Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दाऊद इब्राहिम : पोलीस कॉन्स्टेबलचा मुलगा अंडरवर्ल्डचा डॉन कसा झाला?

Webdunia
सोमवार, 18 डिसेंबर 2023 (09:16 IST)
80 च्या दशकात गुन्हेगारी जगतात प्रवेश झाल्यापासून दाऊद कायमच चर्चा आणि वादांचा केंद्रबिंदू राहिला आहे.
दाऊदचे वडील इब्राहीम कासकर मुंबई पोलिसांत कॉन्स्टेबल होते. डोंगरी - नागपाडा भागामध्ये कॉन्स्टेबल इब्राहीम कासकरांना मान होता. इब्राहीम-अमीना कासकर जोडप्याला 12 मुलं. त्यापैकी एक - दाऊद.
 
सातवीमध्ये शाळा सोडल्यानंतर दाऊदने परिसरातल्या टवाळ मुलांसोबत लहान चोऱ्यामाऱ्या, लोकांच्या गळ्यातल्या साखळ्या हिसकावणं, पाकिटमारी, मारहाण अशा कारवाया सुरू केल्या.
 
किशोरवयात डोंगरीतल्या गल्लीतल्या मुलांची गँग तयार करणारा दाऊद विशीत येईपर्यंत पठाण गँगला आव्हान देऊ लागला होता. सातवीमध्ये शाळा सोडलेला हाच दाऊद पुढे मुंबईचा आणि नंतर भारतातला सगळ्यांत मोठा 'डॉन' बनला.
 
दाऊदने त्याचा भाऊ शब्बीरसोबत स्वतःच्या गटाच्या कारवाया करायला सुरुवात केली. मीडियाने याला नाव दिलं - डी कंपनी (दाऊद कंपनी). दाऊदचा भाऊ अनीस आता या कंपनीसाठीचे सगळे व्यवहार सांभाळत असल्याचा कयास आहे.
 
19 वर्षांच्या दाऊदने भाऊ शब्बीर आणि आपल्या साथीदारांसोबत मुंबईतल्या कर्णाक बंदर भागामध्ये बँकेचे पैसे लुटले आणि गुन्हेगारी जगताचं आणि मुंबईतल्या वर्तमानपत्रांचंही लक्ष या तरुणाकडे गेलं.
 
हे पैसे हाजी मस्तानचे आहेत, असं समजून दाऊदने ही लूट केली. पण त्याने चोरलेले पैसे हे मेट्रोपॉलिटन को-ऑपरेटिव्ह बँकेचे होते आणि हा मुंबईतला दशकभरातला सगळ्यांत मोठा दरोडा होता. आपल्या मुलाचं कृत्य ऐकून इब्राहिम कासकरना धक्का बसला.
 
दाऊद इब्राहिमवर ज्येष्ठ पत्रकार एस. हुसैन झैदी यांनी पुस्तक लिहिलंय. 'डोंगरी टू दुबई' या पुस्तकामध्ये या प्रसंगाचं वर्णन करताना ते लिहितात, "इब्राहिमचं त्याच्या मित्रांचं आणि हितचिंतकांचं असं स्वतःचं एक नेटवर्क होतं. त्यांच्यामार्फत त्याने दोन्ही मुलांचा शोध घ्यायला सुरुवात केली.
 
अनेक दिवस शोधल्यानंतर ते दोघं भायखळ्यातल्या एका मित्राच्या घरी लपून बसल्याचं या संतापलेल्या बापाला समजलं. तिथून तो दोघांनाही घरी घेऊन आला. हे दोघे आई अमीनाचा ओरडा आणि शिव्या शाप माना खाली घालून ऐकत असतानाच माळ्यावर जाऊन इब्राहिमने स्टीलचं कपाट उघडलं. क्राईम ब्राँचचा हेड कॉन्स्टेबल म्हणून अभिमानाने जो चामडी पट्टा तो घालायचा, तो घेऊन इब्राहिम खाली आला.
 
संतापलेल्या इब्राहिमने दोन्ही मुलांना इतकं झोडपून काढलं की त्यांच्या पाठीची सालटी निघाली. शेवटी इतरांनी इब्राहिमला पकडून हातातून बेल्ट हिसकावून घेतल्यानंतर हा मार थांबला."
 
"पण हा बाप इतक्यावर थांबला नाही. अमीनाने या दोघांना अन्न-पाणी देण्यापूर्वीच इब्राहिमने त्यांना फरफटत घराबाहेर काढलं, टॅक्सीत कोंबलं आणि क्राईम ब्रांचला आणलं.
 
तिथल्या अधिकाऱ्यांच्या पायांवर आपल्या मुलांना घालत तो हात जोडून रडू लागला. मुलांनी केलेल्या लाजीरवाण्या कामाबद्दल त्याने अधिकाऱ्यांची माफी मागितली. दाऊद आणि शब्बीरची केविलवाणी अवस्था आणि इब्राहिमचा सच्चेपणा पाहत क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी या दोघांना स्वतःच्या मारातून सूट दिली.
 
पुढे अशा अनेक घटना घडल्या जिथे दाऊदला आपोआप सूट मिळाली. पण रक्त सळसळवणारी ती एक घटना आणि त्यानंतर मिळालेली 15 मिनिटांची प्रसिद्धी दाऊद इब्राहिमला भावली. कदाचित याच घटनेने दाऊद इब्राहिममधल्या 'डॉन'ला जन्म दिला."
 
अंडरवर्ल्डमध्ये दाऊदच्या प्रवेशामुळे तिथल्या तेव्हाच्या प्रस्थापितांच्या वर्चस्वाला धक्का बसला आणि गँगवॉरला आणि रक्तपाताला सुरुवात झाली.
 
दाऊद आणि मुंबई बॉम्बस्फोट
पठाण गँगने शब्बीर कासकरची पेट्रोल पंपवर हत्या केली. दाऊदने नाट्यमयरित्या या हत्येचा बदला घेतला. करीम लालाचा पुतण्या समाद खानची दाऊदने 1986मध्ये हत्या घडवून आणली.
 
यानंतर दाऊद भारताबाहेर पळून गेला. दुबईमध्ये डी कंपनीने वेगवेगळे उद्योग सुरू केले. आणि त्यानंतर या डी कंपनीच्या कारवाया भारताबाहेरही सुरू झाल्या.
 
1993 मध्ये मुंबईमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांचा दाऊद मास्टरमाईंड असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या स्फोटांमध्ये 257 जण ठार झाले तर 700 जण जखमी झाले होते.
 
बाबरी मशीद पाडण्यात आल्यानंतर मुंबईमध्ये दंगली उसळल्या. यामध्ये अनेक मुसलमानांचा बळी गेला.
 
यामुळे व्यथित झालेल्या दाऊदने पाकिस्तानच्या ISIच्या मदतीने भारतामध्ये बॉम्ब आणि शस्त्र स्मगल करून आणली आणि 12 मार्च 1993 रोजी मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले असा दाऊदवर आरोप आहे.
 
बाबरी मशीद पडल्यानंतर मुंबईतल्या मुसलमानांनी दाऊदकडे मदत मागितली पण त्याने मदत केली नाही म्हणून काही मुसलमान महिलांनी दाऊदला बांगड्या पाठवल्याची चर्चा होती, असं मुंबईचे माजी पोलीस कमिशनर राकेश मारिया यांनी त्यांच्या - 'लेट मी से इट नाऊ' या आत्मचरित्रात म्हटलंय.
 
डी कंपनीचे सदस्य असणाऱ्या छोटा शकील, टायगर मेमन, याकूब मेमन आणि अबू सालेम या सगळ्यांवर 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटांसंबंधीचे विविध आरोप होते. यापैकी अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा झाली, तर याकूब मेमनला दोषी आढळल्यानंतर फाशीची शिक्षा देण्यात आली.
 
दाऊदचे लष्कर - ए - तोयबा आणि ओसामा बिन लादेनच्या अल् - कायदाशीही संबंध असल्याचे आरोप झाले होते.
 
9/11 च्या वर्ल्ड ट्रेड सेंटर हल्ल्यांमागे दाऊदचाही हात असल्याचा आरोप अमेरिकन सरकारने केला होता.
 
दाऊद 'स्पेशली डिसिग्नेटेड ग्लोबल टेररिस्ट' असल्याचं म्हणत अमेरिकेने दाऊदची विविध देशांतली मालमत्ता जप्त करण्याची मागणी युनायटेड नेशन्सकडे केली होती.
 
दाऊद कुठे आहे?
दाऊद इब्राहिमने आपलं बस्तान दुबईमधून नंतर पाकिस्तानात हलवलं आणि तिथे पाकिस्तानने त्याला आसरा दिल्याचा आरोप अनेकदा करण्यात आलाय.
 
पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI चा पाठिंबा दाऊदला मिळत असून तो कराचीत राहत असल्याचा आरोप भारताने केला होता. पण दाऊद आणि त्याचं कुटुंब पाकिस्तानात नसल्याचं इस्लामाबादने अनेकदा म्हटलंय.
 
पाकिस्तान सरकारने देशातल्या 88 कट्टरतावादी नेते आणि संघटनांवर 22 ऑगस्ट 2020ला निर्बंध लादले. या यादीत दाऊद इब्राहिमचा समावेश करत पाकिस्तान सरकारने पहिल्यांदाच अप्रत्यक्षपणे का होईना दाऊद आपल्याच देशात असल्याचं स्वीकारलं.
दाऊद आजारी असल्याच्या, त्याचा मृत्यू झाल्याच्या वावड्याही अनेकदा उठल्या. पण दाऊद आणि त्याचं कुटुंब व्यवस्थित असल्याचं अनीस इब्राहिमने IANS वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.
 
दाऊद पाकिस्तानात असून त्याची मुलगी - माहरूखचा विवाह माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियांदादच्या मुलाशी झाल्याचाही द क्विंटच्या या बातमीत उल्लेख आहे. दाऊद आणि त्याच्या भावांनी डी कंपनीच्या मार्फत UAE आणि पाकिस्तानामध्ये लक्झरी हॉटेल्स आणि बांधकाम प्रकल्प सुरू केले असल्याचंही अनीसने या मुलाखतीदरम्यान मान्य केल्याचं या बातमीत म्हटलंय.
 
दाऊदच्या ठावठिकाण्याविषयी बोलताना लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार हुसैन झैदी यांनी 2019मध्ये क्विंटला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं, "दाऊद कुठे आहे, हे एजन्सीजना माहित आहे. अगदी कोणती गल्ली, कोणतं घर हे सगळं माहितेय. म्हणजे दाऊदचा मुलगा मोईन आता अगदी धार्मिक झाला असून त्याने मोठी दाढी ठेवली असल्याचं मला गुप्तचर यंत्रणेतल्या एकाने सांगितलं होतं.
 
जर तुम्हाला इतकं सगळं माहिती असेल, तुम्हाला दाऊद कुठे राहतोय ते माहिती आहे, त्याचा मुलगा काय करतोय ते माहिती आहे. त्याची मुलगी लंडनच्या कोणत्या कॉलेजात आहे, ते माहिती आहे. मग तुम्ही दाऊदला परत का आणत नाही? पण नंतर माझ्या लक्षात आलं, की त्यांना दाऊदला परत आणायचं नाहीये. त्याला परत आणण्यासाठीची राजकीय इच्छाशक्ती नाही.
 
दाऊदच्या बाबत अडचण अशी आहे की त्याला मुंबईत वा भारतात आणलं तर तर त्याच्याशी संबंध असणाऱ्या नेत्यांची वा राजकारण्यांविषयीची माहितीही उघड होईल. दाऊदचे या नेत्यांसोबतचे संबंध जाहीर होतील. त्यामुळे दाऊद परत न येणंच त्यांच्यासाठी सोयीचं आहे."
 
दाऊद आणि बॉलिवुड
बॉलिवुडला गुन्हेगारी विश्वाचं आकर्षण कायमच वाटत आलेलं आहे. गेली अनेक वर्षं बॉलिवुडच्या अनेक सिनेमांमधून हे गुन्हेगारी विश्व मोठ्या प्रमाणावर झळकलं.
 
कंपनी, शूटआऊट अॅट लोखंडवाला, शूटआऊट अॅट वडाला, वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई, ब्लॅक फ्रायडे अशा अनेक सिनेमांमधून मुंबईतल्या गुन्हेगारी विश्वाचं आणि दाऊद इब्राहिमचं चित्रण करण्यात आलंय.
 
1990 च्या दशकात दाऊद इब्राहिमने दुबईमध्ये दिलेल्या पार्ट्यांना बॉलिवुडच्या अनेक तारे - तारकांनी हजेरी लावली होती. याविषयीचे व्हीडिओजही पहायला मिळतात. आपण दाऊद इब्राहिमला दोनदा भेटल्याचं दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी त्यांच्या खुल्लम खुल्ला या आत्मचरित्रात म्हटलंय.
 
टी सीरिजच्या गुलशन कुमार यांच्या हत्येमागे अबू सालेम आणि पर्यायाने डी गँगचा हात असल्याचंही म्हटलं गेलं होतं, तर अभिनेता संजय दत्त याने 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटाशी संबंधित गुन्हासाठी शिक्षा भोगली. अबू सालेमने संजय दत्तच्या घरी जाऊन त्याला हत्यारं दिली अशी कबुली संजय दत्तने दिली होती.
 
