Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री भक्तविजय अध्याय ४६

Webdunia
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीधेनुकासुरमर्दनाय नमः ॥     
आजि अमृतसिंधूसी भरतें आलें ॥ कीं ब्रह्मविद्येचें भांडार उघडलें ॥ कीं वासर मणीचें तेज भलें ॥ हृदयीं प्रकटलें श्रोतयांचें ॥१॥
नातरी शुद्धज्ञानाचें गुज ॥ कानीं अवचट पडिलें सहज ॥ कीं मोक्षयुक्तीचेंही बीज ॥ लाधलें आज निजभाग्यें ॥२॥
कीं हा मंत्रराज मंगळनिधी ॥ दैवदशेनें प्रकटला आधीं ॥ कीं वैराग्यविवेकाची बुद्धी ॥ भक्तकथेसंधीं पातली ॥३॥
नातरी शांतीचें निजसुख ॥ कींण विवेकवल्लीचें उगवलें रोप ॥ कीं आनंदसुखाचा हरिख ॥ प्रकटला देख भूमंडळीं ॥४॥
कीं वैराग्याची निरपेक्षता ॥ कीं भूतदयेची ही ममता ॥ कीं प्रेमआवडी तत्वता ॥ ते हे भक्तकथा रसाळ ॥५॥
कीं सायुज्यतेचें निजधाम ॥ कीं कीर्तनसुखाचें हें प्रेम ॥ कीं निर्विकल्प प्रकटला कल्पद्रुम ॥ कीं साधन निष्काम म्हणावें ॥६॥
मागिले अध्यायीं एकनाथ ॥ परीक्षा करूनि वाळिला गृहस्थ ॥ जेवीं पितळ तावितां अग्नींत ॥ काळें दिसत दृष्टीसी ॥७॥
कीं कसवटी लावितां सुवर्णासी ॥ डांकलग दिसे हीनकसी ॥ मग परीक्षक सोडून देती त्यासी ॥ नये मानसीं म्हणोनियां ॥८॥
नातरी वेश्येचें सुंदर गायन ॥ परी विरक्त तेथें न घालिती मन ॥ कीं राजमंदिरींचें वर्षासन ॥ पवित्र सज्जन न घेती ॥९॥
कीं एकचि शीत चांचपटोनी ॥ भात पाहती सुगरिणी ॥ तेवीं एकनाथें त्यास मागोनि पाणी ॥ कुचर निजमनीं ओळखिला ॥१०॥
षोडशोपचारें नित्य पूजा ॥ सद्भावें अर्पित अधोक्षजा ॥ साहित्य द्यावयासी नाहीं दुजा ॥ हें गरुडध्वजा जाणवलें ॥११॥
म्हणे माझें पूजनीं अति आवडी ॥ एकनाथासी प्रीति लागली गाढी ॥ तरी निजांगें जाऊनि तांतडी ॥ कार्य लवडसवडी साधावें ॥१२॥
ऐसें बोलूनि द्वारकानाथ ॥ ब्राह्मणरूप धरूनि त्वरित ॥ प्रतिष्ठानीं येऊनि अनंत ॥ पुसे वृत्तांत लोकांसी ॥१३॥
जो अंतरसाक्ष चैतन्यघन ॥ ब्रह्मांडनिवासी जगज्जीवन ॥ तो एकनाथाचें पुसे सदन ॥ ठावें असोन अंतरीं ॥१४॥
म्हणे या ग्रामांत वैष्णववीर ॥ श्रीकृष्णपूजनीं अति सादर ॥ ब्राह्मणभोजन करी निरंतर ॥ तयाचें मंदिर कोणतें ॥१५॥
ऐसें बोलोनि घनसांवळा ॥ त्याचें मंदिरांत प्रवेशला ॥ नरनारी दाविती ते वेळां ॥ मग नमस्कार केला तयासी ॥१६॥
एकनाथासी म्हणे जगज्जीवन ॥ मी अनाथ परदेशी ब्राह्मण ॥ तुम्ही नित्य करितां ब्राह्मणसंतर्पण ॥ ती कीर्ति ऐकून मी आलों ॥१७॥
तरी मज वस्त्र अन्न घालावें पोटभरी ॥ मी येथेंच राहीन निरंतरीं ॥ सांगाल कार्य तें करीन सत्वरीं ॥ आळस अंतरीं न आणितां ॥१८॥
एकनाथ पुसती त्याकारण ॥ तुम्ही कोठें असतां कोण ॥ काय परिवार असे जाण ॥ नामाभिधान कोणतें ॥१९॥
ऐकोनि म्हणे रुक्मिणीपती ॥ मी एकला एकटा असें निश्चितीं ॥ पुत्र दारा आणि संपत्ती ॥ कांहींच नसती मजलागीं ॥२०॥
तुमचा प्रसाद सेवून येथें ॥ सेवा करावी अनन्याचित्तें ॥ ऐसा निजमनीं धरूनि हेत ॥ आलों त्वरित या ठायीं ॥२१॥
आणिक स्थळें पाहिलीं बहुत ॥ परी सांप्रत कोठें न रमे चित्त ॥ वचन ऐकोनि एकनाथ ॥ आश्चर्य करीत मानसीं ॥२२॥
