Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कार्तिक माहात्म्य - अध्याय १६

Webdunia
सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (13:20 IST)
नारद म्हणतात - राजा, इकडे विष्णु जलंधर दैत्याचे नगरांत गेले व त्याची स्त्री वृंदा इचें पातिव्रत्य भंग करावें असा त्यांनीं विचार केला ॥१॥
इकडे वृंदा स्वप्नांत आपला पति रेड्यावर बसला आहे, अंगास तेल लाविलें आहे, नग्न आहे ॥२॥
काळ्या फुलांच्या भूषणांनीं युक्त आहे व मांसभक्षक पिशाच्चादि सभोंवार आहेत, हजामत केली आहे, काळोखानें व्याप्त अशा दक्षिण दिशेकडे जात आहे ॥३॥
आपलें नगर समुद्रांत आपल्यासुद्धां बुडालें असें पाहती झाली व ती जागृत होऊन भयंकर स्वप्नाचा विचार करुं लागली ॥४॥
सूर्य उगवल्यावर त्याकडे पाहिलें, तों तिला तो निस्तेज व ज्याला छिद्रें पडलीं आहेत असा दिसला. हें सर्व अनिष्ट आहे असें समजून भयानें घाबरी होऊन ती रडूं लागली ॥५॥
समाधान व्हावें म्हणून गोपुर, बंगला इत्यादिक जागीं गेली परंतु तिला सुख वाटेना. मग दोघी मैत्रिणी घेऊन बागेंत गेली ॥६॥
तेथें इकडे तिकडे पुष्कळ फिरली तरी चैन पडेना. या वनांतून त्या वनांत अशी फिरुं लागली व भ्रमिष्टासारखी होऊन देहभान विसरली ॥७॥
याप्रमाणें ती फिरत असतां ज्यांचीं तोंडे सिंहाप्रमाणें व ज्यांच्या दाढा भयंकर आहेत, असे दोन अक्राळविक्राळ राक्षस पाहिले ॥८॥
त्या राक्षसांना पाहतांच फार घाबरुन पळूं लागली. पळतां पळतां तिनें शिष्यांसहवर्तमान मौन धरुन बसलेला एक तपस्वी पाहिला ॥९॥
वृंदेनें राक्षसांच्या भयानें जाऊन आपल्या हातांनीं त्या तपस्व्याच्या गळ्याला मिठी घातली, आणि हे मुने ! मी शरण आलें; माझें रक्षण कर, असें म्हणाली ॥१०॥
राक्षस मागें लागल्यामुळें ती वृंदा घाबरली आहे असें त्या ऋषीनें पाहून रागाने आपल्या हुंकारानें ते घोर राक्षस मागें परतविले ॥११॥
हुंकाराच्या भयानें राक्षस भिऊन परत गेले असें पाहून वृंदा ऋषीस साष्टांग नमस्कार घालून म्हणाली ॥१२॥
वृंदा म्हणते - हे ऋषे, आपण कृपा करुन माझें या भयंकर संकटापासून रक्षण केलें. आतां माझी एक विनंती आहे, तरी कृपा करुन माझें समाधान करा ॥१३॥
हे प्रभो ! माझा पति जलंधर शंकराशीं युद्ध करण्यास गेला आहे, तर हे सुव्रता, तो तेथें युद्धांत कसा आहे तें मला सांगा ॥१४॥
नारद म्हणतात - ऋषींनी तिचें भाषण ऐकून दयेनें वर पाहिलें इतक्यांत दोन वानर आले व ऋषीस नमस्कार करुन पुढें उभे राहिले ॥१५॥
नंतर ऋषींनीं डोळ्यांनीं खूण करतांच आकाशांत गेले व क्षणार्धांत जाऊन परत येऊन नमस्कार करुन उभे राहिले ॥१६॥
वानरांनीं आणलेलें आपल्या पतीचें मस्तक, धड व हात पाहून पतीच्या दुःखानें व्याकुळ होऊन वृंदा मूर्च्छित होऊन पडली ॥१७॥
ऋषींनी तिच्यावर कमंडलूंतील उदक शिंपडून तिला सावध केली, तेव्हां ती पतीच्या कपाळाला कपाळ लावून रडूं लागली ॥१८॥
