Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डॉक्टर डेथ : टाईपरायटरवर खोटं मृत्युपत्र तयार केलं, एक चूक झाली आणि पकडला गेला 215 जणांचा खूनी

Webdunia
शनिवार, 23 डिसेंबर 2023 (20:41 IST)
तो अतिशय हुशार होता, डॉक्टर होता आणि म्हणूनच आपण शेकडो जणांचा खून करून सहीसलामत सुटू शकतो याची त्याला खात्रीच होती. पोलिसांनी पकडलं तेव्हाही त्याचा उद्धटपणा कमी झाला नाही.
तो म्हणायचा, “लोक अचानक मरतात, म्हातारी माणसं तर नक्कीच, एकदिवस त्यांचं आयुष्य संपतं.” आपण चूक केलीच नाही यावर तो ठाम होता, आणि म्हणूनच पोलीस आपलं काही वाकडं करू शकत नाही हेही त्याला ठामपणे वाटत होतं, पण एक चूक सापडली...
 
ब्रिटनच्या इतिहासातला सर्वात मोठा सीरियल किलर पकडला गेला त्याची सुरुवात झाली एका फोनपासून. मँचेस्टर भागातलं एक लहानसं गाव हाईड. त्याची लोकसंख्या असेल फार फार तर 30 हजार.
 
1988 च्या ऑगस्ट महिन्यात हाईडच्या माजी महापौर कॅथलीन ग्रंडी वयाच्या 81 व्या वर्षी वारल्या, अचानक. म्हणजे 81 हे जाण्याचंच वय, त्यामुळे कोणाला संशयही आला नसता. पण त्यांच्या वकील असलेल्या मुलीला त्यांच्या मृत्युपत्रात काहीतरी गडबड जाणवली.
 
मृत्युपत्रात असं लिहिलं होतं की, ‘मी माझं घर माझे डॉक्टर हॅरोल्ड फ्रेडरिक शीपमन यांच्या नावे करते आहे.’ कॅथलीन यांच्या मुलीचं म्हणणं होतं की हे मृत्युपत्र माझ्या आईने लिहिलेलंच नाही. कारण तिची दोन घरं आहेत, जर डॉक्टरला तिला आपली संपत्ती द्यायची असती तर दोन्ही घरं दिली असती आणि समजा एक दिलं असतं तरी दुसऱ्या घराचा या मृत्युपत्रात उल्लेखच नाहीये.
 
म्हणजेच हे मृत्युपत्र कोणातरी अशा माणसाने लिहिलं आहे ज्याला हे माहितच नव्हतं की कॅथलीन ग्रंडी यांची दोन घरं आहेत.
 
यानंतर एका महिन्याने, 7 सप्टेंबर 1988 ला हेरॉल्ड शीपमन यांना अटक झाली. जो तपास एका खूनाचा आहे असं अधिकाऱ्यांना वाटलं होतं तो तब्बल दोनशेहून अधिक खूनांचा निघाला. ही त्याचीच गोष्ट.
 
आधी म्हटल्याप्रमाणे हाईड गावाची लोकसंख्या होती 30 हजार आणि त्यापैकी तब्बल 3000 लोक एकट्या हेरॉल्डचे पेशंट होते.
 
पण कुठेतरी पाणी मुरत होतं आणि ही गोष्ट सर्वात आधी लक्षात आली, अॅलन मेसी यांच्या. ते फ्युनरल डिरेक्टर होते, म्हणजे त्यांच्याकडे मृतांवर अंतिम संस्कार केले जायचे.
 
अॅलन यांची मुलगी डेबी त्यांना म्हणाली होती की डॉ हॅरोल्ड यांच्या पेशंटचा मृत्युदर फारच जास्त आहे, आणि दुसरी त्याहून गंभीर बाब म्हणजे यापैकी बहुतांश मृत व्यक्ती महिला आहेत.
 
