Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'बलात्कार करत असतानाच तिच्या डोक्यात गोळी घातली'; हमासकडून 7 ऑक्टोबरला महिलांवर बलात्कार

Webdunia
गुरूवार, 7 डिसेंबर 2023 (14:45 IST)
लुसी विलियमसन
 
7 ऑक्टोबरला इस्रायलवर हमासनं केलेल्या हल्ल्यादरम्यान त्यांनी बलात्कार, लैंगिक हिंसाचार आणि महिलांच्या अवयांचे विच्छेदन केल्याचे पुरावे बीबीसीनं पाहिले आणि ऐकले आहेत.
 
(इशारा : या रिपोर्टमध्ये असलेली लैंगिक हिंसाचार आणि बलात्काराशी संबंधित माहिती तुम्हाला विचलित करू शकते.)
 
हमासच्या हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांच्या मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी ते गोळा करण्याचं काम करणाऱ्या अनेकांनी आम्हाला माहिती दिली.
 
त्यांना कापलेले अवयव, ओटीपोटातील गर्भावर वार, जखमा आणि लैंगिक हिंसाचाराच्या अनेक खुणा आढळल्याचं त्यांनी सांगितलं.
 
पीडितांमध्ये लहान, किशोरवयीन मुलं आणि ज्येष्ठांचाही समावेश होता, असंही त्यांनी सांगितलं.
 
नोवा म्युझिक फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेल्या एका प्रत्यक्षदर्शीचा व्हीडिओच्या स्वरुपातील पुरावा इस्रायलच्या पोलिसांनी पत्रकारांना दाखवला. या व्हीडिओमध्ये सामूहिक बलात्कार, शरीराच्या अवयवांचं विच्छेदन आणि एका पीडितेच्या हत्येचं वर्णन केलेलं आहे.
 
हल्ल्याच्या दिवशी हमासनं विवस्त्र आणि रक्तानं माखलेल्या महिलांचे जे व्हिडिओ तयार केले आणि हल्ल्यानंतर घटनास्थळावर मृतदेहांचे जे फोटो काढण्यात आले, त्यावरून महिलांवर हल्लेखोरांनी लैंगिक अत्याचार केल्याचं दिसून येतं.
 
काही पीडित तर जणू फक्त स्वतःवर बेतलेल्या या संकटाबद्दल सांगण्यासाठीच बचावले असल्याचं म्हटलं जात आहे.
 
आता जे या जगात नाहीत, त्यांच्या अखेरच्या काही क्षणांबाबत माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जे जिवंत वाचले, ज्यांनी मृतदेह गोळा केले, शवगृहात काम करणारे कर्मचारी आणि हल्ले झालेल्या ठिकाणांच्या फुटेजच्या माध्यमातून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
 
पोलिसांनी पत्रकारांना नोवा म्युझिक फेस्टिव्हलमध्ये आलेल्या एका महिलेच्या साक्षीचा एक भयावह व्हिडिओ दाखवला. ही महिला हल्ल्याच्यावेळी त्याठिकाणीच होती.
 
हमासच्या हल्लेखोरांना एका महिलेवर सामुहिक बलात्कार करताना पाहिल्याचं या महिलेनं सांगितलं. त्यावेळी त्या पीडितेचे अवयव कापले जात होते. तर शेवटचा हल्लेखोर महिलेच्या डोक्यात गोळी घातल्यानंतरही तिच्यावर बलात्कार करत राहिला, असं त्या महिलेनं सांगितलं.
 
व्हिडिओमध्ये एस नावाच्या या साक्षीदार महिलेनं हल्लेखोर, पीडितांना उचलून एकमेकांकडं कसे देत होते, याचं वर्णन केलं आहे.
 
'बलात्कार करत असतानाच तिच्या डोक्यात गोळी घातली'
साक्षीदार महिला म्हणाली की, "ती जिवंत होती. तिच्या शरीराच्या मागच्या भागातून रक्त वाहत होतं."
 
हल्लेखोर लैंगिक हिंसाचाराच्या वेळीच कशाप्रकारे पीडितेचे अवयव कापत होते, हेही सविस्तरपणे माहिती देताना साक्षीदार महिलेनं सांगितलं.
 
"त्यांनी पीडितेचे स्तन कापून ते रस्त्यावर फेकले. ते त्याबरोबर खेळत होते," असंही महिला म्हणाली.
 
त्यानंतर या पीडित महिलेला त्यांनी गणवेश परिधान केलेल्या इतर व्यक्तींच्या ताब्यात दिलं.
 
"त्यांनी (हल्लेखोर) पीडितेबरोबर बलात्कार केला आणि त्याचदरम्यान तिच्या डोक्यात गोळी घातली. त्यानं पँटही परिधान केलेली नव्हती."
 
म्युझिक फेस्टिव्हलमध्ये आलेल्या एका व्यक्तीशीही आम्ही बोललो. त्यांनीही लोकांच्या हत्या, बलात्कार आणि शीर कापल्यानंतर जसा आरडाओरडा होतो, तसा आरडाओरडा, किंकाळ्या ऐकल्या होत्या.
 
आम्ही विचारलं की, न पाहता फक्त आवाज ऐकून ते एवढ्या ठामपणे हे सगळं कसं सांगू शकतात? त्यावर त्यांनी म्हटलं की, जेव्हा ते आवाज ऐकत होते तेव्हाच त्यांना समजलं होतं की, हा बलात्कारच असू शकतो.
 
मदत करणाऱ्या एका संघटनेच्या माध्यमातून दिलेल्या या व्यक्तीनं जबाबात याला 'अमानवीय' कृत्य म्हटलं आहे.
 
"काही महिलांच्या मृत्यूपूर्वी त्यांच्यावर बलात्कार झाला होता, काहींबरोबर जखमी असताना बलात्कार झाला होता, तर काहींच्या मृत्यूनंतरही त्यांच्यावर बलात्कार झाला. मला त्यांची मदत करण्याची इच्छा होती. पण मी काहीही करू शकत नव्हतो," असं त्या जबाबात म्हटलं आहे.
 
पोलिसांच्या मते, त्यांच्याकडे लैंगिक अत्याचाराच्या घटनांचे 'अनेक' प्रत्यक्ष साक्षीदार आहेत. पण त्यांची संख्या किती आहे, याबाबत काहीही माहिती देण्यात आलेली नाही. आम्ही त्यांच्याशी बोललो, तोपर्यंत त्यांनी बचावलेल्या एकाही पीडितेचा जबाब नोंदवलेला नव्हता.
 
इस्रायलच्या महिला सबलीकरण मंत्री गोलान यांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, लैंगिक अत्याचार झालेल्या काही पीडिता हल्ल्यातून बचावल्या आहेत. त्या सध्या मानसोपचार तज्ज्ञांच्या निगराणीत आहेत.
 
"पण त्यांची संख्या खूपच कमी आहे. बहुतांश पीडितांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. जे बचावले आहेत, ते बोलण्याच्या स्थितीत नाहीत. आमच्याशी, सरकारमधील कोणाशी किंवा माध्यमांशीही बोलण्याच्या स्थितीत ते नाहीत," असं त्या म्हणाल्या.
 
हमासनं तयार केलेल्या व्हिडिओमध्ये एका महिलेचं फुटेज आहे. त्यांना बेड्या घालून बंदींबरोबर नेलं जात आहे. महिलेचा हात अनेक ठिकाणी कापलेला असून पँटवर रक्ताचा मोठा डाग दिसत होता.
 
इतर अनेक व्हिडिओमध्ये नेत असलेल्या महिला विवस्त्र किंवा कमी कपड्यांत असलेल्या दिसत आहेत.
 
