Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रशियाच्या वॅग्नर गटाच्या सैनिकांना बंडाविषयी आधीपासून माहिती होतं का?

Webdunia
सोमवार, 24 जुलै 2023 (22:38 IST)
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या सत्तेलाच आव्हान देणाऱ्या वॅग्नर गटातील एका सैनिकाने सांगितलं की, त्याला आणि त्याच्यासोबतच्या सहकारी सैनिकांना नेमकं काय घडतंय हे माहिती नव्हतं.
 
वॅग्नर गटाचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांनी 24 तासांच्या आत बंड करत आपल्या सैनिकांना रोस्तोव्ह या दक्षिण रशियन शहरात पाठवलं. आणि मॉस्कोच्या दिशेने कूच केली.
 
वॅग्नर गटाचे सैनिक माध्यमांशी संपर्क ठेवत नाहीत. पण बंडाच्या वेळी उपस्थित असणाऱ्या वॅग्नर गटातील एका कनिष्ठ कमांडरशी संपर्क साधण्यात बीबीसी रशियन सेवेला यश आलं.
 
पूर्व युक्रेनमधील बाखमुत या शहरात झालेल्या लढाईत ग्लेब सहभागी होता. ग्लेब हे त्याचं खरं नाव नाही. नाव न जाहीर करण्याच्या अटीवर त्याने ही माहिती दिली.
 
जेव्हा बंड सुरू झालं तेव्हा तो त्याच्या युनिट सोबत रशिया-व्याप्त लुहान्स्क प्रदेशातील बॅरेक्समध्ये आराम करत होता.
 
23 जूनच्या सकाळी त्यांना एक फोन कॉल आला. त्यानुसार युक्रेन मधून जाणाऱ्या वॅग्नर गटाच्या सैनिकांसोबत जाण्याचे आदेश देण्यात आले.
 
हा आदेश वॅग्नर गटाच्या कमांडरने दिला होता. सुरक्षेच्या कारणास्तव ग्लेबला त्याचं खरं नाव उघड करायचं नाही. हा कमांडर प्रिगोझिन आणि वॅग्नर कमांडर कौन्सिलच्या आदेशानुसार काम करत होता.
 
ग्लेबला सांगण्यात आलं की, "आपल्याला एकेठिकाणी तैनात व्हायचं आहे. आपण मोर्चा बनवतो आहे, त्यामुळे निघुया."
 
ग्लेबच्या म्हणण्यानुसार, हा मोर्चा कुठे जाणार आहे हे कोणालाच सांगितलं गेलं नव्हतं. पण युद्ध सोडून ते दुसऱ्या मोर्चावर चालल्याचं बघून ग्लेबला आश्चर्य वाटलं.
 
तो सांगतो, जेव्हा वॅग्नरच्या लढाऊ सैनिकांनी रशियन सीमा ओलांडून रोस्तोव्ह प्रदेशात प्रवेश केला तेव्हा त्यांना कोणत्याही विरोधाचा सामना करावा लागला नाही.
 
तो सांगतो, "मला सीमेवर एकही सैनिक दिसला नाही. पण रस्त्यात असणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांनी आम्हाला सलाम केला."
 
वॅग्नर गटाशी जवळचे संबंध असलेल्या टेलिग्राम चॅनेलने नंतर सांगितलं की, बुगायेव्का चेकपॉईंटवरील सुरक्षा सैनिकांनी वॅग्नर गटाच्या सैनिकांना पाहून आपली हत्यारं टाकली.
 
असा घेतला इमारतींचा ताबा
या चॅनेल्सवर केवळ एकच फोटो शेअर करण्यात आला होता, ज्यात
 
लष्कराचा गणवेश घातलेले दोन डझन लोक दिसत होते. त्यांच्या हातात शस्त्र नव्हती. सैनिकांचा हा ताफा रोस्तोव्ह ऑन डॉनच्या दिशेने जात होता तेव्हा त्यांना शहरातील सर्व सरकारी संस्थांच्या इमारतींना वेढा घालण्याचे आणि लष्करी विमानतळाचा ताबा घेण्याचे आदेश देण्यात आले.
 
ग्लेबच्या युनिटला रशियाच्या फेडरल इन्व्हेस्टिगेटिव्ह सर्व्हिसच्या प्रादेशिक कार्यालयाचा ताबा घेण्याचे आदेश देण्यात आले होते. जेव्हा ते इमारती जवळ पोहोचले तेव्हा ती पूर्णपणे रिकामी होती आणि तिला कुलूप लावलं होतं.
 
लोक कुठे गेले हे जाणून घेण्यासाठी त्यांनी हवेत ड्रोन उडवलं. अर्ध्या तासाने इमारतीचा दरवाजा उघडला आणि दोघेजण रस्त्यावर आले.
 
ग्लेब सांगतो, "ते लोक म्हणाले, चला एक व्यवहार करुया. यावर मी म्हणालो, कसला व्यवहार, हे आमचं शहर आहे."
 
"आम्ही एकमेकांना त्रास न देण्याचं मान्य केलं. ते लोक अधून मधून सिगारेट ओढण्यासाठी बाहेर यायचे."
 
रोस्तोव्ह शहरातील अनेक इमारतींभोवती अशीच परिस्थिती असल्याची नोंद पत्रकारांनी केली होती.
 
वॅग्नर गटाच्या सैनिकांनी प्रथम इमारतींवर ड्रोन उडवले, परिस्थितीचा अंदाज घेतला आणि नंतर इमारतींना वेढा दिला. कोणालाही बाहेर ये जा करण्याची परवानगी नव्हती. पण जे लोक अन्न घेऊन येत होते त्यांना आतमध्ये जाण्याची परवानगी होती.
 
हे सगळं घडत असताना वॅग्नर गटाचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन रशियन सैन्याच्या दक्षिण लष्करी जिल्हा मुख्यालयात होते. तिथे त्यांनी रशियाचे उपसंरक्षण मंत्री, लेफ्टनंट जनरल युनूस बेक येवकुरोव्ह आणि जनरल स्टाफचे डेप्युटी चीफ, लेफ्टनंट जनरल व्लादिमीर अलेक्सेयेव यांची भेट घेतली
 
युक्रेनविरुद्धच्या युद्धात सैन्याचं नेतृत्त्व करणारे संरक्षणमंत्री सर्गेई शोइगु आणि सैन्याचे चीफ ऑफ स्टाप व्हॅलेरी गेरासिमोव्ह यांना वॅग्नर गटाचं बंड म्हणजे थेट आव्हान मानलं जातं.
 
प्रीगोझिन यांनी चीफ ऑफ स्टाफ व्हॅलेरी गेरासिमोव्ह आणि संरक्षण मंत्री सर्गेई शोइगु यांच्या भेटीची मागणी केली. प्रिगोझिन या बैठका घेत असताना वॅग्नर सैनिकांचा आणखी एक मोर्चा पुढे सरकत होता.
 
नेमकं काय घडतंय याची बातमी टेलिग्रामवरून मिळत होती
ग्लेबने सांगितलं की, या मोर्चाचं नेतृत्व वॅग्नर गटाचे संस्थापक दिमित्री उत्किन करत होते. माध्यमांमध्ये देखील याच बातम्या आल्या होत्या. दिमित्री हे रशियन स्पेशल फोर्सेसचे माजी अधिकारी आहेत आणि क्वचितच सार्वजनिक ठिकाणी दिसतात.
 
ग्लेबने सांगितलं की, हा मोर्चा महामार्गावर होता आणि व्होरोनेझच्या दिशेने जात होता. थोडक्यात तो मॉस्कोच्या दिशेने कूच करत होता.
 
त्यामुळे प्रीगोझिन यांच्या मनात नेमकं काय आहे, ते पुढे काय करणार याचा अंदाज लागला होता.
 
त्याने अगदी शपथ घेऊन सांगितलं की त्याला याची अजिबात कल्पना नव्हती.
 
"काय घडतंय याची माहिती तुम्हाला जशी टेलीग्रामवरून मिळाली, तशीच आम्हाला देखील टेलीग्रामवरूनच मिळाली."
 
जसजसा दिवस सरत गेला तसतसे रोस्तोव्हमध्ये काय घडतंय याचे फोटो जगभर दाखवले जाऊ लागले. शहरावर नियंत्रण ठेवणाऱ्या वॅग्नर गटाच्या सैनिकांसोबत स्थानिक लोक आणि स्थानिक पत्रकार बोलत होते, हसत होते हे पाहून लोकांना आश्चर्य वाटलं. वॅग्नर गटाचे सैनिक सहसा शांत असतात.
 
ग्लेब सांगतो, "हे सर्व कैदी होते." वॅग्नर गटातील सैनिक हे पूर्वी कैदी होते. त्यानंतर ते वॅग्नर गटाचे भाडोत्री सैनिक बनले.
 
ग्लेबने सांगितलं, "लोकांशी बोलू नका असं त्यांना कोणी सांगितलंच नाही. त्यामुळे कोणाला त्याची पर्वा नव्हती."
 
ग्लेब हा वॅग्नर गटाचा कायमचा सदस्य आहे आणि युक्रेनचं युद्ध सुरू होण्याच्या खूप आधीपासून तो या गटात काम करतोय. त्याच्यासाठी नियम अगदी स्पष्ट आहेत.
 
त्याने बीबीसीशी बोलताना सांगितलं की, काही महिन्यांपूर्वी त्याच्या वरिष्ठ कमांडरने स्पष्ट सांगितलं होतं की जो सैनिक माध्यमांशी बोलताना दिसेल त्याला मृत्यूदंड दिला जाईल.
 
वॅग्नर गटाच्या इतर अनेक माजी सैनिकांनी देखील आम्हाला हेच सांगितलं होतं.
 
24 जूनच्या संध्याकाळी ग्लेबला त्याच्या एका वरिष्ठाने फोन केला आणि युनिटसह लुहान्स्कमधील लष्करी तळावर परतण्याचे आदेश दिले.
 
जेव्हा तो परत आपल्या बरॅकच्या दिशेने जात होता तेव्हा टेलिग्रामवर येणाऱ्या बातम्यांमधून माहिती घेत होता.
 
त्यावेळी त्याला कळलं की प्रीगोझिन विरोधात फौजदारी आरोप लावण्यात आले होते. त्यानंतर प्रीगोझिन बेलारूसला गेल्याची बातमी वाचली.
 
त्यानंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी म्हटलं की, वॅग्नर गटाच्या सैनिकांना त्यांच्या लढाऊ क्षमतेमुळे या घटनेला जबाबदार धरलं जाणार नाही.
 
ग्लेब आणि त्याच्या युनिटचं भविष्य अस्पष्ट आहे. त्यांना लुहान्स्क येथील त्यांच्या बरॅकमध्येच राहायला सांगितलंय.
 
सध्या ते पूर्व युक्रेनमध्ये रशिया समर्थक असलेल्या फुटीरतावाद्यांसोबत आहेत.
 
ग्लेन सांगतो की, आमचं भविष्य आणि आमच्या शस्त्रास्त्रांचं पुढे काय होणार हे जाणून घेण्याची मला इच्छा आहे.
 
तू अजून वॅग्नर गट का सोडला नाहीस असं जेव्हा त्याला विचारलं तेव्हा त्याने अतिशय सरळ उत्तर दिलं की, 'माझा करार अजून संपलेला नाही.'

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळी 11 वाजता राजभवनात पोहोचणार

LIVE: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज राज्यपालांकडे सुपूर्द करणार राजीनामा

मेहकरमध्ये दोन गटात हाणामारी, 23 जणांवर गुन्हा दाखल

नागपुरात नव्या सरकारच्या स्वागताची तयारी सुरू, उपराजधानी हिवाळी अधिवेशनासाठी सज्ज झाली

नागपूर मध्ये एका व्यक्तीने एका वृद्ध महिलेवर केला हल्ला

पुढील लेख
Show comments