Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

100 मुलांची लैंगिक अत्याचार करुन हत्या करणारा नराधम, स्वतःच दिली कबुली

Webdunia
- शाहिद असलम आणि जुबैर आजम
सूचना- या लेखातील तपशील काही वाचकांना विचलित करू शकतात.
 
वृत्तपत्राच्या कार्यालयाबाहेर एक रिक्षा थांबते. एक मध्यमवयीन इसम त्यातून बाहेर येतो. रिसेप्शनवर तो आपली ओळख सांगतो, 'माझं नाव जावेद इक्बाल. मीच आहे तो 100 मुलांचा खुनी.'
 
रहस्यकथा, क्रूरकथा वाचायला-ऐकायला अनेकांना आवडतं. गुन्हेवृत्त, क्रौर्य याविषयी माणसाला आकर्षण का असतं?
 
भावनाशील मानवी स्वभावाचा हा एक कंगोरा अद्याप मानसशास्त्रज्ञ पूर्णतः उलगडू शकलेले नाहीत. पण कुठल्याही काल्पनिक रहस्यकथेत किंवा क्रूरकथेत आतापर्यंत वर्णन केलं गेलं नसेल असं भयाण कृत्य वास्तवात आलं आणि साऱ्या जगाचेच डोळे विस्फारले गेले.
 
क्रूर, नराधम, पाशवी, विकृत, भीषण अशी सगळी विशेषणं फिकी पडावीत इतक्या वाईट पद्धतीने क्रौर्याची परिसीमा गाठत जावेद इकबाल नावाच्या इसमाने एक-दोन नव्हे 100 मुलांचा जीव घेतला आणि त्यांच्या मृतदेहाची अमानवी, निर्दयी पद्धतीने विल्हेवाट लावली.
 
वय वर्षं 6 ते 16 दरम्यानच्या 100 मुलांची नृशंस हत्या करणारा माणूस कसा काय घडू शकतो? जावेद इकबाल खरंच मानसिक रुग्ण होता का? की प्रसिद्धीच्या हव्यासापोटी त्यानं हे क्रूरकर्म केलं?
 
मुलांचा गळा आवळून, त्यांचे हात-पाय आदी अवयव अॅसिडमध्ये बुडवून त्यांची विल्हेवाट लावणारा हा क्रूरकर्मा इतका कसा काय सर्वसामान्य दिसू शकतो की तो स्वतः गुन्ह्याची कबुली द्यायला आल्यावर ऐकणाऱ्याचा विश्वासही बसू नये?
 
जगाला हादरवणाऱ्या या 100 मुलांच्या हत्याकांडाबद्दल अजूनही पूर्णसत्य उलगडलं नसल्याचं काही जण सांगतात. खरोखर हे 100 खून झाले का यावरही काही जण शंका उपस्थित करतात. पाकिस्तानी न्यायालयाने या नराधमाला 'जशास तसे' न्यायाने मृत्युदंड द्यावा असा आदेश दिला होता.
 
त्याच्याही शरीराचेही 100 तुकडे करावेत असं यात अभिप्रेत होतं. वर कराचीतल्या भर चौकात त्याला हा मृत्युदंड द्यावा असा निकाल दिला गेला. अर्थात त्याला मानवतावाद्यांचा विरोध झाला.
 
पाकिस्तानी घटनेत हे बसत नाही, अशीही टीका झाली. पण प्रत्यक्ष कुठल्याही शिक्षेची कार्यवाही होण्यापूर्वीच होत्याचं नव्हतं झालं आणि या कोड्याचे अनेक पैलू सुटायचे राहिले ते कायमचेच.
 
100 मुलांचा गळा दाबून खून केला. मग मृतदेहांचे तुकडे केले आणि ते हायड्रोक्लोरिक अॅसिडमध्ये बुडवून नष्ट केले. त्यातून उरलेले अवशेष रावी नदीत फेकून दिले. या पाकिस्तानी क्रूरकर्म्याने हे कसं केलं असावं, तो हे करायला का आणि कसा धजावला असावा हे उलगडण्याचा 'बीबीसी उर्दू'ने प्रयत्न केला.
 
लाहोर आणि पाकिस्तानच नव्हे तर जगाला धक्का देणाऱ्या या हत्याकांडाशी निगडित मुख्य आरोपी, इतर गुन्हेगार आणि साक्षीदार आता बहुतांशी अस्तित्त्वात नसले तरी जावेद इकबालचे काही नातलग आणि या हत्याकांडाच्या जागेशी आणि तपासाशी संबंधित काही व्यक्तींशी बोलून, जावेदची डायरी आणि इतर काही कागदपत्रं तपासून बीबीसीने केलेला हा रिपोर्ट.
 
1999 मधली डिसेंबरच्या थंडीची ती रात्र होती. लाहोरच्या पंजाब प्रांताच्या पोलीस मुख्यालयात रात्री साडेनऊ वाजता वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रेस कॉन्फरन्स घेऊन 100 मुलांचा खुनी कसा निसटला याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करत होते.
 
त्याच वेळी पाकिस्तानातल्या प्रमुख वृत्तपत्रापैकी एक असलेल्या 'जंग'च्या लाहोर इथल्याच कार्यालयाबाहेर एक रिक्षा थांबते. एक मध्यमवयीन इसम त्यातून बाहेर येतो. रिसेप्शनवर तो आपली ओळख सांगतो - 'माझं नाव जावेद इक्बाल. मीच आहे तो 100 मुलांचा खुनी.'
 
100 मुलांवर लैंगिक अत्याचार करून त्यांचा खून करणारा आणि मृतदेहांचीदेखील विटंबना करणारा नराधम एवढ्या शांतपणे येतो काय आणि स्वतःच स्वतःच्या गुन्ह्याची कबुली देतो काय, पोलिसांना आपण गुन्हा कसा केला हेदेखील पत्र लिहून सांगतो काय आणि तरीही या प्रकरणाचा छडा शेवटपर्यंत पूर्ण लागत नाही हे आक्रित नेमकं काय?
 
हे समजून घेण्यासाठी जावेद इकबालची थोडी पार्श्वभूमी जाणून घ्यावी लागेल.
 
भारताशी नाळ
जावेद इकबालने हे सगळे खून लाहोरमधल्या 16B, रावी रोड या घरात केले असा दावा केला जातो. हे घर तसं छोटंसं पण तरी तीन प्रशस्त खोल्यांचं. जावेदने ते भाड्याने घेतलं होतं. या घरात नेमकी किती माणसं राहात होती? जावेदचे कुटुंबीय कोण? ते मूळचे कुठले?
 
जावेद हा मोहम्मद अली या व्यापाऱ्याचा मुलगा. ब्रिटीश काळात ते भारतातच व्यवसाय करायचे. पंजाबात त्यांचं मोठं घर होतं.
 
1947 च्या फाळणीनंतर मोहम्मद अलींना भारतातलं सगळं सोडून रेफ्युजी म्हणून पाकिस्तानात यावं लागलं. त्यांनी लाहोरला आल्यावर अक्षरशः शून्यातून विश्व साकारलं. त्यांचं कुटुंब मोठं होतं. पाच मुलं आणि चार मुलींमध्ये जावेद हा सहावं अपत्य होता.
 
जावेदच्या कुटुंबीयांनी त्याच्याशी असलेलं नातं खूप पूर्वीच तोडलं होतं. तो एकटाच राहायचा. पण झिया उल हक हे जावेदेचे मोठे भाऊ बीबीसीशी बोलताना सांगतात की, "लहानपणापासून जावेद थोडा वेगळा होता. जावेद हट्टी होता आणि हेकेखोर. वडिलांनी कुठली गोष्ट द्यायला नकार दिला तर तो रडून धमकावून ती मिळवत असे."
 
"वडिलांना त्याची काळजी वाटत असे. पण आमच्या कुटुंबीयांपैकी एक बुजुर्ग स्नेही एकदा म्हणाले होते की, हा जावेद एक दिवस मोठं नाव कमवेल. आता ते चांगलं काम करून की कुकर्माने हे काही माहीत नव्हतं."
 
बाललैंगिक शोषणाचा गुन्हा
पुढे वडिलांनी जावेदचं कॉलेज शिक्षण सुरू असतानाच त्याला लाहोरच्या शादबाग इथे एक कारखाना उघडून दिला. या कारखान्याच्या निमित्ताने जावेदने बड्या बड्या लोकांशी ओळखी वाढवल्या. जावेद इकबाल हे हत्याकांड करण्यापूर्वीपासूनच बाललैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात एकदा पोलिसांच्या ताब्यात होता.
 
त्याला एकदा तुरुंगवासही झाला होता. जावेदचे काळे उद्योग शादबागेतूनच सुरू झाले असल्याचं बीबीसीशी बोलताना नसीम मुर्शीद यांनी सांगितलं.
 
शादबागच्या कारखान्याच्या निमित्ताने अनेक पोलिसांशीही जावेदचं सूत जमलं होतं, असं म्हणतात. त्यातलाच एक नसीम मुर्शीद. तो पूर्वी पोलीस कौन्स्टेबल होता.
 
नसीम BBC शी बोलताना म्हणाला की, जावेद त्या वेळच्या स्थानिक बाजार समितीचा अध्यक्षही होता. त्याच्या कारखान्यात छोट्या-मोठ्या कामांसाठी तो गरीब मुलं ठेवत असे.
 
जावेदचा भाऊ झिया उल हक सांगतो की, फॅक्टरीतल्या कामासाठी मुलं आवश्यक होती. या मुलांना जावेद जीव लावत असे. त्यांच्यासाठी नवे कपडे खरेदी करून त्यांना घालायला लावत असे. शूज घेत असे आणि फिरायलाही नेत असे.
 
पण नसीम मुर्शीद यांनी मात्र बीबीसीला वेगळीच बाजू सांगितली.
 
मुलांशी गैरवर्तन करत असल्याची तक्रार जावेदविरोधात करण्यात आली होती. 1990 मध्ये शादबाग पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली होती. पण पोलिसांनी पकडण्याच्या आतच जावेद फरार झाला होता.
 
पोलिसांनी मग जावेदच्या वडिलांना आणि एका भावाला या प्रकरणी अटक केली होती. या प्रकरणातून जावेदने त्याची सुटका करून घेतली खरी पण त्याबदल्यात त्याला स्टँपपेपरवर माफीनामा लिहून द्यावा लागला होता. पुन्हा शादबाग एरियात पाय ठेवणार नाही, असंही त्यानं लिहून दिलं होतं.
 
त्याला हद्दपार करण्याची शिक्षा झाली कारण त्यानं मुलांचं लैंगिक शोषण केल्याचं कबूल केलं होतं, असं नसीम सांगतो.
 
'त्यांनी मला मारून टाकलं' - सूडनाट्याची सुरुवात?
1990 मध्ये शादबाद पोलीस ठाण्यात झालेल्या तक्रारीनंतर जावेदने बस्तान हलवलं आणि लाहोरच्याच रावी रोड भागालगत नवीन जागी व्यवसाय सुरू केला. व्हीडीओ गेम पार्लरही तो चालवायचा. त्याच्या विरोधात बाललैंगिक शोषणाची दुसरी तक्रार दाखल झाली 1998 मध्ये.
 
त्याला तुरुंगाची हवाही खावी लागली. पण त्यातून तो सुटला आणि तिथेच सूडनाट्याची सुरुवात झाली असावी. "आम्ही त्याला सोडवून आणलं हेच मोठं पाप झालं", असं त्याचा भाऊ आणि इतर कुटंबीय आता सांगतात. कदाचित तसं झालं नसतं तर पुढची 100 मुलं वाचली असती.
 
1998 मध्ये लाहोरच्या गाझियाबाद भागात जावेद राहायचा. तिथे त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता आणि त्याबद्दल त्याच्या डायरीत नोंद सापडते. '17 सप्टेंबर 1998 च्या रात्री त्यांनी मला मारून टाकलं' असं जावेद लिहितो.
 
