ नामा सांवता ज्ञानेश्वर । सेना कान्हु चोखा महार । दामाजीपंत ठाणेदार । गेले भक्तिमार्गानीं ॥१५॥ शेख महंमद श्रीगोंद्यांत । आनंदी स्वामी जालन्यांत । सुर्जी-अंजनगांवांत । देवनाथ चाहाते योगाचे ॥१६॥ तैसेंच आहे सांप्रत । कर्ममार्गीं वासुदेव रत । मीं धरला भक्तिपंथ । आणिक बहुता जणांनीं ॥१७॥ पळुसचे धोंडीबुवा । सोनगीरचा नाना बरवा । जालन्याचे यशवंतरावा । भक्तिपंथ साध्य झाला ॥१८॥ खाल्ला आम्मा ती विदेही । तेवीं शिर्डीचे बाबा सांई । गुलाबरावांचे ठायीं । ज्ञानदृष्टि असे रे ॥१९॥ पहा चांदूर तालुक्याचा । वरखेडें नामें ग्रामाचा । आडकूजी नामें संत साचा । गेला याच वाटेनें ॥१२०॥ मुर्‍हा गांवचें संतरत्‍न । झिंगाजी तो होय जाण । तेवीं नागपूरचे ताजुद्दीन । भक्तिमार्गासी चहाते ॥२१॥ या अवघ्या संतांचें । आचरण भिन्न प्रकारचें । परी अधिकारी कैवल्याचे । ते बसले होउनी ॥२२॥ मार्ग असो कोणताही । त्याचें मुळीं महत्त्व नाहीं । जो मुक्कामास जाई । त्याचें कौतुक करणें असे ॥२३॥ आम्ही हीं भावंडें सारीं । येतें झालों भूमीवरी । कैवल्याच्या मार्गावरी । भाविक आणून सोडावया ॥२४॥ जें ज्याला आवडेल । तिकडे तो जाईल । आणि मोक्षरुपी भोगील फल । त्या त्या पंथा आचरोनी ॥२५॥ आतां नको पुसूंस कांहीं । हें न कोणा सांगे पाही । निवांत बसूं दे ये ठायीं । पिसेंपणाच्या पासोडीनें ॥२६॥ ज्याची निष्ठा बसेल । वा, जो माझा असेल । त्याचेंच कार्य होईल । इतरांची ना जरुर मला ॥२७॥ ज्यासी अनुताप झाला । ब्रह्मज्ञान सांगणें त्याला । उगीच तर्कटी वात्रटाला । स्फोट त्याचा करुं नये ॥२८॥ कोणी कांहीं म्हणोत । आपण असावें निवांत । तरीच भेटे जगन्नाथ । जगद्‌गुरु जगदात्मा ॥२९॥ ऐसा उपदेश ऐकिला । बाळाभाऊच्या नेत्रांला । प्रेमाश्रूंचा लोटला । पूर तो न आवरे त्या ॥१३०॥ अष्टभाव दाटले । शरीरा रोमांच उमटले । वैखरीचें संपलें । काम तेणें सहजची ॥३१॥ मौनेंच केला नमस्कार । श्रीगजानन साधु थोर । वर्‍हाड प्रांताचा उद्धार । करावयासी अवतरला ॥३२॥ साळुबाई नांवाची । एक असे कण्व शाखेची । ती होती महाराजांची । मनापासून भक्तीण ॥३३॥ तिला महाराज एके दिनीं । ऐशा परी वदले वाणी । डाळपीठ घेऊनी । स्वैंपाक करी अहोरात्र ॥३४॥ जे येतील तयांना । साळु घाल भोजना । येणेंच तूं नारायणा । प्रिय होशील निःसंशय ॥३५॥ ती साळुबाई मठांत । आहे अझूनपर्यंत । जी वैजापूरची असे सत्य । माहेर वाडेंघोडें जिचें ॥३६॥ प्रल्हादबुवा जोशाला । होता कृपेचा योग आला । तो न तया फलद झाला । तयाचिया दुर्दैवें ॥३७॥ खामगांवच्या सान्निध्यासी । जलंब गांव परियेसीं । त्या गांवचा रहिवासी । तुळसीराम एक असे ॥३८॥ पुत्र हा तुळसीरामाचा । आत्माराम नांवाचा । होता तैलबुद्धीचा । वेदाध्ययनीं प्रेम ज्याचें ॥३९॥ या धर्मपीठ वाराणसी । जी भागीरथीच्या तटा काशी । तेथें गेला अध्ययनासी । वेदवेदांग स्मृतीच्या ॥१४०॥ प्रत्यहीं भागीरथीचें स्नान । माधुकरीचें सेवी अन्न । गुरुगृहातें जाऊन । करी अध्ययन श्रुतीचें ॥४१॥ श्रोते विद्यार्थी ना तरी । अध्ययना जाती देशावरी । शिकण्याऐवजीं परोपरी । करुं लागती चैन ते ॥४२॥ चैनीमाजीं गुंतल्या मन । मग कशाचें अध्ययन ? । बिरुड आंब्यालागून । लागतां नास रसाचा ॥४३॥ आत्माराम नव्हता यापरी । विवेकसंपन्न सदाचारी । विद्या अवघी करुन पुरी । आला निजदेशातें ॥४४॥ स्वदेशीं येतां शेगांवासी । गेला असे अति हर्षी । हजिरी ती द्यावयासी । श्रीगजानन महाराजा ॥४५॥ तो वेद विद्येचा जाणता । गजानन केवळ ज्ञानसविता । आत्माराम वेद म्हणतां । कोठें कोठें चुकतसे ॥४६॥ त्या चुकीची दुरुस्ती । करुं लागले सदगुरुमूर्ती । आत्मारामाचे संगतीं । वेद म्हणती महाराज ॥४७॥ ऐकतां त्यांचें वेदाध्ययन । तन्मय होती विद्वान । न होय सराफावांचून । किंमत त्या हिर्‍याची ॥४८॥ शेवटीं समर्थांचेपाशीं । आत्माराम राहिला आदरेंसी । मधु टाकूनी मक्षिकेसी । जाणें कैसें आवडेल ? ॥४९॥ प्रत्यहीं सेवेकारण । यावें त्यानें जलंबाहून । चुकविला ना एकही दिन । ऐसा एकनिष्ठ भक्त तो ॥१५०॥ समर्थांच्या पश्चात । हाच होता मठांत । पूजा अर्चा करण्याप्रत । सद्‌गुरुच्या समाधीची ॥५१॥ मोबदला न घेतां भली । एकनिष्ठ सेवा केली । शेवटीं त्यानेंच अर्पिली । इस्टेट आपली महाराजा ॥५२॥ इस्टेट अल्प साचार । एक जमीन एक घर । येथें न दृष्टि किंमतीवर । देणें आहे भाग पहा ॥५३॥ भिल्लिणीनें रामाला । बोरें देऊन वश केला । तैसाच प्रकार हाही झाला । म्हणून केलें वर्णन ॥५४॥ स्वामी दत्तात्रय केदार । दुसरा नारायण जामकर । निवळ दुधाचा ज्यांचा आहार । तो दुधाहारी बुवा ॥५५॥ ऐसे श्रोते तिघेजण । स्वामीचे भक्त निर्वाण । ज्यांनीं आपुलें तनमन । समर्थचरणीं अर्पिलें ॥५६॥ मोरगांव भाकरे नांवाचा । गांव बाळापूर तालुक्याचा । तेथील मारुतीपंत पटवार्‍याचा । वृत्तान्त ऐका थोडासा ॥५७॥ श्रोते ! त्या मोरगांवांत । मारुतीपंताच्या शेतांत । पिकाचें रक्षण करण्याप्रत । तिमाजीनामें माळी होता ॥५८॥ तो माळी खळ्याभीतरीं । निजला निशीच्या अवसरीं । गाढ झोंप लागली खरी । ते अवसरीं तयाला ॥५९॥ उलटून गेले दोन प्रहर । कुंभाराचे दहावीस खर । खळ्यांत येऊनी दाण्यावर । पडले असती पांडयाच्या ॥६०॥ राखणदार झोंपीं गेला । गर्दभासी आनंद झाला । ते खाऊं लागले जोंधळ्याला । राशींत तोंड घालूनी ॥६१॥ हा पांडया मारुतीपंत । महाराजांचा होता भक्त । म्हणून सद्‌गुरुरायाप्रत । लीला करणें भाग आलें ॥६२॥ क्षणांत जाऊनी मोरगांवासी । हांक मारिली तिमाजीसी । अरे ! जागा होई त्वरेंसी । रासेसी गाढवें पडलीं ना ॥६३॥ ऐसें मोठयानें बोलून । तिमाजीस जागे करुन । महाराज पावले अंतर्धान । खळ्यामधून तेधवां ॥६४॥ तिमाजी उठून पाहतां । गाढवें दिसलीं तत्त्वतां । म्हणे काय करुं आतां । मालक रागे भरेल कीं ॥६५॥ पिकाचें रक्षण करण्यासाठी । त्यानें ठेविलें आहे मसी । विश्वासघात आज दिशीं । झाला त्याच्या माझ्या हातें ॥६६॥ तो विश्वासला माझ्यावर । मी निजता झालों निसूर । रास ही निम्यावर । खाऊन टाकली गाढवांनीं ॥६७॥ आतां समजूत मालकाची । कोण्या रीतीं घालूं साची । पहा त्या वेळीं इमानाची । किंमत होती लोकांस ॥६८॥ ना तरी हल्लींचे नोकर । निमकहराम शिरजोर । नफातोटयाची तिळभर । काळजी न त्यांना मालकाच्या ॥६९॥ तिमाजी तैसा नव्हता । हळहळ लागली त्याच्या चित्ता । म्हणे काय जाऊन सांगूं आतां । मी पांडयाकारणें ॥१७०॥ कांहीं असो चुकीची । माफी मागितली पाहिजे साची । उदार बुद्धि मारुतीची । आहे तो क्षमाच करील ॥७१॥ ऐसें मनाशीं बोलून । उदयास येतां नारायण । तिमाजी गांवांत येऊन । पाय धरी पंताचे ॥७२॥ महाराज माझ्या झोंपेनीं । बुडविलें तुम्हांलागूनी । दहावीस गांढवांनीं । येऊन रास खाल्ली कीं ॥७३॥ ती नुकसान किती झाली । ती पाहिजे पाहिली । खळ्यामाजीं जाऊनि भली । म्हणजे मज वाटेल बरें ॥७४॥ मारुती म्हणाले त्यावर । खळ्यांत यावया साचार । वेळ ना मला तिळभर । मी निघालों शेगांवा ॥७५॥ दर्शन घेऊन सद्‌गुरुचें । त्या गजानन महाराजांचें । उद्यां सकाळीं धान्याचें । काय झालें तें पाहीन ॥७६॥ ऐसें बोलून शेगांवाला । मारुतीपंत येतां झाला । दर्शनासाठीं मठांत गेला । दहा अकराचे सुमारास ॥७७॥ महाराज होते असनावरी । जगू पाटील समोरी । बाळाभाऊ बद्ध करीं । बसला जवळ पाटलाच्या ॥७८॥ मारुतीनें दर्शन । घेतां केलें हास्य वदन । तुझ्यासाठीं मजकारण । त्रास झाला रात्रीसी ॥७९॥ तुम्ही माझे भक्त होतां । मला राबण्या लावितां । झोंपाळू नोकर ठेवितां । आणि आपण निजतां खुशाल घरीं ॥१८०॥ मारुती काल रात्रीला । खळ्यांत तिमाजी झोंपीं गेला । गाढवांचा सुळसुळाट झाला । ते रास भक्षूं लागले ॥८१॥ म्हणून मी जागें केलें । जाऊन तिमाजीसी भले । रास सांभाळण्या सांगितलें । आणि आलों निघून ॥८२॥ ऐसी खूण पटतांक्षणीं । मारुतीनें जोडून पाणी । मस्तक ठेवूनियां चरणीं । ऐसें वचन बोलला ॥८३॥ आम्हां सर्वस्वीं आधार । आपुलाच आहे साचार । लेंकराचा अवघा भार । मातेचिया शिरीं असे ॥८४॥ आमुचें म्हणून जें जें कांहीं । तें अवघेंच आहे आपुलें आई ! । सत्ता त्यावरी नाहीं । तुम्हांवीण कवणाची ॥८५॥ खळें आणि जोंधळा । अवघाची आहे आपला । तिमाजी नोकर नांवाला । व्यवहारदृष्टीं आहे कीं ॥८६॥ ब्रह्मांडाचें संरक्षण । आपण करितां येथून । लेंकरासाठीं त्रास पूर्ण । माता सोसी वरच्यावरी ॥८७॥ मी लेंकरुं आपुलें । म्हणूनियां आपण केलें । खळ्यांत तें जाऊन भलें । मोरगांवीं संरक्षण ॥८८॥ ऐसीच कृपा निरंतर । स्वामी असावी माझ्यावर । आतांच जाऊन करितों दूर । नोकरीवरुन तिमाजीला ॥८९॥ ऐसें बोलतां मारुती । कौतुक वाटलें समर्थांप्रती । आणि भाषण केलें येणें रीतीं । तें आतां अवधारा ॥१९०॥ छे ! छे ! वेडया ! तिमाजीस । नको मुळींच काढूंस । नोकरीवरुन खास । त्याचें वर्म सांगतों तुला ॥९१॥ तिमाजी नोकर इमानी । खळ्यांत गाढवें पाहूनी । दुःखी झाला असें मनीं । तें म्यां तेव्हांच जाणिलें ॥९२॥ रात्रीची हकीकत । तुला सांगावया प्रत । आला होता भीत भीत । सकाळीं ना तुजकडे ॥९३॥ तैं तूं म्हणालास त्याला । मी जातों आहे शेगांवाला । उद्यां सकाळीं खळ्याला । येऊनियां पाहीन ॥९४॥ ऐसें गुरुवचन ऐकिलें। मारुतीसी चोज जहालें । पहा संतांचें कर्तृत्व भलें । कैसें आहे अगाध ॥९५॥ गाढवें खळ्यांत पडलेलीं । कोणीं न त्या सांगितलीं । तीं अंतर्ज्ञानें जाणिलीं । गजाननानें श्रोते हो ॥९६॥ शके अठराशें सोळासी । महाराज बाळापुरासी । असतां गोष्ट झाली ऐसी । ती थोडकी सांगतों ॥९७॥ तेथें सुखलाल बन्सीलालाची । एक बैठक होती साची । त्या बैठकीसमोर महाराजांची । स्वारी बैसली आनंदांत ॥९८॥ मूर्ति अवघी दिगंबर । वस्त्र नव्हतें तिळभर । त्या पाहून भाविक नर । नमन करुन जात होते ॥९९॥  तो होता हमरस्ता । बाजार पेठेचा तत्त्वतां । त्या पंथानें जात होता । एक पोलिस हवालदार ॥२००॥ नांव त्या हवालदाराचें । नारायण आसराजी होतें साचें । समर्था पाहून डोकें त्याचें । फिरुन गेलें तात्काळ ॥१॥ तो म्हणे हा नंगा धोत । मुद्दाम बसला पंथांत । साधू ना हा भोंदू सत्य । त्याची उपेक्षा न करणें बरी ॥२॥ ऐसें बोलून जवळीं गेला । अद्वातद्वां बोलूं लागला । लाज कैसी नाहीं तुजला । नंगा बसतोस रस्त्यावरी ॥३॥ हे घे त्याचें प्रायश्चित्त । तुला मी देतों आज येथ । ऐसें बोलून स्वामीप्रत । मारुं लागला छडीनें ॥४॥ वळ पाठ पोटावरी । उठते झाले निर्धारी । परी ना हवालदार आवरी । मारतां हात आपुला ॥५॥ ऐसें तेधवां पाहून । एक गृहस्थ आला धांवून । आपुल्या दुकानामधून । हुंडीवाला नाम ज्याचें ॥६॥ तो म्हणे हे हवालदार । तूं विचार कांहीं कर । उगेंच सत्पुरुषावर । हात टाकणें बरें नव्हे ॥७॥ कां कीं, संतांचा कैवारी । एक आहे श्रीहरी । वळ त्यांच्या पाठीवरी । उठले ते कां न दिसले तुला ॥८॥ या कृत्यानें तुझा अंत । जवळीं आला अत्यंत । आजारीच मोडितो पथ्य । मरावया कारणें ॥९॥ तेंच तूं आज केलें । हें न कांहीं बरें झालें । अजून तरी उघडी डोळे । माफी माग गुन्ह्याची ॥२१०॥ हवालदार म्हणे माफीचें । कारण मसीं न मागण्याचें । कावळ्याचे शापें साचें । काय ढोरें मरतील ! ॥११॥ हा नंगा धोत हलकट । बसला पाहून बाजारपेठ । तोंडानें गोष्टी चावट । अचाट ऐसा करीत हा ॥१२॥ ऐशा ढोंग्याला मारणें । ईश्वर जरी मानील गुन्हे । तरी मग न्याया कारणें । जागाच नाहीं राहिली ॥१३॥ तेंच पुढें सत्य झालें । हवालदार पंचत्व पावले । त्या बाळापूर नगरींत भले । आपण केलेल्या कृत्यानें ॥१४॥ एका पंधरवडयांत । हवालदाराचे अवघे आप्त । होते झाले भस्मीभूत । एका साधूस मारल्यानें ॥१५॥ म्हणून अवघ्या लोकांनीं । साधूसमोर जपूनी । वागावें प्रत्येकानीं । खरें कळेपर्यंत ॥१६॥ नगर जिल्ह्यांत संगमनेर । प्रवदा नदीचे कांठावर । गांव अति टुमदार । त्याचें वर्णन करवेना ॥१७॥ अनंतफंदी नांवाचा । कवि जेथें झाला साचा । तेथील हरी जाखडयाचा । ऐका तुम्ही वृत्तान्त हा ॥१८॥ हा हरी जाखडी माध्यंदिन । होता यजुर्वेदी ब्राह्मण । गांवोगांव फिरुन । पोट आपुलें भरीतसे ॥१९॥ तो फिरत फिरत शेगांवासी । आला समर्थ दर्शनासी । बसतां झाला पायापासीं । श्रीगजानन स्वामींच्या ॥२२०॥ तों हजारों घेती दर्शन । कोणी ब्राह्मणभोजन । कोणी खडीसाखर वांटून । नवस केलेला फेडिती ॥२१॥ तईं हरी म्हणे चित्तासी । हा केवढा ज्ञानरासी । येऊनियां पायापासीं । विन्मुख जाणें भाग मला ॥२२॥ कां कीं दैव खडतर । माझें आहे साचार। निवळ पर्वत खडकावर । हरळ उगवेल कोठोनी ? ॥२३॥ आज अन्न मिळालें । उद्यांचें कोणीं पाहिलें । ऐसें करीत संपले । दिवस माझे आजवर ॥२४॥ संग्रहासी नाहीं धन । शेतवाडा मळा जाण । मी ना मुळींच विद्वान । मला कन्या कोण देईल ? ॥२५॥ हे स्वामी गजानना ! । सच्चिदानंदा दयाघना ! । संसारसुखाची वासना । जहालीं मनीं बलवत्तर ॥२६॥ ती तूं पूर्ण करावी । मुलें लेंकरें मला व्हावी । प्रथम बायको मिळावी । कुलीन आज्ञाधारक ॥२७॥ ऐसें जो इच्छी मनांत । तोंच त्याच्या अंगावर्त । थुंकते झाले सद्‌गुरुनाथ । इच्छेस त्याच्या जाणूनी ॥२८॥ या हरी जाखडयानें । बावंच्या मागला मजकारणें । म्हणून आले थुंकणें । या मूर्खाच्या अंगावर ॥२९॥ संसारापासून सुटावया । लोक भजती माझ्या पाया । यानें येथें येऊनियां । संसारसुख मागितलें ॥२३०॥ पहा जगाची रीत कैसी । अवघेच इच्छिती संसारासी । सच्चिदानंद श्रीहरीसी । पहाण्या न कोणी तयार ॥३१॥ ऐसें आपणासी बोलले । पुन्हां जाखडयासी पाहिलें । जें जें तूं इच्छिलें । सांप्रतकालीं मनांत ॥३२॥ तें तें अवघें होईल पूर्ण । पुत्रपौत्र तुजलागून । होतील संग्रहासी धन । तेंही थोडकें राहील ॥३३॥ जा आतां परत घरा । सुखें करी संसारा । करीत असावा परमेश्वर । आठव वेडया ! विसरुं नको ॥३४॥ ऐसें तयासी बोलून । प्रसाद म्हणून थोडकें धन । दिलें हरी जाखडयाकारण । लग्न स्वतःचें करावया ॥३५॥ हरी जाखडया संगमनेरीं । सुखी जहाला संसारीं । महाराजाची वाणी खरी । ती कोठून खोटी होईल ॥३६॥ ऐसाच एक निमोणकर । गोविंदाचा कुमार । रामचंद्र नामें साचार । ओव्हरसियरच्या हुद्यावरी ॥३७॥ बेंद्रे वासुदेव सर्व्हेअर । होता त्याच्या बरोबर । तो आणि निमोणकर । आले मुकना नदीवरी ॥३८॥ हा मुकना नाला डोंगरांत । आहे सह्याद्री पर्वतांत । इगतपुरी तालुक्यांत । बुध हो ! नासिक जिल्ह्याच्या ॥३९॥ वनश्री ती रमणीय अती । तिचें वर्णन करुं किती । हरीण बालकें बागडती । निर्भयपणें काननांत ॥२४०॥ फलभारें तरुवर । वांकले असती अपार । वन्य पशु फिरती स्वैर । बिब्बट लांडगे ते ठायां ॥४१॥ असो या मुकन्या नाल्यापासीं । जवळ एका खोर्‍यासी । एका जलाच्या प्रवाहासी । कपीलधारा नाम असे ॥४२॥ तेथें प्रत्येक पर्वणीस । भाविक येती स्नानास । लौकिक याचा आसपास । तीर्थ म्हणून पसरलासे ॥४३॥ असो एक्या पर्वणीसी । निमोणकर गेले स्नानासी । योगाभ्यास थोडा यासी । येत होता विबुध हो ॥४४॥ तो पूर्ण व्हावा म्हणून । इच्छित होतें त्याचें मन । गोसावी बैराग्यालागून । पुसूं लागला तेथल्या ॥४५॥ नाहीं नाहीं माहीत मात । ऐकूं येई सर्वत्र । तेणें निमोणकर चित्तांत । हताश पूर्ण जहाला ॥४६॥ काय करुं देवा आतां । मला योगाभ्यास शिकवितां । कोठें भेटेल तत्त्वतां । ती कृपा करुन सांगणें ॥४७॥ तो कपीलधारेवरी । एक पुरुष देखिला अधिकारी । ज्याचे हात गुडघ्यावरी । येऊन सहज लागले ॥४८॥ उंच बांधा मुद्रा शांत । बैसला होता ध्यानस्त । त्यास घातले दंडवत । निमोणकरानें अष्टांगेंसी ॥४९॥ बराच वेळ झाला जरी । योगी न कांहीं बोले परी । अस्तमानाची वेळ खरी । समीप येऊं लागली हो ॥२५०॥ पोटीं ना अन्न तिळभर । बिर्‍हाड राहिलें बहु दूर । कपीलधारेचें धरुन नीर । तुंब्यांत गोसावी निघाले ॥५१॥ तैं निमोणकर म्हणे समर्था ! । अंत माझा किती पहातां । ठाऊक असल्या योगगाथा । मशीं कांहीं शिकवा हो ॥५२॥ तो अखेर अस्तमानीं । बोलते झाले कैवल्यदानी । हा चित्रपट घेऊनी । जा आपुलें काम करी ॥५३॥ षोडाक्षरी त्यावर । मंत्र लिहिला आहे थोर । त्याचा वाणीनें निरंतर । जप आपुला करावा ॥५४॥ मंत्रप्रभावें थोडा बहुत । योग येईल तुजप्रत । योगमार्ग हा अत्यंत । कठीण सर्व योगामध्यें ॥५५॥ गोगलगाय शेप किडा । हिमालया न देईल वेढा ! । सागरीचा सिंप किडा । मेरु पर्वता न जाय कधीं ॥५६॥ नेटाचा केला यत्‍न । ब्रह्मचर्य संभाळून । येतील दहापांच आसन । धौती नौती केल्यावरी ॥५७॥ जा पुढें न विचारी मला । हा घे देतों प्रसाद तुला । ऐसें बोलून उचलिला । एक तांबडा खडा करें ॥५८॥ तो देऊनियां मजसी । गुप्त झालें पुण्यरासी । तेंच पुढें नाशिकासी । गंगेवरी भेटले त्या ॥५९॥ त्या पाहून निमोणक्र । गेले धांवत साचार । शिर ठेवून पायांवर । प्रश्न त्यांसी ऐसा केला ॥२६०॥ महाराज माझा कंटाळा । कांहो ! आपणच कां केला । आपुल्या नांव गांवाला । न सांगतां गेलाच कीं ॥६१॥ महाराज डोळे वटारुन । बोलते झाले त्याकारण । तांबडा खडा देऊन । नांव माझें कथिलें म्या ॥६२॥ नर्मदेचा गणपती । तांबडा असतो निश्चिती । तूं मूळचाच मूढ मती । रहस्य त्याचें न जाणिलें ॥६३॥ म्हणून त्याचें गूढ तुला । पडतें झालें जाण मुला ! । मी रहातों शेगांवाला । गजानन हें नांव माझें ॥६४॥ धुमाळ सदनापर्यंत । चाल माझ्या समवेत । पुन्हां भेटी तुजप्रत । होईल माझी ते ठायां ॥६५॥ ऐसें बोलूनी निघाले । महाराज रस्त्यांत गुप्त झाले । भिरभिरीं पाहूं लागले । चहूंकडे निमोणकर ॥६६॥ कंटाळून अखेरी । धुमाळाच्या आले घरीं । तों गजानन महाराज ओसरीवरी । बसले ऐसें पाहिले ॥६७॥ मौनेंच करुन वंदन । कथिलें धुमाळाकारण । कपीलधारेपासून । जें कां झालें इथवरी ॥६८॥ तें ऐकून धुमाळाला । अतिशय आनंद जहाला । तो म्हणे योगीराजाला । वाण कशा&n

ऐसाच एक निमोणकर । गोविंदाचा कुमार । रामचंद्र नामें साचार । ओव्हरसियरच्या हुद्यावरी ॥३७॥ बेंद्रे वासुदेव सर्व्हेअर । होता त्याच्या बरोबर । तो आणि निमोणकर । आले मुकना नदीवरी ॥३८॥ हा मुकना नाला डोंगरांत । आहे सह्याद्री पर्वतांत । इगतपुरी तालुक्यांत । बुध हो ! नासिक जिल्ह्याच्या ॥३९॥ वनश्री ती रमणीय अती । तिचें वर्णन करुं किती । हरीण बालकें बागडती । निर्भयपणें काननांत ॥२४०॥ फलभारें तरुवर । वांकले असती अपार । वन्य पशु फिरती स्वैर । बिब्बट लांडगे ते ठायां ॥४१॥ असो या मुकन्या नाल्यापासीं । जवळ एका खोर्‍यासी । एका जलाच्या प्रवाहासी । कपीलधारा नाम असे ॥४२॥ तेथें प्रत्येक पर्वणीस । भाविक येती स्नानास । लौकिक याचा आसपास । तीर्थ म्हणून पसरलासे ॥४३॥ असो एक्या पर्वणीसी । निमोणकर गेले स्नानासी । योगाभ्यास थोडा यासी । येत होता विबुध हो ॥४४॥ तो पूर्ण व्हावा म्हणून । इच्छित होतें त्याचें मन । गोसावी बैराग्यालागून । पुसूं लागला तेथल्या ॥४५॥ नाहीं नाहीं माहीत मात । ऐकूं येई सर्वत्र । तेणें निमोणकर चित्तांत । हताश पूर्ण जहाला ॥४६॥ काय करुं देवा आतां । मला योगाभ्यास शिकवितां । कोठें भेटेल तत्त्वतां । ती कृपा करुन सांगणें ॥४७॥ तो कपीलधारेवरी । एक पुरुष देखिला अधिकारी । ज्याचे हात गुडघ्यावरी । येऊन सहज लागले ॥४८॥ उंच बांधा मुद्रा शांत । बैसला होता ध्यानस्त । त्यास घातले दंडवत । निमोणकरानें अष्टांगेंसी ॥४९॥ बराच वेळ झाला जरी । योगी न कांहीं बोले परी । अस्तमानाची वेळ खरी । समीप येऊं लागली हो ॥२५०॥ पोटीं ना अन्न तिळभर । बिर्‍हाड राहिलें बहु दूर । कपीलधारेचें धरुन नीर । तुंब्यांत गोसावी निघाले ॥५१॥ तैं निमोणकर म्हणे समर्था ! । अंत माझा किती पहातां । ठाऊक असल्या योगगाथा । मशीं कांहीं शिकवा हो ॥५२॥ तो अखेर अस्तमानीं । बोलते झाले कैवल्यदानी । हा चित्रपट घेऊनी । जा आपुलें काम करी ॥५३॥ षोडाक्षरी त्यावर । मंत्र लिहिला आहे थोर । त्याचा वाणीनें निरंतर । जप आपुला करावा ॥५४॥ मंत्रप्रभावें थोडा बहुत । योग येईल तुजप्रत । योगमार्ग हा अत्यंत । कठीण सर्व योगामध्यें ॥५५॥ गोगलगाय शेप किडा । हिमालया न देईल वेढा ! । सागरीचा सिंप किडा । मेरु पर्वता न जाय कधीं ॥५६॥ नेटाचा केला यत्‍न । ब्रह्मचर्य संभाळून । येतील दहापांच आसन । धौती नौती केल्यावरी ॥५७॥ जा पुढें न विचारी मला । हा घे देतों प्रसाद तुला । ऐसें बोलून उचलिला । एक तांबडा खडा करें ॥५८॥ तो देऊनियां मजसी । गुप्त झालें पुण्यरासी । तेंच पुढें नाशिकासी । गंगेवरी भेटले त्या ॥५९॥ त्या पाहून निमोणक्र । गेले धांवत साचार । शिर ठेवून पायांवर । प्रश्न त्यांसी ऐसा केला ॥२६०॥ महाराज माझा कंटाळा । कांहो ! आपणच कां केला । आपुल्या नांव गांवाला । न सांगतां गेलाच कीं ॥६१॥ महाराज डोळे वटारुन । बोलते झाले त्याकारण । तांबडा खडा देऊन । नांव माझें कथिलें म्या ॥६२॥ नर्मदेचा गणपती । तांबडा असतो निश्चिती । तूं मूळचाच मूढ मती । रहस्य त्याचें न जाणिलें ॥६३॥ म्हणून त्याचें गूढ तुला । पडतें झालें जाण मुला ! । मी रहातों शेगांवाला । गजानन हें नांव माझें ॥६४॥ धुमाळ सदनापर्यंत । चाल माझ्या समवेत । पुन्हां भेटी तुजप्रत । होईल माझी ते ठायां ॥६५॥ ऐसें बोलूनी निघाले । महाराज रस्त्यांत गुप्त झाले । भिरभिरीं पाहूं लागले । चहूंकडे निमोणकर ॥६६॥ कंटाळून अखेरी । धुमाळाच्या आले घरीं । तों गजानन महाराज ओसरीवरी । बसले ऐसें पाहिले ॥६७॥ मौनेंच करुन वंदन । कथिलें धुमाळाकारण । कपीलधारेपासून । जें कां झालें इथवरी ॥६८॥ तें ऐकून धुमाळाला । अतिशय आनंद जहाला । तो म्हणे योगीराजाला । वाण कशाची सांग मज ॥६९॥ हे अवघ्या सामर्थ्याची । खाण निःसंशय आहेत साची । सार्वभौमपदाची । त्याच्या पुढें न किंमत ॥२७०॥ जो तांबडा खडा तुसी । दिला तो ठेवून पाटासी । करणें पूजा-अर्चेसी । सद्भावें निरंतर ॥७१॥ योगाभ्यास ही समोरी । त्या खेडयाच्या आदरें करी । त्याच्या कृपेनें कांहीं तरी । योगाभ्यास येईल ॥७२॥ तेंच पुढें झालें सत्य । योगाभ्यास थोडा बहुत । आला निमोणकराप्रत । श्रीगजाननकृपेनें ॥७३॥ एक शेगांवचा रहिवासी । तुकाराम कोकाटे परियेसीं । त्याची संतति यमसदनासी । जाऊं लागली उपजतांच ॥७४॥ म्हणून त्यानें समर्थाला । एकदां नवस ऐसा केला । जरी देशील संततीला । दीर्घायुषी गुरुराया ॥७५॥ तरी एक मुलगा त्यांतून । तुसी करान अर्पण । मनोरथ त्याचे पूर्ण । केले गजाननस्वामीनें ॥७६॥ दोन तीन मुलें झालीं । परी नवसाची न राहिली । आठवण तुकारामा भली । संततीच्या मोहानें ॥७७॥ तो थोरला मुलगा नारायण । रोग झाला त्याकारण । औषधोपचार केले जाण । परी न आला गुण कांहीं ॥७८॥ नाडी बंद होऊं लागली । नेत्रांची ती दृष्टि थिजली । धुगधुगी मात्र उरली । होती त्याच्या छातीला ॥७९॥ ती स्थिति पाहून । तुकारामा झाली आठवण । नवस केल्याची ती जाण । एकदम त्या समयाला ॥२८०॥ तुकाराम म्हणे गुरुराया । हा पुत्र माझा वांचलिया । अर्पण करीन सदया । सेवा तुमची करण्यास ॥८१॥ ऐसा वचनबद्ध होतांक्षणीं । नाडी आली ठिकाणीं । हळूहळू नेत्र उघडोनी । पाहूं लागला बाल तो ॥८२॥ व्याधि बरी झाल्यावर । तो नारायण-कुमार । आणून सोडला मठावर । नवस आपला फेडावया ॥८३॥ तो नारायण अझूनी । आहे तया ठिकाणीं । बोलिलेला नवस कोणी । महाराजांचा चुकवूं नये ॥८४॥ हेंच सांगण्या लोकांप्रत । नारायण आहे जिवंत । शेगांवीं त्या मठांत । संत-चरित्र ना कादंबरी ॥८५॥ असो पुढें आषाढमासीं । महाराज गेले पंढरीसी । घेऊन हरीपाटलासी । विठ्ठलासी भेटावया ॥८६॥ जो सर्व संतांचा । ध्येयविषय साचा । जो कल्पतरु भक्तांचा । कमलनाभ सर्वेश्वर ॥८७॥ जो जगदाधार जगत्पति । वेद ज्याचे गुण गाती । जो संतांच्या वसे चित्तीं । रुक्मिणीपती दयाघन ॥८८॥ पंढरीस आले गजानन । चंद्रभागेचें केलें स्नान । गेलें घ्याया दर्शन । पांडुरंगाचें राउळीं ॥८९॥ हे देवा पंढरीनाथा । हे अचिंत्या अद्वया समर्था । हे भक्तपरेशा रुक्मिणीकांता । ऐक माझी विनवणी ॥२९०॥ तुझ्या आज्ञेनें आजवर । भ्रमण केलें भूमिवर । जे जे भाविक होते नर । त्यांचे मनोरथ पूर्ण केले ॥९१॥ आतां अवतार-कार्य संपलें । हें तूं जाणसी वहिलें । पुंडलीक वरदा विठठले । जाया आज्ञा असावी ॥९२॥ देवा, मी भाद्रपद मासीं । जावया इच्छितों वैकुंठासी । अक्षय्यीचे रहावयासी । तुझ्या चरणांसन्निध ॥९३॥ ऐसी करुन विनवणी । समर्थांनीं जोडिले पाणी । अश्रु आले लोचनीं । विरह हरीचा साहवेना ॥९४॥ हरी पाटील जोडून हातां । पुसूं लागला पुण्यवंता । अश्रु कां हो सद्‌गुरुनाथा । आणिले लोचनीं ये वेळां ? ॥९५॥ किंवा मी कांहीं सेवेला । चुकलों आहे दयाळा । म्हणून आपणां खेद झाला । तें सांगा लवलाही ॥९६॥ महाराज म्हणाले त्यावर । हरी पाटलाचा धरुन कर । सांगितलें तरी न कळणार । त्याचें वर्म बापा तुला ॥९७॥ तो विषय खोल भारी । तूं न पडावें त्याभीतरीं । इतकेंच सांगतों श्रवण करी । संगत माझी थोडी असे ॥९८॥ चाल आतां शेगांवाला । तूं आपल्या ठिकाणाला । तुमच्या पाटील वंशाला । कांहीं न कमी पडेल ॥९९॥ पंढरीचें मावंदें केलें । शेगांवामाजीं भलें । चित्त चिंतेनें व्याप्त झालें । मात्र हरीपाटलाचें ॥३००॥ तो म्हणे मंडळीस । महाराज वदले पंढरीस । संगत राहिली थोडे दिवस । माझी विठूच्या राउळीं ॥१॥ पुढें श्रावणमास गेला । क्षीणता आली तनूला । पुढें भाद्रपदमास आला । काय झालें तें ऐका ॥२॥ गणेश चतुर्थीचे दिवशीं । महाराज म्हणाले अवघ्यांसी । आतां गणपती बोळवण्यासी । यावें तुम्हीं मठांत ॥३॥ कथा गणेशपुराणांत । ऐशापरी आहे ग्रथित । चतुर्थीच्या निमित्त । पार्थिव गणपती करावा ॥४॥ त्याची पूजा-अर्चा करुन । नैवेद्य करावा समर्पण । दुसरे दिवशीं विसर्जून । बोळवावा जलामध्यें ॥५॥ तो दिवस आज आला । तो साजरा पाहिजे केला । या पार्थिव देहाला । तुम्ही बोळवा आनंदें ॥६॥ दुःख न करावें यत्किंचित । आम्हीं आहों येथें स्थित । तुम्हां सांभाळण्याप्रती सत्य । तुमचा विसर पडणें नसे ॥७॥ हें शरीर वस्त्रापरी । बदलणें आहे निर्धारी। ऐसें गीताशास्त्रांतरीं । भगवान् वदला अर्जुना ॥८॥ जे जे ब्रह्मवेत्ते झाले । त्यांनीं त्यांनीं ऐसेंच केले । शरीरवस्त्रासी बदलिलें । हें कांहीं विसरुं नका ॥९॥ चतुर्थीचा अवघा दिवस । आनंदामाजीं काढिला खास । बाळाभाऊच्या धरिलें करास । आसनीं आपल्या बसविलें ॥३१०॥ मी गेलों ऐसें मानूं नका । भक्तींत अंतर करुं नका । कदा मजलागीं विसरुं नका । मी आहे येथेंच ॥११॥ ऐसें भाषण करुन । योगें रोधिला असे प्राण । दिला मस्तकीं ठेवून । त्या महात्म्या पुरुषानें ॥१२॥ शके अठराशें बत्तीस । साधारण नाम संवत्सरास । भाद्रपद शुद्ध पंचमीस । गुरुवारीं प्रहर दिवसाला ॥१३॥ प्राण रोधिता शब्द केला । ’जय गजानन’ ऐसा भला । सच्चिदानंदीं लीन झाला । शेगांवामाझारीं ॥१४॥ देहाचें तें चलनवलन । पार गेलें मावळोन । स्वामी समाधिस्त पाहून । लोक हळूहळूं लागले ॥१५॥ पुकार झाली गांवांत । स्वामी झाले समाधिस्थ । ऐसी ऐकतां मात । हृदय पिटती नारीनर ॥१६॥ गेला गेला साक्षात्कारी । चालता बोलता श्रीहरी । गेला गेला कैवारी । आज दीनजनांचा ॥१७॥ गेला आमुचा विसांवा । गेला आमुचा सौख्यठेवा । विझाला हा ज्ञानदिवा । कालरुपी वार्‍यानें ॥१८॥ अहो गजाननस्वामी समर्था ! । आतां आम्हांस कोण त्राता ? । कां रे इतक्यांत पुण्यवंता । गेलास आम्हां सोडून ? ॥१९॥ मार्तंड पाटील, हरी पाटील । विष्णुसा बंकटलाल । ताराचंद प्रेमळ । भक्त स्वामीचा जो असे ॥३२०॥ श्रीपतराव कुळकर्णी । मठामाजीं जमले जाणी । विचार केला अवघ्यांनीं । ऐशा रीतीं श्रोते हो ॥२१॥ आज आहे पंचमीचा दिवस । समाधि न द्या स्वामीस । हाळोपाळीच्या लोकांस । येऊं द्या हो दर्शना ॥२२॥ आतां पुढें ही मूर्ति । लोपणार आहे निश्चिती । अस्तमानापर्यंत ती । लोकांची ती वाट पहा ॥२३॥ ज्यांच्या नशिबीं असेल । तयांना दर्शन घडेल । नका करुं आतां वेळ । जासूद धाडा चोहींकडे ॥२४॥ गोविंदशास्त्री डोणगांवचे। एक विद्वान् होते साचे। ते बोलिले आपुल्या वाचें । सर्व लोकांस येणें रीतीं ॥२५॥ त्यांच्या आवडत्या भक्तांसी । ते दर्शन देतील निश्चयेंसी । तोंपर्यंत प्राणासी । मस्तकीं धारण करतील ॥२६॥ त्याची प्रचीति पहावया । नको कोठें लांब जाया । पहा लोणी ठेवोनियां। येधवां मस्तकीं स्वामीच्या ॥२७॥ लोणी ठेवितां शिरावरी । तें पघळूं लागलें निर्धारीं । जो तो त्याचें कौतुक करी । बल हें योगशास्त्राचें ॥२८॥ तो प्रकार पहातां । गोविंदशास्त्री झाला बोलता । एक दिवसाची काय कथा । हे राहतील वर्षभर ॥२९॥ निःसंशय ऐशा स्थितींत । परी हें करणें अनुचित । आवडते अवघे आलिया भक्त । समाधि द्या स्वामीला ॥३३०॥ तें अवघ्यांस मानवलें । स्वामीपुढें आदरें भलें । भजन त्यांनीं मांडिलें । हजार टाळ जमला हो ॥३१॥ दुरदूरच्या भक्तांप्रत । स्वामी जाऊन स्वप्नांत । आपुल्या समाधीची मात । कळविते झाले विबुध हो ॥३२॥ तया ऋषिपंचमीला । अपार मेळा मिळाला । लोकांचा तो शेगांवाला । घ्याया दर्शन स्वामीचें ॥३३॥ रथ केला तयार । दिंड्या आल्या अपार । सडे घातले रस्त्यावर । गोमयाचे बायांनी ॥३४॥ रंगवल्या नानापरी । काढू लागल्या चतुर नारी । दीपोत्सव झाला भारी । त्या शेगावग्रामाला ॥३५॥ मूर्ति ठेविली रथात । मिरवणूक निघाली आनंदात । रात्रभरी शेगावात । तो ना थाट वर्णाचे ॥३६॥ वाद्यांचे नाना प्रकार । दिंड्या मिळाल्या अपार । होऊं लागला भगनगजर । विठ्ठलाच्या नावाचा ॥३७॥ तुळशी बुक्का गुलाल फुले । भक्त उधळू लागले । फूलांखाली झाकून गेले । श्री गजानन महाराज ॥३८॥ बर्फीपेढ्यांस नाही मिती । लोक वाटती खिरापती । कित्येकांनी रथावरती । रूपये पैसे उधळीले ॥३९॥ ऐशी मिरवणूक रात्रभर । शेगावी निघून अखेर । उदयास येता दिनकर । परत आली मठात ॥४०॥ समाधीच्या जागेवरी । मूर्ती नेऊनी ठेविली खरी । रूद्राभिषेक केला वरी । अखेरचा देहाला ॥४१॥ पूजा केली पंचोपचार । आरती उजळली अखेर । भक्तांनी केला नामगजर । गजाननाचे नावाचा ॥४२॥ जय जय अवलीया गजानना! । हे नरदेहधारी नारायणा । अविनाशरूपा आनंदघना । परात्परा जगत्पते ॥४३॥ ऐशा भजनाभीतरी । मूर्ति ठेविली आसनावरी । उत्तराभिमुख साजिरी । शास्त्रमार्गाप्रमाणे ॥४४॥ अखेरचे दर्शन । अवघ्यांनी घेतले जाण । ’जय स्वामी गजानन’ । औइसे मुखे बोलोनी ॥४५॥ मीठ अर्गजा अबीर । यांनी ती भरली गार । शिळा लावूनी केले द्वार । बंद भक्तांनी शेवटी ॥४६॥ दहा दिवसपर्यंत । समाराधना चालली तेथ । घेऊनी गेले असंख्यात । लोक स्वामींच्या प्रसादा ॥४७॥ खरोखरीच संतांचा । अधिकार तो थोर साचा । सार्वभौम राजाचा । पाड नाही त्यांच्या पुढे ॥४८॥ स्वस्ती श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामे ग्रंथ । भाविका दावो सत्पथ । भक्ती हरीची करावया ॥३४९॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ ॥ इति एकोनविंशोऽध्यायः समाप्तः ॥

अध्याय २०
॥ श्रीगणेशाय नमः ॥ जय जयाजी रुक्मिणीवरा । हे चंद्रभागातटविहारा । देवा वरदपाणी धरा । दासगणूच्या मस्तकीं ॥१॥ तूं भूपांचा भूपती । अवघेंच आहे तुझ्या हातीं । मग माझी फजीती । कां रे ऐसी मांडलीस ? ॥२॥ माझें पाप ताप दहन । करा कृपाकृशानें करून । राहो आनंदी सदा मन । तुझें भजन करावया ॥३॥ यांत अंतर केल्यास । वृथा तुला लागेल दोष । खर्‍या थोरांनीं आपणांस । बट्टा लावून घेऊं नये ॥४॥ म्हणून हे श्यामसुंदरा । राही रुक्मिणीच्या वरा । पांडुरंगा परम उदारा । माझी इच्छा पूर्ण करी ॥५॥ असो समाधिस्थ झाल्यावर । श्रीगजानन साधुवर । म्हणूं लागले नारीनर । आतां काय ह्या शेगांवीं ॥६॥ शेगांवींचा ज्ञानगभस्ती । अस्ता गेला निश्चिती । आतां काय तेथें माती । राहिली आहे निव्वळ ॥७॥ समुद्राचें आटल्या नीर । वा पुष्पतरूचा गेल्या भर । कोण त्याचें करणार । कौतुक या जगामध्यें ॥८॥ आतां खेपा शेगांवांत । करणें आहे कीं निमित्त ? । देव नसतां देव्हार्‍यांत । माळा बांधणें व्यर्थची ॥९॥ ऐसें कित्येक बोलती । परी ती असे साच भ्रांती । महाराजांची दिव्य ज्योति । अदृश्य आहे तेच ठायां ॥१०॥ जेवीं इंद्रायणीचे तीरीं । ज्ञानेश्वर समाधिस्थ जरी । ते आहेत भेटले परी । तेच ठायीं भाविकां ॥११॥ तैशीच शेगांवांत । श्रीगजाननस्वामी समर्थ । ऐसा जयांचा सिध्दान्त । दर्शन त्यांना तेथ होतें ॥१२॥ ते विषयींची एक कथा । सांगतों मी येथ आतां । गणपत कोठाडे होता । एक भाविक गृहस्थ ॥१३॥ हा रायली कंपनीचा । एजंट शेगांव दुकानीचा । नित्य नेम होता त्याचा । दर्शनाचा श्रोते हो ॥१४॥ अस्तमानीं प्रतिदिवशीं । यावें त्यानें मठासी । बैसोनियां समाधीपासीं । स्तवन करावें एकनिष्ठें ॥१५॥ एकदां ऐसें वाटलें त्यास । अभिषेक करून समाधीस । उद्यांच्या विजयादशमीस । ब्राह्मणभोजन घालावें ॥१६॥ केली सर्व तयारी । अभिषेकाची साजिरी । शिधा मठाभीतरीं । धाडिला मोठ्या प्रमाणांत ॥१७॥ तैं कांता म्हणे हो प्राणनाथा ! । हें तुम्ही काय करितां । हाड नाहीं तुमच्या हातां । खर्च करण्याच्या बाबतींत ॥१८॥ उद्यां आहे विजयादशमी । म्हणून पोरांबाळांसी । कपडे अलंकार अंगासी । करून घाला कांहीं तरी ॥१९॥ हे अभिषेक ब्राह्मणभोजनें । वरचेवरी न योग्य करणें । दिलीं आपणां ईश्वरानें । चार पोरेंबाळें हो ॥२०॥ फुटका मणि ना अंगावरती । मी लंकेची पार्वती । गृहस्थाची ही का रीती ? । संचय करावा धनाचा ॥२१॥ हें कांतेचें भाषण । गणपतरावा न रुचलें जाण । तो म्हणे प्रपंचाहून । श्रेष्ठ परमार्थ वाटे मला ॥२२॥ तोच त्याच्या कांतेसी । स्वप्न पडलें रात्रीसी । उगे न छळी पतीसी । तो करतो तें करूं दे ॥२३॥ त्यांत तुझ्या बापाचें । काय जातें सांग साचें । प्रेम अशाश्वताचें । वेडे ! हें बाळगूं नको ॥२४॥ यामध्यें न कांहीं सार । धन भूचें भूमीवर । येतें मात्र बरोबर । पाप पुण्य मानवाच्या ॥२५॥ अभिषेक ब्राह्मणभोजन । हें पारमार्थिक आहे पुण्य । त्याच्यासाठीं वेंचितां  न । तें न जाय अनाठायीं ॥२६॥ पेरलेल्या बीजापरी । त्याची स्थिती होते खरी । म्हणून सांगतों तुला पोरी । अडथळा त्या करूं नको ॥२७॥ ऐशा पाहून स्वप्नास । सांगती झाली पतीस । तेणें गणपतरावास । हर्ष झाला विबुध हो ॥२८॥ आले का हें प्रत्यंतर । महाराज येथेंच साचार । सोडून द्यावा कुविचार । आजपासून कांहीं तरी ॥२९॥ मुलें बाळें कोणाचीं । धनदौलत कोणाची । तूं न वाही चिंता त्यांची । तें अवघें समर्थाचें ॥३०॥ असो गणपतरावानें । पूजन केलें आनंदानें । त्या दसर्‍याच्या मुहूर्तानें । खर्चही केला अत्युतम ॥३१॥ या गणपतरावाची । निष्ठा समर्थपदीं साची । जडली शुध्द स्वरूपाची । होती पहिल्यापासून ॥३२॥ लक्ष्मण हरी जाजळाला । ऐसाच अनुभव एक वेळां । बोरीबंदरावरी आला । तो ऐका सांगतों ॥३३॥ कांहीं कामानिमित्त । लक्ष्मण गेला मुंबईत । हा समर्थाचा होता भक्त । पहिल्यापासून विबुध हो ॥३४॥ घरच्या कांहीं कटकटीनें । वैताग त्याच्या  ला मनें । कांहीं व्यापारासंबंधानें । आला होता मुंबईस ॥३५॥ असो बोरीबंदरावरी । लक्ष्मण आला जाया घरीं । तों आगगाडीच्या धक्क्यावरी । एक भेटला परमहंस ॥३६॥ आजानुबाहु उंच बांधा । दृष्टि नासाग्रासी सदा। ओंकाराचा सर्वदा । जप चालला त्याच्या मुखीं ॥३७॥ तो बोलला लक्ष्मणास । तूं गजाननाचा आहेस शिष्य । ऐसें असून हताश । कां होतोस कळेना ? ॥३८॥ तूं आपुल्या जेव्हां घरीं । पुण्यतिथि केलीस खरी । चारशें पानांची तयारी । करून उमरावतीला ॥३९॥ गोपाळराव पेठकर । आणी बापटमास्तर । यांचा कैंसा प्रकार । घडला तो आण मना ॥४०॥ पुत्रशोक बापटासी । झाला असून प्रसादासी । तो तुझ्या गेहासी । आला होता न सांग  ॥४१॥ पेठकराचे ब्राह्मण भले । सांग कशानें राहिले ? । अरे गजाननस्वामी गेले । त्या उभयतांच्या स्वप्नांत ॥४२॥ उपदेश करून दोघांस । आणिले होते प्रसादास । हें कैसेम विसरलास ? । सांग मला ये वेळीं ॥४३॥ खुणेच्या गोष्टी ऐकून । साशंक झाला लक्ष्मण । म्हणे हा असावा कोण । हें कांहीं कळत नसे ॥४४॥ लक्ष्मणें त्या संन्याशाला । आदरें नमस्कार केला । तो पाहतां गुप्त झाला । बोरीबंदर स्टेशनासी ॥४५॥ मग लक्ष्मण येऊन घरीं । वागूं लागला पहिल्यापरी । प्रतिवर्षी आपुल्या घरीं । पुण्यतिथीचा प्रारंभ केला ॥४६॥ अवधूत जयराम खेडकरासी । राहीत साहीत गांवासी । भेटते झाले पुण्यराशी । संन्याशाच्या वेषानें ॥४७॥ एक माधवमार्तंड जोशी । कळंब कसूर ग्रामासी । आला मोजणी करायासी । जमिनीची श्रोते हो ॥४८॥ हा सरकारी नौकर । होता रेव्हेन्यु आँफिसर । त्याचा गजानन साधूवर । पूर्ण होता भरवंसा ॥४९॥ दिवसभर मोजणी केली । पुढें त्यास इच्छा झाली । अस्तमानाचे समयां भली । शेगांवास जाण्याची ॥५०॥ आज गुरुवारचा आहे दिन । घेऊं समर्थाचें दर्शन । ऐसा विचार करून । आज्ञा केली शिपायाला ॥५१॥ जोड आपुली वेगें दमणी । जाऊं शेगांवालागूनी । रात्र तेथें काढूनी । येऊं सकाळीं परत पुन्हां ॥५२॥ तई तो शिपाई कुतुबुद्दीन । बोलला कर जोडून । आभाळ आलें भरून । याचा विचार करावा ॥५३॥ मन नदीला पाणी भलें । आहे थोडकें आतां आलें । पाही पाणी गढूळ झालें । म्हणून केली विनंती ॥५४॥ जोशी म्हणाले त्यावर । अरे आतां होऊण नदीपार । जा दमणी करी तयार । उगीच सबबी सांगूं नको ॥५५॥ शिपायानें जोडिली दमणी । आला लगेंच घेऊनी । जोशी आंत बैसोनी । जाऊं लागेल शेगांवा ॥५६॥ दमणी घातली नदींत । तों पाणी आलें अकस्मात । जाण्या बैल तटाप्रत । अवसर नाहीं राहिला ॥५७॥ झंझावात बळावला । कडकडाट करी चपला । मन नदीला पूर आला । क्षणामाजीं भयंकर ॥५८॥ मेघ वर्षे मुसळधार । झंझावात सुटला खरा । शेतकर्‍यांचिया छपरा । तो उडवूं लागला हो ॥५९॥ शिपाई म्हणे कुतुबुद्दीन । साहेब येथेंच आलें मरण । तुम्हीं आम्हांलागून । उपाय यासी आतां नसे ॥६०॥ तई माधव मार्तंड जोशी । घाबरे झाले निजमानसीं । बाहूं लागले समर्थासी । करुणायुक्त वचानें ॥६१॥ हे समर्थ गजानना । रक्षणा आमुच्या करी प्राणां । अशा संकटीं तुझ्याविणा । त्राता न कोणी आम्हांतें ॥६२॥ कथा ऐकिली पुराणांत । जहाज बुडतां समुद्रांत ।त्यास संतानें देऊन हात । रक्षण केलें सर्वस्वीं ॥६३॥ तूंही संत असामान्य । ब्रह्मवेत्ता करूणाघन । करी आमुचें रक्षण । येऊन या पुरामध्यें ॥६४॥ दमणींत आलें जीवन । बैल गेले घाबरोन । मग जोशी पु्ढें होऊन । बोलते झाले शिपायास ॥६५॥ तूं आतां मागें सर । अवलीयाचें भजन कर । तेच नेतील आपणां पार । त्यांची चिंता करूं नको ॥६६॥ जोशी म्हणाले समर्था । अगाध आहे तुझी सत्ता । वाटेल तें करी   । तारी अथवा मारी आम्हां ॥६७॥ कासरा दिला सोडून । दोघांनींही मिटले नयन । तों काय घडलें वर्तमान । तें आतां परियेसा ॥६८॥ ऐशा महापुरांतूनी । पैल तटा पावली दमणी । उभी राहिली येऊनी । सडकेवरी शेगांवच्या ॥६९॥ ऐसा प्रकार पाहतां । आनंदले उभयतां । पाहा केवढी अगाध सत्ता । आहे अवलीया बाबाची ॥७०॥ पुरामाजीं रक्षण केलें । निज भक्तां ना बुडूं दिलें । जोशी शेगांवाप्रती आले । एक घटका रात्रीस ॥७१॥ वंदन केलें समाधीला । पालखीचा पाहिला सोहळा । दुसरे दिवशीं बहुत केला । दानधर्म जोशांनीं ॥७२॥ बाळाभाऊचियापासीं । ब्राह्मणभोजन घालण्यासी । कांही रुपये अतिहर्षीं । जोशी देते जाहले ॥७३॥ साकल्य कथिलें वर्तमान । बाळाभाऊलागुन । हे नवसाचे ब्राह्मण । तुम्ही घाला माझ्यास्तव ॥७४॥ कां कीं मला रजा नाहीं । काम जरूरीचें पाही । ऐसें सांगून लवलाही । जोशी गेले निघून ॥७५॥ एक यादव गणेश सुभेदार । होता हिंगणीचा राहाणार । हा करीतसे व्यापार । वर्‍हाडांत कापसाचा ॥७६॥ यांस एक सालीं भला । दहा हजार तोटा आला । त्या चिंतेनें क्षीण झाला । कांहीं न सुचे मानसीं ॥७७॥ परी व्यापार सोडवेना । चिंता मनींची जाईना । फायदा कांहीं होईना । त्याच्या मनाप्रमाणें ॥७८॥ फायद्यासाठीं खटपट करी । नाना प्रकारें साजिरी । स्वस्थ ना बसती व्यापारी । राहाती सदा प्रयत्नांत ॥७९॥ हा एकदां वर्ध्यांत । आला कांहीं कामानिमित्त । उतरण्या गेला घरांत । विनायक असिरकराच्या ॥८०॥ तों इतक्यांत तेथें आला । एक भिकारी बुध हो भला । भिक्षा कांहीं मागण्याला । असिरकराच्या घरांत ॥८१॥ पोषाख अवघा मराठी । करामाजीं भव्य काठी । डोईस होती टोपी मोठी । बनातीची मळकट ॥८२॥ कंपवायूनें शरीर । कांपत होतें वरच्यावर । त्यास पहातां असिरकर । चित्तीं परम कोपले ॥८३॥ जा बेट्या मागल्या द्वारीं । तेथें मिळेल भिक्षा खरी । नको चढूस पायरी । ओसरीची ये वेळां ॥८४॥ परी हे बोल त्याचे । भिक्षेकरी न मानी साचे । येऊन वरती ओसरीचे । यादवासन्निध बैसला ॥८५॥ घाल भिक्षा कांहीं तरी । असें म्हणून पुढें करी । भिक्षापात्र भिकारी । यादव सुभेदाराच्या ॥८६॥ यादव म्हणे मनांत ।  भिकारी हा लोचट बहुत । नको म्हणत असतां येथ । हा बैसला येवोनी ॥८७॥ त्यातें पहात न्याहाळून । तईं तो भासला गजानन । सुभेदाराकारण । शेगांवचा राजयोगी ॥८८॥ दृष्टीस तेज अत्यंत । स्वरही त्यांच्या परी सत्य । फरक इतुकाच होता त्यांत । कंप होता तनूला ॥८९॥ तेज मुद्रा बोलणें । होतें समर्थाप्रमाणें । तें पाहून ऐसें म्हणे । सुभेदार निज चित्तीं ॥९०॥ हा जरी मानूं गजानन । तरी ते गेले समाधिस्थ होऊन । आतां महाराज कोठून । पडतील आमुच्या दृष्टीशीं ? ॥९१॥ कांहीं असो पैसे दोन । देऊं भिकार्‍याकारण । श्रीगजानन समजून । उहापोह ज्याचा नको ॥९२॥ पैसे घेतले भिकार्‍यानें । आणिक कांहीं देई म्हणे । श्रीगजाननकारणें । शेरणी वाट गुळाची ॥९३॥ ते वायदे करिसी वरचेवर । ते मी न आतां मानणार । तोटा दहा हजार । तुज व्यापारीं आला ना ? ॥९४॥ त्याचा विचार अंतरीं । करून देई कांहीं तरी । रुपये मजला लवकरी । काढ पाकीट खिशांतून ? ॥९५॥ ऐसें भिकारी बोलतां । सुभेदार झाला देता । कांहीं रुपये तत्त्वतां । पाकिटाचे काढून ॥९६॥ भिकारी म्हणे ते अवसरीं । संतुष्ट मी इतुक्यावरी । होत नाहीं दे लवकरी । आणखी रुपये कांहीं मला ॥९७॥ पुन्हां रुपये काढिले । भिकार्‍यासी अर्पिले । तों इतुक्यांत घरांत गेले । विनायकराव असिरकर ॥९८॥ यादवराव एकटा बसला । होता असिरकराच्या ओसरीला । तें पाहून बोलला । सुभेदारासी येणें रीतीं ॥९९॥ संशय गजाननाविषयीं । कां घेतोस चित्तीं पाही ? । कपडे काढून उभा राही । माझ्यापुढें ये वेळां ॥१००॥ तुझ्या अवघ्या अंगावर । दृष्टि पडूं देई एकवार । माझी तेणें होईल दुर । व्याधि तुझी यादवा ॥१॥ तूं मजला मुलापरी । कां रे लाजसी अंतरीं ? । ऐसें म्हणून पाठीवरी । हात फिरविला तयांनीं ॥२॥ फिरविला नखशिखान्त । अंगावरून त्यानें हात । तों आले इतक्यांत । असिरकर ओसरीला ॥३॥ रुपये घेऊन भिक्षेकरी । गेला द्वाराच्या बाहेरी । यादवानें बहुतापरी । तपास केला गांवांत ॥४॥ परी न थांग लागला । शेवटीं त्यानें निश्चय केला । ऐसा आपुल्या चित्ताला । कीं हा असावा गजानन ॥५॥ सुभेदार म्हणे मानसीं । हे समर्थ असल्या आज दिवशीं । फायदा होईल व्यापारासी । कांहीं तरी निःसंशय ॥६॥ तों सुभेदाराच्या । गाड्या आल्या कापसाच्या । विकावयासाठीं साच्या । वर्ध्याचिया बाजारीं ॥७॥ विक्री होतां किंमत । येती झाली तया बहुत । तेणें यादव चित्तांत । समाधान पावला ॥८॥ आणि निश्चय ऐसा केला । जो भिकारी भेटला । तो होता समर्थ भला । श्रीगजानन योगीराज ॥९॥ समर्थ आपुल्या भक्तांसी । रक्षण करती अहर्निशीं । निष्ठा मात्र त्यांचेविषयीं । दृढतर पाहिजे मनांत ॥११०॥

भाऊ राजाराम कवर । खामगांवीं होता डाँक्टर । त्याची तेल्हार्‍याच्यावर । बदली असे जाहली ॥११॥ म्हणून तेथें जाण्याला । खामगांवाहून निघाला । सहकुटुंब मठांत आला । घ्याया श्रींचें दर्शन ॥१२॥ गाडी केली तेल्हार्‍याची । तयारी केली निघण्याची । वेळ अस्तमानाची । असती झाली ते वेळां ॥१३॥ बाळाभाऊ मठाधिपती । तो त्या बोलला येणें रीतीं । अहो ऐका माझी विनंती । प्रसाद घेऊन जावें तुम्हीं ? ॥१४॥ तुम्ही आजपर्यंत । गेलां न येथून उपोषित । आज ऐसें विपरीत । कां हो मनीं आणिलें ? ॥१५॥ ह्यांतून आहे व्यतिपात । हें आणावें मनांत । कवर सांगें त्याप्रत । मला निकड आहे बहु ॥१६॥ आज रात्रीं प्रसाद घेतों । मागल्या रात्रीं निघून जातों । नसतां आग्रह मला तो । तुम्ही न करा ये काळीं ॥१७॥ बोलल्याप्रमाणें निघाला । तेल्हार्‍यासी डाँक्टर भला । घेऊन मुलांमाणसांला । दमणीमाजीं बसून ॥१८॥ रात्र होती अंधारी । महा भयंकर साजरी । वाटे निशा शोक करी । निज पतीच्या वियोगें ॥१९॥ तों चमत्कार ऐसा झाला । तेल्हार्‍याचा रस्ता चुकला । कोणी न भेटे पंथाला । विचारावें कोणा जरी ॥१२०॥ गाडी अरुंद रस्त्यावर । दोही बांजूस कांटे फार । डी उभी कांठावर । एका भव्य तलावाच्या ॥२१॥ म्हणता झाला गाडीवाला । साहेब रस्ता आहे चुकला । हें ऐकून कवराला । आश्चर्य वाटलें मानसीं ॥२२॥ खालीं उतरून जों पहात । तों अवघें दिसलें विपरीत । अपशब्द बोलला बहुत । तो त्या गाडीवाल्याला ॥२३॥ तूं तेल्हार्‍याचा म्हणून । तुझी गाडी केली जाण । आडमार्गें आणून । आम्हां कैसें सोडिलें ? ॥२४॥ काय होतास दारू प्याला । म्हणून हा रस्ता चुकला । वाट तुझ्या डोळ्यांला । दिसली कशी ना सांग मज ? ॥२५॥ तेल्हार्‍याचा रस्ता थोर । आम्ही हमेशा वाहातों साचार । मग आडमार्गावर । गाडी कैशी आली तुझी ? ॥२६॥ ऐसें कवर बोलतां । गाडीवाला जोडी हातां । कां हो मजला शिव्या देतां ? । म्यां न अपराध केला कीं ॥२७॥ मी हमेश भाडें करतों । तेल्हार्‍याहून येथें येतों । वाटेल तेव्हां गाडी हांकतों । रस्ता अवघा माहीत मज ॥२८॥ बैलही ना कोठें वळले । तें नीट येथेंच आले । तलाव पाहातां स्तब्ध झाले । हा न रस्ता तेल्हार्‍याचा ॥२९॥ मग कवर समजला मनांत । हें समर्थाचें आहे कृत्य । प्रसाद घेतल्याविरहित । कां कीं मी निघालों ॥१३०॥ बाळाभाऊच्या विनंतीला । मीं नाहीं मान दिला । म्हणून माझा रस्ता चुकला । आतां वाट गवसे कशी ? ॥३१॥ हे भयंकर कानन । येथें मशी त्राता कोण । गजानना ! तुजवांचून । रक्षण माझें कराया ॥३२॥ तों तळ्याच्या दुसर्‍या बाजूला । घागरमाळांचा आवाज झाला । डाँक्टराच्या कानीं पडला । तेणें आला थोडा धीर ॥३३॥ गाडीवाल्यासी म्हणे कवर । रस्ता नाहीं फार दूर । या चाहुलीचा सुमार । धरून गाडी हाण आतां ॥३४॥ तें त्यानें ऐकिलें । कांट्यांकुपाट्यांमधून नेलें । नीट रस्त्याला लाविलें । या आपल्या गाडीस ॥३५॥ हमरस्ता लागतां भली । डाँक्टरानें चौकशी केली । तों ऐशापरी समजली । गोष्ट तया कवरातें ॥३६॥ हें शेगांवचें शिवार । आहे अझून साचार । मग म्हणाला डाँक्टर । चाल शेगांवीं परत आतां ॥३७॥ सूर्योदयाचे समायाला । शेगांवासी कवर आला । वृत्तांत बाळाभाऊला । केला सर्व निवेदन ॥३८॥ मग बाळाभाऊ म्हणाले । हेंच आज बरें झालें । व्यतिपातीं न जाऊं दिलें । समर्थांनीं तुम्हांस ॥३९॥ आज प्रसाद ग्रहण करा । उद्यां जा हो तेल्हारा । करूं नये कधींच खरा । प्रसादाचा इनकार ॥१४०॥  समर्थाचे तुम्ही भक्त । म्हणून तुम्हां आणिले परत । मानवाचे अवघे बेत । सिध्दीस जाणें अशक्य ॥४१॥ संतांच्या जे असेल मनीं । तेंच येईल घडोनी । भरंवसा त्यांचे चरणीं । ठेवून स्वस्थ असावें ॥४२॥ दुसरे दिवशीं प्रसादासी । घेऊन गेला तेल्हार्‍यासी । आतां पुढील गोष्टीसी । अवधान द्यावें श्रवणातें ॥४३॥ एक रतनसा नामें नर । होता जातीनें भावसार । तयाचा मुलगा दिनकर । होता एक वर्षाचा ॥४४॥ त्यासी सोबणीचा रोग झाला । कोणी म्हणती सटावला । बालक अवघा सुकून गेला । रक्त न राहिलें अंगांत ॥४५॥ दिसूं लागलीं अवघीं हाडें । वरतीं नुसतें कातडें । वैद्य आणले बडेबडे । परी न झाला उपयोग ॥४६॥ मुलगें रडतां राहीना । दूधपाणी घेईना । ज्वर मुळींच सोडीना । पाहा तयाच्या तनूतें ॥४७॥ वैद्य म्हणती रतनसासी । आतां औषध न देई यासी । हा तुझ्या हातासी । लागणें आहे अशक्य ॥४८॥ शक्याशक्य विचार । सुज्ञें करावा निरंतर । उगीच पूल सागरावर । बांधावया जाऊं नये ! ॥४९॥ ऐसें ऐकून रतनसा । रडूं लागला ढसढसां । शेवटीं विचार त्यानें ऐसा । केला आपुल्या मानसीं ॥१५०॥ येवींतेवी मरतें पोर । माझें आतां साचार । पाहूं करून एकवार । उपाय हा शेवटचा ॥५१॥ दिनकराचा अंतकाळ । आला होता अति जवळ । घरचीं माणसें सकळ । लागलीं श्रोते रडावया ॥५२॥ हातपाय गार झाले । नेत्रतेज मंदावलें । मनगटाचें सोडिलें । ठिकाण पाहा नाड्यांनीं ॥५३॥ ऐशा स्थितिमाझारीं । रतनसानें पुत्र करीं । घेऊन ठेविला असें द्वारीं । नेऊनिया समर्थांच्या ॥५४॥ आणि केला त्यांसी नवस । पुत्र माझा उठल्यास । शेरणी वांटीन तुम्हांस । मी पांच रुपयांची ॥५५॥ तुम्ही पावलां अवघ्यांला । त्याचा अनुभव द्यावा मला । मीही आहे आपुला । माझी उपेक्षा करूं नका ॥५६॥ माझें मूल द्वारांत । तुझ्या जरी झालें मृत । तरी अवघ्या वर्‍हाडांत । तुझी होईल नाचक्की ॥५७॥ अमृतापरी तुझे चरण । आले सांगत आम्हां जन । हे स्वामी गजानन । कृपा करा या बाला ॥५८॥ पुत्र न माझा उठला जरी । मी डोकें फोडीन पायांवरी । तुझ्या आज निर्धारीं । ऐसा निश्चय मनींचा ॥५९॥ अमृततुल्य तुझी दृष्टी । त्याची करावी आज वृष्टी । नको करूंस मला कष्टी । महापुरुषा गजानना ! ॥१६०॥ त्यास कांहीं वेळ झाला । तों प्रकार ऐसा घडून आला । मूल हातापायांला । हालवावया लागलें ॥६१॥ नाडी आली ठिकाणीं । रुदन करूं लागलें जाणी । तों प्रकार पाहूनी । लोक सारे आनंदले ॥६२॥ समर्थकृपा झाल्यावर । राहील कोठून त्या दर ? । सूर्याचिया समोर । तमाचा तो पाड नसे ॥६३॥ दिनकर थोडे दिवसांत । होता झाला पूर्वतत । नवस असला श्रध्दायुक्त । तो फळे हा न्याय असे ॥६४॥ दादा कोल्हटकराचा । पुत्र राजा नांवाचा । आहे प्रसाद समर्थांचा । संतकृपा अमोल खरी ॥६५॥ कन्या रामचंद्र पाटलाची । चंद्रभागा नांवाची । ज्वान अठरा वर्षांची । लाडेगांव सासर जिचें ॥६६॥ ही असतां गरोदर । प्रसंग आला दुर्धर । प्रसुतीची वेळ फार । कठीण स्त्रीजातीला ॥६७॥ लाडेगांवाहून माहेरीं । चंद्रभागा आली खरी । प्रसूतीस्तव निर्धारी । जनरीतीप्रमाणें ॥६८॥ मोठ्या कष्टानें प्रसूती । झाली तिची निश्चिती । तोंच चंद्रभागेवरती । ज्वरें अंमल बसविला ॥६९॥ तो होतां नवज्वर । थकून गेले डाँक्टर । औषध उपचार केले फार । आपुल्या मुलीस पाटलांनीं ॥१७०॥ थोडाबहुत गुण आला । व्याधि तितक्यापुरता दबला । परी नव्हता मुळींच झाला । नामशेष देहांतूनी ॥७१॥ चंद्रभागा आजारी । पडूं लागली वरच्यावरी । एकदां अकोल्या नेलें खरी । औषध तिला द्यावया ॥७२॥ वैद्य विघानें नाना करिती । कोणी नळसंग्रहणी बोलती । कोणी वैद्य ऐसें म्हणती । क्षय झाला मुलीस या ॥७३॥ मेळ एकाचा एकाला । नाहीं मुळीं लागला । मग पाटलानें विचार केला । आतां वैद्य गजानन ॥७४॥ तारो अथवा मारो इसी । अंगारा लावा प्रति दिवसीं । तीर्थ द्यावें प्यायासी । समर्थांच्या पायांचें ॥७५॥ पिता मोठा निष्ठावंत । समर्थावरी अवघा हेत । हळूहळू त्या पोरीप्रत । गुण येता जाहला ॥७६॥ तिला उठवत नव्हतें शय्येसी । तीच आली दर्शनासी । पायीं चालत मठासी । हें महत्त्व अंगार्‍याचें ॥७७॥ निष्ठावंत ज्याचा भाव । तयाशीं पावे देव । उपास्यपदीं भाव । उपासकें ठेवावा ॥७८॥ रामचंद्राची अंगना । जानकाबाई सुलक्षणा । परी दैवयोग सुटेना । तो भोगल्यांवाचुनी ॥७९॥ वाताचा झाला विकार । जानकाबाईस साचार । पोट दुखे वरच्यावर । कांहीं उपाय चालेना ॥१८०॥ औषध देतां दबे वात । पुनः उठे पूर्ववत । ऐसा क्रम दिवस बहुत । चालला होता श्रोते हो ॥८१॥ त्या वाताची अखेरी । होती झाली मस्तकावरी । मेंदु बिघडला निर्धारीं । गेली जाणीव मावळून ॥८२॥ वेड्यापरी करावें । वाटेल तें बोलावें । कधीं उपाशीं निजावें । कधीं बसावेम जेवत ॥८३॥ कोणी म्हणती लागलें भुत । कोणी म्हणती रोग सत्य । कांहीं वदू लागले तेथ । हा करणीचा प्रकार असे ॥८४॥ कां कीं जितके असती जमेदार । त्यांचें असतें बाकडें फार । दुबळा आपुला दावी जोर । चेटुककरणी करूनियां ॥८५॥ औषधउपाय बहुत केलें । जाणतेही आणविले । गंडे बहुत बांधिले । करीं जानकाबाईच्या ॥८६॥ पाटील घरचा श्रीमंत । तो सापडला अडचणींत । म्हणून येता झाला ऊत । अवघ्यां त्या दांभिकांना ॥८७॥ कोणी अंगांत आणावें । वेडाचें निदान करावें । कांहीं तरी सांगावें । धनास्तव पाटलाला ॥८८॥ तो बिचारा सारें करी । कांता बरी न होय परी । विचार त्यानें अखेरी । ऐशा रीती ठरविला ॥८९॥ वैद्य आतां गजानन । जाणतां आतां गजानन । देव ऋषि आतां गजानन । तो जें वाटेल तें करो ॥१९०॥ माझी बायको सून त्याची । ही भावना माझी साची । आतां अन्य उपायांची । गरज नाहीं आम्हांला ॥९१॥ तूं उद्यांपासून । प्रातःकाळीं करी स्नान । मठामाजीं जाऊन । घाली प्रदक्षिणा समाधीसी ॥९२॥ तें तिनें पतीचें वचन । सर्वथैव केलें मान्य । समर्थ समाधीलागून । घालू लागली प्रदक्षिणा ॥९३॥ गेल्या न त्या मात्र वायां । दया आली सद्गुरुराया । वातविकार जाऊनियां । निर्दोष ती जाहली ॥९४॥ खर्‍या खर्‍या संतांची । सेवा न जाई वायां साची । परी निष्ठा मानवाची । जडणें तेथें अशक्य ॥९५॥ समर्थांच्या नंतर । बाळाभाऊ गादीवर । बसले त्यांचे चमत्कार । कांहीं थोडे जाहले ॥९६॥ हे वैशाख वद्य षष्ठीसी । शेगांवीं गेले वैकुंठासी । त्यांच्यामागून गादीसी । बसले येऊन नारायण ॥९७॥ बाळाभाऊ जेव्हां गेले । तेव्हां नारायणा स्वप्न पडलें । नांदूरें ग्रामीं भलें । तें थोडें सांगतों ॥९८॥ हे माळी नारायणा । तूं शेगांवास करी गमना । रक्षण्या भाविक जनांना । ऐसें मला वाटतें ॥९९॥ ऐसें स्वप्नीं सांगून । निघून गेले गजानन । म्हणून आले नारायण । शेगांवामाझारीं ॥२००॥ कांहीं दिवस यांनींही । अधिकार चालविला ते ठायीं । यांची समाधि झाली पाही । चैत्र शुध्द षष्ठीला ॥१॥ पूर्वसुकृतावांचून । संतसेवा न घडे जाण । संतसेवेचें महत् पुण्य । त्या पुण्या पार नसे ॥२॥ श्रीगजाननलीलेचा । पार कधीं न लागायाचा । अंबरींच्या चांदण्यांचा । हिशोब कोणा न लागे कधीं ॥३॥ मी अज्ञान पामर । मति नाहीं तिळभर । मग हा लीलासागर । मुखीं केवीं वर्णू हो ! ॥४॥ त्यानें जें जें वदविलें । तें तें मीं कथित केलें । लेखणीनें अक्षर लिहिलें । परी तें न तिचें सामर्थ्य ॥५॥ ती लेखणी ज्याच्या करीं । तोंच अक्षरें काढी सारीं । निमित्ताकारण होतें खरी । लेखणी ती लिहावया ॥६॥ तैसेंच येथें झालें । मी लेखणीचें काम केलें । लिहिते लिहविते स्वामी भले । श्रीगजानन महाराज ॥७॥ त्यांच्या कृपेंकरून । मीं हें केलें लेखन । येथें माझें मोठेपण । कांहींच नाहीं विबुध हो ! ॥८॥ स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ । आतां आला कळसाप्रत । कळसाध्याय पुढें असे ॥२०९॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ ॥ इति विंशोऽध्यायः समाप्तः ॥ 

अध्याय २१
॥ श्रीगणेशाय नमः ॥ जय जयाजी अनंतवेषा । जय जयाजी अविनाशा । जय जयाजी परेशा । ब्रह्मांडाधीशा नमो तुशीं ॥१॥ देवा तूं आपणांस । पतितपावन नाम खास । सर्वदा आहे धरिलेंस । याचा विचार करीं गा ॥२॥ पाप्यावरी प्रेम अमित । तुझें देवा असतें सत्य । पापीजनांनीं तुजप्रत । महत्त्व आणिलें कृपाळा ॥३॥ म्हणून माझ्या पातकासी । पाहूं नका हो हृषीकेशी । धुणें येतें जलापासीं । स्वच्छ होतें म्हणून ॥४॥ म्हणून पतितांचा कंटाळा । करुं नको रे घननीळा । काय भूमीनें सांवरिला । दिलें आहे टाकून ॥५॥ तूंच पतितपावन । तूंच पुण्यपावन । या दोन्ही दोषांपासून । तुम्ही अलग सर्वदा ॥६॥ सूर्य नाशी तमाप्रत । म्हणून कां तो कष्टी होत । कांहीं न करावें लागत । तम नासण्या रवीशीं ॥७॥ तम जों जों भेटण्या येई । तों तों तेथें प्रकाश होई । अंधारत्व अवघें जाई । त्याचें तमाचें नारायणा ॥८॥ पापपुण्याची वासना । तूंच उपजविशी नारायणा । आपला रक्षण्या मोठेपणा । पापी तूंच निर्मिशी ॥९॥ कांहीं असो आतां तरी । चिंता रहित मजला करी । दासगणू हा घ्यावा पदरीं । हेंच आहे मागणें ॥१०॥ तुझ्यावांचून मजप्रत । नाहीं वशिला जगतांत । अवघेंच तुझ्या हातांत । आहे कीं रे पांडुरंगा ॥११॥ श्रोते आतां सावधान । हा कळसाध्याय परिसा पूर्ण । तुमचें भाग्य धन्य धन्य । संतकथा ऐकतसां ॥१२॥ एकविधा निष्ठा ज्याची । जडली गजाननपदीं साची । त्याच्या दुःखसंकटांची । होळीच होते निःसंशय ॥१३॥ बांधीत असतां मंदिर । काम करीत शिखरावर । एक होता मजूर । हाताखालीं गवंडयांच्या ॥१४॥ तो धोंडा देतां मिस्तरीला । एकाएकीं झोक गेला । तीस फुटांवरुन पडला । खालीं घडीव दगडावर ॥१५॥ तो पडतां लोकांनीं पाहिला । जन म्हणती मेला मेला । उंचावरुन खालीं पडला । आतां कशाचा वांचे तो ? ॥१६॥ परी घडलें अघटित । कोठें न लागलें त्याप्रत । जैसा चेंडू झेलितात । तैसें त्यांचें जाहलें ॥१७॥ सोपानसाह्यें ज्यापरी । जन उतरती भूमीवरी । तेथें झालें त्याचपरी । त्या मजुराकारणें ॥१८॥ मजूर म्हणे लोकांला । माझा जेव्हां झोक गेला । तेव्हां एकानें धरलें मला । पडतां पडतां करास ॥१९॥ पाय भूमीसी लागतां क्षणीं । तो न दिसला मजलागुनी । हें वृत्त ऐकुनी । लोक अवघे आनंदले ॥२०॥ अभिश्राप कोणाचा । समर्थ ना घेती साचा । हा योग पडण्याचा । दैवानेंच आला तुज ॥२१॥ या तुझ्या पडण्यानें । स्पर्श केला समर्थानें । तुझ्या कराकारणें । ऐसें भाग्य कोणाचें ? ॥२२॥ असो एक बाई रजपुताची । जयपुराहून आली साची । बाधा होती भूताची । तया अबलेकारणें ॥२३॥ तिसी जयपूर ग्रामाला । दत्तात्रयाचा दृष्टान्त झाला । तूं या रामनवमीला । जाई शेगांवाकारणें ॥२४॥ तेथें संत जागती ज्योत । श्रीगजानन सद्‌गुरुनाथ । ते या तुझ्या पिशाच्याप्रत । मुक्ति देतील निःसंशयें ॥२५॥ या दृष्टान्तेंकरुन । आपुल्या दोन मुलांसी घेऊन । रामनवमीसाठीं जाण । बाई आली शेगांवा ॥२६॥ प्रतिपदेपासून भला । उत्सवासी आरंभ झाला । अफाट समुदाय मिळाला । नवमीस श्रोते शेगांवीं ॥२७॥ काम सभामंडपाचें । चाललें होतें तेथ साचें । खांब मोठमोठे दगडाचे । उभे केले असती ॥२८॥ दीड फूट जाडीचा । पांच फूट लांबीचा । प्रत्येक खांब दगडाचा । ऐसे होते किती तरी ॥२९॥ उत्सवाच्या निमित्त भलें । काम भक्तांनीं बंद केलें । खांब होते बसविलेले । नुसते मात्र ते ठाईं ॥३०॥ श्रीरामाचा जन्म झाला । प्रसादासाठीं लोटला । जनांचा तो समुदाय भला । तो न मसी वर्णवे ॥३१॥ त्या गर्दीत ही बाई । उभी खांबास एक्या पायीं । होती तिला सोसली नाहीं । गर्दी ती यत्किंचित ॥३२॥ म्हणून खांबाच्या आश्रया । गेली निर्भय व्हावया । गर्दी ती चुकवावया । परी झालें विपरीत ॥३३॥ तोच खांब कोसळला । तिच्या शरीरा पडला । तो पहातां लोकांला । ऐसें वाटूं लागलें ॥३४॥ तिचा बहुतेक गेला प्राण । ही बाई कोठील कोण ? । लहान मुलें दिसतीं दोन । खांबाखालीं येधवां ॥३५॥ दहावीस जणांनीं । खांब काढिला अंगावरुनी । पाणी मुखांत घालोनी । लोबोकडे पाठविलें ॥३६॥ ही लोबो डाँक्टरीण । शस्त्रविद्येंत अतिप्रवीण । ही जातीनें ख्रिश्चन । भक्त येशू ख्रिस्ताची ॥३७॥ तिनें ह्या रजपूतिणीला । रीतीप्रमाणें उपचार केला । लोबो म्हणे ना लागला । मार इला कोठेंच ॥३८॥ हें आश्चर्य खरोखर । खांब दगडाचा होता थोर । त्याच्या खालीं शरीर । सुरक्षित रहावें कसें ॥३९॥ आश्चर्य वाटलें लोकांला । प्राण बाईचा वांचला । हा जो कांहीं प्रकार झाला । तो घडला इतुक्यास्तव ॥४०॥ खांब पाडून अंगावरी । भूत जें होतें शरीरीं । त्या भूतास मुक्ति खरी । दिधली त्या गजाननें ॥४१॥ बाई होऊन पूर्ववत । गेली जयपूर शहराप्रत । नांदूं लागली आनंदांत । ऐसा प्रभाव स्वामीचा ॥४२॥ ऐसेंच एका उत्सवाची । नाईक नवर्‍याच्या मस्तकांसी । सोडीत असतां मंडपासी । लाकडी गोल पडला हो ॥४३॥ तोही गोल थोर होता । परी स्वामीची  ध सत्ता । कोठेंही ना आघात होतां । नाईक नवरा वांचला ॥४४॥ पुत्र कृष्णाजी पाटलाचा । रामचंद्र नांवाचा । परमभक्त समर्थांचा । एक असे शेगांवीं ॥४५॥ एके दिवशीं त्याच्या घरीं । येते झाले साक्षात्कारी । ऐन दुपारच्या अवसरीं । गोसाव्याच्या रुपानें ॥४६॥ भूक लागलि मला देखा । अन्न कांहीं देतां कां ? । ऐसें म्हणून मारिली हांका । रामचंद्र पाटलातें ॥४७॥ पाटील मूळचा भाविक । त्याची वाटलें कौतुक । गोसाव्याची ऐकून हांक । दारामाजीं पातला ॥४८॥ निरखून पाहातां गोसाव्यासी । तों ते असावे पुण्यराशी । स्वामी गजानन निश्चयेंसी । ऐसें त्याला वाटलें ॥४९॥ गोसाव्याचा धरुन हात । आला घेऊन घरांत । दिला बसण्या पाट । पूजा केली पायांची ॥५०॥ गोसावी म्हणे पाटलाला । आज मी मुद्दाम आलों मुला । कांहीं तुज सांगण्याला । तें तूं ऐके मनापून ॥५१॥ कर्जाची न चिंता करी । तें फिटून जाईल निर्धारीं । अरे उन्हाळ्यांत गोदावरी । थोडी कोरडी पडतसे ॥५२॥ तैसाच हाही प्रकार । संपन्नतेचा येईल पूर । कृपाघन वर्षल्यावर । श्रीहरीचा समज हें ॥५३॥ उष्टें माझे जें ठायीं । पडेल बापा तें ठाईं । कशाचेंही कधीं पाही । कमी नाहीं पडणार ॥५४॥ आण ताट वाढून । सुग्रास देईं भोजन । मर्जी असल्या पांघरुण । घाल एखादें अंगावरी ॥५५॥ पूजा अन्न दक्षिणा । याचकांसी दिल्या जाणा । तें पावतें नारायणा । येविषयीं शंका नसे ॥५६॥ परी तो याचक । आधीं पाहिजे शुद्ध देख । त्यावांचून हें कौतुक । होणार नाहीं कधींही ॥५७॥ आणलें ताट वाढूनी । गोसावी जेवला प्रेमानीं । पांच रुपये पाटलांनीं । दक्षिणा ठेविली त्याच्या करां ॥५८॥ तैं गोसावी म्हणाला । ही दक्षिणा नको मला । तूं पाहिजे कारभार केला । गजाननाच्या मठांत ॥५९॥ तीच दक्षिणा मागण्यासी । मी आलों तुझ्यापासीं । ती आनंदें देईं मसी । म्हणजे कल्याण होईल ॥६०॥ समर्थसेवेची दक्षिणा । देऊन तुष्टवी माझ्या मना । योग्य मनुष्य तुझ्याविणा । कोणी न येथें सांप्रत ॥६१॥ तुझी कांता आजारी । वरचेवरी पडते जरी । तीही होईल बापा परी । ही दक्षणा दिल्यानें ॥६२॥ बोलाव तुझ्या पुत्राप्रत । त्याच्या कंठीं एक ताईत । बांधितों म्हणजे चेटूकभूत । याचीन बाधा होय त्यासी ॥६३॥ का कीं ही जमेदारी । कठीण आहे भूमीवरी । पाण्याशींच पाणी वैरी। ये ठाईं होत असे ॥६४॥ पाटीलकीचें तुझें वतन । हें वाघाचें पांघरुण । त्याचा उपयोग करणें जाण । अति जपून रामचंद्रा ॥६५॥ द्वेषी मन असूं नये । सन्नीतीला सोडूं नये । राजाविरुद्ध जाऊं नये । उगीच भलत्या कामांत ॥६६॥ साधु कोण संत कोण ? । हें पाहावें शोधून । दांभिकांच्या नादीं जाण । कदापीही लागूं नये ॥६७॥ हीं व्रतें पाळल्यास । तुझा ऋणी श्रीनिवास । होईल या वचनास । असत्या माझ्या मानूं नको ॥६८॥ आय पाहून खर्च करी । दंभाचार कधीं न वरी । साधुसंत येतां घरीं । विन्मुख त्याला लावूं नये ॥६९॥ अपमान खर्‍या संतांचा । झाल्या कोप ईश्वराचा । होतसे बापा साचा । संतचरणीं प्रेमा धरीं ॥७०॥ आपल्या वंशजाचें उणें । पाहूं नये कदा मनें। सोयर्‍याधायर्‍यांकारणें । समयानुसार मान द्यावा ॥७१॥ कोप असावा बाह्यात्कारी । दया असावी अंतरीं । जैसें का तें फणसावरी । कांटे आंत गोड गरे ॥७२॥ मी तुझ्या पाठीस । आहे जाण रात्रंदिवस । ताईत बांधून कंठास । गोसावी जाऊं लागला ॥७३॥ दाराबाहेर जातां भला । अंतर्धान पावला । पाहातां पाहातां झाला । दिसेनासा रस्त्यांत ॥