Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Shivamuthi story सोमवारची शिवामुठीची कहाणी

Webdunia
सोमवार, 20 फेब्रुवारी 2023 (06:31 IST)
आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला चार सुना होत्या. तीन आवडत्या होत्या, एक नावडती होती. आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी. नावडतीला जेवायला उष्टं, नेसायला जाडंभरडं. राहायला गुरांचं बेडं दिलं.गुराख्याचं काम दिलं. पुढं श्रावणमास आला.
 
पहिला सोमवार आला. ही रानीं गेली. नागकन्या-देवकन्यांची भेट झाली. त्यांना विचारलं, “बाई बाई, कुठं जातां?” ” महादेवाच्या देवळीं जातों, शिवामूठ वाहतों.” “यानं काय होतं?” “भ्रताराची भक्ति होते. इच्छित कार्य सिद्धीस जातं. मुलंबाळं होतात. नावडतीं माणसं आवडतीं होतात. वडील मनुष्यांपासून सुखप्राप्ति होते.” मग त्यानीं हिला विचारलं, “तूं कोणाची कोण?” “मी राजाची सून, तुमच्याबरोबर येते.”
 
त्यांचेबरोबर देवळांत गेली. नागकन्या-देवकन्या वसा वसू लागल्या. नावडती म्हणाली, “काय ग बायांनो वसा वसतां?”,“आम्ही शिवामुठीचा वसा वसतों.” “त्या वशाला काय करावं?” “मूठ चिमूट तांदुळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फूल घ्यावं, दोन बेलाचीं पानं घ्यावीं. मनोभावं पूजा करावी. हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं “शिवा शिवा महादेवा,माझी शिवामूठ ईश्वरा देवा. सासूसासर्‍या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा, नावडती आहे ती आवडती कर रे देवा.” असं म्हणून तांदूळ वहावेत. संध्याकाळपर्यंत उपवास करावा. उष्टंमाष्टं खाऊं नये. दिवसा निजूं नये. उपास नाहीं निभवला तर दूध प्यावं. संध्याकाळीं आंघोळ करावी. देवाला बेल वहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा पांच वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसर्‍यास तीळ, तिसर्‍यास मूग, चवथ्यास जव आणि पांचवा आला तर सातू शिवामूठीकरितां घेत जावे.”
 
पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या-देवकन्यांनीं दिलं,आणि दुसऱ्या सोमवारी हिला धरून आणायला संगितलं.त्या दिवशीं हिनं मनोभावं पूजा केली. सारा दिवस उपास केला. जावानणंदांनीं उष्टंमाष्टं पान दिलं. तें तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली.
 
पुढं दुसरा सोमवार आला. नावडतीनं घरांतून सर्व सामान मागून घेतलं. पुढं रानांत जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावें पूजा केली आणि “शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा. सासूसासऱ्या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा, नावडती आहें ती आवडती कर रे देवा.” असं म्हणून तीळ वाहिले. सारा दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिला. दूध पिऊन निजून राहिली. संध्याकाळीं सासर्‍यानं विचारलं. “तुझा देव कुठं आहे? नावडतीनं जबाब दिला, “माझा देव फार लांब आहे. वाटा कठीण आहेत, कांटेकुटे आहेत. साप-वाघ आहेत, तिथं माझा देव आहे.”
 
पुढं तिसरा सोमवार आला. पूजेचं सामान घेतलं. देवाला जाऊं लागली. घरचीं माणसं मागं चाललीं. “नावडते, तुझा देव दाखव,” म्हणून म्हणूं लागलीं. नावडतीला रोजचा सराव होता. तिला कांहीं वाटलं नाहीं. ह्यांना कांटेकुटे पुष्कळ लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानांत कशी येत असेल कोण जाणे. नावडतीला चिंता पडली. देवाची प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या, देवकन्या ह्यांसहवर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडिताचे खांब झाले, हांड्या गलासं लागलीं. स्वयंभू महादेवाची पिंडी झाली. सगळ्यांनीं देवाचं दर्शन घेतलं. नावडाती पूजा करूं लागली. गंधफूल वाहूम लागली. नंतर मूग घेऊन “शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा. सासूसासर्‍या, दिराभावा, नणंदाजावा, भ्रतारा, नावडती आहें ती आवडती कर रे देवा.” असं म्हणून शिवाला वाहिलें. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढलं.दागिने ल्यायला दिले. खुंटीवर पागोटं ठेवून तळं पहायला गेला. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सगळीं माणसं बाहेर आलीं. इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला. माझं पागोटं देवळीं राहिलं देवळाकडे आणायला गेला. तों तिथं एक लहान देऊळ आहे, तिथं एक पिंडी आहे. वर आपण केलेली पूजा आहे, जवळ खुंटीवर पागोटं आहे.तेव्हां त्यांने सुनेला विचारलं,” हें असं कसं झालं?” “माझा गरिबाचा हाच देव.मीं देवाची प्रार्थना केली, त्यानं तुम्हांला दर्शन दिलं.”सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखींत घालून घरीं आणलं.नावडती होती ती आवडती झाली.
 
जसा तिला शंकर प्रसन्न झाला, तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठां उत्तरांची कहाणी.पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेया

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

मारुतीची निरंजनस्वामीकृत आरती

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

Christmas 2024: गोव्यातील या ठिकाणी ख्रिसमस साजरा करा

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख
Show comments