Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मराठीत 'होळी'वर निबंध

Webdunia
सोमवार, 18 मार्च 2019 (15:45 IST)
होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला "होळी पौर्णिमा" असेही संबोधले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी काही ठिकाणी एकत्रितरीत्या तो साजरा होतो. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव साजरा केला जातो.
 
विविध प्रांतातील नावे
ह्या उत्सवाला "होलिकादहन" किंवा "होळी", "शिमगा", "हुताशनी महोत्सव", फाग,फागुन "दोलायात्रा", "कामदहन" अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. कोकणात शिग्मो किंवा शिग्मा म्हणतात.
 
फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या ह्या लोकोत्सवाला "फाल्गुनोत्सव", आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त "वसंतागमनोत्सव" किंवा "वसंतोत्सव" असेही म्हणण्यात येते.
 
धूळवड आणि रंगपंचमी
महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती 'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखविला जातो. महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची पद्धती रूढ आहे.
 
होळी नंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो. याला' धुळवड' असेही म्हणतात. एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते.
 
कृषी संस्कृतीतील महत्त्व
भारतातील शेतकरी वर्गात होळी या सणाचे विशेष महत्त्व आहे. पौराणिक इतिहास पाहता या सणाचे आणि कृष्ण-बलराम यांचे नाते दिसून येते. होळीच्या निमित्ताने या दोन्ही देवतांचे स्मरण आणि पूजा करतात. या दिवशी हाती आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्यासाठी प्रार्थना करतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे.
 
आख्यायिका
लहान मुलांना पीडा देणाऱ्या "होलिका", "ढुंढा", "पुतना" ह्यांसारख्या राक्षसींच्या दहनांच्या कथांमधे ह्या उत्सवाच्या परंपरेचा शोध काही लोक घेतात. (एका पौराणिक कथेनुसार भगवान विष्णूचा भक्त असलेल्या प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकशिपूने धाडलेल्या होलिकादेवतेचा श्रीविष्णू देवाने वध केला होता. होलिकेला वर होता की तिला अग्नी जाळू शकणार नाही, परंतु प्रल्हादाला जाळण्यासाठी तिने त्याला मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला. प्रल्हाद बचावला व होलिकेचे दहन झाले अशी आख्यायिका प्रचलित आहे.
 
विद्वानांच्या मते हा उत्सव प्राचीन अग्निपूजन परंपरेचा आविष्कार आहे. होळीच्या सणाचे आज सगळीकडे प्रचलित असलेले स्वरूप पाहिले तर लक्षात येते ते असे की हा सण मुळात लौकिक पालळीवरचा असावा. त्यात कालांतराने उच्च संस्कृतीच्या लोकांकडून धार्मिक/सांस्कृतिक विधिविधानांची भर पडली असावी.
 
कोकणातील शिमगोत्सव / होलिकोत्सव
फाल्गुन महिन्यात येणारा शिमगा उत्सव शेतकरी वर्गाच्या निवांत काळात येतो.शेतीची कामे संपलेली असतात. शेतीची भाजवणी करून ठेवलेली असते. आता पेरणीच्या काळापर्यंत म्हणजे ६-७ जून पर्यंत (रोहिणी नक्षत्र) विश्रांतीचा काळ असतो. त्यामुळे हा काळ कोकणात विशेष आनंदात शिमगा उत्सव साजरा करण्यासाठी वापरला जातो. कोकणात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात शिमगा हा सण अधिक मोठ्या प्रमाणात साजरा होतो. तिथे हा सण सुमारे ५ ते १५ दिवस असतो. प्रथेप्रमाणे फाल्गुन पौर्णिमेला होळीचा मुख्य दिवस असतो. कोकणात काही ठिकाणी पौर्णिमेच्या रात्री होम केला जातो तर काही ठिकाणी पौर्णिमायुक्त प्रतिपदेला होम केला जातो; याला ‘भद्रेचा होम ‘ असे म्हणतात.
 
फाल्गुन शुक्ल पंचमीला काही ठिकाणी छोटी होळी लावतात आणि नंतर पुढचे काही दिवस गावात पालख्या फिरतात. काही ठिकाणी आधी पालख्या फिरतात आणि पौर्णिमेला प्रत्यक्ष होळी साजरी होते. याला ‘होम’ लागणे असा शब्दप्रयोग वापरतात. काही गावात होम झाल्यानंतरही गावात पालख्या फिरत राहतात अशी प्रथा दिसते.
 
