Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इस्रायल-हमास संघर्ष : ‘सर्व मुलांसह आम्ही एकाच खोलीत झोपतो म्हणजे घरावर बॉम्ब पडला तर कोणीही जिवंत राहणार नाही’

Webdunia
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2023 (23:23 IST)
गाझामध्ये अंदाजे वीस लाखाहून अधिक लोकसंख्या आहे आणि त्यात निम्म्याहून अधिक लोकसंख्या ही लहान मुलांची आहे. म्हणूनच या युद्धाचे परिणाम सर्वांत गंभीर आहेत.
 
या युद्धाचे वाईट परिणाम पुढील अनेक वर्षं लहान मुलांवर दिसू शकतात. काही लोकांच्या मनात हा प्रश्न असेल की युद्धाच्या वाईट परिणामांपासून पालक आपल्या मुलांचं संरक्षण कसं करु शकतात आणि या काळात मानसिक आरोग्याची काळजी कशी घेता येईल?
 
या रिपोर्टमध्ये आम्ही गाझापट्टीमध्ये इस्रायली बॉम्ब हल्ल्याच्या छायेत राहणाऱ्या कुटुंबाची कहाणी सांगितली आहे, त्यांनी गाझा पट्टीमध्ये वारंवार युद्धं पाहिली आहेत. पण आता सुरु असलेलं युद्ध हे मागील युद्धांपेक्षा 'वेगळं' आहे, असं ते सांगतात.
 
'मुलांसोबत राहण्यासाठी व्यवसाय सोडला'
पत्रकार हन्नान अबू दगीम यांनी मला व्हॉट्सअ‍ॅपद्वारे एका संक्षिप्त संभाषणात सांगितलं की, युद्धाच्या या गंभीर परिस्थितीमुळे मुलांची काळजी घेण्यासाठी त्यांनी आपला व्यवसाय सोडला आहे.
 
त्या सांगतात, "अल रमल परिसरातील माझ्या घराचं खूप नुकसान झालं आहे. काही दिवसांपूर्वी मी घर सोडलं आणि माझ्या भावाच्या घरी राहायला आले. आम्ही तीन कुटुंबांनी एकत्र रात्र काढली. जेव्हा बॉम्बस्फोटाची तीव्रता वाढते तेव्हा मुलं 'दुआ पठण' सुरु करतात.
 
जेव्हा बॉम्ब हल्ले तीव्र होतोत तेव्हा आम्ही घरातील सर्व मुलांना आमच्या जवळ बोलवतो आणि त्यांच्यासोबत खेळून त्यांचं लक्ष दुसऱ्या गोष्टींकडे वळवण्याचा प्रयत्न करतो. मलाही माझ्या मनातील गोष्ट कुणाशी तरी बोलाव्यात असं वाटतं. मी त्यांना सांगितलं, मला माहित आहे की हे संकट आहे आणि ते संपणार आहे आणि खुदा (देव) आपल्यासोबत आहे."
 
या परिस्थितीत पत्रकाराची भूमिका साकारणाऱ्या हन्नान सांगतात की त्या कुटुंबाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देतात.
 
त्या म्हणाल्या की, "गाझापट्टीतील लोकांचं एका गोष्टीवर एकमत आहे जे मी खात्रीनं सांगू शकते आणि ते म्हणजे त्यांच्या सर्व मुलांसह ते एकाच खोलीत झोपतात, असं यासाठी की घरावर बॉम्ब हल्ला झाल्यास कोणीही जिवंत राहणार नाही. म्हणजे कुणालाच मृतांचा शोक करावा लागू नये."
 
'बॉम्बस्फोट संपल्यावर मी तुला एक छान भेट देईन'
गाझा पट्टीच्या दक्षिणेकडील खान युनूस इथं राहणाऱ्या सेहर कमाल नावाच्या एका आईला दोन मुलं आहेत. जेव्हा बॉम्बस्फोटाची तीव्रता वाढते तेव्हा त्यांची चार वर्षांची मुलगी रिताल बॉम्बस्फोटाच्या भीतीदायक आवाजाबद्दल तक्रार करू लागते.
 
त्यामुळे सेहर यांना तिला वचन द्यावं लागलं की जर तिनं त्रास दिला नाही तर परिस्थिती सुधारताच एक सुंदर भेट तिला दिली जाईल.
 
सेहर या त्यांच्या दोन मुलांसमोर हसण्याचे आवाज काढून त्यांना हसवण्याचा प्रयत्न करतात.
 
लैला मोहम्मद या 30 वर्षांच्या आहेत. त्या पाच मुलांच्या आई आहेत. त्या सांगतात की, "त्यांना त्यांच्या मुलांची काळजी वाटते आणि त्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. घर सोडणं किंवा बेघर होणं ही परिस्थिती भयावह आहे.
 
"या युद्धामुळे कोणतीही जागा सुरक्षित नसल्याचं त्या सांगतात आणि मागील युद्धांमध्ये स्थलांतरित होण्याच्या अनुभवानंतर माझी मुलगी सलमाला अजूनही ते क्षण आठवतात आणि दररोज ती मला सांगते की मला घर सोडायचं नाही, मला इथून जायच नाही."
 
"तिला असं वाटतं की रस्त्यावरून चालणार्‍या प्रत्येकाचा क्षेपणास्त्रं पाठलाग करत आहे, कारण आम्ही यापूर्वी अशा परिस्थितीतून गेलो आहोत आणि तिला याची भीती वाटते."
 
मुनाल सालिम यांच्या बाबतीतही परिस्थिती फारशी वेगळी दिसत नाही. मुलांनी बॉम्बस्फोटाच्या आवाजाकडे लक्ष देऊ नये म्हणून त्या आपल्या मुलांसोबत खोलीत बसतात आणि खेळणी मांडून त्यांना घरात खेळण्यास सांगतात.
 
त्या म्हणाल्या "माझा 8 वर्षांचा मुलगा फारस हा खूप वेळा बाथरूममध्ये जातो आणि कधीकधी तो चड्डीतच लघवी करतो. कारण तो खूप घाबरतो."
 
"त्याला विमानांचा आवाज आवडत नाही. मला माझ्या मुलाला या परिस्थितीतून बाहेर काढायचं आहे. उपचारासाठी त्याला मानसोपचारतज्ज्ञाकडे घेऊन जायचं आहे."
 
युद्धादरम्यान मुलांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न
ईमान बशीर यांच्यामते हे युद्ध मागील युद्धांपेक्षा वेगळं आहे. त्या तीन मुलांच्या आई आहेत आणि 2021 मध्ये गाझावरील झालेल्या युद्धादरम्यान मी त्यांच्याशी बोललो होतो.
 
मागील युद्धादरम्यान आपल्या मुलांनी मानसिकदृष्ट्या खंबीर राहावं म्हणून त्यांनी काही वैयक्तिक प्रयत्न केले होते.
 
त्याबद्दल त्या सांगतात, जसं की बॉम्बस्फोटाच्या वेळी एखादी कथा वाचणं आणि बॉम्बस्फोट मोठ्या आवाजात होत असल्यास स्पीकरवर मोठ्या आवाजात गाणी लावणं, जेणेकरून मुलांना बाहेरच्या क्षेपणास्त्रांचा आवाज ऐकू येणार नाही.
 
पण आता 7 ऑक्टोबरला सकाळी सुरू झालेल्या या युद्धादरम्यान ईमान या व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एका अतिशय छोट्या संदेशात सांगतात,
 
"यावेळचं युद्ध वेगळं आहे, परिस्थिती खूप वाईट आहे. मला काय करावं हे समजत नाही.
 
कारण माझा नवरा देशाबाहेर आहे आणि मला तीन मुलं आहेत. परिस्थिती बिकट होत चालली आहे. कारण इथला वीजपुरवठा खंडित झाला आहे, त्यामुळे मला काय करावं हे समजत नाही. फक्त आमच्यासाठी प्रार्थना करा."
 
ईमान यांनी एक्सवर युद्धादरम्यान गाझा पट्टीमध्ये काय घडत आहे याचा तपशील शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचं कुटुंब राहत असलेल्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला, त्याचा तपशील सांगताना त्यांना वेदना होतात.
 
'सेव्ह द चिल्ड्रन' या संस्थेनं गेल्या वर्षी गाझा पट्टीतील मुलांच्या मानसिक स्थितीची तुलना करणारा अहवाल प्रकाशित केला होता आणि यात असं नोंदवलं गेलं की 2022 मध्ये जवळपास 88 टक्के मुलं मानसिक समस्यांना सामोरं जात आहेत.
 
तर मागील वर्षांमध्ये हे प्रमाण 55 टक्के होतं.
 
या अहवालानुसार, मुलं ज्या मानसिक समस्यांना तोंड देत आहेत, त्यामध्ये भीती, अस्वस्थता आणि दुःख यांचा समावेश होतो.
 
गाझापट्टी हा जगातील सर्वांत दाट लोकवस्तीचा भाग आहे. सुमारे 23 लाख पॅलेस्टिनी 41 किलोमीटर लांब आणि 10 किलोमीटर रुंद परिसरात राहतात. संयुक्त राष्ट्रांच्या मते, गाझाची 80 टक्के लोकसंख्या आंतरराष्ट्रीय मदतीवर अवलंबून आहे.
 
10 लाख लोक दररोज अन्नासाठी मदतीवर अवलंबून आहेत. प्रत्येक युद्धानंतर मुलांवर झालेल्या मानसिक आघातातून सावरण्यासाठी स्वयंसेवी संस्था आणि त्यांचे कार्यकर्ते मदत करतात.
 
त्यांपैकी एक अहमद हिजाझी नावाचे एक तरुण कार्यकर्ते आहेत, जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील त्याच्या अकाउंटद्वारे 'गाझाच्या मुलांना आनंदी बनवण्याच्या' उद्देशानं काही कार्य करतात.
 
पण अहमद हिजाझी यांनी गाझापट्टीतील मुलांच्या आरोग्याच्या स्थितीसंदर्भात माहितीपट बनवण्यास सुरुवात केली होती.
 
युद्धाच्या परिस्थितीला सामोरं गेलेल्या मुलांचा त्या दिवसातील काय अनुभव आहे, याचा हा दस्तऐवज आहे.
 
यातील बहुतेक मुलांना माहित नाही की, पाच युद्धांआधी गाझा कसा होता? कारण गेली सोळा वर्षं त्यांनी नाकेबंदी केलेला गाझा पहिला आहे.
 
मानसिक आरोग्याची काळजी घेणं किती कठीण आहे?
युद्धजन्य परिस्थितीत राहणाऱ्यांना किंवा दूरवरून युद्ध पाहणाऱ्यांना हा प्रश्न पडू शकतो की, मानसिक आरोग्य कसं जपावं.
 
गाझामध्ये सुरक्षित जागेचा अभाव तर आहेच, पण रस्ते मार्गही सुरक्षित नाही. गाझामध्ये वीज आणि पाणी देखील खंडित झालं आहे.
 
अशा परिस्थितीत मानसिक आरोग्याची काळजी घेणं कमी महत्त्वाचं वाटत असलं तरी तज्ज्ञांच्या मते, मानसिक प्रथमोपचार दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरतो.
 
उदाहरणार्थ, तज्ज्ञांच्या मते, "मुलांनी त्यांच्या भावना व्यक्त करायला हव्यात, म्हणजे मनावर होणाऱ्या वेदना कमी व्हायला मदत होते."
 
गाझा मेंटल हेल्थ प्रोग्रामचे संचालक डॉ. यासिर अबू जामिया म्हणतात, "मुलांमध्ये प्रौढांसारखी शैक्षणिक क्षमता नसते, परंतु त्यांना धोका स्पष्टपणे जाणवतो. कुटुंबातील सदस्यांच्या डोळ्यात भीती पाहून त्यांना जाणीव होते. किंवा जेव्हा ते त्यांच्या चेहऱ्यावरचा तणाव पाहतात."
 
डॉक्टर यासिर अबू जामिया सांगतात की, मानसिक ताणतणाव आणि समस्या प्रौढांकडून मुलांपर्यंत पोहोचतात. त्या कमी करण्यासाठी पालकांना काही सवयी बदलण्याचा सल्ला ते देतात.
 
उदाहरणार्थ, "पालकांनी खिडकीबाहेर पाहणं मर्यादित केलं पाहिजे, सतत बातम्या पाहणं टाळावं आणि मुलांना नियोजनात सहभागी करुन घ्या. जसं की सुरक्षित ठिकाणी एखाद्या नातेवाईकाकडे जाण्याचं नियोजन करताना मुलांना विश्वासात घ्यायला हवं. म्हणजे स्फोटाचा आवाज ऐकला तरी
 
त्यांच्या मनावर दडपण राहत नाही."
 
डॉ अबू जामिया म्हणतात की पालकांनी "त्यांच्या मुलांना त्रास होऊ नये यासाठी प्रयत्न करावेत, मुलांचा कल काय आहे, ते पाहावं.
 
जसं की त्यांना वाटणाऱ्या भीती बद्दल बोलण्यास प्रोत्साहित करावं. पण त्यांना खोट्या बातम्या न सांगणं किंवा त्यांना खोटी आश्वासनं देऊ नयेत. भीती बद्दल त्यांच्याशी बोला आणि त्यांच्यासोबत दैनंदिन कामात सहभागी व्हावं."
 
बेघर लोक शाळांमध्ये आश्रय घेत आहेत
गाझाच्या शाळांमध्ये पूर्वी मुलं अभ्यासासाठी येत होती. शाळा मुलांसाठी शिक्षण आणि मैदानी खेळ खेळण्याची जागा होती.
 
पण युद्धानंतर परिस्थिती बदलली आहे. गाझा पट्टी मधील शाळांमध्ये बेघर लोकांसाठी शिबिरं तयार करण्यात आली आहेत. शाळांनी आपले दरवाजे बेघर कुटुंबांसाठी उघडले आहेत.
 
यूएनडब्ल्यूआरए (युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क्स एजन्सी)नं प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, युद्धाच्या सहाव्या दिवशी गुरुवारपर्यंत(12 ऑक्टोबर), गाझापट्टीतील 2 लाख 80 हजारांहून अधिक नागरिकांनी 92 हून अधिक शाळांमध्ये किंवा शिबिरांमध्ये आश्रय घेतला आहे.
 
युनायटेड नेशन्स रिलीफ अँड वर्क्स एजन्सी फॉर रिफ्युजी या संस्थेनं सांगितलं की, ज्या शाळांमध्ये बेघर लोकांनी आश्रय घेतला आहे. त्या शाळांमध्ये इतकी गर्दी आहे की, त्या प्रमाणात या ठिकाणी अन्न आणि पाण्याची उपलब्धता नाही.
 
'माझं संपूर्ण शरीर दुखतंय असं मला वाटतं'
दक्षिण गाझा पट्टीतील जबालिया कॅम्पमधील 30 वर्षीय सऊद जबर म्हणतात की, इथल्या माता या युद्धात कठीण परिस्थितीत जगत आहेत आणि पण त्यांनी आपल्या मुलांसमोर खंबीर असलं पाहिजे.
 
त्या सांगतात, "माझ्या मुलांपासून मी माझं दु:ख लपवतेय, मी त्यांच्यासमोर रडू शकतं नाही. पण त्यामुळे माझं संपूर्ण शरीर दुखत आहे. मला असं वाटतं की नकारात्मक उर्जेमुळे माझ्या स्नायुच्या आणि शरीराच्या काही भागांवर ताण येत आहे. पण तरीही मी माझ्या मुलांसमोर खंबीर असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करते."
 
प्रत्येक आई महत्त्वाची कागदपत्रं ठेवण्यासाठी बॅग तयार करतेय, जेणेकरून बॉम्बस्फोटाच्या वेळी ती आणि तिची मुलं इथून लवकर बाहेर पडू शकतील.
 
सऊद जबरच्या बाबतीतही असंच घडलं, तीनं बॉम्बस्फोटानंतर अलसिका भागातील आपलं घर सोडलं कारण "तिथं कुठेच सुरक्षित जागा नाही."

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ स्थापनेत भाजप नेतृत्व हस्तक्षेप करणार नाही

एक राष्ट्र, एक निवडणूक' लोकशाही नष्ट करण्याचा भाजपचा डाव : संजय राऊत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली

LIVE: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली

ग्रँडमास्टर डी गुकेश जगज्जेता बनला, बक्षीस म्हणून इतके कोटी रुपये मिळाले

पुढील लेख
Show comments