हल्ल्यानंतर काढण्यात आलेल्या घटनास्थळाच्या अनेक फोटोंमध्ये महिलांच्या मृतदेहांवर कमरेच्या खाली कमी कपडे दिसत आहेत. काही महिलांचे पाय पसरलेले होते, तसंच प्रायव्हेट पार्ट आणि पायांवरही जखमांचे व्रण होते.
 
'वाचलेल्या पीडितांना बोलणेही शक्य नाही'
हीब्रू युनिव्हर्सिटीच्या डेव्हिस इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्समधील लीगल एक्सपर्ट डॉक्टर कोचाव्ह एलकायम लेव्ही यांच्या मते, "असं वाटतं की, हमासनं इराकच्या इस्लामिक स्टेट संघटनेकडून महिलांच्या शरिराचा शस्त्रासारखा कसा वापर करायचा हे शिकलं आहे."
 
"महिलांबरोबर काय करायचं आहे हे त्यांना माहिती होतं, हा विचार करुनच माझा थरकाप उडतो. त्यांचे अवयव कापणे, गुप्तांगांचं विच्छेदन करणं, बलात्कार करणं, हे सर्व खूपच भयावह आहे."
 
इस्रायलच्या मंत्री गोलान म्हणाल्या की, "डोळ्यासमोर बलात्कार होताना पाहिल्यामुळं अजूनही मानसिक धक्क्यातून सावरू न शकलेल्या आणि त्यामुळं रुग्णालयात असलेल्या तीन मुलींशी मी चर्चा केली. त्यांनी मेल्याचं नाटक करत बलात्कार होताना पाहिलं आणि सगळं काही ऐकलंही होतं."
 
इस्रायचे पोलीस प्रमुख याकोव्ह शब्ताई म्हणाले की, हल्ल्यातून वाचलेल्या बहुतांश लोकांसाठी बोलणंदेखील कठीण ठरत आहे. त्यापैकी काही तर त्यांनी काय पाहिलं किंवा सहन केलं, हे कधीच सांगू शकणार नाहीत.
 
"18 तरुण-तरुणी मानसिक आरोग्याशी संबंधित रुग्णालयांमध्ये दाखल आहे, कारण ते काहीही काम करू शकत नव्हते."
 
काही जण तर आत्महत्येसारखे विचार करत होते, असंही समोर आलं. काही जणांनी तर आत्महत्या केलीदेखील, असं पीडितांबरोबर काम करणाऱ्या एका टीमच्या सदस्यानं बीबीसीशी बोलताना सांगितलं.
 
हल्ल्यानंतर मृतदेह गोळा करण्याचं तसंच त्यांची ओळख पटवण्यासाठी शूरा येतील सैन्य तळापर्यंत नेलेले मृतदेह सांभाळण्याचं काम करणाऱ्या स्वयंसेवकांनीच बहुतांश पुरावे दिले आहेत.
 
अशीच एका धार्मिक संघटना झकाच्या माध्यमातून मृतदेह उचलण्याचं काम करणाऱ्या एका व्यक्तीनं आम्हाला टॉर्चर आणि अवयव कापण्याबद्दल सांगितलं. एका गर्भवती महिलेच्या हत्यापूर्वी तिचं गर्भाशय बाहेर काढलं आणि भ्रूणावर वार केले, असं त्यांनी सांगितलं.
 
बीबीसी स्वतः या दाव्याची पुष्टी करू शकत नाही, तसंच इस्रायलच्या मीडिया रिपोर्ट्समध्ये हल्ल्यानंतर काम करणाऱ्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या जबाबांवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.
 
'महिलांच्या मृतदेहानं भरलेले शेल्टर'
दुसऱ्या एका व्यक्तीनं लेखी साक्ष दिली. त्यात सांगितलं की, त्यांनी किबुत्झमध्ये पलंगाला हात पाय बांधलेल्या दोन महिलांचे मृतदेह पाहिले.
 
"त्यांच्यापैकी एकीच्या गुप्तांगामध्ये चाकू अडकलेला होता, तसंच तिच्या शरिराचे आतील अनेक अवयव बाहेर निघालेले होते," असं त्या साक्षीमध्ये म्हटलं होतं.
 
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्युझिक फेस्टिव्हलच्या ठिकाणी, "छोट्या-छोट्या शेल्टर महिलांनी भरलेले होते. त्यांच्या शरिराच्या वरच्या भागावरील कपडे फाटलेले होते. त्याठिकाणी अशा अनेक महिला होत्या. जवळून पाहिलं तर त्यांच्या कपाळाच्या मधोमध गोळी घातली असल्याचं स्पष्टपणे दिसत होतं."
 
स्वयंसेवकांनी हल्ला केलेल्या ठिकाणावरून शेकडो मृतदेह गोळा केले.
 
हल्ल्यानंतर काही दिवस गोंधळाचं वातावरण होतं तसंच काही भागांत संघर्ष सुरू होता. त्यामुळं गुन्हा घडलेल्या ठिकाणाहून पुरावे गोळा करणं, त्यांची तपासणी करणं याची फारच कमी संधी होती आणि त्यात अनेक ठिकाणी चूकही झाली, असं काही तपासकर्त्यांनी सांगितलं.
 
"सुरुवातीचे पाच दिवस तर आम्ही इस्रायलच्या भूमीवर असलेल्या दहशतवाद्यांचा सामना करत होतो आणि सगळीकडं शेकडो मृतदेह पडलेले होते. त्यापैकी काही मृतदेह जळालेले होते, काहींचे अवयव नव्हते, ते पूर्णपणे कापले होते," असं गोलान म्हणाल्या.
 
पोलिस प्रवक्ते डीन एल्सडन यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं की, हा असा क्षण होता जेव्हा एकाचवेळी अनेकांची हत्या करण्यात आली. आमचं पहिलं काम हल्ल्याच्या ठिकाणी तपास नव्हे, तर पीडितांची ओळख पटवण्याचं होतं. लोकांना त्यांच्या आप्तेष्टांबरोबर काय झालं हे जाणून घ्यायचं होतं."
 
ओळख पटवण्यासाठी जेव्हा मृतदेह शूरा लष्करी तळावर आणले गेले त्यावेळी त्याठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी तपास अधिकाऱ्यांना काही महत्त्वाचे पुरावे दिले.
 
हे पुरावे या लष्करी तळावर मृतदेह ठेवण्यासाठी तयार केलेल्या तात्पुरत्या तंबूंमध्ये मिळाले होते.
 
आम्ही त्याठिकाणी गेलो तर, तिथं काही ट्रॉली, स्ट्रेचर हे कंटेनरच्या समोर ठेवलेले होते. याच कंटेनरमध्ये काही काळापूर्वी मृतदेह ओळख पटवण्यासाठी ठेवले होते.
 
गाझामध्ये इस्रायलकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यांदरम्यान आकाशात उडणाऱ्या लढाऊ विमानांचा आवाज आम्हाला ऐकू येत होता.
 
त्याठिकाणी असलेल्या टीमनं आम्हाला सांगितलं की, त्याठिकाणी आणलेल्या मृतदेहांबरोबर लैंगिक अत्याचार, बलात्कार झाल्याच्या खुणा दिसून आल्या. काही मृतदेहांचा शरिराचा खालचा भाग अक्षरशः मोडलेला होता.
 
फॉरेन्सिक टीमच्या सदस्य असलेल्या कॅप्टन मायन बीबीसीशी बोलताना म्हणाल्या की, "आम्हाला प्रत्येक वयाच्या महिला दिसल्या. आम्ही रेप पीडित महिला पाहिल्या. अशा महिला पाहिल्या ज्यांच्याबरोबर काहीतरी चुकीचं घडलेलं होतं. आम्ही मृतदेहांवर असलेल्या जखमा पाहिला. अनेक ठिकाणी कापलेले होते आणि त्यांच्यावर अत्याचार झाल्याचं आमच्या लक्षात येत होतं."
 
