Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रुक्मिणी स्वयंवर प्रसंग सहावा

Webdunia
श्रीगणेशाय नम: ॥ भीमकीचा विवाहसंभ्रम । पाहों आले कृष्ण राम ॥ हें परिसोनि भीमकोत्तम ॥ दर्शना सकाम ऊठिला ॥ १ ॥
भेरी निशाण मृदंग । नाना वाजंत्रे अनेग । पूजासामुग्री घेऊनि साङ्ग । समारंभेसीं पैं आला ॥ २ ॥
कृष्ण देखोंनि सावधान । केलें साष्टांग नमन । कृष्णें दिधलें आलिंगन । विस्मित मन रायाचें ॥ ३ ॥
मूळेंवीण तूं आलासी । परमसुख हें आम्हांसी । शब्देंवीण सोयरा होसी । तूं जाणसी ब्रह्मसूत्र ॥ ४ ॥
वर वरिष्ठ कृष्णदेवो । मनी धरूनि हाची भावो । मधुपर्कविधी पाहा हो । पूजाविधान करीतसे ॥ ५ ॥
नानापरीची उपायनें । वस्त्रें अलंकार भूषणें । अंगिकारिलीं श्रीकृष्णें । जीवींची खूण जाणोनी ॥ ६ ॥
बळिभद्रादि प्रमुख । जे आले यादवादिक । त्यांची पूजा केली देख । यथोचित विधाने ॥ ७ ॥
राव म्हणे श्रीहरी । आतां चलावें नगरांतरीं । समारंभेसीं सहपरिवारीं । चलावें झडकरी कृपाळुवा ॥ ८ ॥
जानवसा नगराआंत । देतां बोलिला कृष्णनाथ । विरोध आम्हां मागधांत । निकट वास करूं नये ॥ ९ ॥
जवळी राहतां बोलाबोली । शोभनामाजी वाढेल कळी । निकरा जाईल रांडोळी । आम्हां आणि रुक्मिया ॥ १० ॥
यासाठीं पाउलें दोन दूरी । राहूं नगराबाहेरी । ठाव द्यावा अंबिकापुरीं । ऎसें श्रीहरी बोलिला ॥ ११ ॥
तंव राव हासिन्नला मनीं । होय बुद्धिमंत शार्ङ्गपाणी । ठाव दिधला अंबिकाभुवनीं । घाव निशाणीं घातला ॥ १२ ॥
राजा म्हणे चक्रपाणीं । मार्ग आहे नगरामधूनी । कृष्णदर्शना उदित राणी । यालागोनि बुद्धि केली ॥ १३ ॥
जाणोनियां तो भावो । रथीं चढला श्रीकृष्णदेवो । आपणाजवळी बैसविला रावो । थोर उत्साहो मांडिला ॥ १४ ॥
लागली वाद्यांची घाई । चवरें ढळती दोहीं बाहीं । बंदीजन गर्जती पाहीं । कृष्णकीर्तीही कीर्तनें ॥ १५ ॥
छेदावया ह्रदयबंध । साधकांमाजी रिघे बोध । तैसा प्रवेशला गोविंद । नगरामाजी निजबळें ॥ १६ ॥
नगरा आला श्रीकृष्ण । नगरनागरिक जन। उतावेळ कृष्णदर्शन । करावया धांविन्नले ॥ १७ ॥
कृष्ण पाहावया नरनारी । मंडपघसणी होतसे भारी । एक चढले माडिया गोपुरीं । पाहावया श्रीहरी स्वानंदें ॥ १८ ॥
कृष्णमुखकमळ सुंदर । जननयन तेचि भ्रमर । तेथेंचि गुंतले साचार । कृष्णआमोदरसभावें ॥ १९ ॥
नयनद्वारें प्राशन । करूनि ह्रदयीं आणीती कृष्ण । सबाह्य पाहाती समान । समदृष्टी कृष्णातें ॥ २० ॥
ऎसा देखोनि श्रीपती । कृष्णमय जाहली वृत्ती । लवों विसरलीं नेत्रपातीं । कृष्णमूर्तीं पाहातां ॥ २१ ॥