त्या रात्री नेमकं काय घडलं याच्या वेगवेगळ्या कथा नंतर समोर आल्या. पण जावेदच्या नोंदीप्रमाणे, 'मी 15 तारखेला बाहेर फिरायला गेलो असताना एक 18 वर्षांचा गरजू मुलगा मला दिसला. तुला काम हवंय का विचारल्यावर तो हो म्हणाला आणि मी त्याला बरोबर घेतलं.
 
पुढे आणखी एक मुलगा कामाच्या शोधात होता. तो भेटला. त्यालाही बरोबर घेऊन घर गाठलं. 17 सप्टेंबरच्या रात्री मी या दोन नवीन कामगारांबरोबर घरी झोपलो होतो. मी बेडवर होतो आणि उशाखाली माझ्या घराची किल्ली असायची. ते दोघं पथारी अंथरून जमिनीवर झोपले होते. शुद्ध हरपण्यापूर्वी मला एवढंच आठवत आहे. 8 ऑक्टोबरला मी शुद्धीवर आलो तेव्हा आईने सांगितलं की, माझ्याबरोबर खूप मोठा 'हादसा' झाला होता.'
 
जावेदने सांगितली ती दुर्घटना म्हणजे त्याच्या खुनाचा प्रयत्न असल्याचा त्याचा दावा त्याने डायरीत केला आहे. त्यातल्या एका मुलाने मला आणि आणखी एका अल्पवयीन मुलाला ठार मारलं, असं तो लिहितो. पण त्याच्या भावाने पोलिसात दिलेली फिर्याद वेगळीच घटना कथन करते.
 
त्या रात्री काय घडलं?
त्या दिवशी जावेदचे दोन भाऊदेखील त्याच्या घरात राहायला गेले होते. त्यापैकीच एकाने पोलीस तक्रार दाखल केली होती. त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीप्रमाणे, जावेद त्या दिवशी दोन अल्पवयीन मुलांना बरोबर घेऊन आला. एक मालीश करणारा होता.
 
त्या दोघांना घेऊन तो वरच्या माळ्यावर झोपला तर आणि दोघे भाऊ खालच्या मजल्यावर झोपलो होतो. मध्यरात्रीनंतर आम्हाला वरून आवाज आले. आम्ही उठून बघेपर्यंत तो मालीश करणारा मुलगा पळून गेला होता आणि जावेद दुसऱ्या मुलासह रक्ताच्या थारोळ्यात होता.
 
जावेदवर नंतर बरेच दिवस उपचार सुरू होते. त्याच्या डोक्याला मार लागला होता आणि काही दिवस तो कुणाला ओळखतही नव्हता असं त्याचा भाऊ सांगतो. आईने त्याची सुश्रुषा केली, असं झिया उल हक हा त्याचा भाऊ सांगतो.
 
भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी केलेल्या तपासाअंती तो मालीश करणारा मुलगा सापडला. पण त्याने वेगळीच कहाणी सांगितली. त्या मुलाने सांगितलं की, मसाज करून देण्यासाठी म्हणून जावेदने त्याला घरात आणलं पण रात्री त्याच्याबरोबर अतिप्रसंग केला.
 
जावेद झोपल्यानंतर त्या तेलमालीश करणाऱ्या मुलाने बाजूची बंदूक उचलली आणि त्याच्या दट्ट्याने जावेदवर हल्ला केला. त्याला जखमी करून पळून गेला. यानंतर पोलिसांनी जावेदविरोधात बाललैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली होती.
 
'या घटनेत आपल्याला पोलिसांनी गोवलं आणि त्याचा आईलाही खूप त्रास झाला. आपल्या मुलाची यातना बघतच तिने प्राण सोडलं आणि म्हणूनच मी 100 मुलांना अशाच यातना देईन आणि त्यांच्या आईसुद्धा असाच शोक करतील, असा पण केला.' अशी आपल्या प्रतिशोधाची कहाणी जावेदने नंतरच्या त्याच्या कबुलीजबाबात सांगितली.
 
पण जावेदचे वकील फैजल नजीब त्याच्या डायरीतल्या नोंदीबद्दल वेगळाच मुद्दा मांडतात. BBCशी बोलताना नजीब म्हणाले, "जावेद म्हणायचा मला मारून टाकलं, याचा अर्थ त्या घटनेत त्याचं पौरुषत्व संपलं. तो लैंगिकदृष्ट्या निष्क्रिय झाला होता."
 
बी 16, रावी रोड, लाहोर
त्या दुर्घटनेनंतर जावेदचं चित्त थाऱ्यावर नव्हतंच पण त्याची आर्थिक स्थितीही लयाला जाऊ लागली. त्या वेळी त्याने रावी नदीच्या जवळ असणाऱ्या या घरात राहायला सुरुवात केली. सईद मुनीर हुसैन शाह नावाच्या इस्टेट एजंटने त्याला हे घर दाखवलं. त्या वेळी या परिसरात फार घरं नव्हती. या सईद शाहशीसुद्धा BBC ने संवाद साधला.
 
"घर भाड्याने घेतलं त्यावेळी जावेद आपली आई, बायको आणि मुलासह इथे राहणार होता. भाड्यासाठी जायचो त्या वेळी बऱ्याचदा त्याची आई पैसे द्यायची. या घरात असं काही घडेल अशी कल्पनाही केली नव्हती." जावेदकडे बघता शंकेलाही वाव नव्हता, असं सईद शाह सांगतो.
 
या हत्याकांडाचं विशेष हेच आहे की, एवढं सगळं घडत असताना आसपासच्या परिसरात कुणालाच काही वावगं दिसलं नाही. एकही माणूस या घटनेचा साक्षीदार नाही किंवा कुणाला साधी शंकाही कधी आली नाही, असं परिसरात राहणाऱ्यांनी पोलिसांना तपासादरम्यान सांगितलं.
 
जावेदने एका मागोमाग एक 100 मुलं इथे मारली, त्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावली आणि कुणाला जराही पत्ता लागला नाही. 4-5 महिने मृत्यूचं आणि यातनांचं थैमान सुरू होतं तरी कुणाला पत्ता नव्हता. फक्त शेजाऱ्यापाजाऱ्यांनाच नव्हे तर पोलिसांनाही असं काही इथे घडलं असेल हे खरं वाटलं नव्हतं.
 
खुद्द जावेदने आपल्या गुन्ह्याचा पाढा वाचणारं रीतसर पत्र पोलिसांना लिहिलं होतं. ते वाचूनही पोलिसांनी ते गंभीरपणे घेतलं नव्हतं. जावेदलाच पुढे येऊन आणखी एक कबुलीनामा लिहावा लागला आणि तो थेट वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये पत्रकारांसमोर वाचावा लागला. त्यानंतर सूत्र हलली आणि भीषण कांड उजेडात आलं.
 
जावेद इकबालच्याच डायरीतल्या नोंदीनुसार, 20 जुलै 1999 पासून त्याने मुलांना मारण्याचा सिलसिला सुरू केला. 26 जुलैला त्याच्या आईचं निधन झालं. त्यानंतर त्याने खून करण्याचा सपाटाच लावला. 13 नोव्हेंबरला त्याने 100 व्या मुलाला मारलं.
 
जावेदबरोबर राहणारा मुलगा आता कुठे?
या काळात जावेदबरोबर नदीम नावाचा बारा वर्षांचा मुलगा राहात होता. घरातून पळून आलेला नदीम कामाच्या शोधात असताना जावेदला भेटला. जावेदच्या केसमध्ये पोलिसांनी नदीमलासुद्धा सहआरोपी म्हणून उभं केलं होतं.
 
पण त्याची पुराव्याअभावी निर्दोष सुटका झाली. नदीम आता 35 वर्षांचा झाला आहे. बायको-मुलासह तो त्याच्या गावी राहतो.
 
