Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

श्री परशुराम माहत्म्य अध्याय २५

Webdunia
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीजानकी जीवनाय नमः ॥
जय जय षड्‌गुणैश्‍वर्य संपन्ना सच्चिदानंदा आनंदघना मायातीता शुद्ध चैतन्या जनार्दना जगत्पते ॥१॥
सज्जन मानस चकोर चंद्रा दुर्जन कानन वैश्‍वानरा धर्मस्थापका जगदोद्धारा भार्गववीरा करुणाब्धी ॥२॥
ब्रह्मादि रुद्र पुरंदर तुझिया अज्ञेचे अज्ञाधार तळीं तल्पक धराधर तेथें भूचर कायसी ॥३॥
तव कृपा जल उदार वर्षतां दैन्य दुःख धुरोळा समग्र निरसुनि सज्जन तृणांकुर टवटवीत विरुढले ॥४॥
सांगे आदि देव चतुर्वक्र नारदातें परवणी चरित्र विमळीं बुडतां पाणिपात्र वसिष्ठा लाधलें मनकर्णिके ॥५॥
भीष्म ह्मणे युधिष्ठिरा विकुंभ पर्वताचिया सिखरा गंधमादन ऋषेश्‍वरा तपो तेजें विराजती ॥६॥
तेथें देवर्षी मुनिजन सिद्ध साधू तपोधन योगध्यानीं परायण बैसले आसती सर्वदां ॥७॥
भव्य तिलक मुद्रांकित कृष्णाजिन व्याघ्राजिन पांघरित मग्न जाले आपल्या साधनांत ईश्‍वराप्रत संतुष्ट करिती ॥८॥
योगयागादि षट्‌कर्म तेथें करिती नित्यनेम हें देखोनि परशुराम करुणा भरें दाटला ॥९॥
ह्मणे मी दवडोनि सागर पवित्र निर्मिलें वैतरणी तिर ऐसे असतो गिरिकंदर ऋषेश्‍वर सेविती ॥१०॥
तरीं या सर्व तोपधनां न्यावें आपले स्वस्थाना ऐसें कल्पोनि भार्गवराणा येता जाला ऋषीं जवळी ॥११॥
मनुष्यपणें समस्तांतें विनंती करी जोडिल्या हातें ह्मणे माझिया दिव्य क्षेत्रातें विमळ वैतरणी नेमिली ॥१२॥
तेथें करितां स्नान दान सर्व पातकें होती दहन यज्ञयागादि पूजासाधन साधितां मोक्ष पाविजे ॥१३॥
जें जें इच्छित जयाचे मनीं तें तें पाविजे तया स्थानीं अगाध महिमा तेथींचा श्रवणीं तुह्मीं ऐकिला असेल ॥१४॥
ऐसें विमळा वैतरणी तीर त्रिभुवनीं नेमिलें सुंदर तरीं हे सोडोनि गिरिकंदर विचित्र स्थळा चलावें ॥१५॥
एवं परशुरामाची वाणी ऐकतां तोषले ऋषी मुनी सर्वही सामुग्री घेउनी निघते जाले समागमें ॥१६॥
शांडिल्य मुद्गल गालव विश्‍वकेतु सुमंतु कण्व वसू सावर्णी सुनय कोलव दालभ्य आणि द्विलोर्दमा ॥१७॥
परा वसू आणि शंखपाळ भृचंडी मृकंड नंदपाळ कूर्म लोम अठराकुळ आणीक सकळ पातले ॥१८॥
पाहोनियां वैतरणी तीर ऋषी घालिती नमस्कार स्नानादि करुनि समग्र रेणुका भगवती पूजिली ॥१९॥
सर्व तीर्थांचें अक्षय भुवन देखिलें विमळ वरुणास्थान तापसी करितां तेथें स्नान पूर्ण तप न होईजे ॥२०॥
संध्या अक्ष सूत्र नेमधर्म तेथें करिती क्रियाकर्म जप जाप्य नित्यनेम सारुनि आराम पावले ॥२१॥
ह्मणती हे भूमी पुण्यस्थळ येथें राहावें सर्वकाळ तपश्चर्या करितां फळ होय तात्काळ निश्चयें ॥२२॥
आगा हे रेणुका गर्भरत्‍ना विश्‍वैक ईशा नारायणा अवतार रुपें देशी दर्शना गोब्राह्मणा हितकारी ॥२३॥
धन्य धन्य तुमची करुणा दिव्यक्षेत्र देखिलें नयना तेथें करितां सत्कर्मा चरणा काय पुण्य वदावें ॥२४॥
भार्गवा सांगे ऋषेश्‍वरां मर्दोनियां पाळ पंजरा उत्तम क्षेत्र पश्चिम तीरा बारा योजन प्रमाण ॥२५॥
यामाजीं विमळ वैतरणी तीर्थें न येती याचिया तुळणीं ॥ येथींचें पुण्य माझिया वाणी वदतां न येची सर्वथा ॥२६॥
अकरा प्रदक्षिणा सृष्टीस प्रयागीं केला कल्पवास याहूनि पुण्य विशेष विमळीं स्नान करितां घडे ॥२७॥
माझिया क्षेत्रा भीतरीं विमळ वैतरणीच्या तिरीं जोमत्पूजा तपश्चर्या करी परमागती तोपावे ॥२८॥
आनादि असे हें महेंद्र क्षेत्र आतां नाम परशुराम क्षेत्र दिव्य प्रख्यात सर्वत्र परम पवित्र जाहलें ॥२९॥
आणीक येथींचा महिमा जाहली वर्णावयाची सीमा मग ते ऋषी परशुरामा वंदूनि बैसले तपध्यानीं ॥३०॥
कृपेचे सिंधू ईश्‍वर प्रगट होऊनि परशुधर जेथें बैसले ऋषेश्‍वर तेथें छायेसी तरु निर्मिले ॥३१॥
अश्‍वत्थ वट औदुंबर तुलसी दाडिंबी देवदार बकुळी जांबळी अंजीर च्यूत मंदार आमले ॥३२॥
पारिभद्र पारिजातक चिंच चंदन शमी चंपक सप्तपदी बिल्वादिक कदंब करवीर शेवंती ॥३३॥
पालाश फणस रातांजन अशोक अगस्ती अर्जुन ॥ को विदार कुडे कंचन नारी केळी पोफळी ॥३४॥
द्राक्षवल्ली प्रवाळवल्ली कनकवल्ली नागवल्ली जाई जुई मनवल्ली वसंत देखोनि सुखावे ॥३५॥
नानापरीचे जे तरुवर फळभारें डोलती अपार छायातळीं ऋषेश्‍वर तपश्चर्या करिताती ॥३६॥
कीं मानस सरोवरा भोंवतीं बैसल्या राजहंसाच्या पंक्ती कीं उडुगणें वेष्टित तारापती निराभ्र नभीं विराजे ॥३७॥
कीर्णें वेष्टित दिनकर त्रिदशामाजीं पुरंदर तेवीं विमळ सरोवर वेष्टोनि ऋषी बैसले ॥३८॥
भीष्म ह्मणे धर्माप्रती तया विमळाचे सभोंवती ठायीं ठायीं तीर्थें असती नामें तूज सांगतों ॥३९॥
भार्गव बाणें विमळासुर जेव्हां पडिला धरणीवर अशुद्धाचा महापूर वहात गेला पूर्वदिशे ॥४०॥
प्रवाहाचा केव्हडा नेट मृत्तिका धुवोनि जाली वाट तेथें उदक अलोट सागरापरी भरलें असे ॥४१॥
परी तें उदक असे गढूळ रामें घालूनि बाण जाळ शोधूनि काढिला तयाचा मळ ह्मणोनि निर्मळ नाम तया ॥४२॥
विमळ निर्मळ तीर्थे दोन्हीं समसमान तये स्थानीं अद्यापि तेथें विमळाचें पाणी निर्मळ जीवनीं वाहतसे ॥४३॥
निर्मळ तीर्थीं स्नानदान करितां विमळासारिखें पुण्य तीर्थ महिमा विशेष जाण अंत न लागे शोधितां ॥४४॥
विश्‍वामित्राचिया शापें रंभा जाहली शिळारुपें श्रीमद्भार्गव चरण प्रतापें उत्धार तेथें जाहला ॥४५॥
तेथें असे शिळातीर्थ वैतरणी तटी अत्यद्भुत स्नान करितां सर्व जळत ब्रह्महत्यादि पातकें ॥४६॥
वनीं पिंडारक नाम तीर्थ असे उत्तमोत्तम वृक्ष भेदीत गेले व्योम अंत न लागे शोधितां ॥४७॥
तया तीर्थीं श्राद्धतर्पण, करितां पितृमोक्ष भुवन तात्काळ जाती उद्धरोन महापवित्र स्थान तें ॥४८॥
ते तंव केवळ यज्ञ भूमिका दुर्लभ देवां तिहीं लोकां स्नानमात्रें मानवादिकां निर्वाणपद प्राप्त होय ॥४९॥
ब्रह्म वेणी ऋषीतीर्थ वरंडक चामाद्य काशतीर्थ मनोमती धुतले तीर्थ स्नानें समस्त दोषाऽवरी ॥५०॥
तीर्थांमाजीं वर्णावरी ताम्रतीर्थ गोदावरी पाई नदी वसुंधरी दीघावरी महातीर्थ ॥५१॥
गौळवापी मुनीतीर्थ केतकी तीर्थ चोत्पळ तीर्थ वराहा कर्दमाळी तीर्थ रुद्रतीर्थ पवित्र पैं ॥५२॥
द्रोणतीर्थ सम्यक् तीर्थ मुरु संगम कुशोदक तीर्थ पृथूदक श्रीविष्णुतीर्थ मेयातीर्थ पृथग्वीतीर्थ ॥५३॥
सप्तळी गोदवती तीर्थ स्कंद वापी कुशोवती तीर्थ प्रयाणी प्रभावती तीर्थ गोमती तीर्थ कुशोदक ॥५४॥
उतळेश्‍वर महातीर्थ ब्रह्मालय ब्रह्मतीर्थ उत्पातळे रेवातीर्थ महिमा अद्भुत न वर्णवे ॥५५॥
भ्रुकुंड तीर्थ तुंग पर्वतीं देव ऋषीमुनी सेविती नाना तपें आचरती अटव्य वनस्थान तें ॥५६॥
आदिचक्र तींर्थ गदातीर्थ तैसें पद्मालय शंखतीर्थ वैतरणी तीर्थ अद्भुत स्नानें समस्त दोष हरती ॥५७॥
धर्मतीर्थ खदिर कुंड विष्णुतीर्थ रामकुंड अरोही तीर्थें उदंड वर्णितां ग्रंथ वृद्धी होय ॥५८॥
वेष्टूनि विमळ वैतरणी स्थान भौवतें पंचक्रोश प्रमाण गोखुरापर्यंत संचलें जीवन तितुकें जाण तीर्थ असे ॥५९॥
अवंती तीर्थें ही पवित्रें निर्माण केलीं रेणुकापुत्रें स्नान करितां हेळामात्रें दोष जळती अपार ॥६०॥
जरी न घडे स्नानदान तरीं हें करितां नित्य पठण श्रवण मनन करितां पुण्य सकळ तीर्थांचें घडतसे ॥६१॥
जो करी परशुराम स्मरण तोचि त्रिजगतीं होय धन्य तया कैंचें संसार दैन्य झाला मान्य ब्रह्मादिकां ॥६२॥
ऐसें हें भीष्माचें वचन ऐकतां संतोषे पंडू नंदन सूत सांगती ऋषीं लागून सप्रेम कथामृत प्रासिजे ॥६३॥
स्वस्तिश्री परशुरामविजय कल्पतरु वर्णितां महात्म्य अपारु ऐकतां निःपाप होती नरु पंचविंशतीऽध्याय गोड हा ॥२५॥ श्रीविश्‍वरुपदर्शकार्पणमस्तु ॥

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

सोमवारी या उपयांनी मिळेल तन, मन आणि धनाचे सुख

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

श्री सूर्याची आरती

काल भैरव आरती Kaal Bhairav Aarti

कालभैरवाने काळ्या कुत्र्याला वाहन म्हणून का निवडले?

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments