Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कार्तिक माहात्म्य - अध्याय ३१

कार्तिक माहात्म्य - अध्याय ३१
, सोमवार, 8 नोव्हेंबर 2021 (15:35 IST)
सूत म्हणालेः-- वृषध्वजशंकर भक्तिमान् कार्तिकस्वामीस जवळ बोलावून पुन्हा कथन करुं लागले ॥१॥
शंकर म्हणालेः-- विष्णूला प्रिय, कार्तिक महिना सर्व महिन्यांत उत्तम आहे; कलियुगांत या महिन्यामध्यें तेहतीस कोटी देव वास्तव्य करितात ॥२॥
कार्तिकमहिन्यांत ब्राह्मणाला भोजन घालावें, तिल, धेनु, सोनें, रुपें, जमीन, वस्रें, गोप्रदानें विष्णुप्रीतीकरितां प्रेमानें देतात. सर्व दानांमध्यें कन्यादान श्रेष्ठ आहे ॥३॥४॥
जे यथाविधि ब्राह्मणाला कन्या दान देतात, त्यांना चौदा इंद्र होततोंपर्यंत वैकुंठांत वास्तव्य घडतें ॥५॥
लव उत्पन्न होण्याचे वेळीं कन्येचा उपभोग चंद्र घेतो, रजाचे वेळीं गंधर्व व कुचदर्शनाचे वेळीं अग्नि हे उपभोग घेतात ॥६॥
याकरितां ऋतुप्राप्तीचे पूर्वी बारावर्षाचें आंत कन्येचा विवाह करावा. आठवे वर्षी विवाह करणें हें सूज्ञानी प्रशस्त मानिलें आहे ॥७॥
श्रोत्रिय, तपस्वी, विधिपूर्वक वेद पठण केलेला व ब्रह्मचारी असा ब्राह्मण पाहून त्याला विधीने कन्यादान करावें ॥८॥
कन्यादान करण्याचा हा मुख्य विधि आहे. याप्रमाणें दान केलें असतां, कन्येच्या आंगावर जितके रोमांच असतील ॥९॥
तितकीं हजार वर्षे कन्यादान करणारा रुद्रलोकीं राहतो हजार गाई दानाबरोबर शंभर बैलांचें दान, दहा बैलांबरोबर एक यानदान, दहा यानांबरोबर एक अश्वदान, व हजार घोडे दिल्यापेक्षां एक हत्तीदान अधिक आहे ॥१०॥११॥
हजार हत्तीदानाबरोबर एक सुवर्णदान आहे व हजार सुवर्णदानाबरोबर एक विद्यादान आहे ॥१२॥
विद्यादानाच्या कोटीपट भूमिदानाचें पुण्य आहे व हजार भूमिदानापेक्षां गोप्रदान विशेष आहे ॥१३॥
व हजार गोप्रदानांपेक्षां वेळेवर अन्नदानाचें पुण्य अधिक आहे. कारण, हें सर्व स्थावर जंगम ॥ ( अचल व चल ) जग अन्नाच्या आधारावर आहे ॥१४॥ याकरितां षडानना ! कार्तिकांत अन्नदान द्यावें. सर्व इच्छा पूर्ण करणारी गाय, भूमि व विद्या, हीं तीन दानें सारखीं आहेत, असें विद्वान् म्हणतात ॥१५॥
कार्तिकेय म्हणतातः-- देवा ! आणखी कांहीं दुसरे धर्म सांगा; कीं, जे केले असतां सर्व पापें जाऊन देवतुल्य होतो ॥१६॥
सूत म्हणालेः-- याप्रमाणें विचारल्यावर शंकर कार्तिकेयाचें बहुत अभिनंदन करुन भाषण करुं लागलें. तें तुम्हांला सांगतो; तर सर्व तपोधनहो ! श्रवण करा ॥१७॥
शंकर म्हणालेः-- जो कार्तिकव्रत करुन परान्न सोडील, त्याला चांद्रायणव्रताचें फळ मिळेल ॥१८॥
कार्तिकमास प्राप्त होतांच जो परान्न वर्ज करील त्याला दररोज अतिकृच्छ्राचें फल मिळेल ॥१९॥
कार्तिकांत तेल व मध सोडावीं ॥२०॥
कार्तिकांत काशाचें पात्र वर्ज्य करावें.  विशेंषेंकरुन मद्य उत्पन्न करुं नये. कार्तिकांत जर एक वेळ मांस भक्षण केलें तर त्याला राक्षस जन्म प्राप्त होतो ॥२१॥