वृंदा म्हणाली - जो पूर्वी सुखाच्या भाषणांनीं माझा विनोद करीत होतात, मग आज तुमची परम प्रिया मी निरपराधी असून माझ्याशीं कां बोलत नाहीं ? ॥१९॥
ज्यानें देव गंधर्व व विष्णु यांना देखील जिंकिलें अशा त्रैलोक्य जिंकणार्‍याला केवळ तपस्वी शंकरानें कसें मारिलें ॥२०॥
नारद म्हणतात - राजा, वृंदा याप्रमाणें रडून ऋषीला म्हणाली. वृंदा म्हणतेः-- हे कृपानिधे मुनिश्रेष्ठा ! या माझ्या प्रिय पतीला जिवंत करा ॥२१॥
आपण माझे पतीला जीवंत करण्यास समर्थ आहां असें मला वाटतें. नारद म्हणतातः-- हें तिचें भाषण ऐकून ऋषि हसून भाषण करितात ॥२२॥
ऋषि म्हणतात - हे वृंदे, याला शंकरांनीं युद्धांत मारिलें आहे म्हणून हा जिवंत होण्याला समर्थ नाहीं; तरी तुझी फार दया येते म्हणून याला उठवितों ॥२३॥
नारद म्हणालेः-- ऋषि याप्रमाणें बोलून गुप्त झाले व जलंधर जिवंत होऊन उठून प्रीतीनें वृंदेस आलिंगून तिचें चुंबन घेऊं लागला ॥२४॥
वृंदाही आपल्या पतीला पाहून आनंदित झाली व त्याचेबरोबर पुष्कळ दिवस त्याच वनांत राहून उपभोग घेतला ॥२५॥
एके दिवशीं संभोगाचे शेवटीं तो आपला पती नसून विष्णु आहे असें तिनें पाहिले. तेव्हां रागानें ती विष्णूची निर्भर्त्सना करुन बोलली ॥२६॥
वृंदा म्हणालीः-- दुसर्‍याचे स्त्रियांशी गमन करणार्‍या तुझ्या शीलाला धिक्कार असो; तूंच मायेनें कपटी तपस्वी झाला होतास, हें मला चांगलें समजलें ॥२७॥
जे दोघे आपले द्वारपाळ सेवक मला मायेनें वानर दाखविलेस तेच पुढें राक्षस होऊन तुझी स्त्री हरण करितील ॥२८॥
व तूं स्त्रीच्या दुःखानें रानोरान फिरशील. तेव्हां वानर तुझें सहाय करतील. दुसरा शिष्य शेष लक्ष्मण हा तुजबरोबर फिरेल व तुझी सेवा करील ॥२९॥
याप्रमाणें बोलून त्या वृंदेनें अग्निप्रवेश केला. विष्णूंनीं तिचें पुष्कळ निवारण केलें तरी तिनें त्याचें ऐकिलें नाहीं ॥३०॥
नंतर विष्णु वृंदेवर मन ठेवून विरहदुःखानें वारंवार तिचें चिंतन करीत तिच्या राखेंत लोळत राहिले; देवादिकांनीं पुष्कळ समजूत केली, तरी त्यांच्या मनाला शांति आली नाहीं ॥३१॥
इति श्रीपद्मपुराणे कार्तिकमाहात्म्ये वृंदाग्निप्रवेशो नाम षोडशोध्यायः ॥१६॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती गुरुवारची

गुरुप्रतिपदा का साजरी करतात?

श्री नृसिंह सरस्वती अष्टक Shri Nrusingh Sarswati Ashtak

Holika Dahan 2025 होलिका दहन कधी आहे? तारीख, शुभ वेळ आणि महत्त्व जाणून घ्या

श्री नृसिंह सरस्वती आरती

सर्व पहा

नक्की वाचा

Makeup Tricks : हिवाळ्यात तुमची लिपस्टिक आणि आयलायनर कोरडे झाले आहेत का? या टिप्स वापरा

मुलांमध्ये खोकला कमी करण्यासाठी हे ५ घरगुती उपाय वापरून पहा

Valentine week days list जाणून घ्या व्हॅलेंटाईन वीक लिस्ट, असे व्यक्त करा तुमचे प्रेम

अकबर-बिरबलची कहाणी : चोराच्या दाढीतला एक ठिपका

Radha Krishna Photo घरामध्ये राधा-कृष्णाची मूर्ती ठेवत असाल तर हे वास्तू नियम पाळावे

पुढील लेख
Show comments