Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्रीसद्‍गुरुलीलामृत अध्याय तेरावा

Webdunia
॥ श्रीसद्‍गुरुलीलामृत ॥
अध्याय तेरावा
समास पहिला
 
मुखें बोलवी सद्‌गुरुबुद्धिदाता । अहंभार हा वाब्गवी कोण माथां ॥
जडो भावना रामदासीं सदा ती । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ १३ ॥
 
जयजयाजी मंगलमूर्ति । जयजय माय सरस्वती ।
आत्माराम सर्वांभूतीं । नमन करूं साष्टांगे ॥ १ ॥
नमो सद्‌गुरु परेशा । विराटरूपा विश्वेशा ।
मायबापा प्रकृतिपुरुषा । संतसज्जनां नमन असो ॥ २ ॥
धन्य सद्‌गुरुप्रसाद । केला न वचे अनुवाद ।
त्रिलोकीं दुर्मिळ मकरंद । गुरुपूत भृंग सेविती ॥ ३ ॥
पाहोन जी प्रसादगोडी । हरिहरादिक झालीं वेडी ।
घेतां जन्म बहुत कोडी । गुरुप्रसाद दुर्लभ ॥ ४ ॥
एक्या गुरुप्रसादाकारणें । योगयाग पुरश्चरणें ।
देहादि ममत्व सोडणें । दृढविश्वास गुरुवचनीं ॥ ५ ॥
प्रसाद जयावरी झाला । तो कृतकृत्य होवोनि गेला ।
जीवशिव भेद मावळला । ठायींचे ठायीं ॥ ६ ॥
गुरुप्रसाद परमामृत । सदा वांच्छी अमरनाथ ।
दुर्लभ दुर्मिळ अनंत । सुकृतेंही जोडेना ॥ ७ ॥
पुण्यपाप क्षय झाला । जीवात्म्याचा गोवा तुटला ।
तरीच सद्‌गुरुपदाला । पडेल मिठी ॥ ८ ॥
जडले ते तन्मय झाले । स्वस्वरूपानंदीं रमले ।
त्यांचे स्मरणें अनेक तरले । धन्यधन्य गुरुकृपा ॥ ९ ॥
गुरुकृपा होय जयासी । काव्य व्युत्पत्ति नको त्यासी ।
ज्ञान होय सर्वांशी । समाधान पूर्णत्वें ॥ १० ॥
निःसंदेह जें विज्ञान । तेंचि गुरूचें कृपादान ।
वेदशास्त्रां जेथें मौन । तेंचि स्वयें गुरुभक्त ॥ ११ ॥
अंध पंगु बहिरा मुका । परि सद्‌गुरूसी सलोखा ।
तया न गणावा फिका । साधुशिरोमणि ॥ १२ ॥
नरदेह सार्थक करावें । ऐसें घेतलें ज्याचे जीवें ।
तेणें हेंचि एक साधावें । अढळ लक्ष गुरुवचनीं ॥ १३ ॥
चित्तशुद्धि मनोजय । फलत्याग वासनाक्षय ।
शून्यावस्थेवरी विजय । गुरुपूतें मिळविला ॥ १४ ॥
श्रवण मनन अभ्यास समाधि । कुंडलिनी जे अमृत शोधी ।
ब्रह्मांड भेदून निरुपाधि । करी क्षणीं गुरुकृपा ॥ १५ ॥
स्थूल सूक्ष्म कारण । महाकारण विराट्‌ गहन ।
हिरण्यगर्भ अव्याकृति जाण । मूल प्रकृति कोश हे ॥ १६ ॥
ऐसें हें भ्रमबंधन । तत्काल जाय तुटोन ।
स्वस्वरूपानुसंधान । अखंड ऐक्य संचलें ॥ १७ ॥
रंकाचा होतो राव । जीवाचा होतो शिव ।
क्षणामाजीं हें अभिनव । सद्‌गुरुस्वरूप देखिलिया ॥ १८ ॥
सद्‌गुरुवीण जिणें पाहीं । सर्वथा श्लाघ्य होणें नाहीं ।
देव भक्ता ऐक्य कांहीं । प्रसादेविण होईना ॥ १९ ॥
सद्‌गुरुपदीं अनन्य । सर्वभावें जावें शरण ।
व्हावें दीनाहून दीन । तैं होय गुरुकृपा ॥ २० ॥
सद्‌गुरुपद शाश्वत । तेथें ठेवितां अखंड चित्त ।
देहादि ममता समस्त । गुरुचरणीं अर्पाव्या ॥ २१ ॥
सद्‌गुरुकृपेलागून । ब्रह्मांड मानावें हीन ।
जाणीव नेणीव विसरून । गुरुवचनीं विश्वास धरावा ॥ २२ ॥
तरीच होय गुरुकृपा । तरीच चुकती या खेपा ।
तरीच प्रकाश ज्ञानदीपा । अलक्षीं लक्ष विरेल ॥ २३ ॥
ऐसा सद्‌गुरुप्रसाद । आनंदाचा निजकंद ।
परा-उन्मनीहून शुद्ध । विद्ध करी वासना ॥ २४ ॥
नरदेहीं दक्षता गहन । तयामाजीं सन्मार्ग गहन ।
सन्मार्गीं अध्यात्म गहन । त्याहीवरि गुरुकृपा ॥ २५ ॥
भाविकां सदा सुफलित । इहपर पुरवी मनोरथ ।
गुरुकृपेवीण स्वार्थ । आन नेणे ॥ २६ ॥
सिद्ध साधक महानुभाव । जाणती हाच अभिप्राव ।
ना तरी कलीचा स्वभाव । वाग्जल्प विकल्प धरावा ॥ २७ ॥
सज्जनांसी युगधर्म । न पीडी संगतकर्म ।
युगनियंता श्रीराम । सर्वकाळ रक्षितसे ॥ २८ ॥
येणें परी कलियुगांत । अनेक होऊन गेले संत ।
जगदुद्धार हाचि हेत । धरोनियां अवतरले ॥ २९ ॥
तैसे ब्रह्मचैतन्य सद्‌गुरु । आम्हा अनाथांचें तारूं ।
तयांचा प्रसादविस्तारु । लीलाग्रंथी वर्णिला ॥ ३० ॥
निमित्तमात्र लेखक । स्फूर्तिरूप गुरुनायक ।
ऐसा हा प्रसाद देख । अत्यानंदें सेवावा ॥ ३१ ॥
स्थूलावरी राजसत्ता । स्थूलसूक्ष्मीं गुरुसत्ता ।
अखंड सूत्रें चालविता । एकला एक अलिप्त ॥ ३२ ॥
तयांचा दासासी प्रसाद । सद्‌गुरुलीला ही विशद ।
श्रवणमननें शुद्ध बोध । घेऊन सन्मार्गें चालावें ॥ ३३ ॥
संतचरित्र परम गोड । श्रवणें तृप्त वासनेची ओढ ।
करोनि देईल श्रद्धा जाड । साधकांसी सुनिश्चयें ॥ ३४ ॥
नास्तिकांचें बंड मोठें । साधका ने आडवाटे ।
नरदेहा येवोन करंटे । केले कितीएक ॥ ३५ ॥
तेणें पहावी सद्‌गुरुलीला । द्वादशाध्यायमंत्रमाळा ।
कीं हा द्वादशादित्यमेळा । अज्ञानतिमिर घालवी ॥ ३६ ॥
त्रयोदशीं ज्ञानरवि । शीघ्रचि होईल गोसावी ।
श्रवण मनन क्रिया बरवी । शुद्धांतकरणें केलिया ॥ ३७ ॥
कवण अध्यायापासूनि । कवण बोध घ्यावा मनीं ।
वंदन करोनि श्रीचरणीं । विशद करूं गुरुकृपें ॥ ३८ ॥
प्रथमाध्यायीं मंगलाचरण । गणेश-शारदा-स्तवन ।
मग सद्‌गुरुवंदन । साष्टांगभावें ॥ ३९ ॥
गण नामें इंद्रियें समस्त । तयांचा स्वामी गणनाथ ।
इंद्रियनिग्रह मूळ हेत । परमार्थी साधी निर्विघ्न ॥ ४० ॥
शारदा सुविद्या सद्बुतद्धि । असलिया परमार्थ साधी ।
अविद्या वैभवोपाधि । लावून फशी पाडील ॥ ४१ ॥
इंद्रियनिग्रह करोनि । सद्विद्यें शुद्धि साधोनि ।
शरण रिघतां गुरुचरणीं । समाधान पूर्णत्वें ॥ ४२ ॥
आधीं विद्या नाहीं पढला । आणि राजयापाशीं गेला ।
देईं म्हणे फडणविशीला । तरी तें निरर्थक ॥ ४३ ॥
आधीं विद्या शिकावी । तरी राजा स्वयें बोलावी ।
तैसें शम दम सुविद्या बरवी । असतां सद्‌गुरु भेटती ॥ ४४ ॥
क्षेत्र सोज्ज्वळ तयार झालें । मेघजळ मातीस आलें ।
तरी धांवून येती कृषीवलें । ज्ञानबीज रुजवाया ॥ ४५ ॥
नाशिवंत सांडोन समस्त । शाश्वत ध्यावे सद्‌गुरुनाथ ।
येथींचा जो गर्भितार्थ । विवरविवरों उकलावा ॥ ४६ ॥
गुरुगम्य मायानिरास । गुरुगम्य ज्ञानकळस ।
गुरुगम्य पूर्ण भक्तिरस । समाधान गुरुकृपा ॥ ४७ ॥
येथें आशंकेची उरी । पतिता कोण उद्धरी ।
गुरुभक्ति कैशापरी । करावी तेणें ॥ ४८ ॥
सद्‌गुरुपद शाश्वत । तेथें जावया कोण समर्थ ।
अंतर्बाह्य विषयें लिप्त । बहुतां जन्मापांसोनि । ४९ ॥
तयासि होतां संतभेटी । बुद्धि वळेल उफराटी ।
शमदमादि हातोटी । सुबुद्धि होय मानावा ॥ ५० ॥
याकारणें गुरुमूर्ति । सगुणरूपें अवतरती ।
दुष्प्राप्य वस्तु आयती । अभाग्याचे घरी रिघे ॥ ५१ ॥
धरितां तयाची कास । हळूंहळूं साधनास ।
लावोन मनोवृत्तीस । करिती शुद्ध ॥ ५२ ॥
मन बुद्धि विषयें लिप्त । तैंशाच कामना उठत ।
त्यांहून अन्य वाटे व्यर्थ । गोडी नुपजे निष्कामीं ॥ ५३ ॥
स्त्रिया पुत्र आणि धन । जगीं मान्यता सन्मान ।
देह गेह संरक्षण । इच्छिती हेंचि आवडी ॥ ५४ ॥
तयांच्या पुरुवोनि कामना । हळूंहळूं निष्काम भजना ।
लावोन करिती समाधाना । सद्‌गुरु संत समर्थ ॥ ५५ ॥
जैसीं लेकुरें हट्ट घेती । बाहुलीस जेवूं घालिती ।
माय करोन तैशा रिती । अर्भकामुखीं ग्रास घाली ॥ ५६ ॥
ऐसें मानत मानत साधनासी । लावोन चित्तशुद्धीसी ।
झालिया सद्‌गुरुकृपेसी । पात्र होय ॥ ५७ ॥
नूतन वधू गृहीं जातां । ठेवा न ये तिचे हातां ।
सुनीतीनें सेवा करितां । धनीण तेचि असे ॥ ५८ ॥
तैसे सद्‌गुरु आणि अज्ञान । भेटलिया होय समाधान ।
जरी साधनीं देह झिजवोन । गुरुवचनीं विश्वास धरील ॥
ऐसें सद्‌गुरुवंदन । तैसेचि संत सज्जन ।
परमार्थमार्गींची शिकवण । प्रत्यक्ष क्रियेनें दाविती ॥ ६० ॥
जैसा चाणाक्ष शेजारी । दक्षतेनें व्यवहार करी ।
संगतीं शिकती नानापरी । पाहोनिया आपेंआप ॥ ६१ ॥
ऐसे संत सज्जन । तयांचे धरितां चरण ।
वासना मागें वळोन । रामापायीं जडतसे ॥ ६२ ॥
इतुका साधावया स्वार्थ । देह पाहिजे परम पुनीत ।
मायबापें कारणीभूत । शुद्ध बीज रक्षाया ॥ ६३ ॥
मातेपरी ममता नाहीं । परि जारिणी घात करिते पाहीं ।
विपरीत बुद्धि सकलही । विपरीत क्रिया केलिया ॥ ६४ ॥
कुलवेली राहील शुद्ध । तरी बुद्धि करील भेद ।
मायोद्भ व संसारखेद । बहुत जन्मोजन्मींचा ॥ ६५ ॥
कुलाचार सांडूं नये । उपकारिया विसरूं नये ।
लीनता धरोनि उपायें । अधर्ममात्र त्यागावे ॥ ६६ ॥
आतां वंदूं श्रोतेजन । जे संतकथा भोक्ते गहन ।
श्रवणीं सुबुद्धि धरोन । शुद्धमानसें बैसले ॥ ६७ ॥
कोणा मिसें काये होणें । बुद्धि वक्तयासी देणें ।
पहा धृतराष्ट्राकारणें । ज्ञानचक्षूं संजया ॥ ६८ ॥
श्रोता मिळालिया सावध । वक्त्या सुचे बुद्धिवाद ।
श्रोता सुप्त आणि सुंद । असतां उल्हास होईना ॥ ६९ ॥
श्रोता असावा अर्थभोक्ता । श्रोता असावा शंकाघेता ।
निर्मत्सरी निरभिमानता । प्रेमळ आणि भाविक ॥ ७० ॥
ऐसें हें श्रोतृवंदन । पुढें देशकालवर्णन ।
उत्पत्तिस्थितीसि कारण । मूळमाया नाथिली ॥ ७१ ॥
भूत भूतांते प्रसवे । आपणहि नांदे त्यांसवें ।
भूतें भूतांसींच खावें । तेथील तेथें विलीन ॥ ७२ ॥
मूळमाया प्रकृतिपुरुष । पुरुषबिंब परमांश ।
बिंबध्यानें मायानिरास । करावा बिंबासहित ॥ ७३ ॥
जेथें जे निर्माण होतें । तेथेंचि तें लीन होतें ।
मातीस माती मिळते । ऐसे वदती सर्वत्र ॥ ७४ ॥
तैसें या मायेचे पोटीं । सत्त्वस्नेहें ज्ञानदिवटी ।
उजळितां जाळील ही मठी । मूल बापास मारील ॥ ७५ ॥
व्हावया सात्त्विक ज्ञान । देशकालादि साधन ।
सात्त्विक ज्ञानें समाधान । साच आहे ॥ ७६ ॥
राक्षसी मानवी आणि दैवी । त्रिविध माया जाणावी ।
फशीं पाडिते गोसावी । थोरथोर ॥ ७७ ॥
त्यांत एकचि ज्ञानबिंदु । समूळ आटवील भवसिंधु ।
भक्ति-उपासना-संबंधु । घडलिया सतत ॥ ७८ ॥
असो माया कैसी मोहविते । ज्ञान कैसें जागविते ।
हें पहावें जी निरुतें । अवतारमालावर्णनीं ॥ ७९ ॥
एकाची तों ऊर्ध्वगति । एकाची असे अधोगति ।
हे जाणोनियां श्रोतीं । उचित तेंचि घेत जावें ॥ ८० ॥
जरी पाहिजे उत्तम गुण । तरी संतचरित्र हें दर्पण ।
दाविलें पुढती पाहोन । अवगुण धुवोनि काढावे ॥ ८१ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते त्रयोदशाध्यायांतर्गतः प्रथमः समासः ॥
श्रीसद्‌गुरुचरणार्पणमस्तु ॥
 
अध्याय तेरावा
समास दुसरा
 
द्वितीयाध्यायीं ऐशी कथा । देशकालादि अनुकूल असतां ।
प्रयत्नें मानव ईशसत्ता । निःसंशय मिळवितसे ॥ १ ॥
कुल शील असतां भलें । तरीच ऐशी सत्ता चाले ।
वनीं जन्मती जंबूकपिलें । गज कैसे विदारित ॥ २ ॥
याकारणें कुल शील । राखावें अति निर्मल ।
विषयलालसेनें केवळ । घात न करावा पुढिलांचा ॥ ३ ॥
चतुरें पाया घातला । मध्यें आपणां भाग आला ।
तरी न ठेवावा ढिला । पुढिलांसी घातक ॥ ४ ॥
लक्ष्मीचा दु‍आंगी टोला । नीतीनें पाहिजे सोसला ।
येतां मदें धुंद केला । जातां तृष्णा मोह पाडी ॥ ५ ॥
प्रारब्धयोगें द्रव्य येतां । बहुत चाले त्याची सत्ता ।
तेणें जननिंदा दोषवार्ता । विसरोनि जोडी अधर्म ॥ ६ ॥
अथवा दैवें दारिद्र्य आलें । आणि वैराग्य नाहीं बाणलें ।
विषयतृष्णें व्याकुळ केलें । धर्माधर्म पाहवेना ॥ ७ ॥
असो संपत्ति अथवा विपत्ति । दोन्हीं ठायीं चित्तवृत्ति ।
शांत ठेवोनि नीति । राखितां बरें ॥ ८ ॥
परमार्थ साधावा मुख्यत्वें । प्रपंचहि करावा दक्षत्वें ।
लिंगोपंत-रावजींचीं तत्त्वें । सूक्ष्मपणें विवरावीं ॥ ९ ॥
सूर्योदय होईल पुढती । परि आधी प्रभा पैसावती ।
तैसे दृष्टांत डोहळे होती । शुभाआधीं शुभशकुन ॥ १० ॥
धर्मस्थापनेचे नर । केवळ कारणिक अवतार ।
परि वेश तैसा आचार । अंगीकारिती अत्यादरें ॥ ११ ॥
असो मानववेशांत । अवतार घेती सद्‌गुरुनाथ ।
सुकृतें फळा आली समस्त । गीता रावजी धन्य केले ॥ १२ ॥
सुपुत्र पित्याचा उद्धार । मोकळें करी स्वर्गद्वार ।
परि स्वर्गाहून जें पर । तेथें स्वयेंचि कष्टावें लागे ॥ १३ ॥
मायोद्भ व लोभ अहंता । नसताचि घालिती गोता ।
तेणें जीव सुखदुःखभोक्ता । होतो ऐसें जाणावें ॥ १४ ॥
बाळलीला तृतीयाध्यायीं । पहा कैसी नवलाई ।
सत्यज्ञाना नाश नाहीं । अनंत जन्म घेतलिया ॥ १५ ॥
प्रवृत्तिज्ञान नाशिवंत । जेथील तेथें लया जात ।
याकारणें निवृत्तिज्ञान सत्‌ । आत्महिता धरावें ॥ १६ ॥
नरदेहीं वसति थोडी । न भरे ब्रह्मयाची घडी ।
याकारणें शाश्वतजोडी । अतियत्नेंम साधावी ॥ १७ ॥
साखर शोधित मुंग्या जाती । तैसी बालपणींच वाढली महंती ।
आणिक एक धरा चित्तीं । मंत्रदीक्षा ॥ १८ ॥
आत्महित साधायासी । आचार कथिती देव ऋषि ।
अदूरदृष्टी निरर्थक त्यासी । मानोनि अव्हेर न करावा ॥ १९ ॥
वेदबीज मंत्रबीज । ज्ञानबीज धर्मबीज ।
वेल मुळीं वासनाबीज । शुद्ध भूमिके रुजलिया ॥ २० ॥
उपदेशक असावा ज्ञाता । अपरोक्षानुभवी पुरता ।
तरी घडे सार्थकता । उपासनाबळें ॥ २१ ॥
यांतील एकही असतां उणें । वैराग्य कदापी न बाणे ।
मां समाधान कोण जाणे । कैसें आहे ॥ २२ ॥
आचार शुद्ध विचार शुद्ध । भूमिका शुद्ध संगति शुद्ध ।
तरीच हें होईल साध्य । वेदगुह्य ॥ २३ ॥
परि कालधर्म उफराटा । ब्रह्मकर्मा दिधला फांटा ।
यास्तव ज्ञानियाच्या वाटा । शोधूं निघाले ॥ २४ ॥
अनुताप उपजला पोटीं । वैराग्य बाणलें उठा‍उठीं ।
परि मायबापांसाठीं । गृहस्थाश्रम आदरिला ॥ २५ ॥
मायबाप अधिदैवत । हेंहि दाविलें नेमस्त ।
आणि आपुलाहि स्वार्थ । साधावया कष्टले ॥ २६ ॥
एक असतां एक नाहीं । ऐसें असतें बहुतांठायीं ।
परि ज्ञानी सर्वत्र विदेही । जळीं राहोन कोरडा ॥ २७ ॥
तृतीयाध्यायाचें अंती । घराबाहेर निघाला गणपती ।
मायामोहाची गुंती । अल्पवयीं सोडविली ॥ २८ ॥
चतुर्थाध्यायींचा प्रसंग । दाविले विवेक वैराग्य ।
कैसा अनुताप तगमग । भरतखंड शोधिलें ॥ २९ ॥
सद्‌गुरु शिष्यातें परीक्षी । सच्छिष्य सद्‌गुरु लक्षी ।
अलिप्तपणे गरुडपक्षी । साध्य जैसा शोधितसे ॥ ३० ॥
उपमर्द कोणाचा न केला । वाद कोणासी न घातला ।
सूक्ष्मदृष्टीं जगताला । शोधूं लागले ॥ ३१ ॥
काम क्रोध दंभ अहंता । लोभ तृष्णा दुस्तर ममता ।
त्यजोनि विवेकवैराग्यें मलिनता । चित्ताची घालविली ॥ ३२ ॥
साधोनिया चित्तशुद्धि । लीन होतां गुरुपदीं ।
प्रसाद व्हावया अवधि । पळभरी नाहीं ॥ ३३ ॥
असो नामस्मरण तीर्थाटन । संतदर्शनें उपोषण ।
ऐसें करीत साधन । समाधान शोधिलें ॥ ३४ ॥
पंचमाध्यायप्रसंगीं । तुकाराम महायोगी ।
तेथें लीन सर्वांगीं । होवोनि केलें सार्थक ॥ ३५ ॥
सरिता सागरीं मिळाली । द्वैतभावना अवघी गेली ।
परि वळण लावावया केली । गुरुसेवा बहुविध ॥ ३६ ॥
निर्गुणीं व्हावें अनन्य । सगुणीं सगुणत्वें भजन ।
हेंहि दाविलें वळण । स्वयें सेवा करोनी ॥ ३७ ॥
ज्ञानें होती परमहंस । परि सगुणीं उदास ।
ऐशियानें जगतास । काय बोध होईल ॥ ३८ ॥
ऐसे बहुत साधु झाले । आपआपणापुरते तरले ।
परि ही नौका अखंड चाले । बहुतांसी तारक ॥ ३९ ॥
असो कठिण सेवा केली । गुरुमाय आनंदविली ।
कसासी वृत्ती न डगली । लेशमात्र अहर्निशीं ॥ ४० ॥
सुखासनीं सुग्रासभोजनीं । वेदान्त वदोनि म्हणती ज्ञानी ।
परि मायाकसोटी घर्षणीं । उतरणें कठिण आहे ॥ ४१ ॥
भ्याड बहु वल्गना करी । प्रसंग आल्या अंग चोरी ।
ऐसियानें माया आसुरी । मरणार नाहीं ॥ ४२ ॥
जगदुद्धार करावयासी । आज्ञापिती ज्ञानराशी ।
पोई घातली तृषितांसी । शांतवाया निःस्वार्थें ॥ ४३ ॥
अज्ञ सुज्ञ भेद इतुका । अज्ञ परार्थीं न वेचीं तुका ।
ज्ञानियाचा प्रपंच देखा । केवळ परहिताकारणें ॥ ४४ ॥
सहावियांत तीच कथा । प्रपंचीं दाविली विदेहता ।
नाना जीवां आश्रयदाता । इहपर सौख्य दाविलें ॥ ४५ ॥
निःस्वार्थें प्रपंच केला । घराचा देव्हारा बनविला ।
पाकगृहाची धर्मशाळा । केली समस्तांकारणें ॥ ४६ ॥
हजार येती हजार जाती । खाती पिती सुखी होती ।
मूढ ज्ञानी एका पंक्ती । बैसविले निरहंकारें ॥ ४७ ॥
तारक नामस्मरणासी । लाविले लहानथोरांसी ।
नाना प्रपंचव्याधींसी । दिधल्या दूर झुगारुनी ॥ ४८ ॥
संसारचक्रीं जे भ्रमले । आपत्तीनें कष्टी झाले ।
बहुत पीडतां कुरवाळिले । गुरुमाउलीनें ॥ ४९ ॥
अन्नदान सौख्यदान । त्याहीवरी ज्ञानदान ।
तेंहि परिसा सज्जन । सप्तमाध्यायीं ॥ ५० ॥
काळवेळा कठिण आली । सदसद्विवेक बुद्धि गेली ।
महामायेनें भुलविली । नानाप्रकारें ॥ ५१ ॥
इच्छामात्रें सकळ घडी । निमिषार्धें करी बिघडी ।
नाथिली परि कोडी । अनंत अगाध ॥ ५२ ॥
माया महान वटवृक्ष । शाखापल्लव गणितां लक्ष ।
बीजरूपें अनंत वृक्ष । शोधितां पुढतीं धांवतसे ॥ ५३ ॥
याची गणना होणें नाहीं । पाहिलें तेंहि शाश्वत नाहीं ।
अष्टधेचा कर्दम पाहीं । अनंत चमत्कृति मोहक ॥ ५४ ॥
मोहें भुलविला जनांस । परमार्थीं पाडिले ओस ।
शुद्ध ज्ञान लयास । जाऊं लागले ॥ ५५ ॥
माया सोडितां सुटेना । धरितां हातीं लागेना ।
इहपर कांहींच साधेना । मानवासी ॥ ५६ ॥
शुद्धज्ञानें मायानिरास । इहपर साधेल स्वहितास ।
ज्ञानरूप सद्‌गुरु परेश । पाहोन चरणीं लागावें ॥ ५७ ॥
यास्तव सद्‌गुरुओळख । कथिली परिक्षा निष्कलंक ।
काळवेळ पाहोनि देख । व्यवहारसाधन कथियेलें ॥ ५८ ॥
स्वल्प परि अर्थें जाड । कथन केलें गुह्य गोड ।
अनुभवज्ञान नव्हे वाड । शब्दावडंबर निरर्थक ॥ ५९ ॥
शब्दज्ञानी घरोघरी । अनुभवी क्वचित् गिरिगव्हरीं ।
उथळ जळा खळखळ भारी । डोह शांत गंभीर ॥ ६० ॥
सप्तमाध्याय करोनि पठण । ठेवितां तैसें आचरण ।
दुस्तरकाळीं भवतरण । होईल जाणा निश्चयें ॥ ६१ ॥
क्रिया करोनि दाविली । तीच जनां उपदेशिली ।
रसाळ मधुर फळें आलीं । तीं कथिलीं अष्टमीं ॥ ६२ ॥
इति श्रीसद्‍गुरुलीलामृते त्रयोदशाध्यायांतर्गतः द्वितीयः समासः ॥
॥ श्रीसद्‍गुरुचरणार्पणमस्तु ॥

अध्याय सहावा
समास तिसरा
 
सद्‌गुरुपदीं लागतां । अनन्यभावें सेवा करितां ।
भवसिंधु होईल तरता । सच्छिष्य जाणावा ॥ १ ॥
शिष्य सद्‌गुरु होईल । भेद मुळींचा विरेल ।
मानव करणी कराल । तरीच होय जगदात्मा ॥ २ ॥
कलीं परमार्थ गहन । म्हणोन न व्हा उदासीन ।
प्रयत्नेंर प्राप्त निधान । दुर्लभ तेंचि साधावें ॥ ३ ॥
कोणी म्हणती संचित नाहीं । संचित पूर्वठेवा पाहीं ।
कष्टें सांठविला जिहीं । तयांसीच तो लाभतसे ॥ ४ ॥
एवं प्रयत्नव हेंचि सार । सत्संग तयासि आधार ।
येणेंचि तरले नर । तरती, पुढें तरतील ॥ ५ ॥
लहानथोर कथिले भक्त । जे जे गुरुपदांकित ।
एक वस्ति दों वसति जात । कोणी पावले मुक्कामीं ॥ ६ ॥
मार्ग चालूं असतां कांही । इच्छित ठाव दुर्लभ नाहीं ।
अडचणी गुंता पडतां पाहीं । गुरुमाय हात देतसे ॥ ७ ॥
मार्गीं देहादि वसति ठाव । उणें अधिक भोगी जीव ।
साधनी असावा उत्साह । उणें अधिक मानूं नये ॥ ८ ॥
गुरुभक्तांच्या जाती दोन । सकाम निष्काम करिती भजन ।
यास्तव थोर आणि सान । कथन केले अवधारा ॥ ९ ॥
परि श्रींची हातवटी । सकामिया नैष्कर्म्य पोटीं ।
बोधोन नेती उफराटीं । भाविकांसी निजपंथें ॥ १० ॥
जन्म हेंचि पातक गहन । तैशा वासनाही सघन ।
परि हंसदृष्टि जाण । क्षीर तितुकें सेविलें ॥ ११ ॥
आणिक एक जाणणें । लक्षांमाजी एक जाणे ।
क्वचित हातीं येईल केणें । सद्वस्तु कष्टसाध्य ॥ १२ ॥
तैसे समर्थांचे सेवक । असती जरी न्यूनाधिक ।
तरी वंद्यचि निःशंक । राजमुद्रे मोल चढे ॥ १३ ॥
असो ऐसें अष्टाध्यायीं । ठेवी प्रस्तुत पुण्याई ।
तेचि जडले गुरुपायीं । नमन करूं साष्टांगे ॥ १४ ॥
नवमाध्यायीं गोरक्षण । तैसेंचि कथिले अन्नदन ।
राममंदिरें स्थापून । सत्कर्मपोयी घातल्या ॥ १५ ॥
गोमाहात्म्य वर्णिले न वचे । इहपरहित मानवांचें ।
सद्धर्म आणि सुभिक्षेचें । साधन हें सभाग्य ॥ १६ ॥
अन्नदान अतिथीपूजा । परमसंतोष गरुडध्वजा ।
आदरें करोनि गुरुराजा । समस्तांसी बोधितसे ॥ १७ ॥
अन्नपूर्णा पाकशाळे । सदा दावी निजसोहळे ।
शतसहस्र येतांही निराळे । उणें पडों नेदीच ॥ १८ ॥
कुबेर राहे श्रींचे घरी । आले अतिथी आदरी ।
जेथें प्रत्यक्ष श्रीहरी । उणें काय त्या ठायां ॥ १९ ॥
ऋणमुक्त केले किती । मुंजी-विवाहां नसे मिती ।
धेनु बहुमोलें घेती । हिशेब कोणा कळेना ॥ २० ॥
जितुक्या येती सुवासिनी । खण देती तयांलागोनि ।
बालकां अंगीटोपी करोनी । प्रेमभरें बोळविती ॥ २१ ॥
ब्रह्मचारी संन्यासी । बैरागी तडीतापसी ।
वस्त्रें देती तयांसी । ज्याचे त्यापरी ॥ २२ ॥
तेथें नांदे गणपति । जो विद्यावंतांचा अधिपति ।
अनेकांच्या शंका फेडिती । साधार स्वानुभवें ॥ २३ ॥
भूतभविष्य जाणोनि । प्रत्युत्तर दे गुरुजननी ।
उणें अधिक चापपाणी । होवोंच नेदी ॥ २४ ॥
इतुक्या असोनिया कळा । वेष अत्यंत साधासरळा ।
अखंड शांतीचा जिव्हाळा । ऊर्मिरहित ॥ २५ ॥
बहुत येती निंदक । नीचोत्तरें बोलती अनेक ।
शांत राहोन गुरुनायक । समाधान करिती तयांचें ॥ २६ ॥
कांहीं धूर्त परीक्षूं येती । स्थिति पाहोन चकित होती ।
प्रेमभावें शरण निघती । धन्य साधु म्हणोनी ॥ २७ ॥
सामर्थ्य असोन लीनता । सर्वां भूतीं दयार्द्रता ।
अहंकार सारोनि परता । सानपणा आंगीकारिती ॥ २८ ॥
म्हणती ’आम्ही माणदेशी शेतकरी । रामदासी केवळ भिकारी ।
कुटुंबवत्सल संसारी । मुमुक्षुजन ॥ २९ ॥
लोकीं उठविलें बंड । साधुत्वाचें घेती कुभांड ।
येरवीं सर्व थोतांड । तुम्ही आम्ही सारखे’ ॥ ३० ॥
मूर्तिमंत ज्ञानघन । आदि-मध्यांत अविच्छिन्न ।
परि पांघरोन अज्ञान । पोरांसवें खेळती ॥ ३१ ॥
कुणबटासी कुणबट गोष्टी । करिती जुनाट मराठी ।
ज्ञान्यासी ज्ञानभेटी । भाविकासी भाविक ॥ ३२ ॥
योगाभ्यासियासी योग । षट्चक्रभेद अष्टांग ।
धमनित्रय भ्रमरमार्ग । दावोनि देती वायूचा ॥ ३३ ॥
सर्वज्ञासी काय उणें । जे जे येतील शहाणे ।
तितुकियांची समाधानें । करिती बहु आदरें ॥ ३४ ॥
असो ऐसीं बहुत चित्तें । शांतवोनि लाविलीं भक्तीतें ।
दुस्तर कलिमाजीं निरुते । उपकार केले अगणित ॥ ३५ ॥
दशम एकादशांत । हेंचि ध्यावें जी सतत ।
आणिक अवतार समाप्त । जाणा येथें वर्णिला ॥ ३६ ॥
बहुत जनां लाविला लळा । प्रेमतंतूचा जिव्हाळा ।
गुरुचि देव राउळा । मानोनि गळां पडतील ॥ ३७ ॥
ज्ञानचक्षु क्वचितांसी । ते जाणती गुरुपदासी ।
एरवीं सर्व सगुणासी । भजती भावभक्तिनें ॥ ३८ ॥
माय बाप सुत जाया । याहून श्रीचरणीं माया ।
देहत्यागीं शोकत्रस्त होतील बाया । नर आणि बालकें ॥ ३९ ॥
यास्तव दूर धाडिले । येत्यांसि अडथळे घातले ।