साठ हजार वर्षे विष्ठेमध्यें दुःख भोगतो; नंतर त्यांतून निघाल्यावर विष्ठा भक्षण करणारा गांवडुकर होतो. ॥२२॥
जो शाकव्रतादि भक्ष्यांचा कार्तिक महिन्यांत नियम करितो त्याला मोक्ष देणारें असें विष्णु स्वरुप व वैकुंठ प्राप्त होतें ॥२३॥
कार्तिकासारखा उत्तम महिना नाहीं, केशवापेक्षां दुसरा श्रेष्ठ देव नाहीं, वेदासारखें शास्त्र नाहीं व गंगेसारखें तीर्थ नाहीं ॥२४॥
सत्याप्रमाणें दुसरें श्रेष्ठ वर्तन नाहीं, कृतयुगसारखें दुसरें युग नाहीं, भोजनासारखी तृप्ति नाहीं व दानासारखे सुख नाहीं ॥२५॥
धर्मसारखा मित्र नाहीं व नेत्रासारखें दुसरें तेज नाहीं ॥२६॥
जो दामोदराला प्रिय असा कार्तिकमास व्रतावांचून घालवील ॥२६॥
तो कर्मभ्रष्ट समजावा व तो नीच योनींत जन्म पावेल; कार्तिकमास हा श्रेष्ठ म्हणून वैष्णवांना सदा प्रिय आहे ॥२७॥
समुद्राला मिळणारी पुण्य नदी स्नानाला मिळणें दुर्लभ, उत्तम कुलशीलाची कन्या बायको करण्यास मिळालेंलें दांपत्य दुर्लभ ॥२८॥
आई व विशेषतः बाप यांचें फार दिवस सुख मिळणें दुर्लभ, साधूंचा सत्कार दुर्लभ व धर्मशील पुत्र दुर्लभ ॥२९॥
द्वारकेंत राहण्यास मिळणें दुर्लभ, कृष्णाचें दर्शन दुर्लभ, गोमतीचें स्नान दुर्लभ व कार्तिकाचें व्रत दुर्लभ आहे ॥३०॥
हे कार्तिकेया ! चंद्र व सूर्यग्रहणामध्यें ब्राह्मणाला भृमिदान दिल्याचें जें पुण्य तें कार्तिकांत भूमीवर निजल्यानें मिळतें ॥३१॥
ब्राह्मणांचे दांपत्यास भोजन घालावें. त्यांचे अंगाला चंदन लावून पूजन करावें, शालजोड्या, रत्नें व नानाप्रकारचीं वस्त्रें ॥३२॥
अभर्‍यासह गाद्या, जोडा व छत्री हीं दानें, हे कार्तिकेया ! तूं कार्तिकांत दान दे ॥३३॥
जो मनुष्य कार्तिक महिन्यांत पानावर भोजन करतो, तो चौदा इंद्र होईत तोंपर्यंत दुर्गतीला जात नाहीं ॥३४॥
पळसाच्या पानावर जेवलें असतां सर्व मनोरथ पूर्ण होऊन सर्व तीर्थांचें फळ मिळतें. तो कधींही नरक पाहणार नाहीं ॥३५॥
पळस साक्षात् ब्रह्मदेव आहे म्हणून सर्व मनोरथ पूर्ण करणारा आहे. हे कार्तिकेया ! कार्तिक महिन्यांत त्याचें मध्यम पान वर्ज्य करावें. ॥३६॥
ब्रह्मा, विष्णु व शंकर असे तीन देव तीन पानांवर आहेत. त्यांत शंकराचें मधलें पान वर्ज्य करावें ॥३७॥
बाकी ब्रह्मा व विष्णूच्या पात्रांवर भोजन केलें असतां सर्व पुण्य प्राप्त होतें. शूद्रांनीं मधल्या पानावर भोजन व कपिला गाईचें दूध प्राशन केलें असतां नरक प्राप्त होतो ॥३८॥
जर शुद्र न समजून कपिला गाईचें दूध प्याला ॥३९॥
तर त्यानें ब्राह्मणाला कपिला गाय दान द्यावी, म्हणजे शुद्ध होतो ॥४०॥
तिळांचें दान, नदीचें स्नान, नेहमी साधूचें दर्शन व पळसाच्या पानावर भोजन, हीं कार्तिकांत मुक्ति देणारीं आहेत ॥४१॥
कार्तिकांत मौन धरुन पळसाच्या पानावर भोजन करणें, तीळ लावून स्नान करणें व नेहमीं क्षमावान् असणें, भुईवर निजणें यांपासून एक युगाचें पाप नाहीसें होतें ॥४२॥
कार्तिकांत अरुणोदयाचे वेळी जो विष्णूपुढें हरिजागर करितो, त्याला हे षडानना ! हजार गाई दान केल्याचें फल मिळतें ॥४३॥
