सध्या संपूर्ण जग करोना व्हायरसमुळे त्रस्त असून सगळयांचे लक्ष करोनाला रोखणारी लस बाजरात कधी उपलब्ध होणार याकडे लागले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना लसी संदर्भात एक महत्त्वपूर्ण टि्वट केले आहे. ‘ग्रेट न्यूज ऑन व्हॅक्सीन्स’ असे त्यांनी या टि्वटमध्ये म्हटले आहे.
करोना लसी संदर्भात चांगली बातमी असा त्या टि्वटचा अर्थ आहे. डोनाल्ड ट्रम्प लसी संदर्भात मोठी घोषणा करु शकतात असा कयास बांधला जात आहे. अमेरिकेत वेगवेगळया कंपन्या करोनावर लस विकसित करत असून यात आघाडीवर असलेल्या मॉडर्ना कंपनीची लस पहिल्या फेजमध्ये यशस्वी ठरली आहे.
अमेरिकेला करोनावर लस सापडली?
– रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने बनवलेली लस मानवी परीक्षणामध्ये यशस्वी ठरलेली असतानाच जगासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे.
– करोना व्हायरस विरोधात अमेरिकेच्या मॉर्डना कंपनीने विकसित केलेली लसही फेज १ च्या टप्प्यावर यशस्वी ठरली आहे. मॉर्डना कंपनीने विकसित केलेल्या लसीची ४५ तंदुरुस्त स्वयंसेवकांवर चाचणी घेण्यात आली.
– या चाचणीमध्ये ही लस मानवी शरीरासाठी सुरक्षित असून रोगप्रतिकारक शक्तीला चालना देत असल्याचे दिसून आले आहे.
– अमेरिकन संशोधकांनी मंगळवारी ही माहिती दिली. ज्या स्वयंसेवकांना लसीचे दोन डोस देण्यात आले, त्यांच्या शरीरात व्हायरसला मारणाऱ्या अँटीबॉडीजची मोठया प्रमाणात निर्मिती झाल्याचे दिसून आले.
– करोना व्हायरसमधून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या शरीरात जितक्या अँटीबॉडीज आहेत, त्यापेक्षा हे प्रमाण जास्त होते. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
– महत्त्वाचं म्हणजे मॉडर्नाची ही लस दिल्यानंतर गंभीर साईड इफेक्ट दिसून आले नाहीत. लस घेणाऱ्या निम्म्या स्वयंसेवकांमध्ये सौम्य ते मध्यम स्वरुपांची लक्षणे दिसली.
– थकवा, डोकेदुखी, थंडी, स्नायुंचे दुखणे आणि इंजेक्शन दिलेल्या जागी दुखणे अशा तक्रारी स्वयंसेवकांनी केल्या. रशियाने विकसित केलेली लस घेतल्यानंतरही काही स्वयंसेवकांनी अशाच प्रकारच्या तक्रारी केल्या होत्या.
– मॉर्डनाच्या लसीचा दुसरा डोस आणि खासकरुन जास्त क्षमतेचा डोस घेतल्यानंतर ही लक्षणे दिसून आली.
– करोना लसीची मानवी चाचणी सुरु करणारी मॉर्डना जगातील पहिली कंपनी आहे. १६ मार्चलाच मॉर्डनाने लसीची चाचणी सुरु केली होती.