आज सकाळी लेमन टी चा घोट-घोट घशात रिचवत गच्चीत येऊन बसलो. श्रावण पंचमी झाली ना काल! वर्षा ऋतूच्या अभ्यंगाने र्निमल झालेली झाडे निरखता-परखता मनात मस्त कोवळी उन्हे पडत राहिली. आकाशही किती सुंदर व निरभ्र होते..! श्रावण असा.. श्रावण तसा..! बाहेरही स्वच्छ ऊन. आतही स्वच्छ ऊन. अंतर्बाह्य कोवळ्या उन्हात नहाताना आयुष्य सुंदर वाटते. खरेच! कधी कधी मानवी मन हे श्रावणासारखं वाटतं. जलधारांनी युक्त सरसर शिरवे आणि उन्हे-पावसाचा श्रावणासारखा खेळ मनातही चालतो. आज मात्र पाऊस नव्हताच..! हा मनभावन श्रावण मनाला आज चक्क लुचत होता. त्याचा निरागस काळजात अमृतपानाचे मधुहिंदोळे आंदोलित होत होते. पळपळ, घटीघटी अंगावर ऊनपाऊस झेलत सुंदरतेच्या हिंदोळवर रूपे झक्कास बदलवावी; तर ती श्रावणानेच! रूपांच्या बाबतीत इतक झटकन् या बोटावरचे त्या बोटावर करावे; तर ते श्रावणानेच! बाकी इतर महिन्यांना हा असला अधिकार मुळीच नाही. ‘तो मी नव्हेच!' असं सतत म्हणणारा आणि वेगवेगळ्या रूपांनी समोर येणारा श्रावण आपल लोखंडी मनाचं सोनं करत राहातो. आपल्या ओल्या मधुगंधाने मनाला स्पर्शणारा परीस होत राहातो.
अर्रे! एवढा विचार करेपर्यंत बेट्याने बदललं ना रूपडं! शिरवळ पडलं. ढगांच्या सावल्या तरी किती मनोहर! झाडांच्या सावल्यात मन विश्रांती घेते आणि ढगांच्या सावल्यात उड्डाणे! आकाश आज नेहमीप्रमाणे सतत निळं जांभळं राहिलंच नाही. ते निरभ्रच राहिलं. आयुष्याची धग घालवणारे सावळे सुंदर ढग आज आकाशात नव्हतेच! धग आणि रग या पलीकडे श्रावणी त्रैलोक्यनाट्याचा वग मात्र चांगलाच रंगला होता. पांढुरके ढग मात्र मजेत दाटून येत होते. ढगांचा रंग काळा-सावळा, निळा-जांभळा असो नाहीतर शुभ्र पांढरा असो! सावल्या नेहमी काळ्याकबर्यायच पडतात. त्यातून दिसत राहातात ढगांची वेगवेगळी रूपे-स्वरूपे. कधी विठु-रखुमाईच्या दर्शनाला व आषाढी वारीला गेलेले वारकरी झालेले ढग आपाल्याला घराकडे परतत असतात. कधी डोंगरदर्यांखवरून शुभ्र ढगांच्या काळ्या सावल्यांचे नक्षी-पक्षी विहरत पुढे जात असताना दिसतात. तर कधी ओथंबल्या धारांचे घनती ओझे अंगावर वागवित राजे ढगोबा डोंगरांचे मुकुट होतात. ढगांची रूपे चित्तचोरटी असतात. ती काळीज चोरून कशी निघून जातात? हे कळतच नाही कधी..! त्यांना चोर ठरवून पकडून ठेवायला मनाची जनाई आणि देहाची पंढरी व्हावी लागते.
अवकाश पित्याचे ढग नावाचे राजकुमार एवढे रूपवान व सुंदर असले तरी श्रावणातले ढग मला जरा भित्रटच वाटतात. ज्येष्ठाच्या सुरूवातीला रोहिण्यांचे विमुक्त ढग जसे धडाडा गरजतात, तसे इतक्या मोठ्याने श्रावणाच्या ढगांना गरजता येत नाही. असा न गरजणारा भित्रटपणा मनात असायलाही हवा ना! केवळ शौर्यानेही जीवन सुंदर होत नाही; भीतीची जाणीवसुद्धा माणसाचे जीवन संयमित व सुंदर करत असते. हे शिकवणारे श्रावणी ढग शिव आराधनेचे होतात ते यामुळेच! याच भगवान शिवाचा शुभ्र वस्त्रे परिधान केलेला नंदी श्रावणशुभ्र पांढर्याश ढगातून अवतरत राहातो. पुढे तर गंमतच होते. हे पांढुरके व इवल्या चिवल्या ढुरक्या देत दुसर्या्ला भिववण्याचे नाटक
करणारे असे कर्पुरी ढग गोकुळातल्या गोपाळकृष्णासारखे होतात. यमुनेच्या तीरी जाऊन मुरली वाजवत गवळणींची मुलायम वस्त्रे झाडांवर लपवून ठेवणारा व त्यांना पाण्यातच राहा, जीवन प्रवाही आहे; अशी कर्मगीता सांगणारा बालकृष्ण या ढगातून दिसत राहतो. चोरून लोणी खाऊन ‘मै नही माखन खाया!' असं बिनदिक्कत यशोदेला खरे-खोटे एकमेकात मिसळून सांगत राहतो. तोंडात ओली श्रावणमाती घालून आपल्या मुखातच फिरणार्या वसुंधरेचं गोलाकारी दर्शन देत राहतो. वरती आणखीन् यशोदेपुढे तो भीत असल्याचे मस्त नाटकही हाच मनमोहन करतो. श्रावणातले ढग असे फसवे परंतु मनातले रूसवे काढणारे व मनाला पुन्हा पुन्हा कोवळ उन्हात झोके घ्यायला लावणारे असतात.
अर्रे! एवढं लिहीपर्यंत ढगांची चांगलीच दाटी झाली ना! पांढर्यान ढगांनी खरोखरीच ‘तो मी नव्हेच..!' हे नाटक सुरू केलं की काय? माथ्यावरती विहरणार्या शुभ्र ढगांनी पांढर्यान धोतरावर काळा सदरा कधी नेसला बरे? क्षितिजावरती तर त्या सावळ्या सुंदराने विश्वरूपदर्शनाचा पवित्राच घेतला होता. महाकाय देही तो मेघश्याम हळूहळू उंच अवकाशी निराकारी होत चालला होता. त्याच्या पायाशी बसून पाहताना मनातला श्रावणसुद्धा निराकारी, निरहंकारी होत चालला. कोठूनसे तुषार अंगावर आले. झिलमिल झिलमिल आकाश झुरुमुरु झुरुमुरू झाले. जिवाशिवाची भेटी व्हावी तसा मेघश्याम लक्षावधी धारातून पुन्हा पुन्हा वसुंधरेवर यावा, ही प्रार्थना करत मनातला श्रावण बरवा बरवा, हिरवा हिरवा होत राहिला.
श्रावण असा! श्रावण तसा!
मोहरत राहिला.. हरिहराची रूपे घेत काळजात बरसत बरसत राहिला.