पितृपक्षांत अन्न दान दिल्यानें व ज्येष्ठ आषाढ मासीं अर्थात् उन्हाळ्यांत उदक दिल्यानें जें पुण्य मिळतें, तितकेंच कार्तिकांत नंदादीप लावल्यानें फळ मिळतें ॥४४॥
दुसर्‍याचा नंदादीप उजळणें, वैष्णवांची सेवा करणें हीं कार्तिकांत अश्वमेध व राजसूय यज्ञांचे फळ देणारी होतात ॥४५॥
नदीचें स्नान करणें, विष्णूच्या कथा ऐकणें व वैष्णवांचें दर्शन हीं ज्याला कार्तिकांत घडत नाहींत, त्याचें दहा वर्षाचें पुण्य जातें ॥४६॥
कार्तिकमहिन्यांत जो ज्ञानी कर्मानें, मनानें व वाचेनें, पुष्कराचें स्मरण करील; तर त्याला लक्षकोटीपट पुण्य प्राप्त होतें ॥४७॥
माघमासीं प्रयागांत, कार्तिकांत पुष्कर तीर्थात तसेंच वैशाखांत उज्जयिनी येथें स्नानदानादि केल्यानें एक युगाचें पातक नाहींसेम होतें ॥४८॥
हे स्कंदा ! जे मनुष्य नित्य भक्तीनें विशेषतः या कलिकालांत हरीचें पूजन करितात ते धन्य आहेत ॥४९॥
गयेमध्यें पिंड देऊन अथवा श्राद्धादिक करुन काय करावयाचें ? त्यानें कार्तिकांत हरीचें पूजन केल्यानेंच आपले पितर नरकापासून तारिले असेंच निःसंशय समजावें ॥५०॥
आपल्या पितरांच्या संतोषाकरितां जे विष्णूला दुग्धादिकांनीं स्नान घालितात, ते कोटिकल्पपर्यंत स्वर्गांत जाऊन देवांसह राहतात ॥५१॥
ज्यांनीं कार्तिकमहिन्यांत कमलनेत्र कृष्णाची पूजा कमलांनीं केली नाहीं, त्यांचे घरांत कोटिजन्मपर्यंत लक्ष्मी वास करणार नाहीं ॥५२॥
अहो ! ज्यांनीं भक्तीनें पांढर्‍या, काळ्या किंवा तांबड्या कमलांनीं हरीची पूजा केली नाहीं ते फसले व ते नाश पावून कलीच्या गुहेमध्यें पडले असें समजावें ॥५३॥
जो एका कमलानें कमलापति हरीची पूजा करील, तो आपलें दहा हजार वर्षाचें पातक नाहीसे करील ॥५४॥
विष्णूची एका कमलानें पूजा करुन नमस्कार केला असतां विष्णू त्याचे एक हजार सातशें अपराधांची क्षमा करितात ॥५५॥
जो कार्तिक महिन्यांत लक्ष तुलसीपत्रांनी विष्णूची पूजा करील त्याला दर पत्राला एक एक मोतीं वाहिल्याचें फल मिळतें ॥५६॥
देवाला अर्पण करण्याचें जलादि पदार्थ तुलसीनीं सुगंधित करुन अर्पण केले असतां, त्यानें हजारों कोटी कल्पपर्यंत विष्णु संतुष्ट होतो ॥५७॥
हे स्कंदा ! जो कृष्णाला वाहून काढलेल्या तुळसी आपल्या मुखांत, मस्तकावर व देहावर प्रीतीनें धारण करील त्याला कलि स्पर्श करणार नाहीं ॥५८॥
हे षण्मुखा ! विष्णूवरच्या तीर्थादि निर्माल्यानें जो आपलें शरीर परिमार्जन करिल, तो सर्व रोगांपासून व पापांपासून मुक्त होतो ॥५९॥
विष्णूचे निर्माल्याचा ज्याचे अंगाला स्पर्श होईल, त्याचीं पापें व व्याधि छिन्नभिन्न होऊन नाश पावतात ॥६०॥
शंखोदक, विष्णूची भक्ति, निर्माल्य, शालिग्रामाचें तीर्थ, गंध व अंगारा हीं ब्रह्महत्या नाहींशी करणारीं आहेत ॥६१॥
इति श्रीपद्मपुराणे उत्तरखंण्डे कार्तिकमहात्म्ये एकत्रिंशोऽध्यायः ॥३१॥

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कार्तिक माहात्म्य - अध्याय ३०