बीबीसीने त्याचीही भेट घेऊन चौकशी केली. "जावेदने मला काम दिलं. किती पैसे दिले आठवत नाही. पण पापड विकण्यासाठी मुलं घेऊन यायचं काम होतं. जावेदच्या घरात 15 दिवस राहिलो, त्यावेळी किमान 4-5 मुलं घरात असायची. पळून आलेली किंवा अनाथ मुलं काम मिळेल या आशेने यायची.
 
"पण या काळात मी कुठल्या मुलाचा छळ होताना किंवा मारताना पाहिलेलं नाही." नदीम सांगतो. आज 22 वर्षांनंतरही त्या घटनेचे पडसाद त्याच्या आयुष्यावर उमटलेले जाणवतात.
 
जावेदचा कबुलीनामा एकदा नव्हे दोनदा
या घटनेचा एकही साक्षीदार नाही. कुणी तक्रार केली नाही. पोलिसांनी तपास सुरू केला नाही, तर हे हत्याकांड उघडकीस आलं कसं? खुद्द जावेदनेच आपण काय काय केलंय हे सांगणारं पत्र पोलिसांना लिहिलं. अर्थातच पोलिसांनी ते गांभीर्याने घेतलं नाही.
 
अखेर जावेदने लिहिलेलं पत्र वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या वाचनात आलं. जावेदने गुन्हा कसा केला वगैरे कारणासहित सविस्तर लिहिलं होतं. मग एका डीएसपीकडे केस सोपवली. आता या केसमध्ये पुढे काय झालं याची वेगवेगळी व्हर्जन्स बीबीसीकडे आली.
 
डीएसपीने रावी रस्त्यावरच्या घराला भेट दिली तेव्हा त्याला काही अॅसिडने भरलेले ड्रम सापडले त्यात मानवी अवयव होते. मग जावेदला पोलीस ठाण्यात बोलावलं गेलं. पण त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याऐवजी तो मनोरुग्ण आहे असं मानून पोलिसांची दिशाभूल करतोय असं म्हणत त्याला सोडून देण्यात आलं. पोलिसांनी जे करायला हवं होतं ते मग पत्रकाराने केलं.
 
अटकेपूर्वी थेट वर्तमानपत्रात मुलाखत द्यायला हजर
जंग या प्रसिद्ध पाकिस्तानी वृत्तपत्राचे क्राइम एडिटर जमील चिश्ती ते पत्र वाचून कोड्यात पडले होते. 2 डिसेंबर 1998 चा तो दिवस त्यांना चांगला आठवतो, असं ते सांगतात. त्यांच्यासमोर एका बंद जाडजूड लिफाफ्यातून त्या दिवसाचीच नव्हे तर आतeपर्यंतची सर्वांत मोठी क्राइम न्यूज येऊन पडली होती. लाहोर किंवा पाकिस्तानच नव्हे तर जगाला या बातमीने हादरवलं.
 
जावेदने आपल्या गुन्ह्याचं रीतसर वर्णन त्यात केलं होतं. कुठल्या मुलांना मारलं त्यांच्या अगदी छायाचित्रांसहित इत्यंभूत माहिती त्यानेच स्वतः लिहून पाठवली. "माझाही सुरुवातीला त्या पत्रावर विश्वास बसणं अवघडच होतं. इतक्या क्रूरपणे कुणी मुलांना कसं मारू शकेल? पण तिथे जाऊन बघण्यात काहीच अडचण नव्हती."
 
बी 16, रावी रोड या पत्त्यावर जमील थडकले तेव्हा घर बंद होतं. पण सैद मुनीर हुसैन शाह हा प्रॉपर्टी डिलर त्यांना भेटला आणि त्याला घेऊनच ते घरात शिरले.
 
"आत गेल्यावर पत्रात लिहिलं होतं तसं तंतोतंत सगळं सापडलं. मुलांचे फोटो दिसले. कपड्यांनी भरलेली बॅग 'कपडे' असं लिहिलेल्या लेबलसह होती. तीच गोष्ट मुलांच्या शूजची. तिथे भरलेले ड्रम दिसले.
 
