Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कार्तिक माहात्म्य - अध्याय ३०

कार्तिक माहात्म्य - अध्याय ३०
, सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (15:34 IST)
सूत म्हणालेः-- याप्रमाणें श्रीकृष्णाचें भाषण ऐकून भाग्यशाली सत्राजिताची कन्या सत्यभामा भाषण करुं लागली ॥१॥
सत्या म्हणालीः-- हे प्रभो ! कर्तिकाचें माहात्म्य विस्तारानें ऐकिलें नाहीं. सर्व महिन्यांत कार्तिक महिनाच श्रेष्ठ कसा झाला हें मला सांगा ॥२॥
श्रीकृष्ण म्हणतातः-- सत्यभामे ! तूं कार्तिकव्रत विचारिलेंस हें उत्तम केलेंस; पूर्वी श्रेष्ठ सूतांनीं शौनकादिऋषींना ही कथा सांगितली आहे, ती तूं ऐक ॥३॥
सूत म्हणालेः-- हे ऋषिश्रेष्ठहो ! पूर्वी प्रश्न केला असतां शंकरांनीं कार्तिकस्वामीला जें सांगितलें आहे तें तुम्हांला सांगतों ऐका. ॥४॥
कार्तिकस्वामी म्हणालेः-- हे विष्णुभक्ता शंकरा ! तुम्ही मला विष्णूच्या पुष्कळ प्रिय व रहस्य कथा सांगितल्या त्या मी ऐकिल्या ॥५॥
आतां संसारसागरामध्यें ज्या दुःखलहरी प्राप्त होतात, त्यांतून तरुन पार निघण्याला कांहीं उपाय सांगा ॥६॥
ज्या योगानें मनुष्यें दुःखसमुद्रांतून तरुन उद्धार पावतात अशा कार्तिकमासाच्या व्रताचा व कार्तिकस्नानाचा विधि सांगा ॥७॥
वैष्णवधर्माचें फल विस्तारानें सांगा कीं, ज्या धर्माच्या सामर्थ्यानें लोक वैकुंठास जातील ॥८॥
दीपदानाचें माहात्म्य, अगस्त्याच्या फुलाचें, गोपीचंदनाचें व तुळसीचें माहात्म्य सांगा ॥९॥
मालिनी फुलांचें, कमळांचें, आंवळ्याचें तसेंच दंवण्याचें, केवड्याच्या फुलाचें माहात्म्य व देवाचे नैवद्याचें व तीर्थोदकाचें माहात्म्य व माघस्नानाचें फल सांगा ॥१०॥११॥
तसेंच पळसाच्या पानावर भोजनाचें फल, देवाच्या आरतीचें, नंदादीपाचें व दुसर्‍याचा दिवा सारण्याचें माहात्म्य सांगा ॥१२॥
पुष्कर क्षेत्राचें, शूकर क्षेत्राचें, शालिग्रामाचें माहात्म्य व स्वस्तिक घालण्याचें विधान सांगा ॥१३॥
दानांचें, परान्न सोडल्याचें, महिनाभर उपोषण केल्याचें व पलंगशयन सोडल्याचें फल सांगा ॥!४॥
दीपावलीचें, प्रबोधिनीएकादशीचें व भीष्मपंचकाचें माहात्म्य, विस्तारानें कृपा करुन सांगा ॥१५॥
शंकर म्हणालेः-- पुत्रा ! तूं लोकांचा उद्धार व्हावा म्हणून फार चांगलें विचारलेंस. तुझ्यासारखा विष्णुभक्त कोणी नाहीं म्हणून तुला हें विस्तारानें सांगतों श्रवण कर ॥१६॥
तूं सत्पुत्र आहेस. म्हणून माझा उद्धार झाला; तुझी विष्णूचे ठिकाणीं दृढ व निश्चल भक्ति आहे ॥१७॥
जो ब्राह्मण मनुष्याला वैष्णवधर्म सांगतो त्या ब्राह्मणाला समुद्रवलयांकित पृथ्वीदान केल्याचें पुण्य प्राप्त होतें ॥१८॥
सर्व तीर्थे व सर्व दानें यांचें पुण्य एकत्र केलें तरी, तें कार्तिक महिन्याच्या पुण्याच्या कोटि हिशाचीही बरोबरी करणार नाहीं ॥१९॥
एकीकडे गोप्रदानें, दक्षिणायुक्त सर्व यज्ञ एकीकडे, पुष्करक्षेत्र, हिमालय व कुरुक्षेत्र यांचे ठिकाणीं वस्ती व ॥२०॥
मथुरा काशी वराह या क्षेत्रांत वास हीं एकीकडे; केशवाला प्रिय असा कार्तिकमास एकटा एकीकडे; या सर्वाबरोबर आहे ॥२१॥
सूत म्हणालेः-- ऋषिहो ! शंकर याप्रमाणें बोलून पुन्हा कार्तिकस्नानाचें माहात्म्य विस्तारानें सांगतों असें म्हणाले ॥२२॥
शंकर म्हणालेः-- कार्तिकेया ! कृतयुग ब्राह्मणांचें, त्रेतायुग क्षत्रियांचें, द्वापार युग वैश्यांचे आणि कलियुग शूद्रांचें असें सांगितलें आहे ॥२३॥
पुत्रा ! कलीमध्यें मनुष्याला स्नानाचा आळस असतो; तरी कार्तिकस्नान व माघस्नान यांचें फल सांगतों ॥२४॥
ज्याचे हात, पाय, वाणी व मन हीं चांगलीं स्वाधीन आहेत; विद्या, तप, कीर्ति चांगलीं आहेत त्यालाच तीर्थाचें सर्व फळ मिळतें ॥२५॥
ज्याला श्रद्धा नाहीं, मन पापी आहे, नास्तिक आहे, मनाचा कुचका आहे व भलतीच मनाप्रमाणें बडबड करणारा या पांचांना तीर्थाचें फल मिळत नाहीं ॥२६॥
जो ब्राह्मण प्रातःकालीं उठून नेहमीं तीर्थात प्रातः स्नान करितो, त्याचीं सर्व पापें नाहींशी होऊन त्याला ब्रह्मप्राप्ति होते ॥२७॥
षडानना ! ज्ञात्यांनीं स्नानाचे वायव्य, वारुण, दिव्य व ब्राह्म असे चार प्रकार सांगितले आहेत ॥२८॥
सत्यभामा म्हणालीः-- हे प्रभो श्रीकृष्ण ! या चार प्रकारच्या स्नानांचीं लक्षणें सांगा; म्हणजे तीं ऐकून मी आपले गृहांत समाधानानें राहीन ॥२९॥
श्रीकृष्ण म्हणालेः-- हे प्रिये ! गाईची धुळी अंगावर येऊं देणें तें वायव्यस्नान, समुद्र नद्या इत्यादिकांच्या पाण्यानें केलेलें तें वारुणस्नान, ब्राह्मणांच्या मंत्रांनीं केलेलें ब्राह्मस्नान व पर्जन्यांत उभें राहून केलेलें तें दिव्य अथवा भास्करस्नान ॥३०॥
ह्या सर्व स्नानांमध्यें वारुणस्नान श्रेष्ठ आहे. ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांनीं समंत्रक स्नान करावें ॥३१॥
हे षडानना ! शूद्रांनीं व स्त्रियांनीं अमंत्रक स्नान करावें. बाल, तरुण, वृद्ध असे पुरुष, स्त्रिया व नपुंसक, हे सर्व कार्तिक व माघस्नानानें सर्व पापांपासून मुक्त होतात; कार्तिकस्नान करणारे सर्व इच्छित फलाला पावतात ॥३२॥३३॥
इति श्रीपद्मपुराणे उत्तरखंण्डे कार्तिकमहात्म्ये त्रिंशोऽध्यायः ॥३०॥

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कार्तिक माहात्म्य - अध्याय २९