Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अमेरिका गोळीबार: 'हल्लेखोर शहरात फिरत आहे असं आम्हाला जेव्हा लाऊडस्पीकरवरुन कळलं'

अमेरिका गोळीबार: 'हल्लेखोर शहरात फिरत आहे असं आम्हाला जेव्हा लाऊडस्पीकरवरुन कळलं'
, शुक्रवार, 27 ऑक्टोबर 2023 (07:27 IST)
अमेरिकेतील मेन राज्यातील लुईस्टन शहरात एका बंदुकधारी व्यक्तीनं 16 जणांची हत्या केली आहे.
पोलिस या प्रकरणात 40 वर्षीय रॉबर्ट कार्ड याचा शोध घेत आहेत. कारण त्याच्याकडे शस्त्र आहेत आणि हे धोकादायक असू शकतं, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
 
या व्यक्तीच्या शोधासाठी शेकडो पोलिस तैनात करण्यात आले आहेत. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
 
लुईस्टन हे मेन राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं मोठे शहर आहे. पोर्टलँडपासून 35 किलोमीटर अंतरावर वसलेल्या या शहराची लोकसंख्या जवळपास 38 हजार आहे.
पोलिसांनी या घटनेविषयी सांगितलं की, ते एकाहून अधिक ठिकाणी झालेल्या हल्ल्याचा ते तपास करत आहेत. पोलिसांनी संशयिताचं छायाचित्रही प्रसिद्ध केलं असून शहरातील लोकांना ते सध्या जिथं आहेत तिथंच राहण्यास सांगितलं आहे.
 
या हल्ल्यात किमान 50 लोक जखमी झाले आहेत. त्यांना शहरातील दोन वेगवेगळ्या भागात गोळीबार झाल्याचं वृत्त मिळालं आहे. यापैकी एक शेमेंगीज नावाचं रेस्टॉरंट आहे तर दुसरे स्पेअरटाइम रिक्रिएशन नावाची बॉलिंग गेम झोन आहे, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
 
ही दोन ठिकाणं एकमेकांपासून जवळपास 6 किलोमीटर अंतरावर आहेत. एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पोहोचायला 10 मिनिटे लागतात.
 
लुईस्टनचे पोलीस अधीक्षक जेक लँगलॉय यांनी एक निवेदन प्रसिद्ध केलंय. त्यानुसार, गुरुवारी( 26 ऑक्टोबर) संपूर्ण परिसरातील शाळा बंद राहतील.
 
प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले?
या गोळीबारादरम्यान शेजारच्या ऑबर्न शहरातील एक रहिवासी लुईस्टनमध्ये आले होते.
 
ऑबर्न शहरातील रहिवाशी असलेल्या अॅन किन्नी यांनी स्थानिक मीडियाला सांगितलं की, त्या लुईस्टनमधील सुपरमार्केटमध्ये प्रिस्क्रिप्शन घेत होत्या तेव्हा स्टोअरमधील स्पीकरवरुन त्यांना या गोळीबाराबद्दल माहिती मिळाली.
 
ऑबर्न शहराची सीमा लुईस्टनला लागून आहे आणि दोन शहरांचं वर्णन अनेकदा जुळी शहरं म्हणून केलं जातं. ही शहरं एंड्रोस्कोगिन नदीमुळे वेगळी झाली आहेत.
 
त्यांनी सांगितलं की, "स्टोअरमधील लाऊडस्पीकरवरुन आम्हाला सांगितलं गेलं की, तिथं एक शूटर शहरात फिरत आहे आणि सुपरमार्केटचे सर्व प्रवेशद्वार आणि बाहेर पडण्याचे दरवाजे लॉक केले जात आहेत. पोलिस अधिकारी येईपर्यंत एका कर्मचाऱ्यानं आम्हाला बसण्यासाठी काही खुर्च्या आणून दिल्या.
 
"त्या अधिकाऱ्यानं नंतर स्टोअरमध्ये असलेल्यांना सल्ला दिला की ग्राहकांना एक-एक करून सोडू द्या आणि नंतर स्टोअर पूर्णपणे बंद करा. मी हादरले होते, पण मी सुरक्षितपणे घरी पोहोचू शकली," असं त्यांनी पुढे सांगितलं.
 
मृतांचा आकडा नेमका किती?
या घटनेतील मृतांच्या संख्येची पुष्टी होत नाहीये. मेनमधील अधिकाऱ्यांनी मृतांच्या संख्येची पुष्टी केलेली नाही. पण, रिपोर्टनुसार ही संख्या16 ते 22 पर्यंत असू शकते.
 
काही स्थानिक अधिकार्‍यांनी बीबीसीच्या अमेरिकन सहयोगी सीबीएस न्यूजला सांगितलं की, यात किमान 16 लोकांनी जीव गमावला. अधिकाऱ्यांनी मृतांचा आकडा 20 पेक्षा जास्त असू शकतो असेही संकेत दिले आहेत.
 
लुईस्टन सिटी कौन्सिलर रॉबर्ट मॅककार्थी यांनी शहर प्रशासकाचा हवाला देत सीएनएनला सांगितलं की, किमान 22 लोक मारले गेले आहेत.
सेंट्रल मेन मेडिकल सेंटरचं म्हटलंय की, ते सामूहिक गोळीबारातील जखमींवर उपचार करण्यासाठी शहरातील इतर रुग्णालयांशी समन्वय साधत आहेत.
 
होमलँड सिक्युरिटीने एका निवेदनात म्हटलं आहे की, सचिव अलेक्झांड्रो मोरोर्कास यांना या घटनेची माहिती देण्यात आली असून ते संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.
 
व्हाईट हाऊसनं सांगितलं की, अध्यक्ष बायडेन यांनी मेन राज्याचे गव्हर्नर जेनेट मिल्स, सिनेटर्स अँगस किंग आणि सुसान कॉलिन्स आणि लुइस्टनमधून अमेरिकन काँग्रेसचे सदस्य जेरेड गोल्डन यांच्याशी फोनवर बोलले आहे.
 
जेरेड गोल्डन यांनी सोशल मीडियावर एक निवेदन प्रसिद्ध करून म्हटलं आहे की, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आम्ही स्थानिक एजन्सींची मदत घेत आहोत आणि घटनेबाबत अधिक माहिती गोळा करत आहोत.
 





































Published By- Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आमदार अपात्रता सुनावणी : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्या गटांकडून काय युक्तिवाद?