Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Rishi Panchami Katha ऋषिपंचमीची कहाणी

Rishi Panchami katha
Webdunia
ऐका ऋषीश्वरांनो तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. तो आपला शेतीभाती करून सुखानं नांदत होता. एके दिवशी त्याची बायको शिवेनाशी झाली. विटाळ तसाच घरात कालविला. त्या दोषानं काय झालं? तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला. त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म आला. देवीची करणी! दोघंही आपल्या मुलाच्या घरी होती. तो मोठा धार्मिक होता. देवधर्म करी, श्राद्धपक्ष करी, आल्या ब्राह्मणांचा समाचार घेई. 
 
एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं. बायकोला सांगितलं, आज माझ्या आईचं श्राद्ध आहे, खीरपुरीचा सैंपाक केला. इतक्यात काय चमत्कार झाला? खिरींचं भांडं उघडं होतं. त्यात सर्पानं आपलं गरळ टाकलं. हे त्या कुत्रीनं पाहिलं. मनात विचार केला, ब्राह्मण खीर खातील नि मरून जातील. मुलाला ब्रह्महत्येचं पाप लागेल. म्हणून उठली, पटकन खिरीच्या पातेल्याला शिवली. ब्राह्मणाच्या बायकोला राग आला. तिनं जळतं कोलीत घेतलं नि कुत्रीच्या कंबरेत मारलं, तो सैंपाक टाकून दिला, पुन्हा सैंपाक केला, ब्राह्मणांना जेवू घातलं. कुत्रीला उष्टमाष्टं देखील घातलं नाही. सारा दिवस उपास पडला. रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे बैलाजवळ गेली, आणि आक्रोश करून रडू लागली. 
 
बैलानं तिला कारण विचारलं. तशी म्हणाली, मी उपाशी आहे. आज मला अन्न नाही, पाणी नाही. खिरीच्या पातेल्यात सर्पानं गरळ टाकलं ते माझ्या दृष्टीस पडलं. ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्यास जाऊन शिवले. माझ्या सुनेला राग आला. तिनं जळकं कोलीत घेऊन माझी कंबर मोडली. माझं सारं अंग दुखतं आहे. ह्याला मी काय करू? बैलानं तिला उत्तर दिलं, तू आदल्या जन्मी विटाळशीचा विटाळ घरात कालवलास, त्याचा संपर्क मला झाला. त्या दोषानं मी बैल झालो. आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं. तोंड बांधून मला मारलं. मी देखील आज उपाशीच आहे. त्याचं श्राद्ध फुकट गेलं. हे भाषण मुलानं ऐकलं. लागेच उठून बाहेर आला. बैलाला चारा घातला. कुत्रीला अन्न घातलं, दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं. मनात फार दु:खी झाला.
 
दुसरे दिवशी सकाळी उठला. घोर अरण्यात गेला. तिथं ऋषींचा मेळा पाहिला. त्यांना साष्टांग नमस्कार घातला. ऋषींनी त्याला प्रश्न केला, तू असा चिंताक्रांत का आहेस? मुलानं सांगितलं, माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे. त्यांना मोक्ष कसा मिळेल, ह्या चिंतेत मी पडलो आहे. कृपा करून मला उपाय सांगा. 
 
तेव्हा त्याला ऋषींनी सांगितलं, तू ऋषिपंचमीचं व्रत कर! ते व्रत कसं करावं? भाद्रपदाचा महिना येतो, चांदण्या पाखांतली पंचमी येते. त्या दिवशी काय करावं? ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं. आघाड्याची प्रार्थना करावी. त्याच्या काष्ठानं दंतधावन करावं. आवळकाठी कुटून घ्यावी, तीळ वाटून घ्यावे, ते तेल केसाला लावावं, मग अंघोळ करावी. धुतलेली वस्त्र नेसावी. चांगल्या ठिकाणी जावं. अरुधंतीसह सप्तऋषींची पूजा करावी. असं सात वर्षं करावं शेवटी उद्यापन करावं. ह्या व्रतानं काय होतं? रजस्वलादोष नाहीसा होतो, पापापासून मुक्तता होते. नाना तीर्थाच्या स्नानाचं पुण्य लागतं. नाना प्रकारच्या दानाचं पुण्य लागतं, मनी इच्छिलं कार्य होतं. मुलानं ते व्रत केलं. त्याचं पुण्य आईबापांना दिलं. 
 
त्या पुण्यानं काय झालं? रजोदोष नाहीसा झाला. आकाशातून विमान उतरलं. बैल होता तो सुंदर पुरुष झाला. कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली. दोघं विमानात बसून स्वर्गास गेली. मुलाचा हेतू पूर्ण झाला, तसा तुमचा आमचा होवो. ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी सुफल संपूर्ण.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

पापमोचनी एकादशी व्रत कथा Papmochani Ekadashi Vrat Katha

चैत्र नवरात्रीत तुळशी आणि या ४ गोष्टी देवीला अर्पण करू नका, अन्यथा आयुष्यभर त्रासात राहाल !

स्वामी समर्थ सप्तशती संपूर्ण अध्याय १ ते १०

Swami Samarth Prakat Din 2025 श्री स्वामी समर्थ प्रकट दिन कधी, काय करावे?

Eid-Ul-Fitr 2025 भारतात ईद कधी आहे, ३१ मार्च की १ एप्रिल? चंद्र बघण्याची तारीख आणि महत्त्व जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

पुढील लेख
Show comments