Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री नवनाथ भक्तिसार कथामृत - अध्याय ११

Webdunia
मच्छिंद्रनाथाचे स्त्रीराज्यात गमन, जालंदरनाथ जन्मकथा
गहिनीनाथास गंगाबाईच्या स्वाधीन केल्यावर गोरक्षनाथास समागमे घेऊन मच्छिंद्रनाथ निघाला. तो तीर्थयात्रा करीत करीत बदरिकाश्रमास शिवालयात गेला. दोघांनी शंकरास नमस्कार केला आणि स्तवन करण्यास आरंभ केला. त्यांची स्तुति ऐकून शंकर प्रसन्न झाला व प्रगट होऊन त्याने दर्शन दिले. मग उभयतास आलिंगन देऊन जवळ बसविले, त्या वेळी शंकराने गोरक्षाच्या तोंडावरून हात फिरविला व तू हरिनारायणाचा अवतार आहेस असे म्हटले आणि मच्छिंद्रनाथास असे सांगितले की, हा तुझा गोरक्षनाथ ब्रह्मांडास तारक होईल. कनकगिरीवर तू अभ्यास करून दैवते साध्य करून घेतलीस; श्रीराम, नरसिंह, सूर्य, हनुमंत, कालिका वगैरे वीरांसहवर्तमान भैरवांना बोलाविलेस तेव्हा मीहि आलो होतो. तेव्हापासून माझी व या गोरक्षाची ओळख आहे. तू ह्याचेकडून विद्याभ्यास करविला आहेस खरा, पण त्यापासून विशेष उपयोग व्हावयाचा नाही. ह्याने तप केलेच पाहिजे, यास्तव माझ्या आश्रमामध्ये ह्यास तू तप करण्याकरिता बसव. मग ह्याची विद्या, अस्त्रे ही सर्व फलद्रूप होतील, असा जेव्हा शंकराने मच्छिंद्रनाथास बोध केला, तेव्हा गोरक्षनाथास उत्तम मुहूर्तावर तपश्चर्येस बसविले. मग तो लोखंडाच्या काट्यावर पाय ठेवून उभा राहिला व नजर करून फळे, पाला खाऊन तपश्चर्या करू लागला. हे पाहून मच्छिंद्रनाथ आपली पुन्हा बारा वर्षांनी भेट होईल असे गोरक्षनाथास सांगून तीर्थयात्रेस जावयास निघाला.
 
तो अनेक तीर्थे करून शेवटी सेतुबंधरामेश्वराला गेला तेथे रामेश्वराचे दर्शन घेऊन समुद्रस्नानास गेला असता त्यास मारुतीने नमस्कार केला. त्यावेळेस त्यास फारच हर्ष झाला. त्यास ह्रदयी धरून जवळ बसविल्यावर मारुती म्हणाला, आज चोवीस वर्षांनी तुझी भेट झाली. मग त्याने तेथे नाथाचे आदरातिथ्य उत्तम प्रकारे केले. पुढे गोष्टी सांगता सांगता योग्य संधि पाहून मारुतीने गोष्ट काढिली की, स्त्रीराज्यात जाण्याचे तू मला वचन दिले होतेस; असे असता तू अजूनपर्यंत तिकडे गेला नाहीस; तर कृपा करून तिकडे जाऊन तिचे हेतु पूर्ण करून मला एकदा तिच्या वचनांतू मोकळा कर. 'मच्छिंद्रनाथ येथे येऊन तुझे मनोरथ पुरवील' असे मी तिला वचन देऊन ठेविले आहे. ते पूर्ण केले पाहिजे व तूहि मला मागे वचन दिले आहेस ते पाळण्याची आता ही चांगली संधि आहे, असे हनुमंताने म्हटल्यानंतर मच्छिंद्रनाथ 'ठीक आहे' असे म्हणाले व तीन रात्री तेथे राहून ते दोघेहि स्त्रीराज्यात जाण्यासाठी निघाले.
 
ते थोड्याच दिवसात तीर्थे करीत करीत स्त्रीराज्यात गेले. त्या राज्यात पुरुष नावाला सुद्धा नव्हता. राज्यपदावर एक राणी असून सर्व राजकीय कारभार पाहाणार्‍या स्त्रिया आहेत. त्या राज्यकारभार सुयंत्र चालवीत. असो; या दोघांनी राजवाड्यात प्रवेश करून राणीची भेट घेतली. तेव्हा तिला आनंद होऊन त्यास कनकासनावर बसविले. मग त्यांची षोडशोपचारानी पूजा करून ती हात जोडून उभी राहिली व हा दुसरा बरोबर कोण आहे हे सांगण्यासाठी तिने मारुतीची प्रार्थना केली. मारुतीने तिला सांगितले की, तू तप केलेस त्या वेळी मच्छिंद्रनाथ येऊन तुला विषयविलासाचे यथेच्छ सुख देईल' म्हणून मी वरदान दिले होते, तोच हा होय. तर आता ह्याच्यापासून तू आपली मनकामना पुर्ण करून घे. या प्रमाणे तिला सांगितल्यावर मारुती तेथे तीन रात्री राहून परत सेतुबंधरामेश्वरास आला व रामाचे भजन करीत बसला.
 
इकडे मच्छिंद्रनाथ विषयविलासाच्या सुखामध्ये निमग्न होऊन गेला. मच्छिंद्रनाथ विषयविलासाचा उपभोग घेत असता काही दिवसांनी राणी गरोदर राहिली. मग पूर्ण दिवस भरल्यावर प्रसूत होऊन पुत्ररत्‍न झाले. त्याचे नाव मोठ्या आवडीने 'मीननाथ' असे ठेविले.
 
इकडे कुरुकुळात जनमेजय राजापासून सातवा पुरुष जो बृहद्रव राजा, त्याने हस्तिनापुराचे राज्य करीत असता सोमयाग करण्यास प्रारंभ केला. पूर्वी शंकराच्या नेत्राच्या प्रळयाग्नीने मदन जाळीला होता. तो अग्नीच्या उदरात वाढत होता. त्यात अंतरिक्षनारायणाने संचार करून तो गर्भ अग्निकुंडात टाकिला. पूर्णाहुति झाल्यानंतर यज्ञकुंडातील रक्षा घेण्यासाठी ब्राह्मणांनी हात घातला असता मुलगा हातास लागून त्याचे रडणेहि त्यास ऐकू येऊ लागले. मग पुरोहिताने ही गोष्ट राजास कळविली. त्या मुलास पाहून बृहद्रवा राजास संतोष झाला. त्यास राजाने आपल्या हातात घेतले व त्याचे मुके तो घेऊ लागला. हा प्रत्यक्ष मदनाचा पुतळा असे राजास वाटले.
 
मग राजा बालकास घेऊन घाईघाईने अंतःपुरात सुराचना राणिकडे गेला. तिचे रुप देवांगनेप्रमाणे होते. कुरुकुळास तारण्यासाठी साक्षात रमा, सरस्वती किंवा पार्वती अवतरली आहे, असे वाटे. मुलगा कोणाचा म्हणून विचारल्यावर राजाने तिला सांगितले की, हा अग्निनारायणाने प्रसाद दिला आहे; मीनकेत तर तुला एक पुत्र आहेच, त्यास ह्यांचे पाठबळ होईल. हे ऐकताच तिने बालकास आपल्या हाती घेऊन स्तनाशी लावताच दूध उत्पन्न जाले, मग मोठा उत्सव सुरू झाला. बाराव्या दिवशी मुलगा पाळण्यात घातला व जालंदर असे त्याचे नाव ठेविले. त्या दिवशी गावात साखर वाटली व याचकांना पुष्कळ द्रव्य दिले. पुढे बृहद्रवा राजाने जालंदरचा व्रत बंध केला. नंतर त्याचे लग्न करावे असे एके दिवशी राजाच्या मनात आले. त्यावरून त्याने धूमीण प्रधानाबरोबर पुरोहितास देऊन उत्तम मुलगी पाहण्यासाठी पाठविले.
 
प्रधान गेल्यावर धूमीण प्रधान आताशी दिसत नाही, तो कोठे दूर गेला आहे काय, म्हणून जालंदराने एके दिवशी आईस विचारिले असता ती म्हणाली, तुझ्या बापाने तुला बायको पाहावयास त्यास व पुरोहितास पाठविले आहे. तेव्हा बायको कशी असते, असे त्याने तिला विचारल्यावर, माझ्यासारखी बायको असते, म्हणून तिने त्यास सांगितले. ही गोष्ट लक्षात ठेवून त्याने खेळावयास गेल्यावर आपल्या खेळगड्यास विचारिले की, गड्यांनो, माझे आईबाप मला बायको करून देणार आहेत; तर ती कशासाठी करतात ह्याची माहिती तुम्हास असली तर मला सांगा. असे त्याने विचारल्यावर मुलांना त्याच्या अज्ञानाचे फारच नवल वाटले. त्यास त्यानी सर्व कारण उघड करून सांगितले. तेव्हा तो मनात विचार करू लागला की, हे जग परम अधम आहे; जेथून उत्पन्न व्हावयाचे ते स्थान आपण वर्ज्य करावे व अशा अयोग्य कार्यास प्रवृत्त होऊ नये, असे मनात आणून तो अरण्यात निघाला. गावाच्या सीमेवर रक्षक होते त्यांनी त्यास पाहिले; पण राजपुत्र असल्यामुळे त्यांनी त्यास कोठे जातोस म्हणून विचारिले नाही. मात्र मनुष्य पाठवून ही गोष्ट त्यांना राजास कळविली. ती ऐकताच राजा घाबरून धावत आला व तोहि अरण्यात शोध करू लागला. अंधार पडेपर्यंत पुष्कळ लोक एकसारखे त्यास धुंडीत होते; पण पत्ता लागला नाही. मग निराश होऊन सर्व मंडळी घरोघर गेली. नंतर मुलाच्या वियोगाने राजास व राणीस अतिशय दुःख झाले. ती उभयता त्याचे गुण आठवून शोक करू लागली.
 
इकडे जालंदर अरण्यात निजला असता रात्रीस वणवा लागला. मग गवत पेटत पेटत अग्नि अगदी जवळ आला; त्या अग्नीने मुलास ओळखले. मग चांगल्या ठिकाणी ह्यास सोडिले असता हा अशा स्थितीत येथे कसा आला म्हणून तो चिंतेत पडला तेव्हा अग्नीने मूर्तिमंत्र प्रगट होऊन त्यास जागृत केले आणि मांडीवर बसवून येथे येण्याचे कारण विचारिले. तेव्हा तू कोण आहेस असे जालंदराने अग्नीला विचारिले असता तो म्हणाला, मी तुझी आई व बाप आहे; मला अग्नि म्हणतात. मग तू माझा आईबाप कसा म्हणून उलट त्याने त्यास विचारल्यावरून अग्नीने त्यास सविस्तर जन्मकथा सांगितली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Avoid on Wednesday बुधवारी ही कामे करु नये

आरती बुधवारची

Margashirsha 2024 मार्गशीर्ष महिन्यात काय करावे?

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

अष्टविंशतिविष्णुनामस्तोत्रम्

सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

पुढील लेख
Show comments