म्हणे तुमची इच्छा असेल जरी ॥ तरी राहावें आमुचें मंदिरीं ॥ ऐसें ऐकतांचि श्रीहरी ॥ संतोष अंतरीं मानीतसे ॥२३॥
जो ब्रह्मादिकां पूज्यमान ॥ शिवादि करिती ज्याचें ध्यान ॥ तो लीलानाटकी जगज्जीवन ॥ ब्राह्मणजन जाहला कीं ॥२४॥
ज्याची कीर्ति वर्णितां चोखडी ॥ श्रुति पुराणें झालीं वेडीं ॥ तो गंगोदकें भरूनि कावडी ॥ लवडसवडी वाहातसे ॥२५॥
क्षीरसागरीं प्रभाकर बेट ॥ तेथें शेषशायी वैकुंठपीठ ॥ तो प्रातःकाळ होतांचि उठे ॥ देखासी कष्ट न मानितां ॥२६॥
अष्टांगयोगसाधनीं जाण ॥ योगी शिणती जयाकारण ॥ तो देवपूजेसी उपकरण ॥ सोज्ज्वळ उटोन देतसे ॥२७॥
सुकुमार सांवळा रुक्मिणीकांत ॥ सायुज्यदानी जगविख्यात ॥ तो सडासंमार्जन करूनि त्वरित । देवघर सारवीत निजांगें ॥२८॥
जयाच्या चरणापासूनि निश्चितीं ॥ प्रकट जाहली भागीरथी ॥ तो देवपूजेसी अग्रोदक प्रीतीं ॥ भरूनि श्रीपती ठेवीतसे ॥२९॥
अठ्ठ्यायशीं सहस्र ऋषी जाण ॥ सद्भावें ज्याचें करिती अर्चन ॥ तो ब्राह्मण होऊनि जगज्जीवन ॥ उगाळी चंदन निजप्रीतीं ॥३०॥
अष्टसिद्धि सकळ दासी ॥ जयासी ओळंगती अहर्निशीं ॥ तो हार गुंफोनि हृषीकेशी ॥ देवपूजेसी ठेवीतसे ॥३१॥
चंद्र सूर्य नक्षत्रराज ॥ ज्याचे योगें दिसती सतेज ॥ तो दीपक सरसावी अधोक्षज ॥ परी मनीं न लाजे सर्वथा ॥३२॥
सकळ सुरगण इंद्रादिक ॥ जयाचे म्हणविती आज्ञाधारक ॥ तो देवपूजेचे उपचार अनेक ॥ एकनाथासी देतसे ॥३३॥
कृष्णा म्हणोनि हांक मारितां ॥ तंव पुढें सादर होय अवचैता ॥ कोठेंही अंतर न पडे सर्वथा ॥ सावधानता सर्वकाळ ॥३४॥
चंदन देतसे उगाळून ॥ कोणी म्हणती श्रीखंड्या ब्राह्मण नगरवासी सकळ जन ॥ आश्चर्य मनीं करिताती ॥३५॥
म्हणती एकनाथाचें घरीं ॥ एक ब्राह्मण करितो चाकरी ॥ कांहीं वेतन न घेतां पदरीं ॥ अवघे भरोवरी करीतसे ॥३६॥
एकनाथासी न कळत ॥ मंदिरांत जाती द्वारकानाथ ॥ कांतेसीं धंदा करूं लागत ॥ उल्हासयुक्त निजप्रीतीं ॥३७॥
सडासंमार्जन पात्रें धुवून ॥ उशीर होतांचि करी घुसळण ॥ म्हणे कार्य सांगाया मजकारण ॥ संचोक मनीं न धरावा ॥३८॥
विलंब होतांचि घनसांवळा ॥ निजांगें झाडीत पाकशाळा ॥ साहित्य घेऊनि एकवेळां ॥ स्वयंपाकासी निघतसे ॥३९॥
होतां कार्याची आडाआडी ॥ आपण निजांगें द्विजांसी वाढी ॥ त्या अन्नासी अधिक लागे गोडी ॥ नवल परवडी अभिनव ॥४०॥
उदक वाढीत जगज्जीवन ॥ तें प्राशन करिती जंव ब्राह्मण ॥ तंव अभिनव गोडी त्याकारण ॥ विस्मितमन होताती ॥४१॥
उच्छिष्टें काढावया लवडसवडी ॥ त्या देवासी अत्यंत आवडी ॥ ओंचे खोवूनियां तांतडी ॥ अन्न सावडी निजहस्तें ॥४२॥
प्रीतीनें धरूनि पत्रावळी ॥ बाहेर टाकीत वनमाळी ॥ हस्त प्रक्षालूनि ते वेळीं ॥ भूमिका जळें धूतसे ॥४३॥
एकनाथाचीं मातापिता ॥ क्रमोनि गेलें आयुष्य सरतां ॥ तों एक वर्तली अभिनव कथा ॥ ते परिसा आतां भाविक हो ॥४४॥
एकदां पितृतिथी येतां जाण ॥ ब्राह्मणांसी दिधलें आमंत्रण ॥ म्हणे उदयीक तुम्हां पितृक्षण ॥ भोजनासी येणें निश्चित ॥४५॥
प्रातःकाळीं उठोनि सत्वरगती ॥ गृहांत करविली पाकनिष्पत्ती ॥ दीड प्रहर येतांचि निश्चितीं ॥ स्नानें सांगितलीं विप्रांसी ॥४६॥
मग जेथें श्रीकृष्ण ब्राह्मणजन ॥ तेह्तें साहित्यासी काय उणें ॥ धोतरजोडे दक्षिणा सुवर्ण ॥ द्विजांकारणें सिद्ध केलीं ॥४७॥
मग स्नान करूनि सत्वरगती ॥ एकनाथ आले मंदिराप्रती ॥ उपरीवरी जाउनि निश्चितीं ॥ धोत्रें वाळविती तेधवां ॥४८॥
तों अनामिक आणि त्याची कांता ॥ बिदीस झाडिती उभयतां ॥ पक्वान्नांचा सुवास तत्वतां ॥ आला अवचिता तयांसी ॥४९॥
मग अंत्यजासी कांता बोले उत्तर ॥ अन्नाचा सुवास येतसे सुंदर ॥ हें आपुल्यासी प्राप्त नव्हे साचार ॥ खातील द्विजवर भाग्याचें ॥५०॥
तेव्हां अनामिक म्हणे स्त्रियेसी ॥ तूं व्यर्थचि कासया लाळ घोंटिसी ॥ हें उष्ण पक्वान्न आपणासी ॥ आपुल्या जन्मासी लाधेना ॥५१॥
आजि याचें घरीं श्राद्ध जाण ॥ उच्छिष्टही टाकिती पुरोन ॥ तुवां नेणोनियां मूर्खपणें ॥ वासना मनीं धरियेली ॥५२॥
वृषभ गेला लग्नाप्रती ॥ तरी समर्थ कडबा त्यासी देती ॥ तेवीं पक्वान्नभोजन आपुलें संचितीं ॥ कोठोनि असेल निजकांते ॥५३॥
ऐसी परस्परें बोलतां वाणी ॥ एकनाथाच्या पडिली श्रवणीं ॥ मग खालीं उतरूनि तये क्षणीं ॥ कांतेलागोनि पुसत ॥५४॥
म्हणे अनामिक दोघें झाडिती ॥ त्यांणीं पक्वान्नभभोजन इच्छिलें चित्तीं ॥ तरी घरांत जाहली पाकनिष्पत्ती ॥ तें भोजन त्यांप्रति घालावें ॥५५॥
यावरी कांता बोलत ॥ अन्न तों निपजलें असे बहुत ॥ तरी मुलांलेंकरांसमवेत ॥ अतिशूद्र समस्त बोलवा ॥५६॥
दोघांसीच जरी घातलें भोजन ॥ तरी इतर अतृप्त राहतील जाण ॥ ते जाऊन सांगतील त्यांकारण ॥ मग येतील धांवून सकळिक ॥५७॥
तरी आधीं बोलावून सकळांप्रती ॥ भोजन घालावें सत्वरगती ॥ जनार्दन आहे सर्वां भूतीं ॥ तरी करावी तृप्ति अनामिकां ॥५८॥
मग बाहेर येऊन तत्काळ ॥ अंत्यज बोलाविले सकळ ॥ बिदीस बैसवून ते वेळ ॥ अति कळवळे निजमानसीं ॥५९॥
करावया ब्राह्मणपूजन ॥ गंधाक्षता पुष्पें सुमन ॥ साहित्य ठेविलें होतें करून ॥ तें केलें अर्पण अनामिकां ॥६०॥
शूद्रांहातीं पात्रें मांडवून ॥ तयांसी वाढविलें पक्वान्न ॥ घृत शर्करा शाका लवण ॥ बाहेर आणोन ठेविलीं ॥६१॥
जनीं जनार्दन आहे निश्चित ॥ हा भाव जाणोनि चित्तांत ॥ संकल्प सोडी एकनाथ ॥ भोक्ता कृष्णनाथ म्हणूनि ॥६२॥
ग्रास घ्या म्हणतां त्यांकारणें ॥ अनामिक सेविती पक्वान्नें ॥ मुलें लेंकुरें थोर लाहानें ॥ करिती भोजनें यथारुचि ॥६३॥
देखिला ऐकिला नव्हता कर्णीं ॥ तो रस लाधला त्यांलागूनी ॥ म्हणती धन्य एकनाथा तुझी करणी ॥ आम्हांलागोनि तृप्त केलें ॥६४॥
आम्ही अंत्यज यातिहीन ॥ देखिलें नव्हतें कधीं अन्न ॥ तूं दयावंत वैष्णव जाण ॥ केली आठवण जन्मवरी ॥६५॥
जें जें अपेक्षित ज्यांसी ॥ मागतां तैसेंच वाढी त्यांसी ॥ तृप्त केलें सकळिकांसी ॥ विडे समस्तांसी दीधले ॥६६॥
उरलें अन्न होतें घरीं ॥ तेंही घातलें त्यांचे पदरीं ॥ मग सडासंमार्जन करूनि मंदिरीं ॥ पात्रें झडकरी धूतलीं ॥६७॥
आणिक सामुग्री उदक देऊनी ॥ पाकासी घातल्या स्वयंपाकिणी ॥ पहिल्याहूनि दशगुणीं ॥ निपजलीं गृहीं पक्वान्नें ॥६८॥
ब्राह्मणांसी सांगितलीं होतीं स्नानें ॥ तयांसी कळलें हें वर्तमान ॥ कीं पितृक्षण ॥ घातलें भोजन अनामिकां ॥७०॥
विप्र होऊनि क्रोधायमान ॥ विचार करिती अवघे जण ॥ आजपासोनि या भ्रष्टाचें अन्न ॥ कोणीं न घेणें सर्वथा ॥७१॥