७४॥ पाटील अवघ्या दिवसभर । मानसीं करी विचार । हा गोसावी कोणी इतर । नसावा ऐसें वाटतें ॥७५॥ श्रीगजाननस्वामी मला । आले उपदेश करायाला । घेऊन गोसावीवेषाला । हें आतां समजलें ॥७६॥ रात्रीं स्वप्नीं येऊन । संशय केला निरसन । ऐसें स्वामीगजानन । भक्तवत्सल खरोखरी ॥७७॥ श्रीगजानन चरित्र । तारक असोनी परमपवित्र । अनुभव येण्या मात्र । सबळ निष्ठा पाहिजे ॥७८॥ या ग्रंथाची अवतरणिका । देतों आतां ही तुम्ही ऐका । वेळ उगा दवडूं नका । पूर्ण व्हावें सावधान ॥७९॥ प्रथमाध्यायीं मंगलाचरण । देवगुरुचें वंदन । केलें पुढें निवेदन । गजाननाच्या पूर्वचरिता ॥८०॥ माघमासीं सप्तमीसी । समर्थ आले शेगांवासी । देवीदासाच्या सदनापासीं । दिसते झाले प्रथमतः ॥८१॥ बंकटलाल दामोदर । दोन होते चतुर नर । त्यांनीं परीक्षा अखेर । केली गजाननाची ॥८२॥ कथा द्वितीयाध्यायांत । येणेंपरी आहे सत्य । गोविंदबुवाच्या कीर्तनांत । महाराज येऊन बैसले ॥८३॥ पितांबर शिंप्याला । रस्त्यांत चमत्कार दाविला । बंकटलालाच्या घराला । महाराज गेले शेवटीं ॥८४॥ कथा तृतीयाध्यायाला । गोसाव्यानें नवस केला । गांजाचा श्रीसमर्थाला । पाजण्याचा विबुध हो ॥८५॥ त्याची इच्छा पुरविली । प्रथा गांजाची पडली । तेथपासोनी भली । शेगांवचे मठांत ॥८६॥ जानराव देशमुखाचें । गंडांतर टाळिलें साचें । देऊन तीर्थ पायांचें । आपुलें तें स्वामींनीं ॥८७॥ मृत्यूचे ते प्रकार । तेथें कथिले सविस्तर । तुकारामासी दिला मार । ढोंग करितो म्हणोनी ॥८८॥ कथा चतुर्थाध्यायाठायीं । येणें रीतीं असे पाही । जानकीरामें दिला नाहीं । विस्तव चिलमीकारणें ॥८९॥ किडे पडले चिंचवण्यांत । अन्न गेलें वायां सत्य । सोनारानें जोडून हात । केली विनंती समर्थांला ॥९०॥ त्याचा अपराध क्षमा केला । पूर्ववत्‌ केले चिंचवण्याला । जानकीराम भक्त झाला । ते दिवसापासून ॥९१॥ होते दोन कान्होले । उतरंडीसी ठेविलेले । तेच समर्थें मागितले । खाया चंदू मुकिंदासी ॥९२॥ चिंचोलीच्या माधवाला । यमलोक दावून मुक्त केला । शिष्याहातें करविला । थाट वसंतपूजेचा ॥९३॥ कथा पंचमाध्यायांत । महाराज पिंपळगांवांत । बसले शंकराच्या मंदिरांत । पद्मासन घालोनियां ॥९४॥ गुराख्यांनीं पूजा केली । गांवची मंडळी तेथें आली । महाराजांसी घेऊन गेली । पिंपळगांवाकारणें ॥९५॥ हें कळलें बंकटलाला । तो पिंपळगांवास गेला । महाराजासी आणण्याला । परत शेगांवाकारणें ॥९६॥ समर्थासी आणले परत । कांहीं दिवस राहून तेथ । पुन्हां गेले अकोलींत । भास्करासी तारावया ॥९७॥ कोरडया ठणठणीत विहिरीला । जिवंत झरा फोडीला । एका क्षणांत आणिलें जला । त्या कोरडया विहिरी ठायीं ॥९८॥ भास्कराची उडवलि भ्रांती। घेऊन आले तयाप्रती । शेगांवास गुरुमूर्ति । ही कथा पंचमांत ॥९९॥ ष्ठाध्यायीं ऐसी कथा । बंकटलालें सद्‌गुरुनाथा । मक्याचीं कणसें खाण्याकरितां । नेलें आपुल्या मळ्यांत ॥१००॥ गांधीलमाशा उठल्या तेथ । लोक होऊन भयभीत । पळूं लागले असती सत्य । जीव आपुला घेऊनी ॥१॥ बाधा गांधीलमाश्यांची । महाराजा न झाली साची । घेतली असे शिष्यत्वाची । परीक्षा बंकटलालाची ॥२॥ नरसिंगजीस भेटण्याला । स्वामी गेले अकोटाला । जो नरसिंगजी होता भला । शिष्य कोतशा अल्लीचा ॥३॥ कांहीं दिवस राहिले । अकोटामाजीं भले । नरसिंगजीसी हितगुज केलें । बंधु आपुला म्हणून ॥४॥ चंद्रभागेच्या तीरीं । शिवरग्रामाभीतरीं । कृपा व्रजभूषणावरी । केली असें जाऊन ॥५॥ रुतीच्या मंदिरांत । श्रावणमासाच्या उत्सवांत । समर्थ आले राहण्याप्रत । येथें षष्ठमाची पूर्तता ॥६॥ गांवींची पाटीलमंडळी । अवघी आडदांड होती भली । हमेश होई बोलाचाली । त्यांची समर्थाबरोबर ॥७॥ हरि पाटलासवें भले । महाराज कुस्ती खेळले । मल्लविद्येचें दाविलें । प्रत्यंतर बहुताला ॥८॥ उंसाचा चमत्कार । दाऊनियां साचार । अभिमानाचा परिहार । केला पाटील मंडळींच्या ॥९॥ भिक्यानामें दिला सुत । खंडू कडताजी पाटलाप्रत । आम्रभोजनाचें व्रत । चालविण्यास कथिलें पाटलाला ॥११०॥ ऐशा कथा सप्तमाध्यायीं । कथन केल्या आहेत पाही । निष्ठा समर्थांच्या ठायीं । जडली पाटीलमंडळींची ॥११॥
कथा आहे अष्टमांत । दुफळी पाटील देशमुखांत । अर्ज दिधला सरकारांत । महारांनीं विरुद्ध पाटलाच्या ॥१२॥ खंडूवरी बालंट आलें। तें समर्थांनीं नासिलें । निर्दोष सुटते झाले । खंडू पाटील खटल्यांतून ॥१३॥ तेलंगी ब्राह्मणाला । वेद म्हणून दाखविला । आपण कोण हा कळविला । सहज लीलेनें समाचार ॥१४॥ कृष्णाजीच्या मळ्याशीं । महाराज राहिले छपरासी । मंदिराच्या सान्निध्यासी । चंद्रमौळी हराच्या ॥१५॥ ब्रह्मगिरी गोसाव्याला । अभिमानविरहित केला । "नैनं छिन्दन्ति" श्र्लोकाला । रहस्यासह सांगून ॥१६॥ जळत्या पलंगाच्यावर । महाराज बसते झाले स्थिर । न जाळे वैश्वानर । केव्हांही खर्‍या संताला ॥१७॥ कथा नवमाध्यायाला। द्वाड घोडा शांत केला । खूण नवस करणाराला । दिली असे गांजाची ॥१८॥ दासनवमीचे उत्सवासी। समर्थ बाळापुरासी । घेऊन आपल्या शिष्यांसी । बाळकृष्णाच्या घरां गेले ॥१९॥ बाळकृष्णालागून । करविलें समर्थाचें दर्शन । संशयरहित केलें मन । तया रामदास्याचें ॥१२०॥ दशमाध्यायीं सुरेख । उमरावतीचें कथानक । उपरति झाली पुरी देख । तेथें बाळाभाऊला ॥२१॥ गणेश आप्पा चंद्राबाई । यांनीं अर्पिला संसार पाईं । भावभक्तीनें लवलाही ।  जाननस्वामीच्या ॥२२॥ गणेश दादा खापडर्याला । शुभ आशीर्वाद दिधला । छत्रीनें मारुन बाळाला । परीक्षा त्याची घेतली ॥२३॥ द्वाड गाय सुकलालाची । अति गरीब केली साची । दांभिक भक्ति घुडयाची । कशी ती कथन केली ॥२४॥ एकादशाध्यायीं कथन । भास्करासी डसला श्वान । आले त्र्यंबकेश्वरीं जाऊन । गोपाळदासा भेटले ॥२५॥ झ्यामसिंगाच्या विनंतीसी । देऊन मान अडगांवासी । येते झाले पुण्यराशी । श्रीगजाननमहाराज ॥२६॥ निजधामा भास्कर गेला । त्याचा देह ठेविला । द्वारकेश्वरासन्निध भला । सतीबाईचे शेजारीं ॥२७॥ आज्ञा केली कावळ्यांला । तुम्ही न यावें या स्थला । वांचविले गणु जवर्‍याला । सुरुंग उडतां विहिरींत ॥२८॥ शेट बचुलालाची । कथा द्वादशाध्यायीं साची । मूर्ति निरिच्छपणाची । प्रत्यक्ष होते महाराज ॥२९॥ स्वामीचें वस्त्र नेसला । पितांबर शिंपी कोंडोलीला । स्वइच्छेनें येता झाला । परमभक्त होता जो ॥१३०॥ पितांबरानें कोंडोलीसी । बळिरामाच्या शेतासी । वठलेलिया आंब्यासी । पानें फळें आणविलीं ॥३१॥ पितांबर राहिला कोंडोलींत । तेथेंच झाला समाधिस्थ । नव मठ झाला स्थापित । शेगांवीं समर्थ इच्छेनें ॥३२॥ विचार करुनी मानसीं । बसून रेतीच्या गाडीसी । महाराज नव्या मठासी। आले जुन्या मठांतून ॥३३॥ झ्यामसिंगानें मुंडगांवाला । नेलें गजाननस्वामीला । पर्जन्यानें घोटाळा । भंडार्‍याचा केला असे ॥३४॥ झ्यामसिंगानें आपुली । इस्टेट समर्था अर्पिली । पुंडलिकाची निमाली । गांठ प्लेगची श्रीकृपें ॥३५॥ कथाभाग तेराव्याचा । महारोग गोसाव्याचा । हरण गंगाभारतीचा । केला असें गजाननें ॥३६॥ बंडुतात्यासी भाग्य आलें । भूमींत धन सांपडलें । कर्जापासून मुक्त केलें । समर्थानें निजकृपें ॥३७॥ नर्मदेच्या स्नानास । सोमवती अमावास्यास । नौका फुटतां छिद्रास । हात लाविला नर्मदेनीं ॥३८॥ विडा माधवनाथाला । शिष्याहातीं पाठविला । या कथा चवदाव्याला । वर्णिल्या असती साकल्यें ॥३९॥ अध्याय तो पंधरावा । शिवजयंतीचा आहे बरवा । आले अकोले नामक गांवा । टिळक बाळ गंगाधर ॥१४०॥ भाकरी प्रसाद पाठविला । कोल्हटकराचे हस्तें भला । मुंबईंत लोकमान्याला । ग्रहण करायाकारणें ॥४१॥ श्रीधर गोविंद काळ्यास । करिते झाले उपदेश । नको जाऊं विलायतेस । येथेंच आहे सर्व कांहीं ॥४२॥ कथा ऐशा सोळाव्यासी । पुंडलीक अंजनगांवासी। जातां निवारिले त्यासी । येऊनिया स्वप्नांत ॥४३॥ पादुकाचा प्रसाद त्याला । झ्यामसिंगहस्तें पाठविला । कवराच्या भाजीभाकरीला । ग्रहण केलें आनंदें ॥४४॥ छरा तुकारामाचा । कानामधून पडला साचा । ह्या अशा कथांचा । समावेश सोळाव्यांत ॥४५॥ सतराव्यांत कथा सुरस । विष्णूसाच्या घरास । जाया मलकापुरास । समर्थ निघाले गाडींतून ॥४६॥ नग्न फिरती म्हणूनी । खटला भरला पोलिसांनीं । केवळ अहंपणानीं । सत्पुरुषासी त्रास द्याया ॥४७॥ महताबशा सांईला । पाठवून दिलें पंजाबाला । हिंदुयवनांविषयीं केला । कळकळीचा बोध त्यासी ॥४८॥ बापुरावाच्या कांतेसी । भानामती न मानी साची । भेट गंगाभागीरथीसी । झाली अकोटीं विहिरींत ॥४९॥ कथा बायजा माळणीची । अठराव्यामाजीं साची । कवर डाँक्‍टरच्या फोडाची । कथा यांत ग्रथित असे ॥१५०॥ महाराज गेले पंढरीला । घेऊन अवघ्यां लोकांला । तेथें बापुना काळ्याला । दर्शन हरीचें करविलें ॥५१॥ कवठे बहादुरचा वारकरी । मरीनें झाला आजारी । त्यास घटकेमाझारीं । समर्थानें बरें केलें ॥५२॥ एक्या कर्मठ ब्राह्मणाला । श्वान उठून मेलेला । दाऊन त्याचा गलित केला । कर्माभिमान श्रोते हो ॥५३॥ कथा एकोणविसाव्यासी । दिला काशीनाथपंतासी । आशीर्वाद तो अतिहर्षी । तो येता दर्शना ॥५४॥ गोपाळ मुकिंद बुटी भला । नागपुरासी घेऊन गेला । श्रीगजाननस्वामीला । आपुल्या गेहाकारणें ॥५५॥ त्याच्या मनीं ऐसा हेत । महाराज ठेवावें नागपुरांत । परी हरि पाटलांनीं परत । आणिले समर्थ शेगांवीं ॥५६॥ धार-कल्याणचे रंगनाथ । साधु आले भेटण्याप्रत । समर्थासी शेगांवांत । ऐसे आणि कितीतरी ॥५७॥ श्रीवासुदेवानंद सरस्वती । जो कर्ममार्गाची प्रत्यक्ष मूर्ति । दृष्टादृष्ट होतां नुसती । आनंद झाला उभयतातें ॥५८॥ तेव्हां बाळाभाऊला । जो कां होता संशय आला । तो समर्थांनीं निवटिला । करुनियां उपदेश॥५९॥ केलें खळ्याचें संरक्षण । गाढवाचे पासून । समर्था मारितां आलें मरण । नारायणासी बाळापुरीं ॥१६०॥ गजाननाचे कृपें भलें । जाखडयाचें लग्न झालें । कपीलधारेसी दिधलें । दर्शन निमोणकराला ॥६१॥ तुकारामें आपुला । पुत्र समर्था वाहिला । नारायण नामें भला । सेवा करावयाकारणें ॥६२॥ पंढरीतें जाऊन । विठ्ठलातें विचारुन । महाराज आले परतून । शेगांवाकारणें ॥६३॥ पुढें भाद्रपदमासासी । ऋषि-पंचमीच्या पुण्य दिवशीं । आधुनिक कालाचा हा ऋषि । समाधिस्त जहाला ॥६४॥ विसाव्यामाजीं इतर । श्रींची समाधि झाल्यावर । जे का घडले चमत्कार । त्यांचें वर्णन केलें असे ॥६५॥ जे जे भाविक भक्त कोणी । त्यांना त्यांना अजुनी । दर्शन देती कैवल्यदानी । त्यांच्या इच्छा पुरवून ॥६६॥ आतां हा एकविसावा । अवघ्या कथेचा कळस बरवा । अवघ्यांचा लेखावा । तुम्ही सार श्रोते हो ॥६७॥ प्रत्यक्षापरी प्रकार । येथें होती वरच्यावर । म्हणून म्हणणें आहे सार । अवघ्यांचें या अध्याया ॥६८॥ वर्गणीच्या जोरें भलें । समाधीचें काम झालें । मनापासून भक्त झटले । वर्गणी गोळा कराया ॥६९॥ ऐसें भव्य सुंदर । काम कोठें न भूमीवर । धर्मशाळा चौफेर । चहूं बाजूंनीं बांधिल्या ॥१७०॥ या भव्य कामाला । बहुतांनीं हात लाविला । त्यांचीं नांवें तुम्हांला । सांगतां ग्रंथ वाढेल ॥७१॥ मुख्य जे होते त्यांतून । त्यांचीं नांवें करितों कथन । कुकाजीचा नंदन । हरी पाटील नाम ज्याचें ॥७२॥ सांगवी गांवचा बनाजी । उमरीचा तो गणाजी । बटवाडीचा मेसाजी । लाडेगावचा गंगाराम ॥७३॥ भागू, नंदू, गुजाबाई । अकोल्याची बनाबाई । सुकदेव पाटलाची ती आई । यांनीं हजारों रुपये दिले ॥७४॥ पाटील रामचंद्र कृष्णाजी । दुसरा दत्तु भिकाजी । पळसखेडचा सुखदेवजी । मार्तन्ड गणपती शेगांवचा ॥७५॥ बालचंद्राचा रतनलाल । पंचगव्हाणचा दत्तुलाल । त्याच गांवींचा बिसनलाल । अंबरसिंग टाळकीचा ॥७६॥ किसन बेलमंडळेकर । विठोबा पाटील चावरेकर । हसनापुरचा राहणार । गंगाराम नाम ज्याचें ॥७७॥ या दानशूरांनीं । मोठमोठया रकमा देऊनी । केली मठाची उभारणी । भक्तिस्तव समर्थांच्या ॥७८॥ कोठया कचेरी स्वैंपाकघरें । सोपे उत्तम प्रकारें । बांधिले असती साजिरे । समाधीच्या चौफेर ॥७९॥ लोकांनीं ज्या देणग्या दिल्या । त्या बांधकामीं जिरुन गेल्या । परी पुष्कळ गोष्टी राहिल्या । बांधण्याच्या अवशेष ॥१८०॥ त्यासाठीं युक्ति केली । वर्गणी जमवण्यासाठीं भली । योजना ती ऐशी झाली । ती ऐका विबुध हो ॥८१॥ बसविला शेतसार्‍यावर । समर्थांचा धार्मिक कर । कोणासी न करितां जोर । रुपयामागें एक आणा ॥८२॥ तैशीच बाजारपेठेशीं । धान्य अथवा कपाशी । जी येईल विकायासी । पट्टी बसविली त्यावर ॥८३॥ गाडीमागें अर्धा आणा । हर्ष वाटे देतांना । कां कीं समर्थांच्या चरणां । निष्ठा होती सर्वांची ॥८४॥ समाधीपुढें स्वाहाकार । होऊन गेले अपार । परी त्यांतून मोठे चार । सर्वश्रुत जाहले ॥८५॥ शतचंडीचें अनुष्ठान । ब्राह्मणांच्या करवीं जाण । केलें आदरेंकरुन । किसनलाल शेठजीनें ॥८६॥ अनुष्ठान शतचंडीचें । करणें अति अवघड साचें । अधिकशून्य ना खपायाचें । जगदंबे कालिकेस ॥८७॥ कांहीं चुकतां विधानांत । तात्काळ होतें विपरीत । काम्य अनुष्ठानाप्रत । भीति चहूं बाजूंनीं ॥८८॥ वडील किसनलालाचा । बंकटलाल नांवाचा । भक्त होता समर्थांचा । एकनिष्ठ पहिल्यापून ॥८९॥ पूर्ण आहुतीच्या दिवशीं । त्या बंकटलाल भक्तासी । व्याधि उद्भवली शरीरासी । प्राणांताचा समय आला ॥१९०॥ लोक गेले घाबरुन । म्हणती हें काय आलें विघ्न । शतचंडीचें अनुष्ठान । करतां विपरीत व्हावें कां ? ॥९१॥ बंकटलाल म्हणे पुत्रासी । भिऊं नकोस मानसीं । माझा तारिता पुण्यरासी । समाधीसी बसलासे ॥९२॥ तो अवघें करील बरें । नका होऊं बावरें । पूर्ण आहुतीचें काम सारें । घ्यावें सशास्त्र उरकून ॥९३॥ माझा स्वामी गजानन । येऊं न देई कदा विघ्न । भक्ताचें करण्या संरक्षण । मुळींच बसला येथें तो ॥९४॥ तेंच पुढें सत्य झालें । व्याधीचें स्वरुप मावळलें । एका बाईचें निमालें । भूत शतचंडींत या ॥९५॥ बनाजी तिडके सांगवीकर । यांनीं केला स्वाहाकार । कसुर्‍याची रहाणार । गुजाबाई नाम जिचें ॥९६॥ चापडगांवींचा वामन । शामरावाचा नंदन । यांनींही एक यज्ञ । केला समाधीच्या पुढें ॥९७॥ ऐसीं धर्मकृत्यें किती तरी । झालीं समर्थासमोरी । खरे खरेच साक्षात्‌कारी । श्रीगजाननमहाराज ॥९८॥ यावत्‌ कालपर्यंत । लोक होते निष्ठावंत । तावत्‌ कालपर्यंत । वर्‍हाड होता सुखी बहु ॥९९॥ जसजसी निष्ठा कमी झाली । तों तों विपन्न दशा आली । अवदसेनें घातली । माळ कंठीं वर्‍हाडाच्या ॥२००॥ विपुल पिकणें टाकिलें । काश्यपीनें पहा भले । नवे वाहूं लागले । वारे सर्व वर्‍हाडांत ॥१॥ वर्‍हाडाची ऐसी दैना । समर्थांसी पाहवेना । म्हणून घेतलें आपणां । कोंडोनीं त्यांनीं जलांत ॥२॥ तीस फुटांपासून । पाया आणिला भरुन । तेथेंच कां हें जीवन । निर्माण व्हावें श्रोते हो ॥३॥ म्हणून ऐसें वाटतें । राग आला समर्थांतें । म्हणून त्यांनीं जलातें । भोंवतीं केलें निर्माण ॥४॥ सुखसंपन्न पहिल्यापरी । वर्‍हाड व्हावा निर्धारी । ऐसें चित्तांत असल्या जरी । या वर्‍हाडी जनांच्या ॥५॥ तरी त्या अवघ्या जनांनीं । श्रीगजाननाच्या चरणीं । पूर्ववत् निष्ठा ठेवूनी । सुखालागीं अनुभवावें ॥६॥ ऐसें न जरी करतील । तरी याहीपेक्षां येईल । वर्‍हाडासी बिकट काळ । याचा विचार करा हो ॥७॥ गजाननपदीं निष्ठा ठेवा । सुख-अनुभव सर्वदा घ्यावा । कुतर्कासी मुळीं न द्यावा । ठाव आपुल्या मानसीं ॥८॥ या गजाननरुप जमिनींत । जें जें कांहीं पेराल सत्य । तें तें मिळणार आहे परत । बहुत होऊन तुम्हांला ॥९॥ दाणे टाकिल्या खडकावरी । त्यांचीं न रोपें होतीं खरीं । याचा विचार अंतरीं । सर्व काळ करा हो ॥२१०॥ कंटाळा संतसेवेचा । ज्या ज्या प्रांता येत साचा । त्या त्या प्रांतीं दुष्काळाचा । प्रादुर्भाव होतसे ॥११॥ धर्मश्रद्धा ही वाघीण । गेल्या मनरुपी दरींतून । दुर्वासनेचे कोल्हे जाण । येऊन बसतील ते ठायां ॥१२॥ भक्ति शुचिर्भूत अंगना । अभक्ति वारांगना । तिच्या नादीं लागल्या जाणा । विटंबनाच सर्वत्र ॥१३॥ सन्नीतीला सोडूं नका । धर्मवासना टाकूं नका । शत्रु न माना एकमेकां । तरीच शक्ति वाढेल ॥१४॥ ऐसें तुम्ही वागल्यास । येतील चांगले दिवस । या वर्‍हाड प्रांतास । हें कधींहि विसरुं नका ॥१५॥ एकदां तरी वर्षांतून । घ्यावें गजाननाचें दर्शन । एकदां तरी पारायण । करा गजाननचरित्राचें ॥१६॥ हा एकवीस अध्यायांचा । गजाननविजय नांवाचा । नैवेद्य एकवीस मोदकांचा । गजाननासी अर्पा हो ॥१७॥ वा हे अध्याय साचार । माना एकवीस दुर्वांकुर । पारायणरुपें निरंतर । वाहाव्या गजाननासी ॥१८॥ सद्‌भाव जो मानवाचा । तोच दिवस चतुर्थीचा । प्रेमरुपी चंद्राचा । उदय झाला पाहिजे ॥१९॥ मग या ग्रंथाचें अक्षर । एकेक हें दुर्वांकुर । अर्थ शब्दाचा साचार । मोदक समजा विबुध हो ॥२०॥ तो अर्पून गजानना । पारायणरुपी पारणा । साधून घ्यावा करा ना । वेळ आतां थोडकाही ॥२१॥ हा ग्रंथ ना कादंबरी । ती गजाननाची लीला खरी । येथें जो अविश्वास धरी । तो बुडेल निःसंशय ॥२२॥ श्रीगजाननस्वामी चरित्र । जो नियमें वाचील सत्य । त्याचे पुरतील मनोरथ । गजाननकृपेनें ॥२३॥ हें गजाननचरित्र भागीरथी । कथा या तोय निश्चिती । महाराष्ट्र ओंव्या तयावरती । लहरी समजा विबुध हो ॥२४॥ वा कल्पवृक्ष हें स्वामीचरित्र । शाखा अध्याय तयाप्रत । पद्मरचना हीच सत्य । पालवी या वृक्षाची ॥२५॥ जो या ग्रंथीं ठेवील भाव । त्यासी पावेल स्वामीराव । संकटीं त्याच्या घेईल धांव । रक्षण त्याचें करावया ॥२६॥ हा ग्रंथ केवळ चिंतामणी । चिंतिलें फळ देईल जाणी । दृढतर विश्वास असल्या मनीं । हें मात्र विसरुं नका ॥२७॥ जेथें गजाननचरित्राचा । पाठ होईल नित्य साचा । तेथें वास लक्ष्मीचा । चिरकाल होईल हो ॥२८॥ दारिद्रयासी मिळेल धन । रोगीयासी आरोग्य जाण । साध्वी स्त्रीचें वांजपण । फिटेल याच्या वाचनें ॥२९॥ निपुत्रिकासी होईल पुत्र । निष्कपटी मिळेल मित्र । चिंता न राहील अणुमात्र । या ग्रंथाच्या वाचका ॥२३०॥ दशमी एकादशी द्वादशीला । हा ग्रंथ जो वाची भला । अनुपम येईल भाग्य त्याला । श्रीगजाननकृपेनें ॥३१॥ गुरुपुष्य योगावरी । जो याचें पारायण करी । बसून एक्या आसनावरी । राहूनियां शुचिर्भूत ॥३२॥ त्याच्या अवघ्या मनकामना । खचित होतील पूर्ण जाणा । कसल्याही असोत यातना । त्या त्याच्या निरसतील ॥३३॥ जेथें हा राहील ग्रंथ । तेथें न कदा येई भूत । लाग न साधे यत्किंचित । तेथें ब्रह्म समंधाचा ॥३४॥ ऐसें याचें महत्त्व । ये भाविकाला प्रचीत । कुटिलदुष्टदुर्जनांप्रत । याचा अनुभव येणें नसे ॥३५॥ मानसाची योजना । राजहंसासाठीं जाणा । तैसें हें संतसज्जनां । मानस स्वामीचरित्र ॥३६॥ पूर्वकालीं ज्ञानेश्वर । मीरा मेहता कबीर । नामा सांवता चोखा महार । गोरा बोधला दामाजी ॥३७॥ उंबरखेडी ऐनाथ । सखाराम अंमळनेरांत । वा देव मामलेदार यशवंत । वा हुमणाबादी माणिकप्रभू ॥३८॥ तेवींच हा वर्‍हाडांत । गजाननस्वामी सद्‌गुरुनाथ । फरक नाहीं यत्किंचित । त्यांच्या यांच्या मधीं हो ॥३९॥ आतां हीच विनंति । तुम्हां अवघ्यां भाविकांप्रती । अत्यंत असूं द्यावी प्रीति । श्रीगजाननांचे चरणीं ॥२४०॥ म्हणजे तुमची येरझार । जन्ममृत्यूची साचार । होऊनियां व्हाल पार । दुस्तर भवामधूनी ॥४१॥ आतां स्वामी दयाघना ! । तुला येवो माझी करुणा । दासगणूच्या यातना । सकल निवारी कृपेनें ॥४२॥ मी तुझा झालों भाट । मार्ग दावी मला नीट । दुर्वासनेचा येतो वीट । चित्तामाजीं दयाळा ! ॥४३॥ आमरण वारी घडो । संतचरणीं प्रेमा जडो । अक्षय्यीचा वास घडो । श्रीगोदेच्या तीराला ॥४४॥ प्रसंग याचना करण्याचा । मशीं नको आणूंस साचा । समर्था दासगणूचा । अभिमान वाहावा मानसीं ॥४५॥ मी सकल संतांचा चरणरज । माझी राखा तुम्ही लाज । हेंचि मागणें आहे आज । पदर पसरुन तुम्हांतें ॥४६॥ जैसी केलीस प्रेरणा । तैसेंच मी वदलों जाणा । हे स्वामी गजानना ! । तुझें चरित्र लिहितां कीं ॥४७॥ शेगांवचे मठांत । कांहीं होतें कागदपत्र । ते रतनसातें मजप्रत । आणूनियां दाखविले ॥४८॥ त्यांच्या आधारें ग्रंथ लिहिला । कल्पनेच्या ना उपयोग केला । म्हणून अधिक न्यूनाला । मी नाहीं कारण ॥४९॥ झालें असल्या अधिकऊन । त्याची क्षमा गजानन । करो सर्वदा मजलागून । हीच आहे विनंती ॥२५०॥ शके अठराशें एकसष्टांत । प्रमाथिनाम संवत्सरांत । चैत्रमासीं शुद्धांत । वर्षप्रतिपदेला ॥५१॥ हा ग्रंथ कळसा गेला । शेगांव-ग्रामीं भला । तो गजाननांनीं पूर्ण केला । प्रथम प्रहरीं बुधवारीं ॥५२॥ स्वस्ति श्रीदासगणूविरचित । हा गजाननविजय नामें ग्रंथ । नौका होवो भाविकांप्रत । भवसिंधु तरावया ॥२५३॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ ॥ इति एकविंशोऽध्यायः समाप्तः ॥ ॥ पुंडलीक वरदा हरिविठ्ठल ॥ ॥ सीताकांतस्मरण जयजय राम ॥ ॥ पार्वतीपते हरहर महादेव ॥ ॥समाप्त॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

उत्पत्ति एकादशी कथा मराठी Utpanna Ekadashi Katha

पंच कैलास कुठे आहे? जाणून घ्या

आरती सोमवारची

सोमवारी या उपयांनी मिळेल तन, मन आणि धनाचे सुख

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख