Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संत निवृत्तीनाथांचे अभंग 161 ते 170

Webdunia
बुधवार, 15 जून 2022 (15:39 IST)
हरिदास संगे हरिदास खेळे । ब्रह्मादिक सोहळे भोगिताती ॥ १ ॥
संतमुनिदेवसनकादिक सर्व । तिहीं मनोभाव अर्पियेला ॥ २ ॥
पुंडलिकफळ वोळले सकळ । शंकर सोज्वळ प्रेमें डुले ॥ ३ ॥
निवृत्ति लोळत चरणरजीं लाटा । माजि त्या वैकुंठा आत्मलिंगीं ॥ ४ ॥
 
सोपान संवगडा स्वानंद ज्ञानदेव । मुक्ताईचा भाव विठ्ठलराज ॥ १ ॥
दिंडी टाळघोळ गाती विठ्ठल नाम । खेचरासी प्रेम विठ्ठलाचें ॥ २ ॥
नरहरि विठा नारा ते गोणाई । प्रेम भरित डोहीं वोसंडती ॥ ३ ॥
निवृत्ति प्रगट ज्ञानदेवा सांगे । पुंडलिकसंगे हरि खेळे ॥ ४ ॥
 
वोळलें दुभतें सर्वांसि पुरतें । प्रेमाचें भरतें वैष्णवासी ॥ १ ॥
वोळतील चरणीं वैष्णव गोमटे । पुंडलिकपेठें हरि आला ॥ २ ॥
सोपान खेंचर ज्ञानदेव लाठा । देताती वैकुंठा क्षेम सदा ॥ ३ ॥
निवृत्तीनें ह्रदयीं पूजिलें तें रूप । प्रत्यक्ष स्वरूप विठ्ठलराज ॥ ४ ॥
 
धन्य हा खेचर धन्य हा सोपान । भक्तीचें जीवन जनक हेतु ॥ १ ॥
धन्य याचें कूळ पवित्र कुशळ । नित्य या गोपाळ जवळी असे ॥ २ ॥
याचेनि स्मरणें नासती दारुणें । कैवल्य पावणें ब्रह्मामाजी ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे परब्रह्म हें साकार । तेथील अंकूर उमटले ॥ ४ ॥
 
कमळाच्या स्कंधी गुणी गुढारलें । वरी आकारलें फूल तया ॥ १ ॥
सुमनाचेनि वासें भ्रमरभुलले । मार्ग पैं विसरले इंद्रियांचा ॥ २ ॥
तैसेहे संत विठ्ठलीं तृप्त । नित्य पैं निवांत हरि चरणीं ॥ ३ ॥
नाठवे हें दिन नाठवे निशी । अखंड आम्हांसि हरिराजा ॥ ४ ॥
तल्लिन प्रेमाचे कल्लोळ अमृताचे । डिंगर हरिचे राजहंस ॥ ५ ॥
टाहो करूं थोर विठ्ठल कीर्तनें । नामाच्या सुमनें हरि पुजूं ॥ ६ ॥
निवृत्ति निवांत तल्लीन पै झाला । प्रपंच आबोला हरिसंगें ॥ ७ ॥
 
गयनी गव्हार कृपेचा उद्धार । वरुषला उदार अमृतमय ॥ १ ॥
तोंची बोध साचा मुक्ताईसी लाटा । चालिले वैकुंठा समारंबें ॥ २ ॥
कुंचे गरुडटके टाळ श्रुति हरि । चालिलें गजरीं हरिसंगे ॥ ३ ॥
निवृत्ति वैष्णव सोपान खेचर । करिताती गजर हरिनामें ॥ ४ ॥
 
शांति क्षमा दया सर्वभावें करुणा । तोचि नारायणा आवडे दासु ॥ १ ॥
तोचि एक साधु बोलिजे पैं जनीं । निरंतर ध्यानीं कृष्णमूर्ति ॥ २ ॥
जीवशिव एक सर्वत्र चैतन्य । ऐसे जया कारुण्य तोचि धन्य ॥ ३ ॥
तोचि एक भक्तु हरि हरि म्हणे । नित्य नारायणें तारिजे त्यासि ॥ ४ ॥
येउनि जनीं सदा पैं तो विदेही । तारकू सबाहीं सप्रेमळु ॥ ५ ॥
निवृत्ति सांगतु भक्तीचा महिमा । करी शांति क्षमा तो विरळा असे ॥ ६ ॥
 
प्रकृतीचा पैठा कल्पना माजिठा । न पवे तो वैकुंठा कर्मजाड्य ॥ १ ॥
अहिंसेचें स्वरूप हेंचि हरिरूप । न म्हणे हरि आप सर्व आहे ॥ २ ॥
नाहीं त्यांसि जय नुद्धरे सर्वथा । हरिवीण व्यथा कोण वारी ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे धरी गुरुचरणसोये । तेणें मार्गें पाहे हरि सोपा ॥ ४ ॥
 
कांसवीचीं पिलीं करुणा भाकी । परिसंपडलीं निकीं चरणसोय ॥ १ ॥
कामधेनु घरीं हरि माझा गोपाळ । मज काळवेळ नाठवें तैसी ॥ २ ॥
चातका चिंतिता जरी नपवे जीवन । तरीच शोकें प्राण तृषा हेतु ॥ ३ ॥
निवृत्ति स्वानंदु कामधेनु गुरु । नामाचा उच्चार तेणें छंदें ॥ ४ ॥
 
आदिनाथ उमाबीज प्रकटिलें । मछिंद्रा लाधली सहजस्थितीं ॥ १ ॥
तेचि प्रेममुद्रा गोरक्षा दिधली । पूर्ण कृपा केली गयनिनाथा ॥ २ ॥
वैराग्यें तापला सप्रेमें निवाला । ठेवा जो लाधला शांतिसुख ॥ ३ ॥
निर्द्वद्व निःशंक विचरतां मही । सुखानंद ह्रदयीं स्थिर जाला ॥ ४ ॥
विरक्तीचें पात्र अन्वयाचें मुख । देऊनि सम्यक अनन्यता ॥ ५ ॥
निवृत्ति गयनी कृपा केली असे पूर्ण । कूळ हें पावन कृष्णनामें ॥ ६ ॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

गुरुवारी उधार देऊ नये व घेऊ नये

महावीर स्वामी आरती : Lord Mahavir aarti

Anang Trayodashi 2025 आकर्षण वाढविण्यासाठी आणि प्रेमात यश मिळवण्यासाठी अनंग त्रयोदशी व्रत विधी आणि कथा

महावीर जयंती का साजरी केली जाते, जाणून घ्या त्याशी संबंधित मनोरंजक तथ्ये

मारुती स्तोत्र मराठी अर्थासह Maruti stotra with meaning in marathi

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

पुढील लेख
Show comments