विविध गावातील प्रथा
रत्नागिरीतील ओठी–नवेठ गावात शिमग्यात ‘होलदेव’ साजरा होतो. नवलाईदेवीच्या देवळात एक ५०-६० किलो वजनाचा एक दगड आहे. यालाच होलदेव म्हणतात. त्याची एक आख्यायिका प्रसिद्ध आहे असे मानले जाते. भद्रेचा होम ज्यावेळी पेटविला जातो त्यावेळी गावातील मानकरी आणि खास करून नवविवाहित तरूण हा होलदेव उचलतात आणि होळीभोवती एक प्रदक्षिणा घालतात अशी प्रथा आहे. देवळे महाल या गावात ग्रामदेवता काळेश्वरी, चाफवली, मेघी, दाभोळे, कनकाडी, कारंजारी, या ग्रामदेवतांच्या पालख्या एकत्र उत्साहाने नाचविल्या जातात. कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावातील गडकऱ्यांची होळी- छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा जोपासणारे हे गाव. शिवापूर गाव हे शिवकालात नांदते गाव होते. मनोहर मनसंतोष किल्ल्यावर तीनशे गडकऱ्यां तिथे वस्ती होती.स्वराज्यातील मावले जे मर्दानी खेळ त्यावेळी खेळत असत ती परंपरा या गावात आजही जोपासली आहे. आगीतून पलायन, नारळ जिंकणे अशा स्पर्धा आजही शिमगा उत्सवात भरवल्या जातात. होळीच्या दिवसात ‘जती’ च्या रूपात गायनाचा कार्यक्रम चालतो. धुलिवंदनाच्या दिवशी ओल्या मातीत लोळण घेण्याची प्रथा आजही जोपासली जाते.
 
आदिवासी जमातीत
भारतातील आदिवासी जमातीत हा दिवस गुलाल उधळून, टिमक्या-ढोल वाजवून, नृत्य करून स्त्री-पुरुष उत्साहाने साजरा करतात. महाराष्ट्रातील आदिवासी जमातीतील लोकांत होळी हा सण उत्साहाने साजरा केला जातो. होळी साजरा करत असताना आदिवासी लोकांच्या भोजनामध्ये गोड पुरी, मासळी व गोड भात या पदार्थांचा समावेश असतो. सातपुडा पर्वत प्रदेशातील आदिवासी होळीच्या दरम्यान काठी उत्सव साजरा करतात. बाराव्या शतकापासून ही परंपरा सुरू असल्याचे दिसते. दागदागिने घालून, नक्षीकाम करून स्त्री-पुरुष यात सहभागी होतात. विविध वाद्यांच्या तालावर नृत्य केले जाते.
भारताच्या अन्य प्रांतात
उत्तर भारतातील व्रज भागात होळीचे महत्त्त्व विशेष आहे. येथे कृष्ण आणि होळी असे धार्मिक आचार प्रसिद्ध आहेत. उत्तर भारतातील खेडेगावांत होळीचे महत्त्व विशेष आहे. लाकडे रचून त्याची होळी पेटविली जाते आणि युवक-युवती त्याभोवती नृत्य करतात. बनारसमधील लहान गावात पुरोहितांनी होळीच्या अग्नीवरून चालत जाण्याची प्रथा आहे.
 
महाराष्ट्र
पुरणपोळी
महाराष्ट्रात होळीच्या अग्नीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे.तसेच समस्त समुदाय होळीची विधियुक्त पूजन करतो.होळी समोर गार्‍हाणे, नवस बोलण्याची परंपरा आहे.
 
प. बंगाल
बंगाल प्रांतात हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. वैष्णव संप्रदायात "गौरपौर्णिमा" या नावाने हा दिवस चैतन्य महाप्रभू यांची जन्मतिथी म्हणून श्रीकृष्ण जन्माष्टमी प्रमाणेच भक्तिभावाने साजरा केला जातो.
 
ईशान्य भारत
ईशान्य भारतात विशेषकरून मणिपूर मधील विष्णुपुरी भागात महिला होळीचा दिवस आनंदाने साजरा करतात.
 
राजस्थान
या प्रदेशात एकमेकांवर गुलाल उधळून महिला-पुरुष होळी साजरी करतात. राजस्थानात संस्थान म्हणून मान्यता असताना तत्कालीन रितीप्रमाणे होळीच्या दिवशी विशेष दरबार भरत असे.
 
गुजरात
गुजरातमध्ये एक आठवडा होळीचा आनंद साजरा केला जातो.
 
होळीदहन हे मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी या गोष्टीचे प्रतीक आहे. त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

आरती सोमवारची

सोमवारी या उपयांनी मिळेल तन, मन आणि धनाचे सुख

Surya Dev Mantra: सूर्याच्या 7 शक्तिशाली मंत्र जपल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात, रविवारी कोणत्याही एका मंत्राचा जप करा

श्री सूर्याची आरती

काल भैरव आरती Kaal Bhairav Aarti

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments