Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तुकाराम गाथा - अभंग संग्रह ३००१ ते ३५००

तुकाराम गाथा - अभंग संग्रह ३००१ ते ३५००
, शनिवार, 10 फेब्रुवारी 2024 (05:34 IST)
३००१
 
कांहीं विपत्ति अपत्यां । आतां अमुचिया होतां । काय होईंल अनंता । पाहा बोलों कासया ॥१॥
 
बरें अनायासें जालें । सायासेंविण बोले चाले । काबाड चुकलें । केलें कष्टावेगळें ॥ध्रु.॥
 
बरा सांपडलासी वोजा । वर्मावरी केशीराजा । बोलायासी तुझा । उजुरचि नाहींसा ॥२॥
 
तुकयाबंधु म्हणे दगा । बरा दिला होता बागा । झडकरी चलागा । चांग दैवें पावलों ॥३॥
 
३००२
 
देवा तुजपें माझ्या पूर्वजांचें ॠण । आहे तें कां नेदिसी अझून ।
 
अवगलासीं झोंडपणें । परी मी जाण जीवें जिरों नेदीं ॥१॥
 
कळों येईंल रोकडें । उभा करिन संतांपुढें ।
 
तुझें काय एवढें । भय आपुलें मागतां ॥ध्रु.॥
 
आजिवरी होतों नेणता । तों तुज फावलें रे अनंता ।
 
कवडीचा तो आतां । पडों नेदीन फेर ॥२॥
 
ठेविला ये जीवनीं जीव । म्हणे तुकयाचा बंधव ।
 
माझा गळा तुझा पाव । एके ठायीं बांधेन ॥३॥
 
३००३
 
मागें असताशी कळला । उमस घेऊं नसता दिला।
 
तेणें चि काळें केला । असता अवघा निवाडा ॥१॥
 
इतका न लगता उशीर । न धरितों भीडभार ।
 
सद्धिासी वेव्हार । कासयासी लागला ॥ध्रु.॥
 
असोनियां माल खरा । किती केल्या येरझारा ।
 
धरणें ही दिवस तेरा । माझ्या भावें घेतलें ॥२॥
 
अझुन तरी इतक्यावरी । चुकवीं जनाचार हरी ।
 
तुकयाबंधु म्हणे उरी । नाहीं तरी नुरे कांहीं ॥३॥
 
३००४
 
आतां न राहें क्षण एक । तुझा कळला रे लौकिक । नेदीं हालों एक । कांहीं केल्यावांचूनि ॥१॥
 
संबंध पडिला कोणाशीं । काय डोळे झांकितोसी । नेईंन पांचांपाशीं । दे नाहींतरी वोढूनि ॥ध्रु.॥
 
सुखें नेदीस जाणवलें । नास केल्याविण उगलें । तरि तें ही विचारिलें । आम्ही आहे तुज आधीं ॥२॥
 
असें च करूनि किती । नागविलीं नाहीं नीती । तुकयाबंधु म्हणे अंतीं । न सोडिसी ते खोडी ॥३॥
 
३००५
 
तुज ते सवे आहे ठावें । घ्यावें त्याचें बुडवावें । परि ते आम्हांसवें । आतां न फावे कांहीं ॥१॥
 
नव्हों सोडायाचे धणी । कष्टें मेळविलें करोनि । पाहा विचारोनी । आढी धरोनि काम नाहीं ॥ध्रु.॥
 
अवघे राहिले प्रकार । जालों जीवासी उदार । असा हा निर्धार । कळला असावा असेल ॥२॥
 
आतां निदसुर नसावें । गाठ पडली कुणब्यासवें । तुकयाबंधु म्हणे राखावें । देवा महत्व आपुलें ॥३॥
 
३००६
 
बहु बोलणें नये कामा । वाउगें तें पुरुषोत्तमा । एकाचि वचनें आम्हां । काय सांगणें तें सांग ॥१॥
 
देणें आहे कीं भांडाईं । करणें आहे सांग भाईं । आतां भीड कांहीं । कोणी न धरी सर्वथा ॥ध्रु.॥
 
मागें गेलें जें होउनी । असो तें धरित नाहीं मनीं । आतां पुढें येथूनि । कैसा काय विचार ॥२॥
 
सारखी नाहीं अवघी वेळ । हें तों कळतें सकळ । तुकयाबंधु म्हणे खळखळ । करावी ते उरेल ॥३॥
 
३००७
 
आतां हें न सुटे न चुके । बोल कां दवडिसी फिके ।
 
जन लोक पारिखें । अवघें केलें म्यां यासाटीं ॥१॥
 
नये सरतां नव्हे भलें । तुझें लक्षण कळलें ।
 
बैसलासी काढिलें । देहाचें मुळीं दिवाळें ॥ध्रु.॥
 
दिसतोसी बरा बोल कोंवळे । गुण मैंदाचे चाळे ।
 
दिसताती ये वेळे । काय करूं विसंबोनि ॥२॥
 
तुकयाबंधु म्हणे देखतां । अंध बहिर ऐकतां ।
 
कैसें व्हावें आतां । इतकियाउपरी ॥३॥
 
३००८
 
तिहीं ताळीं हेचि हाक । म्हणती पांढरा स्फटिक ।
 
अवघा बुडविला लौकिक । सुखें चि भीके लाविलीं ॥१॥
 
थोंटा नांव शिरोमणी । नाहीं जोडा त्रिभुवनीं ।
 
म्हणोनि शाहाणे ते कोणी । तुझे दारीं बैसतिना ॥ध्रु.॥
 
निर्गुण निलाजिरा निनांवा । लंड झोंड कुडा देवा ।
 
नागवणा या नांवा । वांचूनि दुजा नाइकों ॥२॥
 
सर्वगुणें संपन्न । कळों आलासी संपूर्ण ।
 
तुकयाबंधु म्हणे चरण । आतां जीवें न सोडीं ॥३॥
 
३००९
 
तो चि प्रसंग आला सहज । गुज धरितां नव्हे काज । न संडितां लाज । पुढें वोज न दिसे ॥१॥
 
तूं तर न होसी शाहाणा । नये सांगतों तें ही मना । आपण आपणा । आतां प्रयत्न देखावा ॥ध्रु.॥
 
न पुरवी पाहातां वाट । द्यावें प्रमाण चोखट । कास घालूनियां नीट । चौघाचार करावा ॥२॥
 
आतां श्रमाचें कारण । नव्हे व्हावें उदासीन । न पडे तयाविण । गांठी तुकयाबंधु म्हणे ॥३॥
 
३०१०
 
हळूहळू जाड । होत चालिलें लिगाड । जाणवेल निवाड । न करिसी परी पुढें ॥१॥
 
मी तों सांगून उतराईं । जालों आतां तुज काईं । कळों येईंल भाईं । तैसा करीं विचार ॥ध्रु.॥
 
मागें युगें अठ्ठाविस । जालीं दिवसाचा दिवस । मुदल व्याज कासावीस । होसी देवा ये कामें ॥२॥
 
तुकयाबंधु म्हणे राखें । आतां टाकीं तुझीं तीं सुखें । जगजाहिर ठाउकें । जालें नाहीं खंडलेंसें ॥३॥
 
३०११
 
पत्र उचटिलें प्रेत्नें । ग्वाही कराया कारणें । नाहींतरी पुण्यें । तुझ्या काय उणें आम्हां ॥१॥
 
नांव तुझें चि करोनि । आहों सुखें पोट भरोनि । केली जाणवणी । म्हणउनि नाहीं म्हणसील ॥ध्रु.॥
 
आतां इतकियाउपरी । दे नको भलतें करीं । म्हणती ॠणकरी । आमुचा इतकें उदंड ॥२॥
 
तुकयाबंधु जागा । अळवावया पांडुरंगा । केला कांहीं मागायाची । नव्हती गरज ॥३॥
 
३०१२
 
माझ्या भावें केली जोडी । न सरेसी कल्पकोडी । आणियेलें धाडी । घालुनि अवघें वैकुंठ ॥१॥
 
आतां न लगे यावें जावें । कोठें कांहीं च करावें । जन्मोजन्मीं खावें । सुखें बैसोनसें जालें ॥ध्रु.॥
 
असंख्य संख्या नाहीं पार । आनंदें दाटलें अंबर । न माये अपार । त्रिभुवनीं सांटवितां ॥२॥
 
अवघें भरलें सदोदित । जाले सुखाचे पर्वत । तुकयाबंधु म्हणे परमार्थ । धन अद्भुत सांपडलें ॥३॥
 
३०१३
 
आतां चुकलें देशावर । करणें अकरणें सर्वत्र । घरासी आगर । आला सकळसद्धिींचा ॥१॥
 
जालों निधाईं निधानें। लागलें अनंतगुणरत्न । जन्माचें विच्छिन्न । दुःख जालें दारिद्र ॥ध्रु.॥
 
तारूं सागरिंचें अवचितें । हेंदोवलें आलें येथें । ओढिलें संचितें । पूर्वदत्तें लाधलें ॥२॥
 
तुकयाबंधु म्हणे सीमा । नाहीं आमुचिया दैवा । आतां पुरुषोत्तमा । ऐसा सवदागर सांपडला ॥३॥
 
३०१४
 
सांपडलें जुनें । आमुच्या वडिलांचें ठेवणें । केली नारायणें । कृपा पुण्यें पूर्वाचिया ॥१॥
 
सुखें आनंदरूप आतां । आम्ही आहों याकरितां । निवारली चिंता । देणें घेणें चुकलें ॥ध्रु.॥
 
जालें भांडवल घरिंचें । अमुप नाम विठ्ठलाचें । सुकृत भावाचें । हें तयानें दाविलें ॥२॥
 
तुकयाबंधु म्हणे फिटला । पांग नाहीं बोलायाला । चाड दुसरी विठ्ठ्ला । वांचूनियां आणीक ॥३॥ ॥३७॥
 
३०१५
 
काम क्रोध अहंकार नको देहीं । आशा तृष्णा माया लज्जा चिंता कांहीं ।
 
वास पंढरीचा जन्म सदा देई । आणीक दुजें मागणें तुज नाहीं ॥१॥
 
कृपा देई दान हरि मज कृपा देई दान । नासीं त्रिमिर दाखवीं चरण ।
 
आर्त पुरवावें भेटी देऊन । नको उपेक्षूं आलिया शरण ॥ध्रु.॥
 
नाम अखंड हृदयीं राहो वाणी । न पडो विसर क्षण ज्यागृतिं स्वप्नीं ।
 
संतसमागम ऐसा दे लावुनि । आणीक दुजें कांहीं नेणें तुजवांचूनि ॥२॥
 
पंथपुरिंचा रविसुत पुरे आतां । आड करावा भवसिंधु ऐसा नव्हता ।
 
नाहीं आडताळा त्रैलाक्यामाजी सरता । विनवी तुकयाबंधु चरणीं ठेवूनि माथा ॥३॥
 
३०१६
 
तटाचे जातीला नाहीं भीड भार । लाता मारी थोर लाहान नेणे ॥१॥
 
परी तो त्या विशेष मानुष होऊन । करी खंड मान वडिलांचा ॥ध्रु.॥
 
बेरसा गाढव माया ना बहीण । भुंके चवीविण भलतें चि ॥२॥
 
तुकयाबंधु म्हणे बोकड मातलें । न विचारी आपुले तोंडीं मुते ॥३॥
 
३०१७
 
मायझवा खर गाढवाचें बीज । तें ऐसें सहज कळों येतें ॥१॥
 
आपमानिलें जेणें श्रेष्ठाचें वचन । ते चि त्याची खुण ओळखावी ॥ध्रु.॥
 
मद्यपीर पुरा अधम यातीचा । तया उपदेशाचा राग वांयां ॥२॥
 
तुकयाबंधु म्हणे पिसाळलें सुनें । आप पर तेणें न विचारावें ॥३॥
 
३०१८
 
मत्स्यकूर्मशेषा कोणाचा आधार । पृथिवीचा भार वाहावया ॥१॥
 
काय धाक आम्हां कासयाची चिंता । ऐसा तो असतां साहाकारी ॥ध्रु.॥
 
शंखचक्रगदा आयुधें अपार । वागवितो भार भक्तांसाटीं ॥२॥
 
पांडवां जोहरी राखिलें कुसरी । तो हा बंधुचा कैवारी तुकयाच्या ॥३॥
 
३०१९
 
राम म्हणतां कामक्रोधांचें दहन । होय अभिमान देशधडी ॥१॥
 
राम म्हणतां कर्म तुटेल भवबंधन । नये श्रम सीण स्वप्नास ही ॥ध्रु.॥
 
राम म्हणे जन्म नाहीं गर्भवास । नव्हे दारिद्रास पात्र कधीं ॥२॥
 
राम म्हणतां यम शरणागत बापुडें । आढळ पद पुढें काय तेथें ॥३॥
 
राम म्हणतां धर्म घडतील सकळ । त्रिमिर पडळ नासे हेळा ॥४॥
 
राम म्हणतां म्हणे तुकयाचा बंधु । तरिजेल भवसिंधु संदेह नाहीं ॥५॥
 
३०२०
 
मरोनि जाईंन गुणनामावरूनि । तुझ्या चक्रपाणी मायबापा ॥१॥
 
चुकविलीं दुःखें मायेचा वोळसा । तोडोनियां आशापाश तेणें ॥ध्रु.॥
 
केली काया तनु हिंवसी शीतळ । चिंतातळमळ नाहीं ऐसी ॥२॥
 
काळें तोंड काळ करूनि राहिलें । भूतमात्र जालें सज्जनसखें ॥३॥
 
तुकयाबंधु म्हणें अवघ्या देशदिशा । मुक्त रे परेशा तुझ्या पुण्यें ॥४॥
 
३०२१
 
आतां मागतों तें ऐक नारायणा । भावपूर्वक मनापासूनियां ॥१॥
 
असों दे मोकळी जिव्हा जरि गाइल गुण । नाहीं तरी खिळुन टाकीं परती ॥ध्रु.॥
 
मातेचिया परी देखती परनारी । ठेवीं नेत्र तरी नाहीं तरि नको ॥२॥
 
तरी बरें कांटाळा करिती निंदास्तुतीचा । नाहीं तरि कानांचा ही देख प्रेत्न ॥३॥
 
सकळ इंद्रियांचा निग्रह करूनि एक । राखवीं पृथक तोडोनि भ्रम ॥४॥
 
तुकयाबंधु म्हणे ते चि वाट प्राणां । पडता नारायणा विसर तुझा ॥५॥
 
३०२२
 
नमस्कारी भूतें विसरोनि याती । तेणें आत्मस्थिती जाणीतली ॥१॥
 
परउपकारीं वेचियेल्या शक्ती । तेणें आत्मस्थिती जाणीतली ॥ध्रु.॥
 
द्वयें द्वैतभाव नाहीं जया चत्तिीं । तेणें आत्मस्थिती जाणीतली ॥२॥
 
जयाचिये वाचे नये निंदास्तुती । तेणें आत्मस्थिती जाणीतली ॥३॥
 
उचित अनुचित जाणे धर्मनीती । दृढ भाव भक्ति मानव तो ॥४॥
 
तुकयाबंधु म्हणे वरकड ते येर । संसाराचे खर भारवाही ॥५॥
 
३०२३
 
चवदा भुवनें लोक तिन्हीं दाढे जो कवळी । संपुष्ट तो संबळीमध्यें देखा ॥१॥
 
उत्पत्तिसंहारकरिता जो पाळण । तो नंदा नंदन म्हणवीतसे ॥ध्रु.॥
 
असुर तोडरी दैत्यांचा काळ । जाला द्वारपाळ बळीचा तो ॥२॥
 
लक्षुमीचा स्वामी क्षीराच्या सागरा । उच्छिष्टकवळा पसरी मुख ॥३॥
 
तुकयाबंधु म्हणे चतुरांचा रावो । भावें तो पाहा हो केला वेडा ॥४॥
 
३०२४
 
कोण या पुरुषार्थाची गति । आणियेला हातोहातीं ।
 
जाहाज पृथ्वीपति । केली ख्याती अद्भुत ॥१॥
 
भला रे पुंडलिका भला । महिमा नव जाये वर्णिला ।
 
दगा देउनि अवघियांला । सांटविलें अविनाश ॥ध्रु.॥
 
केलें एके घरीं केणें । भरलीं सदोदित दुकानें ।
 
दुमदुमिलीं सुखानें । हे भाग्याची पंढरी ॥२॥
 
तुकयाबंधु म्हणे किल्ल्या । संताचे हातीं दिल्या ।
 
आंगावेगळें आपुल्या । टाकुनि जाला मेहेमान ॥३॥
 
३०२५
 
पाहा हो कलिचें महिमान । असत्यासी रिझलें जन ।
 
पापा देती अनुमोदन । करिती हेळण संतांचे ॥१॥
 
ऐसें अधर्माचें बळ । लोक झकविले सकळ ।
 
केलें धर्माचें निर्मूळ । प्रळयकाळ आरंभला ॥ध्रु.॥
 
थोर या युगाचें आश्चर्य । ब्रम्हकर्म उत्तम सार ।
 
सांडूनियां द्विजवर । दावलपीर स्मरताती ॥२॥
 
ऐसे यथार्थाचे अनर्थ । जाला बुडाला परमार्थ ।
 
नाहीं जाली ऐसी नीत । हा हा भूत पातलें ॥३॥
 
शांति क्षमा दया । भावभक्ति सित्क्रया ।
 
ठाव नाहीं सांगावया । सत्वधैर्य भंगिलें ॥४॥
 
राहिले वर्णावर्णधर्म । अन्योन्य विचरती कर्म ।
 
म्हणवितां रामराम । श्रम महा मानिती ॥५॥
 
थेर भोरपाचे विशीं । धांवती भूतें आविसा तैसीं ।
 
कथा पुराण म्हणतां सिसी । तिडीक उठी नकर्‍याचे ॥६॥
 
विषयलोभासाटीं । सर्वार्थेसीं प्राण साटी ।
 
परमार्थी पीठ मुठी । मागतां उठती सुनींसीं ॥७॥
 
धनाढए देखोनि अनामिक । तयातें मनिती आवश्यक ।
 
अपमानिले वेदपाठक । सात्विक शास्त्रज्ञ संपन्न ॥८॥
 
पुत्र ते पितियापाशीं । सेवा घेती सेवका ऐसी ।
 
सुनांचिया दासी । सासा जाल्या आंदण्या ॥९॥
 
खोटें जालें आली विंवसी । केली मर्यादा नाहींसी ।
 
भ्रतारें तीं भार्यासी । रंक तैसीं मानिती ॥१०॥
 
नमस्कारावया हरिदासां । लाजती धरिती कांहीं गर्वसा ।
 
पोटासाटीं खौसा । वंदिती मलिंछाच्या ॥११॥
 
बहुत पाप जालें उचंबळ । उत्तम न म्हणती चांडाळ।
 
अभक्ष भिक्षती विटाळ । कोणी न धरी कोणाचा ॥१२॥
 
कैसें जालें नष्ट वर्तमान । एकादशीस खाती अन्न ।
 
विडे घेऊनि ब्राम्हण । अविंदवाणी वदताती ॥१३॥
 
कामिनी विटंबिल्या कुळवंती । वदनें दासीचीं चुंबिती ।
 
सोवळ्याच्या स्फीती । जगीं मिरविती पवित्रता ॥१४॥
 
मद्यपानाची सुराणी । नवनीता न पुसे कोणी ।
 
केळवती व्यभिचारिणी । दैन्यवाणी पतिव्रता ॥१५॥
 
केवढी दोषाची सबळता । जाली पाहा हो भगवंता ।
 
पुण्य धुडावोनी संता । तीर्थां हरी आणिली ॥१६॥
 
भेणें मंद जाल्या मेघवृष्टि । आकांतली कांपे सृष्टि ।
 
देव रिगाले कपाटीं । आटाआटी प्रवर्तली ॥१७॥
 
अपीक धान्यें दिवसें दिवसें । गाईं म्हैसी चेवल्या गोरसें ।
 
नगरें दिसती उध्वंसें । पिकलीं बहुवसें पाखांडें ॥१८॥
 
होम हरपलीं हवनें । यज्ञयाग अनुष्ठानें ।
 
जपतपादिसाधनें । आचरणें भ्रष्टलीं ॥१९॥
 
अठरा यातींचे व्यापार। करिती तस्कराईं विप्र ।
 
सांडोनियां शुद्ध शुभ्र । वस्त्रें निळी पांघरती ॥२०॥
 
गीता लोपली गायत्री । भरले चमत्कार मंत्रीं ।
 
अश्वाचियापरी । कुमारी विकिती वेदवक्ते ॥२१॥
 
वेदाध्ययनसंहितारुचि । भकाद्या करिती तयांची ।
 
आवडी पंडितांची । मुसाफावरी बैसली ॥२२॥
 
मुख्य सर्वोत्तम साधनें । तीं उच्छेदुनि केलीं दीनें ।
 
कुडीं कापटें महा मोहनें । मिरविताती दुर्जन ॥२३॥
 
कळाकुशळता चतुराईं । तर्कवादी भेद निंदेठायीं ।
 
विधिनिषेधाचा वाही । एक ही ऐसीं नाडलीं ॥२४॥
 
जे संन्यासी तापसी ब्रम्हचारी । होतां वैरागी दिगांबर निस्पृही वैराग्यकारी ।
 
कामक्रोधें व्यापिले भारी । इच्छाकरीं न सुटती ॥२५॥
 
कैसें विनाशकाळाचें कौतुक । राजे जाले प्रजांचे अंतक ।
 
पिते पुत्र सहोदर । एकाएक शत्रुघातें वर्त्तती ॥२६॥
 
केवढी ये रांडेची अंगवण । भ्रमविलें अवघें जन ।
 
याती अठरा चार्‍ही वर्ण । कर्दम करूनि विटाळले ॥२७॥
 
पूवाअहोतें भविष्य केलें । संतीं ते यथार्थ जालें ।
 
ऐकत होतों ते देखिलें ।प्रत्यक्ष लोचनीं ॥२८॥
 
आतां असो हें आघवें । गति नव्हे कळीमध्येंवागवरावें ।
 
देवासी भाकोनि करुणावें । वेगें स्मरावें अंतरीं ॥२९॥
 
अगा ये वैकुंठानायका । काय पाहातोसि या कौतुका ।
 
धांव कलीनें गांजिलें लोकां । देतो हाका सेवक तुकयाचा ॥३०॥
 
३०२६
 
केली हार्णाळां अंघोळी । येऊनि बैसलों राउळीं॥१॥
 
अजिचें जाले भोजन । राम कृष्ण नारायण ॥२॥
 
तुकयाबंधु म्हणे नास । नाहीं कल्पांती जयास ॥३॥
 
॥१२॥
 
३०२७
 
तुजलागीं माझा जीव जाला पिसा । अवलोकितों दिशा पांडुरंगा ॥१॥
 
सांडिला वेव्हार माया लोकाचार । छंद निरंतर हा चि मनीं ॥ध्रु.॥
 
आइकिलें कानीं तें रूप लोचन । देखावया सीण करिताति ॥२॥
 
प्राण हा विकळ होय कासावीस । जीवनाविण मत्स्य तयापरी ॥३॥
 
तुका म्हणे आतां कोण तो उपाव । करूं तुझे पाव आतुडे तो ॥४॥
 
३०२८
 
कोणे गांवीं आहे सांगा हा विठ्ठल । जरी ठावा असेल तुम्हां कोणा ॥१॥
 
लागतसें पायां येतों लोटांगणीं । मात तरी कोणी सांगा याची ॥ध्रु.॥
 
गुण रूप याचे वाणिती या संतां । मज क्षेम देतां सुख वाटे ॥२॥
 
सर्वस्वें हा जीव ठेवीन चरणीं । पांडुरंग कोणी दावी तया ॥३॥
 
तुका म्हणे गाईंवत्सा तडातोडी । तैसी जाते घडी एकी मज ॥४॥
 
३०२९
 
एकाचिये सोईं कवित्वाचे बांधे । बांधिलिया साध्य काय तेथें ॥१॥
 
काय हातीं लागे भुसाचे कांडणीं । सत्यासी दाटणी करुनि काय ॥ध्रु.॥
 
कवित्वाचे रूढी पायां पाडी जग । सुखावोनि मग नरका जाय ॥२॥
 
तुका म्हणे देव केल्याविण साहे । फजिती आहे लटिक्या अंगीं ॥३॥
 
३०३०
 
भल्याचें दरुषण । तेथें शुभ चि वचन ॥१॥
 
बोलावी हे धर्मनीत । क्षोभें होत नाहीं हित ॥ध्रु.॥
 
मर्यादा ते बरी । वेळ जाणावी चतुरीं ॥२॥
 
तुका म्हणे बहु । लागे ऐसें बरें मऊ ॥३॥
 
३०३१
 
आवडीनें धरिलीं नांवें । प्रियभावें चिंतन ॥१॥
 
वेडा जाला वेडा जाला । लांचावला भक्तीसी ॥ध्रु.॥
 
निचाड्या चाड धरी । तुळसी करीं दळ मागे ॥२॥
 
धरिला मग न करी बळ । तुका म्हणे कळ पायीं ॥३॥
 
३०३२
 
कंठीं राहो नाम । अंगीं भरोनियां प्रेम ॥१॥
 
ऐसें द्यावें कांहीं दान । आलों पतित शरण ॥ध्रु.॥
 
संतांचिये पायीं । वेळोवेळां ठेवीं डोईं ॥२॥
 
तुका म्हणे तरें । भवसिंधु एका सरें ॥३॥
 
३०३३
 
विठ्ठल विठ्ठल येणें छंदें । ब्रम्हानंदें गर्जावें ॥१॥
 
वाये टाळ टाळ्याटाळी । होइल होळी विघ्नांची ॥ध्रु.॥
 
विठ्ठल आद्ये अवसानीं । विठ्ठल मनीं स्मरावा ॥२॥
 
तुका म्हणे विठ्ठलवाणी । वदा कानीं आईंका ॥३॥
 
३०३४
 
पंढरीचे वारकरी । ते अधिकारी मोक्षाचे ॥१॥
 
पुंडलिका दिला वर । करुणाकरें विठ्ठलें ॥ध्रु.॥
 
मूढ पापी जैसे तैसे । उतरी कासे लावूनि ॥२॥
 
तुका म्हणे खरें जालें । एका बोलें संतांच्या ॥३॥
 
३०३५
 
अमृताचीं फळें अमृताची वेली । ते चि पुढें चाली बीजाची ही ॥१॥
 
ऐसियांचा संग देई नारायणा । बोलावा वचना जयांचिया ॥ध्रु.॥
 
उत्तम सेवन सितळ कंठासी । पुष्टी कांती तैसी दिसे वरी ॥२॥
 
तुका म्हणे तैसें होइजेत संगें । वास लागे अंगें चंदनाच्या ॥३॥
 
३०३६
 
पंढरीसी जा रे आलेनो संसारा । दीनाचा सोयरा पांडुरंग ॥१॥
 
वाट पाहे उभा भेटीची आवडी । कृपाळूं तांतडी उतावीळ ॥ध्रु.॥
 
मागील परिहार पुढें नेहे सीण । जालिया दर्षणें एकवेळा ॥२॥
 
तुका म्हणे नेदी आणिकांचे हातीं । बैसला तो चत्तिीं निवडेना ॥३॥
 
३०३७
 
न कळे तें कळों येईंल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥१॥
 
न दिसे तें दिसों येईंल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥ध्रु.॥
 
न बोलों तें बोलों येईंल उगलें । नामें या विठ्ठलें एकाचिया ॥२॥
 
न भेटे तें भेटों येईंल आपण । करितां चिंतन विठोबाचें ॥३॥
 
अलभ्य तो लाभ होईंल अपार । नाम निरंतर म्हणतां वाचे ॥४॥
 
तुका म्हणे आसक्त जीव सर्वभावें । तरतील नांवें विठोबाच्या ॥५॥
 
३०३८
 
बहुजन्में केला लाग । तो हा भाग लाधलों ॥१॥
 
जीव देइन हा बळी । करीन होळी संसारा ॥ध्रु.॥
 
गेलें मग नये हाता । पुढती चिंता वाटतसे ॥२॥
 
तुका म्हणे तांतड करूं । पाय धरूं बळकट ॥३॥
 
३०३९
 
भक्तिप्रेमसुख नेणवे आणिकां । पंडित वाचकां ज्ञानियांसी ॥१॥
 
आत्मनिष्ठ जरी जाले जीवन्मुक्त । तरी भक्ति सुख दुर्लभ त्यां ॥२॥
 
तुका म्हणे कृपा करिल नारायण । तरि च हें वर्म पडे ठायीं ॥३॥
 
३०४०
 
दुधाळ गाढवी जरी जाली पाहे । पावेल ते काय धेनुसरी ॥१॥
 
कागाचिया गळा पुष्पाचिया माळा । हंसाची तो कळा काय जाणे ॥ध्रु.॥
 
मर्कटें अंघोळी लावियेले टिळे । ब्राम्हणाचे लीळे वर्तूं नेणे ॥२॥
 
जरी तो ब्राम्हण जाला कर्मभ्रष्ट । तुका म्हणे श्रेष्ठ तिहीं लोकीं ॥३॥
 
३०४१
 
देव भक्तालागीं करूं नेदी संसार । अंगें वारावार करोनि ठेवी ॥१॥
 
भाग्य द्यावें तरी अंगीं भरे ताठा । म्हणोनि करंटा करोनि ठेवी ॥ध्रु.॥
 
स्त्री द्यावी गुणवंती नसती गुंते आशा । यालागीं कर्कशा पाठी लावी ॥२॥
 
तुका म्हणे मज प्रचित आली देखा । आणीक या लोकां काय सांगों ॥३॥
 
३०४२
 
वाघें उपदेशिला कोल्हा । सुखें खाऊं द्यावें मला ॥१॥
 
अंतीं मरसी तें न चुके । मज ही मारितोसी भुके ॥ध्रु.॥
 
येरू म्हणे भला भला । निवाड तुझ्या तोंडें जाला ॥२॥
 
देह तंव जाणार । घडेल हा उपकार ॥३॥
 
येरू म्हणे मनीं । ऐसें जावें समजोनि ॥४॥
 
गांठी पडली ठका ठका । त्याचा धर्म बोले तुका ॥५॥
 
३०४३
 
जेथें आठवती स्वामीचे ते पाय । उत्तम ते ठाय रम्य स्थळ ॥१॥
 
रान अथवा घर एकांत लोकांत । समाधान चत्ति तें ते घडी ॥ध्रु.॥
 
धन्य तो हा काळ सरे आनंदरूप । वाहातां संकल्प गोविंदाचे ॥२॥
 
तुका म्हणे लाभकाळ ते चि जीणें । भाग्य नारायण उत्तम तें ॥३॥
 
३०४४
 
तुज न भें मी कळिकाळा । मज नामाचा जिव्हाळा ॥१॥
 
माझा बळिया नेणसी कोण । संतां साहे नारायण ॥ध्रु.॥
 
शंख वधिला सागरीं । वेद घेउनि आला चारी ॥२॥
 
कूर्में दैत्य वधिला जेठी । हात पाय लपवी पोटीं ॥३॥
 
वाराहरूप धरिलें गाढें । धरा प्रतापें धरिली दाढे ॥४॥
 
हिरण्यकश्यप विदारिला । भक्त प्रल्हाद रक्षिला ॥५॥
 
वामन जाला दिनानाथ । बळी पाताळीं घातला दैत्य ॥६॥
 
छेदुनियां सहस्र भुजा । कामधेनु आणिली वोजा ॥७॥
 
शिळा प्रतापें सागरीं तारी । स्थापी बिभीषण रावण मारी ॥८॥
 
मारोनियां कंसराव । पिता सोडविला वसुदेव ॥९॥
 
पांचाळीसी गांजितां वैरी । वस्त्रें आपण जाला हरी ॥१०॥
 
गजेंद्र स्मरे राम राम । त्यासी पाववी वैकुंठधाम ॥११॥
 
तुका म्हणे हरिरूप जाले । पुन्हा जन्मा नाहीं आले ॥१२॥
 
३०४५
 
सर्वा भूतीं द्यावें अन्न । द्रव्य पात्र विचारोन । उपतिष्ठे कारण । तेथें बीज पेरीजे ॥१॥
 
