इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथील केमायोरान भागात मंगळवारी दुपारी एका सात मजली कार्यालयीन इमारतीत भीषण आग लागली, ज्यामध्ये किमान 20 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण आत अडकल्याची भीती आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे आणि इमारतीच्या आत बचाव आणि शोध मोहीम सुरू आहे. सेंट्रल जकार्ता पोलिस प्रमुख सुसाट्यो पूर्णोमो कोंड्रो यांनी या माहितीला दुजोरा दिला.
कोंड्रो यांच्या म्हणण्यानुसार, इमारतीच्या पहिल्या मजल्यावर दुपारी आग लागली आणि हळूहळू वरच्या मजल्यांवर पसरली. अनेक कर्मचारी जेवण करत होते, तर काही जण आग लागली तेव्हा कार्यालयाबाहेर पडले होते.
जकार्ता आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे (बीपीबीडी) प्रमुख इसानावा अडजी म्हणाले की आगीच्या कारणांचा तपास सुरू आहे आणि नुकसानीचे मूल्यांकन सुरू आहे. आगीचे कारण अद्याप तपासात आहे.
आग विझविण्यासाठी अधिकाऱ्यांनी 28अग्निशमन दलाच्या गाड्या आणि 101कर्मचारी तैनात केले. मृत आणि जखमींना ओळख पटविण्यासाठी आणि उपचारांसाठी पूर्व जकार्ता येथील क्रामत जाती पोलिस रुग्णालयात नेण्यात आले.
ही इमारत टेरा ड्रोन इंडोनेशियाचे मुख्यालय आहे, ही कंपनी खाणकाम आणि शेतीसह विविध क्षेत्रातील ग्राहकांना हवाई सर्वेक्षण ड्रोन सेवा प्रदान करते. मदत कार्य पूर्ण होईपर्यंत इमारत पूर्णपणे सीलबंद राहील असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.