मग सकळ शास्त्रज्ञ झडकरी ॥ पातले एकनाथाचें घरीं ॥ सक्रोध होऊनि त्या अवसरीं ॥ कठोर शब्दें ताडिती ॥७२॥
म्हणती ऐक रे कर्मभ्रष्टा ॥ तुवां अघटित केल्या चेष्टा ॥ ब्राह्मण न जेवितांचि दुष्टा ॥ अंत्यजां आधीं पूजिलें ॥७३॥
आजि तुझे वडिलांची पितृतिथी देख ॥ ते काय होते अनामिक ॥ म्हणोनि अतिशूद्र पूजिले अनेक ॥ जे कां बुडवूनी ॥७४॥
तुझेनि योगें वर्णसंकर ॥ आतांचि होऊं पाहे सत्वर ॥ निजांगें मांडिला भ्रष्टाचार ॥ ब्राह्मण आचार बुडवूनी ॥७५॥
ऐसी ऐकोनि विप्रवाणी ॥ एकनाथ विनवी कर जोडोनी ॥ दुसरा स्वयंपाक तुम्हांलागोनी ॥ मंदिरीं करूनि ठेविला ॥७६॥
पहिला स्वयंपाक होता सदनीं ॥ त्याचा सुवास घेतला अंत्यजानीं ॥ तें उच्छिष्ट अन्न तुम्हांलागोनी ॥ कैशा रीतीं घालावें ॥७७॥
म्हणोनि तें त्यांसी अर्पोनि निश्चितीं ॥ दुसरा स्वयंपाक करविला प्रीतीं ॥ तरी क्षमा करूनि कृपामूर्ती ॥ करावी पितृतिथी पुनीत ॥७८॥
यावरी द्विज बोलती काय ॥ अजि तूं आमुचा अपमान केला आहे ॥ महायज्ञाचा पुरोडाश पाहें ॥ वायसा पुढें टाकिला ॥७९॥
कीं भागीरथीची कुपी जाण ॥ बहिर्भूमीसी दिधली लवंडोन ॥ किंवा राजकांतेचें जडित भूषण ॥ दासीस नेऊन दीधलें ॥८०॥
नातरी मैलागिरी शुद्ध चंदन ॥ त्याचें खरासी केलें लेपन ॥ कीं विष्णुपूजेच्या तुळसी जाण ॥ मसिदीस नेऊन वाहिल्या ॥८१॥
कीं अग्निहोत्रींचा कृशान झडकरी ॥ नेऊनी ठेविला गुडागुडीवरी ॥ सुधारस ओतिला राखेवरी । तरी वायांचि निर्धारीं गेला कीं ॥८२॥
तेवीं आम्हां न देतां भोजन ॥ अंत्यज पूजिले त्वां प्रीतीनें ॥ हें अनुचित केलें जाण ॥ लाविलें दूषण आपणासी ॥८३॥
ऐसें बोलोनियां त्वरित ॥ ब्राह्मण घालोनि गेले वाळीत ॥ एकनाथ होऊनि चिंताक्रांत ॥ बैसले निवांत ते समयीं ॥८४॥
तों घरीं कृष्णा ब्राह्मणजन ॥ श्रीखंड्या दुसरें नामानिधान ॥ तो म्हणे एकनाथाकारण ॥ उद्विग्न मन कासया ॥८५॥
आजि पितृतिथि आहे घरीं ॥ म्हणूनि चिंता सर्वथा न करीं ॥ तुमचे पितर साक्षात झडकरी ॥ येतील सत्वरीं जेवावया ॥८६॥
पाकसिद्धि झालिया घरांत ॥ पात्रें घालावीं तुम्हीं त्वरित ॥ एकनाथ जाहले हर्षयुक्त ॥ आश्चर्य करीत मानसी ॥८७॥
नानापरीं पक्वान्न ॥ धृत शर्करा वाढिलीं जाण ॥ आगतं म्हणतां निजमुखेंकरून ॥ तों पितर येऊन बैसले ॥८८॥
अर्ध्यपाद्यपूजा करून ॥ पूगीफल गोपीचंदन ॥ यज्ञोपवीत सकळांसी देऊन ॥ हिरण्य दक्षिणा दिधली ॥८९॥
ब्रह्मार्पण सांडितांचि एकनाथ ॥ साक्षात पितर बैसले जेवित ॥ जें जें अन्न जयासी रुचत ॥ तें तें भक्षिती निजप्रीतीं ॥९०॥
जनार्दनपायीं भाव धरिला ॥ तो पितृस्वरूपीं प्रकटला ॥ एकनाथासी आनंद वाटला ॥ कीं दृष्टीसी देखिला पितृलोक ॥९१॥
तृप्त जाहलिया पितृपंक्ती ॥ करशुद्धि दिधली तयांप्रती ॥ विडे दक्षिणा देऊनि प्रीतीं ॥ एकनाथ पुसती तयांसी ॥९२॥
शेष उरलें आहे अन्न ॥ काय करावें यालागून ॥ इष्टांसमवेत करावें भोजन ॥ उत्तर दिधलें तयांनीं ॥९३॥
तंव ब्राह्मण द्वारीं उभे राहूनी ॥ हे शब्द ऐकिले त्यांणीं श्रवणीं ॥ कवाडें उघडोनि तये क्षणीं ॥ आंत येऊनि पाहाती ॥९४॥