आधी तर या गोष्टीला काय प्रतिक्रिया द्यावी हे अॅलन यांना कळलं नाही, कारण डॉ. हेरॉल्डला त्या लहानशा गावात खूप मानसन्मान होता. लोक त्याचा फार आदर करायचे. अशा माणसावर आपण भलते सलते आरोप कसे करायचे या चिंतेने त्यांना ग्रासलं.
पण तरीही ते मनाचा हिय्या करून हेरॉल्डला भेटायला गेले आणि त्यांना विचारलं की नक्की काय घडतंय? यावर हेरॉल्डने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. तो शांत बसून राहिला, काही क्षणांनी उठला आणि कपाटातून फायलींचं बाड काढून अॅलनसमोर ठेवलं आणि म्हणाला, “या रजिस्टर्समध्ये सगळी माहिती आहे, ज्याला कोणाला तपासून पाहायचं असेल ते पाहू शकतात.”
 
कॅथलीन ग्रंडी यांच्या मुलीने मृत्युपत्राविषयी तक्रार करण्याच्या चार महिने आधी घडलेला हा प्रसंग.
 
हेरॉल्डच्या बळींमध्ये जास्तीत जास्त वृद्ध महिला होत्या. त्यांच्या मृत सापडण्यामागेही काहीतरी गूढ होतं. त्या मृतावस्थेत सापडल्या तेव्हा त्यांनी नीटनेटके कपडे घातलेले असायचे, त्या सहसा खुर्चीत बसलेल्या आढळून यायच्या.
 
भले त्या म्हाताऱ्या असतील. पण ज्यामुळे जीव गेला अशा आजाराची किंवा त्रासाची लक्षणं त्यांच्यात दिसून यायची नाहीत.
 
हेरॉल्ड इतक्या सहजासहजी इतके खून करून अनेक वर्षं कोणाच्या हाती लागला नाही याचं एक कारण त्याच्या बळी एकाकी म्हाताऱ्या, म्हातारे होते हेही आहे.
 
इतर कोणी वेळ देत नसताना, स्वतःची मुलं दूरदेशी असताना हा डॉक्टर त्यांना वेळ द्यायचा, त्यांच्याशी गप्पा मारायचा, त्यांच्या भावना जाणून घ्यायचा, आणि अनेकदा त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांच्या घरी जायचा. ही वृद्ध मंडळी आपल्या मनातलं सगळं त्याला बोलून दाखवायची.
 
त्याच्या अशा वागण्यामुळे तो हाईडमध्ये प्रसिद्ध झाला नसता तर नवलच.
तो जेव्हा त्यांच्या घरी जायचा तेव्हा त्याला त्यांच्या परिस्थिती जास्त चांगल्या प्रकारे कळायची. कोण किती एकटं आहे, कोणाची संपत्ती किती, कोणाकडे त्यांच्या मुलांचं लक्ष आहे, कोणाच्या आरोग्याची विचारपूस त्यांची मुलं, नातेवाईक नियमितपणे करतात, कोण एकटं राहातं कोण नाही, हे सगळं त्याला नीट माहिती असायचं.
 
काही काही वृद्धांनी तर आपल्या घराची चावीही त्याला देऊन ठेवलेली असायची.
 
यावरच तो कोणाचा खून करायचा ते ठरवायचा.
 
‘काहीतरी चुकतंय’
हेरॉल्ड हाईडमधल्या डॉनीब्रुक मेडिकल सेंटरमध्ये डॉक्टर होता. त्याआधी एका ठिकाणहून त्याला काढून टाकलं होतं, पण त्याकडे नंतर येऊ.
 
साधारण 1976 च्या सुमारास तो इथे काम करायला आला. पुढच्या 10 वर्षांत त्याच्या अनेक वृद्ध पेशंटचा जीव गेला होता. पण म्हातारेच ते, कधी ना कधी जायचेच या न्यायाने त्याकडे कोणी लक्ष दिलं नाही.
 
हेरॉल्ड डॉनीब्रुक हॉस्पिटलमध्ये काम करायला लागून 12 वर्षं झाली होती. 1989 मध्ये अशाच एका वृद्ध पेशंटचा मृत्यू झाला. त्याचं नाव होतं जोसेफ विलकॉक्स. ते 62 वर्षांचे होते. त्यांच्या पायाला मोठी इजा झाली होती आणि इतरही अनेक आजार होते.
 
त्यामुळे या पेशंटच्या घरी रोज एक नर्स चक्कर मारून जायची. 6 नोव्हेंबर नेहमीसारखी एक नर्स दुपारी आली, तेव्हा तिला दिसलं की विलकॉक्सचा मृत्यू झाला आहे. जोसेफ खुर्चीत बसले होते, त्यांनी नीटनेटके कपडे घातले होते आणि त्यांचं शरीर पूर्ण थंडही झालं नव्हतं.
 
नर्सने त्यादिवशी हॉस्पिटलच्या कॉम्प्युटरमध्ये पाहिलं होतं की त्या दिवशी सकाळी डॉ. हेरॉल्ड जोसेफ यांच्या घरी तपासायला येणार होता. तिने हेरॉल्डाला फोन केला आणि म्हणाली की या रुग्णाचा मृत्यू झाला आहे, तुम्ही सकाळी आलात तेव्हा तुम्हाला काही जाणवलं होतं का?
 
पण हेरॉल्डने थेट नकार दिला. मी त्या रुग्णाच्या घरी गेलोच नव्हतो, इतकंच नाही तर माझी व्हीजिट आजच्या दिवशी ठरलीच नव्हती असं तो म्हणायला लागला. नर्सला खात्री होती की तिने सकाळी कॉम्प्युटर तपासला तेव्हा त्यात हेरॉल्डची व्हीजिट ठरलेली होती, पण मग कुठे गल्लत झाली? यावरून हेरॉल्ड आणि त्या नर्समध्ये वादही झाला.
 
पण हॉस्पिटलमध्ये परत आल्यावर रेकॉर्ड चेक केल्यावर दिसलं की हेरॉल्ड खरं सांगत होता, त्याची व्हीजिट ठरलेली नव्हती.
 
नर्सला मात्र तेव्हाच वाटायला लागलं की, ‘काहीतरी चुकतंय’. तिने वरिष्ठांकडे तक्रार केली. दवाखान्यातले इतर डॉक्टर आणि स्टाफ आधीच डॉ. हेरॉल्डच्या सतत मरणाऱ्या रुग्णांवरून आपआपसात कुजबुजत होते. त्यामुळे हेरॉल्डने चारच वर्षांच डॉनीब्रुक हॉस्पिटल सोडलं आणि हाईड शहरातच स्वतःच हॉस्पिटल काढलं.
 
हेरॉल्ड इतका प्रसिद्ध होता की त्याने स्वतःचं हॉस्पिटल काढलं म्हटल्यावर त्याच्याकडे पेशंटची, विशेषतः वृद्ध पेशंटची रांग लागली.
 
एक इंजेक्शन आणि संपला खेळ
एका बाजूला हेरॉल्डचे पेशंट मरत होते, पण काही लोकांना संशय यायला लागला. हाईडच्या आणखी एका हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉ लिंडा रेनॉल्डस आणि राज पटेल यांनी पोलिसांना विनंती केली की या प्रकरणात लक्ष घाला.
 
त्यांना संशय यायचं कारण होतं हेरॉल्डच्या अनेक मृत पेशंटचं दहन केलं जात होतं. त्यासाठी नातेवाईक अर्ज करत होते. आता हे लक्षात घेतलं पाहिजे की ख्रिश्चन धर्मात सहसा मृतदेहांचं दहन केलं जात नाही, तर दफन केलं जातं. त्यातही ऐंशीच्या दशकात, मँचेस्टरमधल्या एका लहानशा गावात त्याचं प्रमाण फारसं नव्हतं.
 
तरी हेरॉल्डच्या मृत पावलेल्या पेशंटचं दहन होण्याचं प्रमाण फार जास्त होतं.
 
तिथल्या नियमांप्रमाणे जर एखाद्या मृतदेहाचं दहन करायचं असेल तर दोन डॉक्टरांची अर्जावर सही लागायची. एक सही हेरॉल्ड करायचा तर एका सहीसाठी वेगवेगळे डॉक्टर गाठायचा.
 
यातूनच डॉ. लिंडा रेनॉल्डस यांना संशय आला कदाचित हेरॉल्ड आपल्या पेशंटचा खून करत असावा. पण कसा?
 
त्यासाठी थोडं मागे जाऊन हेरॉल्डचं बालपण आणि तरुणपण समजून घेऊ.
 
हेरॉल्ड एका गरीब घरात वाढला, त्याचे वडील ट्रक ड्रायव्हर होते तर आई गृहिणी. आईचा त्याच्यावर खूप प्रभाव होता. आईची एकच शिकवण होती की या गरिबीतून बाहेर पडायचं असेल तर खूप शिका. हेरॉल्डने ते मनावर घेतलं होतं.
 
पण शाळेत असताना त्याच्या आईला कॅन्सल झाला. साठच्या दशकात कॅन्सरवर फारसे परिणामकारक उपचार उपलब्ध नव्हते, त्यामुळे त्यावेळी त्याच्या आईला वेदना कमी व्हाव्या म्हणून डॉक्टर्स पेनकिलर्स आणि मॉर्फिनचं इंजेक्शन द्यायचे.
 
याच मॉर्फिनच्या इंजेक्शनबद्दल हेरॉल्डचं कुतुहल वाढलं.
 
त्यालाही पेनकिलर्समुळे येणाऱ्या नशेची सवय लागली. तो आईची औषधं नशेसाठी घ्यायला लागला.
 
आईचा मृत्यू झाल्यानंतर त्याने मेडिकल स्कुलमध्ये प्रवेश घेतला. याच काळात त्याचं लग्न झालं. त्याचं व्यसन वाढत होतं.
 
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने एका हॉस्पिटलमध्ये काम करायला सुरुवात केली. पण त्याचं व्यसन त्याला शांत बसू देईना. या पहिल्या हॉस्पिटलमध्ये त्याची नेमणूक कनिष्ठ कर्मचारी म्हणून झाली होती त्यामुळे त्याला काहीच करता येत नव्हतं.
 
त्याने काही काळात हे हॉस्पिटल सोडलं आणि टॉडमॉर्डन या लहानशा गावातल्या एब्राम मेडिकल प्रॅक्टिस या हॉस्पिटलमध्ये रुजू झाला. त्याला इथे स्वातंत्र्य होतं, त्याच्यावर लक्ष ठेवणारं कोणी नव्हतं. त्याने आपल्या व्यसनासाठी एक खेळ सुरू केला.
 
तो आपल्या पेशंटला जास्तीची पेनकिलर्स इंजेक्शन लिहून द्यायचा आणि उरलेली स्वतः वापरायचा. पण दोन वर्षांता त्याचा खेळ उघडकीला आला. तो अॅडिक्ट आहे हे हॉस्पिटल प्रशासनाच्या लक्षात आलं आणि त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं.
 
खरंतर त्याचं मेडिकल लायसन्स रद्द व्हायचं पण तसं न होता त्याला 600 पाऊंडचा दंड भरावा लागला आणि व्यसनमुक्ती केंद्रात जावं लागलं.
 
तिथून बाहेर आल्यानंतर तो हाईडला आला आणि त्याने तिथे आपलं बस्तान बसवलं. पण तरीही त्याचा स्वभाव बदलला नव्हता. उलट त्याला आणखी एक नशा हवीहवीशी झाली. लोकांचा खून करण्याची.
 
त्याचा रस्ता त्याला लहानपणीच सापडला होता, मॉर्फिनचं इंजेक्शन.
 
तो आपल्या वृद्ध आणि एकाकी पेशंटच्या घरी जायचा. बरं, होम व्हीजिटमध्ये काही वावगं नव्हतं, उलट म्हाताऱ्या लोकांना दवाखान्यात यायचा त्रास होऊ नये म्हणून डॉक्टर स्वतः त्यांना घरी भेटायला जात आहे हे पासून हेरॉल्डचं कौतुकच व्हायचं.
 
पेशंट त्याने आधीच हेरून ठेवलेले असायचे. त्यांच्या घरी गेला की तो त्यांच्याशी गप्पा मारायचा. डॉक्टर येणार म्हणून पेशंटही, यात बहुतांश महिलाच होता, नीटनेटके कपडे घालून त्यांची वाट पाहात असायच्या.
 
हेरॉल्ड सोडून त्यांना नियमित भेटणारं कोणी नव्हतं. तो आला की त्याच्याशी गप्पा मारायचा. प्रत्येकीची प्रकृतीची काही ना काही तक्रार असायचीच. त्यावर उपाय म्हणून एक इंजेक्शन देतो असं हेरॉल्ड म्हणायचा. ही वृद्ध मंडळी, ज्यात महिलाच जास्त होत्या, सोफ्यावर किंवा खुर्चीत बसायची. हेरॉल्ड त्यांनी मॉर्फिनचं इंजेक्शन द्यायचा. त्याने हळूहळू गुंगी येत हृदयाचे ठोके मंदावायचे आणि त्यातच त्यांचा जीव जायचा.
 
27 वर्षांच्या आपल्या कारकिर्दीत अशा साधारण 215 ते 250 जणांचा हेरॉल्डने जीव घेतल्याचा पोलिसांचा कयास आहे.
 
अखेरचा धागा
हेरॉल्डचे पेशंट कधी एका आठवड्यात तीन तीन मरायचे, तर कधी दोन-तीन महिने एकाही मृत्यू व्हायचा नाही. पण त्याचे पेशंट इतरांच्या तुलनेत जास्त मरत होते हे खरं. तरीही जवळपास तीन दशकं कोणालाच संशय आला नाही?
 
हा खूनी इतकी वर्षं कसा पकडला गेला नाही?
 
खरं सांगायचं तर अध्येमध्ये कोणाकोणाला संशय येत राहीला पण हेरॉल्डचं नावच इतकं मोठं होतं की कोणी त्याविरोधात बोलू धजलं नाही.
 
बरं असंही नाही की हा माणूस सत्ताधारी होता, गुंड होता म्हणून लोक घाबरत होते. हेरॉल्डची प्रतिमा एक चांगला, मनमिळावू, कुटुंबवत्सल, पेशंटची काळजी घेणारा डॉक्टर अशी होती.
 
हो, त्याच्या काही सवयी विचित्र होत्या, तो एखादं वेळेस मध्येच चिडायचा, तरुणपणी त्याला औषधांच्या नशेचं व्यसन होतं, किंवा त्याच्या पेशंटच्या घरी जाण्याची किंवा त्यांच्या रक्ताचं सँपल घेण्याची कोणाला परवानगी नव्हती, त्याला प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवायचं असायचं, पण असे स्वभावविशेष प्रत्येकाचेच असतात, म्हणून कोणी चांगल्या, सुस्वभावी डॉक्टरांवर खूनाचा आरोप करत नाही.
म्हणून डॉ. लिंडा रेनॉल्डस पहिल्यांदा जेव्हा पोलिसांकडे गेल्या तेव्हा त्यांनाही याबाबतीत फारसं तथ्य वाटलं नाही. त्यांनी रेकॉर्डस तपासले तर त्यातही सगळं व्यवस्थित होतं. मग अशा माणसाला चौकशीसाठी ताब्यात घेऊन लोकांचा रोष कशाला पत्कारावा असं त्यांना वाटलं.
 
प्लॅनिंग एकदम नीट केलं होतं हेरॉल्डने. त्याच्यावर वारंवार संशय व्यक्त होतोय हे त्याला 27 वर्षांत कळलं होतं, पण तरी तो कोणाच्या हाती लागत नव्हता.
 
त्याने केलेला प्रत्येक खून हा वयामानाने झालेला मृत्यू म्हणून खपून जात होता. यात तर खरं 49 वर्षीय महिलेचाही समावेश होता. आता 49 व्या वर्षी जर कोणताही मोठा आजार नसेल तर बसल्या बसल्या कोणाचंही हृदय असंच बंद पडत नाही ना!
 
पण ही महिला अगदीच एकटी होती, नैराश्याने तिला ग्रासलं होतं. तिचा मृत्यू झाला हेही तिच्यासोबत काम करणाऱ्या मानसिक आरोग्य स्वयंसेविकेने इतरांना सांगितलं. अनेकांना वाटलं तिने आत्महत्या केली आणि ती केसही तिथेच थांबली.
 
कदाचित अशा घटनांमुळे ‘मला कोणी पकडू शकत नाही’ अशी भावना हेरॉल्डच्या मनात उत्पन्न झाली. त्याला जणूकाही याचा माजच होता आणि यातच त्याने एक चूक केली.
 
कॅथलीन ग्रंडी. वरती म्हटल्याप्रमाणे त्याने कॅथलीन ग्रंडी यांचं खोटं मृत्युपत्र तयार केलं. ते त्यांच्या वकील असलेल्या मुलीच्या लक्षात आलं.
 
तिने याविरोधात तक्रार केली. आधी म्हटल्या प्रमाणे कॅथलीन यांची दोन घरं होती आणि या मृत्युपत्रात एकाच घराचा उल्लेख होता त्यामुळे मुलीचा संशय आणखी बळावला.
 
त्यामुळे संपत्तीसाठी या आईचा खून झाला असावा अशी शंका तिने व्यक्त केली.
 
ही हेरॉल्डची पहिली चूक होती. आता सबळ पुरावा असल्याने त्याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं. तेव्हाही तो निर्धास्त होता.
 
त्याच्या उलटतपासणीचे व्हीडिओ यूट्युबवर उपलब्ध आहेत. त्यातून त्याच्या बेफिकिर दृष्टीकोनाची कल्पना येते.
 
त्यातही प्रश्न विचारणाऱ्या अधिकाऱ्यांना तो वैद्यकीय गोष्टी समजावून सांगताना दिसतो आणि कसं कॅथलीन यांचा मृत्यू वृद्धापकाळाने झाला हेही सांगतो.
 
पण कॅथलीन यांचं मृत्युपत्र टाईपरायटरवर टाईप केलं होतं आणि त्यामुळे पोलिसांनी हेरॉल्डचा टाईपरायटर ताब्यात घेतला. त्याची चाचणी करण्यात आली. ही हॅरोल्डची दुसरी चूक होती.
 
त्या टाईपरायटरवर की अक्षर स्पष्ट उमटत नव्हतं. कॅथलीनच्या मृत्युपत्रातही असंच दिसलं त्यामुळे ज्या टाईपरायटरवर हे खोटं मृत्युपत्र टाईप केलं तो हॅरोल्डचाच असल्याचं सिद्ध झालं.
 
पण तरीही हेरॉल्ड डगमगला नाही. त्याने म्हटलं की मी माझा टाईपरायटर कधी कधी श्रीमती ग्रंडी यांना द्यायचो, त्यांना काही टाईप करायचं असेल तर.
 
तो आपलं म्हणणं रेटत होता, ते मृत्युपत्र खोटं आहे हे मला माहीत नाही, मला त्याबद्दल काही माहीत नाही, ग्रंडीच्या मृत्यूबद्दल मला काही माहीत नाही. पण त्या माझा टाईपरायटर वापरायच्या.
 
पोलिसांना आणखी पुराव्यांची गरज होती.
 
कॅथलीन ग्रंडी यांच्या डेथ सर्टिफिकेटवर हॅरोल्डचीच सही होती. त्यात लिहिलं होतं की त्यांचा मृत्यू वृद्धापकाळाने झाला आहे.
 
भले त्यांचं वय 80 पेक्षा जास्त होतं, पण त्यांची प्रकृती चांगली होती, त्यांना अचानक असं मरण येईल अशी शक्यता नाही असं त्यांच्या मुलीचं, अँजेलाचं म्हणणं पडलं.
 
शेवटी त्यांचा दफन केलेला मृतदेह परत उकरून काढून त्यांचं पोस्ट मॉर्टेम करण्याची परवानगी त्यांच्या मुलीने, अँजेलाने दिली.
 
त्याचा मृतदेह उकरून काढण्यात आला, पोस्ट मॉर्टेम केल्यानंतर लक्षात आलं की त्यांना डायमॉर्फिनचा जीवघेणा डोस देण्यात आला होता.
हे डायमॉर्फिन एका डॉक्टरकडेच असू शकतं. पण तरीही हेरॉल्डने म्हटलं की याबाबतीत मला काहीही माहिती नाही. त्याने हेही ठसवायचा प्रयत्न केला की कॅथलीन ग्रंडी यांनी डायमॉर्फिनचा ओव्हरडोस घेऊन आत्महत्या केली असावी. अजूनही म्हणावा तसा सबळ पुरावा हाती लागत नव्हता आणि तपासही एकाच खुनापुरता मर्यादित होता.
 
एका डॉक्टरवर आपल्या पेंशटचा मॉर्फिनचा ओव्हरडोस देऊन खून केल्याचा आरोप असल्याची बातमी पसरली आणि अनेक कुटुंब आमच्याही बाबतीत असं झालं असेल का अशी विचारणा करत पुढे यायला लागली.
 
त्यांच्याही घरातल्या वृद्ध स्त्रिया अशा अचानक मरण पावल्या होत्या, त्यांचाही डॉक्टर हेरॉल्ड होता आणि त्याही नीटनेटके कपडे घालून, खुर्चीत बसलेल्या स्थितीत मृत सापडल्या होत्या.
 
काही आठवड्यात एका खूनावरून हा तपास वीस खूनांवर पोचला.
 
पत्रकारांचे जथ्थेच्या जथ्थे या लहानशा गावात आले.
 
आणखी तीन महिला, जॉन मलिया, विनीफ्रेड मॅलर आणि बियांका पॉम्फ्रे यांचे दफन केलेले मृतदेह उकरून काढण्यात आले. त्यांच्याशी शरीरात डायमॉर्फिनचा जीवघेणा अंश सापडला होता.
 
पोलिसांनी त्याच्या दवाखान्यात छापा मारला. तिथले सगळे रजिस्टर, नोंदणी वह्या, आणि कॉम्प्युटर उचलून आणले.
 
पेशंटचे रजिस्टर बिनचूक होते, हेरॉल्डने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी जुळत होत्या. असा कोणताही सबळ पुरावा अजूनही सापडला नव्हता.
 
पण फॉरेन्सिक अॅनालिस्टने कॉम्प्युटर तपासला तेव्हा वेगळीच माहिती समोर आली. ही हेरॉल्डची तिसरी आणि सर्वात मोठी चूक होती.
 
हेरॉल्ड आपले खून लपवण्यासाठी आणि खून झाला तेव्हा मी वेगळ्याच ठिकाणी होतो, माझी वेगळी अपॉईंटमेंट होती हे दर्शवण्यासाठी पेशंटचे रेकॉर्ड बदलायचा. अनेकदा त्यात भलत्याच औषधांचा उल्लेख असायचा जे पेशंट घेतही नव्हते आणि हॅरोल्ड पेशंट आहे त्यापेक्षा खूप आजारी आहेत आणि जे कधीही मरू शकतात असं भासवायचा.
 
त्याने कागदी रजिस्टरमधले सगळे रेकॉर्ड बदलले, तेही बिनचूक. कॉम्प्युटरवरचेही रेकॉर्ड बदलले. पण नव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना त्याच्याकडून एक चूक झाली.
 
सुरुवातीचे रेकॉर्ड आणि नंतर बदललेले रेकॉर्ड याची कॉम्प्युटरमध्ये नोंद होत होती. आता हे आज आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की कोणतंही डॉक्युमेंट कॉम्प्युटरवर मॉडिफाय केलं की त्याच्या टाईमस्टँपची नोंद होते.
 
म्हणजे एखाद्या फाईलमध्ये कोणत्या तारखेला, कधी वाजता, किती वेळा बदल केलेत याची सगळी जंत्री बाहेर येते. पण हे हेरॉल्डला माहिती नव्हतं.
 
त्याचा कॉम्प्युटर तपासल्यानंतर सगळी माहिती बाहेर आली. पोलिसांना हवा होता तो सबळ पुरावा सापडला.
 
एव्हाना आणखी काही मृतदेह उकरून काढण्यात आले. त्याच्यावर आता पंधरा खूनांसाठी खटला सुरू झाला.
 
ज्यादिवशी पोलिसांनी हेरॉल्डला कॉप्युटरमधले पुरावे दाखवले आणि त्यावर त्याचं काय म्हणणं आहे विचारलं, त्याचे डोळेच विस्फारले. त्याचा सगळा उद्दामपणा हरवून गेला. त्याला कदाचित लक्षात आलं की तो पकडला गेलाय आणि आता सुटू शकत नाही. तो तिथेच कोसळला. त्याला हे पटतच नव्हतं की तो पकडला जाऊ शकतो. नंतरच्या उलट तपासणीत तर तो सरळ पोलिसांकडे पाठ करून, डोळे बंद करून बसायला लागला.
 
त्यानंतर तो पोलिसांशी कधीच बोलला नाही, ना त्याने आपल्या कृत्यांचा कबुलीजबाब दिला.
 
अर्थात पोलिसांना त्याची गरज नव्हती, आता त्यांच्या हातात सबळ पुरावे होते. पण एका प्रश्नाचं उत्तर कोणालाच मिळालं नाही की तो हे खून का करत होता.
 
कॅथलीन ग्रंडींच्या खूनात निदान प्रॉपर्टी हे कारण असू शकतं होतं. पण इतर खुनांचं काय?
 
हॅरोल्ड शीपमनची केस ब्रिटनमध्ये प्रसिद्ध आहे. तो त्या देशातला कदाचित सर्वात जास्त खून करणारा सीरियल किलर होता. त्यावर अनेक मनोवैज्ञानिकांनी अभ्यास करून त्याची खून करण्यामागे काय प्रेरणा होती याचा अभ्यास केला आहे.
 
काहींचं म्हणणं पडलं की, ‘डॉक्टर असल्यामुळे त्याला आपणच देव आहोत असं वाटायला लागलं आणि जो जीवदान देऊ शकतो, तो जीव घेऊही शकतो हा न्यायाने त्याने हे खून केले असावेत.’
 
तर काहीचं म्हणणं होतं की त्याच्या आईच्या अकाली मृत्यूचा बदला घेत होता. ‘ज्या वृद्ध महिलांचे तो खून करत होता, त्यांच्याकडे एक अशी गोष्ट होती जी त्याच्या आईला कधीच मिळाली नाही – दीर्घायुष्य.’
 
हॅरोल्डला 15 जन्मठेपांची शिक्षा झाली. म्हणजे तो हयात असताना कधीही तुरुंगाबाहेर येऊ शकणार नव्हता. पण त्याचा विचार काहीतरी वेगळाच होता.
 
गोष्ट अजून संपली नाही...
हेरॉल्डला शिक्षा झाल्यानंतरही त्याने नक्की किती महिलांचा, वृद्धांचा खून केला आहे हे जाणून घेण्यासाठी एक समिती स्थापन केली.
 
तुरुंगातल्या अधिकाऱ्यांना अशीही भीती होती की हेरॉल्ड तुरुंगातही खूनसत्र थांबवणार नाही. त्याच्यासोबत तुरुंगात असलेले दोन कैद्यांना पैनकिलर्सच्या ओव्हरडोसमुळे आयसीयूत दाखल करावं लागलं. हे पेनकिलर्स अवैधपणे तुरुंगात आले होते.
 
पण नक्की काय झालं शेवटपर्यंत कळलं नाही. ना त्या कैद्यांनी काही जबाब दिला ना हेरॉल्डनी.
 
2004 साली त्याने तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही आत्महत्याही त्याने योग्य वेळ निवडून केली. निवृत्त होण्याच्या वयाआधी त्याने आत्महत्या केल्यामुळे त्याच्या बायकोला त्याची सगळी पेन्शन मिळाली. त्याच्या नियंत्रणातली ही शेवटची गोष्ट होती.
 
संदर्भ
द शीपमन फाईल्स : अ व्हेरी ब्रिटिश क्राईम स्टोरी (डॉक्युमेंटरी, निर्मिती - बीबीसी टू)
 
हॅरोल्ड शीपमन : डॉक्टर डेथ (डॉक्युमेंटरी, निर्मिती – अवर लाईफ)
 
डॉक्टर हू किल्ड 250+ पेशंट्स (डॉक्युमेंटरी, निर्मिती – ट्विस्टेड माइंड)
 
बीबीसी डॉट कॉम लेख
 
Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

अरविंद केजरीवाल पुन्हा ईडीच्या तावडीत, निवडणुकीपूर्वी उघडले दारु घोटाळा प्रकरण

गुजरातमध्ये पार्सल उघडताच मोठा स्फोट झाला,खळबळ उडाली

मुंबई बोट दुर्घटनेत बेपत्ता 7 वर्षाच्या मुलाचा मृतदेह सापडला

LIVE: मंत्र्यांच्या खात्याशिवाय हिवाळी अधिवेशन संपत आहे-नितीन राऊत

जया बच्चन भाजपच्या जखमी खासदारांवर ताशेरे ओढत म्हणाल्या ते ऍक्टिंग करत असून त्यांना पुरस्कार द्यायला हवेत

पुढील लेख
Show comments