घेऊनि निजबोधाची वेताटी । विवेक दृश्याची मांदी लोटी । तैसा सात्त्विक जगजेठी । जनां सकळिकां वारिता ॥ २२ ॥
मागें परमात्मा कृष्णवीर । करूनि निजबोधाचा भार । चालतसे स्थिरस्थिर । आत्मस्थितीच्या पाउलीं ॥ २३ ॥
बोलती नरनारी सकळा । काल मिरविले गे शिशुपाळा । ने देखो नोवरेपणाची कळा । नाहीं जिव्हाळा लग्नाचा॥ २४ ॥
कृष्णा नोवरा भीमकीलागीं । भीमकी होय कृष्णाजोगी । सृष्टी शोभत इंहीच दोघी । तिसरें जगीं न देखॊं ॥ २५ ॥
आमुचें जन्मोजन्मींचें सुकृत । शुद्ध पुण्य जें शोभिवंत । तेणें तरी कृष्णनाथ । भीमकीकांत हो लग्नीं ॥ २६ ॥
ऎसे आशीर्वाद देती । कृष्णरूपीं वेधल्या वृत्ती । प्रत्यावृत्ती हरि पाहती । नाहीं उपरती जनासी ॥ २७ ॥
कृष्णें केला मेळिकार । भीमकें केला आदर थोर । सकळ सैन्य पाहुणेर । यथोचित यादवांतें ॥ २८ ॥
भीमकें देखिलें कृष्णासी । दृष्टी जडली त्या रूपांसी । साखरेवरूनी नुठे माशी । तेवी रायासी जाहलें ॥ २९ ॥
भीमकें पूजिले कृष्णासी । विकल्प वाटेल चैद्यासी । यालागीं सकळीकां रायांसी । पूजा विधीसी मांडिली ॥ ३० ॥
यथा कुल तथा शील । जैसे वीर्य तैसे बळ । तदनुसार राजे सकळ । भीमकें केवळ पूजेलें ॥ ३१ ॥
कृष्ण आणि हलायुध । आले ऎकोनि चैद्य मागध । दचकोनि म्हणती विरोध । थोर आम्हां मांडले ॥ ३२ ॥
कृष्ण आला महाबळी । ऎकोनि चिंतेची काजळी । वाढिन्नली ह्रदयकमळीं । तोडें काळीं तेणे झालीं ॥ ३३ ॥
मागध परस्परें आपणांत । कुजबुज करूं लागले बहुत । एकमेकांते खुणवित । समस्त त्यात मीनले ॥ ३४ ॥
भीमकें पूजिलें कृष्णासी । केला मधुपर्क विधानेंसी । तोही मीनला आहे त्यांसी । आहाच आम्हांसीं सोयरीक ॥ ३५ ॥
लग्न लागलियापाठीं । कायसी यादवांची गोष्टी । कार्य करूं दाटोदाटी । आम्ही जगजेठी असतां ॥ ३६ ॥
रुक्मिया आहे आम्हांकडे । भीमके सात्त्विक तें बापुडे । म्हातारपणीं जाहलें वेडें । त्यांचे त्यापुढें काय चाले ॥ ३७ ॥
वेगीं विस्तारा पां फळ । सन्नद्ध जाले वीर सकळ । तूर्ये लागली प्रबळ । घावो निशाणी घातला ॥ ३८ ॥
शुद्धमती म्हणे रायासी । तुम्ही विसरलेति कुळधर्मासी । कन्या न्यावी अंबिकेसी । गौरीहरासी पूजावया ॥ ३९ ॥
तंव रायाचा ज्येष्ठ कुमर । ऎकोनि कोपा चढिन्नला थोर । मिथ्या बायकांचा विचर । केंवि साचार मानितां ॥ ४० ॥
आत्मबुद्धिहितार्थाय गुरुबुद्धिर्विशेषत: । परबुद्धिर्विनाशाय स्त्रीबुद्धि: प्रलयावहा ॥ १ ॥
आपुली बुद्धी ते हितासी । गुरुबुद्धि त्याहून विशेषी । परबुद्धि विनाशाशी । मूळ प्रळयासी स्त्रीबुद्धि ॥ ४१ ॥
अंबालयीं यादव वीर । उतरले असती अकर्माकार । हिरोनी नेतील सुंदर । लाज थोर होईल ॥ ४२ ॥
ऎसें बोले रुक्मिया वीर । करूं नये आणीक विचार । कार्य साधावें सत्वर । मग हो कां भलतेंचि ॥ ४३ ॥
राजा म्हणे कट-कटा । व्यर्थ आलासी मझिया पोटा । नव्हेसी वीरवृत्तिलाठा । अतिकरंटा नपुंसक ॥ ४४ ॥
अजि कळली तुझी बुद्धी । वाटीव उसधी हांडिया-सांधी । हागीर भ्याड तूं त्रिशुद्धी । गाढा बुद्धि नव्हेसी ॥ ४५ ॥
वर्मी खोंचला रुक्मिया । कन्या नेईन अंबालया । ख्याती लावीन यादवां तयां । मज कोपलिया कोण साहे ॥ ४६ ॥
ऎसें होतें माझे पोटीं । लग्न लागलियांपाठीं । दोघें वधूवरें गोमटी । न्यावीं भेटी जगदंबे ॥ ४७ ॥
ऎसा नव्हेचि कुळधर्म । लग्नापूर्वील हा नेम । सिद्धी पाववीन सुगम । पराक्रम पाहें माझा ॥ ४८ ॥
ऎसें सांगोनि रायासी । वेगीं आला चैद्यांपासीं । गुज सांगतसे तयांसी । विघ्न लग्नाली वोढवलें ॥ ४९ ॥
कृष्णाकडे आमुचा पिता । जीवेंभावें तिकडेच माता । कार्याकारण प्रपंचता । मिथा दाविती आम्हांकडे ॥ ५० ॥
ऎका आमुच्या कुळधर्मासी । नोवरी न्यावी अंबिकेसीं । सन्नद्ध होऊन दळभारेंसी । आलें तुम्हांसी पाहिजे ॥ ५१ ॥
येरीकडे चौथे बंधु । घेऊनि निघाले जी वधु । करूनि दळभारु सन्नद्ध । महावीर उदित ॥ ५२ ॥
मी तरी परवडी आढावाची । शस्त्रें उघडीं हातीं त्यांचीं । मागें परवडी धनुर्धरांची । शितें धनुष्यासी वाइलीं ॥ ५३ ॥
तयामागें वीर घोडीं । रथ जोडियले जोडी । वर बैसले परवडीं । शस्त्रें उघडीं झळकती ॥ ५४ ॥
तयामागें कुंजरथाट । गळां सांखळिया एकवट । खिळिले चालती गजघंट । दुर्ग अचाट सैन्याचे ॥ ५५ ॥
भक्तजनाचिया काजा ॥ जेवीं करिती आवरणपूजा । तेवी सैन्य रचिलें वोज । कृष्णभाजा भीमकिया ॥ ५६ ॥
नातरी उपासनायंत्र । तैसें दिसे सैन्यसूत्र ॥ भीमकी मध्यपीठ पवित्र । कृष्णक्षेत्रे निजबीज ॥ ५७ ॥
जेवीं साधनचतुष्टयसंपत्ती । परमात्मयासन्मुख करिती वृत्ती । तैसे चौघे बंधू घेऊनि येती । कृष्णासन्मुख भीमकी॥ ५८ ॥
नातरी जैसे चारी वेद । उपनिषदें करिती बोध । वृत्ति स्वयें देखे निजपद । तैसे बंधू भीमकीसी ॥ ५९ ॥
नातरी चारी पुरुषार्थ जैसे । भक्तापाशीं येती आपैसे । चारी बंधू जाण तैसे । भीमकीसरिसे चालती ॥ ६० ॥
वैराग्य विवेकाचेनि बळी । तैसा रुक्मरथ रक्ममाळी । मागें पुढें जी सांभाळी । परिके जवळी येऊं नेदी ॥ ६१ ॥
स्वानंद आणि अनुभवू । जीवाहून आवडती बहू । तैसे रुक्मकेली रुक्मबाहू । दोघे भाऊ दोहीं भागी ॥ ६२ ॥
ऎसे भीमकीच्या चहूं भागीं । चौघे बंधू रंगले रंगीं । भीमकीसवें चालती वेगीं । धन्य जगीं रुक्मिणी ॥ ६३ ॥
वडील बंधु चौघांहूनी ॥ जो अतिगर्वित अभिमानी । तो सांडिलासे त्यजूनी । साधुजनीं जेवि निंदा ॥ ६४ ॥
कृष्णद्वेषिया तो खरा । मिळणी मीनला असुरां । म्हणूनि त्यजिला परबाहिरा । नव्हे सोयिरा निजाचा ॥ ६५ ॥
भोग त्यजूनि वैरागी ॥ योगसाधना निघे योगी । तैसी माया माहेर सांडूनि वेगीं । चरणचाली निघाली ॥ ६६ ॥
लोकप्रतिष्ठा महंती । बैसावें अश्वगजरथीं । जेणें होय कृष्णप्राप्ती ॥ भीमकी गती ते जाणे ॥ ६७ ॥
पारिखा पाई कृष्ण ठाके । हें बोलणें समूळ लटिकें । ऎसें जाणोनि निष्टंकें । चरणीं चामके वैदर्भी ॥ ६८ ॥
कृष्णचरणीं जडलें मन ॥ यालगीं वाचें पडलें मौन । दृढ लागलें अनुसंधान । सहजस्थिती चालली ॥ ६९ ॥
आत्मसाक्षात्कारवृत्ती । अनिवार अहिंसादिक येती । तेवीं भीमकीसवें समस्ती । सखिया धांवती स्वानंद ॥ ७० ॥
जे कां निरपेक्ष मानसीं । सिद्धी तिष्ठती सेवेसी । तैसा सखिया भीमकीपाशीं । उपचारेंसी चालती ॥ ७१ ॥
वडिलांमाजी वडीलपणीं । निजशांतीची स्वामिणी । वागवीतसे रुक्मिणी । अग्रगणी सकळिकां ॥ ७२ ॥
बोधपुत्राच्या जननी । ब्रह्मवेत्त्याच्या ब्राह्मणी । अकामकामाचिया कामिनी ॥ सवें सुवासिनी चालती ॥ ७३ ॥
जैसा अनुहताचा गजर । तैसीं तुरें वाजती अपार । नादें कोंदले अंबर । शब्दाकार नभ झालें ॥ ७४ ॥
पहिले उठिले घंटानाद । मागें किंकिणींचे शब्द । मधुर शंखांचे अनुवाद । वीणावेणू रुणझुणती ॥ ७५ ॥
नादें उठिल्या झल्लरी । मृदंगध्वनी त्यामाझारीं । निशाणीं दुमदुमिल्या भेरी । नादाभीतरी मन निवे ॥ ७६ ॥
कृष्णकीर्तीचिया कीर्तनीं । चौघीजणी गाती गाणीं । त्यापुढें नाचणी नाचती । चारी मुक्ती उदास । ७७ ॥
कृष्ण वर्णावया श्रेष्ठ । चौघे गर्जताती भाट । अठरा मागध अतिउद्भट । वंशावळी वर्णिती ॥ ७८ ॥
कळा वाढविती शब्द । साहीजणांशी विवाद । युक्तिप्रयुक्तीचे बोध । नाना छंद शब्दांचे ॥ ७९ ॥
पातली अंबिकेचें रंगण । केलें करचरणक्षालन । रुक्मिणीचें सावध मन । शुद्धाचमन तिनें केलें ॥ ८० ॥
श्रद्धापूजेचे संभार । शुद्ध सुमनांचे पैं हार । चिद्रत्‍नांचे अलंकार । विरजांबर पूजेसी ॥ ८१ ॥
देवालया आली हरिखें । अंबा पाहतां कृष्णाचि देखे । येणे रूपें यदुनायकें । पाणिग्रहण करावे ॥ ८२ ॥
सावध होऊनि पाहे चित्ता । म्हणे हे आमुची कुळदेवता । आपुल्या रूपें दावी अनंता । होईल भर्ता निश्चित ॥ ८३ ॥
हरिखें ओसंडली पोटीं । मग बांधिली शकुनगाठीं । अतिउल्हासें गोरटी । पूजा विधीसीं मांडिली ॥ ८४ ॥
षोडशोपचारीं पूजा । करिती जाहली भीमकात्मजा । विधी सांगती द्विजभाजा । गरुडध्वजप्राप्तीसी ॥ ८५ ॥
वस्त्रें अलंकार भूषणें । नाना उपचार बलिदानें । दीपावली नीरांजने । सावधानें अर्पिलीं ॥ ८६ ॥
कृष्ण धरूनियां मानसीं । भीमकी पूजी द्विजपत्‍न्यांसी । जें जें बोलिलें विधीसी । तें ते त्यांसी दिधलें ॥ ८७ ॥
निंबें नारिंगे नारिकेळे । अपूप लाडू अमृतफळें । इक्षुदंड आंबे केळें । सुवासिनींसी दिधलीं ॥ ८८ ॥
मुक्ताफळेंसीं आभरणें । सौभाग्यद्रव्यें कंठाभरणें । हळदी जिरें लवण धणे । दिधलीं वाणें नारींसी ॥ ८९ ॥
होती नीलोत्पलांची माळ । ते घातली जगदंबेच्या गळां । वर देईं वो घनसांवळां । उचितकळां आजिच्या ॥ ९० ॥
म्हणॊनि विसर्जिलें मौन । करूं आदरिलें स्तवन । मनामागें ठेवोनि मन । सावधान स्तवनासी ॥ ९१ ॥
जयजय वो अव्यक्तव्यक्ती । जयजय वा अमूर्तमूर्ती । जयजय वो विश्वस्फूर्ती । चिच्छक्ती चिन्मात्रे ॥ ९२ ॥
जयजय वो जगदंबे । जयजय वो आरंभस्तंभे । जयजय वो सौभाग्यशोभे । स्वयंस्वयंभे कुमारी ॥ ९३ ॥
जयजय वो अनादि । नाकळसी तूं मनोबुद्धी । देवोदेवी इंही शब्दीं । तूं त्रिशुद्धी नांदसी ॥ ९४ ॥
शिवा तुझेनि शिवपण । जीवा तुझेनि जीवपण । देवा तुझेनि देवपण । निजकारण तूं माये ॥ ९५ ॥
तुझेनि शब्दांदिका शोभा । तुझेनि नभत्व आले नभा । तूंचि मूळ प्रारंभा । विश्वकदंबा जीवन तूं ॥ ९६ ॥
तुझी उघडलिया दृष्टी । नांदो लागे सकळ सृष्टी । तुवां उपेक्षिलियापाठीं । देवांही नुठी देवपण ॥ ९७ ॥
ॐ पुण्याहं सुमुहूर्ती । लग्न लावणें तुझे हातीं । मज नोवरा श्रीपती । समूळ कर्ती तूं माये ॥ ९८ ॥
ऎसा स्तुतिवाद करितां । कंठीची माळ आली हाता । येचि माळें श्रीकृष्णनाथा । वरीन आतां निर्धारें ॥ ९९ ॥
महाप्रसाद सर्वथा । म्हणोनि चरणीं ठेविला माथा । आशीर्वाद देती समस्ता । पतिव्रता द्विजपत्‍न्या ॥ १०० ॥
येणें उल्हासें सुंदरा । वरूं निघे श्रीकृष्णवरा । स्वानुभवाचा सेवक खरा । त्यातें करी धरूनी ॥ १०१ ॥
भीमकीसौंदर्य अमूप । जिचेनि जगा नांव रूप । तिचे लावण्याचे दीप । मुख्य स्वरूप केवीं वर्णूं ॥ १०२ ॥
जियेतें स्रजूं न शके चतुरानन । कृष्णप्रभावें स्वरूप पूर्ण । तिचिया स्वरूपाचें वर्णन । एका जनार्दन वर्णीतसे ॥ १०३ ॥
इति श्रीमद्भागवते महापुराणें दशमस्कंधे हरिवंशसंहितासंमते रुक्मिणीस्वयंवरे अंबिकापूजनं नाम षष्ठ: प्रसंग: ॥६॥
॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

सोमवारी या उपयांनी मिळेल तन, मन आणि धनाचे सुख

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

श्री सूर्याची आरती

काल भैरव आरती Kaal Bhairav Aarti

कालभैरवाने काळ्या कुत्र्याला वाहन म्हणून का निवडले?

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments