Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इन्सुलिनचे इंजेक्शन देऊन केली 7 बाळांची हत्या करणारी सीरिअल किलर नर्स, 15 बाळांच्या हत्येचा प्रयत्न

LUCY LETBY
, सोमवार, 21 ऑगस्ट 2023 (11:50 IST)
LUCY LETBY
लूसी लेटबाय
एका रुग्णालयातील नवजात शिशू विभागात लहान बाळांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याचं निदर्शनास आलं होतं. या प्रकरणी येथील मुख्य डॉक्टरांनी हॉस्पिटल प्रशासनाकडे तक्रार दाखल केली.
 
डॉक्टरांचा संशय हा प्रामुख्याने नवजात शिशू विभागातच काम करणाऱ्या एका नर्सवर होता. नर्सचं नाव होतं लूसी लेटबाय.
 
पण हॉस्पिटल प्रशासनाने या डॉक्टरच्या तक्रारीची दखल घेऊन लूसीची चौकशी करण्याऐवजी डॉक्टरांचंच तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला. हे प्रकरण पुढे पोलिसांपर्यंत गेलं. तोपर्यंत या रुग्णालयात तब्बल 7 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता.
 
या प्रकरणात अटक होईपर्यंत सुमारे तीन वर्ष लूसी लेटबाय याच रुग्णालयात काम करत होती.
 
नवजात शिशू विभागाचे मुख्य डॉ. स्टिफन ब्रेयर यांनी 2015 साली तिच्यावर संशय व्यक्त केला होता. हीच नर्स लहान बाळांचा खून करत आहे, असा आरोप त्यांनी केला होता.
 
यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यानंतर लूसीने इतर पाच बालकांना मारण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला होता.
 
युकेमधील चेशायर शहरात काऊंटेस ऑफ चेस्टर रुग्णालयातील हे प्रकरण आहे. यामध्ये लूसी लेटबाय हिला सात नवजात बालकांची हत्या आणि इतर सात बालकांच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात दोषी सिद्ध करण्यात आलं आहे.
 
यामध्ये पहिल्या पाच लहान बाळांचा मृत्यू जून ते ऑक्टोबर 2015 दरम्यान झाला. तर दोन बालकांचा मृत्यू जून 2016 मध्ये झाला होता.
 
ज्या-ज्या वेळी हे खून झाले, त्या-त्या वेळी नर्स लूसी लेटबाय हीच ड्यूटीवर होती, हे तपासकर्त्यांना आढळून आल्याने तेही चक्रावले.
 
बीबीसी पॅनोरमा आणि बीबीसी न्यूजने ब्रिटनच्या या बहुचर्चित सिरीअल किलिंग प्रकरणाची माहिती घेतली.
 
लूसी लेटबाय ही नर्स इतके दिवस कशा प्रकारे या हत्या करत होती. शिवाय हे खून करून ती स्वतः कशा प्रकारे सहीसलामत सुटत होती हे या प्रकरणातलं गूढच आहे.
 
लूसीवर पहिल्यांदा संशय
जून 2015 पूर्वी रुग्णालयातील नवजात शिशू विभागात साधारणपणे एका वर्षांत दोन किंवा तीन नवजात बाळांचा मृत्यू व्हायचा.
 
पण जून 2015 मध्ये काही विचित्र घटना येथे घडल्या. जून महिन्यातील दोन आठवड्यांतच तीन नवजात बाळांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं.
 
मुख्य डॉक्टर डॉ. स्टिफन ब्रेयर यांनी येथील युनिट मॅनेजर इरियन पॉवेल आणि रुग्णालयाचे संचालक एलिसन केली यांच्यासोबत एक बैठक घेतली.
 
डॉ. ब्रेयर बीबीसीशी बोलताना म्हणाले, “आम्ही सूक्ष्म गोष्टींवर लक्ष दिलं. या तिन्ही मृत्यूंवेळी नर्स लूसी लेटबाय हीच ड्युटीवर होती. मला आठवतं त्यावेळी चर्चेदरम्यान कुणीतरी म्हटलं, ‘नाही, ती असू शकत नाही. ती चांगली व्यक्ती आहे.’
 
खरं तर या तिन्ही मृत्यूंमध्ये कोणतंच साम्य नव्हतं. डॉ. ब्रेयर यांच्यासह कुणालाही त्याबाबत संशय आला नाही. पण ऑक्टोबर 2015 मध्ये पुन्हा दोन नवजात बाळांचा मृत्यू झाला. याही वेळी नर्स लूसी लेटबाय हीच ड्युटीवर होती.
 
यावेळी मात्र डॉ. स्टिफन ब्रेयर यांना लूसीचा संशय आला. बाळांच्या मृत्यूमागे कोणत्या ना कोणत्या प्रकारे लूसीच आहे, असं त्यांना वाटू लागलं.
 
याबाबत युनिट मॅनेजर इरियन पॉवेलसोबत बोलताना त्यांनी आपल्या मनातील संशय सांगितलं. पण ते ही गोष्ट मान्य करण्यास तयार नव्हते.
 
यासंदर्भात पॉवेल यांनी डॉ. ब्रेयर यांना ऑक्टोबर 2015 मध्ये केलेल्या मेलमध्ये हे मृत्यू दुर्दैवी असल्याचं म्हटलं. पण सोबतच लेटबाय त्यावेळी ड्युटीवर असणं हा केवळ योगायोग आहे, असंही ते म्हणाले.
 
डॉ. ब्रेयर यांनी संचालक एलिसन केली यांच्याशीही चर्चा केली. पण त्यांनीही ब्रेयर यांचं ऐकून घेतलं नाही.
 
डॉ. ब्रेयर यांच्यासह इतर डॉक्टरही या प्रकरणामुळे चिंताग्रस्त होते. कारण या मृत्यूंशिवाय येथील वॉर्डात नवजात शिशू विनाकारण गंभीररित्या आजारी पडू लागले होते.
 
बाळांना अचानकच अतिगंभीर उपचार किंवा ऑक्सिजन देण्याची गरज पडू लागली होती. या प्रत्येक प्रसंगी लूसी लेटबाय ही नर्सच ड्युटीवर असायची.
 
इतर एक डॉक्टर रवी जयराम यांनी सांगितलं, “फेब्रुवारी 2016 मध्ये त्यांनी लूसी लेटबायला एका नवजात बाळाच्या समोर उभी असल्याचं पाहिलं होतं. या बाळाने श्वास घेणं बंद केलं होतं.”
 
डॉ. ब्रेयर यांनी तत्काळ रुग्णालयाचे संचालक इयान हार्वे आणि एलिसन केली यांच्याशी संपर्क साधला. मार्च महिन्यात त्यांनी यासंदर्भात इरियन पॉवेल यांच्यासह बैठक घेण्याचं ठरवलं.
 
संशय सत्यात बदलला
यानंतर तीन महिने उलटले. मे महिन्यात दोन बाळ मरता-मरता वाचले. यानंतर डॉ. ब्रेयर यांची वरीष्ठ मॅनेजर्ससोबत बैठक झाली.
 
ते म्हणाले, “मीटिंगमध्ये मला माझ्या संशयावर विश्वास होता. त्यांनी माझं म्हणणं ऐकलं, पण नर्सला काम सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली.”
 
जून 2016 मध्ये आणखी एका नवजात बाळाचा मृत्यू झाला. जून महिना अखेरीस रुग्णालयात एका महिलेस तिळे जन्मले होते. पण त्यापैकी दोन बाळांचा 24 तासांच्या आत मृत्यू झाला. त्या मृत्यूंदरम्यान लूसी लेटबाय हीच ड्युटीवर होती.
 
यानंतर निराश आणि दुःखी झालेल्या कर्मचाऱ्यांची एक बैठक बोलावण्यात आली. डॉ. ब्रेयर म्हणाले, “जेव्हा लूसी लेटबाय हिला त्यावेळी सुटी घेण्यास सांगण्यात आलं होतं. पण तिने तसं करण्यास नकार दिला. मी दुसऱ्या दिवशी कामावर येईन, या भूमिकेवर ती ठाम होती.”
 
त्याच वेळी डॉ. ब्रेयर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा संशय सत्यात बदलला. त्यांनी ड्युटी लावणाऱ्या कारेन रिस यांना लूसीला हटवण्यास सांगितलं. पण त्यांनीही त्याला नकार दिला.
 
दुसऱ्या दिवशी आणखी एक बाळ खूप आजारी पडलं. सुदैवाने त्याला वाचवण्यात यश आलं. पण यावेळीही लेटबाय हीच ड्युटीवर असल्याचं सर्वांना दिसलं.
 
या घटनेनंतर लूसीने आणखी तीन शिफ्ट केल्या. त्यानंतर तिला वॉर्डातून हटवण्यात आलं. लूसीला हटवताच वॉर्डात होणारे मृत्यू अचानकपणे थांबले.
 
रुग्णालयाने लूसी लेटबायला निलंबित करण्याऐवजी तिची बदली रुग्णालयातच रिस्क अँड पेशंट सेफ्टी कार्यालयात करण्यात आली.
 
पण, याठिकाणी नवजात बाळांच्या कागदपत्रे तिला हाताळता येऊ लागली. तसंच जे या प्रकरणाचा तपास करत आहेत, त्या वरीष्ठ मॅनेजर्समध्ये तिची उठबस सुरू झाली.
 
प्रकरण दाबण्याचा प्रयत्न
29 जून 2016 रोजी नवजात शिशू विभागाच्या एका डॉक्टरांनी या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांची मदत घेण्याबाबतचा विचार प्रशासनाला मेल करून व्यक्त केला.
 
पण रुग्णालयाच्या मॅनेजरने त्यास नकार दर्शवला. संचालक इयान हार्वे म्हणाले, “या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आता याबाबत कोणताच मेल करू नका.”
 
 
त्याच्या दोन दिवसांनंतर डॉक्टरांची रुग्णालय प्रशासनातील वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत एक बैठक झाली. त्यामध्ये अधिकाऱ्यांनी डॉक्टरांना पोलिसांना या प्रकरणाविषयी काहीही कळवू नका, असा इशारा दिला. असं केल्याने रुग्णालयाची प्रतिमा बिघडेल, असं ते म्हणाले.
 
पण, रॉयल कॉलेज ऑफ पेडियाट्रिक्स अँड चाईल्ट केअर (RCPACH) यांच्याकडून नवजात शिशू विभागाचं रिव्ह्यू करण्यात यावं, असं त्यांनी म्हटलं.
 
RCPACH ने नोव्हेंबर 2016 मध्ये या प्रकरणाचा तपास करून एक अहवाल दिला. त्यामध्ये प्रत्येक अनपेक्षित मृत्यूबाबत सविस्तरपणे तपास करण्यात यावा असं सांगण्यात आलं होतं.
 
दरम्यान, इयान हार्वे यांनी चाईल्ड स्पेशलिस्ट डॉ. जडेन डाऊडॉन यांना हे प्रकरण तपासण्यास सांगितलं. त्यांनी चार मृत्यूंची फॉरेन्सिक तपासणी करण्याचा सल्ला दिला. पण तेही झालं नाही.
 
या प्रकरणी जानेवारी 2017 मध्ये पुन्हा एक बैठक झाली. त्यामध्ये प्रशासनाने डॉक्टरांनीच आता यामध्ये हस्तक्षेप करू नये, असा निर्णय दिला.
 
काही आठवड्यांनंतर येथील सर्वच्या सर्व सात डॉक्टरांना बोलवण्यात आलं. त्यामध्ये CEO टोनी चेंबर्स हेसुद्धा होते. चेंबर्स यांनी लूसी लेटबाय हिला डॉक्टरांची माफी मागण्यास सांगितलं. आता हे प्रकरण इथेच मिटवा, असा इशारा त्यांनी दिला.
 
CEO टोनी चेंबर्स यांनी नंतर याबाबत बीबीसी पॅनोरमाशी बोलताना स्पष्टीकरण दिलं की आपल्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. आपला तपासाला विरोध नव्हता. हे प्रकरण समजलं तेव्हा जून 2016 मध्येच आपण तपासाचे आदेश दिले होते.
 
पोलीस तपासात उघड झालं हत्या प्रकरण
अखेर, रुग्णालय प्रशसनाच्या मॅनेजरना न जुमानता डॉक्टरांनी या प्रकरणी पोलिसांशी संपर्क साधला.
 
पोलिसांनी काऊंटेस ऑफ चेस्टर हॉस्पिटलमध्ये झालेल्या नवजात बाळांच्या मृत्यूचा गुन्हेगारी तपास करण्यास सुरू केलं. या मोहिमेचं नाव ऑपरेशन हमिंगबर्ड असं ठेवण्यात आलं.
 
डॉ. ब्रेयर हे पोलिसांना पूर्ण सहकार्य करत होते. दरम्यान त्यांच्यासमोर एका मृत बाळाच्या रक्ताचा अहवाला आला. त्यामध्ये इन्सुलिनचं प्रमाण गरजेपेक्षा खूपच जास्त आढळून आलं.
 
शरीरात जास्त इन्सुलिन तयार होत असल्यास सोबत सी-पेप्टाईड हे रसायनसुद्धा बनतं. पण अहवालात मात्र सी-पेप्टाईडची नोंद शून्य होती.
 
डॉ. ब्रेयर म्हणाले, “अहवाल पाहून मला धक्का बसला. लहान बाळांना इन्सुलिन देऊन मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.”
 
यानंतर काही महिन्यांनी लूसी लेटबायला अटक करण्यात आली. तर रुग्णालयाचा परवाना रद्द करण्यात आला. यामध्ये तीन वर्ष निघून गेले.
 
जानेवारी 2018 मध्ये CEO चेंबर्स यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. तर त्या पदावर डॉ. सुसान गिल्बी यांची नियुक्ती करण्यात आली.
 
गिल्बी यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, “मला ही जबाबदारी मिळाली तेव्हा हार्वे यांनी मला नवजात डॉक्टरांवर कारवाई करण्याचा सल्ला दिला होता. पण मी त्यास नकार दिला.”
 
नर्स लूसी लेटबाय हिच्यावर जून 2015 ते जून 2016 मध्ये 7 बाळांचा खून आणि 15 बाळांच्या खूनाच्या प्रयत्नाचे आरोप करण्यात आले. त्यापैकी 7 खून आणि 7 खूनाचे प्रयत्न हे आरोप कोर्टात सिद्ध झाले.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Nagpur: तलाठी परीक्षा केंद्राच्या बाहेर विद्यार्थ्यांचा गोंधळ