त्याचं झाकण उघडताच तीव्र दर्प आला आणि मला गरगरायला लागलं. हात घालून पाहताच हात जळलाच. मानवी अवयव होते त्या ड्रममध्ये. त्या भयंकर वास आणि वातावरणाने मला घेरी आली", जमील चिश्ती सांगतात.
 
मग पोलिसांना पाचारण करण्यात आलं आणि देशाला हादरवणारी क्राइम स्टोरी उघड झाली. पण तोवर जावेदचा पत्ता नव्हता. तो गायब झाला होता. अखेर तो जमील चिश्तींनाच भेटला जंगच्या ऑफिसमध्ये आणि गुन्हा का केला, कसा केला याची सविस्तर उत्तरं देणारा इंटरव्ह्यू त्याने दिला.
 
पोलिसांना दिसावे, सहज हाताला लागावे म्हणूनच पुरावे मागे ठेवल्याचं त्याने या वेळी सांगितलं. तिथूनच पोलिसांनी त्याला अटक केली.
 
कोर्टातला ड्रामा आणि भयंकर ऐतिहासिक निकाल
जावेद इकबालने आपण केलेला गुन्हा कबूल करणारी, त्यामागची सूडकथा सांगणारी पत्रं दोन वेळा लिहिली खरी, पण प्रत्यक्ष कोर्टात सुनावणी सुरू झाल्यावर आपण निर्दोष असल्याचा दावा त्याने केला.
 
हरवलेल्या मुलांच्या तपासाबाबत पोलीस यंत्रणा किती उदासीन असते हे उघड पाडण्यासाठी आपण सगळं नाटक केल्याचा वेगळाच दावा त्याने केला. पण पत्रकारानंतर पोलिसांना सापडलेले अॅसिडने भरलेले ड्रम, त्यामधले मानवी अवयव, मुलांचे कपडे, शूज या सगळ्याचा पुरावा सादर करण्यात आला.
 
न्यायाधीशांनी या अभूतपूर्व केससाठी आणि अमानवी, निर्दयी कृत्यासाठी तितकीच कडक आणि दुर्मीळ शिक्षा सुनावली. जावेदने ज्या पद्धतीने मुलांना मारलं तसाच त्यालाही मृत्युदंड द्यावा.
 
त्याच्या शरीराचे 100 तुकडे करावेत आणि अॅसिडमध्ये टाकून मिनार- ए-पाकिस्तानच्या भर चौकात विरघळायला ठेवावेत अशी शिक्षा अल्लाहबक्ष रांझा या न्यायाधीशांनी सुनावली.
 
सगळं काही प्रसिद्धीसाठी?
जावेद इक्बाल मनोविकृत होता. त्याला प्रसिद्धीचा हव्यास होता. म्हणूनच त्याने ही गोष्ट रचली, असाही दावा केला जातो. कारण या प्रकरणा एकाही मुलाचा मृतदेह किंवा अवशेष सापडलेले नाहीत.
 
पण या प्रकरणी तपास करणारे पोलीस, जावेदला भेटलेले पत्रकार आणि न्यायाधीश यांना कुणालाही तो मनोरुग्ण असल्यासारखा जाणवला नव्हता.
 
'जंग'चे पत्रकार जमील चिश्ती म्हणतात, "कोर्टाने इतकी भयंकर शिक्षा सुनावली त्यावेळी मी कोर्टरूममध्ये होतो. जावेदच्या चेहऱ्यावर शिक्षा ऐकल्यावर काडीचाही परिणाम झालेला दिसला नाही. उलट तो माझ्याकडे पाहून हसला आणि धन्यवाद दिले."
 
नवाझ शरीफांना वाचवण्यासाठी लक्ष वळवलं?
जावेद इक्बाल केसची चर्चा सुरू होती त्याच वेळी पाकिस्तानात भली मोठी राजकीय उलथापालथ सुरू होती. 1999 च्या ऑक्टोबर महिन्यात तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांची सत्ता उलथवून लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांनी देशाचा ताबा घेतला.
 
तत्पूर्वी या लष्करी उठावाची कल्पना आल्याने जनरल मुशर्रफ यांना पदावरून हटवून त्यांचं विमान पाकिस्तानात उतरवायला शरीफ यांनी मनाई केली होती.
 
सत्ता काबीज करताच मुशर्रफ यांनी शरीफ यांच्यावर विमान हायजॅक केल्याचा ठपका ठेवत केस केली.
 
या सगळ्या प्रकरणातून जनतेचं आणि मीडियाचं लक्ष वळवण्यासाठीच जावेद इकबाल प्रकरण उकरून काढलं गेल्याचा दावा काही जणांनी केला.
 
वास्तविक अशा 100 हत्या झाल्या की नाहीत यावर शंका उपस्थित केली गेली. याविषयी तत्कालीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश अल्लाहबक्ष रांझा यांच्याशीच बीबीसी उर्दूने बातचीत केली.
 
जावेद प्रकरणी ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर एवढ्या वर्षांनी निवृत्त न्यायाधीश प्रथमच त्याविषयी माध्यमाशी बोलले.
 
या हत्याकांडाच्या सत्यतेविषयीच्या शंका उपस्थित करत त्यांना छेडलं असता रांझा म्हणाले, "ती शंभर मुलं जिवंत असल्याचा एक तरी पुरावा आहे का? खून झालेच नसते तर त्यापैकी एक जण तरी एवढ्या वर्षांत समोर आला असता." नवाझ शरीफ यांच्या प्लेन हायजॅक प्रकरणाशी याचा संबंध जोडण्यात येत होता त्याविषयी रांझा "हा सगळा मूर्खपणा आहे", असं म्हणत दावा निकालात काढतात.
 
जावेदने दिलेल्या फोटो आणि पत्त्याच्या आधारे त्या मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. पोलिसांना ती मुलं बेपत्ता असल्याचंच दिसलं.
 
शिवाय त्यातल्या काही मुलांच्या पालकांनी आपल्या मुलांचे कपडेही ओळखले. जावेदने ते पिशवीत बांधून ठेवले होते.
 
तुरुंगातच अंत - आत्महत्या की खून?
पाकिस्तानच्या इतिहासात कधीही न ऐकलेली भयंकर शिक्षा शरिया कायद्यानुसार भर चौकात देण्याचा निकाल आल्यावर त्याला विरोध झाला. सरकारमधूनही काही मंत्र्यांनी घटनाबाह्य शिक्षा असल्याचं सांगत विरोध केला.
 
त्याला फाशी द्यावी असं सुचवण्यात आलं. पण प्रत्यक्ष कुठल्याही शिक्षेची कार्यवाही होण्यापूर्वीच 8 ऑक्टोबर 2001 रोजी सकाळी तो कारागृहातच मृतावस्थेत आढळला. त्याने तुरुंगातल्या चादरीने फास आवळून घेतल्याचं तुरुंग अधिकाऱ्यांनी सांगितलं.
 
जावेदबरोबर शिक्षा सुनावलेला दुसरा गुन्हेगारही त्याच पद्धतीने छताला लटकलेला आढळला. ही आत्महत्या असल्याचा अधिकाऱ्यांनी दावा केला असला तरी त्याला मारलं असण्याची शक्यताच अधिक चर्चेत होती.
 
जगाच्या इतिहासातल्या सर्वांत क्रूर सीरिअल किलरपैकी एकाचा मृत्यूही त्याच्या कारनाम्याला साजेसा गूढ आणि संशयास्पद रीतीनेच झाला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुंबईत भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, तरुणाचा मृत्यू

Gas Cylinder:रेशनकार्ड धारकांना सरकार देत आहे 450 रुपयांना एलपीजी गॅस सिलिंडर

बटाट्यावरून वाद, वृद्ध महिलेवर हल्ला, नागपूरची घटना

दिल्लीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं नाव फायनल, सस्पेन्स आज संपणार?

जाधववाडी येथे ट्रकची दुचाकीला धडक, दोघे ठार

पुढील लेख
Show comments