सगुणरूप लोपविलें । निर्गुणीं झाले विलीन ॥ ४० ॥
काशीपासोन रामेश्वर । बहुत करविला नामगजर ।
असंख्य तारिले नर । ख्याती झाली चहूंदेशी ॥ ४१ ॥
आणिक एक कार्य केलें । देशासि जें दौर्बल्य आलें ।
पारतंत्र्यें विकळ केलें । पिळपिळोनी काढिलें ॥ ४२ ॥
यासी सबळ कारण । पाप भरलें अतिगहन ।
दुःखमूळ दुरित जाण । श्रुतिस्मृति बोलती ॥ ४३ ॥
हरिस्मरणेंदुःखें जाती । हरिस्मरणें पापें जळती ।
याकारणें नामजपाप्रति । लाविले लक्षानुलक्ष ॥ ४४ ॥
शुद्ध भूमिका निर्मळ बीज । असलिया सुफळें येती सहज ।
तेंहि पुढें दिसेल काज । यथाकाळीं यथाक्रमें ॥ ४५ ॥
दशरथें तप केलें । तेव्हां रामचरण लाभले ।
भाग्यवान पुरुष झाले । शुद्धभूमिकेपासोनी ॥ ४६ ॥
असो पुढील कार्य जें होणें । तें एक श्रीगुरु जाणे ।
लखोटा लिहूनियां जेणें । ठेविला स्वहस्तींचा ॥ ४७ ॥
पक्कें मोर्तब करोनि । वरि लिहिलें श्रींनी ।
मजवांचोनिया कोणी । फोडूं नये लखोटा ॥ ४८ ॥
दुरितनाश कार्यकारण । तप करविलें नामस्मरण ।
इहपरहित करोन । समाधिस्थ जाहले ॥ ४९ ॥
द्वादशाध्यायीं समाधीवर्णन । कथिलें परिसा जी सज्जन ।
जेणेंयोगें समाधान । वैराग्ययुक्त होतसे ॥ ५० ॥
ब्रह्मचैतन्य परात्पर । अखंड अक्षय चरचर ।
संचले रितें अणुभर । स्थान पाहतां गवसेना ॥ ५१ ॥
त्यांही विशेष स्थानें । परिसा जी सद्‌गुरुवचनें ।
गुरुवचनीं विश्वास धरणें । निजकर्तव्य शिष्याचें ॥ ५२ ॥
अखंड वास भक्त हृदयीं । जेणें चित्त अर्पिलें गुरुपायीं ।
नामजप जेथें पाही । तेथें वास श्रीगुरूंचा ॥ ५३ ॥
जेथें नामोत्साह चालती । आदरें प्रसाद अर्पिती ।
तेथें वास गुरुमूर्ती । न्यून पडो देईना ॥ ५४ ॥
संकटकालीं भक्तीनें । बाहती श्रींसी करुणावचनें ।
तया स्थळीं धांवोनि जाणें । श्रीगुरु मायबाप ॥ ५५ ॥
सच्छिष्य जेथे स्थापना करी । अनंत भावना एकसरी ।
जडल्या तेथें भक्तकैवारी । वसती नित्य निर्लिप्त ॥ ५६ ॥
जेथें श्रींच्या पादुका । भक्त पूजिती भावें देखा ।
तेथे वास गुरुनायका । साच साच जाणावा ॥ ५७ ॥
मायबापांची करितां सेवा । तेथें गुरूंसी विसावा ।
आणिक प्रकार परिसावा । गुरुभक्तांचे संगमीं ॥ ५८ ॥
सद्‌गुरुलीला जेथें वर्णिती । लिहिती वाचिती पूजा करिती ।
भक्तिभावें सेवा करिती । साह्य तयांसी सर्वदा ॥ ५९ ॥
गोंदावलींची मुख्य स्थानें । परिसा जी निर्मलमनें ।
’शेजगृहीं असे माझें नित्य राहणें’ । ऐसें वदले आम्हां श्रीगुरु ॥ ६० ॥
समाधि साक्षात्‌ गुरुरूप । प्रगट गुप्त भेद अल्प ।
अनेकांचा हरती ताप । साक्षात्कार घडोघडी ॥ ६१ ॥
अनेकांच्या कामना पुरती । कित्येकांसी ज्ञानप्राप्ति ।
अनेकां साधनें सुचविती । यथाक्रम यथान्याय ॥ ६२ ॥
दर्शनें सकलां होय समाधान । जेवीं प्रत्यक्ष दर्शन ।
येविषयीं स्वानुभव जाण । कथन करूं तुम्हांसी ॥ ६३ ॥
श्रींनी केला देहत्याग । वियोगें जाहला उद्वेग ।
समाधिदर्शनें अभंग । गुरुमाय भेटली ॥ ६४ ॥
वरी जीं जीं कथिली स्थानें । अनुभवियां खूण बाणे ।
कांहीं दृष्टांत इतरांकारणें । कथन करूं अवधारा ॥ ६५ ॥
समाधीचे तिसरे दिवशी । अनुग्रह दिधला द्रविडांसी ।
दृष्टांतहि बहुतांसी । होती बहुविध प्रकारें ॥ ६६ ॥
वाराणसीं विप्रबाळ । बुडतां आठवी गुरु दयाळ ।
हात देवोनि तीराजवळ । आणोनि जीव वांचविला ॥ ६७ ॥
जालनेकरांचे जामात । पांडुरंगबुवा परम भक्त ।
बदरीनारायण तीर्थाप्रत । जाऊन मागें परतले ॥ ६८ ॥
तेव्हां हृषीकेशाचें दर्शन । पुढें चट्टी सत्यनारायण ।
तेथें घोर कानन । व्याघ्र मार्गीं आड आला ॥ ६९ ॥
गुरगुर करी वांकुल्या दावी । अत्यंत भय वाटलें जीवीं ।
तेव्हां आठविले गोसावी । ब्रह्मचैतन्य सद्‌गुरु ॥ ७० ॥
शरणागता अभयदाते । साक्षात्‌ प्रगट झाले तेथें ।
वदती ’व्याघ्र काय करील तूतें । शिरीं असतां रामराय’ ॥ ७१ ॥
असो व्याघ्र निघोनि गेला । ऐसा भक्तसंकटीं सद्‌गुरु धांवला ।
स्थिरचर व्यापून राहिला । जगदात्मारूपें ॥ ७२ ॥
आणिकहि बहुतांसी । साक्षात्कार बहुवसी ।
झाले परि ग्रंथासी । विस्तार होईल ॥ ७३ ॥
जैसा भाव तैसा देव । हाचि मुख्य अभिप्राव ।
अंतर्बाह्य गुरुराय । येत ना जातसे ॥ ७४ ॥
घटीं आकाश पाहिलें । तें गोलाकार भासलें ।
तैसे सद्‌गुरु नटले । भावनेसारिखे ॥ ७५ ॥
द्वादशाध्याय मुक्तामाला । त्रयोदश मेरु आगळा ।
गुरुकृपामृत जिव्हाळा । अखंड आकंठ पान करूं ॥ ७६ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते त्रयोदशाध्यायांतर्गतः तृतीयः समासः ॥
॥ श्रीसद्‍गुरुचरणार्पणमस्तु ॥
 
अध्याय तेरावा
समास चवथा
 
॥ श्रीसद्‌गुरु श्रीब्रह्मचैतन्यमहाराजाय नमः ॥
नमो पुरुषा गणपति । शारदा सुविद्या प्रकृति ।
नमो स्वयंसिद्ध ज्योति । चैतन्यब्रह्म ॥ १ ॥
नमो सकळ श्रोतेजन । धन्य तुमचे कृपादान ।
वारंवार प्रोत्साहन । देऊन ग्रंथ वदविला ॥ २ ॥
ग्रंथ लिहिण्याची स्फूर्ति । उपजली कोणे रिती ।
कोणपरीनें समाप्ति । जाहली ती परिसावी ॥ ३ ॥
घेतां श्रींनी समाधि । तीन संवत्सवें गेली अवधि ।
परि श्रीचरित्रासंबंधी । कोणी कांहींच बोलेना ॥ ४ ॥
श्रींचे शिष्य ज्ञानी । एकाहूनि एक द्विगुणी ।
प्राचीन अर्वाचीन दोन्ही । शास्त्रांमाजी प्रवीण ॥ ५ ॥
कांहीं अपरोक्षज्ञानी सिद्ध । जयांवरी सद्‌गुरुप्रसाद ।
अधिकारी मठपति प्रसिद्ध । संप्रदाय वाढविते ॥ ६ ॥
परि कारण तें वेगळें । कांहींनी लिहो आरंभिलें ।
तयां श्रीगुरु वदले । ’लिहूं नये कोणीहि ॥ ७ ॥
ग्रंथ लिहिणार वेगळा असे । तो लिहील अनायासें ।
उचित काळीं पहा खासें । तुम्ही स्थिर रहावें’ ॥ ८ ॥
ऐसी झाली मागें भाक । तेणें स्थिर सकल लोक ।
नातरी एकाहून एक अधिक । ज्ञानी चतुर गुरुभक्त ॥ ९ ॥
आणिक एक मुख्य कारण । आत्मश्लाघा निष्कारण ।
श्रवणीं न पडावी म्हणोन । आज्ञा न देती कवणासी ॥ १० ॥
तो काल निघोनि गेला । परि भाव तैसाचि उरला ।
आज्ञा नसे कवणाला । प्रसाद कोणा कळेना ॥ ११ ॥
कोणी प्रयत्नण करूं जातां । तया निवारिती सर्वथा ।
तुम्हांसि नसे पात्रता । पुण्यपुरुष पाहिजे ॥ १२ ॥
माहिती कोणा न देती । प्रसंग आल्याहि छपविती ।
स्फूर्तिदाते गुरुमूर्ति । दोष नसे कवणाचा ॥ १३ ॥
असो इतुक्याहि प्रसंगांत । आम्हां स्फूर्ति अवचित ।
झाली परि वदाया मात । वाव कोठें दिसेना ॥ १४ ॥
विद्या नाहीं दीक्षा नाहीं । सहवास बहुत केला नाहीं ।
वैभव मान्यता कांहींच नाही । स्फूर्ति मात्र दुणावली ॥ १५ ॥
श्रीसमाधीनंतर । ब्रह्मानंद भक्त थोर ।
गुरुरूप मानिती साचार । सकलहि गुरुभक्त ॥ १६ ॥
तयांसि कैसें पुसावें । सूर्यापुढती जैसे काजवे ।
स्वयें कैसें प्रकाशावें । श्लाघ्य नोहे ॥ १७ ॥
यास्तव चरित्रदिग्दर्शन । "नमस्कारत्रयोदशी" म्हणोन ।
श्लोक रचिले हेतु धरोन । चरित्र लेखनाचा ॥ १८ ॥
ते हरिदास यांचेकरवीं । दावोनि आज्ञा घेतली बरवी ।
तेणें प्रफुल्लता आली नवी । स्फूर्तीसि सिद्धवाक्यें ॥ १९ ॥
या‍उपरी औदासिन्य । माहिती‍अभावी आले गहन ।
गुरुभक्त न उघडिती वदन । तेंहि एकें दूर केलें ॥ २० ॥
कागवाडकर रामदासी । पत्र देती हरिदासांसी ।
उभयतां मिळोन मजसी । साह्य केलें मनोभावें ॥ २१ ॥
कांहीं ग्रंथ पाहिल्यावरी । प्रासादिक वदलीं सारीं ।
मग माहिती उपरि । कांहीं देवों लागले ॥ २२ ॥
गोखले उपनामी भले । लेखनसाहित्य त्यांनी केलें ।
बहुतीं प्रोत्साहन दिलें । वरी छाया गुरुकृपा ॥ २३ ॥
शके अठराशें चाळीस । पुण्यतिथि मार्गशीर्ष ।
ग्रंथारंभ गोंदावलीस । श्रीसन्निध जाहला ॥ २४ ॥
बुधग्रामीं साग्र लिहिला । श्रीकृपें पूर्ण झाला ।
अठराशें त्रेचाळिसाला । अर्पण केला गुरुचरणीं ॥ २५ ॥
श्रीकृपेचीं उत्तरें । वेडींवांकुडीं लिहिलीं बरें ।
सेवन करा क्षीरनीरें । हंसदृष्टि ठेवोनि ॥ २६ ॥
बहुत मतें एकवटोनी । कांहीं स्वानुभव घेवोनी ।
कथा लिहिल्या ग्रंथसदनीं । सत्य आणि निवडक ॥ २७ ॥
सद्‌गुरुलीला अनंत अपार । काव्य काय उतरील पार ।
कांही सत्य आणि साधार । असती त्या घेतल्या ॥ २८ ॥
क्वचित्‌ शब्द भेद झाला । तरी बाध न ये तत्त्वाला ।
तत्त्वदृष्टि घेऊन चाला । श्रोतेजन भाविकहो ॥ २९ ॥
घुगरदरे सोलापूरकर । श्रींचे आप्त आणि चतुर ।
यांनींहि चरित्र मधुर । गद्य लिहिलें श्रींचे ॥ ३० ॥
धीट पाठ प्रासादिक । करिती गद्यपद्यात्मक ।
श्रींचे दरबारीं अनेक । सेवाकरिती यथाशक्ति ॥ ३१ ॥
आरती सवाई अष्टक । पद अभंग आणि श्लोक ।
भूपाळ्या गद्येंहि अनेक । भक्त स्तविती श्रीगुरु ॥ ३२ ॥
कोकिळकंठ प्रेमळ वाणी । रूप लावण्य इंद्रियें देखणीं ।
कवित्वशक्ति चातुर्यखाणी । देणें भगवंताचें ॥ ३३ ॥
कांही असती उपजत ज्ञानी । एकपाठी असती कोणी ।
सरळ नासिका गौरवर्णी । देणें भगवंताचें ॥ ३४ ॥
राजयासी पुत्र झाला । आणि पांगुळाच निपजला ।
ही ईश्वरकरणी, तयाला । मानव बापुडें काय करी ॥ ३५ ॥
हिरण्यकश्यपूसि प्रल्हाद । हा ईश्वरी प्रसाद ।
सुरुरिपुच्या गृहीं शुद्ध । देवभक्त निपजला ॥ ३६ ॥
तैसें साधन ना भजन । नाहीं केलें शास्त्रध्ययन ।
परि गुरुकृपा गहन । देणें भगवंताचें ॥ ३७ ॥
कर्ता तो वेगळाचि असे । देहबुद्धि लावी पिसें ।
अहंकार माथां बैसे । अधोगतीसी न्यावया ॥ ३८ ॥
भाग्यें कामधेनू आली । तेणें संपत्ति दुणावली ।
कृपणत्वें खादाड दिसली । मग मांडिला विक्रय ॥ ३९ ॥
धेनु धन सकल गेलें । दैन्यवाणें उगाचि शिणलें ।
यास्तव देहबुद्धिवेगळें । साधकें असावें ॥ ४० ॥
तैसी ही प्रसादवाणी । लिहविता सद्‌गुरु धनी ।
गुरुबंधू आयतनीं । कथा कथिते ॥ ४१ ॥
लेखक द्विज चित्पावन । ऋग्वेद शाखा आश्वलायन ।
अत्रि गोत्र फडके म्हणून । उपनामें संबोधिती ॥ ४२ ॥
वासस्थान तासगांव । विष्णु यशोदा जनकदेव ।
गोपाल ऐसें वदती सर्व । तुम्हीं श्रोते जाणावें ॥ ४३ ॥
रामदासीबुवा ऐसें । सद्‌गुरुमाय संबोधीतसे ।
ग्रंथी निर्देश तोचि असे । श्रोतीं आक्षेप न धरावा ॥ ४४ ॥
वामनबुवा मठ मोरगिरी । सद्‌गुरुसेवा मागोन बरवी ।
शुद्ध लिपि लिहोनि सत्वरीं । बहुपरी साह्य केलें ॥ ४५ ॥
ग्रंथ नव्हे हा प्रचीन । ना ही सरणी अर्वाचीन ।
कोणा दिसे अधिकन्यून । तरी क्षमा असावी ॥ ४६ ॥
ग्रंथ नव्हे सुलभ गद्य । ग्रंथ नव्हे गूढपद्य ।
वेडेवांकुडे दोन शब्द । गुरुचरणीं अर्पिले ॥ ४७ ॥
शृंगार हास्य शोकादिक । रस जे रजतमात्मक ।
साधका होती बाधक । ते येथें वर्जिले ॥ ४८ ॥
भक्तरस सत्त्वप्रधान । सद्‌गुरूचा महिमा गहन ।
उपदेशवचनें प्रमाण । घेतलीं संतौच्छिष्टें ॥ ४९ ॥
वेदांत सिद्धांत धादांत । नीतिव्यवहार परमार्थ ।
गुरुभक्तांचा अनुभव येथे । सत्य शोधोनि वर्णिला ॥ ५० ॥
गुरुलीला ही साधार । परि कांहीं सोडिला प्रकार ।
जेणें दुखवेल परांतर । ऐसे दृष्टांत त्यागिले ॥ ५१ ॥
कांहीं भाग लिहिला होता । परि दृष्टांत होय अवचितां ।
निंदकाचें कृत्य वर्णितां । लाभ काय तुम्हांसी ॥ ५२ ॥
असो प्रत्यक्ष असतां श्रीगुरुवर । निंदकां करिती उपकार ।
तैसाच ग्रंथगर्भीं प्रकार । गुरुआज्ञेनें जाहला ॥ ५३ ॥
गुरु दयेची माउली । गुरु शांतीची साउली ।
गुरु आनंदा घरकुली । गुरु माय सर्वांची ॥ ५४ ॥
षड्गुआणैश्वर्यसंपन्न । सद्‌गुरु माझें निधान ।
भक्तांसि सदा प्रसन्न । स्वानंदरस वर्षतसे ॥ ५५ ॥
असो माहात्म्य श्रीगुरूंचे । शब्दातीत अगम्य वाचे ।
म्यां शब्दस्वरूप दिधले काचें । म्हणून क्षमा भाकितों ॥ ५६ ॥
सद्‌गुरुचि एक बुद्धिदाता । कर्ता वक्ता आणि श्रोता ।
सूक्ष्म देहअगहंता । समरस होवों गुरुचरणीं ॥ ५७ ॥
जें जें कांहीं घडे कर्म । तें तें अर्पावें हा धर्म ।
तैसी अहंताहि दुर्गम । श्रीसेवे लाविली ॥ ५८ ॥
समर्थ सद्‌गुरूंची कीर्ति । साधकां मार्गदर्शी ज्योति ।
जे कोणी भावें गाती । प्रसाद होय तयांवरी ॥ ५९ ॥
सद्‌गुरुलीला करितां श्रवण । अखंड होय समाधान ।
नाना शंकांचे निरसन । होय येथें ॥ ६० ॥
प्रपंच साधोन परमार्थ । कैसा साधावा निजस्वार्थ ।
हेंहि सद्‌गुरु समर्थ । बोधिती या ठायीं ॥ ६१ ॥
सद्‌गुरुंच्या प्रतिमा अनेक । त्यांहूनि विशेष हें रूपक ।
येथें साक्षात गुरुनायक । वास करिती अक्षरीं ॥ ६२ ॥
वेद तोचि विश्वंभर । तैसी लीला गुरुवर ।
येथें रोकडा साक्षात्कार । भाविकांसी होईल ॥ ६३ ॥
रामायण हरिवंश । पूजितां प्रसन्न जगदीश ।
तेवीं श्रीसद्‌गुरुलीलामृतास । पूजितां गुरुमाय तोषेल ॥ ६४ ॥
या ग्रंथाची करितां सेवा । सद्‌गुरु देईल विसांवा ।
तापत्रयांतून जीवा । सोडवील धरा विश्वास ॥ ६५ ॥
सद्भारवें ग्रंथ श्रवण करितां । जाईल समंध भूतव्यथा ।
चेडेचेटुका वार्ता । न चले येथें ॥ ६६ ॥
देह प्रारब्धाधीन । हें पूर्वींच गेले नेमोन ।
उपाय करितां अधिकन्यून । समर्थकृपें होतसे ॥ ६७ ॥
निपुत्रिकां पुत्रप्राप्ति । दरिद्रियां धनप्राप्ति ।
रोगग्रस्तां रोगमुक्ति । सद्‌गुरुमाय देईल ॥ ६८ ॥
बद्धासी होय अनुताप । मुमुक्षुसि साधन स्वल्प ।
साधकासि ज्ञानदीप । गुरुमाय दावील ॥ ६९ ॥
असतां दृढश्रद्धा विमल भाव । सदा जवळींच गुरुराव ।
मग त्रिविधताप मायोद्भ व । दूर जाती पळिन ॥ ७० ॥
सद्भारवें सेवा करितां । वाहील सद्‌गुरु त्याची चिंता ।
भवसिंधुवरोनि तारिता । युक्तिप्रयुक्ति होईल ॥ ७१ ॥
सेवेचे बहुविध प्रकार । मुख्य श्रवण मनन आचार ।
सप्ताह पूजा नमस्कार । प्रदक्षिणा ही उपांगें ॥ ७२ ॥
कैशी असेल कालगति । जैंसी ज्याची शक्ति मति ।
तैसी भजावी गुरुमूर्ति । परमपावन गुरुलीला ॥ ७३ ॥
सद्‌गुरुमाय दयावंत । भोळा भाव सिद्धीस नेत ।
यास्तव न धरितां किंत । यथाशक्ति आळवावी ॥ ७४ ॥
यावरी श्रोते प्रश्न करिती । सप्ताह करावा कवणे रिती ।
कैसी होय फलप्राप्ति । कथन करावें ॥ ७५ ॥
वक्ता वदे बरवें पुसिलें । वंदन करोनि गुरुपाउलें ।
कथितो अवधान द्या भले । श्रोते तुम्ही भाविक ॥ ७६ ॥
अंतःशुचि बाह्यशुचि । स्थानशुचि द्रव्यशुचि ।
श्रोतृसमुदायशुचि । शक्य तितुकें साधावें ॥ ७७ ॥
निष्काम पाठ मुख्य धर्म । सकाम हा गौणधर्म ।
दोहीं ठायीं हरती श्रम । सद्‌गुरु दयावंत ॥ ७८ ॥
स्नानसंध्या करोनि । भक्तिभावें पूजोनि ।
सोज्ज्वळ दीप ठेवोनि । पाठारंभ करावा ॥ ७९ ॥
प्रत्येक ओवी वाचल्यावरी । ’श्रीराम’ म्हणा सत्वरीं ।
ऐसी प्रति‍ओवीसी वैखरी । श्रीरामीं लावावी ॥ ८० ॥
येणें सद्‌गुरु तोष पावे । येणें फल दुणावे ।
सेतु बांधिला जैसा देवें । तैसा परमार्थ साधेल ॥ ८१ ॥
ही गुरुघरची सरणी । श्रोते नीट धरा ध्यानी ।
प्रतिदिनीं दोन अज्ञाय वाचोनि । नैवेद्य आरती करावी ॥ ८२ ॥
सात्त्विक आहार मृदुवचन । ब्रह्मचर्य नामस्मरण ।
इतुकें होतां तत्काळ विघ्न । गुरुकृपें निरसेल ॥ ८३ ॥
तीन दिनीं अध्याय सहा । चवथे दिनीं सातवा पहा ।
मननयुक्त वाचावा हा । पान करा बोधामृत ॥। ८४ ॥
पुढे तीन दिनपर्यंत । प्रतिदिनीं दोहींप्रत ।
वाचोन सप्ताह समाप्त । सांगता करावी ॥ ८५ ॥
सांगता मुख्यलक्षण । नामस्मरण अन्नदान ।
सात्त्विक द्रव्य मेळवून । यथाशक्ति करावें ॥ ८६ ॥
आषाढ शुद्ध पौर्णिमेसी । अवश्य करा सप्ताहासी ।
गुरुपूजा ते दिवशी । उत्सव प्रिय गुरुभक्तां ॥ ८७ ॥
कली प्रबल झाला मोठा । श्रद्धेसि मारिला चपेटा ।
परि प्राचीन सुलभ वाटा । साधकें न सोडाव्या ॥ ॥ ८८ ॥
वरी दिसते मोहक । अंतरीं अति भयानक ।
साधकें नसावें वंचक । लोकेपणे कदापि ॥ ८९ ॥
परांतर दुखविणें हेंचि दुरित । दया सदाचार हेंचि सुकृत ।
रामनाम साधन सारभूत । वैराग्य परम वैभव ॥ ९० ॥
शेवटीं एक विनवणी । लय लागो नामस्मरणीं ।
श्रीजगदीश नमोनी । घेऊं गुरुचरणीं विसांवा ॥ ९१ ॥
इति श्रीसद्‌गुरुलीला । श्रवणीं स्वानंदसोहळा ।
पुरविती रामदासीयांचा लळा । कृपाकटाक्षें ॥ ९२ ॥
॥ इति श्रीसद्‌गुरुलीलामृते त्रयोदशाध्यायांतर्गतः चतुर्थः समासः ॥
॥ इति त्रयोदशोऽध्यायः समाप्तः ॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

मंगळवारी हनुमान चालीसा पठण किती वेळा करावे?

सद्गुरु श्री गजानन महाराज आरती मराठी

आरती सोमवारची

Mahadev Mantra महादेवाचे मंत्र सोमवारी नक्की जपावे

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

पुढील लेख