Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मैत्री असावी तर अशी...जेव्हा प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या सख्याचे पाय चेपू लागतो!

krishna sudama maitri
, बुधवार, 11 फेब्रुवारी 2026 (21:27 IST)
सुदामा गाढ झोपेत होते. त्यांच्या पायथ्याशी बसलेले द्वारकाधीश श्रीकृष्ण आपल्या सख्याचे पाय चेपत असताना जुन्या आठवणींत इतके हरवून गेले होते की, त्यांना काळाचे भानच राहिले नाही. तितक्यात रुक्मिणीने हळूच त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. भानावर येत कृष्णाने रुक्मिणीकडे पाहिले आणि मग सुदामाच्या शांत चेहऱ्याकडे बघून ते हळूच उठले आणि आपल्या कक्षात आले.
 
कृष्णाची ही व्याकुळ अवस्था पाहून रुक्मिणीने विचारले, "स्वामी, आज तुमचे वागणे खूपच अनाकलनीय वाटतेय. जगातील मोठे सम्राट तुमच्या दारी झुकतात, तेव्हा तुम्ही विचलित होत नाही; पण आज एका गरीब मित्राच्या आगमनाची वार्ता मिळताच तुम्ही अन्नाचा घास सोडून अनवाणी पायांनी धावत सुटलात?"
 
तिने पुढे विचारले, "ज्या कृष्णाला जगातील कोणतेही संकट रडवू शकले नाही, अगदी गोकुळ सोडताना यशोदा मातेचे अश्रू पाहूनही ज्याचे डोळे पाणावले नाहीत, तो कृष्ण आज सुदामाचे ते जखमी पाय पाहून ढसाढसा रडला? इतके की, आपल्या अश्रूंनीच त्याचे पाय धुतले? केवळ मैत्रीपोटी तुम्ही त्याला त्रिलोकाचे ऐश्वर्य द्यायला निघालात?"
 
मैत्रीचा अथांग अर्थ
भगवान श्रीकृष्ण मंद हसले आणि भावूक स्वरात म्हणाले, "रुक्मिणी, तो केवळ माझा मित्र नाही, तो माझ्या बालपणाचा सखा आहे."
 
तेवढ्यात सत्यभामेने आपली शंका मांडली, "पण स्वामी, त्यांनी तर बालपणी गुरुमातेने तुम्हाला वाटून खायला दिलेले चणे चोरून खाल्ले होते ना? मग अशा मित्रासाठी इतकी माया का?"
 
श्रीकृष्ण गहिवरून म्हणाले, "सत्यभामे, सुदामाने ते चणे स्वतःच्या भुकेसाठी नाही, तर संपूर्ण सृष्टीच्या कल्याणासाठी खाल्ले होते. त्याला माहित होते की ते चणे शापित आहेत. जो कोणी ते खाईल, तो आयुष्यभर दरिद्री राहील, असा त्या ब्राह्मण स्त्रीचा शाप होता."
 
"सुदामाला वाटले की जर मी (कृष्ण) ते चणे खाल्ले आणि मी दरिद्री झालो, तर संपूर्ण जगच दरिद्री होईल. स्वतःचा मित्र आणि ही सृष्टी सुखी राहावी, म्हणून त्याने स्वतःहून दरिद्रतेचा स्वीकार केला. त्याने स्वतःच्या नशिबात दारिद्र्य ओढवून घेतले, जेणेकरून मी सुखी राहावे."
 
मैत्रीतील सर्वोच्च त्याग
रुक्मिणीच्या मुखातून शब्द फुटले, "केवढा मोठा हा त्याग!"
 
कृष्ण पुढे म्हणाले, "रुक्मिणी, तो ब्राह्मण आहे, आणि खऱ्या ब्राह्मणाच्या ठायी जनकल्याणाची भावना ओतप्रोत भरलेली असते. गोकुळ सोडताना मी रडलो नाही, कारण माझ्या रडण्याने मातेचे प्राण व्याकुळ झाले असते. पण आज सुदामाच्या पायांतील ते काटे, त्या जखमा पाहून माझे हृदय पिळवटून निघाले. त्याचे हे हाल केवळ माझ्या कल्याणासाठी झाले आहेत."
 
ते अधिक भावूक होत म्हणाले, "या जगात प्रत्येकजण देवाकडे काहीतरी मागण्यासाठी येतो, पण सुदामा असा मित्र आहे ज्याने माझ्या सुखासाठी स्वतः कष्ट सोसले. अशा मित्राला त्रिलोकाची संपत्ती दिली तरी ती कमीच पडेल."
 
कक्षात बसलेल्या राण्यांचे डोळे पाणावले होते, तर दुसरीकडे कक्षाबाहेर उभे असलेल्या सुदामाच्या डोळ्यांतून आनंदाश्रूंच्या धारा वाहत होत्या. आपल्या सख्याने आपले 'चोरून चणे खाण्याचे' गुपित इतक्या पवित्र भावनेने जपले आहे, हे पाहून सुदामा कृतकृत्य झाला.
 
।। जय श्रीकृष्ण ।।
 
 
- सोशल मीडिया

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संत सेवालाल महाराज: बंजारा समाजाचे आराध्य दैवत आणि समाजसुधारक