पुण्य करितां होय पाप । दुग्ध पाजोनि पोशिला साप । करोनि अघोर जप । दुःख विकत घेतलें ॥ध्रु.॥
 
भूमी पाहातां नाहीं वेगळी । माळ बरड एक काळी । उत्तम निराळी । मध्यम कनिष्ठ ॥२॥
 
म्हणोनि विवेकें । कांहीं करणें निकें । तुका म्हणे फिकें । रुची नेदी मिष्टान्न ॥३॥
 
३०४६
 
देवावरी भार । वृत्ति अयाचित सार ॥१॥
 
देह देवाचे सांभाळी । सार योजे यथाकाळीं ॥ध्रु.॥
 
विश्वासीं निर्धार । विस्तारील विश्वंभर ॥२॥
 
तुका म्हणे व्हावें । बळ एक चि जाणावें ॥३॥
 
३०४७
 
वर्त्ततां बासर । काय करावें शरीर ॥१॥
 
ठेवा नेमून नेमून । माझें तुमचे पायीं मन ॥ध्रु.॥
 
नेदाविया वृत्ती । कोठें फांकों चि श्रीपती ॥२॥
 
तुका म्हणे भले । जन्मा येऊनियां जाले ॥३॥
 
३०४८
 
केली प्रज्ञा मनाशीं । तई मी दास सत्यत्वेशीं । नेईंन पायांपाशीं । स्वामी मूळ पंढरिये ॥१॥
 
तोंवरी हें भरीं पोट । केला तो मिथ्या बोभाट । नाहीं सांपडली वाट । सइराट फिरतसें ॥ध्रु.॥
 
ज्यावें आदराचें जिणें । स्वामी कृपा करी तेणें । पाळिल्या वचनें । सख्यत्वाचा अनुभव ॥२॥
 
घडे तैसें घडो आतां । मायबापाची सत्ता । तुका म्हणे चिंता । काय पाहें मारगा ॥३॥
 
३०४९
 
नेत्र झाकोनियां काय जपतोसी । जंव नाहीं मानसीं भावप्रेम ॥१॥
 
उघडा मंत्र जाणा राम कृष्ण म्हणा । तुटती यातना गर्भवास ॥ध्रु.॥
 
मंत्र यंत्र कांहीं करिसी जडी बुटी । तेणें भूतसृष्टी पावशील ॥२॥
 
सार तुका जपे बीजमंत्र एक । भवसिंधुतारक रामकृष्ण ॥३॥
 
३०५०
 
संत मारगीं चालती । त्यांची लागो मज माती ॥१॥
 
काय करावीं साधनें । काय नव्हे एक तेणें ॥ध्रु.॥
 
शेष घेईंन उच्छिष्ट । धाय धणीवरी पोट ॥२॥
 
तुका म्हणे संतां पायीं । जीव ठेविला निश्चयीं ॥३॥
 

३०५१
 
जैसें तैसें बाळ मातेसी आवडे । बोलतां बोबडे शब्द गोड ॥१॥
 
आपुले आवडी लेववी खाववी । पाहोनियां जीवीं सुख वाटे ॥२॥
 
तुका म्हणे काय देऊं परिहार । काय ते साचार जाणतसें ॥३॥
 
३०५२
 
देवाचिया वस्त्रा स्वप्नीं ही नाठवी । स्त्रियेसी पाठवी उंच साडी ॥१॥
 
गाईंचें पाळण नये चि विचारा । अश्वासी खरारा करी अंगें ॥ध्रु.॥
 
लेकराची रास स्वयें धांवें क्षाळूं । न म्हणे प्रक्षाळूं द्विजपायां ॥२॥
 
तुका म्हणे त्याच्या तोंडावरि थुंका । जातो यमलोका भोगावया ॥३॥
 
३०५३
 
उरा लावी उर आळंगितां कांता । संतासी भेटतां अंग चोरी ॥१॥
 
अतीत देखोनि होय पाठमोरा । व्याह्यासी सामोरा जाय वेगीं ॥ध्रु.॥
 
द्विजा नमस्कारा मनीं भाव कैचा । तुकाऩचे दासीचा लेंक होय ॥२॥
 
तुका म्हणे तुम्ही क्रोधासी न यावें । स्वभावा करावें काय कोणीं ॥३॥
 
३०५४
 
ब्रम्हज्ञान जरी कळें उठाउठी । तरि कां हिंपुटी वेदशास्त्रें ॥१॥
 
शास्त्रांचे भांडण जप तीर्थाटणें । उर्वीचें भ्रमण या च साटीं ॥ध्रु.॥
 
याचसाटीं जप याचसाटीं तप । व्यासें ही अमुप ग्रंथ केले ॥२॥
 
या च साटीं संतपाय हे सेवावे । तरि च तरावें तुका म्हणे ॥३॥
 
३०५५
 
गायत्री विकोन पोट जे जाळिती । तया होय गति यमलोकीं ॥१॥
 
कन्येचा जे नर करिती विकरा । ते जाती अघोरा नरकपाता ॥ध्रु.॥
 
नाम गाऊनियां द्रव्य जे मागती । नेणों तयां गति कैसी होय ॥२॥
 
आमुचा सांगाती आहे तो श्रीहरि । न लगे दुराचारी तुका म्हणे ॥३॥
 
३०५६
 
साधूच्या दर्शना लाजसी गव्हारा । वेश्येचिया घरा पुष्पें नेसी ॥१॥
 
वेश्या दासी मुरळी जगाची वोंवळी । ते तुज सोंवळी वाटे कैशी ॥२॥
 
तुका म्हणे आतां लाज धरीं बुच्या । टांचराच्या कुच्या मारा वेगीं ॥३॥
 
३०५७
 
राउळासी जातां त्रास मानी मोठा । बैसतो चोहोटां आदरेशीं ॥१॥
 
न करी स्नान संध्या म्हणे रामराम । गुरुगुडीचे प्रेम अहर्निशी ॥ध्रु.॥
 
देवाब्राम्हणासी जाईंना शरण । दासीचे चरण वंदी भावें ॥२॥
 
सुगंध चंदन सांडोनियां माशी । बसे दुगपधीशीं अतिआदरें ॥३॥
 
तुका म्हणे अरे ऐक भाग्यहीना । कां रे रामराणा विसरसी ॥४॥
 
३०५८
 
दुर्बुद्धि ते मना । कदा नुपजो नारायणा ॥१॥
 
आतां ऐसें करीं । तुझे पाय चत्तिीं धरीं ॥ध्रु.॥
 
उपजला भाव । तुमचे कृपे सद्धिी जावो ॥२॥
 
तुका म्हणे आतां । लाभ नाहीं या परता ॥३॥
 
३०५९
 
तरुवर बीजा पोटीं । बीज तरुवरा सेवटीं ॥१॥
 
तैसें तुम्हां आम्हां जालें । एकीं एक सामावलें ॥ध्रु.॥
 
उदकावरील तरंग । तरंग उदकाचें अंग ॥२॥
 
तुका म्हणे बिंबच्छाया । ठायीं पावली विलया ॥३॥
 
३०६०
 
साकरेच्या गोण्या बैलाचिये पाठी । तयासी सेवटीं करबाडें ॥१॥
 
मालाचे पैं पेटे वाहाताती उंटें । तयालागीं कांटे भक्षावया ॥ध्रु.॥
 
वाउगा हा धंदा आशा वाढविती । बांधोनियां देती यमा हातीं ॥२॥
 
ज्यासी असे लाभ तो चि जाणे गोडी । येर तीं बापुडीं सिणलीं वांयां ॥३॥
 
तुका म्हणे शहाणा होई रे गव्हारा । चोर्‍यासीचा फेरा फिरों नको ॥४॥
 
३०६१
 
चिरगुटें घालूनि वाढविलें पोट । गर्‍हवार बोभाट जनामध्यें ॥१॥
 
लटिके चि डोहळे दाखवी प्रकार । दुध स्तनीं पोर पोटीं नाहीं ॥२॥
 
तुका म्हणे अंतीं वांज चि ते खरी । फजिती दुसरी जनामध्यें ॥३॥
 
३०६२
 
माझी सर्व चिंता आहे विठोबासी । मी त्याच्या पायांसी न विसंभें ॥१॥
 
विसरतां रूप क्षण एक चत्तिीं । जिवलग मूर्ती सांवळी ते ॥ध्रु.॥
 
विसरतां हरी क्षण एक घडी । अंतरली जोडी लक्षलाभ ॥२॥
 
तुका म्हणे माझ्या विठोबाचे पाये । संजीवनी आहे हृदयामाजी ॥३॥
 
३०६३
 
काय तीं करावीं मोलाचीं माकडें । नाचत ती पुढें संसाराच्या ॥१॥
 
झाडा देतेवेळे विचकिती दांत । घेती यमदूत दंडवरी ॥ध्रु.॥
 
हात दांत कान हलविती मान । दाखविती जन मानावया ॥२॥
 
तुका म्हणे किती जालीं हीं फजित । मागें नाहीं नीत भारवाही ॥३॥
 
३०६४
 
थोर ती गळाली पाहिजे अहंता । उपदेश घेतां सुख वाटे ॥१॥
 
व्यर्थ भराभर केलें पाठांतर । जोंवरी अंतर शुद्ध नाहीं ॥ध्रु.॥
 
घोडें काय थोडें वागवितें ओझें । भावेंविण तैसें पाठांतर ॥२॥
 
तुका म्हणे धरा निष्ठावंत भाव । जरी पंढरीराव पाहिजे तो॥३॥
 
३०६५
 
जाय जाय तूं पंढरी । होय होय वारकरी ॥१॥
 
सांडोनियां वाळवंट । काय इच्छिसी वैकुंठ ॥ध्रु.॥
 
खांद्या पताकांचे भार । तुळसीमाळा आणि अबीर ॥२॥
 
साधुसंतांच्या दाटणी । तुका जाय लोटांगणीं ॥३॥
 
३०६६
 
जगीं ऐसा बाप व्हावा । ज्याचा वंश मुक्तिस जावा ॥१॥
 
पोटा येतां हरलें पापा । ज्ञानदेवा मायबापा ॥ध्रु.॥
 
मुळीं बाप होता ज्ञानी । तरी आम्ही लागलों ध्यानीं ॥२॥
 
तुका म्हणे मी पोटींचें बाळ । माझी पुरवा ब्रम्हींची आळ ॥३॥
 
३०६७
 
संतांच्या हेळणे बाटलें जें तोंड । प्रत्यक्ष तें कुंड चर्मकाचें ॥१॥
 
भेसळीचें वीर्य ऐशा अनुभवें । आपुलें परावें नाहीं खळा ॥ध्रु.॥
 
संतांचा जो शोध करितो चांडाळ । धरावा विठाळ बहु त्याचा ॥२॥
 
तुका म्हणे केली प्रज्ञा या च साटीं । कांहीं माझे पोटीं शंका नाहीं ॥३॥
 
३०६८
 
बहु टाळाटाळी । होतां भोवताहे कळी ॥१॥
 
बरें नव्हेल सेवटीं । भय असों द्यावें पोटीं ॥ध्रु.॥
 
मुरगाळी कान । घुसमाडील सावधान ॥२॥
 
अबोलणा तुका । ऐसें कोणी लेखूं नका ॥३॥
 
३०६९
 
जिव्हे जाला चळ । नेये अवसान ते पळ ॥१॥
 
हें चि वोसनावोनी उठी । देव सांटविला पोटीं ॥ध्रु.॥
 
नाहीं ओढा वारा । पडिला प्रसंग तो बरा ॥२॥
 
तुका म्हणे जाली । मज हे अनावर बोली ॥३॥
 
३०७०
 
गोहो यावा गांवा । ऐसे नवस करी आवा ॥१॥
 
कैचें पुण्य तया गांठी । व्रतें वेची लोभासाटीं ॥ध्रु.॥
 
वाढावें संतान । गृहीं व्हावें धनधान्य ॥२॥
 
मागे गारगोटी । परिसाचीये साटोवाटी ॥३॥
 
तुका म्हणे मोल । देउन घेतला सोमवल ॥४॥
 
३०७१
 
बाळपणें ऐसीं वरुषें गेलीं बारा । खेळतां या पोरा नानामतें ॥१॥
 
विटू दांडू चेंडू लगोरया वाघोडीं । चंपे पेंड खडी एकीबेकी ॥ध्रु.॥
 
हमामा हुंबरी पकव्याच्या बारे । खेळे जंगीभोंवरे चुंबाचुंबी ॥२॥
 
सेलडेरा आणि निसरभोंवडी । उचली बाले धोंडी अंगबळें ॥३॥
 
तुका म्हणे ऐसें बाळपण गेलें । मग तारुण्य आलें गर्वमूळ ॥४॥
 
३०७२
 
तारुण्याच्या मदें न मनी कोणासी । सदा मुसमुसी खूळ जैसा ॥१॥
 
अंठोनी वेंठोनीं बांधला मुंडासा । फिरतसे म्हैसा जनामधीं ॥ध्रु.॥
 
हातीं दीडपान वरती च मान । नाहीं तो सन्मान भलियांसी ॥२॥
 
श्वानाचिया परी हिंडे दारोदारीं । पाहे परनारी पापदृष्टी ॥३॥
 
तुका म्हणे ऐसा थोर हा गयाळी । करितां टवाळी जन्म गेला ॥४॥
 
३०७३
 
म्हातारपणीं थेटे पडसें खोकला । हात कपाळाला लावुनि बैसे ॥१॥
 
खोबरियाची वाटी जालें असे मुख । गळतसे नाक श्लेष्मपुरी ॥ध्रु.॥
 
बोलों जातां शब्द नये चि हा नीट । गडगडी कंठ कफ भारी ॥२॥
 
सेजारी म्हणती मरेना कां मेला । आणिला कांटाळा येणें आम्हां ॥३॥
 
तुका म्हणे आतां सांडुनी सर्वकाम । स्मरा राम राम क्षणक्षणा ॥४॥
 
३०७४
 
जेथें कीर्तन करावें । तेथें अन्न न सेवावें ॥१॥
 
बुका लावूं नये भाळा । माळ घालूं नये गळां ॥ध्रु.॥
 
तटावृषभासी दाणा । तृण मागों नये जाणा ॥२॥
 
तुका म्हणे द्रव्य घेती । देती ते ही नरका जाती ॥३॥
 
३०७५
 
लंकेमाजी घरें किती तीं आइका । सांगतसें संख्या जैसीतैसी ॥१॥
 
पांच लक्ष घरें पाषाणांचीं जेथें । सात लक्ष तेथें विटेबंदी ॥ध्रु.॥
 
कोटि घरें जेथें कांशा आणि तांब्याचीं । शुद्ध कांचनाचीं सप्त कोटी ॥२॥
 
तुका म्हणे ज्याची संपदा एवढी । सांगातें कवडी गेली नाहीं ॥३॥
 
३०७६
 
व्यभिचारिणी गणिका कुंटणी । विश्वास चि मनीं राघोबाचा ॥१॥
 
ऐसी ही पापिणी वाइली विमानी । अचळ भुवनीं टेवियेली ॥ध्रु.॥
 
पतितपावन तिहीं लोकीं ठसा । कृपाळू कोंवसा अनाथांचा ॥२॥
 
तुका म्हणे विठोबाची धरा सोय । आणिक उपाय नेणों किती ॥३॥
 
३०७७
 
गजेंद्र तो हस्ती सहस्र वरुषें । जळामाजी नक्रें पीडिलासे ॥१॥
 
सुहुदव सांडिलें कोणी नाहीं साहे । अंतीं वाट पाहे विठो तुझी ॥ध्रु.॥
 
कृपेच्या सागरा माझ्या नारायणा । तया दोघांजणा तारियेलें ॥२॥
 
तुका म्हणे नेले वाऊनि विमानी । मी ही आईंकोनी विश्वासलों ॥३॥
 
३०७८
 
ब्रम्हयाचे वेद शंखासुरें नेले । त्यासाटीं धरिलें मत्स्यरूप ॥१॥
 
तेणें आत्मा नव्हता नेला ब्रम्हांडासी । काय ब्रम्हयासी नव्हतें ज्ञान ॥ध्रु.॥
 
परि तेणें धावा केला आवडीनें । जाले नारायण कृपासिंधु ॥२॥
 
तुका म्हणे विठोबा मी नामधारक । पोसनें सेवक भेटी देई ॥३॥
 
३०७९
 
देवीं आणि दैतीं सिंधू गुसळिला । भार पृथ्वीस जाला साहावेना ॥१॥
 
जालासी कासव धरिली पाठीवरी । चिंता तुज हरी सकळांची ॥ध्रु.॥
 
तये काळीं देव करिताती स्तुती । कृपाळु श्रीपती म्हणोनियां ॥२॥
 
तुका म्हणे ऐसे उदंड पवाडे । ज्यासी सहस्र तोंडें सिणला तो ही ॥३॥
 
३०८०
 
हिरण्याक्ष दैत्य मातला जे काळीं । वरदानें बळी शंकराच्या ॥१॥
 
इंद्रपदराज्य घेतलें हिरोनी । देवा चक्रपाणी म्हणती धांव ॥ध्रु.॥
 
तइं पांडुरंगा शूकर जालेती । तया दैत्यपती मारविले ॥२॥
 
तुका म्हणे ज्यांचीं राज्यें त्यांसी दिलीं । ऐसी तूं माउली पांडुरंगा ॥३॥
 
३०८१
 
प्रल्हादाकारणें नरसिंहीं जालासी । त्याचिया बोलासी सत्य केलें ॥१॥
 
राम कृष्ण गोविंदा नारायणा हरि । गर्जे राजद्वारीं भक्तराज ॥ध्रु.॥
 
विठ्ठल माधव मुकुंद केशव । तेणें दैत्यराव दचकला ॥२॥
 
तुका म्हणे तयां कारणें सगुण । भक्तांचें वचन सत्य केलें ॥३॥
 
३०८२
 
नामाचें सामर्थ्य कां रे दवडीसी । कां रे विसरसी पवाडे हे ॥१॥
 
खणखणां हाणती खर्ग प्रल्हादासी । न रुपे आंगासी किंचित ही ॥ध्रु.॥
 
राम कृष्ण हरी ऐसी मारी हाक । तेणें पडे धाक बळियासी ॥२॥
 
असों द्यावीं सामर्थ्या ऐसिया कीर्तीचीं । आवडी तुक्याची भेटी देई ॥३॥
 
३०८३
 
वाटीभर विष दिलें प्रल्हादासी । निर्भय मानसीं तुझ्याबळें ॥१॥
 
भोक्ता नारायण केलें तें प्राशन । प्रतापें जीवन जालें तुझ्या ॥ध्रु.॥
 
नामाच्या चिंतनें विषाचें तें आप । जाहालें देखत नारायणा ॥२॥
 
तुका म्हणे ऐसे तुझे बडिवार । सिणला फणीवर वर्णवेना ॥३॥
 
३०८४
 
अग्निकुंडामध्यें घातला प्रल्हाद । तरी तो गोविंद विसरेना ॥१॥
 
पितियासी म्हणे व्यापक श्रीहरि । नांदतो मुरारी सर्वां ठायीं ॥ध्रु.॥
 
अग्निरूपें माझा सखा नारायण । प्रल्हाद गर्जून हाक मारी ॥२॥
 
तुका म्हणे अग्नि जाहाला शीतळ । प्रताप सबळ विठो तुझा ॥३॥
 
३०८५
 
कोपोनियां पिता बोले प्रल्हादासी । सांग हृषीकेशी कोठें आहे ॥१॥
 
येरू म्हणे काष्ठीं पाषाणीं सकळीं । आहे वनमाळी जेथें तेथें ॥ध्रु.॥
 
खांबावरी लात मारिली दुर्जनें । खांबीं नारायण म्हणतां चि ॥२॥
 
तुका म्हणे कैसा खांब कडाडिला । ब्रम्हा दचकला सत्यलोकीं ॥३॥
 
३०८६
 
डळमळिला मेरु आणि तो मांदार । पाताळीं फणिवर डोईं झाडी ॥१॥
 
लोपे तेजें सूर्य आणीक हा चंद्र । कांपतसे इंद्र थरथरां ॥ध्रु.॥
 
ऐसें रूप उग्र हरीनें धरिलें । दैत्या मारियेलें मांडीवरी॥२॥
 
तुका म्हणे भक्तांकारणें श्रीहरि । बहु दुराचारी निर्दाळिले ॥३॥
 
३०८७
 
बहुत कृपाळु दीनाचा दयाळु । जगीं भक्तवत्सळु नाम तुझें ॥१॥
 
मानियेला चत्तिीं बळीचा उपकार । अझूनि त्याचें द्वार राखसील ॥ध्रु.॥
 
काय त्याच्या भेणें बैसलासी द्वारीं । नाहीं तुज हरि कृपा बहु ॥२॥
 
तुका म्हणे भक्तजनाची ममता । तुम्हांसी अनंता अलोलिक ॥३॥
 
३०८८
 
पांडुरंगा तुझे काय वाणूं गुण । पवाडे हे धन्य जगीं तुझे ॥१॥
 
दंडिलें दुर्वासा सुरा असुरानें । तो आला गार्‍हाणें सांगावया ॥ध्रु.॥
 
बळिचिये द्वारीं तुम्ही बैसलेती । दुर्वास विनंती करी भावें ॥२॥
 
तुका म्हणे कृपासागरा श्रीहरी । तुझी भक्तावरी प्रेमच्छाया ॥३॥
 
३०८९
 
दुर्वासया स्वामी गुंतलों भाकेसी । पुसा जा बळीसी निरोप द्यावा ॥१॥
 
त्याचे आज्ञेविण आम्हां येतां नये । द्वारपाळ राहें होऊनियां ॥ध्रु.॥
 
पुसे दुर्वासया बळीसी जाऊनि । येरू म्हणे झणी बोलों नका ॥२॥
 
तुका म्हणे केला अन्यत्राचा त्याग । तेव्हां पांडुरंग सखा जाला ॥३॥
 
३०९०
 
बळी म्हणे आजि दुर्वासया स्वामी । मागों नका तुम्ही नारायणा ॥१॥
 
बहुतां प्रयासीं जोडला श्रीहरी । बैसविला द्वारीं राखावया ॥ध्रु.॥
 
परतला दुर्वास मग हो तेथूनि । चिंतातुर मनीं उद्वेगला ॥२॥
 
काय तूं एकाचा आहेसी अंकित । होई कृपावंत तुका म्हणे ॥३॥
 
३०९१
 
त्रैलोकींचा नाथ सकळांचा आधार । बळिचें तुवां घर धरियेलें ॥१॥
 
आम्हां मोकलिलें कोणां निरविलें । कोणा हातीं दिले तिन्ही लोक ॥ध्रु.॥
 
अनाथांचा बंधु दासांचा कैवारी । ब्रिदें तुझीं हरी जाती वांयां ॥२॥
 
तुका म्हणे ऐसें बोलिला दुर्वास । वाटला संतोष पांडुरंगा ॥३॥
 
३०९२
 
बोलिलेती ते देवॠषी दुर्वासया । जाय पुसावया मागत्यानें ॥१॥
 
मागुता दुर्वास पुसे बळिराया । निरोप जावया देई देवा ॥ध्रु.॥
 
बळी म्हणे त्यासी जाय मी न म्हणें । जाईंल नारायण लागला ची ॥२॥
 
मजपाशीं राहें कोठें तरीं जाय । तुका म्हणे पाय न सोडीं मी ॥३॥
 
३०९३
 
दुर्वासें निरोप आणिला ये रिती । मग वाढलेती नारायणा ॥१॥
 
ठेविलें चरण बळिचिये द्वारीं । शीर अंगावरी लांबविलें ॥ध्रु.॥
 
पाडियेलें द्वार द्वारावतियेसी । वरि हृषीकेशी निघालेती ॥२॥
 
तेथूनियां नाम पडिलें द्वारका । वैकुंठनायका तुका म्हणे ॥३॥
 
३०९४
 
मुरुकुश दोन्ही मारिले आसुर । दुर्वास ॠषीश्वर सुखी केला ॥१॥
 
मारियेला मुरु म्हणोनी मुरारी । नाम तुझें हरी पडियेलें ॥ध्रु.॥
 
पूवाअहुनी ऐसा भक्तिप्रतिपाळ । केला त्वां सांभाळ नारायणा ॥२॥
 
तुका म्हणे ये चि वेळे काय जालें । कां सोंग धरिलें मोहनाचें ॥३॥
 
३०९५
 
गुरुपादाग्रींचें जळ । त्यास मानी जो विटाळ ॥१॥
 
संतीं वाळिला जो खळ । नरकीं पचे चिरकाळ ॥ध्रु.॥
 
गुरुतीर्थी अनमान । यथासांग मद्यपान ॥२॥
 
गुरुअंगुष्टा न चोखी । मुख घाली वेश्येमुखीं ॥३॥
 
तुका म्हणे सांगों किती । मुखीं पडो त्याचे माती ॥४॥
 
३०९६
 
वाढविलें कां गा । तुम्ही एवढें पांडुरंगा ॥१॥
 
काय होती मज चाड । एवढी करावया बडबड ॥ध्रु.॥
 
ब्रम्हसंतर्पण । लोकीं करावें कीर्तन ॥२॥
 
निमित्याचा धणी । तुका म्हणे नेणे कोणी ॥३॥
 
३०९७
 
साही शास्त्रां अतिदुरी तो परमात्मा श्रीहरि । तो दशरथाचे घरीं क्रीडतो राम ॥१॥
 
शिवाचें निजदेह वाल्मीकाचें निजगुहे । तो भिल्लटीचीं फळें खाय श्रीराम तो ॥ध्रु.॥
 
योगियांचे मनीं नातुडे चिंतनीं । वानरांचे कानीं गोष्टी सांगे ॥२॥
 
चरणीं शिळा उद्धरी नामें गणिका तारी । तो कोळिया घरीं पाहुणा राम ॥३॥
 
क्षण एक सुरवरा नातुडे नमस्कारा । तो रिसा आणि वानरा क्षम दे राम ॥४॥
 
राम सांवळा सगुण राम योगियाचें ध्यान । राम राजीवलोचन तुका चरण वंदितो ॥५॥
 
३०९८
 
विठ्ठल माझा जीव विठ्ठल माझा भाव । कुळधर्म देव विठ्ठल माझा ॥१॥
 
विठ्ठल माझा गुरु विठ्ठल माझा तारूं । उतरील पारु भवनदीचा ॥ध्रु.॥
 
विठ्ठल माझी माता विठ्ठल माझा पिता । विठ्ठल चुलता बहिणी बंधु ॥२॥
 
विठ्ठल हे जन विठ्ठल माझें मन । सोयरा सज्जन विठ्ठल माझा ॥३॥
 
तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा । नश्वरित गांवा जाइन त्याच्या ॥४॥
 
३०९९
 
न मनावी चिंता । कांहीं माझेविशीं आतां ॥१॥
 
ज्याणें लौकिक हा केला । तो हें निवारिता भला ॥ध्रु.॥
 
माझे इच्छे काय । होणार ते एक ठाय ॥२॥
 
सुखा आणि दुःखा । म्हणे वेगळा मी तुका ॥३॥
 
३१००
 
माझा पाहा अनुभव । केला देव आपुला ॥१॥
 
बोलविलें तें चि द्यावें । उत्तर व्हावें ते काळीं ॥ध्रु.॥
 
सोडिलिया जग निंद्य । मग गोविंद म्हणियारा ॥२॥
 
तुका म्हणे धीर केला । तेणें याला गोविलें ॥३॥
 

३१०१
 
जिंकावा संसार । येणें नांवें तरी शूर ॥१॥
 
येरें काय तीं बापुडीं । कीर अहंकाराचीं घोडीं ॥ध्रु.॥
 
पण ऐशा नांवें । देवा धरिजेतो भावें ॥२॥
 
तुका म्हणे ज्यावें । सत्य कीर्तीनें बरवें ॥३॥
 
३१०२
 
सरे ऐसें ज्याचें दान । त्याचे कोण उपकार ॥१॥
 
नको वाढूं ऐसें काचें । दे वो साच विठ्ठला ॥ध्रु.॥
 
रडत मागें सांडी पोर । ते काय थोर माउली ॥२॥
 
तुका म्हणे कीर्ति वाढे । धर्म गाढे ते ऐसे ॥३॥
 
३१०३
 
तुटे मायाजाळ विघडे भवसिंधू । जरि लागे छंदु हरिनामें ॥१॥
 
येर कर्म धर्म करितां ये कळी । माजी तरला बळी कोण सांगा ॥ध्रु.॥
 
 
न पढवे वेद नव्हे शास्त्रबोध । नामाचे प्रबंध पाठ करा ॥२॥
 
न साधवे योग न करवे वैराग्य । साधा भक्तिभाग्य संतसंगें ॥३॥
 
नव्हे अनुष्ठान न कळे ब्रम्हज्ञान । करावी सोपान कृष्णकथा ॥४॥
 
तुका म्हणे वर्म दावियेलें संतीं । यापरती विश्रांति आणिक नाहीं ॥५॥
 
३१०४
 
लोभावरी ठेवुनि हेत । करी असत्य न्याय नीत ॥१॥
 
त्याच्या पूर्वजां पतन । नरकीं किडे होती जाण ॥ध्रु.॥
 
कोटिगोहत्यापातक । त्यासी घडेल निष्टंक ॥२॥
 
मासां श्रवे जे सुंदरा । पाजी विटाळ पितरां ॥३॥
 
तुका म्हणे ऐसियासी । यम गांजील सायासी ॥४॥
 
३१०५
 
देह जाईंल जाईंल । यासी काळ बा खाईंल ॥१॥
 
कां रे नुमजसी दगडा । कैचे हत्ती घोडे वाडा ॥ध्रु.॥
 
लोडें बालिस्तें सुपती । जरा आलिया फजिती ॥२॥
 
शरीरसंबंधाचें नातें । भोरड्या बुडविती सेतातें ॥३॥
 
अझुनि तरी होई जागा । तुका म्हणे पुढें दगा ॥४॥
 
३१०६
 
मागें बहुतां जनां राखिलें आडणी । धांवसी निर्वाणी नाम घेतां ॥१॥
 
ऐसें ठावें जालें मज बरव्या परी । म्हणऊनि करीं धांवा तुझा ॥ध्रु.॥
 
 
माझेविशीं तुज पडिला विसरु । आतां काय करूं पांडुरंगा ॥२॥
 
 
अझुनि कां नये तुम्हासी करुणा । दुरि नारायणा धरिलें मज ॥३॥
 
तुका म्हणे जीव जाऊं पाहे माझा । आतां केशीराजा घालीं उडी ॥४॥
 
३१०७
 
कळलें माझा तुज नव्हे रे आठव । काय काज जीव ठेवूं आतां ॥१॥
 
तूं काय करिसी माझिया संचिता । धिग हे अनंता जालें जिणें ॥ध्रु.॥
 
पतितपावन राहिलों या आशा । आइकोनि ठसा कीर्ती तुझी ॥२॥
 
आतां कोण करी माझा अंगीकार । कळलें निष्ठ‍ जालासी तूं ॥३॥
 
तुका म्हणे माझी मांडिली निरास । करितों जीवा नास तुजसाटीं ॥४॥
 
३१०८
 
तरि कां मागें वांयां कीर्ती वाढविली । जनांत आपुली ब्रिदावळी ॥१॥
 
साच करितां आतां फिरसी माघारा । ठायींचें दातारा नेणवेचि ॥ध्रु.॥
 
संतांसी श्रीमुख कैसें दाखविसी । पुढें मात त्यांसी सांगईंन ॥२॥
 
घेईंन डांगोरा तुझिया नामाचा । नव्हे अनाथांचा नाथ ऐसा ॥३॥
 
तुका म्हणे आधीं राहिलों मरोनि । तूं कां होसी धनी निमित्याचा ॥४॥
 
३१०९
 
आम्ही तुझ्या दासीं । जरि जावें पतनासी ॥१॥
 
तरि हें दिसे विपरीत । कोठें बोलिली हे नीत ॥ध्रु.॥
 
तुझें नाम कंठीं । आम्हां संसार आटी ॥२॥
 
तुका म्हणे काळ । करी आम्हांसी विटाळ ॥३॥
 
३११०
 
लाजती पुराणें । वेदां येऊं पाहे उणें ॥१॥
 
आम्ही नामाचे धारक । किविलवाणीं दिसों रंक ॥ध्रु.॥
 
बोलिले ते संतीं । बोल वायांविण जाती ॥२॥
 
तुका म्हणे देवा । रोकडी हे मोडे सेवा ॥३॥
 
३१११
 
आहारनिद्रे न लगे आदर । आपण सादर ते चि होय ॥१॥
 
परमितेविण बोलणें ते वांयां । फार थोडें काया पिंड पीडी ॥ध्रु.॥
 
समाधान त्याचें तो चि एक जाणे । आपुलिये खुणे पावोनियां ॥२॥
 
 
तुका म्हणे होय पीडा ते न करीं । मग राहें परी भलतिये ॥३॥
 
३११२
 
भूमि अवघी शुद्ध जाणा । अमंगळ हे वासना ॥१॥
 
तैसे वोसपले जीव । सांडी नसतां अंगीं घाव ॥ध्रु.॥
 
जीव अवघे देव । खोटा नागवी संदेह ॥२॥
 
तुका म्हणे शुद्ध । मग तुटलिया भेद ॥३॥
 
३११३
 
सरतें माझें तुझें । तरि हें उतरतें ओझें ॥१॥
 
न लगे सांडावें मांडावें । आहे शुद्ध चि स्वभावें ॥ध्रु.॥
 
घातला तो आशा । मोहोजाळें गळां फासा ॥२॥
 
सुखदुःखाचा तो मान । नाहीं दुःखाचा तो शीण ॥३॥
 
करितां नारायण । एवढें वेचितां वचन ॥४॥
 
लाभ हानि हे समान । तैसा मान अपमान ॥५॥
 
तुका म्हणे याचें । नांव सोंवळें साचें ॥६॥
 
३११४
 
तुज करितां होती ऐसे । मूढ चतुर पंडित पिसे॥१॥
 
परि वर्म नेणे तें कोणी । पीडाखाणी भोगितील ॥ध्रु.॥
 
उलंघितें पांगुळ गिरी । मुकें करी अनुवाद ॥२॥
 
पापी होय पुण्यवंत । न करी घात दुर्जन ॥३॥
 
अवघें हेळामात्रें हरि । मुक्त करी ब्रम्हांड ॥४॥
 
तुका म्हणे खेळे लीळा । पाहे वेगळा व्यापूनि ॥५॥
 
३११५
 
पिकवावें धन । ज्याची आस करी जन ॥१॥
 
पुरोनि उरे खातां देतां । नव्हे खंडन मवितां ॥ध्रु.॥
 
खोलीं पडे ओली बीज । तरीं च हाता लागे निज ॥२॥
 
तुका म्हणे धणी । विठ्ठल अक्षरें या तिन्ही ॥३॥
 
३११६
 
करिसी लाघवें । तूं हें खेळसी आघवें ॥१॥
 
अहंकार आड । आम्हां जगासी हा नाड ॥ध्रु.॥
 
येथें भुतें यावें । दावूं लपों ही जाणावें ॥२॥
 
तुका म्हणे हो श्रीपती । आतां चाळवाल किती ॥३॥
 
३११७
 
घालिती पव्हया । वाटे अनाथाच्या दया ॥१॥
 
तैसें कां हें नये करूं । पांडुरंगा आम्हां तारूं ॥ध्रु.॥
 
रोगियासी काढा । देउनि वारितील पीडा ॥२॥
 
बुडत्यासाटीं उडी । घालितील कां हे जोडी ॥३॥
 
सारितील कांटे । पुढें मागिलांचे वाटे ॥४॥
 
तुका म्हणे भार । घेती भागल्यांचा फार ॥५॥
 
३११८
 
नका दंतकथा येथें सांगों कोणी । कोरडे ते मानी बोल कोण ॥१॥
 
अनुभव येथें व्हावा शिष्टाचार । न चलती चार आम्हांपुढें ॥ध्रु.॥
 
 
निवडी वेगळें क्षीर आणि पाणी । राजहंस दोन्ही वेगळालीं ॥२॥
 
 
तुका म्हणे येथें पाहिजे जातीचें । येरा गाबाळाचें काय काम ॥३॥
 
३११९
 
न करि त्याचें गांढेपण । नारायण सद्धि उभा ॥१॥
 
भवसिंधूचा थडवा केला । बोलाविला पाहिजे ॥ध्रु.॥
 
याचे सोईं पाउल वेचे । मग कैचे आडथळे ॥२॥
 
तुका म्हणे खरें खोटें । न म्हणे मोटें लहान ॥३॥
 
३१२०
 
रिकामें तूं नको मना । राहों क्षणक्षणा ही ॥१॥
 
वेळोवेळां पारायण । नारायण हें करीं ॥ध्रु.॥
 
भ्रमणांच्या मोडीं वाटा । न भरें फाटा आडरानें ॥२॥
 
तुका म्हणे माझ्या जीवें । हें चि घ्यावें धणीवरी ॥३॥
 
३१२१
 
पंचभूतांचिये सांपडलों संदीं । घातलोंसे बंदीं अहंकारें ॥१॥
 
आपल्या आपण बांधविला गळा । नेणें चि निराळा असतां हो ॥ध्रु.॥
 
कासया हा सत्य लेखिला संसार । कां हे केले चार माझें माझें ॥२॥
 
कां नाहीं शरण गेलों नारायणा । कां नाहीं वासना आवरिली ॥३॥
 
किंचित सुखाचा धरिला अभिळास । तेणें बहु नास केला पुढें ॥४॥
 
तुका म्हणे आतां देह देऊं बळी । करुनि सांडूं होळी संचिताची ॥५॥
 
३१२२
 
देव जाले अवघे जन । माझे गुण दोष हारपले ॥१॥
 
बरवें जालें बरवें जालें । चत्ति धालें महालाभें ॥ध्रु.॥
 
दर्पणीचें दुसरें भासे । परि तें असे एक तें ॥२॥
 
तुका म्हणे सिंधुभेटी । उदका तुटी वाहाळासी ॥३॥
 
३१२३
 
बहुत प्रकार परि ते गव्हाचे । जिव्हा नाचे आवडी ॥१॥
 
सरलें परि आवडी नवी । सिंधु दावी तरंग ॥ध्रु.॥
 
घेतलें घ्यावें वेळोवेळां । माय बाळा न विसंबे ॥२॥
 
तुका म्हणे रस राहिला वचनीं । तो चि पडताळूनि सेवीतसें ॥३॥
 
३१२४
 
आम्हां सोइरे हरिजन । जनीं भाग्य निकंचन ॥१॥
 
ज्याच्या धैर्या नाहीं भंग । भाव एकविध रंग ॥ध्रु.॥
 
भुके तान्हे चत्तिीं । सदा देव आठविती ॥२॥
 
तुका म्हणे धन । ज्याचें वत्ति नारायण ॥३॥
 
३१२५
 
म्हणवितों दास न करितां सेवा । लंडपणें देवा पोट भरीं ॥१॥
 
खोटें कोठें सरे तुझे पायांपाशीं । अंतर जाणसी पांडुरंगा ॥ध्रु.॥
 
आचरण खोटें आपणासी ठावें । लटिकें बोलावें दुसरें तें ॥२॥
 
तुका म्हणे ऐसा आहें अपराधी । असो कृपानिधी तुम्हां ठावा ॥३॥
 
३१२६
 
जळालें तें बाहए सोंग । अंतर व्यंग पडिलिया ॥१॥
 
कारण तें अंतरलें । वाइट भलें म्हणवितां ॥ध्रु.॥
 
तांतडीनें नासी । तांतडीनें च संतोषी ॥२॥
 
तुका म्हणे धीर । नाहीं बुद्धि एक स्थिर ॥३॥
 
३१२७
 
चत्तिाचें बांधलें जवळी तें वसे । प्रकाशीं प्रकाशे सर्वकाळ ॥१॥
 
अंतरीं वसावी उत्तम ते भेटी । होऊं कांहीं तुटी न सके चि ॥ध्रु.॥
 
ब्रम्हांड कवळे आठवणेसाटीं । धरावा तो पोटीं वाव बरा ॥२॥
 
तुका म्हणे लाभ घरिचिया घरीं । प्रेमतंतु दोरी न सुटतां॥३॥
 
३१२८
 
दुखवलें चत्ति आजिच्या प्रसंगें । बहु पीडा जगें केली देवा ॥१॥
 
कधीं हा संबंध तोडिसी तें नेणें । आठवूनि मनें पाय असें ॥ध्रु.॥
 
आणिकांची येती अंतरा अंतरें । सुखदुःख बरेंवाइट तीं ॥२॥
 
तुका म्हणे घडे एकांताचा वास । तरिच या नास संबंधाचा ॥३॥
 
३१२९
 
धनवंत एक बहिर अंधळे । शुभ्र कुष्ठ काळे भोग अंगीं ॥१॥
 
परारब्धगति न कळे विचित्र । आहे हातीं सूत्र विठोबाचे ॥ध्रु.॥
 
आणीक रोगांचीं नांवें घेऊं किती । अखंड असती जडोनियां ॥२॥
 
तुका म्हणे नष्ट संचिताचें दान । पावे खातां पण सुख नेदी ॥३॥
 
३१३०
 
भेदाभेदताळा न घडे घालितां । आठवा रे आतां नारायण ॥१॥
 
येणें एक केलें अवघें होय सांग । अच्युताच्या योगें नामें छंदें ॥ध्रु.॥
 
भोंवरे खळाळ चोर वाटा घेती । पावल मारिती सिवेपाशीं ॥२॥
 
तुका म्हणे येथें भावेंविण पार । न पविजे सार हें चि आहे ॥३॥
 
३१३१
 
जे गाती अखंड विठ्ठलाचे गीत । त्यांचे पायीं चत्ति ठेवीन मी ॥१॥
 
जयांसी आवडे विठ्ठलाचें नाम । ते माझे परम प्राणसखे ॥ध्रु.॥
 
जयांसी विठ्ठल आवडे लोचनीं । त्यांचें पायवणी स्वीकारीन ॥२॥
 
विठ्ठलासी जिहीं दिला सर्व भाव । त्यांच्या पायीं ठाव मागईंन ॥३॥
 
तुका म्हणे रज होईंन चरणींचा । म्हणविती त्यांचा हरिचे दास ॥४॥
 
३१३२
 
काय तो विवाद असो भेदाभेद । साधा परमानंद एका भावें ॥१॥
 
निघोनि आयुष्य जातें हातोहात । विचारीं पां हित लवलाहीं ॥२॥
 
तुका म्हणे भावभक्ति हे कारण । नागवी भूषण दंभ तो चि ॥३॥
 
३१३३
 
देवकीनंदनें । केलें आपुल्या चिंतनें ॥१॥
 
मज आपुलिया ऐसें । मना लावूनियां पिसें ॥ध्रु.॥
 
गोवळे गोपाळां । केलें लावूनियां चाळा ॥२॥
 
तुका म्हणे संग । केला दुरि नव्हे मग॥३॥
 
३१३४
 
माझिया जीवासी हे चि पैं विश्रांति । तुझे पाय चत्तिीं पांडुरंगा ॥१॥
 
भांडवल गांठी आलें सपुरतें । समाधान चत्तिें मानियेलें ॥ध्रु.॥
 
उदंड उच्चारें घातला पसरु । रूपावरी भरु आवडीचा ॥२॥
 
तुका म्हणे मज भक्तीची आवडी । अभेदीं तांतडी नाहीं म्हुण ॥३॥
 
३१३५
 
एकविध आम्ही न धरूं पालट । न संडूं ते वाट सांपडली ॥१॥
 
म्हणवूनि केला पाहिजे सांभाळ । माझें बुद्धीबळ पाय तुझे ॥ध्रु.॥
 
बहुत न कळे बोलतां प्रकार । अंतरा अंतर साक्ष असे ॥२॥
 
तुका म्हणे आगा जीवांच्या जीवना । तूं चि नारायणा साक्षी माझा ॥३॥
 
३१३६
 
राहो ये चि ठायीं । माझा भाव तुझे पायीं ॥१॥
 
करीन नामाचें चिंतन । जाऊं नेदीं कोठें मन ॥ध्रु.॥
 
देईंन ये रसीं । आतां बुडी सर्वविशीं ॥२॥
 
तुका म्हणे देवा । साटी करोनियां जीवा ॥३॥
 
३१३७
 
तैसे नहों आम्ही विठ्ठलाचे दास । यावें आणिकांस काकुलती ॥१॥
 
स्वामिचिया सत्ता ठेंगणें सकळ । आला कळिकाळ हाताखालीं ॥ध्रु.॥
 
अंकिताचा असे अभिमान देवा । समर्पूनि हेवा असों पायीं ॥२॥
 
तुका म्हणे आम्हां इच्छेचें खेळणें । कोड नारायणें पुरवावें ॥३॥
 
३१३८
 
मोक्ष देवापाशीं नाहीं । लटिक्या घाई वळिवतें ॥१॥
 
काय खरें न धरी शुद्धी । गेली बुद्धी भ्रमलें ॥ध्रु.॥
 
अहंकारास उरलें काईं । पांचांठायीं हें वांटे ॥२॥
 
तुका म्हणे कुंथे भारें । लटिकें खरें मानुनियां ॥३॥
 
३१३९
 
आपला तो एक देव करुनि घ्यावा । तेणेंविण जीवा सुख नव्हे ॥१॥
 
तें तीं माइकें दुःखाचीं जनितीं । नाहीं आदिअंतीं अवसान ॥ध्रु.॥
 
अविनाश करी आपुलिया ऐसें । लावीं मना पिसें गोविंदाच्या ॥२॥
 
तुका म्हणे एका मरणें चि सरें । उत्तम चि उरे कीर्ति मागें ॥३॥
 
३१४०
 
आजिचें हें मज तुम्हीं कृपादान । दिलें संतजन मायबापीं ॥१॥
 
आलीं मुखावाटा अमृतवचनें । उत्तीर्ण तीं येणें नव्हे जन्में ॥२॥
 
तुका म्हणे तुम्हीं उदार कृपाळ । शृंगारिलें बाळ कवतुकें ॥३॥
 
३१४१
 
स्तुती अथवा निंदा करावी देवाची । अधम तो वेची व्यर्थ वाणी ॥१॥
 
आइकोनि होती बहिर हे बोल । वेचूनि ते मोल नरका जाती ॥ध्रु.॥
 
इह लोकीं थुंका उडे तोंडावरी । करणें अघोरी वास लागे ॥२॥
 
तुका म्हणे माप वाचेऐसें निकें । भरलें नरकें निंदेसाटीं ॥३॥
 
३१४२
 
लोह कफ गारा सद्धि हे सामुग्री । अग्नि टणत्कारी दिसों येतो ॥१॥
 
सांगावें तें काईं सांगावें तें काईं । चत्तिा होय ठायीं अनुभव तो ॥ध्रु.॥
 
अन्नें सांगों येतो तृप्तीचा अनुभव । करूनि उपाव घेऊं हेवा ॥२॥
 
तुका म्हणे मिळे जीवनीं जीवन । तेथें कोणा कोण नांव ठेवी ॥३॥
 
३१४३
 
बाळाचें जीवन । माता जाणें भूक तान ॥१॥
 
काय करूं विनवणी । असो मस्तक चरणीं ॥ध्रु.॥
 
ठेविलिये ठायीं । चत्ति ठेवुनि असें पायीं ॥२॥
 
करितों हे सेवा । चिंतन सर्वां ठायीं देवा ॥३॥
 
न्यून तें चि पुरें । घ्यावें करोनि दातारें ॥४॥
 
तुका म्हणे बुद्धि । अल्प असे अपराधी ॥५॥
 
३१४४
 
जाणतों समये । परि मत कामा नये ॥१॥
 
तुम्ही सांगावें तें बरें । देवा सकळ विचारें ॥ध्रु.॥
 
फुकाचिये पुसी । चिंता नाहीं होते ऐसी ॥२॥
 
तुका म्हणे आहे । धर पाय मज साहे ॥३॥
 
३१४५
 
द्वारपाळ विनंती करी । उभे द्वारीं राउळा ॥१॥
 
आपुलिया शरणागता । वाहों चिंता नेदावी ॥ध्रु.॥
 
वचना या चत्ति द्यावें । असो ठावें पायांसी ॥२॥
 
तुका म्हणे कृपासिंधू । दीनबंधू केशवा ॥३॥
 
३१४६
 
दोहीं बाहीं आम्हां वास । असों कास घालूनि ॥१॥
 
बोल बोलों उभयतां । स्वामीसत्ता सेवेची ॥ध्रु.॥
 
एकसरें आज्ञा केली । असों चाली ते नीती ॥२॥
 
तुका म्हणे जोहारितों । आहें होतों ते ठायीं ॥३॥
 
३१४७
 
ऐका जी देवा माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥
 
सन्निध पातलों सांडूनियां शंका । सन्मुख चि एकाएकीं पुढें ॥ध्रु.॥
 
जाणविलें कोठें पावे पायांपाशीं । केली या जिवासी साटी म्हुण ॥२॥
 
तुका म्हणे माझे हातीं द्या उद्धार । करीं करकर म्हणवूनि ॥३॥
 
३१४८
 
बैसलों तों कडियेवरी । नव्हें दुरी वेगळा ॥१॥
 
घडलें हें बहुवा दिसां । आतां इच्छा पुरवीन ॥ध्रु.॥
 
बहु होता जाला सीण । नाहीं क्षण विसांवा ॥२॥
 
दुःखी केलें मीतूंपणें । जवळी नेणें होतें तें ॥३॥
 
पाहात जे होतों वास । ते चि आस पुरविली ॥४॥
 
तुका म्हणे मायबापा । झणी कोपा विठ्ठला ॥५॥
 
३१४९
 
तुझें नाम मुखीं तयासी विपत्ति । आश्चर्य हें चत्तिीं वाटतसे ॥१॥
 
काय जाणों काय होसील निजला । नेणों जी विठ्ठला मायबापा ॥ध्रु.॥
 
भवबंधनाचे तुटतील फांसे । तें कां येथें असे अव्हेरिलें ॥२॥
 
तुका म्हणे माझें दचकलें मन । वाटे वांयांविण श्रम केला ॥३॥
 
३१५०
 
सेवकें करावें सांगितलें काम । सिक्याचा तो धर्म स्वामी राखे ॥१॥
 
काय देवा नेणों आलें गांढेपण । तुम्ही शक्तिहीन जाले दिसां ॥ध्रु.॥
 
विष्णुदास आम्ही निर्भर ज्याबळें । तें दिसे या काळें अव्हेरिलें ॥२॥
 
तुका म्हणे मूळ पाठवा लौकरी । किंवा करूं हरी काय सांगा ॥३॥
 
 

३१५१
 
खेळतां न भ्यावें समर्थाच्या बाळें । तयाच्या सकळ सत्तेखालीं ॥१॥
 
तरी लेवविला शोभे अळंकार । नाहीं तरी भार मानाविण ॥ध्रु.॥
 
अवघी च दिशा असावी मोकळी । मायबाप बळी म्हणऊनि ॥२॥
 
तुका म्हणे माझें ऐसें आहे देवा । म्हणऊनि सेवा समर्पिली ॥३॥
 
३१५२
 
निरांजनीं एकटवाणें । संग नेणें दुसरा ॥१॥
 
पाहा चाळविलें कैसें । लावुनि पिसें गोवळें ॥ध्रु.॥
 
लपलें अंगें अंग । दिला संग होता तो ॥२॥
 
तुका म्हणे नव्हतें ठावें । जालें भावें वाटोळें ॥३॥
 
३१५३
 
नव्हती भेटी तों चि बरें । होतां चोरें नाडिलें ॥१॥
 
अवाघियांचा केला झाडा । रिता वाडा खोंकर ॥ध्रु.॥
 
चिंतनांचें मूळ चत्ति । नेलें वृत्ति हरूनि ॥२॥
 
तुका म्हणे मूळा आलें । होतें केलें तैसें चि ॥३॥
 
३१५४
 
जये ठायीं आवडी ठेली । मज ते बोली न संडे ॥१॥
 
पुरवावें जीवींचें कोड । भेटी गोड तुज मज ॥ध्रु.॥
 
आणिलें तें येथवरी । रूप दुरी न करावें ॥२॥
 
तुका म्हणे नारायणा । सेवाहीना धिग वृत्ति ॥३॥
 
३१५५
 
सरलियाचा सोस मनीं । लाजोनियां राहिलों ॥१॥
 
आवडीनें बोलावितों । येथें तें तों लपावें ॥ध्रु.॥
 
माझें तें चि मज द्यावें । होतें भावें जोडिलें ॥२॥
 
तुका म्हणे विश्वंभरा । आळीकरा बुझावा ॥३॥
 
३१५६
 
नाचावेंसें वाटे मना । छंद गुणा अधीन ॥१॥
 
चेष्टविलीं माझीं गात्रें । सत्तासूत्रें हालती ॥ध्रु.॥
 
नामरूपें रंगा आलीं । ते चि चाली स्वभावें ॥२॥
 
तुका म्हणे पांडुरंगे । अंग संगें कवळिलें ॥३॥
 
३१५७
 
खेळतों ते खेळ पायांच्या प्रसादें । नव्हती हीं छंदें नासिवंतें ॥१॥
 
माझा मायबाप उभा विटेवरी । कवतुकें करी कृपादान ॥ध्रु.॥
 
प्रसादाची वाणी वदें ती उत्तरें । नाहीं मतांतरें जोडियेलीं ॥२॥
 
तुका म्हणे रस वाढितिया अंगें । छाया पांडुरंगें केली वरी ॥३॥
 
३१५८
 
अखंड मुडतर । सासुरवास करकर ॥१॥
 
याची जाली बोळवण । आतां न देखों तो शीण ॥ध्रु.॥
 
बहुतांची दासी । तये घरीं सासुरवासी ॥२॥
 
तुका म्हणे मुळें । खंड जाला एका वेळें ॥३॥
 
३१५९
 
अवघा भार वाटे देवा । संतसेवा न घडतां ॥१॥
 
कसोटी हे असे हातीं । सत्य भूतीं भगवंत ॥ध्रु.॥
 
चुकलोंसा दिसें पंथ । गेले संत तो ऐसा ॥२॥
 
तुका म्हणे सोंग वांयां । कारण या अनुभवें ॥३॥
 
३१६०
 
आतां तुम्ही कृपावंत । साधु संत जिवलग ॥१॥
 
गोमटें तें करा माझें । भार ओझें तुम्हांसी ॥ध्रु.॥
 
वंचिलें तें पायांपाशीं । नाहीं यासी वेगळें ॥२॥
 
तुका म्हणे सोडिल्या गांठी । दिली मिठी पायांसी ॥३॥
 
३१६१
 
सुख वाटे परी वर्म । धर्माधर्म न कळे ॥१॥
 
गायें नाचें एवढें जाणें । विठ्ठल म्हणे निर्लज्ज ॥ध्रु.॥
 
अवघें माझें एवढें धन । साधन ही सकळ ॥२॥
 
तुका म्हणे, पायां पडें । तुमच्या कोडें संतांच्या ॥३॥
 
३१६२
 
धरिलीं जीं होतीं चित्तीं । डोळां तीं च दिसती ॥१॥
 
आलें आवडीस फळ । जालें कारण सकळ ॥ध्रु.॥
 
घेईंन भातुकें । मागोनियां कवतुकें ॥२॥
 
तुका म्हणे लाड । विठोबा पुरवील कोड ॥३॥
 
३१६३
 
बहुतां दिसांची आजि जाली भेटी । जाली होती तुटी काळगती ॥१॥
 
येथें सावकासें घेईंन ते धणी । गेली अडचणी उगवोनि ॥ध्रु.॥
 
बहु दुःख दिलें होतें घरीं कामें । वाढला हा श्रमश्रमें होता ॥२॥
 
बहु दिस होता पाहिला मारग । क्लेशाचा त्या त्याग आजि जाला ॥३॥
 
बहु होती केली सोंगसंपादणी । लौकिकापासूनि निर्गमलें ॥४॥
 
तुका म्हणे येथें जालें अवसान । परमानंदीं मन विसावलें ॥५॥
 
३१६४
 
पुत्र जाला चोर । मायबापा हर्ष थोर ॥१॥
 
आतां काशासाटीं जोडी । हाट धाटे गुंडगे घडी ॥ध्रु.॥
 
ऐते अपाहार । आणूनियां भरी घर ॥२॥
 
मानिली निश्चिंती । नरका जावया उभयतीं ॥३॥
 
झोडाझोडगीचे पोटीं । फळें बीजें तीं करंटीं ॥४॥
 
तुका म्हणे बेट्या । भांडवल न लगे खट्या ॥५॥
 
३१६५
 
एवढी अपकीर्ती । ऐकोनियां फजीती ॥१॥
 
जरि दाविल वदन । थुंका थुंका तो देखोन ॥ध्रु.॥
 
काळिमेचें जिणें । जीऊनियां राहे सुनें ॥२॥
 
तुका म्हणे गुण । दरुषणें अपशकुन ॥३॥
 
३१६६
 
पुंडलीक भक्तराज । तेणें साधियेलें काज । वैकुंठींचें निज । परब्रम्ह आणिलें ॥१॥
 
पांडुरंग बाळमूर्ति । गाईंगोपाळां संगती । येऊनियां प्रीति । उभें सम चि राहिलें ॥ध्रु.॥
 
एका आगळें अक्षर । वैकुंठ चि दुसरें । म्हणविती येरें । परि ती ऐसीं नव्हेती॥२॥
 
पाप पंचक्रोशीमधीं । येऊ न सकेचिना आधीं । कैंची तेथें विधि । निषेधाची वसति ॥३॥
 
पुराणें वदती ऐसें । चतुर्भुज तीं मानसें । सुदर्शनावरी वसे । रीग न घडे कल्पांतीं ॥४॥
 
महाक्षेत्र हें पंढरी । अनुपम्य इयेची थोरी । धन्य धन्य वारकरी । तुका म्हणे तेथींचे ॥५॥
 
३१६७
 
देह मृत्याचें भातुकें । कळों आलें कवतुकें ॥१॥
 
काय मानियेलें सार । हें चि वाटतें आश्चर्य ॥ध्रु.॥
 
नानाभोगांची संचितें । करूनि ठेविलें आइतें ॥२॥
 
तुका म्हणे कोडीं । उगवून न सकती बापुडीं ॥३॥
 
३१६८
 
त्यागें भोग माझ्या येतील अंतरा । मग मी दातारा काय करूं ॥१॥
 
आतां असो तुझे पायीं हें मोटळें । इंद्रियें सकळें काया मन ॥ध्रु.॥
 
सांडीमांडी विधिनिषेधाचा ठाव । न कळतां भाव जाइल वांयां ॥२॥
 
तुका म्हणे आतां नको उजगरा । लपवीं दातारा अंगीं मज ॥३॥
 
३१६९
 
दावूनियां बंड । पुरे न करी तें भांड ॥१॥
 
जळो जळो तैसें जिणें । फटमरे लाजिरवाणें ॥ध्रु.॥
 
घेतलें तें सोंग । बरवें संपादावें सांग ॥२॥
 
तुका म्हणे धीरें । देवें नुपेक्षिलें खरें ॥३॥
 
३१७०
 
न पालटे जाती जीवाचिये साटीं । बाहे तें चि पोटीं दावी वरी ॥१॥
 
अंतरीं सबाहीं सारिखा चि रंग । वीट आणि भंग नाहीं रसा ॥ध्रु.॥
 
घणाचिया घायें पोटीं शिरे हिरा । सांडूं नेणे धीरा आपुलिया ॥२॥
 
तुका म्हणे कढे करावी शीतळ । ऐसें जातिबळ चंदनाचें ॥३॥
 
३१७१
 
दिली मान तरी नेघावी शत्रूची । शरण आलें त्यासी जतन जीवें ॥१॥
 
समर्थासी असे विचाराची आण । भलीं पापपुण्य विचारावें ॥ध्रु.॥
 
काकुळतीसाटीं सत्याचा विसर । पडिलें अंतर न पाहिजे ॥२॥
 
तुका म्हणे यश कीर्ति आणि मान । करितां जतन देव जोडे ॥३॥
 
३१७२
 
विचारिलें आधीं आपुल्या मानसीं । वांचों येथें कैसीं कोण्या द्वारें ॥१॥
 
तंव जाला साहए हृदयनिवासी । बुद्धि दिली ऐसी नास नाहीं ॥ध्रु.॥
 
उद्वेगाचे होतों पडिलों समुद्रीं । कोण रीती तरी पाविजेल ॥२॥
 
तुका म्हणे दुःखें आला आयुर्भाव । जाला बहु जीव कासावीस ॥३॥
 
३१७३
 
आपुलें वेचूनि खोडा घाली पाव । ऐसे जया भाव हीनबुद्धि तो ॥१॥
 
विषयांच्या संगें आयुष्याचा नास । पडियेलें ओस स्वहितांचे ॥ध्रु.॥
 
भुलल्यांचें अंग आपण्या पारिखें । छंदा च सारिखें वर्ततसे ॥२॥
 
तुका म्हणे दुःख उमटे परिणामीं । लंपटासी कामीं रतलिया ॥३॥
 
३१७४
 
केलें शकुनें प्रयाण । आतां मागें फिरे कोण ॥१॥
 
होय तैसें होय आतां । देह बळी काय चिंता ॥ध्रु.॥
 
पडिलें पालवीं । त्याचा धाक वाहे जीवीं ॥२॥
 
तुका म्हणे जीणें । देवा काय हीनपणें ॥३॥
 
३१७५
 
आळणी ऐसें कळों आलें । त्यासी भलें मौन्य चि ॥१॥
 
नये कांहीं वेचूं वाणी । वेडे घाणीसांगातें ॥ध्रु.॥
 
वेगळें तें देहभावा । भ्रम जीवा माजिरा ॥२॥
 
तुका म्हणे कवतुक केलें । किंवा भलें दवडितां ॥३॥
 
३१७६
 
चत्तिाचा चाळक । त्याचें उभय सूत्र एक ॥१॥
 
नाचवितें नानाछंदें । सुखें आपुल्या विनोदें ॥ध्रु.॥
 
चंद्र कमळणी । नाहीं धाडीत सांगोनि ॥२॥
 
तुका म्हणे उठी । लोह चुंबकाचे दृष्टी ॥३॥
 
३१७७
 
करितां तडातोडी । वत्सा माते सोईं ओढी ॥१॥
 
करित्याचा आग्रह उरे । एक एकासाटीं झुरे ॥ध्रु.॥
 
भुके इच्छी अन्न । तें ही त्यासाटीं निर्माण ॥२॥
 
तुका म्हणे जाती । एक एकाचिये चित्तीं ॥३॥
 
३१७८
 
निघालें दिवाळें । जालें देवाचें वाटोळें ॥१॥
 
आतां वेचूं नये वाणी । विचारावें मनिच्या मनीं ॥ध्रु.॥
 
गुंडाळिलीं पोतीं । भीतरी लावियेली वाती ॥२॥
 
तुका म्हणे करा । ऐसा राहे माजी घरा ॥३॥
 
३१७९
 
तीर्थाचिये आस पंथ तो निट देव । पाविजेतो ठाव अंतराय ॥१॥
 
म्हणऊनि भलें निश्चळ चि स्थळीं । मनाचिये मुळीं बैसोनियां ॥ध्रु.॥
 
संकल्पारूढ तें प्रारब्धें चि जिणें । कार्य चि कारणें वाढतसे ॥२॥
 
तुका म्हणे कामा नाहीं एक मुख । जिरवितां सुख होतें पोटीं ॥३॥
 
३१८०
 
क्षणक्षणा हा चि करावा विचार । तरावया पार भवसिंधु ॥१॥
 
नाशिवंत देह जाणार सकळ । आयुष्य खातो काळ सावधान ॥ध्रु.॥
 
संतासमागमीं धरूनि आवडी । करावी तांतडी परमार्था ॥२॥
 
तुका म्हणे येह लोकीच्या वेव्हारें । नये डोळे धुरें भरूनि राहों ॥३॥
 
३१८१
 
कोणाशीं विचार करावा सेवटीं । एवढ्या लाभें तुटी जाल्या तरे ॥१॥
 
सांभाळितो शूर आला घावडाव । पुढें दिला पाव न करी मागें ॥ध्रु.॥
 
घात तो या नांवें येथें अंतराय । अंतरल्या पाय गोविंदाचे ॥२॥
 
तुका म्हणे गडसंदीचा हा ठाव । केला तो उपाव कार्या येतो ॥३॥
 
३१८२
 
असा जी सोंवळें । आहां तैसे चि निराळे ॥१॥
 
आम्हीं नयों तुमच्या वाटा । काय लटिका चि ताठा ॥ध्रु.॥
 
चिंतन चि पुरे । काय सलगी सवें धुरे ॥२॥
 
तुका म्हणे देवा । नका नावडे ते सेवा ॥३॥
 
३१८३
 
अहंकार तो नासा भेद । जगीं निंदे ओंवळा ॥१॥
 
नातळे तो धन्य यासी । जाला वंषीं दीपक ॥ध्रु.॥
 
करवितो आत्महत्या । नेदी सत्या आतळों ॥२॥
 
तुका म्हणे गुरुगुरी । माथां थोरी धरोनि ॥३॥
 
३१८४
 
इच्छिलें ते शकुनवंती । होय देती तात्काळ ॥१॥
 
क्षीरा नीरा निवाड करी । वरावरी विठ्ठल ॥ध्रु.॥
 
भाग्याविण कैचें फळ । अंतर मळमूत्राचें ॥२॥
 
तुका म्हणे संचित कुडें । तें बापुडें करीतसे ॥३॥
 
३१८५
 
काशासाठीं आम्ही जाळिला संसार । न करा विचार ऐसा देवा ॥१॥
 
कैसें नेणों तुम्हां करवतें उदास । माझा प्रेमरस भंगावया ॥ध्रु.॥
 
समर्पूनि ठेलों देह हा सकळ । धरितां विटाळ न लजा माझा ॥२॥
 
तुका म्हणे अवघी मोकलूनि आस । फिरतों उदास कोणासाटीं ॥३॥
 
३१८६
 
नाहीं तुम्हां कांहीं लाविलें मागणें । कांटाळ्याच्या भेणें त्रासलेती ॥१॥
 
एखादिये परी टाळावीं करकर । हा नका विचार देखों कांहीं ॥ध्रु.॥
 
पायांच्या वियोगें प्राणासवें साटी । ने घवेसी तुटी जाली आतां ॥२॥
 
तुका म्हणे तुम्हां मागेन तें आतां । हें चि कृपावंता चरणीं वास ॥३॥
 
३१८७
 
जग अमंगळ । लागे देखतां विटाळ ॥१॥
 
धर्म भूतांची ते दया । सत्य कारण ऐसीया ॥ध्रु.॥
 
नव्हे माझें मत । साक्षी करूनि सांगें संत ॥२॥
 
तुका म्हणे जीवें । दावी उमटूनि अनुभवें ॥३॥
 
३१८८
 
दंड अन्यायाच्या माथां । देखोनि करावा सर्वथा ॥१॥
 
नये उगे बहुतां घाटूं । सिसें सोनियांत आटूं ॥ध्रु.॥
 
पापुण्यासाठीं । नीत केली सत्ता खोटी ॥२॥
 
तुका म्हणे देवा । दोष कोणाचा तो दावा ॥३॥
 
३१८९
 
आम्ही पापी तूं पावन । हें तों पूर्वापार जाण ॥१॥
 
नवें करूं नये जुनें । सांभाळावें ज्याचें तेणें ॥ध्रु.॥
 
राखावा तो ठाव । मिरासी करोनि उपाव ॥२॥
 
वादें मारी हाका । देवा आइकवी तुका ॥३॥
 
३१९०
 
पाडावी ते बरी । गांठी धुरेसवें खरी ॥१॥
 
नये मरों लंडीपणें । काय बापुडें तें जिणें ॥ध्रु.॥
 
लुटावें भांडार । तरी जया नाहीं पार ॥२॥
 
तुका म्हणे नांवें । कीर्ती आगळीनें ज्यावें ॥३॥
 
३१९१
 
भजनें चि जालें । मग जीवाचें काय आलें ॥१॥
 
येऊं नेदावी पुढती । आड भयाची ते जाती ॥ध्रु.॥
 
करितां सरोबरी । कांहीं न ठेवावी उरी ॥२॥
 
तुका म्हणे शूर । व्हावे धुरेसीं च धुरे॥३॥
 
३१९२
 
जन्मांतरीं शुद्ध नाहीं आचरण । यालागीं चरण अंतरले ॥१॥
 
वोडवलें संचित येणें जन्में पाहतां । आतां पंढरिनाथा कृपा करीं ॥ध्रु.॥
 
पतितपावन ब्रिद साच करीं देवा । यालागी कुढावा करीं माझा ॥२॥
 
अपराधी पातकी दृष्ट दुराचारी । अहाळलों भारी संवसारें ॥३॥
 
कामक्रोध आदि कल्पनेच्या त्रासें । तुज न पवें ऐसें जालें देवा ॥४॥
 
हा ना तोसा ठाव जाला पांडुरंगा । नये चि उपेगा काय करूं ॥५॥
 
आपुलिया नांवा धांवणिया धांवें । लवकरी यावें तुका म्हणे ॥६॥
 
३१९३
 
प्रेमभेटी आळिंगण । मग चरण वंदावे ॥१॥
 
ऐसामाझा भोळा बाप । हरी ताप कवळोनि ॥ध्रु.॥
 
न संगतां सीण भाग । पांडुरंग जाणतसे ॥२॥
 
तुका म्हणे कृपावंतें । द्यावें, भातें न मागतां ॥३॥
 
३१९४
 
वचनाचा अनुभव हातीं । बोलविती देव मज ॥१॥
 
परि हें न कळे अभाविकां । जडलोकां जिवांसी ॥ध्रु.॥
 
अश्रुत हे प्रसादिक । कृपा भीक स्वामीची ॥२॥
 
तुका म्हणे वरावरी । जातों तरी सांगत ॥३॥
 
३१९५
 
कां रे तुम्हीं ठेवा बहुतां निमित्ती । माझिया संचितें वोडवलें ॥१॥
 
भक्तिप्रेमगोडी बैसली जिव्हारीं । आनंद अंतरीं अंतरीं येणें झाला ॥ध्रु.॥
 
पुसिलें पडळ त्रिमिर विठ्ठलें । जग चि भरलें ब्रम्हानंदें ॥२॥
 
तुका म्हणे केलों कामनेवेगळा । आवडी गोपाळावरी वसे ॥३॥
 
३१९६
 
आसन शयन भोजन गोविंदें । भरलें आनंदें त्रिभुवन॥१॥
 
अवघियां केली काळें तडातोडी । अवश्वरु घडी पुरों नये ॥ध्रु.॥
 
वांटणी घातले शरीराचे भाग । दुजियाचा लाग खंडियेला ॥२॥
 
आवडीच्या आलें आहारासी रूप । पृथक संकल्प मावळले ॥३॥
 
काम तरी क्रोध बुद्धि मन नासे । भ्रमाचे वोळसे गिळिले शांती ॥४॥
 
तुका म्हणे मना श्रीरंगाचा रंग । बैसला अभंग एकविध ॥५॥
 
३१९७
 
ज्वरल्यासी काढा औषध पाचन । मूढां नारायण स्मरवितो ॥१॥
 
भवव्याधि येणें तुटेल रोकडी । करूनियां झाडी निश्चयेसी ॥ध्रु.॥
 
आणिकां उपायां अनुपान कठिण । भाग्यें बरें सीण शीघ्रवत ॥२॥
 
तुका म्हणे केला उघडा पसारा । भाग्य आलें घरा दारावरी ॥३॥
 
३१९८
 
जपाचें निमत्ति झोपेचा पसरु । देहाचा विसरू पाडूनियां ॥१॥
 
ऐसीं तीं भजनें अमंगळवाणी । सोंगसंपादणी बहुरूप्याची ॥ध्रु.॥
 
सेवेविशीं केलें लोभाचिये आसे । तया कोठें असे उरला देव ॥२॥
 
तुका म्हणे मानदंभ जया चित्तीं । तयाची फजीती करूं आम्ही ॥३॥
 
३१९९
 
परद्रव्य परकांता । नातळे जयाचिया चित्त । आणि कर्मी तो तत्वता । बांधला न वजाय ॥१॥
 
ऐसा अनुभव रोकडा । विश्वासीतो जीवा जोडा । एकांत त्या पुढां । अवघा करी उकल ॥ध्रु.॥
 
सकट आंबलें तें अन्न । शोधीं तें चि मद्यपान । विषमानें भिन्न । केलें शुद्धाशुद्ध ॥२॥
 
तुका म्हणे नित । बरवें अनुभवें उचित । तरी काय हित । मोलें घ्यावें लागतें ॥३॥
 
३२००
 
भूक पोटापुरती । तृष्णा भरवी वाखती । करवी फजीती । हांवें भार वाढला ॥१॥
 
कुळिकेसी लांस फांस । डोईं दाढी बोडवी दोष । अविहितनाश । करवी वजन चुकतां ॥ध्रु.॥
 
विधिसेवनें विहितें । कार्यकारणापुरतें । न वाटे तो चित्तें । अधमांच्या तो त्यागी ॥२॥
 
आज्ञापालणें ते सेवा । भय धरोनियां जीवा । तुका म्हणे ठेवा । ठेविला तो जतन ॥३॥
 

३२०१
 
कळे न कळे त्या धर्म । ऐका सांगतों रे वर्म । माझ्या विठोबाचें नाम । अटाहासें उच्चारा ॥१॥
 
तो या दाखवील वाटा । तया पाहिजे त्या नीटा । कृपावंत मोटा । पाहिजे तो कळवळा ॥ध्रु.॥
 
पुसतां चुका होतो वाटा । सवें बोळावा गोमटा । मोडों नेदी कांटा । घेऊं सांटा चोरासी ॥२॥
 
तुका म्हणे मोल । न लगें द्यावें वेचावे बोल । विठ्ठल विठ्ठल । ऐसा छंद मनासी ॥३॥
 
३२०२
 
तरी कां वोळगणे । राजद्वारीं होती सुने ॥१॥
 
अंगीं दावुनि निष्कामता । पोकळ पोकळी ते वृथा ॥ध्रु.॥
 
कासया मोकळ । भोंवतें शिष्यांचे गाबाळ ॥२॥
 
तुका म्हणे ढाळे । बाहेर गुदे तें निराळें ॥३॥
 
३२०३
 
हरिच्या दासां सोपें वर्म । सर्व धर्म पाउलें ॥१॥
 
कडिये देव बाहेर खांदी । वैष्णव मांदी क्रीडेसी ॥ध्रु.॥
 
सरती येणें आटाआटी । नाहीं तुटी लाभाची ॥२॥
 
तुका म्हणे समाधान । सदा मन आमुचें ॥३॥
 
३२०४
 
भूतांचिये नांदे जीवीं । गोसावी च सकळां ॥१॥
 
क्षणक्षणां जागा ठायीं । दृढ पायीं विश्वास ॥ध्रु.॥
 
दावूनियां सोंग दुजें । अंतर बीजें वसतसे ॥२॥
 
तुका म्हणे जाणे धने । धरी तें वर्म चिंतन ॥३॥
 
३२०५
 
संत आले घरा । तों मी अभागी दातारा ॥१॥
 
कासयानें पूजा करूं । चरण हृदयीं च धरूं ॥ध्रु.॥
 
काया कुरवंडी । करुन ओंवाळून सांडी ॥२॥
 
तुका म्हणे भावें । हात जोडीं असो ठावें ॥३॥
 
३२०६
 
भेद तुटलियावरी । आम्ही तुमचीं च हो हरी ॥१॥
 
आतां पाळावे पाळावे । आम्हां लडिवाळांचे लळे ॥ध्रु.॥
 
आणिकांची देवा । नाहीं जाणत चि सेवा ॥२॥
 
तुका म्हणे हेवा । माझा हेत पायीं देवा ॥३॥
 
३२०७
 
आमुची विश्रांति । तुमचे चरण कमळापती ॥१॥
 
पुढती पुढती नमन । घालूंनियां लोटांगण ॥ध्रु.॥
 
हें चि एक जाणें । काया वाचा आणि मनें ॥२॥
 
नीच जनालोकां । तळिले पायेरीस तुका ॥३॥
 
३२०८
 
विनवितों सेवटीं । आहे तैसें माझे पोटीं ॥१॥
 
कंठीं राहावें राहावें । हें चि मागतसें भावें ॥ध्रु.॥
 
पुरली वासना । येणें होईंल नारायणा ॥२॥
 
तुका म्हणे जो देहाडा । तो चि वर्णी पवाडा ॥३॥
 
३२०९
 
आवडीची सलगी पूजा । विषम दुजा भाव तो ॥१॥
 
ऐसीं उफराटीं वर्में । कळों भ्रमें न येती ॥ध्रु.॥
 
न लगे समाधान मोल । रुचती बोल प्रीतीचे ॥२॥
 
तुका म्हणे एका जीवें । सूत्र व्होवें गुंतलें ॥३॥
 
३२१०
 
बाळ माते लाते वरी । मारी तेणें संतोषे ॥१॥
 
सुख वसे चित्ती अंगीं । तें हें रंगीं मिळालें ॥ध्रु.॥
 
भक्षी त्याचा जीवमाग । आले भाग तो बरा ॥२॥
 
तुका म्हणे ॠणानुबंधें । सांगें सुदें सकळां ॥३॥
 
३२११
 
शिजल्यावरी जाळ । वांयां जायाचें तें मूळ ॥१॥
 
ऐसा वारावा तो श्रम । अतिशयीं नाहीं काम ॥ध्रु.॥
 
सांभाळावें वर्म । उचिताच्या काळें धर्म ॥२॥
 
तुका म्हणे कळे । ऐसें कारणाचे वेळे ॥३॥
 
३२१२
 
उभा ऐल थडी । तेणें घालूं नये उडी ॥१॥
 
पुढें गेल्याचे उपाय । करावे ते केले काय ॥ध्रु.॥
 
दिसतें आहारीं । नये जाऊं ऐशावरी ॥२॥
 
अळसाची धाडी । तुका म्हणे बहु नाडी ॥३॥
 
३२१३
 
शक्ती द्याव्या देवा । नाहीं पदार्थी सेवा ॥१॥
 
मुख्य आहे ऐसा धर्म । जाणते हो जाणा वर्म ॥ध्रु.॥
 
मना पोटीं देव । जाणे जैसा तैसा भाव ॥२॥
 
तुका म्हणे सोसें । लागे लाविल्याचें पिसें ॥३॥
 
३२१४
 
कार्य चि कारण । तृष्णा पावविते सीण ॥१॥
 
काय करुनि ऐसा संग । सोसें चि तूं पांडुरंग ॥ध्रु.॥
 
रूपीं नाहीं गोडी । हांवें हांवें ऊर फोडी ॥२॥
 
तुका म्हणे पडे भारी । ऐशा वरदळाचे थोरी ॥३॥
 
३२१५
 
संसाराच्या नांवें घालूनियां शून्य । वाढता हा पुण्य केला धर्म ॥१॥
 
हरिभजनें हें धवळिलें जग । चुकविला लाग कळिकाळाचा ॥ध्रु.॥
 
कोणां ही नलगे साधनांचा पांग । करणें केला त्याग देहबुद्धी ॥२॥
 
तुका म्हणे सुख समाधि हरिकथा । नेणें भववेथा गाईंल तो ॥३॥
 
३२१६
 
विश्वासिया नाहीं लागत सायास । रंग अनायासें अंगा येतो ॥१॥
 
लेंकराच्या हातें घास मागे माता । वोरसोनि चित्ता सुख पावे ॥ध्रु.॥
 
गौरव त्या मानी आरुषा वचनीं । भूषण ते वाणी मिरवावी ॥२॥
 
तुका म्हणे आहेस सकळ ही साक्षी । माझा कई पक्षी पांडुरंग ॥३॥
 
३२१७
 
वैभवाचे धणी सकळां शरणागत । सत्यभावें चत्ति अर्पिलें तें ॥१॥
 
नेदी उरों देव आपणावेगळें । भावाचिया बळें ठायाठाव ॥ध्रु.॥
 
जाणोनि नेणोनि अंगा आली दशा । मग होय इच्छा आपणच ॥२॥
 
तुका म्हणे बरें धाकट्याचें जिणें । माता स्तनपानें वाढवते ॥३॥
 
३२१८
 
कई ऐसी दशा येइल माझ्या आंगा । चत्ति पांडुरंगा झुरतसे ॥१॥
 
नाठवुनि देह पायांचें चिंतन । अवसान तें क्षण नाहीं मधीं ॥ध्रु.॥
 
काय ऐसा पात्र होईंन लाभासी । नेणों हृषीकेशी तुष्टईंल ॥२॥
 
तुका म्हणे धन्य मानीन संचित । घेईंन तें नित्य प्रेमसुख ॥३॥
 
३२१९
 
नाहीं वागवीत जाणिवेचें ओझें । स्वामिसेवेकाजे निर्धारु हा ॥१॥
 
आज्ञा ते प्रमाण हा मनीं निर्धार । येणें फिटे भार निश्चयेसी ॥ध्रु.॥
 
आळीकरें आम्ही एकविध चित्ते । तैसें होऊं येतें मायबापें ॥२॥
 
तुका म्हणे माझी ये जातीची सेवा । घातलासे देवावरी भार ॥३॥
 
३२२०
 
काय नाहीं माझे अंतरीं वसति । व्यापक हा भूतीं सकळां नांदे ॥१॥
 
चत्तिासी प्रसाद होईंल चळण । तें चि तें वळण मनासही ॥ध्रु.॥
 
सर्व शक्ति जीवीं राहिल्या कुंटित । नाहीं केलें होत आपुलें तें ॥२॥
 
तुका म्हणे दोरी खांब सूत्र्या हातीं । नाचवी नाचती जडें तैसीं ॥३॥
 
३२२१
 
देवाचें निर्माल्य कोण शिवे हातीं । संकल्पासी होती विकल्प ते ॥१॥
 
वाहिलें देह हें देवा एकसरें । होईंल तें बरें तेणें द्वारें ॥ध्रु.॥
 
होता भार त्याची निवारली खंती । येथें आतां रिती साटवण ॥२॥
 
तुका म्हणे इच्छे पावविले कष्ट । म्हणऊनि नष्ट दुरावली ॥३॥
 
३२२२
 
देव तीर्थ येर दिसे जया ओस । तोचि तया दोष जाणतिया ॥१॥
 
तया बरें फावे देवा चुकवितां । संचिताची सत्ता अंतराय ॥ध्रु.॥
 
शुद्धाशुद्धठाव पापुण्यबीज । पाववील दुजे फळभोग ॥२॥
 
तुका म्हणे विश्वंभराऐसें वर्म । चुकविल्या धर्म अवघे मिथ्या ॥३॥
 
३२२३
 
काय करूं सांगतां ही न कळे वर्म । उपस्थित भ्रम उपजवितो ॥१॥
 
मन आधीं ज्याचें आलें होईंल हातां । तयावरी सत्ता केली चाले ॥ध्रु.॥
 
अभुकेचे अंगीं चवी ना सवाद । मिथ्या ऐसा वाद दुराग्रह ॥२॥
 
तुका म्हणे आप राखावें आपणा । संकोचों चि कोणा नये आतां ॥३॥
 
३२२४
 
अमृत अव्हेरें उचळलें जातां । विष आर्त्तभूतां आवश्यक ॥१॥
 
आदरासी मोल नये लावूं केजें । धीर शुद्धबीजें गोमटा तो ॥ध्रु.॥
 
खर्‍याचिये अंगीं आपणे चाली । लावणी लाविली काय लागे ॥२॥
 
तुका म्हणे चाडे करा वेवसाव । आम्हांसी तो वाव धीर आहे ॥३॥
 
३२२५
 
अनुभवाचे रस देऊं आर्त्तभूतां । सोडूं चोजवितां पुढें पोतीं ॥१॥
 
देवाचा प्रसाद रत्नाच्या ओवणी । शोभतील गुणीं आपुलिया ॥ध्रु.॥
 
आधीं भाव सार शुद्ध ते भूमिका । बीज आणि पिका चिंता नाहीं ॥२॥
 
तुका म्हणे ज्याचें नाम गुणवंत । तें नाहीं लागत पसरावें ॥३॥
 
३२२६
 
काय मज एवढा भार । हे वेव्हार चाळवाया ॥१॥
 
उकल तो जाणे धणी । मज भोजनीं कारण ॥ध्रु.॥
 
चिंता ज्याची तया शिरीं । लेंकरीं तें खेळावें ॥२॥
 
तुका म्हणे सेवट झाल । देव या बोला भोगिता ॥३॥
 
३२२७
 
न गमे न गमे न गमे हरिविण । न मगे न मगे न मगे मेळवा शाम कोणी गे ॥१॥
 
तळमळ करी तैसा जीव जळाविण मासा । दिसती दिशा ओसा वो ॥ध्रु.॥
 
नाठवे भूक तान विकळ जालें मन । घडी जाय प्रमाण जुगा एकी वो ॥२॥
 
जरी तुम्ही नोळखा सांगतें ऐका । तुकयाबंधूचा सखा जगजीवन ॥३॥
 
३२२८
 
विठ्ठला रे तुझे वर्णितां गुणवाद । विठ्ठला रे दग्ध जालीं पापें ॥१॥
 
विठ्ठला रे तुझें पाहातां श्रीमुख । विठ्ठला रे सुख जालें नयना ॥ध्रु.॥
 
विठ्ठला रे तुज देतां आलिंगन । विठ्ठला तनमन निवाल्या बाह्या ॥२॥
 
विठ्ठला रे तुझी ऐकतां कीर्ति । विठ्ठल हे विश्रांति पावले स्मरणें ॥३॥
 
विठ्ठला रे तुकयाबंधु म्हणे देहभाव । विठ्ठला जीवीं पाव धरितां गेला ॥४॥
 
३२२९
 
एकांतीं लोकांतीं करूं गदारोळ । लेश तो ही मळ नाहीं येथें ॥१॥
 
घ्यावें द्यावें आम्हीं आपुलिया सत्ता । न देखों पुसता दुजा कोणी ॥ध्रु.॥
 
भांडाराची किली माझे हातीं आहे । पाहिजे तो पाहें वान येथें ॥२॥
 
तुका म्हणे आम्हां विश्वासाच्या बळें । ठेविलें मोकळें देवें येथें ॥३॥
 
३२३०
 
स्मरणाचे वेळे । व्हावें सावध न कळे ॥१॥
 
पडिलों विषयांचे ओढीं । कोणी न दिसेसें काढी ॥ध्रु.॥
 
भांडवल माझें । वेच जालें भूमी ओझें ॥२॥
 
तुका म्हणे कळे । तूं चि धावें ऐसें वेळे ॥३॥
 
३२३१
 
पाहा हो देवा कैसे जन । भिन्न भिन्न संचितें ॥१॥
 
एक नाहीं एका ऐसें । दावी कैसे शुद्ध हीन ॥ध्रु.॥
 
पंचभूतें एकी रासी । सूत्रें कैसीं खेळवी ॥२॥
 
तुका म्हणे जे जे जाती । तैसी स्थिति येतसे ॥३॥
 
३२३२
 
कोणाचिया न पडों छंदा । गोविंदासी आळवूं ॥१॥
 
बहुतांचीं बहु मतें । अवघे रिते पोकळ ॥ध्रु.॥
 
घटापटा ढवळी मन । होय सीण न करूं तें ॥२॥
 
तुका म्हणे पांडुरंग । भरूं भाग आला तो ॥३॥
 
३२३३
 
एकवेळ करीं या दुःखावेगळें । दुरिताचें जाळें उगवूनि॥१॥
 
आठवीन पाय हा माझा नवस । रात्री ही दिवस पांडुरंगा ॥ध्रु.॥
 
बहु दूरवरी भोगविले भोग । आतां पांडुरंगा सोडवावें ॥२॥
 
तुका म्हणे काया करीन कुरवंडी । ओंवाळूनि सांडीं मस्तक हें ॥३॥
 
३२३४
 
आणीक म्यां कोणा यावें काकुळती । कोण कामा येती अंतकाळीं ॥१॥
 
तूं वो माझी सखी होसी पांडुरंगे । लवकरी ये गे वाट पाहें ॥ध्रु.॥
 
काया वाचा मनें हें चि काम करीं । पाउलें गोजिरीं चिंतीतसें ॥२॥
 
तुका म्हणे माझी पुरवीं हे आस । घालीं ब्रम्हरस भोजन हें ॥३॥
 
३२३५
 
हें आम्हां सकळा । तुझ्या नामाचें चि बळ ॥१॥
 
करूं अमृताचें पान । दुजें नेणों कांहीं आन ॥ध्रु.॥
 
जयाचा जो भोग । सुख दुःख पीडी रोग ॥२॥
 
तुका म्हणे देवा । तुझे पायीं माझा हेवा ॥३॥
 
३२३६
 
आर्त माझ्या बहु पोटीं । व्हावीं भेटी पायांशी ॥१॥
 
यासी तुम्ही कृपावंता । माझी चिंता असों द्या ॥ ।ध्रु.॥
 
तळमळ करी चित्त । अखंडित वियोगें ॥२॥
 
तुका म्हणे पंढरिनाथा । जाणें वेथा अंतरिंची ॥३॥
 
३२३७
 
बहु जन्मांतरें फेरे । केले येरे सोडवीं ॥१॥
 
आळवितों करुणाकरे । विश्वंभरे दयाळे ॥ध्रु.॥
 
वाहवतों मायापुरीं । येथें करीं कुढावा ॥२॥
 
तुका म्हणे दुजा कोण । ऐसा सीण निवारी ॥३॥
 
३२३८
 
कराल तें काय नव्हे जी विठ्ठला । चत्ति द्यावें बोला बोबडिया ॥१॥
 
सोडवूनि घ्यावें काळचक्रा हातीं । बहुत विपत्ती भोगविल्या ॥ध्रु.॥
 
ज्यालें जेऊं नेदी मारिलें चि मरो । प्रारब्धा उरो मागुतालीं ॥२॥
 
तुका म्हणे दुजा खुंटला उपाय । म्हणऊनि पाय आठविले ॥३॥
 
३२३९
 
डौरलों भक्तिसुखें । सेवूं अमृत हें मुखें ॥१॥
 
संतसंगें सारूं काळ । प्रेमसुखाचा कल्लोळ ॥ध्रु.॥
 
ब्रम्हादिकांसी सुराणी । तो हा आनंद मेदिनी ॥२॥
 
नाहीं वैकुंठींचा पांग । धांवे कथे पांडुरंग ॥३॥
 
मुक्त व्हावें काशासाठीं । कैची येणें रसें भेटी ॥४॥
 
तुका म्हणे गोड । हें चि पुरे माझें कोड ॥५॥
 
३२४०
 
फोडिलें भांडार । माप घेऊनियां खरें ॥१॥
 
केली हरिनामाची वरो । मागितलें आतां सरो ॥ध्रु.॥
 
देशांत सुकाळ । जाला हारपला काळ ॥२॥
 
घ्यावें धणीवरी । तुका म्हणे लाहान थोरीं ॥३॥
 
३२४१
 
आनंदाचे डोहीं आनंदतरंग । आनंद चि अंग आनंदाचें ॥१॥
 
काय सांगों जालें कांहीचियाबाही । पुढें चाली नाहीं आवडीनें ॥ध्रु.॥
 
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा । तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे ॥२॥
 
तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा । अनुभव सरिसा मुखा आला ॥३॥
 
३२४२
 
म्हणऊनि धरिले पाय । अवो माय विठ्ठले ॥१॥
 
आपुलें चि करूनि घ्यावें । आश्वासावें आम्हास ॥ध्रु.॥
 
वाढली ते तळमळ चिंता । शम आतां करावी ॥२॥
 
तुका म्हणे जीवीं वसे । मज नसे वेगळी ॥३॥
 
३२४३
 
कल्याण या आशीर्वादें । जाती द्वंद्वें नासोनि ॥१॥
 
आश्वासिलें नारायणें । प्रेमदानें अंतरिंच्या ॥ध्रु.॥
 
गेली निवारोनि आतां । सकळ चिंता यावरि ॥२॥
 
तुका म्हणे गातां गीत । आलें हित सामोरें ॥३॥
 
३२४४
 
हरिनामवेली पावली विस्तार । फळीं पुष्पीं भार बोल्हावला ॥१॥
 
तेथें माझ्या मना होई पक्षिराज । साधावया काज तृप्तीचें या ॥ध्रु. ॥
 
मुळऴिचया बीजें दाखविली गोडी । लवकर चि जोडी जालियाची ॥२॥
 
तुका म्हणे क्षणक्षणां जातो काळ । गोडी ते रसाळ अंतरेल ॥३॥
 
३२४५
 
बरवें ऐसें आलें मना । नारायणा या काळें ॥१॥
 
देव आम्हा प्राणसखा । जालें दुःखा खंडण ॥ध्रु. ॥
 
जन्मांतरिंच्या पुण्यरासी । होत्या त्यांसी फळ आलें ॥२॥
 
तुका म्हणे निजठेवा । होईंल हेवा लाधलों ॥३॥
 
३२४६
 
जरि हे आड यती लाज । कैसें काज साधतें ॥१॥
 
कारण केलें उठाउठी । पायीं मिठी घातली ॥ध्रु.॥
 
समपिऩला जीव भाव । धरिला भाव अखंड ॥२॥
 
तुका म्हणे आड कांहीं । काळ नाहीं घातला ॥३॥
 
३२४७
 
पात्र शुद्ध चत्ति गोही । न लगे कांहीं सांगणें ॥१॥
 
शूर तरी सत्य चि व्हावें । साटी जीवें करूनि ॥ध्रु.॥
 
अमुप च सुखमान । स्वामी जन मानावें ॥२॥
 
तुका म्हणे जैसी वाणी । तैसे मनीं परिपाक ॥३॥
 
३२४८
 
प्रगटलें ज्ञान । नारायण भूतीं तें ॥१॥
 
अनुभव च घेऊं व्हावा । विनंती देवा करूनियां ॥ध्रु.॥
 
देखोवेखीं वदे वाणी । पडिल्या कानीं प्रमाणें ॥२॥
 
तुका म्हणे योगक्षेम । घडे तें वर्म साधावें ॥३॥
 
३२४९
 
मुख्य आधीं विषयत्याग । विधिभाग पाळणें ॥१॥
 
मन पावे समाधान । हें चि दान देवाचें ॥ध्रु.॥
 
उदासीन वृत्ति देहीं । चाड नाहीं पाळणें ॥२॥
 
तुका म्हणे नाहीं भय । सम सोय विषमाची ॥३॥
 
३२५०
 
आतां हें चि सार हें चि सार । मूळबीज रे आइका ॥१॥
 
आवडीनें आवडी उरे । जें ज्या झुरे तें त्यासी ॥ध्रु.॥
 
प्रेमाचिया सूत्रदोरी । नाहीं उरी उरवी ॥२॥
 
तुका म्हणे चिंतन बरें । आहे खरें ख†यापें ॥३॥
 

३२५१
 
केला तैसा अंगीकार । माझा भार चालवीं ॥१॥
 
होऊं अंतराय बुद्धी । कृपानिधी नेदावी ॥ध्रु.॥
 
आम्ही तरी जड जीव । कैंचा भाव पुरता ॥२॥
 
अनन्यभावें घ्यावी सेवा । आम्हां देवा घडेसी ॥३॥
 
तुम्हीं आम्ही शरणागतें । कृपावंतें रक्षीजे ॥४॥
 
तुका म्हणे भाकुं कींव । असों जीव जड आम्ही ॥५॥
 
३२५२
 
सोसें बहुगर्भवासीं । मेलों असों उपवासीं । नाहीं सखीं ऐसीं । तेथें कोणी भेटलीं ॥१॥
 
करीं करीं रे स्वहित । देह तंव हे अनित्य । नाहीं दिलें चित्त । सोडवूं मोहापासोनि ॥ध्रु.॥
 
पाळी तोंडीचिया घांसें । तें चि होय अनारिसें । ज्या नव्हे ऐसें । खेदी परि सोडवीना ॥२॥
 
तुका म्हणे धनमानें । माझ्या बाटलों मीपणें । नाहीं दिला जनें । देखों लाभें हा लाभ ॥३॥
 
३२५३
 
इच्छिती तयांसी व्हावें जी अरूप । आम्हांसी स्वरूपस्थिती चाड ॥१॥
 
आतां नव्हे माझा भाव अनारिसा । पाउलांनी इच्छा गोवियेली ॥ध्रु.॥
 
लेंकरासी कोठें जाणत्याची परी । करूं येते दुरी धरावया ॥२॥
 
लागली न सुटे नामाची आवडी । माझी भावजोडी भंगूं नका ॥३॥
 
घेसील वेढे मुक्तीच्या अभिळासें । चाळवीं जा पिसे ब्रम्हज्ञानी ॥४॥
 
तुका म्हणे माझा कोठें भक्तिरस । पाडावया ओस चाळविसी ॥५॥
 
३२५४
 
आम्हां भाविकांची जाती । एकविध जी श्रीपती । अळंकारयुक्ति । सरों शके चि ना ॥१॥
 
जाणें माउली त्या खुणा । क्षोभ उपजों नेदी मना । शांतवूनि स्तना । लावीं अवो कृपाळे ॥ध्रु.॥
 
तुज अवघे होऊं येते । मज वाटों नये चित्त । उपासने परतें । नये कांहीं आवडों ॥२॥
 
करूं रूपाची कल्पना । मुखीं नाम उच्चारणा । तुका म्हणे जना । जल स्थल देखतां ॥३॥
 
३२५५
 
ज्यावें हीनपणें । कासयाच्या प्रयोजनें ॥१॥
 
प्रारब्धीं संसार । बरी हिमतीची थार ॥ध्रु.॥
 
होणार ते कांहीं । येथें अवकळा नाहीं ॥२॥
 
तुका म्हणे देवें । कृपा केलिया बरवें ॥३॥
 
३२५६
 
किती रांडवडे । घालूनि व्हाल रे बापुडे । संसाराचे भिडे । कासावीस जालेती ॥१॥
 
माझ्या स्वामी शरण रिघा । कृपाळुवा पांडुरंगा । ठेवी अंगसंगा । विश्वासियां जवळी ॥ध्रु.॥
 
कांहीं न मागतां भलें । होईंल तें चि काम केलें । नसावें आथिलें । कांहीं एका संकल्पें ॥२॥
 
तुका म्हणे भाव । पाववील ठायाठाव । एकविध जीव । ठेविलिया सेवेसी ॥३॥
 
 
 
३२५७
 
बाप करी जोडी लेंकराचे ओढी । आपुली करवंडी वाळवूनी ॥१॥
 
एकाएकीं केलों मिरासीचा धनी । कडिये वागवूनी भार खांदीं ॥ध्रु.॥
 
लेवऊनी पाहे डोळा अळंकार । ठेवा दावी थोर करूनियां ॥२॥
 
तुका म्हणे नेदी गांजूं आणिकांसी । उदार जीवासी आपुलिया ॥३॥
 
३२५८
 
या रे हरिदासानो जिंकों कळिकाळा । आमुचिया बळा पुढें किती बापुडें ॥१॥
 
रंग सुरंग घमंडी नाना छंदें । हास्यविनोदें मनाचिये आवडी ॥ध्रु.॥
 
येणें तेणें प्रकारें बहुतां सुख जोडे । पूजन तें घडे नारायणा अंतरीं ॥२॥
 
वांकड्या माना बोल बोलावे आर्ष । येईंल तो त्यांस छंद पढीयें गोविंदा ॥३॥
 
आपुलालें आवडी एकापुढें एक नटा । नाहीं थोर मोठा लहान या प्रसंगीं ॥४॥
 
तुका म्हणे येथें प्रेम भंगूं नये कोणीं । देव भक्त दोन्ही निवडितां पातक ॥५॥
 
३२५९
 
अवघा च अन्यायी । तेथें एकल्याचें काईं ॥१॥
 
आतां अवघें एकवेळें । जळोनि सरो तें निराळें ॥ध्रु.॥
 
काय माझें खरें । एवढें च राखों बरें ॥२॥
 
तुका म्हणे आतां । परिहार न लगे चित्ता ॥३॥
 
३२६०
 
काय वृंदावन मोहियेलें गुळें । काय जिरें काळें उपचारिलें ॥१॥
 
तैसी अधमाची जाती च अधम । उपदेश श्रम करावा तो ॥ध्रु.॥
 
न कळे विंचासी कुरवाळिलें अंग । आपले ते रंग दावीतसे ॥२॥
 
तुका म्हणे नये पाकासी दगड । शूकरासी गोड जैसी विष्ठा ॥३॥
 
३२६१
 
स्तवूनियां नरा । केला आयुष्याचा मातेरा ॥१॥
 
नारायणचिया लोपें । घडलीं अवघीं चि पापें ॥ध्रु.॥
 
जीव ज्याचें दान । त्याचा खंडूनियां मान ॥२॥
 
तुका म्हणे वाणी । आइके त्या दोष कानीं ॥३॥
 
३२६२
 
संतां नाहीं मान । देव मानी मुसलमान ॥१॥
 
ऐसे पोटाचे मारिले । देवा आशा विटंबिले ॥ध्रु.॥
 
घाली लोटांगण । वंदी नीचाचे चरण ॥२॥
 
तुका म्हणे धर्म । न कळे माजल्याचा भ्रम ॥३॥
 
३२६३
 
अवो कृपावंता । होई बुद्धीचा ये दाता ॥१॥
 
जेणें पाविजे उद्धार । होय तुझे पायीं थार ॥ध्रु.॥
 
वदवीं हे वाचा । भाव पांडुरंगीं साचा ॥२॥
 
तुका म्हणे देवा । माझे अंतर वसवा ॥३॥
 
३२६४
 
नाहीं म्या वंचिला मंत्र कोणापाशीं । राहिलों जीवासीं धरूनि तो ॥१॥
 
विटेवरी भाव ठेवियेलें मन । पाउलें समान चिंतीतसें ॥ध्रु.॥
 
पावविला पार धरिला विश्वास । घालूनियां कास बळकट ॥२॥
 
तुका म्हणे मागें पावले उद्धार । तिहीं हा आधार ठेविलासे ॥३॥
 
३२६५
 
चंचळीं चंचळ निश्चळीं निश्चळ । वाजवी खळाळ उदकासी ॥१॥
 
सोपें वर्म परि मन नाहीं हातीं । हा हा भूत चित्ती भ्रम गाढा ॥ध्रु.॥
 
रविबिंब नाहीं तुटत उदका । छायेची ते नका सरी धरूं ॥२॥
 
तुका म्हणे भय धरी रज्जूसाटीं । नाहीं साच पोटीं कळलें तों ॥३॥
 
३२६६
 
आवडी येते कळों । गुणें चिन्हें उमटती ॥१॥
 
पोटीचें ओठीं उभें राहे । चत्ति साहे मनासी ॥ध्रु.॥
 
डाहोळे याची भूक गर्भा । ताटीं प्रभा प्रतिबिंबे ॥२॥
 
तुका म्हणे मानोन घ्यावें । वाटे खावें वाटतें ॥३॥
 
३२६७.
 
काय ऐसी वेळ । वोडवली अमंगळ ॥१॥
 
आजि दुखवलें मन । कथाकाळीं जाला सीण ॥ध्रु.॥
 
पापाचिया गुणें । त्यांचिया वेळे दर्षणें ॥२॥
 
तुका म्हणे कानीं । घालूं आले दुष्टवाणी ॥३॥
 
३२६८
 
किती वेळां जन्मा यावें । नित्य व्हावें फजीत ॥१॥
 
म्हणऊनि जीव भ्याला । शरण गेला विठोबासी ॥ध्रु.॥
 
प्रारब्ध पाठी गाढें । न सरें पुढें चालत ॥२॥
 
तुका म्हणे रोकडीं हे । होती पाहें फजीती ॥३॥
 
३२६९
 
होतों सांपडलों वेठी । जातां भेटी संसारा ॥१॥
 
तों या वाटे कृपा केली । भेटी जाली विठोबासी ॥ध्रु.॥
 
होता भार माथां माझे । बहु ओझें अमुप ॥२॥
 
तुका म्हणे केली चिंता । कोण दाता भेटेल ॥३॥
 
३२७०
 
भुंकुनियां सुनें लागे हस्तीपाठी । होऊनि हिंपुटी दुःख पावे ॥१॥
 
काय त्या मशकें तयाचें करावें । आपुल्या स्वभावें पीडतसे ॥ध्रु.॥
 
मातलें बोकड विटवी पंचानना । घेतलें मरणा धरणें तें ॥२॥
 
तुका म्हणे संतां पीडितील खळ । घेती तोंड काळें करूनियां ॥३॥
 
३२७१
 
जा रे तुम्ही पंढरपुरा । तो सोयरा दीनांचा ॥१॥
 
गुण दोष नाणी मना । करी आपणासारिखें ॥ध्रु.॥
 
उभारोनि उभा कर । भवपार उतराया ॥२॥
 
तुका म्हणे तांतड मोठी । जाली भेटी उदंड ॥३॥
 
३२७२
 
गर्जत जावें नामावळी । प्रेमें टाळी वाहोनि ॥१॥
 
येणें सुखें पुढती धांवे । भेटी सवें गोपाळा ॥ध्रु.॥
 
लोटांगण घाला तळीं । वंदा धुळी संतांची ॥२॥
 
तुका म्हणे विठ्ठल लाहो । ऐसा बाहो उभारा ॥३॥
 
३२७३
 
अनुसरे तो अमर जाला । अंतरला संसारा ॥१॥
 
न देखती गर्भवास । कधीं दास विष्णूचे ॥ध्रु.॥
 
विसंभेना माता बाळा । तैसा लळा पाळावा ॥२॥
 
त्रिभुवनीं ज्याची सत्ता । तुक्या रक्षिता तो जाला ॥३॥
 
३२७४
 
आतां केशीराजा हे चि विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥
 
देह असो माझा भलतिये ठायीं । चत्ति तुझ्या पायीं असों द्यावें ॥ध्रु.॥
 
काळाचें खंडण घडावें चिंतन । धनमानजनविन्मुख तो ॥२॥
 
कफवातपत्ति देहअवसानीं । ठेवावीं वारूनि दुरितें हीं ॥३॥
 
सावध तों माझीं इंद्रियें सकळें । दिलीं एका वेळे हाक आधीं ॥४॥
 
तुका म्हणे तूं या सकळांचा जनिता । येथें ऐकता सकळांसी ॥५॥
 
३२७५
 
चत्ति तें चिंतन कल्पनेची धांव । जे जे वाढे हांव इंद्रियांची ॥१॥
 
हात पाव दिसे शरीर चालतां । नावें भेद सत्ता जीवाची ते ॥ध्रु.॥
 
रवीचिये अंगीं प्रकाशक कळा । वचनें निराळा भेद दिला ॥२॥
 
तुका म्हणे माप वचनाच्या अंगीं । मौन्य काय रंगीं निवडावें ॥३॥
 
३२७६
 
बोलोनियां काय दावूं । तुम्ही जीऊ जगाचे ॥१॥
 
हे चि आतां माझी सेवा । चिंतन देवा करितों ॥ध्रु.॥
 
विरक्तासी देह तुच्छ । नाहीं आस देहाची ॥२॥
 
तुका म्हणे पायापाशीं । येइन ऐसी वासना ॥३॥
 
३२७७
 
निजों नव्हें सकाळवेळीं । रातीकाळी चिंन चिंनी॥१॥
 
वोंगळानें घेतली पाठी । केली आटी जीवासी ॥ध्रु.॥
 
मेळऊनि सवें जन । चिंता नेणे देवळीं च ॥२॥
 
तुका म्हणे आलों घरा । तोंडा घोरा बाइलेच्या ॥३॥
 
३२७८
 
मायबाप सवें नये धनवत्ति । करावें संचित भोगावें तें ॥१॥
 
म्हणऊनि लाभ काय तो विचारीं । नको चालीवरी चत्ति ठेवूं ॥ध्रु.॥
 
आयुष्य सेवटीं सांडूनि जाणार । नव्हे हें साचार शरीर हें ॥२॥
 
तुका म्हणे काळें लावियेलें माप । जमे धरी पापपुण्याची ही ॥३॥
 
३२७९
 
मोटळें हाटीं सोडिल्या गांठी । विकर्‍या घातलें केण ।
 
ज्याचे भाग त्यासी देऊनि वारिलें । सारूनि लिगाड दान ।
 
खरें माप हातीं घेऊनि बैसलों । मानिती ते चौघे जन ।
 
खरें वत्ति तेथें आले चोजवीत । गिर्‍हाइक संतजन ॥१॥
 
झाडिला पालव केला हाट वेच । जाली सकाळीं च अराणूक ।
 
याल तरि तुम्ही करा लगबग । आमचे ते कोणी लोक ॥ध्रु.॥
 
एक ते उत्तम मध्यम कनिष्ठ । वित्ताचे प्रकार तीन । बहुतां जनाचे बहुत प्रकार । वेगळाले वाण ।
 
लाभ हाणि कोणा मुदल जालें । कोणासी पडिलें खाण ।
 
अर्धमर्ध कोणी गुंतोनि राहिले । थोडे तैसे बहु जन ॥२॥
 
एके सांते आले एक गांवीहून । येकामे चि नव्हे जाणें ।
 
येतां जातां रुजू नाहीं दिवाणा । काळतोंडीं एकें तेणें ।
 
लाग भाग एकी एकानीं गोविलें । मागील पुढिलां ॠणें ।
 
तुका म्हणे आतां पाहूं नये वास । साधावें आपुलें पेणें ॥३॥
 
३२८०
 
करा करा लागपाट । धरा पंढरीची वाट । जंव नाहीं चपेट । घात पडिला काळाचा ॥१॥
 
दुजा ऐसा नाहीं कोणी । जो या काढी भयांतूनि । करा म्हणऊनि । हा विचार ठायींचा ॥ध्रु.॥
 
होती गात्रें बेंबळीं । दिवस अस्तमाना काळीं । हातपायटाळीं । जें मोकळी आहेती ॥२॥
 
कां रे घेतलासी सोसें । तुज वाटताहे कैसें । तुका म्हणे ऐसें । पुढें कैं लाहासी ॥३॥
 
३२८१
 
यत्न आतां तुम्ही करा । मज दातारा सत्तेनें ॥१॥
 
विश्वास तो पायांवरि । ठेवुनि हरी राहिलों ॥ध्रु.॥
 
जाणत चि दुजें नाहीं । आणीक कांहीं प्रकार ॥२॥
 
तुका म्हणे शरण आलों । नेणें बोलों विनवितां ॥३॥
 
३२८२
 
अनाथां जीवन । आम्हां तुमचे चरण । करूनि सांटवण। धरीयेले हृदयीं ॥१॥
 
पुष्ट जाली अंगकांति । आनंद न समाये चित्तीं । कवतुकें प्रीती । गाऊं नाचों उल्हासें ॥ध्रु.॥
 
करुणाउत्तरीं । करून आळवण हरी । जाऊं नेदूं दुरी । प्रेमप्रीतिपडिभरें ॥२॥
 
मोहो माते करी गोवा । ऐसें आहे जी केशवा । तुका म्हणे सेवा । आणीक नाहीं जाणत ॥३॥
 
३२८३
 
सुखाची वसति जाली माझे जीवीं । तुमच्या गोसावी कृपादानें ॥१॥
 
रूप वेळावेळां आठवीं अंतरीं । बैसोनि जिव्हारीं राहिलें तें ॥ध्रु.॥
 
विसांवलें मन विठ्ठलें प्रपंचा । गोडावली वाचा येणें रसें ॥२॥
 
तुका म्हणे कांहीं नाठवेसें केलें । दुसरें विठ्ठलें मज आतां ॥३॥
 
३२८४
 
आम्हां कांहीं आम्हां कांहीं । आतां नाहीं या बोलें ॥१॥
 
मोल सांगा मोल सांगा । घेणें तिंहीं गा पुसावें ॥ध्रु.॥
 
कैसें घडे कैसें घडे । बडबड तुज मज ॥२॥
 
मुदलें साटी मुदलें साटी । लाभ पोटीं त्या च मधीं ॥३॥
 
तुका म्हणे साटवूं घरीं । आडल्या काळें पुसती तरी ॥४॥
 
३२८५
 
घ्या रे भाईं प्या रे भाईं । कोणी कांहीं थोडें बहु ॥१॥
 
ये च हाटीं ये च हाटीं । बांधा गाठी पारखून ॥ध्रु.॥
 
वेच आहे वेच आहे । सरलें पाहे मग खोटें ॥२॥
 
उघडें दुकान उघडें दुकान । रात्री जाली कोण सोडी मग ॥३॥
 
तुका म्हणे अंतकाळीं । जाती टाळीं बैसोनि ॥४॥
 
३२८६
 
मार्ग चुकले विदेशीं एकले । तयावरि जाले दिशाभुली ॥१॥
 
हातीं धरूनियां पावविलें घरा । त्याच्या उपकारा काय द्यावें ॥२॥
 
तैसा मी कुडकुडा होतों केशीराजा । सेवा न घडे लाजा म्हणऊनि ॥ध्रु.॥
 
सांडियेला गर्भ उबगोनि माउली । नाहीं सांभाळिली भूमि शुद्ध ॥३॥
 
उष्ण तान भूक एवढिये अकांतीं । वोसंगा लाविती काय म्हणिजे ॥४॥
 
खांद्यावरी शूळ मरणाचे वाटे । अन्याय हि मोटे साच केले ॥५॥
 
हातींचें हिरोनि घातला पाठीसी । तुका म्हणे ऐसी परी जाली ॥६॥
 
३२८७
 
जैसी तैसी तरि वाणी । मना आणी माउली ॥१॥
 
लेकरांच्या स्नेहें गोड । करी कोड त्या गुणें ॥ध्रु.॥
 
मागें पुढें रिघे पोटीं । साहे खेटी करीतें ॥२॥
 
तुका विनवी पांडुरंगा । ऐसें पैं गा आहे हें ॥३॥
 
३२८८
 
गुणांचे आवडी वाचेचा पसरू । पडिला विसरु इतरांचा ॥१॥
 
आदिमध्यअंतीं नाहीं अवसान । जीवनीं जीवन मिळोनि गेलें ॥ध्रु.॥
 
रामकृष्णनाममाळा हे साजिरी । ओविली गोजिरी कंठाजोगी ॥२॥
 
तुका म्हणे तनु जालीसे शीतळ । अवघी सकळ ब्रम्हानंदें ॥३॥
 
३२८९
 
देवाची भांडारी । आदा विनियोग करी ॥१॥
 
आतां न माखे हातपाय । नेणों होतें ऐसें काय ॥ध्रु.॥
 
देवें नेली चिंता । जाला सकळ करिता ॥२॥
 
तुका म्हणे धणी । त्यासी अवघी पुरवणी ॥३॥
 
३२९०
 
पेणावलें ढोर मार खाय पाठी । बैसलें तें नुठी तेथूनियां ॥१॥
 
तैसी माझ्या मना परी जाली देवा । धावें अहंभावा सांडावलों ॥ध्रु.॥
 
कडां घालीं उडी मागिलांच्या भेणें । मरणामरण न कळे चि ॥२॥
 
तुका म्हणे जालों त्यापरी दुःखित । असें बोलावीत पांडुरंगा ॥३॥
 
३२९१
 
जालिया दर्शन करीन मी सेवा । आणीक ही देवा न लगे दुजें ॥१॥
 
प्रारब्धा अंगीं अन्न आच्छादन । स्थिर करोनि मन ठेवीं पायीं ॥ध्रु.॥
 
ये गा ये गा ये गा कृपाळुवा हरी । निववीं अभ्यंतरीं देउनि भेटी ॥२॥
 
आसावलें मन जीवनाचे ओढी । नामरूपें गोडी लावियेली ॥३॥
 
काय तुम्हांपाशीं नाहीं भांडवल । माझे मिथ्या बोल जाती ऐसे ॥४॥
 
काय लोखंडाचे पाहे गुण दोष । सिवोनि परिस सोनें करी ॥५॥
 
तुका म्हणे माझें अवघें असों द्यावें । आपुलें करावें ब्रीद साच ॥६॥
 
३२९२
 
येथें आड कांहीं न साहे आणीक । प्रमाण तें एक हें चि जालें ॥१॥
 
गाऊं नाचों टाळी गाऊं गाऊं गीत छंदें । डोलवूं विनोदें अंग तेणें ॥ध्रु.॥
 
मथुनियां सार काढिलें बाहेरी । उपाधि ते येरी निवडिली ॥२॥
 
तुका म्हणे जगा लाविली शिराणी । सेवितां हे धणी होत नाहीं ॥३॥
 
३२९३
 
शरणागत जालों । तेणें मीपणा मुकलों ॥१॥
 
आतां दिल्याची च वाट । पाहों नाहीं खटपट ॥ध्रु.॥
 
नलगे उचित । कांहीं पाहावें संचित ॥२॥
 
तुका म्हणे सेवा । माने तैसी करूं देवा ॥३॥
 
३२९४
 
वाचेचिया आळा कवळिलें ब्रम्ह । चुकविला श्रम पृथक तो ॥१॥
 
सुलभ जालें सुलभ जालें । जवळी आलें पंढरिये ॥ध्रु.॥
 
नामरूपाचें बांधलें मोटळें । एक एका वेळे सारियेलें ॥२॥
 
तुका म्हणे वाटे चुकली वसती । उद्धार तो हातीं आणियेला ॥३॥
 
३२९५
 
सवंग जालें सवंग जालें । घरा आलें बंदरींचे ॥१॥
 
आतां हेवा करावा सोस । भक्तिरस बहु गोड ॥ध्रु.॥
 
पाउल वेचे चिंता नाहीं । आड कांहीं मग नये ॥२॥
 
तुका म्हणे संचिताचें । नेणें काचें राहों तें ॥३॥
 
३२९६
 
तुम्ही संत मायबाप कृपावंत । काय मी पतित कीर्ती वाणूं ॥१॥
 
अवतार तुम्हां धराया कारणें । उद्धरावें जन जड जीव ॥ध्रु.॥
 
वाढविलें सुख भक्ति भाव धर्म । कुळाचार नाम विठोबाचें ॥२॥
 
तुका म्हणे गुण चंदनाचे अंगीं । तैसे तुम्ही जगीं संतजन ॥३॥
 
३२९७
 
पाठी लागे तया दवडीं दुरी । घालीं या बाहेरी संवसारा ॥१॥
 
येउनि दडें तुमच्या पायीं । धांवें तई छो म्हणा ॥ध्रु.॥
 
पारखियाचा वास पडे । खटबड उठी तें ॥२॥
 
तुका म्हणे लाविला धाक । नेदी ताक खाऊं कोणी ॥३॥
 
३२९८
 
सांखळिलों प्रीती गळां । भुंके वेळा जाणोनियां ॥१॥
 
तुमचें मी केशीराजा । सुनें या काजा पाळिलों ॥ध्रु.॥
 
आलें गेलें कळे वाटा । कोण निटा वाकडिया ॥२॥
 
तुका म्हणे आलें वारी । दुरितें दुरी नातळतां ॥३॥
 
३२९९
 
सुनियांचा हा चि भाव । आपला ठाव राखावा ॥१॥
 
दुजियाचा येऊं वारा । नेदूं घरावरी देऊं ॥ध्रु.॥
 
केली याची फाडाफाडी। तडामोडी क्षेत्राची ॥२॥
 
पातेजत नाहीं लोकां । तुका देवावांचूनि ॥३॥
 
३३००
 
सुनियांची आवडी देवा । घेत सेवा नाहीं कांहीं ॥१॥
 
सिकविलें जवळी बैसों । जेथें असों तेथें चि ॥ध्रु.॥
 
नेदी दुजें बोलों करूं । गुरुगुरु न साहे ॥२॥
 
तुका म्हणे कृवाळितां । अंग सत्ता संगाची ॥३॥
 

३३०१
 
सिळे खातां आला वीट । सुनें धीट पावि धरी ॥१॥
 
कान्होबा ते जाणे खूण । उन उन घास घाली ॥ध्रु.॥
 
आपुलिये ठायींचे घ्यावें । लाड भावें पाळावा ॥२॥
 
तुका म्हणे मी जुनाट । मोहो आट परतला ॥३॥
 
३३०२
 
लागलें भरतें । ब्रम्हानंदाचें वरतें ॥१॥
 
जाला हरिनामाचा तारा । सीड लागलें फरारा ॥ध्रु.॥
 
बैसोनि सकळ । बाळ चालिले गोपाळ ॥२॥
 
तुका म्हणे वाट । बरवी सांपडली नीट ॥३॥
 
३३०३
 
धनें वित्तें कुळें । अवघियानें ते आगळे ॥१॥
 
ज्याचे नारायण गांठीं । भरला हृदय संपुटीं ॥ध्रु.॥
 
अवघें चि गोड । त्याचें पुरलें सर्व कोड ॥२॥
 
तुका म्हणे अस्त । उदय त्याच्या तेजा नास्त ॥३॥
 
३३०४
 
बोलावें तें आतां आम्ही अबोलणे । एका चि वचनें सकळांसी ॥१॥
 
मेघदृष्टि कांहीं न विचारी ठाव । जैसा ज्याचा भाव त्यासी फळो ॥२॥
 
 
तुका म्हणे नाहीं समाधानें चाड । आपणा ही नाड पुढिलांसीं ॥३॥
 
३३०५
 
अधिकार तैसा करूं उपदेश । साहे ओझें त्यास तें चि द्यावें ॥१॥
 
मुंगीवर भार गजाचें पालाण । घालितां तें कोण कार्यसिद्धी ॥२॥
 
तुका म्हणे फांसे वाघुरा कुर्‍हाडी । प्रसंगी तों काढी पारधी तो ॥३॥
 
३३०६
 
नव्हों वैद्य आम्ही अर्थाचे भुकेले । भलते द्यावे पाले भलत्यासी ॥१॥
 
कुपथ्य करूनि विटंबावे रोगी । का हे सलगी भीड त्याची ॥२॥
 
तुका म्हणे लांसू फांसुउं देऊं डाव । सुखाचा उपाव पुढें आहे ॥३॥
 
३३०७
 
नव्हें परि म्हणवीं दास । कांहीं निमित्तास मूळ केलें ॥१॥
 
तुमचा तो धर्म कोण । हा आपण विचारा ॥धृ. ॥
 
नाहीं शुद्ध आचरण । परी चरण चिंतितों ॥२॥
 
तुका म्हणे पांडुरंगा । ऐसें कां गा नेणां हें ॥३॥
 
३३०८
 
मागें चिंता होती आस । केला नास या काळें ॥१॥
 
तुम्ही आम्हां उदासीन । भिन्नाभिन्न वारिलें ॥ध्रु.॥
 
मोहजाळें दुःख वाढे । ओढे ओढे त्यास तें ॥२॥
 
तुका म्हणे कोण देवा । आतां हेवा वाढवी ॥३॥
 
३३०९
 
आहो उभा विटेवरी । भरोवरी चुकविली ॥१॥
 
निवारलें जाणें येणें । कोणा कोणें रुसावे ॥ध्रु.॥
 
संकल्पासी वेचे बळ । भारे फळ निर्माण ॥२॥
 
तुका म्हणे उभयतां । भेटी सत्ता लोभाची ॥३॥
 
३३१०
 
असो खटपट । आतां वाउगे बोभाट ॥१॥
 
परिसा हे विनवणी । असो मस्तक चरणीं ॥ध्रु.॥
 
अपराध करा । क्षमा घडले दातारा ॥२॥
 
तुका म्हणे वेथा । तुम्हा कळे पंढरिनाथा ॥३॥
 
३३११
 
वारकरी पायांपाशीं । आले त्यांसी विनविलें ॥१॥
 
काय काय तें आइका । विसरों नका रंकासी ॥ध्रु.॥
 
चिंतावोनि चिंता केली । हे राहिली अवस्था ॥२॥
 
तुका म्हणे संसारा । रुसलों खरा यासाठीं ॥३॥
 
३३१२
 
जीवींचें कां नेणां । परि हे आवडी नारायणा ॥१॥
 
वाढवावें हें उत्तर । कांहीं लाज करकर ॥ध्रु.॥
 
कोठें वांयां गेले । शब्द उत्तम चांगले ॥२॥
 
तुका म्हणे बाळा । असतात प्रिय खेळा ॥३॥
 
३३१३
 
वोडविलें अंग । आतां करूनि घ्यावें सांग ॥१॥
 
काय पूजा ते मी नेणें । जाणावें जी सर्वजाणें ॥ध्रु.॥
 
पोटा आलें बाळ । त्याचें जाणावें सकळ ॥२॥
 
चुका म्हणे हरी । वाहावें जी कडियेवरी ॥३॥
 
३३१४
 
सेवटींची हे विनंती । पाय चित्तीं रहावे ॥१॥
 
ऐसे करा कृपादान । तुम्हां मन सन्निध ॥ध्रु.॥
 
भाग्याविण कैंची भेटी । नव्हे तुटी चिंतनें ॥२॥
 
तुका म्हणे कळसा आलें । हें विठ्ठलें परिसावें ॥३॥
 
३३१५
 
करूंनियां शुद्ध मन । नारायण स्मरावा ॥१॥
 
तरीच हा तरिजे सिंधु । भवबंधू तोडोनिया ॥ध्रु.॥
 
तेथे सरे शुद्ध साचें । अंतरींचे बीज तें ॥२॥
 
तुका म्हणे लवणकळी । पडतां जळीं तें होय ॥३॥
 
३३१६
 
जिकडे पाहे तिकडे देव । ऐसा भाव दे कांहीं ॥१॥
 
काय केलों एकदेशी । गुणदोषीं संपन्न ॥ध्रु.॥
 
पडें तेथें तुझ्या पायां । करीं वायां न वजतें ॥२॥
 
तुका म्हणे विषमें सारी । ठाणें धरी जीवासी ॥३॥
 
३३१७
 
जिकडे जाय तिकडे सवें । आतां यावें यावरी ॥१॥
 
माझ्या अवघ्या भांडवला । तूं एकला जालासी ॥ध्रु.॥
 
आतां दुजें धरा झणी । पायांहूनि वेगळें ॥२॥
 
तुका म्हणे आतां देवा । नका गोवा यावरी ॥३॥
 
३३१८
 
स्मरतां कां घडे नास । विष्णुदास यावरी ॥१॥
 
ऐसी सीमा जाली जगीं । तरी मी वेगीं अनुसरलों ॥ध्रु.॥
 
धरिलें तें निवडे आतां । न घडे चित्तावेगळें ॥२॥
 
तुका म्हणे नाश नाहीं । पुराणें ही गर्जती ॥३॥
 
३३१९
 
आधी नाहीं कळों आला हा उपाय । नाहीं तरी काय चुकी होती ॥१॥
 
घालितो पायांसी मिठी एकसरें । नेदीं तो दुसरें आड येऊं ॥ध्रु.॥
 
 
कासया पडतों लटिक्याचे भरी । नव्हता का शिरीं भार घेतों ॥२॥
 
 
तुका म्हणे कां हे घेतों गर्भवास । कां या होतों दास कुटुंबाचा ॥३॥
 
३३२०
 
आतां बरें जालें । माझें मज कळो आलें ॥१॥
 
खोटा ऐसा संवसार । मज पायीं द्यावी थार ॥ध्रु.॥
 
उघडले डोळे । भोग देताकाळीं कळे ॥
 
तुका म्हणे जीवा । होतां तडातोडी देवा ॥३॥
 
३३२१
 
बोलिलों ते धर्म अनुभव अंगें । काय पांडुरंगें उणें केलें ॥१॥
 
सर्व सिद्धि पायीं वोळगती दासी । इच्छा नाहीं ऐसी व्हावें कांहीं ॥ध्रु.॥
 
संतसमागमें अळंकार वाणी । करूं हे पेरणी शुद्ध बीजा ॥२॥
 
तुका म्हणे रामकृष्णनामें गोड । आवडीचें कोड माळ ओऊं ॥३॥
 
३३२२
 
परिसाचे अंगें सोनें जाला वळिा । वाकणें या कळा हीन नेव्हे ॥१॥
 
अंतरीं पालट घडला कारण । मग समाधान तें चि गोड ॥ध्रु.॥
 
पिकली सेंद पूर्वकर्मा नये । अव्हेरु तो काय घडे मग ॥२॥
 
तुका म्हणे आणा पंगती सुरण । पृथक ते गुण केले पाकें ॥३॥
 
३३२३
 
ज्याचे माथां जो जो भार । ते चि फार तयासी ॥१॥
 
मागें पुढें अवघें रितें । कळों येतें अनुभवें ॥ध्रु.॥
 
परिसा अंगीं अमुपसोनें । पोटीं हीन धातु चि ॥२॥
 
आपुला तो करि धर्म । जाणे वर्म तुका तें ॥३॥
 
३३२४
 
पाहें तिकडे दिशा ओस । अवघी पास पायांपें ॥१॥
 
मन चि साच होइल कई । प्रेम देई भेटोनि ॥ध्रु.॥
 
सर्वापरि पांगुळ असें । न कळे कैंसे तें तुम्हा ॥२॥
 
तुका म्हणे कृपावंता । तूं तों दाता दीनाचा ॥३॥
 
३३२५
 
चालवणें काय । ऐसें अंगे माझे माय ॥१॥
 
धांव धांव लवलाहें । कंठीं प्राण वाट पाहे ॥ध्रु.॥
 
पसरूनि कर । तुज चालिलों समोर ॥२॥
 
देसील विसांवा । तुका म्हणे ऐशा हांवा ॥३॥
 
३३२६
 
आवडीच्या ऐसें जालें । मुखा आलें हरिनाम ॥१॥
 
आतां घेऊं धणीवरि । मागें उरी नुरेतों ॥ध्रु.॥
 
सांटवण मनाऐसी । पुढें रासी अमुप ॥२॥
 
तुका म्हणे कारण जालें । विठ्ठल तीं अक्षरीं ॥३॥
 
३३२७
 
त्यांचिया चरणां माझें दंडवत । ज्यांचें धनवित्त पांडुरंग ॥१॥
 
येथें माझा जीव पावला विसांवा । म्हणऊनि हांवा भरलासें ॥ध्रु.॥
 
 
चरणींचें रज लावीन कपाळा । जीं पदें राउळा सोईं जाती ॥२॥
 
 
आणिक तीं भाग्यें येथें कुरवंडी । करूनियां सांडीं इंद्राऐसी ॥३॥
 
वैष्णवांचे घरीं देवाची वसति । विश्वास हा चित्तीं सत्यभावें ॥३॥
 
तुका म्हणे सखे हरिचे ते दास । आतां पुढें आस नाहीं दुजें ॥५॥
 
३३२८
 
उपजोनियां मरें । परि हें चि वाटे बरें ॥१॥
 
नाहीं आवडीसी पार । न म्हणावें जालें फार ॥ध्रु.॥
 
अमृताची खाणी । उघडली नव्हे धणी ॥२॥
 
तुका म्हणे पचे । विठ्ठल हें मुखा साचें ॥३॥
 
३३२९
 
सत्य तूं सत्य तूं सत्य तूं विठ्ठला । कां गा हा दाविला जगदाकार ॥१॥
 
सांभाळीं आपुली हाक देतो माया । आम्हांसी कां भयाभीत केलें ॥ध्रु.॥
 
रूप नाहीं त्यासी ठेवियेलें नाम । लटका चि श्रम वाढविला ॥२॥
 
तुका म्हणे कां गा जालासी चतुर । होतासी निसुर निर्विकार ॥३॥
 
३३३०
 
अमच्या कपाळें तुज ऐसी बुद्धि । धरावी ते शुद्धी योगा नये ॥१॥
 
काय या राहिलें विनोदावांचून । आपुलिया भिन्न केलें आम्हां ॥ध्रु.॥
 
कोठें मूर्तिमंत दावीं पुण्यपाप । काशासी संकल्प वाहाविसी ॥२॥
 
तुका म्हणे आतां आवरावा चेडा । लटिकी च पीडा पांडुरंगा ॥३॥
 
३३३१
 
नो बोलावें ऐसें जनासी उत्तर । करितों विचार बहु वेळा ॥१॥
 
कोण पाप आड ठाकतें येऊन । पालटिति गुण अंतरींचा ॥ध्रु.॥
 
संसारा हातीं सोडवूनि गळा । हें कां अवकळा येती पुढें ॥२॥
 
तुका म्हणे सेवे घडेल अंतराय । यास करूं काय पांडुरंगा ॥३॥
 
३३३२
 
आतां हें उचित माझें जना हातीं । पाहिजे फजीती केली कांहीं ॥१॥
 
मग हे तुमचे न सोडीं चरण । त्रासोनियां मन येइल ठाया ॥ध्रु.॥
 
वाउगे वाणीचा न धरीं कांटाळा । ऐसी कां चांडाळा बुद्धि मज ॥२॥
 
तुका म्हणे जरि माथां बैसे घाव । तरि मग वाव नेघे पुढें ॥३॥
 
३३३३
 
मायेवरी सत्ता आवडीची बाळा । संकोचोनि लळा प्रतिपाळी ॥१॥
 
अपराध माझे न मनावे मनीं । तुम्ही संतजनीं मायबापीं ॥ध्रु.॥
 
आरुष वचन लेंकुराची आळी । साहोनि कवळी मागुताली ॥२॥
 
तुका म्हणे अंगीं काय नाहीं सत्ता । परि निष्ठ‍ता उपेजना ॥३॥
 
३३३४
 
कैसा होतो कृपावंत । बहुसंत सांगती । पुसणें नाहीं यातीकुळ । लागों वेळ नेदावा ॥१॥
 
ऐसी काय जाणों किती । उतरती उतरले ॥ध्रु.॥
 
दावी वैकुंठींच्या वाटा । पाहातां मोठा संपन्न । अभिमान तो नाहीं अंगी । भक्तालागी न बैसे ॥२॥
 
तुका म्हणे आळस निद्रा । नाहीं थारा त्या अंगीं । आलें द्यावें भलत्या काळें । विठ्ठल बळें आगळा ॥३॥
 
३३३५
 
सदैव हे वारकरी । जे पंढरी देखती । पदोपदीं विठ्ठल वाचे । त्यांसी कैचा संसार ॥१॥
 
दोष पळाले दोष पळाले । पैल आले हरिदास ॥ध्रु.॥
 
प्रेमभातें भरलें अंगीं । निर्लज्ज रंगीं नाचती । गोपीचंदनाची उटी । तुळसी कंठीं मिरवती ॥२॥
 
तुका म्हणे देव चित्तीं । मोक्ष हातीं रोकडा । दुर्बळा या शक्तिहीना । त्या ही जना पुरता ॥३॥
 
३३३६
 
ऐसीं ठावीं वर्में । तरी सांडवलों भ्रमें ॥१॥
 
सुखें नाचतों कीर्तनीं । नाहीं आशंकित मनीं ॥ध्रु.॥
 
ऐसें आलें हाता । बळ तरी गेली चिंता ॥२॥
 
सुखे येथें जालें तरी । नाहीं आणिकांची उरी ॥३॥
 
ऐसें केलें देवें । पुढें कांहीं चि न व्हावें ॥४॥
 
तुका म्हणे मन । आतां जालें समाधान ॥५॥
 
३३३७
 
चित्तीं बैसलें चिंतन । नारायण नारायण ॥१॥
 
न लगे गोड कांहीं आतां । आणीक दुसरें सर्वथा ॥ध्रु.॥
 
हरपला द्वैतभाव । तेणें देह जाला वाव ॥२॥
 
तुकयाबंधु म्हणे आम्ही । जालों निष्काम ये कामीं ॥३॥
 
३३३८
 
व्यापिलें सर्वत्र । बाहेरी भीतरीं अंत ॥१॥
 
ऐसें गोविंदें गोविलें । बोलें न वजाये बोलिले ॥ध्रु.॥
 
संचिताची होळी । करूनि जीव घेतला बळी ॥२॥
 
तुकयाबंधु म्हणे नाहीं । आतां संसारा उरी कांहीं ॥३॥
 
३३३९
 
तुम्हांआम्हांसी दरुषण । जालें दुर्लभ भाषण ॥१॥
 
म्हणऊनि करितों आतां । दंडवत घ्या समस्तां ॥ध्रु.॥
 
भविष्याचें माथां देह । कोण जाणें होइल काय ॥२॥
 
म्हणे तुकयाचा बंधव । आमचा तो जाला भाव ॥३॥
 
३३४०
 
अनंतजन्में जरी केल्या तपरासी । तरी हा न पवे म्हणे देह ॥१॥
 
ऐसें जें निधान लागलेंसे हातीं । त्याची केली माती भाग्यहीना ॥ध्रु.॥
 
उत्तमाचें सार वेदाचें भांडार । ज्याच्यानें पवित्र तीथॉ होती ॥२॥
 
तुका म्हणे तुकयाबंधु आणीक उपमा । नाहीं या तों जन्मा द्यावयासी ॥३॥
 
३३४१
 
आम्हांपाशीं सरे एक शुद्ध भाव । चतुराईं जाणींव न लगे कळा ॥१॥
 
सर्वजाण माझा स्वामी पांडुरंग । तया अंगसंगें गोपाळासी ॥२॥
 
तुका म्हणे कर्मधर्में नये हातां । तयावरि सत्ता भाविकांची ॥३॥
 
३३४२
 
प्रीति करी सत्ता । बाळा भीती मातापिता ॥१॥
 
काय चाले त्याशीं बळ । आळी करितां कोल्हाळ ॥ध्रु.॥
 
पदरीं घाली मिठी । खेदी मागें पुढें लोटी ॥२॥
 
बोले मना आलें । तुका साहिला विठ्ठलें ॥३॥
 
३३४३
 
आवडीचे भेटी निवे । चित्त पावे विश्रांती ॥१॥
 
बरवियाचा छंद मना । नारायणा अवीट ॥ध्रु.॥
 
तळणे कांहीं साम्या पुरे । हें तों नुरे ये रुचि ॥२॥
 
तुका म्हणे बरवें जालें । फावलें हें कळे त्या ॥३॥
 
३३४४
 
केलियाचें दान । करा आपुलें जतन ॥१॥
 
माझी बुद्धि स्थिर देवा । नाहीं विषयांचा हेवा ॥ध्रु.॥
 
भावा अंतराय । येती अंतरती पाय ॥२॥
 
तुका म्हणे जोडी । आदीं अंतीं राहो गोडी ॥३॥
 
३३४५
 
माझे हातीं आहे करावें चिंतन । तुम्ही कृपादान प्रेम द्यावें ॥१॥
 
मागति यां भांडवल आळवण । नामाची जतन दातियासी ॥ध्रु.॥
 
बाळक धांवोनि आड निघे स्तनीं । घालावा जननी कृपे पान्हां ॥२॥
 
तुका म्हणे करीं कासवाचे परी । आहे सूत्रदोरी तुझे हातीं ॥३॥
 
३३४६
 
वाट दावी त्याचें गेलें काय । नागवला जो वारितां जाय ॥१॥
 
ऐसीं मागें ठकलीं किती । सांगतां खाती विषगोळा ॥ध्रु.॥
 
विचारोनि पाहे त्यास । न वजे जीवें नव्हे नास ॥२॥
 
तुका म्हणे जो रुसला जीवा । तयासी केशवा काय चाले ॥३॥
 
३३४७
 
अनुभवावांचून सोंग संपादणें । नव्हे हें करणें स्वहिताचें ॥१॥
 
तैसा नको भुलों बाहिरल्या रंगें । हित तें चि वेगें करूनि घेई ॥ध्रु.॥
 
बहुरूपी रूपें नटला नारायण । सोंग संपादून जैसा तैसा ॥२॥
 
पाषाणाचें नाव ठेविलें देव । आणिका तारी भाव परि तो तैसा ॥३॥
 
कनक झाड म्ह‍ वंदिलें माथां । परिं तें अर्था न मिळे माजी ॥४॥
 
तुका म्हणे त्याचा भाव तारी त्यास । अहंभावीं नास तो चि पावे ॥५॥
 
३३४८
 
मज नष्टा माया मोह नाहीं लोभ । अधिक हो क्षोभ आदराचा ॥१॥
 
धिग हें शरीर अनउपकार । न मनी आभार उपकाराचा ॥ध्रु.॥
 
मजहून नष्ट आहे ऐसा कोण । नावडे मिष्टान्न बहुमोल ॥२॥
 
न दिसती मज आपलेसे गुण । संचित तें कोण जाणे मागें ॥३॥
 
तुका म्हणे देखोनियां काईं । पांडुरंगा पायीं राखियेलें ॥४॥
 
३३४९
 
मतिविण काय वर्णू तुझें ध्यान । जेथें पडिलें मौन्य वेदश्रुती ॥१॥
 
करूनि गोजिरा आपुलिये मती । धरियेलें चित्तीं चरणकमळ ॥ध्रु.॥
 
सुखाचें ओतिलें पाहों ते श्रीमुख । तेणें हरे भूक तान माझी ॥२॥
 
रसना गोडावली ओव्या गातां गीत । पावलेंसे चित्त समाधान ॥३॥
 
तुका म्हणे माझी दृष्टि चरणांवरी । पाउलें गोजिरीं कुंकुमाचीं ॥४॥
 
३३५०
 
ओस जाल्या मज भिंगुळवाणें । जीवलग नेणें मज कोणी ॥१॥
 
भय वाटे देखें श्वापदांचे भार । नव्हे मज धीर पांडुरंगा ॥ध्रु.॥
 
अंधकारापुढे न चलवे वाट । लागतील खुंटे कांटे अंगा ॥२॥
 
एकला निःसंग फांकती मारग । होतों नव्हे लाग चालावया ॥३॥
 
तुका म्हणे वाट दावूनि सद्ग‍ु । राहि हा दुरू पांडुरंग ॥४॥
 

३३५१
 
उदार कृपाळ सांगसी जना । तरी कां त्या रावणा मारियेलें ।
 
नित्य नित्य पूजा करी श्रीकमळीं । तेणें तुझें काय केलें ॥१॥
 
काय बडिवार सांगसी वांयां । ठावा पंढरिराया आहेसि आम्हां ।
 
एकला चि जरी देऊं परिहार । आहे दुरिवरी सीमा ॥ध्रु.॥
 
कर्णाऐसा वीर उदार जुंझार । तो तुवां जर्जर केला वाणीं ।
 
पडिला भूमी परी नयेची करुणा । दांत पाडियेले दोन्ही ॥२॥
 
िश्रयाळ बापुडे सात्विकवाणी । खादलें कापूनि त्याचें पोर ।
 
ऐसा कठिण कोण होईंल दुसरा । उखळीं कांडविलें शिर ॥३॥
सिभ्री चक्रवर्ती करितां यज्ञयाग । त्याचें चिरिलें अंग ठायीं ठायीं ।
 
जाचऊनि प्राण घेतला मागें । पुढें न पाहतां कांहीं ॥४॥
 
बळीचा अन्याय सांग होता काय । बुडविला तो पाय देऊनि माथां ।
 
कोंडिलें दार हा काय कहार । सांगतोसी चित्त कथा ॥५॥
 
हरश्चिंद्राचें राज्य घेऊनियां सर्व । विकविला जीव डोंबाघरीं ।
 
पाडिला विघड नळा दमयंतीमधीं । ऐसी तुझी बुद्धि हरि ॥६॥
 
आणिकही गुण सांगावे किती । केलिया विपित्त माउसीच्या ।
 
वधियेला मामा सखा पुरुषोत्तमा । म्हणे बंधु तुकयाचा ॥७॥
 
३३५२
 
जे केली आळी ते अवघी गेली वांयां । उरला पंढरिराया श्रम माझा ॥१॥
 
काय समाधान केलें कोण वेळे । कोणें माझे लळे पाळियेलें ॥ध्रु.॥
 
आभास ही नाहीं स्वप्नीं दुश्चिता । प्रत्यक्ष बोलतां कंइचा तो ॥२॥
 
आतां पुढें लाज वाटे पांडुरंगा । भक्त ऐसे जगामाजी जाले ॥३॥
 
तुका म्हणे आतां नाहीं भरवसा । मोकलीसी ऐसा वाटतोसी ॥४॥
 
३३५३
 
समश्रुळित असतां वाचा । घोष न करिसी कां नामाचा ॥१॥
 
कां रे वैष्णव नव्हेसी । कवण्या दंभें नागवलासी ॥ध्रु.॥
 
हरि हरि म्हणतां लाजसी । गर्वें फुगोनि चालसी ॥२॥
 
तारुण्यें उताणा । पुंसेंविण बांडा सुना ॥३॥
 
जालेंसि महिमेचे वेडें । नाचों लाजसी दिंडीपुढें ॥४॥
 
अळंकारांच्यानि बळें । वंचलासी तुळसीमाळें ॥५॥
 
कैसा सकुमार जालासी । म्हणसी न टकें एकादशी ॥६॥
 
स्नान न करिसी आंघोळी । विभुती न लाविसी कपाळीं ॥७॥
 
वरिवरि न्याहाळिसी त्वचा । उपेग नाहीं मांसाचा ॥८॥
 
पद्मनाभी विश्वनाथ । तुका अझून रडत ॥९॥
 
३३५४
 
वाघाचा काळभूत दिसे वाघाऐसा । परी नाहीं दशा साच अंगीं ॥१॥
 
बाहेरील रंग निवडी कसोटी । संघष्टणें भेटी आपेआप ॥ध्रु.॥
 
सिकविलें तैसें नाचावें माकडें । न चले त्यापुढें युक्ति कांहीं ॥२॥
 
तुका म्हणे करी लटिक्याचा सांटा । फजित तो खोटा शीघ्र होय ॥३॥
 
३३५५
 
सिंदळीचे सोर चोराची दया । तो ही जाणा तया संवसर्गी ॥१॥
 
फुकासाटीं भोगे दुःखाचा वाटा । उभारोनी कांटा वाटेवरी ॥ध्रु.॥
 
सर्प पोसूनियां दुधाचा नास । केलें थीता विष अमृताचें ॥२॥
 
तुका म्हणे यासी न करितां दंडण । पुढिल खंडण नव्हे दोषा ॥३॥
 
३३५६
 
तेणें सुखें माझें निवालें अंग । विठ्ठल हें जग देखियेलें ॥१॥
 
कवतुकें करुणा भाकीतसें लाडें । आवडी बोबडें बोलोनियां ॥ध्रु.॥
 
मज नाहीं दशा अंतरीं दुःखाची । भावना भेदाची समूळ गेली ॥२॥
 
तुका म्हणे सुख जालें माझ्या जीवा । रंगलें केशवा तुझ्या रंगे ॥३॥
 
३३५७
 
विठ्ठल सोयरा सज्जन विसांवा । जाइन त्याच्या गांवा भेटावया ॥१॥
 
सीण भाग त्यासी सांगेन आपुला । तो माझा बापुला सर्व जाणे ॥ध्रु.॥
 
माय माउलिया बंधुवर्गा जना । भाकीन करुणा सकळिकांसी ॥२॥
 
संत महंत सद्धि महानुभाव मुनि । जीवभाव जाऊनि सांगेन त्या ॥३॥
 
माझिये माहेरीं सुखा काय उणें । न लगे येणें जाणें तुका म्हणे ॥४॥
 
३३५८
 
ध्याइन तुझें रूप गाइन तुझें नाम । आणीक न करीं काम जिव्हामुखें ॥१॥
 
पाहिन तुझे पाय ठेविन तेथें डोय । पृथक तें काय न करीं मनीं ॥ध्रु.॥
 
तुझे चि गुणवाद आइकेन कानीं । आणिकांची वाणी पुरे आतां ॥२॥
 
करिन सेवा करीं चालेन मी पायीं । आणीक न वजें ठायीं तुजविण ॥३॥
 
तुका म्हणे जीव ठेविला तुझ्या पायीं । आणीक तो काईं देऊं कोणा ॥४॥
 
३३५९
 
देवाचें भजन कां रे न करीसी । अखंड हव्यासीं पीडतोसी ॥१॥
 
देवासी शरण कां रे न वजवे तैसा । बक मीना जैसा मनुष्यालागीं ॥ध्रु.॥
 
देवाचा विश्वास कां रे नाहीं तैसा । पुत्रस्नेहें जैसा गुंतलासी ॥२॥
 
कां रे नाहीं तैसी देवाची हे गोडी । नागवूनी सोडी पत्नी तैसी ॥३॥
 
कां रे नाहीं तैसे देवाचे उपकार । माया मिथ्या भार पितृपूजना ॥४॥
 
कां रे भय वाहासी लोकांचा धाक । विसरोनि एक नारायण ॥५॥
 
तुका म्हणे कां रे घातलें वांयां । अवघें आयुष्य जाया भक्तिविण ॥६॥
 
३३६०
 
माझें चित्त तुझे पायीं । राहें ऐसें करीं कांहीं । धरोनियां बाहीं । भव तारीं दातारा ॥१॥
 
चतुरा तूं शिरोमणि । गुणलावण्याची खाणी । मुगुट सकळां मणि । तूं चि धन्य विठोबा ॥ध्रु.॥
 
करीं त्रिमिराचा नाश । दीप होउनि प्रकाश । तोडीं आशापाश । करीं वास हृदयीं ॥२॥
 
पाहें गुंतलों नेणतां । तुज असो माझी चिंता । तुका ठेवी माथा । पायीं आतां राखावें ॥३॥
 
३३६१
 
आमुचें उचित हे चि उपकार । आपला चि भार घालूं तुज ॥१॥
 
भूक लागलिया भोजनाची आळी । पांघुरणें काळीं शीताचिये ॥ध्रु.॥
 
जेणें काळें उठी मनाची आवडी । ते चि मागों घडी आवडे तें ॥२॥
 
दुःख येऊं नेदी आमचिया घरा । चक्र करी फेरा भोंवताला ॥३॥
 
तुका म्हणे नाहीं मुक्तीसवें चाड । हें चि आम्हां गोड जन्म घेतां ॥४॥
 
३३६२
 
मी दास तयाचा जया चाड नाहीं । सुख दुःख दोहीविरहित जो ॥१॥
 
राहिलासे उभा भीमरेच्या तीरीं । कट दोहीं करीं धरोनियां ॥ध्रु.॥
 
नवल काईं तरी पाचारितां पावे । न श्मरित धांवे भक्तिकाजें ॥२॥
 
सर्व भार माझा त्यासी आहें चिंता । तों चि माझा दाता स्वहिताचा ॥३॥
 
तुका म्हणे त्यास गाईंन मी गीतीं । आणीक तें चित्तीं न धरीं कांहीं ॥४॥
 
३३६३
 
यासी कोणी म्हणे निंदेचीं उत्तरें । नागवला खरें तो चि एक ॥१॥
 
आड वाटे जातां लावी नीट सोईं । धर्मनीत ते ही ऐसी आहे ॥ध्रु.॥
 
नाइकता सुखें करावें ताडण । पाप नाहीं पुण्य असे फार ॥२॥
 
जन्म व्याधि फार चुकतील दुःखें । खंडावा हा सुखें मान त्याचा ॥३॥
 
तुका म्हणे निंब दिलियावांचून । अंतरींचा सीण कैसा जाय ॥४॥
 
३३६४
 
निवडे जेवण सेवटींच्या घांसें । होय त्याच्या ऐसें सकळ ही ॥१॥
 
न पाहिजे जाला बुद्धीचा पालट । केली खटपट जाय वांयां ॥ध्रु.॥
 
संपादिलें होय धरिलें तें सोंग । विटंबणा वेंग पडियाली ॥२॥
 
तुका म्हणे वर्म नेणतां जें रांधी । पाववी ते बुद्धि अवकळा ॥३॥
 
३३६५
 
न लगे मरावें । ऐसा ठाव दिला देवें ॥१॥
 
माझ्या उपकारासाटीं । वागविला म्हुण कंठीं ॥ध्रु.॥
 
घरीं दिला ठाव । अवघा सकळ ही वाव ॥२॥
 
तुका म्हणे एके ठायीं । कोठें माझें तुझें नाहीं ॥३॥
 
३३६६.
 
नाहीं लाग माग । न देखेंसें केलें जग ॥१॥
 
आतां बैसोनियां खावें । दिलें आइतें या देवें ॥ध्रु.॥
 
निवारिलें भय । नाहीं दुसर्‍याची सोय ॥२॥
 
तुका म्हणे कांहीं । बोलायाचें काम नाहीं ॥३॥
 
३३६७
 
दिली हाक मनें नव्हे ती जतन । वेंटाळिल्या गुणें धांव घेती ॥१॥
 
काम क्रोध मद मत्सर अहंकार । निंदा द्वेष फार माया तृष्णा ॥ध्रु.॥
 
इंद्रियांचे भार फिरतील चोर । खान घ्यावया घर फोडूं पाहे ॥२॥
 
माझा येथें कांहीं न चले पराक्रम । आहे त्याचें वर्म तुझे हातीं ॥३॥
 
तुका म्हणे आतां करितों उपाय । जेणें तुझे पाय आतुडती ॥४॥
 
३३६८
 
तुझा दास मज म्हणती अंकित । अवघे सकळिक लहान थोर ॥१॥
 
हें चि आतां लागे करावें जतन । तुझें थोरपण तुज देवा ॥ध्रु.॥
 
होउनी निर्भर राहिलों निश्चिंतें । पावनपतित नाम तुझें ॥२॥
 
करितां तुज होय डोंगराची राईं । न लगतां कांहीं पात्या पातें ॥३॥
 
तुका म्हणे तुज काय ते आशंका । तारितां मशका मज दीना ॥४॥
 
३३६९
 
काय मागावें कवणासी । ज्यासी मागों तो मजपाशीं ॥१॥
 
जरी मागों पद इंद्राचें । तरी शाश्वत नाहीं त्याचें ॥ध्रु.॥
 
जरी मागों ध्रुवपद । तरी त्यासी येथील छंद ॥२॥
 
स्वर्गभोग मागों पूर्ण । पुण्य सरल्या मागुती येणें ॥३॥
 
आयुष्य मागों चिरंजीव । जीवा मरण नाहीं स्वभावें ॥४॥
 
तुका म्हणे एक मागें । एकपणे नाहीं भंग ॥५॥
 
३३७०
 
आम्ही ज्याचे दास । त्याचा पंढरिये वास ॥१॥
 
तो हा देवांचा ही देव । काय कळिकाळाचा भेव ॥ध्रु.॥
 
वेद जया गाती । श्रुति म्हणती नेति नेति ॥२॥
 
तुका म्हणे निज । रूपडें हें तत्वबीज ॥३॥
 
३३७१
 
भक्तवत्सल दिनानाथ । तिहीं लोकीं ज्याची मात ॥१॥
 
तो हा पुंडलिकासाठीं । आला उभा वाळवंटीं ॥ध्रु.॥
 
गर्भवास धरी । अंबॠषीचा कैवारी ॥२॥
 
सकळां देवां अधिष्ठान । एका मंत्रासी कारण ॥३॥
 
तुका म्हणे ध्यानीं । ज्यासि ध्यातो शूळपाणी ॥४॥
 
३३७२
 
फटकाळ देव्हारा फटकाळ अंगारा । फटकाळ विचारा चालविलें ॥१॥
 
फटकाळ तो देव फटकाळ तो भक्त । करवितो घात आणिका जीवा ॥२॥
 
तुका म्हणे अवघें फटकाळ हें जन । अनुभविये खूण जाणतील ॥३॥
 
३३७३
 
लावुनियां गोठी । चुकवूं आदरिली दिठी । देउनियां मिठी । पळे महिमा थुलिया ॥१॥
 
पुढें तो चि करी आड । तिचा लोभ तिसी नाड । लावुनि चरफड । हात गोऊनि पळावें ॥ध्रु.॥
 
आधीं काकुलती । मोहो घालावा पुढती । तोंडीं पडे माती । फिरतां मागें कैचा तो ॥२॥
 
तुका म्हणे देवा । यासी रडवी याचा हेवा । भावें कां हे सेवा । सुखें तुम्हां नार्पिती ॥३॥
 
