Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Apollo 11- कसे होते खऱ्या आयुष्यातले नील आर्मस्ट्राँग?

Webdunia
- पल्लब घोष
नील आर्मस्ट्राँग चंद्रावरून परतल्यानंतर त्यांचा अनेक देशांच्या राजा-राण्यांकडून, राष्ट्राध्यक्षांकडून - पंतप्रधानांकडून सत्कार करण्यात आला.
 
खरंतर सारं जग त्यांच्या पायाशी होतं पण या प्रसिद्धीचा आनंद घेण्याऐवजी ते सार्वजनिक आयुष्यातून निवृत्त झाले.
 
या गूढ व्यक्तीविषयी लोकांना फार काही माहिती नव्हतं. पण नील आर्मस्ट्राँग प्रत्यक्षात कसे होते याची थोडीथोडी माहिती आता समोर यायला लागली आहे.
 
त्यांना एकांतात रहायला आवडत असावं. कदाचित हा चांद्रमोहिमेचा परिणाम असावा कारण चंद्रावर पोहोचल्यानंतर पृथ्वीवरचं आयुष्य त्यांना अगदीच साधासोपं - नीरस वाटत असावं.
 
मुलाखती देणं त्यांना आवडत नसे. म्हणूनच त्यांच्याविषयीच्या या चर्चा वाढल्या आणि चंद्रावर माणूस उतरल्याला जितकी वर्षं होत गेली, तितक्या या चर्चाही वाढत गेल्या.
 
नील आर्मस्ट्राँग यांना भेटणाऱ्या मोजक्या नशीबवान पत्रकारांपैकी मी एक होतो. आणि मला आजवर भेटलेलो तो सर्वात शहाणा माणूस होता.
 
अगदी सुरुवातीला तरुण वयात मी बीबीसी लुक ईस्टसाठी काम करायचो. नील आर्मस्ट्राँग यांना क्रेनफिल्ड युनिव्हर्सिटीकडून मानद पदवी देण्यात येणार होती आणि त्यांची मुलाखत घेण्यासाठी मला सांगण्यात आलं.
 
तेव्हा मी घाबरलो होतो. त्यांच्या नावाच्या-कर्तृत्त्वाच्या दडपणाखाली होतो. चंद्रावर उतरणारी ही पहिली व्यक्ती होती. तरीही त्यांचं वागणं अत्यंत सौहार्दपूर्ण होतं. त्यांनी माझं दडपण घालवत माझ्या प्रश्नांची मनमोकळी आणि विचारपूर्वक उत्तरं दिली.
 
अपोलो कार्यक्रम रद्द करण्यात आल्याबद्दलची माझी नाराजी मी त्यांच्याजवळ व्यक्त केली. कारण त्यामुळे माझं अंतराळात जाण्याचं लहानपणीचं स्वप्न काहीसं भंगलं होतं. त्यांना माझ्या भावना समजल्या.
 
मी त्यांना विचारलं, "'आर्मस्ट्राँग ड्रीम'चं काय होणार आता?"
 
"ते स्वप्न अजूनही कायम आहे. आता कदाचित ते शक्य नसेल. पण काही काळाने ते स्वप्न पुन्हा पाहता येईल. " हे सांगताना त्यांच्या डोळ्यांत एक चमक होती.
 
एका पत्रकाराला बातमी देण्यापेक्षा त्यांचं उत्तर हे एका तरुणाला चांद्रमोहिमांबद्दल आशा दाखवणारं होतं.
 
16 वर्षांनंतर मी त्यांना पुन्हा भेटलो.
 
ते अपोलो मोहिमांमधले अंतराळवीर जीन सेर्नन आणि जिम लोवेल यांच्यासोबत युकेमध्ये आले होते. मानव चंद्रावर उतरल्याला 40 वर्षं झाल्याबद्दल या टूरचं आयोजन करण्यात आलं होतं.
 
हिथ्रो विमानतळाजवळच्या एका साध्याशा हॉटेलमध्ये आम्हाला बोलवण्यात आलं. गुप्तता पाळण्याचे सक्त आदेश आम्हाला देण्यात आले होते.
 
कोणत्यातरी वेगळ्याच नावांनी या अंतराळवीरांचं बुकिंग या हॉटेलमध्ये करण्यात आलं होतं. ही मुलाखत कशाबद्दल आहे हे आम्हाला हॉटेलच्या स्टाफने विचारल्यावर आम्ही गोल्फबद्दल मुलाखत असल्याचं सांगितलं होतं.पण अंतराळवीरांनी घातलेले कपडे पाहता हे फारसं पटण्याजोगं नव्हतं.
 
आपण अनेक वर्षांपूर्वी भेटल्याची आठवण मी आर्मस्ट्राँग यांना करून दिली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर अगदी ओळखीचं हसू होतं. त्यांना तो दिवस आठवत होता आणि त्याबद्दल ते अगदी प्रेमाने बोलले.
 
सँडविच खाताखाता आम्ही गप्पा मारल्या. पण मुलाखत द्यायचं मात्र त्यांनी नाकारलं. त्यांना त्यांच्या अंतराळवीर सोबत्यांकडून प्रसिद्धी हिरावून घ्यायची नव्हती.
 
त्यांच्या आयुष्यावरील 'आर्मस्ट्राँग' या डॉक्युमेंटरीमधून आता त्यांची ही बाजू समोर येतेय. चंद्रावर मानव उतरल्याला 50 वर्षं झाल्याच्या निमित्ताने ही डॉक्युमेंटरी प्रसिद्ध करण्यात येत आहे.
 
त्यांचा धाकटा मुलगा मार्क आणि नात कॅली याबद्दल अधिक सांगण्यासाठी बीबीसी न्यूजच्या स्टुडिओत आले होते. हे दोघेही संगीतकार आहेत.
 
नासाच्या त्या चांद्रमोहिमेचं थोडं फुटेज आम्ही त्यांना दाखवलं.
 
लाँचपॅडवरून चालणाऱ्या आपल्या आजोबांकडे कॅली डोळे विस्फारून पाहत होती. तेव्हाचे 39 वर्षांचे आजोबा आणि तिचे आता 56 वर्षांचे असणारे वडील किती एकसारखे दिसतात याचंही तिला आश्चर्य वाटत होतं.
 
त्या दोघांच्याही चेहऱ्यांवर कौतुक होतं.
 
खरंतर मार्क आणि कॅली या दोघांनाही या मोहिमेबद्दल सर्व माहिती होतं. पण तरीही त्यांची नजर त्या क्षणांवर खिळलेली होती.
 
"हे दरवेळी नव्याने पाहिल्यासारखं वाटतं" मार्क कॅलीला म्हणाला.
 
लुनार मॉड्यूलमधून चंद्रावर उतरणाऱ्या नील आर्मस्ट्राँगकडे दोघेजण थक्क होऊन पाहत होते. मग नील आर्मस्ट्राँग यांनी ते जगप्रसिद्ध शब्द उच्चारले, "मानवाचं हे लहानसं पाऊल, मानवजातीची एक मोठी झेप ठरेल."
 
"गुड जॉब, ग्रँड पा!" कॅली कुजबुजली. समोर घडणाऱ्या गोष्टी अगदी आता घडत असल्यासारख्या ती श्वास रोखून पाहत होती.
 
आपल्या वडिलांना एकांतात रहायला आवडत असल्याच्या चर्चा चुकीच्या असल्याचं मार्कनी सांगितलं.
 
"मीडियाने माझ्या वडिलांचं चुकीचं वर्णन केलं," त्यांनी आम्हाला सांगितलं.
 
"ते विचारी होते. त्यांना चांगली विनोदबुद्धी होती आणि संगीताचा 'कान'ही होता. कधीकधी ते चालताना ओक्लाहोमाची गाणी गुणगुणत."
 
"तुम्ही काय केलं पाहिजे हे सतत सांगत राहाणाऱ्या वडिलांपैकी ते नव्हते. ते एखाद्या प्राध्यापकासारखे होते जे वेगवेगळे पर्याय देतात आणि नीट विचार करून योग्य निवड करायला तुम्हाला सांगतात. त्यांचं आख्खं आयुष्य याचं एक चांगलं उदाहरण होतं."
 
कॅलीसाठी नील हे फक्त "ग्रँड पा" होते जे त्यांच्या चंद्रवारीविषयी फारसे बोलत नसत. पण चंद्राच्या पृष्ठभागावरून पृथ्वी उगवताना पाहण्याचा अनुभव या चांद्रमोहिमेदरम्यान मनावर सर्वात जास्त परिणाम करणारा होता, असं त्यांनी तिला एकदा सांगितला होता.
 
"1969मध्ये ते अंतराळातून पृथ्वीकडे पाहत होते. आणि आपल्याकडचा हा ठेवा किती नाजूक आहे आणि या पृथ्वीची लोकांनी किती काळजी घ्यायला हवी, याची जाणीव त्यांना झाली," कॅली सांगते.
 
नील आर्मस्ट्राँग यांचा मोठा मुलगा रिक याच्याशीही मी चर्चा केली. मून लँडिंगचं यश साजरं करण्यासाठी ते ब्रिटनच्या दौऱ्यावर होते. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनियर असणाऱ्या रिकला आपल्या वडिलांचा मुलगा म्हणवून घ्यायला आवडतं पण त्यांच्या कर्तृत्त्वाच्या छायेखाली राहणं कधीकधी कठीण जात असल्याचंही तो सांगतो.
 
"तुमच्याकडून अपेक्षा वाढतात. प्रत्येकाला असं वाटतं की त्याचं मूल्यमापन त्याच्या स्वतःच्या गुणांनुसार व्हावं. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचा मुलगा असण्याने याचा कधीकधी लोकांना विसर पडतो."
 
"मला अंतराळ मोहिमांमधला अंतराळवीर व्हायला आवडलं असतं पण माझी वडिलांसोबत तुलना झाली असती, म्हणून कदाचित मी झालो नाही."
 
वडिलांच्या अनमोल कार्याविषयी विचारल्यानंतर रिक म्हणतो, "कार्याविषयी विचार करताना मी त्यांचा माझे वडील म्हणून विचार करत नाही. अपोलो कार्यक्रमामध्ये हजारो लोकांची टीम एकाच ध्येयासाठी काम करत होती."
 
"जर असं उद्दिष्टं ठरवून काम केलं, तर मग अनेक गोष्टी साध्य करता येतात.
 
"आणि लोकांना यातून प्रेरणा मिळाली. अनेकांनी मला सांगितलं आहे की 60च्या दशकामध्ये जे झालं त्यातून प्रेरणा घेत ते वैज्ञानिक झाले वा इंजिनियर, डॉक्टर किंवा इतर कोणीतरी झाले. याची गणना केली जाऊ शकत नाही."
 
एकादृष्टीने पाहिलं तर चंद्रावर माणूस उतरण्याच्यावेळी असणारे सर्वच जण नीलच्या मुलांसारखेच आहे. तो असा क्षण होता जो जगभरातल्या अनेकांनी एकत्र अनुभवला. ज्यामुळे नवीन आशा निर्माण झाल्या. आणि आपल्यालाही चंद्रावर जाता येऊ शकतो यावर सर्वांचा विश्वास बसला.
 
काहीही करणं शक्य आहे हे लक्षात आल्यावर अनेकांनी आपल्या उद्दिष्टाच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली.
 
माझ्यासाठी नीलच्या या गोष्टीतली सर्वात 'शूर' बाब म्हणजे मानवजातीच्या सांस्कृतिक बदलामध्ये इतकी महत्त्वाची भूमिका बजावूनही त्यांनी विनयशीलपणे या सर्वापासून दूर जाणं पसंत केलं.
 
प्राध्यापक, संगीततज्ज्ञ, वडील, इंजिनियर अशा त्यांनी वेगवेगळ्या पण भूमिकांमध्ये ते जगले. असे होते खरे नील आर्मस्ट्राँग

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

LIVE: बारामती मतदारसंघातून अजित पवार 3600 मतांनी, एकनाथ शिंदे 4231 मतांनी आघाडीवर

LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: पक्षाची स्थिती

लोकल ट्रेनमध्ये सीटवरून वाद झाला, दुसऱ्या दिवशी अल्पवयीनने खून करून बदला घेतला

अजित पवार होणार पुढचे मुख्यमंत्री! निकालापूर्वीच पक्षाने बॅनर लावले

टोमॅटो आता महागणार नाही, लोकांना मिळणार दिलासा, सरकारने ही योजना केली

पुढील लेख
Show comments