त्यांनी पाहिलेल्या मृतदेहांपैकी किती मृतदेहांवर अशा जखमा होत्या असं आम्ही त्यांना विचारलं?
 
उत्तर देताना ते म्हणाले की, "खूप साऱ्या अगदी लहान मुलींपासून वृद्ध महिलांपर्यंत सर्वांच्या मृतदेहावर जखमा होत्या. "
 
पीडितांचा आकडा समजणं कठीण
मृतदेह ज्या अवस्थेत आहेत, त्यावरून हमासच्या हल्ल्यातील पीडितांचा आकडा सांगणं कठीण आहे.
 
ऐव्हिगायेल नावाच्या सैनिक म्हणाल्या की, पीडितांची संख्या अनेक पटीनं अधिक आहे.
 
"याबाबत सांगणं कठीण आहे. मी खूप जळालेले मृतदेहही पाहिले. मृत्यूपूर्वी त्यांना काय सहन करावं लागलं असेल, याचा विचारही मी करू शकत नाही. अनेक मृतदेह असे आहेत, ज्यांच्या कमरेखालचा पूर्ण भागच नव्हता. त्यांच्यावर बलात्कार झाला किंवा नाही, हेही मला माहिती नाही. पण काही महिलांवर बलात्कार झाला का? असं जर तुम्ही स्पष्टपणे विचारलं तर, हो!
 
मोठ्या संख्येनं तसं घडलं होतं. ही संख्या खूप जास्त होती," असं त्या म्हणाल्या.
 
"अनेक मृतदेहांचा लहानसे भागच आम्हाला सापडले. कुठं फक्त बोट, कुठं हात तर कुठं पाय सापडले. त्यावरून ओळख पटवणं अत्यंत कठिण होतं. काही लोक जळून राख झाले होते. त्यांचं काहीही शिल्लक राहिलं नाही. त्यामुळं या हिंसाचारात किती लोक मारले गेले हे आपल्याला कधीही कळू शकणार नाही," असं डॉ. एलकायम लेव्ही यांनी म्हटलं.
 
चर्चेत सहभागी झालेले काही लोक खासगीत बोलताना पीडितांची संख्या मोठी असल्याचं सांगतात, पण ते लगेच असंही म्हणतात की अजून पुरावे गोळा केले जात आहेत.
 
डॉ. एलकायम लेव्ही सिव्हिल कमिशनचं नेतृत्व करत आहेत. हे कमिशन लैंगिक हिंसाचाराचे पुरावे गोळा करत आहे. या कमिशननं 7 ऑक्टोबरला सुनियोजित कट करून करण्यात आलेला हिंसाचार आणि मानवते विरोधातील गुन्ह्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्याची मागणी केली आहे.
 
"आम्हाला पॅटर्न स्पष्टपणे दिसतो. ही अचानक केलेली घटना नव्हती. ते स्पष्ट आदेशासह आलेले होते. नरसंहारासारखे बलात्कार करण्याचे हे आदेश होते, " असं त्यांचं म्हणणं आहे.
 
ऐव्हिगायेल यांनी याच्याशी सहमती दाखवत म्हटलं की, शूरा बेसमध्ये जो मृतदेह आले त्यात बरंच साम्य होतं.
 
"एका भागातून ज्या महिलांचे मृतदेह आले होते, त्या सर्वांबरोबर सारखंच कृत्य करण्यात आल्याचं दिसत होतं. काही महिलांचा बलात्कार एकसारख्या पद्धतीनं केलेला होता. मृतदेहांमध्येही साम्य पाहायला मिळालं. तर काही प्रकरणं अशी होती, ज्यात बलात्कार झालेला नव्हता पण अनेक गोळ्या घालण्यात आल्या होत्या. कट्टरतावाद्यांच्या वेगवेगळ्या गटांनी वेगवेगळ्या पद्धतीनं क्रौर्य केलं, असं वाटतं.
 
पोलीस प्रमुख याकोव्ह यांनी पत्रकारांना म्हटलं की, "हा पूर्णपणे विचारपूर्वक आणि नियोजन करून केलेला हल्ला होता."
 
लैंगिक हिंसाचार नियोजित होता?
तपासात सहभागी असलेले इस्रायलच्या सायबर क्राइम युनिटचे डेवीड कात्झ यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं की, हा लैंगिक अत्याचार आधीच योजना आखून केलेला होता, हे सिद्ध करणं आता घाईचं ठरेल. पण हमासच्या हल्लेखोरांच्या फोनमधून जो डेटा मिळाला आहे, त्यावरून सर्वकाही नियोजित पद्धतीनं केलं, याचे संकेत मिळतात.
 
"जे काही घडलं ते पूर्णपणे नियोजन करून घडलं. काहीही योगायोग नव्हता. व्यवस्थिरित्या बलात्कार करण्यात आले," असं ते म्हणाले.
 
इस्रायलनं हमासकडं मिळालेल्या दस्तऐवजांकडेही इशारा केला. या दस्तऐवजांच्या आधारे इस्रायलनं लैंगिक अत्याचाराची योजना आखण्यात आली होती, असं वाटत असल्याचा दावा केलाय.
 
इस्रायलनं चौकशीदरम्यानच्या काही क्लिप्सदेखील जारी केल्या आहेत. त्यात पकडलेले हल्लेखोर लैंगिक अत्याचारासाठी महिलांना लक्ष्य करण्यात आल्याचं सांगत आहेत.
 
गेल्या आठवड्यात यूएन वुमननं एक वक्तव्य प्रसिद्ध करून, हमासचा हल्ला आणि त्यादरम्यान महिलांवर करण्यात आलेल्या लैंगिक हिंसाचाराचा निषेध केला होता.
 
ते वक्तव्य प्रसिद्ध करण्याच्या पूर्वी डॉ. एलकायम लेव्ही यांनी म्हटलं होतं की, आंतरराष्ट्रीय महिला संघटनांनी पाठिंबा मागितल्यानंतरही खूप उशिरा प्रतिक्रिया दिली.
 
"मानवी इतिहासात नोंद झालेलं हे सर्वात मोठं क्रौर्य आहे," असंही त्यांनी म्हटलं.
 
सात ऑक्टोबरची पहाट झाली त्यानंतर हा देश पूर्वीसारखा राहिला नाही, असं पोलीस प्रमुख याकोव्ह शब्ताई यांनी म्हटलं.
 
शूरा आयडेंटिफिकेशन युनिटच्या कॅप्टन मायान म्हणाल्या की, "याठिकाणी काहींनी सकाळी सुंदर दिसण्यसाठी मेकअप केला होता, कानात सुंदर कानातले परिधान केले होते, त्या महिलांबरोबर जे झालं ते पाहून सर्वाधिक त्रास झाला."
 
महिला म्हणून या हल्ल्यानं त्यांच्यावर काय परिणाम केला? असं मी त्यांना विचारलं.
 
त्यावर त्या म्हणाल्या,"दहशत, यामुळं आम्ही भेदरलेलो आहोत."

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

आश्चर्यकारक! माणसाने गिळली जिवंत कोंबडी, जीव गुदमरुन मृत्यु

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातून पाच वर्षाच्या मुलाचे अपहरण, गुन्हा दाखल

अमित शहांच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकर संतापले, म्हणाले- भाजपची जुनी मानसिकता समोर आली

LIVE: मुंबईत सीबीआयची धाड,भ्रष्टाचार प्रकरणी दोन आयआरएससह 7 जणांना अटक

मुंबई बोट दुर्घटना: बचाव कार्यात हेलिकॉप्टर गुंतले, 77 प्रवाशांची सुटका, 2 ठार

पुढील लेख
Show comments