तंव साक्षात पितर येऊन जेविले ॥ यांस देखतांचि अदृश्य जाहले ॥ सकळ द्विजांसी आश्चर्य वाटलें ॥ नवल देखिलें म्हणोनि ॥९५॥
मग ब्राह्मण बाहेर जाऊनि त्वरित ॥ एकमेकांसी उत्तरें बोलत ॥ मानवी नव्हे हा एकनाथ ॥ अवतार साक्षात विष्णूचा ॥९६॥
आपण धरूनि कर्माभिमान ॥ वायांच करितों याचें छळण ॥ परी तयासी साह्य श्रीकृष्ण ॥ जाहला प्रसन्न निजनिष्ठें ॥९७॥
तयासी संकट पाहतां सहज ॥ तत्काळ पावे गरुडध्वज ॥ पितर साक्षात जेवविले आज ॥ आणिली लाज आपणांसी ॥९८॥
एक म्हणती पक्वान्नें नाना ॥ आणि हातींची गेली दक्षिणा ॥ पुढें होणार तें कळेना ॥ बोल प्राक्तना ठेवावा ॥९९॥
आतां उदयीक जाऊनि अवघे त्वरित ॥ एकनाथासी सांगावी नीत ॥ कीं आतां घेऊनि प्रायश्चित्त ॥ स्वयातींत असावें ॥१००॥
येरवींच तयासी पवित्र म्हणतां ॥ तरी आपुली गेली व्यर्थ अहंता ॥ तरी दंड करूनि एकनाथा ॥ लावावा मागुता सत्कर्मीं ॥१॥
दुसरे दिवसीं द्विजवर सकळ ॥ वाळुवंटीं गोळा जाहले तत्काळ ॥ मग एकनाथासी ते वेळ ॥ पाचारिलें तेधवां ॥२॥
ब्राह्मणांसी देखोनि नयनीं ॥ नमस्कार केला ते क्षणीं ॥ म्हणे कोणता हेतु धरून मनीं ॥ मज स्वामींनीं बोलाविलें ॥३॥
यावरी द्विज बोलती वचन ॥ तुज न कळतां घडलें दूषण ॥ आतां विधियुक्त प्रायश्चित्त घेऊन ॥ द्यावा मान वेदवचना ॥४॥
ऐकोनि म्हणे एकनाथ ॥ मी सर्वथा न घें प्रायश्चित्त ॥ मायबाप असतां श्रीकृष्णनाथ ॥ कैसें विपरीत करावें ॥५॥
ब्राह्मण म्हणती यथार्थ पाहीं ॥ परी आमच्या वचनासी मान देई ॥ प्रायश्चित्त घेतल्याविण नाहीं ॥ शुद्धता देहीं सर्वथा ॥६॥
मग गंगेंत स्नान घालूनि त्वरित ॥ एकनाथासी देती प्रायश्चित्त ॥ भस्म गोमय लावूनि त्वरित ॥ मंत्र वेदोक्त म्हणताती ॥७॥
तों त्र्यंबकेश्वराहूनि तेथ ॥ एक ब्राह्मण आला अकस्मात ॥ लोकांप्रति काय बोलत ॥ कोणता एकनाथ मज सांगा ॥८॥
त्याच्या सर्वांगासी जाहलें कुष्ठ ॥ तिळप्राय आंग नसे नीट ॥ ऐसें रूप देखोनि दुष्ट ॥ सांगती स्पष्ट तयासी ॥९॥
पैल तो उदकांत प्रायश्चित्त घेत ॥ त्यासीचि म्हणती एकनाथ ॥ कैसियास्तव पुससी त्यातें ॥ सांग त्वरित आम्हांसी ॥११०॥
यावरी बोले कुष्ठी ब्राह्मण ॥ म्यां त्र्यंबकीं केलें अनुष्ठान ॥ मग शंकरें दृष्टांत दाखवून ॥ येथ पाठवून दीधलें ॥११॥
मज सांगत उमाकांत ॥ कीं पैठणीं एकनाथ विष्णुभक्त ॥ तेणें अनामिक जेवविले बहुत ॥ होती पितृतिथ ते दिवशीं ॥१२॥
तें पुण्य आहे त्याचे पदरीं ॥ तरी तूं जाऊनि तेथ सत्वरीं ॥ तो किंचित पुण्य देईल जरी ॥ कुष्ठ सत्वरीं जाईल ॥१३॥
हें स्वप्न होतांचि त्वरित ॥ मी तत्काळ धांवत आलों येथ ॥ वचन ऐकोनि द्विज समस्त ॥ आश्चर्य करीत मानसीं ॥१४॥
ब्राह्मण टाकोनि अंत्यज जेवविले ॥ हें पुण्य कोण्या शास्त्रीं बोलिलें ॥ एक म्हणती असत्य भलें ॥ धरणें उठविलें शंकरें ॥१५॥
एक म्हणती उगेचि बैसा ॥ हातींच्या कंकणासी काय आरसा ॥ एकनाथाचा भाव कैसा ॥ निवडेल आपैसा ये समयीं ॥१६॥
मग कोडी जाऊनि गंगेआंत ॥ एकनाथासी काय बोलत ॥ एका अनामिकाचें सुकृत ॥ शंकरें देवविलें मजलगीं ॥१७॥
अवश्य म्हणोनि तये क्षणीं ॥ त्याचे हस्तावरी घातलें पाणी ॥ सकळ ब्राह्मण तटस्थ होऊनी ॥ कौतुक नयनीं पाहाती ॥१८॥
तों नेत्रांसी न लागतां पातीं ॥ सुंदर झाली कोडियाची कांती ॥ हें कौतुक देखोनि समस्तीं ॥ आश्चर्य केलें मनांत ॥१९॥
म्हणती कर्माचा धरिला अभिमान ॥ तेणेंचि नाडलों आम्ही जाण ॥ विष्णुभक्तासी प्रायश्चित्त देणें ॥ हेंचि दूषण आपल्यासी ॥१२०॥
एकनाथासी म्हणती द्विजवर ॥ तूं केवळ विष्णूचा अवतार ॥ सर्वथा नव्हसी मानववीर ॥ कळलें साचार आम्हांसी ॥२१॥
हिमालयासी न लगे विंझणवारा ॥ प्रावरण न लगेचि अंबरा ॥ स्नान न लगेचि वैश्वनरा ॥ तेवीं वैष्णववीरा निर्मळ तूं ॥२२॥
अमृता न लगे पाककरण ॥ उदधीसी कासया तीर्थाटन ॥ तेवीं तुजला प्रायश्चित्त न लगेचि जाण ॥ आम्हांकारणें समजलें ॥२३॥
तुवां अघटित दाविली करणी ॥ साक्षात पितर जेवविले आणोनी ॥ हे देखिलें ऐकिलें नव्हतें कोणीं ॥ तें प्रत्यक्ष नयनीं दाविलें ॥२४॥
मग एकनाथासी धरूनि हातीं ॥ गृहासी आले सत्वरगती ॥ म्हणती तुज साह्य रुक्मिणीपती ॥ निश्चयें चित्तीं कळों आलें ॥२५॥
द्विजांसी अर्पोनि दक्षिणा ॥ तीर्थ मस्तकीं वंदिलें जाणा ॥ ते जाऊनि आपुल्या सदना ॥ आश्चर्य मना करिताती ॥२६॥
म्हणती धन्य हा विष्णुभक्त ॥ ब्राह्मणसेवेसी अति निरत ॥ देवतार्चन विधियुक्त ॥ प्रेमभावें करीतसे ॥२७॥
यापरी पेठणींचे लोक समस्त ॥ कोणी निंदीत कोणी स्तवीत ॥ परी एकनाथ सदा संतोषयुक्त ॥ हर्षशोकांत पडेना ॥२८॥
तों एक ब्राह्मण जाऊनि द्वारावती ॥ तप करी अनुतापयुक्ती ॥ म्हणे मज भेटावा रुक्मिणीपती ॥ धरिला चित्तीं हेत पूर्ण ॥२९॥
मग स्वप्नांत येऊनि राधा रुक्मिणी ॥ काय सांगती त्यालागोनी ॥ द्वारकेंत नाहींत चक्रपाणी ॥ तूं जाईं येथोनि सत्वर ॥१३०॥
गंगातीरीं प्रतिष्ठानांत ॥ वैष्णणभक्त एकनाथ ॥ गंगातीरीं प्रतिष्ठानांत ॥ वैष्णवभक्त एकनाथ ॥ ब्राह्मणसंतर्पण नित्य करीत ॥ तुवां जावें निश्चित ते ठायीं ॥३१॥
कृष्णा श्रीखंड्या ब्राह्मणजन ॥ द्वादश वर्षें राहिला जाण ॥ तो साक्षात् परब्रह्म नारायण ॥ तरी घ्यावें दर्शन तयाचें ॥३२॥
निजभक्ताची सेवा करित ॥ तेथेंच बैसलां वैकुंठनाथ ॥ आमुची कदा न करी मात ॥ तरी आणावें त्वरित जाऊनि ॥३३॥
ऐसा दृष्टांत ऐकोनि कानीं ॥ ब्राह्मण हर्षला स्वमनीं ॥ मग प्रतिष्ठानासी येऊनी ॥ लोकांप्रति पुसत ॥३४॥
येथें एकनाथ वैष्णवभक्त ॥ ब्राह्मणसेवनीं अति निरत ॥ त्याचें मंदिर दावा त्वरित ॥ ऐसें बोलत चालिला ॥३५॥
पुसतपुसत ते अवसरीं ॥ ब्राह्मण पातला त्याचें मंदिरीं ॥ तापसी देखतांचि सत्वरीं ॥ नमस्कार करी एकनाथ ॥३६॥
बैसावया दिधलें आसन ॥ म्हणे कोठोनि झालें जी आगमन ॥ कवण कवण तीर्थाटन ॥ आलेति हिंडोन या ठाया ॥३७॥
यावरी तापसी बोले वचन ॥ कृष्णा श्रीखंड्या ब्राह्मणजन ॥ त्याचें घ्यावया दर्शन ॥ आलों धांवोन या ठाया ॥३८॥
एकनाथ म्हणती ते अवसरीं ॥ उदकासी गेला गंगातीरीं ॥ तुम्ही स्वस्थ बसावें निमिषभरी ॥ येईल सत्वरी या ठाया ॥३९॥
तों खांदीं कावड घेऊनी ॥ वाड्यांत आले चक्रपाणी ॥ तापसियासी देखतां नयनीं ॥ संकोच मनीं वाटला ॥१४०॥
म्हणे द्वादश वर्षेंपर्यंत ॥ मी आनंदयुक्त होतों येथ ॥ हा कोठोनि पातला ऋणायित ॥ देखिला अवचित या ठाया ॥४१॥
ऐसें म्हणोनि वैकुंठनाथ ॥ मनीं जाहले चिंताक्रांत ॥ तों नवल वर्तलें अद्भुत ॥ तें परिसा निजभक्त भाविक हो ॥४२॥
एकनाथ म्हणे तापसियासी ॥ कृष्णा ब्राह्मण पहा दृष्टीसीं तेणें सत्वर उठोनि वेगेंसीं ॥ मिठी चरणांसी घातली ॥४३॥
मग कावड घेऊनि जगन्नाथ ॥ सत्वर गेला देवघरांत ॥ घागरी खालीं ठेवूनि त्वरित ॥ अदृश्य जाहला ते ठायीं ॥४४॥
तापसी बाहेर वाट पाहात ॥ तंव परतोनि न येच रुक्मिणीकांत ॥ देवगृहांत जंव विलोकित ॥ तंव कोणीच तेथ दिसेना ॥४५॥
तेव्हां शोक करीत तये क्षणीं ॥ अंग टाकूनि दिधलें धरणीं ॥ म्हणे मज देखोनि चक्रपाणी ॥ गेला पळोनि लवलाहें ॥४६॥
हें दृष्टीस देखतां एकनाथ ॥ तापसियासी पुसे वृत्तांत ॥ म्हणे कां झालासी शोकाकुलित ॥ सांग त्वरित मजपासीं ॥४७॥
त्यानें सकळ वृत्तांत सांगोनी ॥ एकनाथाचे लागला चरणीं ॥ दोघेही सद्गदित होउनी ॥ एकमेकांसी भेटती ॥४८॥
एकनाथ म्हणे तापसियास ॥ धन्य तुमचें भाग्य विशेष ॥ दृष्टीं ओळखूनि जगन्निवास ॥ चरण सावकाश वंदिले ॥४९॥
आम्हीं न ओळखोनि देवा ॥ त्यापासूनि बहुत घेतली सेवा ॥ ऐसा अनुताप धरूनि जीवा ॥ एकनाथ केशवा आळवीतसे ॥१५०॥
म्हणे भक्तवत्सल दीननात ॥ तुवां बहुत कष्ट केले येथ ॥ मज न कळतां वृत्तांत ॥ घडला अनर्थ थोर हा ॥५१॥
तूं परम सुकुमार चक्रपाणी ॥ कावडी वाहिल्या अनवाणी ॥ खडे रुतले असतील चरणीं ॥ अघटित करणी हे केली ॥५२॥
द्वादश वर्षें जवळ असतां ॥ परी कांहींच नेणवे माझिया चित्ता ॥ ब्राह्मणवेष धरून अनंता ॥ कार्य नेणतां सांगितलें ॥५३॥
तूं ब्रह्मादिकांसी पूज्यमान ॥ सदाशिव चिंती तव चरण ॥ तो तूं स्वकरें उगाळूनि चंदन ॥ देत होतासी पूजेसी ॥५४॥
तापसी तप करूनि अवघड ॥ तुज लक्षिती वाडकोड ॥ एक तीर्थाटनें करिती गाढ ॥ परी दृष्टीपुढें न दिससी ॥५५॥
ऐसा दुर्लभ हृषीकेशी ॥ तुझें लाघव न कळे कोणासी ॥ येऊनि यशोदेचें उदरासी ॥ ते पुत्रपणें तुजसी लेखीतसे ॥५६॥
मग गोकुळ टाकूनि मथुरेसी जातां ॥ तेव्हां उमजलें तियेचें चित्ता ॥ तेवीं द्वादश वर्षें जवळी असतां ॥ मी नेणोंचि अनंता तुजलागीं ॥५७॥
ऐसा अनुताप धरूनि अंतरीं ॥ खेद करीत नानापरी ॥ तो प्रेमा वर्णितां सविस्तरीं ॥ तरी ग्रंथ विस्तारीं वाढेल ॥५८॥
एकनाथाची निजकांता ॥ परम भाविक पतिव्रता ॥ म्हणे देवाधिदेवा रुक्मिणीकांता ॥ तुज आम्हीं वृथा कष्टविलें ॥५९॥
तूं परम सुकुमार गोविंदा ॥ प्रातःकाळीं उठोनि करिसी धंदा ॥ आम्हीं केली अमर्यादा ॥ नेणतां मुकुंदा तुजलागीं ॥१६०॥
तूं सकळ देवांसी पूज्यमान ॥ आम्हांमागूनि करिसी भोजन ॥ नाहीं जाणिली भूक ताहान ॥ ऐसी मी अधम श्रीकृष्णा ॥६१॥
द्वादश वर्षेंपर्यंत निश्चितीं ॥ श्रीकृष्ण होता त्यांचे संगतीं ॥ तितुके गुण नित्य आठविती ॥ विस्तारें किती सांगावें ॥६२॥
यावरी एके दिवसीं एकनाथ ॥ निद्रित होते यामिनींत ॥ तों ज्ञानदेव येऊनि स्वप्नांत ॥ काय सांगत तयांसी ॥६३॥
तुवां अलकावतीस येऊन ॥ समाधि उघडोनि घ्यावें दर्शन ॥ तेथें अजानवृक्षाची मुळी जाण ॥ सन्निध येऊन लागेल ॥६४॥
ते एकीकडे लावूनि हातें ॥ मागुती समाधि बुजवी त्वरित ॥ ऐसें देखोनि एकनाथ ॥ जाहला जागृत तत्काळ ॥६५॥
मग अलकावतीस येऊन ॥ इंद्रायणीचें केलें स्नान ॥ सिद्धेश्वराचें घेऊनि दर्शन ॥ समाधि उघडोन पाहिली ॥६६॥
तों वज्रासन घालोनि सहज ॥ तेथें बैसले ज्ञानराज ॥ दिव्य स्वरूप दिसे तेजःपुंज ॥ उपमा न साजे तयासी ॥६७॥
नमस्कार करूनि ते वेळीं ॥ एकनाथ समाधींत न्याहाळी ॥ तों अजानवृक्षाची मुळी ॥ ज्ञानदेवाजवळी पातली ॥६८॥
ते निजकरें लागूनि एकीकडे ॥ मागुती समाधीचें लागिलें कवाड ॥ चुनेगच्चीनें बुजवोनि दृढ ॥ पूर्ववत दगड रचियेले ॥६९॥
तेव्हां अलकावती उजाड बहुत ॥ सिधासामुग्री न मिळे तेथ ॥ शिष्यसंप्रदायी जाहले क्षुधित ॥ तों पंढरीनाथ पावले ॥१७०॥
निजभक्तांची भूक ताहान ॥ निजांगें पुरवी जगज्जीवन ॥ तेथें वाणियाचें रूप धरून ॥ पाल देऊन बैसले ॥७१॥
हें दृष्टीसी देखोनि त्वरित ॥ चितीं हर्षले एकनाथ ॥ म्हणे व्यवसायी आले बाजारांत ॥ सामग्री विकत आणावी ॥७२॥
मग दोघे ब्राह्मण पाठवूनि झडकरी ॥ सर्व साहित्य घेतलें पदरीं ॥ म्हणती द्रव्य आणूनि देतों सत्वरी ॥ तुम्ही स्वस्थ अंतरीं असावें ॥७३॥
यावरी बोलती पंढरीनाथ ॥ आम्ही आजिचा दिवस आहों येथ ॥ तुम्ही स्वयंपाक करूनि त्वरित ॥ जेवा समस्त बिर्‍हाडीं ॥७४॥
एकनाथासी जाणतो आम्ही ॥ परी ते नोळखती मजलागोनी ॥ ते यात्रेसी आले ऐकोनी ॥ सामग्री घेऊनि मी आलों ॥७५॥
पाठमोरे होतां ब्राह्मणासी ॥ तों अदृश्य जाहले हृषीकेशी ॥ आश्चर्य वाटलें सकळांसी ॥ एकनाथासी सांगीतलें ॥७६॥
म्हणती आम्हांसी सामग्री देऊनी ॥ तत्काळ अदृश्य जाहला वाणी ॥ द्रव्यही न देतां त्यालागूनी ॥ जाहली करणी अद्भुत ॥७७॥
ऐसी ऐकोनियां मात ॥ एकनाथ झाले सद्गदित ॥ म्हणती आम्हांसाठी ॥ पंढरीनाथ ॥ शिणले बहुत वाटते ॥७८॥
मग पाकसिद्धी होतां जाण ॥ ब्राह्मणांसहित केलें भोजन ॥ ते दिवसीं रात्रीस राहून ॥ मांडिलें कीर्तन निजप्रेमें ॥७९॥
समाधीसी करूनि नमस्कार ॥ दुसरे दिवसीं निघाले सत्वर ॥ प्रतिष्ठनीं येऊनि साचार ॥ सप्रेम भजन करीतसे ॥१८०॥
एकनाथाची ऐसी स्थिती ॥ जनार्दनस्वरूप त्रिजगतीं ॥ तोचि व्यापक सर्वांभूतीं ॥ संशय चित्तीं न वाटे ॥८१॥
जनार्दनाचें लागतां ध्यान ॥ स्वयेंचि झाले जनार्दन ॥ तेथें कांहींचि न दिसे भिन्न ॥ जेवीं सरिताजीवन सागरीं ॥८२॥
कीं दीप प्रकाश दोघे जण ॥ नामें वेगळीं परी एकचि जाण ॥ तेवीं एकनाथ आणि जनार्दन ॥ नव्हती भिन्न सर्वथा ॥८३॥
कीं कर्पूर सुगंध एक पाहीं ॥ कीं द्रवत्व क्षरासी द्वैत नाहीं ॥ नातरी पुष्प मकरंद एके ठायीं ॥ निजप्रीतीनें नांदती ॥८४॥
तेवीं एकनाथ आणि जनार्दन ॥ समरस असती एकपण ॥ महीपति तयांसी अनन्य शरण ॥ वंदि चरण सद्भावें ॥८५॥
स्वस्ति श्रीभक्तीविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ षट्चत्वारिंशाध्याय रसाळ हा ॥१८६॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥
श्रीभक्तविजय षट्चत्वारिंशाध्याय समाप्त

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

देव दिवाळी कार्तिक पौर्णिमा पौराणिक कथा

Guru Nanak Jayanti 2024: नानक देव आणि कुष्ठरोगीची गोष्ट

Guruwar upay गुरुवार वारांचे उपवास आणि व्रत कैवल्य

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

पुढील लेख
Show comments