३३७४
 
नेत्राची वासना । तुज पाहावें नारायणा ॥१॥
 
करीं याचें समाधान । काय पहातोसी अनुमान ॥ध्रु.॥
 
भेटावें पंढरिराया । हें चि इच्छिताती बाह्या ॥२॥
 
म्हणतों जावें पंढरीसीं । हेंचि ध्यान चरणासी ॥३॥
 
चित्त म्हणे पायीं । तुझे राहीन निष्चयीं ॥४॥
 
म्हणे बंधु तुकयाचा । देवा भाव पुरवीं साचा ॥५॥
 
३३७५
 
मन उतावळि । जालें न राहे निश्चळ ॥१॥
 
दे रे भेटी पंढरिराया । उभारोनि चारी बाह्या ॥ध्रु.॥
 
सर्वांग तळमळी । हात पाय रोमावळी ॥२॥
 
तुकयाबंधु म्हणे कान्हा । भूक लागली नयना ॥३॥
 
३३७६
 
म्हणसी दावीन अवस्था । तैसें नको रे अनंता ॥१॥
 
होऊनियां सहाकार । रूप दाखवीं सुंदर ॥ध्रु.॥
 
मृगजळाचिया परी । तैसें न करावें हरी ॥२॥
 
तुकयाबंधु म्हणे हरी । कामा नये बाह्यात्कारी ॥३॥
 
३३७७
 
आकारवंत मूर्ति । जेव्हां देखेन मी दृष्टी ॥१॥
 
मग मी राहेन निवांत । ठेवूनियां तेथें चित्त ॥ध्रु.॥
 
श्रुति वाखाणिती । तैसा येसील प्रचिती ॥२॥
 
म्हणे तुकयाचा सेवक । उभा देखेन सन्मुख ॥३॥
 
३३७८
 
जेणें तुज जालें रूप आणि नांव । पतित हें दैव तुझें आम्ही ॥१॥
 
नाहीं तरी तुज कोण हें पुसतें । निराकारी तेथें एकाएकी ॥ध्रु.॥
 
अंधारे दीपा आणियेली शोभा । माणिकासी प्रभा कोंदणासी ॥२॥
 
धन्वंतरी रोगें आणिला उजेडा । सुखा काय चाडा जाणावें तें ॥३॥
 
अमृतासी मोल विषाचिया गुणें । पितळें तरी सोनें उंच निंच ॥४॥
 
तुका म्हणे आम्ही असोनिया जना । तुज देव पणा आणियेलें ॥५॥
 
३३७९
 
सुखवाटे ये चि ठायी । बहु पायीं संतांचें ॥१॥
 
म्हणऊनि केला वास । नाहीं नास ते ठायीं ॥ध्रु.॥
 
न करवे हाली चाली । निवारिली चिंता हे ॥२॥
 
तुका म्हणे निवे तनु । रजकणु लागती ॥३॥
 
३३८०
 
देऊं कपाट । कीं कोण काळ राखों वाट ॥१॥
 
काय होईंल तें शिरीं । आज्ञा धरोनियां करीं ॥ध्रु.॥
 
करूं कळे ऐसी मात। किंवा राखावा एकांत ॥२॥
 
तुका म्हणे जागों । किंवा कोणा नेंदूं वागों ॥३॥
 
३३८१
 
मायबापापुढें लेंकराची आळी । आणीक हे पाळी कोण लळे ॥१॥
 
सांभाळा जी माझीं विषमें अनंता । जवळी असतां अव्हेर कां ॥ध्रु.॥
 
आणिकांची चाले सत्ता आम्हांवरी । तुमची ते थोरी काय मग ॥२॥
 
तुका म्हणे आलों दुरोनि जवळी । आतां टाळाटाळी करूं नये ॥३॥
 
३३८२
 
माझ्या मुखें मज बोलवितो हरि । सकळां अंतरीं नारायण ॥१॥
 
न करावा द्वेष भूतांचा मत्सर । हा तंव विचार जाणों आम्ही ॥२॥
 
तुका म्हणे दोष नाहीं या विचारें । हिताचीं उत्तरें शिकवितां ॥३॥
 
३३८३
 
मांस खातां हाउस करी । जोडुनि वैरी ठेवियेला ॥१॥
 
कोण त्याची करिल कींव । जीवें जीव नेणती ॥ध्रु.॥
 
पुढिलांसाटीं पाजवी सुरी । आपुली चोरी अंगुळी ॥२॥
 
तुका म्हणे कुटिती हाडें । आपुल्या नाडें रडती ॥३॥
 
३३८४
 
तुज जाणें तानें नाहीं पांडुरंगा । कां जी मज सांगा उपेक्षिलें ॥१॥
 
तुज ठावें होतें मी पातकी थोर । आधीं च कां थार दिधली पायीं ॥ध्रु.॥
 
अंक तो पडिला हरिचा मी दास । भेद पंगतीस करूं नये ॥२॥
 
तुका म्हणे आम्ही जिंतिलें तें खरें । आतां उणें पुरें तुम्हां अंगीं ॥३॥
 
३३८५
 
आम्हां घरीं धन शब्दाचीं रत्नें । शब्दाचीं शस्त्रें यत्न करूं ॥१॥
 
शब्द चि आमुच्या जीवाचें जीवन । शब्दें वांटूं धन जनलोकां ॥२॥
 
तुका म्हणे पाहा शब्द चि हा देव । शब्दें चि गौरव पूजा करूं ॥३॥
 
३३८६
 
ब्रम्हज्ञान दारीं येतें काकुलती । अव्हेरिलें संतीं विष्णुदासीं ॥१॥
 
रिघों पाहे माजी बळें त्याचें घर । दवडिती दूर म्हणोनियां ॥२॥
 
तुका म्हणे येथें न चाले सायास । पडिले उदास त्याच्या गळां ॥३॥
 
३३८७
 
कासया लागला यासी चौघाचार । मुळींचा वेव्हार निवडिला ॥१॥
 
ग्वाही बहुतांची घालूनियां वरि । महजर करीं आहे माझ्या ॥ध्रु.॥
 
तुम्हां वेगळा लागें आपल्या च ठायीं । होतें करुनि तें ही माझें माझें ॥२॥
 
भांडण सेवटीं जालें एकवट । आतां कटकट करूं नये ॥३॥
 
ठेविला ठेवा तो आला माझ्या हाता । आतां नाहीं सत्ता तुज देवा ॥४॥
 
तुका म्हणे वांयांविण खटपटा । राहिलों मी वांटा घेऊनियां ॥५॥
 
३३८८
 
देहबुद्धि वसे जयाचियें अंगीं । पूज्यता त्या जगीं सुख मानी ॥१॥
 
थोर असे दगा जाला त्यासी हाटीं । सोडोनिया गांठी चोरीं नेली ॥ध्रु.॥
 
गांठीचें जाउनि नव्हे तो मोकळा । बांधिलासे गळा दंभलोभें ॥२॥
 
पुढिल्या उदिमा जालेंसे खंडण । दिसे नागवण पडे गांठी ॥३॥
 
तुका म्हणे ऐसे बोलतील संत । जाणूनियां घात कोण करी ॥४॥
 
३३८९
 
निंबाचिया झाडा साकरेचें आळें । आपलीं ती फळें न संडी च ॥१॥
 
तैसें अधमाचें अमंगळ चित्त । वमन तें हित करुनि सांडी ॥ध्रु.॥
 
परिसाचे अंगीं लाविलें खापर । पालट अंतर नेघे त्याचें ॥२॥
 
तुका म्हणे वेळू चंदना संगतीं । काय ते नसती जवळिकें ॥३॥
 
३३९०
 
दुबळें सदैवा । म्हणे नागवेल केव्हां ॥१॥
 
आपणासारिखें त्या पाहे । स्वभावासी करिल काये ॥ध्रु.॥
 
मूढ सभे आंत । इच्छी पंडिताचा घात ॥२॥
 
गांढें देखुनि शूरा । उगें करितें बुरबुरा ॥३॥
 
आणिकांचा हेवा । न करीं शरण जाई देवा ॥४॥
 
तुका म्हणे किती । करूं दुष्टाची फजिती ॥५॥
 
३३९१
 
माझी आतां लोक सुखें निंदा करू । म्हणती विचारू सांडियेला ॥१॥
 
कारण होय तो करावा विचार । काय भीड भार करूं देवा ॥२॥
 
तुका म्हणे काय करूं लापनिक । जनाचार सुख नासिवंत ॥३॥
 
३३९२
 
ढेंकणाचे संगें हिरा जो भंगला । कुसंगें नाडला तैसा साधु ॥१॥
 
ओढाळाच्या संगें सात्विक नासलीं । क्षण एक नाडलीं समागमें ॥ध्रु.॥
 
डांकाचे संगती सोनें हीन जालें । मोल तें तुटलें लक्ष कोडी ॥२॥
 
विषानें पक्वान्नें गोड कडू जालीं । कुसंगानें केली तैसी परी ॥३॥
 
भावें तुका म्हणे सत्संग हा बरा । कुसंग हा फेरा चौर्‍याशीचा ॥४॥
 
३३९३
 
भलते जन्मीं मज घालिसील तरी । न सोडीं मी हरी नाम तुझें ॥१॥
 
सुख दुःख तुज देईंन भोगितां । मग मज चिंता कासयाची ॥ध्रु.॥
 
तुझा दास म्हणवीन मी अंकिला । भोगितां विठ्ठला गर्भवास ॥२॥
 
कासया मी तुज भाकितों करुणा । तारीं नारायणा म्हणवुनि ॥३॥
 
तुका म्हणे तुज येऊं पाहे उणें । तारिसील तेणें आम्हां तया ॥४॥
 
३३९४
 
गातों नाचतों आनंदें । टाळघागरिया छंदें ॥१॥
 
तुझी तुज पुढें देवा । नेणों भावे कैसी सेवा ॥ध्रु.॥
 
नेणों ताळ घात मात । भलते सवां पाय हात ॥२॥
 
लाज नाहीं शंका । प्रेम घाला म्हणे तुका ॥३॥
 
३३९५
 
रुसलों आम्हीं आपुलिया संवसारा । तेथें जनाचारा काय पाड ॥१॥
 
आम्हां इष्ट मित्र सज्जन सोयरे । नाहीं या दुसरें देवाविण ॥ध्रु.॥
 
दुराविले बंधु सखे सहोदर । आणीक विचार काय तेथें ॥२॥
 
उपाधिवचन नाइकती कान । त्रासलें हें मन बहु माझें ॥३॥
 
तुका म्हणे करा होईंल ते दया । सुख दुःख वांयां न धरावें ॥४॥
 
३३९६
 
सांडुनि सुखाचा वांटा । मुक्ति मागे तो करंटा ॥१॥
 
कां रे न घ्यावा जन्म । प्रेम लुटावें नाम ॥ध्रु.॥
 
येथें मळितो दहीं भात । वैकुंठीं ते नाहीं मात ॥२॥
 
तुका म्हणे आतां । मज न लगे सायुज्यता ॥३॥
 
३३९७
 
पदोपदीं पायां पडणें । करुणा जाण भाकावी ॥१॥
 
ये गा ये गा विसांवया । करुणा दयासागरा ॥ध्रु.॥
 
जोडोनियां करकमळ । नेत्र जळ भरोनि ॥२॥
 
तुका उभें दारीं पात्र । पुरवीं आर्त विठोबा ॥३॥
 
३३९८
 
आतां हें सेवटीं असों पायांवरी । वदती वैखरी वागपुष्प ॥१॥
 
नुपेक्षावें आम्हां दीना पांडुरंगा । कृपादानीं जगामाजी तुम्हीं ॥ध्रु.॥
 
वोळवुनी देह सांडियेली शुद्ध । सारियेला भेद जीव शिव ॥२॥
 
तुका म्हणे मन तुमचे चरणीं । एवढी आयणी पुरवावी ॥३॥
 
३३९९
 
तरि च होय वेडी । नग्न होय धडफुडी ॥१॥
 
काय बोलाचें गौरव । आंत वरी दोन भाव ॥ध्रु.॥
 
मृगजळा न्याहाळितां । तान न वजाये सेवितां ॥२॥
 
न पाहे आणिकांची आस । शूर बोलिजे तयास ॥३॥
 
तुका म्हणे हें लक्षण । संत अळंकार लेणें ॥४॥
 
३४००
 
आग्रहा नांवें पाप । योगीं सारावे संकल्प ॥१॥
 
सहजा ऐसें भांडवल । असोनि कां सारा बोल ॥ध्रु.॥
 
तैं न भेटे तें काय । मना अंगींचे उपाय ॥२॥
 
तुका म्हणे धरीं सोय । वासनेची फोडा डोय ॥३॥
 

३४०१
 
न करीं पठन घोष अक्षरांचा । बीजमंत्र आमुचा पांडुरंग ॥१॥
 
सर्वकाळ नामचिंतन मानसीं । समाधान मनासी समाधि हे ॥ध्रु.॥
 
न करीं भ्रमण न रिघें कपाटीं । जाईंन तेथें दाटी वैष्णवांची ॥२॥
 
अनु नेणें कांहीं न वजें तपासी । नाचें दिंडीपाशीं जागरणीं ॥३॥
 
उपवास व्रत न करीं पारणें । रामकृष्ण म्हणें नारायण ॥४॥
 
आणिकांची सेवा स्तुती नेणें वाणूं । तुका म्हणे आणु दुजें नाहीं ॥५॥
 
३४०२
 
पुंडलिकाचे निकटसेवे । कैसा धांवे बराडी ॥१॥
 
आपुलें थोरपण । नारायण विसरला ॥ध्रु.॥
 
उभा कटीं ठेवुनि कर। न म्हणे पर बैससें ॥२॥
 
तुका म्हणे जगदीशा । करणें आशा भक्तांची ॥३॥
 
३४०३
 
बाळ काय जाणे जीवनउपाय । मायबाप वाहे सर्व चिंता ॥१॥
 
आइतें भोजन खेळणें अंतरीं । अंकिताचे शिरीं भार नाहीं ॥ध्रु॥
 
आपुलें शरीर रिक्षतां न कळें । सांभाळूनि लळे पाळी माय ॥२॥
 
 
तुका म्हणे माझा विठ्ठल जनिता । जेथें आमची सत्ता तयावरी ॥३॥
 
३४०५
 
काय करिती केलीं नित्य पापें । वसे नाम ज्यापें विठोबाचें ॥१॥
 
तृणीं हुताशन लागला ते रासी । जळतील तैसीं क्षणमात्रें ॥ध्रु.॥
 
विष्णुमूर्तिपाद पाहतां चरण । तेथें कर्म कोण राहूं शके ॥२॥
 
तुका म्हणे नाम जाळी महादोष । जेथें होय घोष कीर्तनाचा ॥३॥
 
३४०६
 
वेद नेलें शंखासुरें । केलें ब्रम्ह्यानें गार्‍हाणें ॥१॥
 
धांव धांव झडकरी । ऐसें कृपाळुवा हरी ॥ध्रु.॥
 
गजेंद्र नाडियें गांजिला । तेणें तुझा धांवा केला ॥२॥
 
तुका म्हणे पद्मनाभा । जेथें पाहें तेथें उभा ॥३॥
 
३४०७
 
माकडा दिसती कंवटी नारळा । भोक्ता निराळा वरील सारी ॥१॥
 
एका रस एका तोंडीं पडे माती । आपुलाले नेती विभाग ते ॥ध्रु.॥
 
सुनियांसी क्षीर वाढिल्या ओकवी । भोगित्यां पोसवी धणीवरी ॥२॥
 
तुका म्हणे भार वागविती मूर्ख । नेतील तें सार परीक्षक ॥३॥
 
३४०८
 
भेटीची आवडी उतावळि मन । लागलेंसे ध्यान जीवीं जीवा ॥१॥
 
आतां आवडीचा पुरवावा सोहळा । येऊनी गोपाळा क्षेम देई ॥ध्रु.॥
 
 
नेत्र उन्मळित राहिले ताटस्त । गंगा अश्रुपात वहावली ॥२॥
 
 
तुका म्हणे तुम्ही करा साचपणा । मुळींच्या वचना आपुलिया ॥३॥
 
३४०९
 
धवळलें जगदाकार । आंधार तो निरसला ॥१॥
 
लपों जातां नाहीं ठाव । प्रगट पा पसारा ॥ध्रु.॥
 
खरियाचा दिवस आला । वाढी बोला न पुरे ॥२॥
 
तुका म्हणे जिवें साटीं । पडिली मिठी धुरेसी ॥३॥
 
३४१०
 
मातेची अवस्था काय जाणे बाळ । तिसी तों सकळ चिंता त्याची ॥१॥
 
ऐसें परस्परें आहे चि विचारा । भोपळ्याचा तारा दगडासी ॥ध्रु.॥
 
भुजंग पोटाळी चंदनाचें अंग । निवे परि संग नव्हे तैसा ॥२॥
 
तुका म्हणे करा परिसाचे परी । मज ठेवा सरी लोखंडाचे ॥३॥
 
३४११
 
लावूनि कोलित । माझा करितील घात ॥१॥
 
ऐसे बहुतांचे संधी । सांपडला खोळेमधीं ॥ध्रु.॥
 
पाहातील उणें । तेथें देती अनुमोदनें ॥२॥
 
तुका म्हणे रिघे । पुढें नाहीं जालें धींगे ॥३॥
 
३४१२
 
ऐसी एकां अटी । रीतीं सिणती करंटीं ॥१॥
 
साच आपुल्या पुरतें । करून नेघेती कां हितें ॥ध्रु.॥
 
कां हीं वेचितील वाणी । निरर्थक चि कारणीं ॥२॥
 
तुका म्हणे देवा । कांहीं समर्पूनि सेवा ॥३॥
 
३४१३
 
चालिले सोबती । काय मानिली निश्चिती ॥१॥
 
काय करिसी एकला । काळ सन्निध पातला ॥ध्रु.॥
 
कांहीं सावध तो बरवा । करीं आपुला काढावा ॥२॥
 
चालिले अगळे । हळू च कान केश डोळे ॥३॥
 
वोसरले दांत । दाढा गडबडल्या आंत ॥४॥
 
एकली तळमळ । जिव्हा भलते ठायीं लोळे ॥५॥
 
तुका म्हणे यांणीं । तुझी मांडिली घालणी ॥६॥
 
३४१४
 
नका मजपाशीं । वदो प्रपंचाचे विशीं ॥१॥
 
आतां नाइकावी कानीं । मज देवाविण वाणी ॥ध्रु.॥
 
येऊनियां रूपा । कोण पाहे पुण्यपापा ॥२॥
 
मागे आजिवरी । जालें माप नेलें चोरी ॥३॥
 
सांडियेलीं पानें । पुढें पिका अवलोकन ॥४॥
 
पडों नेदी तुका । आड गुंपूं कांहीं चुका ॥५॥
 
३४१५
 
जाले आतां सांटे । कासयाचे लहान मोटे ॥१॥
 
एक एका पडिलों हातीं । जाली तेव्हां चि निश्चींती ॥ध्रु.॥
 
नाहीं फिरों येत मागें । जालें साक्षीचिया अंगें ॥२॥
 
तुका म्हणे देवा । आतां येथें कोठें हेवा ॥३॥
 
३४१६
 
माझें मज द्यावें । नाहीं करवीत नवें ॥१॥
 
सहस्रनामाचें रूपडें । भक्त कैवारी चोखडें ॥ध्रु.॥
 
साक्षीविण बोलें । तरी मज पाहिजे दंडिलें ॥२॥
 
तुका म्हणे माल । माझा खरा तो विठ्ठल ॥३॥
 
३४१७
 
करूं स्तुती तरि ते निंदा । तुम्ही जाणां हे गोविंदा ॥१॥
 
आम्हां लडिवाळांचे बोल । करा कवतुकें नवल ॥ध्रु.॥
 
बोबड्या उत्तरीं । तुम्हा रंजवितों हरी ॥२॥
 
मागतों भातुकें । तुका म्हणे कवतुकें ॥३॥
 
३४१८
 
नव्हतील जपें नव्हतील तपें । आम्हांसी हें सोपें गीतीं गातां ॥१॥
 
न करितां ध्यान न करितां धारणा । तो नाचे कीर्तनामाजी हरि ॥ध्रु.॥
 
 
जयासी नाहीं रूप आणि आकार । तो चि कटी कर उभा विटे ॥२॥
 
 
अनंत ब्रम्हांडें जयाचिया पोटीं । तो आम्हां संपुष्टीं भक्तिभावें ॥३॥
 
तुका म्हणे वर्म जाणती लडिवाळें । जें होतीं निर्मळें अंतर्बाहीं ॥४॥
 
३४१९
 
आम्ही जालों बळिवंत । होऊनियां शरणागत ॥१॥
 
केला घरांत रिघावा । ठायीं पडियेला ठेवा ॥ध्रु.॥
 
हातां चढलें धन । नेणं रचिलें कारण ॥२॥
 
तुका म्हणे मिठी । पायीं देउनि केली सुटी ॥३॥
 
३४२०
 
लागपाठ केला । आतां वांटा नित्य त्याला ॥१॥
 
करा जोडीचा हव्यास । आलें दुरील घरास ॥ध्रु.॥
 
फोडिलीं भांडारें । मोहोरलीं एकसरें ॥२॥
 
अवघियां पुरतें । तुका म्हणे घ्यावें हातें ॥३॥
 
३४२१
 
एकीं असे हेवा । एक अनावड जीवां ॥१॥
 
देवें केल्या भिन्न जाती । उत्तम कनिष्ठ मध्यस्ती ॥ध्रु.॥
 
प्रीतिसाटीं भेद । कोणी पूज्य कोणी निंद्य ॥२॥
 
तुका म्हणे कळा । त्याचा जाणे हा कळवळा ॥३॥
 
३४२२
 
स्वामीचें हें देणें । येथें पावलों दर्षणें ॥१॥
 
करूं आवडीनें वाद । तुमच्या सुखाचा संवाद ॥ध्रु.॥
 
कळावया वर्म । हा तों पायांचा चि धर्म ॥२॥
 
तुका म्हणे सिद्धी । हे चि पाववावी बुद्धी ॥३॥
 
३४२३
 
रुसलों संसारा । आम्ही आणीक व्यापारा ॥१॥
 
म्हणऊनि केली सांडी । देउनि पडिलों मुरकंडी ॥ध्रु.॥
 
परते चि ना मागें । मोहो निष्ठ‍ जालों अंगें ॥२॥
 
सांपडला देव । तुका म्हणे गेला भेव ॥३॥
 
३४२४
 
हें तों वाटलें आश्चर्य । तुम्हां न धरवे धीर ॥१॥
 
माझा फुटतसे प्राण । धांवा धांवा म्हणऊन ॥ध्रु.॥
 
काय नेणों दिशा । जाल्या तुम्हांविण ओशा ॥२॥
 
तुका म्हणे कां गा । नाइकिजे पांडुरंगा ॥३॥
 
३४२५
 
धांवा केला धांवा । श्रम होऊं नेदी जीवा ॥१॥
 
वर्षे अमृताच्या धारा । घेई वोसंगा लेंकरा ॥ध्रु.॥
 
उशीर तो आतां । न करावा हे चिंता ॥२॥
 
तुका म्हणे त्वरें । वेग करीं विश्वंभरे ॥३॥
 
३४२६
 
जोडिले अंजुळ । असें दानउतावळि ॥१॥
 
पाहा वाहा कृपादृष्टी । आणा अनुभवा गोष्टी ॥ध्रु.॥
 
तूं धनी मी सेवक । आइक्य तें एका एक ॥२॥
 
करितों विनंती । तुका सन्मुख पुढती ॥३॥
 
३४२७
 
काय तुज कैसें जाणवेल देवा । आणावें अनुभवा कैशा परी ॥१॥
 
सगुण निर्गुण थोर कीं लहान । न कळे अनुमान मज तुझा ॥ध्रु.॥
 
कोण तो निर्धार करूं हा विचार । भवसिंधु पार तरावया ॥२॥
 
तुका म्हणे कैसे पाय आतुडती । न पडे श्रीपती वर्म ठावें ॥३॥
 
३४२८
 
मी तव बैसलों धरुनियां ध्यास । न करीं उदास पांडुरंगा ॥१॥
 
नको आतां मज दवडूं श्रीहरी । मागाया भिकारी जालों दास ॥ध्रु.॥
 
भुकेलों कृपेच्या वचनाकारणें । आशा नारायणें पुरवावी ॥२॥
 
तुका म्हणे येऊनियां देई भेटी । कुरवाळुनी पोटीं धरीं मज ॥३॥
 
३४२९
 
आतां तुझें नाम गात असें गीतीं । म्हणोनी मानिती लोक मज ॥१॥
 
अन्नवस्त्रचिंता नाहीं या पोटाची । वारिली देहाची थोर पीडा ॥ध्रु.॥
 
सज्जन संबंधी तुटली उपाधी । रोकडी या बंदीं सुटलोंसें ॥२॥
 
घ्यावा द्यावा कोणें करावा सायास । गेली आशापाश वारोनियां ॥३॥
 
तुका म्हणे तुज कळेल तें आतां । करा जी अनंता मायबापा ॥४॥
 
३४३०
 
कामक्रोध माझे लावियेले पाठीं । बहुत हिंपुटीं जालों देवा ॥१॥
 
आवरितां तुझे तुज नावरती । थोर वाटे चित्तीं आश्चर्य हें ॥ध्रु.॥
 
तुझिया विनोदें आम्हां प्राणसाटी । भयभीत पोटीं सदा दुःखी ॥२॥
 
तुका म्हणे माझ्या कपाळाचा गुण । तुला हांसे कोण समर्थासी ॥३॥
 
३४३१
 
सन्मुख चि तुम्हीं सांगावी जी सेवा । ऐसे माझे देवा मनोरथ ॥१॥
 
निघों आम्ही कांहीं चित्तवित्त घरें । आपुल्या उदारें जीवावरी ॥ध्रु.॥
 
बोल परस्परें वाढवावें सुख । पाहावें श्रीमुख डोळेभरी ॥२॥
 
तुका म्हणे सत्य बोलतों वचन । करुनी चरण साक्ष तुझे ॥३॥
 
३४३२
 
मज अनाथाकारणें । करीं येणें केशवा ॥१॥
 
जीव झुरे तुजसाटीं । वाट पोटीं पहातसें ॥ध्रु.॥
 
चित्त रंगलें चरणीं । तुजवांचूनि न राहे ॥२॥
 
तुका म्हणे कृपावंत । माझी चिंता असावी ॥३॥
 
३४३३
 
कासया वांचूनि जालों भूमी भार । तुझ्या पायीं थार नाहीं तरी ॥१॥
 
जातां भलें काय डोळियांचें काम । जंव पुरुषोत्तम न देखती ॥ध्रु.॥
 
काय मुख पेंव श्वापदाचें धांव । नित्य तुझें नांव नुच्चारितां ॥२॥
 
तुका म्हणे आतां पांडुरंगाविण । न वांचतां क्षण जीव भला ॥३॥
 
३४३४
 
नको मज ताठा नको अभिमान । तुजवांचूनि क्षीण होतो जीव ॥१॥
 
दुर्धर हे माया न होय सुटका । वैकुंठनायका सोडवीं मज ॥२॥
 
तुका म्हणे तुझें जालिया दर्षण । मग निवारण होइल सर्व ॥३॥
 
३४३५
 
चाल घरा उभा राहें नारायणा । ठेवूं दे चरणांवरि माथा ॥१॥
 
वेळोवेळां देई क्षेमआलिंगन । वरी अवलोकन कृपादृष्टी ॥ध्रु.॥
 
प्रक्षाळूं दे पाय बैसें माजघरीं । चित्त स्थिर करीं पांडुरंगा ॥२॥
 
आहे त्या संचितें करवीन भोजन । काय न जेवून करिसी आतां ॥३॥
 
करुणाकरें नाहीं कळों दिलें वर्म । दुरी होतां भ्रम कोण वारी ॥४॥
 
तुका म्हणे आतां आवडीच्या सत्ता । बोलिलों अनंता करवीन तें ॥५॥
 
३४३६
 
देवाची ते खूण आला ज्याच्या घरा । त्याच्या पडे चिरा मनुष्यपणा ॥१॥
 
देवाची ते खूण करावें वाटोंळें । आपणा वेगळें कोणी नाहीं ॥ध्रु.॥
 
देवाची ते खूण गुंतों नेदी आशा । ममतेच्या पाशा शिवों नेदी ॥२॥
 
देवाची ते खूण गुंतों नेदी वाचा । लागों असत्याचा मळ नेदी ॥३॥
 
देवाची ते खूण तोडी मायाजाळ । आणि हें सकळ जग हरी ॥४॥
 
पहा देवें तेंचि बळकाविलें स्थळ । तुक्यापें सकळ चिन्हें होतीं ॥५॥
 
३४३७
 
अनंताचे मुखीं होसील गाइला । अमुप विठ्ठला दास तुम्हां ॥१॥
 
माझें कोठें आलें होईंल विचारा । तरीं च अव्हेरा योग्य जालों ॥ध्रु.॥
 
सर्वकाळ तुम्ही असा जी संपन्न । चतुरा नारायण शिरोमणि ॥२॥
 
तुका म्हणे ऐसे कलियुगींचे जीव । तरी नये कीव बहुपापी ॥३॥
 
३४३८
 
न करावी चिंता । भय धरावें सर्वथा ॥१॥
 
दासां साहे नारायण । होय रिक्षता आपण ॥ध्रु.॥
 
न लगे परिहार । कांहीं योजावें उत्तर ॥२॥
 
न धरावी शंका । नये बोलों म्हणे तुका ॥३॥
 
३४३९
 
भांडवल माझें लटिक्याचे गांठी । उदीम तो तुटी यावी हा चि ॥१॥
 
कैसी तुझी वाट पाहों कोणा तोंडें । भोंवतीं किं रे भांडे गर्भवास ॥ध्रु.॥
 
चहूं खाणीचिया रंगलोंसें संगें । सुष्ट दुष्ट अंगें धरूनियां ॥२॥
 
बहुतांचे बहु पालटलों सळे । बहु आला काळें रंग अंगा ॥३॥
 
उकलूनि नये दावितां अंतर । घडिचा पदर सारूनियां ॥४॥
 
तुका म्हणे करीं गोंवळें यासाटीं । आपल्या पालटीं संगें देवा ॥५॥
 
३४४०
 
संतसंगतीं न करावा वास । एखादे गुणदोष अंगा येती ॥१॥
 
मग तया दोषा नाहीं परिहार । होय अपहार सुकृताचा ॥२॥
 
तुका म्हणे नमस्कारावे दुरून । अंतरीं धरून राहें रूप ॥३॥
 
३४४१
 
जें ज्याचें जेवण । तें चि याचकासी दान ॥१॥
 
आतां जाऊं चोजवीत । जेथें वसतील संत ॥ध्रु.॥
 
होतीं धालीं पोटें । मागें उरलीं उच्छिष्ट ॥२॥
 
तुका म्हणे धांव । पुढें खुंटईंल हांव ॥३॥
 
३४४२
 
धरावा तो बरा । ठाव वसतीचा थारा ॥१॥
 
निजविल्या जागविती । निज पुरवूनि देती ॥ध्रु.॥
 
एक वेवसाव । त्यांचा संग त्यांचा जीव ॥२॥
 
हितें केलें हित । ग्वाही एक एकां चित्त ॥३॥
 
विषमाचें कांहीं । आड तया एक नाहीं ॥४॥
 
तुका म्हणे बरीं । घरा येतील त्यापरी ॥५॥
 
३४४३
 
धोंडएासवें आदळितां फुटे डोकें । तों तों त्याच्या सुखें घामेजेना ॥१॥
 
इंगळासी सन्निधान अतित्याईं । क्षेम देतां काईं सुख वाटे ॥२॥
 
तुका म्हणे आम्हांसवें जो रुसला । तयाचा अबोला आकाशासीं ॥३॥
 
३४४४
 
सरे आम्हांपाशीं एक शुद्धभाव । नाहीं तरी वाव उपचार ॥१॥
 
कोण मानी वरी रसाळ बोलणें । नाहीं जाली मनें ओळखी तों ॥२॥
 
तुका म्हणे आम्हां जाणीवेचें दुःख । न पाहों त्या मुख दुर्जनाचें ॥३॥
 
३४४५
 
आतां तळमळ । केली पाहिजे सीतळ ॥१॥
 
करील तें पाहें देव । पायीं ठेवुनियां भाव ॥ध्रु.॥
 
तो चि अन्नदाता । नाहीं आणिकांची सत्ता ॥२॥
 
तुका म्हणे दासा । नुपेक्षील हा भरवसा ॥३॥
 
३४४६
 
लांब धांवे पाय चोरी । भरोवरी जनाच्या ॥१॥
 
आतां कैसें होय याचें । सिजतां काचें राहिलें ॥ध्रु.॥
 
खाय ओकी वेळोवेळां । कैसी कळा राहेल ॥२॥
 
तुका म्हणे भावहीण । त्याचा सीण पाचावा ॥३॥
 
३४४७
 
माझ्या इंद्रियांसीं लागलें भांडण । म्हणतील कान रसना धाली ॥१॥
 
करिती तळमळ हस्त पाद भाळ । नेत्रांसी दुकाळ पडिला थोर ॥ध्रु.॥
 
गुण गाय मुख आइकती कान । आमचें कारण तैसें नव्हे ॥२॥
 
दरुषणें फिटे सकळांचा पांग । जेथें ज्याचा भाग घेइल तें ॥३॥
 
तुका म्हणे ऐसें करीं नारायणा । माझी ही वासना ऐसी आहे ॥४॥
 
३४४८
 
सिद्धीचा दास नव्हें श्रुतीचा अंकिला । होईंन विठ्ठला सर्व तुझा ॥१॥
 
सर्वकाळ सुख आमच्या मानसीं । राहिलें जयासी नास नाहीं ॥ध्रु.॥
 
नेणें पुण्य पाप न पाहें लोचनीं । आणिका वांचूनि पांडुरंगा ॥२॥
 
न करीं आस मुक्तीचे सायास । भक्तिप्रेमरस सांडूनियां ॥३॥
 
गर्भवासीं धाक नाहीं येतां जातां । हृदयीं राहतां नाम तुझें ॥४॥
 
तुका म्हणे जालों तुझा चि अंकिला । न भें मी विठ्ठला कळिकाळासी ॥५॥
 
३४४९
 
जन्मा येऊनि तया लाभ जाला । बिडवईं भेटला पांडुरंगा ॥१॥
 
संसारदुःखें नासिलीं तेणें । उत्तम हें केणें नामघोष॥ध्रु.॥
 
धन्य ते संत सद्धि महानुभाव । पंढरीचा ठाव टाकियेला ॥२॥
 
प्रेमदाते ते च पतितपावन । धन्य दरुषण होय त्याला ॥३॥
 
पावटणिया पंथें जालिया सिद्धी । वोगळे समाधि सायुज्यता ॥४॥
 
प्रेम अराणूक नाहीं भय धाक । मज तेणें सुखें कांहीं चिंता ॥५॥
 
तें दुर्लभ संसारासी । जडजीवउद्धारलोकासी ॥६॥
 
तुका म्हणे त्यासी । धन्य भाग्य दरूषणें ॥७॥
 
३४५०
 
काय दिवस गेले अवघे चि वर्‍हाडें । तें आलें सांकडें कथेमाजी ॥१॥
 
क्षण एके ठायीं मन स्थिर नाहीं । अराणूक कइं होईंल पुढें ॥ध्रु.॥
 
कथेचे विरसें दोषा मूळ होय । तरण उपाय कैचा माती ॥२॥
 
काय तें सांचवुनि उरलें हें मागें । घटिका एक संगें काय गेलें ॥३॥
 
ते चि वाणी येथें करा उजळणी । काढावी मथूनि शब्दरत्नें ॥४॥
 
तुका म्हणे हें चि बोलावया चाड । उभयतां नाड हित असे ॥५॥
 

३४५१
 
शुद्धाशुद्ध निवडे कैसें । चर्म मास भिन्न नाहीं ॥१॥
 
कांहीं अधिक नाहीं उणें । कवण्या गुणें देवासी ॥ध्रु.॥
 
उदक भिन्न असे काईं । वाहाळ बावी सरिता नईं ॥२॥
 
सूर्य तेजें निवडी काय । रश्मी रसा सकळा खाय ॥३॥
 
वर्णां भिन्न दुधा नाहीं । सकळा गाई सारखें ॥४॥
 
करितां भिन्न नाहीं माती । मडक्या गति भिन्न नांवें ॥५॥
 
वर्त्ते एकविध अग्नि । नाहीं मनीं शुद्धाशुद्ध ॥६॥
 
तुका म्हणे पात्र चाड । किंवा विसें अमृत गोड ॥७॥
 
३४५२
 
न धरी प्रतिष्ठा कोणाची यम । म्हणतां कां रे राम लाजा झणी ॥१॥
 
सांपडे हातींचें सोडवील काळा । तो कां वेळोवेळां नये वाचे ॥ध्रु.॥
 
कोण लोक जो हा सुटला तो एक । गेले कुंभपाक रवरवांत ॥२॥
 
तुका म्हणे हित तों म्हणा विठ्ठल । न म्हणे तो भोगील कळेल तें ॥३॥
 
३४५३
 
म्हणवितां हरी न म्हणे तयाला । दरवडा पडिला देहामाजी ॥१॥
 
आयुष्यधन त्याचें नेले यमदूतीं । भुलविला निश्चिंतीं कामरंगें ॥ध्रु.॥
 
नावडे ती कथा देउळासी जातां । प्रियधनसुता लक्ष तेथें ॥२॥
 
कोण नेतो तयां घटिका दिवसा एका । कां रे म्हणे तुका नागवसी ॥३॥
 
३४५४
 
कथे बैसोनि सादरें । सुखचर्चा परस्परें । नवल काय तो उद्धरे । आणीक तरे सुगंधें ॥१॥
 
पुण्य घेई रे फुकाचें । पाप दुष्टवासनेचें । पेरिल्या बीजाचें । फळ घेई शेवटीं ॥ध्रु.॥
 
कथा विरस पाडी आळसें । छळणा करूनि मोडी रस । बुडवी आपणासरिसें । विटाळसें नावेसी ॥२॥
 
सज्जन चंदनाचिये परी । दुर्जन देशत्यागें दुरी । राहो म्हणे हरि । विनंती करी तुका हे ॥३॥
 
३४५५
 
कळों आलें तुझें जिणें । देवा तूं माझें पोसनें ॥१॥
 
वाट पाहासी आठवाची । सत्ता सतंत कईची ॥ध्रु.॥
 
बोलावितां यावें रूपा । सदा निर्गुणीं चि लपा ॥२॥
 
तुका म्हणे तूं परदेशी । येथें आम्हां अंगेजिसी ॥३॥
 
३४५६
 
आतां येथें लाजे नाहीं तुझें काम । जाय मज राम आठवूं दे ॥१॥
 
तुझे भिडे माझे बहु जाले घात । केलों या अंकित दुर्जनाचा ॥ध्रु.॥
 
माझें केलें मज पारिखें माहेर । नटोनी साचार चाळविलें ॥२॥
 
सुखासाटीं एक वाहियेलें खांदीं । तेणें बहु मांदी मेळविली ॥३॥
 
केला चौघाचार नेलों पांचांमधीं । नाहीं दिली शुद्धी धरूं आशा ॥४॥
 
तुका म्हणे आतां घेईंन कांटीवरी । धनी म्यां कैवारी केला देव ॥५॥
 
३४५७
 
आजिवरि होतों तुझे सत्ते खालीं । तोंवरी तों केली विटंबणा ॥१॥
 
आतां तुज राहों नेदीं या देशांत । ऐसा म्यां समर्थ केला धणी ॥ध्रु.॥
 
सापें रिग केला कोठें बाळपणीं । होतीसी पापिणी काय जाणों ॥२॥
 
तुका म्हणे म्यां हा बुडविला वेव्हार । तुझे चि ढोपर सोलावया ॥३॥
 
३४५८
 
देवाच्या निरोपें पिटितों डांगोरा । लाजे नका थारा देऊं कोणी ॥१॥
 
मोडिलें या रांडे सुपंथ मारग । चालविलें जग यमपंथें ॥ध्रु.॥
 
परिचारीं केली आपुली च रूढी । पोटींची ते कुडी ठावी नाहीं ॥२॥
 
तुका म्हणे आणा राउळा धरून । फजित करून सोडूं मग ॥३॥
 
३४५९
 
कां रे तुम्ही निर्मळ हरिगुण गा ना । नाचत आनंदरूप वैकुंठासी जा ना ॥१॥
 
काय गणिकेच्या याती अधिकार मोटा । दोषी अजामेळ ऐसीं नेलीं वैकुंठा ॥ध्रु.॥
 
ऐसे नेणों मागें किती अनंत अपार । पंच महादोषी पातकां नाहीं पार ॥२॥
 
पुत्राचिया लोभें नष्ट म्हणे नारायण । कोण कर्तव्य तुका म्हणे त्याचें पुण्य ॥३॥
 
३४६०
 
बैसोनियां खाऊं जोडी । ओढाओढी चुकवूनि ॥१॥
 
ऐसें केलें नारायणें । बरवें जिणें सुखाचें ॥ध्रु.॥
 
घरीच्या घरीं भांडवल । न लगे बोल वेचावे ॥२॥
 
तुका म्हणे आटाआटी । चुकली दाटी सकळ ॥३॥
 
३४६१
 
नाहीं भ्यालों तरी पावलों या ठाया । तुम्हां आळवाया जवळिकें ॥१॥
 
सत्ताबळें आतां मागेन भोजन । केलें तें चिंतन आजिवरी ॥ध्रु.॥
 
नवनीतासाटीं खादला हा जीव । थोड्यासाटीं कीव कोण करी ॥२॥
 
तुका म्हणे ताक न लगे हें घाटे । पांडुरंगा खोटें चाळवण ॥३॥
 
३४६२
 
सारीन तें आतां एकाचि भोजनें । वारीन मागणें वेळोवेळां ॥१॥
 
सेवटींच्या घासें गोड करीं माते । अगे कृपावंते पांडुरंगे ॥ध्रु.॥
 
वंचूं नये आतां कांहीं च प्रकार । धाकल्याचें थोर जाल्यावरी ॥२॥
 
तुका म्हणे आतां बहु चाळवावें । कांहीं नेदीं ठावें उरों मागें ॥३॥
 
३४६३
 
पोट धालें मग न लगे परती । जालिया निश्चिंती खेळ गोड ॥१॥
 
आपुलिया हातें देईं वो कवळ । विठ्ठल शीतळ जीवन वरी ॥ध्रु.॥
 
घराचा विसर होईंल आनंद । नाचेन मी छंदें प्रेमाचिया ॥२॥
 
तुका म्हणे तों च वरी करकर । मग हें उत्तर खंडईंल ॥३॥
 
३४६४
 
बोलविसी तरी । तुझ्या येईंन उत्तरीं ॥१॥
 
कांहीं कोड कवतिकें । हातीं द्यावया भातुकें ॥ध्रु.॥
 
बोलविसी तैसें । करीन सेवन सरिसें ॥२॥
 
तुका म्हणे देवा । माझें चळण तुज सवा ॥३॥
 
३४६५
 
दिला जीवभाव । तेव्हां सांडिला म्यां ठाव ॥१॥
 
आतां वर्ते तुझी सत्ता । येथें सकळ अनंता ॥ध्रु.॥
 
माझीया मरणें । तुम्ही बैसविलें ठाणें ॥२॥
 
तुका म्हणे काई । मी हें माझें येथें नाहीं ॥३॥
 
३४६६
 
एकाचिये वेठी । सांपडलों फुकासाटीं ॥१॥
 
घेतों काम सत्ताबळें । माझें करूनि भेंडोळें ॥ध्रु.॥
 
धांवे मागें मागें । जाय तिकडे चि लागे ॥२॥
 
तुका म्हणे नेलें । माझें सर्वस्वें विठ्ठलें ॥३॥
 
३४६७
 
बराडियाची आवडी पुरे । जया झुरे साटीं तें ॥१॥
 
तैसें जालें माझ्या मना । नुठी चरणावरूनि ॥ध्रु.॥
 
मागलिया पेणें पावे । विसांवे तें ठाकणीं ॥२॥
 
तुका म्हणे छाया भेटे । बरें वाटे तापे त्या ॥३॥
 
३४६८
 
आतां द्यावें अभयदान । जीवन ये कृपेचें ॥१॥
 
उभारोनी बाहो देवा । हात ठेवा मस्तकीं ॥ध्रु.॥
 
नाभी नाभी या उत्तरें । करुणाकरें सांतवीजे ॥२॥
 
तुका म्हणे केली आस । तो हा दिस फळाचा ॥३॥
 
३४६९
 
बहुजन्में सोस केला । त्याचा जाला परिणाम ॥१॥
 
विठ्ठलसें नाम कंठीं । आवडी पोटीं संचितें ॥ध्रु.॥
 
येथुन तेथवरी आतां । न लगे चिंता करावी ॥२॥
 
तुका म्हणे धालें मन । हें चि दान शकुनाचें ॥३॥
 
३४७०
 
उसंतिल्या कर्मवाटा । बहु मोटा आघात ॥१॥
 
शीघ्र यावें शीघ्र यावें । हातीं न्यावें धरूनि ॥ध्रु.॥
 
भागलों या खटपटे । घटपटें करितां ॥२॥
 
तुका म्हणे कृपावंता । माझी चिंता खंडावी॥३॥
 
३४७१
 
तुम्हांसी हें अवघें ठावें । किती द्यावें स्मरण ॥१॥
 
कां बा तुम्ही ऐसें नेणें । निष्ठ‍पणें टाळित असां ॥ध्रु.॥
 
आळवितां मायबापा । नये कृपा अझूनि ॥२॥
 
तुका म्हणे जगदीशा । काय असां निजेले ॥३॥
 
३४७२
 
नेलें सळेंबळें । चित्तावित्ताचें गांठोळें ॥१॥
 
साहए जालीं घरिच्या घरीं । होतां ठायीं च कुठोरी ॥ध्रु.॥
 
मी पातलों या भावा । कपट तें नेणें देवा ॥२॥
 
तुका म्हणे उघडें केलें । माझें माझ्या हातें नेलें ॥३॥
 
३४७३
 
जाला हा डांगोरा । मुखीं लहानाचे थोरा ॥१॥
 
नागविलों जनाचारीं । कोणी बैसों नेदी दारी ॥ध्रु.॥
 
संचिताचा ठेवा। आतां आला तैसा घ्यावा ॥२॥
 
तुका म्हणे देवें । म्हणों केलें हें बरवें ॥३॥
 
३४७४
 
किती चौघाचारें । येथें गोविलीं वेव्हारें ॥१॥
 
असे बांधविले गळे । होऊं न सकती निराळे ॥ध्रु.॥
 
आपलें आपण । केलें कां नाहीं जतन ॥२॥
 
तुका म्हणे खंडदंडें । येरझारीं लपती लंडें ॥३॥
 
३४७५
 
पांडुरंगा ऐसा सांडुनि वेव्हारा । आणिकांची करा आस वांयां ॥१॥
 
बहुतांसी दिला उद्धार उदारें । निवडीना खरें खोटें कांहीं ॥ध्रु.॥
 
याचिया अंकिता वैकुंठ बंदर । आणीक वेव्हार चालितना ॥२॥
 
तुका म्हणे माझे हातींचें वजन । यासी बोल कोण ठेवूं सके ॥३॥
 
३४७६
 
ठेवूनि इमान राहिलों चरणीं । म्हणउनि धणी कृपा करी ॥१॥
 
आम्हांसी भांडार करणें जतन । आलें गेलें कोण उंच निंच ॥ध्रु.॥
 
करूनि सांभाळीं राहिला निराळा । एक एक वेळा आज्ञा केली ॥२॥
 
तुका म्हणे योग्यायोग्य विनीत । देवा नाहीं चित्त येथें देणें ॥३॥
 
३४७७
 
आतां नव्हे गोड कांहीं करितां संसार । आणीक संचार जाला माजी ॥१॥
 
ब्रम्हरसें गेलें भरूनियां अंग । आधील तो रंग पालटला ॥ध्रु.॥
 
रसनेचिये रुची कंठीं नारायण । बैसोनियां मन निवविलें ॥२॥
 
तुका म्हणे आतां बैसलों ठाकणीं । इच्छेची ते धणी पुरईंल ॥३॥
 
३४७८
 
आतां काशासाटीं दुरी । अंतर उरी राखिली ॥१॥
 
करीं लवकरी मुळ । लहानें तीळ मुळीचिया ॥ध्रु.॥
 
दोहीं ठायीं उदेगवाणें । दरुषणें निश्चिंती ॥२॥
 
तुका म्हणे वेग व्हावा । ऐसी जीवा उत्कंठा ॥३॥
 
३४७९
 
पडिली हे रूढि जगा परिचार । चालविती वेव्हार सत्य म्हूण ॥१॥
 
मरणाची कां रे नाहीं आठवण । संचिताचा धन लोभ हेवा ॥ध्रु.॥
 
देहाचें भय तें काळाचें भातुकें । ग्रासूनि तें एकें ठेविलेंसे ॥२॥
 
तुका म्हणे कांहीं उघडा रे डोळे । जाणोनि अंधळे होऊं नका ॥३॥
 
३४८०
 
जेथें पाहें तेथें कांडिती भूस । चिपाडें चोखूनि पाहाती रस ॥१॥
 
काय सांगों देवा भुलले जीव । बहु यांची येतसे कींव ॥ध्रु.॥
 
वेठीचें मोटळें लटिकें चि फुगे । पेणिया जाऊनि भिक्षा मागे ॥२॥
 
तुका म्हणे कां उगे चि खोल । जवळी दाखवी आपणां बोल ॥३॥
 
३४८१
 
जाणिवेच्या भारें चेंपला उर । सदा बुरबुर सरे चि ना ॥१॥
 
किती याचें ऐकों कानीं । मारिलें घाणीं नाळकरी ॥ध्रु.॥
 
मिठेंविण आळणी बोल । कोरडी फोल घसघस ॥२॥
 
तुका म्हणे डेंगा न कळे हित । किती फजित करूं तरी ॥३॥
 
३४८२
 
अनुतापयुक्त गेलिया अभिमान । विसरूं वचन मागिलांचा ॥१॥
 
त्याचे पाय माझे लागोत कपाळीं । भोग उष्टावळी धन्यकाळ ॥ध्रु.॥
 
षड उर्मी जिंहीं हाणितल्या लाता । शरण या संता आल्या वेगीं ॥२॥
 
तुका म्हणे जाती वोळे लवकरी । ठायीं चि अंतरीं शुद्ध होती ॥३॥
 
३४८३
 
खोल ओले पडे तें पीक उत्तम । उथळाचा श्रम वांयां जाय ॥१॥
 
लटिक्याचे आम्ही नव्हों सांटेकरी । थीतें घाली भरी पदरीचें ॥ध्रु.॥
 
कोणा इहलोकीं पाहिजे पसारा । दंभ पोट भरायाचे चाडे ॥२॥
 
तुका म्हणे कसीं अगी जें उतरे । तें चि येथें सरे जातिशुद्ध ॥३॥
 
३४८४
 
गोमट्या बीजाचीं फळें ही गोमटीं । बाहे तें चि पोटीं समतुक ॥१॥
 
जातीच्या संतोषें चित्तासी विश्रांति । परतोनि मागुती फिरों नेणें ॥ध्रु.॥
 
खर्‍याचे पारखीं येत नाहीं तोटा । निवडे तो खोटा ढाळें दुरी ॥२॥
 
तुका म्हणे मज सत्याचि आवडी । करितां तांतडी येत नाहीं ॥३॥
 
३४८५
 
मन जालें भाट । कीर्ति मुखें घडघडाट । पडियेली वाट । ये चि चाली स्वभावें ॥१॥
 
बोलें देवाचे पवाडे । नित्य नवे चि रोकडे । ज्या परी आवडे । तैसा तैसा करूनि ॥ध्रु.॥
 
रोखीं रहावें समोर । पुढें मागें चाले भार । करावें उत्तर । सेवा रुजू करूनि ॥२॥
 
पूर वर्षला देकारें । संतोषाच्या अभयें करें । अंगींच्या उत्तरें । तुकया स्वामी शृंगारी ॥३॥
 
३४८६
 
दूरि तों चि होतों आपुले आशंके । नव्हतें ठाउकें मूळभेद ॥१॥
 
आतां जेथें तेथें येइन सांगातें । लपाया पुरतें उरों नेदीं ॥ध्रु.॥
 
मिथ्या मोहें मज लाविला उशीर । तरी हे अंतर जालें होतें ॥२॥
 
तुका म्हणे कां रे दाखविसी भिन्न । लटिका चि सीण लपंडाईं ॥३॥
 
३४८७
 
कळों नये तों चि चुकावितां बरें । मग पाठमोरें काय काज ॥ १॥
 
धरिलेती आतां द्या जी माझा डाव । सांपडतां भाव ऐसा आहे ॥ ध्रु.॥
 
होतासी अंतरें झाकिलिया डोळीं । तो मी हा न्याहाळीं धरुनी दृष्टी ॥ २॥
 
तुका म्हणे तुज रडीची च खोडी । अहाच बराडी तो मी नव्हे ॥.३॥
 
३४८८
 
करिसी लाघवें । तूं हें खेळसी आघवें ॥१॥
 
केला अहंकार आड । आम्हां जगासी हा नाड ॥ध्रु.॥
 
यथंभुतें यावें । दावूं लपों ही जाणावें ॥२॥
 
तुका म्हणे हो श्रीपती । आतां चाळवाल किती ॥३॥
 
३४८९
 
विश्वास तो देव । म्हणुनि धरियेला भाव ॥१॥
 
माझी वदवितो वाणी । ज्याणें धरिली धरणी ॥ध्रु.॥
 
जोडिलीं अक्षरें । नव्हेती बुद्धीचीं उत्तरें ॥२॥
 
नाहीं केली आटी । कांहीं मानदंभासाटीं॥३॥
 
कोणी भाग्यवंत । तया कळेल उचित ॥४॥
 
तुका म्हणे झरा । आहे मुळींचा चि खरा ॥५॥
 
३४९०
 
सुराणीचीं जालों लाडिकीं एकलीं । वडील धाकुलीं आम्ही देवा ॥१॥
 
म्हणऊनि कांहीं न घडे अव्हेर । गोमटें उत्तर भातुकें ही ॥ध्रु.॥
 
कांहीं एक नाहीं वंचिलें वेगळें । मुळीचिया मुळें स्थिराविलें ॥२॥
 
लेवविलीं अंगीं आपुलीं भूषणें । अळंकार लेणें सकळ ही ॥३॥
 
सारितां न सरे आमुप भांडार । धना अंतपार नाहीं लेखा ॥४॥
 
तुका म्हणे आम्ही आळवूं आवडी । म्हणऊनी जोडी दाखविली ॥५॥
 
३४९१
 
एका वेळे केलें रितें कलिवर । आंत दिली थार पांडुरंगा ॥१॥
 
पाळण पोषण लागलें ते सोईं । देहाचें तें काईं सर्वभावें ॥ध्रु.॥
 
माझिया मरणें जाली हे वसति । लागली ते ज्योती अविनाशा ॥२॥
 
जाला ऐसा एका घायें येथें नाहीं । तुका म्हणे कांहीं बोलों नये ॥३॥
 
३४९२
 
पावतों ताडन । तरी हें मोकलितों जन ॥१॥
 
मग मी आठवितों दुःखें । देवा सावकाश मुखें ॥ध्रु.॥
 
होती अप्रतिष्ठा । हो तों वरपडा कष्टा ॥२॥
 
तुका म्हणे मान । होतां उत्तम खंडन ॥३॥
 
३४९३
 
धरावें तों भय । अंतरोनि जाती पाय ॥१॥
 
जाल्या तुटी देवासवें । काय वांचोनि करावें ॥ध्रु.॥
 
कोणासी पारिखें । लेखूं आपणासारिखें ॥२॥
 
तुका म्हणे असो । अथवा हें आतां नासो ॥३॥
 
३४९४
 
आम्हांसी सांगाती । होती अराले ते होती ॥१॥
 
येती आइकतां हाक । दोन मिळोन म्हणती एक ॥ध्रु.॥
 
आणिकां उत्तरीं । नसे गोवी वैखरी ॥२॥
 
तुका म्हणे बोल । खूण पहाती विठ्ठल ॥३॥
 
३४९५
 
आनंदाचा थारा । सुखें मोहरला झरा ॥१॥
 
ऐसी प्रभुची ज्या कळा । त्याच्या कोण पाहे बळा ॥ध्रु.॥
 
अंकिता ऐसया । होइल पावविलें ठाया ॥२॥
 
तुका म्हणे ऐसें । दिलें आभंड प्रकासे ॥३॥
 
३४९६
 
काहे लकडा घांस कटावे । खोद हि जुमीन मठ बनावे ॥१॥
 
देवलवासी तरवरछाया । घरघर माईं खपरिबसमाया ॥ध्रु.॥
 
कां छांडियें भार फेरे सीर भागें । मायाको दुःख मिटलिये अंगें ॥२॥
 
कहे तुका तुम सुनो हो सिद्धी । रामबिना और झुटा कछु धंदा ॥३॥
 
३४९७
 
आणीक पाखांडें असती उदंडें । तळमळिती पिंडें आपुलिया ॥१॥
 
त्याचिया बोलाचा नाहीं विश्वास । घातलीसे कास तुझ्या नामीं ॥ध्रु.॥
 
दृढ एक चित्तें जालों या जीवासी । लाज सर्वविशीं तुम्हांसी हे ॥२॥
 
पीडों नेदी पशु आपुले अंकित । आहे जें उचित तैसें करा ॥३॥
 
तुका म्हणे किती भाकावी करुणा । कोप नारायणा येइल तुम्हां ॥४॥
 
३४९८
 
व्हावया भिकारी हें आम्हां कारण । अंतरोनि जन जावें दुरी ॥१॥
 
संबंध तुटावा शब्दाचा ही स्पर्श । म्हणऊनि आस मोकलिली ॥२॥
 
तुका म्हणे दुःखें उबगला जीव । म्हणऊनी कीव भाकीं देवा ॥३॥
 
३४९९
 
कोरडिया ऐशा सारून गोष्टी । करा उठाउठीं हित आधीं ॥१॥
 
खोळंबला राहे आपुला मारग । पहावी ते मग तुटी कोठें ॥ध्रु.॥
 
लौकिकाचा आड येईंल पसारा । मग येरझारा दुःख देती ॥२॥
 
तुका म्हणे डांख लागे अळंकारें । मग नव्हे खरें पुटाविण ॥३॥
 
३५००
 
ऐसें ठावें नाहीं मूढा । सोस काकुलती पुढां ॥१॥
 
माझीं नका जाळूं भांडीं । पोटीं भय सोस तोंडीं ॥ध्रु.॥
 
पातलिया काळ । तेव्हां काय चाले बळ ॥२॥
 
संचित तें करी । नरका जाया मेल्यावरी ॥३॥
 
परउपकार । न घडावा हा विचार ॥४॥
 
तुका म्हणे लांसी । आतां भेटों नये ऐसी ॥५॥
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तुकाराम गाथा - अभंग संग्रह २५०१ ते ३०००