दाऊद आणि क्रिकेट
शारजाच्या क्रिकेट स्टेडियममध्ये बॉक्समध्ये बसून सामना पाहणाऱ्या दाऊद इब्राहिमचा व्हीडिओ आहे. 1987मध्ये एका सामन्यादरम्यान दाऊद इब्राहिमने ड्रेसिंग रूममध्ये येत टीमच्या सदस्यांना टोयोटा कार देऊ केल्याचं दिलीप वेंगसरकर यांनी म्हटलं होतं. तर कपिल देव यांनी याच प्रसंगाविषयीची आठवण इंडिया टुडेला सांगितली होती.
 
खेळादरम्यान एक व्यक्ती प्लेयर्सशी बोलण्यासाठी ड्रेसिंग रूममध्ये आली. पण इथे बाहेरच्या व्यक्तींना येण्यास मनाई आहे, असं म्हणत आपण त्या व्यक्तीला जायला सांगितलं, त्या व्यक्तीने सगळं ऐकून घेतलं आणि काही न बोलता निघून गेली. ही व्यक्ती म्हणजे मुंबईचा दाऊद इब्राहिम नावाचा स्मगलर असल्याचं आपल्याला नंतर समजल्याचं कपिल देव यांनी म्हटलं होतं.
 
बीसीसीआयचे माजी सचिव जयवंत लेले यांच्या पुस्तकातही या घटनेचा उल्लेख आहे.
 
दाऊद आणि बातम्या
दाऊद इब्राहिम विषयीच्या बातम्या सतत चर्चेत असतात. खरंतर गेल्या अनेक वर्षांत दाऊदचा नवीन फोटोही समोर आलेला नाही, चित्रण उपलब्ध नाही किंवा गेल्या अनेक वर्षांत दाऊदचं कोणत्याही नवीन प्रकरणांत नाव आलेलं नाही. पण तरीही दाऊद इब्राहिम चर्चेत असतो.
 
याविषयी बोलताना मुंबई क्राईम रिपोर्टर असोसिएशनचे माजी अध्यक्ष सुधाकर काश्यप म्हणाले, " दाऊद बातम्यांमध्ये असतो कारण या बातम्या नॅशनल - इंटरनॅशनल असतात, भारतीय मीडियासाठी महत्त्वाच्या असतात आणि अशी बातमी आली की, इतर बातम्या बाजूला पडतात.
 
मुंबई पोलिसांनी 2002मध्ये मोक्का कायदा बनवल्यानंतर पुढच्या 10 वर्षांमध्ये सगळं गँगवॉर संपवलं. आता गँगवॉर राहिलेलं नाही. गँग्स आहेत पण गँगवॉर नाही. लोकंही आता घाबरत नाहीत. पण दाऊदची बातमी मात्र अधूनमधून येत असते. त्याचा कोणत्याही गुन्ह्याशी संबंध नसतो. गेल्या 10 - 15 वर्षांमध्ये कुठल्याही केसमध्ये दाऊदचं नाव आलेलं नाही.
 
2002-2003 ला सारा-सहारा प्रकरण झालं. त्यावेळी दाऊदचं नाव चर्चेत होतं. 93 ब्लास्टमध्ये दाऊद वाँटेड आरोपी होता. त्यानंतर कुठल्याही गुन्ह्यात दाऊदचं नाव आलेलं नाही. पण तरीही दर महिन्या - दोन महिन्याला दाऊदची बातमी येत असते."
 
2015 मध्ये मुंबईतल्या दाऊदच्या मालकीच्या 'दिल्ली जायका' रेस्टॉरंटची विक्री करण्यात आली, तेव्हाही दाऊद इब्राहिम चर्चेत होता.
 
दाऊदची मुलाखत - हुसैन झैदी
पत्रकार एस. हुसैन झैदी यांनी दाऊद इब्राहिमची फोनवरून मुलाखत घेतली होती. सप्टेंबर 1997 मध्ये इंडियन एक्स्प्रेसच्या पहिल्या पानावर ही मुलाखत छापण्यात आली.
 
बीबीसीला 2019 मध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये हा अनुभव सांगितला होता.
 
हुसैन झैदींनी म्हटलं होतं, " माझ्या काँटॅक्ट आणि सोर्सेमार्फत मी दाऊदशी संपर्क करायचा प्रयत्न करायला सुरुवात केली. दक्षिण मुंबईतल्या काहींचा दाऊदशी चांगला संपर्क होता. पण माझी गाठ घालून देण्याची त्यांची इच्छा नव्हती.
 
कारण त्यांनी तसं केलं असतं तर पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांना पकडण्याची, त्रास देण्याची शक्यता होती. म्हणूनच त्यांनी माझ्याकडून वचन घेतलं की ते मुलाखत ठरवून देतील पण त्यानंतर मी पुन्हा कधीही त्यांना संपर्क करायचा नाही. मी तयार झालो. पण मला वाईटही वाटत होतं, कारण हे लोक माझे चांगले सोर्सेस होते. त्यांनी मला अनेक बातम्या दिलेल्या होत्या.
 
पण दाऊदची मुलाखत मिळवण्यासाठी मी हे करायला तयार होतो. त्यांनी माझ्यातर्फे काही निरोप पाठवले. याच्या काही दिवसांनी मला पेजरवर निरोप आला. एका नंबरवर फोन करण्यास सांगण्यात आलं.
 
मी रिक्षात होतो. रिक्षातून उतरून मी कलिना भागातल्या एका रेस्टॉरंटमधून मी लोकल फोनबूथला फोन केला. आणि या लोकल फोनबूथने मला कराचीत दाऊदशी जोडलं. समोर फोनवर असणारी व्यक्ती अगदी सभ्यपणे बोलत होती. मी म्हटलं मला तुमच्याशी नाही, दाऊद इब्राहीमशी बोलायचं आहे. समोरून आवाज आला - मै दाऊद बोल रहा हू."
 
"मी तोपर्यंत ज्या गँगस्टर्सशी बोललो होतो त्यांचा अनुभव वेगळा होता. ते लोक चांगली - सुसंस्कृत भाषा बोलत नव्हते. त्यांच्या बोलण्यात शिव्या होत्या. पण दाऊद अतिशय नम्रपणे बोलत होता. त्याचं ऊर्दू अस्खलित होतं. माझ्याशी गँगस्टरऐवजी एखाद्या सोफिस्टिकेटेड बिझनेसमनसारखा तो बोलत होता.
 
पूर्ण मुलाखतभर तो 'जंटलमन'सारखा बोलला. या सगळ्या मुलाखतीदरम्यान माझ्या एका प्रश्नाने तो नाराज झाला. मी त्याच्या ड्रग्स व्यवहारांमधल्या सहभागाविषयी विचारलं. तो म्हणाला - मिस्टर झैदी, मला तुमच्याविषयी आदर आहे म्हणून मी तुम्हाला काही बोलणार नाही पण हा प्रश्न मला विचारण्याची इतर कोणाचीही हिंमत होणार नाही. मी ड्रग्जसंबंधीचे व्यवहार करत नाही."
 
"त्या संभाषणाने मी पूर्णपणे चकित झालो होतो. मी दाऊद इब्राहिमशी बोललो यावर क्षणभर माझा विश्वासही बसला नाही. त्याने गँगस्टरचा हा मुखवटा चढवलेला आहे की धंद्यासाठीची ही इमेज आहे, हे मला माहित नाही. यातला नेमका खरा दाऊद कोणता, हे मला माहित नाही."
 
एस. हुसैन झैदी यांनी दाऊद इब्राहिमवर लिहीलेल्या 'डोंगरी टू दुबई' या पुस्तकाच्या सुरुवातीला ही मुलाखत छापलेली आहे.
 
Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शहरी नक्षलवादी वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कायदेशीर नोटीस

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचे संकेत दिले

अफगाणिस्तानने सुपर 8 मध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला

‘RTE मधून प्रवेश मिळाला नाही, तर मुलाला घरीच बसवावं लागेल’, नेमकी कुठे रखडली प्रक्रिया?

NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहाराचा तपास शिक्षण मंत्रालयाने सीबीआयकडे सोपवला

सर्व पहा

नवीन

इस्रायलच्या लष्करानं पॅलेस्टिनी नागरिकाला जीपच्या बोनेटवर बांधले, IDF ने दिला दुजोरा

International Olympic Day 2024 का साजरा करतात, इतिहास जाणून घ्या

ISRO: इस्रोचा आणखी एक विक्रम,पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण वाहन पुष्पकची यशस्वी लँडिंग

प्रज्ज्वल रेवण्णाचा भाऊ सूरजला अटक,लैंगिक शोषणाचा आरोप

IND vs BAN : भारताने बांगलादेशचा 50 धावांनी पराभव केला,उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित

पुढील लेख
Show comments