Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गाझा : जिथं जगण्याची खात्री उरली नाही, तिथं 'या' पॅलेस्टिनी शिक्षकाची शिकवण्याची धडपड

Webdunia
रविवार, 24 डिसेंबर 2023 (16:49 IST)
दक्षिण गाझा पट्टीतील रफाह शहरातील तात्पुरत्या वर्गाच्या खिडक्यांवर कपडे सुकत घातलेले आहेत.
खोलीतील डझनभर खुर्च्यांसमोर एक लाकडी फळा ठेवलाय, ज्यावर इंग्रजीत लिहिलंय, ‘तुमचं पॅलेस्टाईनवर प्रेम आहे का?’ (डू यू लव्ह पॅलेस्टाईन?)
 
ऑक्टोबर महिन्यात गाझामध्ये जेव्हा युद्ध सुरू झालं, तेव्हापासून शिक्षणव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडली आहे.
 
पॅलेस्टिनी शिक्षक तारिक अल-एन्नाबी यांनी स्वेच्छेने या छोट्याशा जागेत मुलांना शिकवायला सुरुवात केली, जेणेकरून कठीण काळातही मुलांच्या शिक्षणात खंड पडता कामा नये.
 
तारिक अशा ठिकाणी हा उपक्रम राबवत आहेत, जिथे इस्रायलच्या हल्ल्यात हजारोंच्या संख्येने लहान मुलं मारली गेली आहेत. म्हणजेच जिथे मुलं जिवंत राहण्याची काहीच शाश्वती नाही, तिथे तारिक मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करतायत.
 
संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, इस्रायलने गाझामध्ये जमिनीवरील मोहीम सुरू केल्यापासून 6.25 लाख पॅलेस्टिनी विद्यार्थी शिक्षणापासून दूर लोटले गेले आहेत.
 
गाझाच्या शिक्षण मंत्रालयाचं म्हणणं आहे की, गेल्या दोन महिन्यांच्या युद्धकाळात 203 शिक्षण कर्मचारी आणि 3,477 विद्यार्थी मारले गेले आहेत.
पण या छोट्याशा, तात्पुरत्या वर्गात गेल्यावर असं वाटतं की बाहेर जे काही सुरू आहे. त्यापासून मुलं अलिप्त आहेत.
 
ती मुलं आनंदी आहेत, प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी उत्साहाने हात वर करतात, एकमेकांसोबत स्पर्धा लावतात, एकमेकांशीसोबत मिळून-मिसळून राहतात आणि शिक्षकांपासून स्वत:चं हसणं लपविण्याचा प्रयत्न करतात, या सर्व त्या गोष्टी आहेत ज्या ते आपल्या नेहमीच्या शाळेमध्ये करत होते.
 
युद्धग्रस्त भागात शिकवण्याचा मानस
तारिक यांनी घरून स्वतःचा फळा आणलाय, जो ते पूर्वी खाजगी शिकवणीसाठी वापरत असत. लहान पाट्या आणि खडूचे तुटलेले तुकडे त्यांनी मुलांना दिले आहेत.
 
ते म्हणतात, “मुलांना युद्धाच्या वातावरणातून बाहेर काढण्याची आणि त्यांना इंग्रजी शिकवण्याची ही एक उत्तम संधी आहे.”
 
मात्र, त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी विद्यार्थ्यांची युद्धाच्या वास्तवापासून सुटका करणं शक्य नाही.
 
ते म्हणतात की, बॉम्बवर्षाव होत असताना त्यांना अनेकवेळा आपली शिकवणी थांबवावी लागायची आणि जेव्हा वातावरण शांत व्हायचं तेव्हा ते पुन्हा शिकवायला सुरूवात करायचे.
 
या सर्व अडचणींचा सामना करावा लागत असतानाही त्यांना असं वाटतं की, इंग्रजी भाषा शिकवल्याने आजूबाजूला जे काही सुरू आहे त्याबद्दल मुलांसोबत संवाद साधता येईल आणि युद्धाविषयीच्या त्यांच्या भावना जाणून घेण्याचा तो एक मार्ग आहे.
गाझामधून विस्थापित झालेली मुलं आणि त्यांच्या पालकांकडून तारिक यांच्या या उपक्रमाचं अतिशय उत्साहाने स्वागत आणि कौतुक होत असल्याचं पाहायला मिळतंय.
 
सुरुवातीला त्यांच्या वर्गात फक्त 10 मुलं होती, त्यांची संख्या आता 30 वर पोहोचलेली आहे. 8 ते 14 वर्षे वयोगटातील ही मुलं तारिक यांच्याकडून आलटूनपाटून इंग्रजीचे धडे घेत आहेत.
 
25 वर्षीय तारिक युद्धापूर्वी गाझा शहराच्या पूर्वेकडील झैतून येथील अल-हुरिया शाळेत शिकवायचे.
 
रफाह येथील आपल्या घरातून ते दररोज गाझामधील त्या शाळेत जात असत, शाळा संपल्यानंतर ते मुलांची शिकवणी घ्यायचे आणि आपल्या मित्रांसोबत कॅफेमध्ये फुटबॉलचे सामने पाहायची त्यांना आवड होती.
 
“आता सर्वकाही पूर्णपणे बदलून गेलंय,” असं ते हताश होऊन सांगतात.
 
इस्त्रायलच्या बॉम्बहल्ल्यात त्यांची शाळा उद्ध्वस्त झाली आणि त्यांचे काही विद्यार्थी मारले गेले, असंही त्यांनी आम्हाला सांगितलं.
 
गाझामधील 70% शाळांच्या इमारती उद्ध्वस्त
लहान मुलांसाठी काम करणारी संयुक्त राष्ट्र संघाची संस्था युनिसेफच्या अहवालानुसार, युद्धाच्या पहिल्या दोन महिन्यांत 342 हून अधिक शाळांच्या इमारतींचं नुकसान झालं.
 
अहवालानुसार, गाझामधील एकूण शाळांच्या इमारतींपैकी हा आकडा 70% आहे आणि पूर्वेकडील पॅलेस्टिनी निर्वासितांसाठी काम करणारी संयुक्त राष्ट्राची संस्था यूएनआरडब्ल्यूए द्वारे चालवल्या जाणार्‍या 70 पैकी 56 शाळांमध्ये विस्थापित पॅलेस्टिनी शरणार्थींना ठेवण्यात आलंय.
 
युनिसेफच्या अंदाजानुसार यूएनआरडब्ल्यूए संचालित शाळांमध्ये सध्या सुमारे 11 लाख लोक आश्रय घेत आहेत आणि 2.23 लाख लोक सार्वजनिक शाळांमध्ये राहत आहेत.
 
युनिसेफचे कम्युनिकेशन मॅनेजर रिकार्डो पायर्स यांचं म्हणणं आहे की, याच कारणामुळे आगामी काळात सुरक्षित वर्गखोल्यांची कमतरता हे सर्वात मोठं आव्हान असणार आहे.
 
ते इतर आव्हानांबद्दलही बोलताना सांगतात की, अनेक शिक्षक बॉम्बहल्ल्यांमध्ये मारले गेल्यामुळे प्रशिक्षित शिक्षकांचीही कमतरता भासणार आहे, शिवाय शैक्षणिक साहित्यही मोठ्या प्रमाणावर नष्ट झालंय.
 
पायर्स शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मानसोपचारतज्ज्ञांचीही गरज असल्याचं आवर्जुन सांगतात, कारण युद्ध सुरू झाल्यापासून या सर्वांवर मानसिक आघात झाला आहे.
 
तारिक यांच्या तात्पुरत्या वर्गातील मुलांना त्यांच्या युद्धपूर्व आयुष्याची ओढ लागलेली आहे.
 
'सर्वात कठीण प्रश्न'
 
गाझा शहरातून विस्थापित झालेल्या हजारो मुलांपैकी एक असलेली 10 वर्षीय आफना सांगते की, "आम्ही शाळेत शिकायचो आणि नंतर घरी परत जायचो.”
 
"आम्ही इथेच खातो-पितो आणि झोपतो... आम्हाला माहित आहे की, आम्हाला आमची शाळा स्वच्छ ठेवायची आहे. पण ही शाळा स्वच्छ नाहीय आणि हे वेगळं आहे."
 
तिची 10 वर्षांची मैत्रिण बैतूल अदालू तिच्या वाक्याला दुजोरा देते, "मला माझ्या जुन्या शाळेची खूप आठवण येते."
 
दोन्ही मुलींचं भविष्यात वैद्यकशास्त्राचं शिक्षण घेण्याचं स्वप्न आहे. त्यांना त्यांच्या घरी आणि शाळेत परतण्याची इच्छा आहे, पण त्यांची ही इच्छा लवकर पूर्ण होईल असं दिसत नाही.
 
गाझामधील मुलांना योग्य शिक्षण मिळण्यासाठी वर्ष नाही पण काही महिने तरी जावे लागण्याची दाट शक्यता आहे.
 
युनिसेफचं आकलन आहे की, विस्थापित लोकांना ते आश्रय घेत असलेल्या शाळा रिकामी करून त्यांच्या घरी परत जाण्यासाठी अनेक वर्ष लागतील.
 
उद्ध्वस्त झालेल्या शाळंची पुनर्बांधणी करण्यासाठीही बराच कालावधी लागेल.
 
शाळा लवकर उघडणार नाहीत, हे सत्य पचवताना तारिक म्हणतात की, ते मदत पोहोचवणे, शिक्षण देणे आणि विस्थापित लोकांना मदत करण्याचं काम सुरूच ठेवतील.
 
तारिक सांगतात, "माझ्या एका विद्यार्थ्याने मला आतापर्यंतचा सर्वात कठीण प्रश्न विचारला की, युद्ध कधी संपेल आणि ते त्यांच्या घरी परत कधी जाऊ शकतील."
 
शाळा रिकामी करण्याच्या आणि विस्थापित लोकांना ते कुठेही असले तरी त्यांच्या घरी परत पाठवण्याच्या आव्हानाचा विचार करून ते अतिशय दु:खी होतात.
 
ते म्हणतात, "युद्धानंतरची परिस्थिती युद्धापेक्षा कठीण असते."
 
Published By- Priya Dixit
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

रमेश चेन्निथला यांनी आमदारांशी पराभवाच्या कारणांवरचर्चा केली

LIVE: वीर सावरकरांना भारतरत्न द्या, उद्धव यांनी केली मागणी, काँग्रेसलाही सुनावले

वीर सावरकरांना भारतरत्न द्या, उद्धव यांनी केली मागणी, काँग्रेसलाही सुनावले

काँगोच्या फिमी नदीत बोट उलटली, 25 जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments