Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऋषी सुनक UKचे पंतप्रधान होण्याची शक्यता किती?

Webdunia
सोमवार, 22 ऑगस्ट 2022 (20:45 IST)
जुबैर अहमद
एकेकाळी भारतीय वंशाच्या लोकांना ब्रिटनमध्ये अनेक प्रकारच्या भेदभावांना सामोरं जावं लागायचं. त्यावेळी कुणी कल्पनाही केली नसेल की त्यांच्यापैकीच एक जण ब्रिटनच्या पंतप्रधानपदाचं स्वप्न बघेल.
 
ब्रिटनमधील विरोधी पक्ष असलेल्या मजूर पक्षाचे खासदार वीरेंद्र शर्मा यांनी वयाची पंचाहात्तरी पार केली आहे. वयाच्या 55 व्या वर्षी ते पंजाबमधून लंडनमध्ये आले होते.
 
सुरुवातीच्या दिवसात त्यांना ज्या भेदभावांचा सामना करावा लागला त्याविषयी बीबीसी हिंदीशी बोलताना त्यांनी सांगितलं, "60 च्या दशकात इथे घराबाहेर 'भाड्यासाठी उपलब्ध. मात्र आशियाच्या लोकांसाठी आणि काळ्यांसाठी नाही', अशा पाट्या लागलेल्या असायच्या.
 
कल्बबाहेर पाट्या असायच्या - 'कुत्री, आयरिश, भटके आणि कृष्णवर्णियांना आत परवानगी नाही.' भारतीयांना बघून इंग्रज म्हणायचे - हे तर आमचे गुलाम होते. आज आमच्यासोबत बसलेत. ते विरोध करायचे."
 
मात्र, आज ब्रिटनमध्ये वीरेंद्र सिंह यांच्यासारखेच अनेक भारतीय वंशाचे खासदार आहेत. बोरीस जॉनसन यांच्या सरकारमधील अनेक मंत्रीही भारतीय वंशाचे होते.
 
बोरीस जॉन्सन यांच्या कार्यकाळात मंत्री असणारे एक खासदार - ऋषी सुनक आज पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. सुनक ब्रिटनचे अर्थमंत्री होते आणि हुजूर पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत.
 
पंतप्रधानपदाच्या शर्यतीत 42 वर्षांच्या ऋषी सुनक यांचा सामना आहे लिज ट्रस यांच्याशी. ट्रस यासुद्धा हुजूर पक्षातील अनुभवी नेत्या आहेत.
 
हुजूर पक्षाचे 1 लाख 60 हजार सदस्य या दोघांपैकी एकाला मत देऊन त्यांना ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून निवडतील. या शर्यतीत कोण बाजी मारेल हे 5 सप्टेंबर रोजी कळेल.
 
तेव्हा ब्रिटनचे नवे पंतप्रधान भारतीय वंशाचे असतील का? हे शक्य आहे का?
 
याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी बीबीसीने येथील सर्व समाज आणि हुजूर पक्षाच्या सदस्यांशी बातचीत केली.
 
कोण आहेत ऋषी सुनक?
ऋषी सुनक इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत.
त्यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांचा ब्रिटनच्या सर्वांत श्रीमंत महिलांच्या यादीत समावेश आहे.
ऋषी सुनक हे बोरीस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते.
2015 सालापासून सुनक यॉर्कशायच्या रिचमंडमधून हुजूर पक्षाचे खासदार म्हणून निवडून आले.
त्यांचे वडील डॉक्टर होते आणि आई फार्मासिस्ट.
भारतीय वंशाचे त्यांचे पूर्वज पूर्व आफ्रिकेतून ब्रिटनमध्ये आले होते.
ऋषी सुनक यांचं शिक्षण विंचेस्टर कॉलेज या विशेष खाजगी संस्थेतून झालं.
पुढे त्यांनी ऑक्सफोर्डमधून उच्चशिक्षण घेतलं.
त्यानंतर स्टॅन्डफोर्ड विद्यापीठातून एमबीएचं शिक्षण घेतलं.
राजकारणात येण्याआधी गोल्डमन सॅक्स या इन्व्हेस्टमेंट बँकेत त्यांनी काम केलं आहे.
'ऋषी चांगले आहेत, मात्र..'
लंडनपासून जवळपास 100 किमी दूर असलेलं चेल्टनहॅम हे शहर ब्रिटनच्या सत्ताधारी हुजूर पक्षाचा बालेकिल्ला आहे. लंडन, बर्मिंघम, मॅन्चेस्टर आणि लिव्हरपूल या मोठ्या शहरांपलिकडे असलेल्या चेल्टनहॅमसारख्या छोट्या शहरांमध्ये विविधता कमीच दिसते. हे प्रामुख्याने श्वेतवर्णीयांचं शहर आहे.
 
ऋषी सुनक पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असण्याबाबत या शहरातील एक तरुणी म्हणाली, "ते स्वतः अर्थतज्ज्ञ असल्यामुळे ते अर्थव्यवस्थेसाठी उत्तम ठरतील. त्यामुळे या दृष्टिकोनातून त्यांची बाजू अधिक भक्कम दिसते."
 
तिची एक मैत्रीण म्हणाली, "त्यांची धोरणं त्यांच्यासारखे श्रीमंत वगळता इतर कुणासाठीच उपयोगाची नाही. त्यामुळे मी यांच्यापैकी कुणाचंच समर्थन करत नाही."
 
ब्रिटीश समाज एक बिगर- श्वेतवर्णीय पंतप्रधान स्वीकारण्यास तयार आहे का, हा प्रश्न मी एका महिलेला विचारला.
 
त्या म्हणाल्या, "मी व्यक्तिशः याचा विचार करत नाही. पण, मला वाटतं मी पूर्णपणे तयार असेन. माझा कल ऋषी यांच्या बाजूने आहे."
 
शहरातील बाजारात भेटलेल्या एका व्यक्तीला मी विचारलं की इथला समाज एक बिगर श्वेतवर्णीय पंतप्रधान स्वीकारण्यासाठी तयार आहे का? यावर तो म्हणाला, "मी नक्कीच तयार आहे. इतरांचं मला माहिती नाही. पण, मला वाटतं की हे नक्कीच योग्य असेल."
 
'एक उत्कृष्ट उमेदवार, पण…'
बर्मिंघम ब्रिटनमधील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वांत मोठं शहर आहे. इथल्या लोकसंख्येत विविधता दिसते. शहरात नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या सांस्कृतिक सोहळ्यातही ही विविधता अनुभवायला मिळली.
 
इथे पाकिस्तानी वंशाच्या लोकांची संख्या बरीच आहे. पाकिस्तानी वंशाच्या लोकांना एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला पंतप्रधान होताना बघणं, आवडेल का?
 
शुक्रवारची नमाज अदा करून मशिदीतून बाहेर पडणारी एक व्यक्ती म्हणाली, "मला आशा आहे की संपूर्ण समाज व्यक्तीची क्षमता बघण्याइतका शहाणा झाला आहे. तो व्यक्तीचा वंश किंवा त्याचा रंग कोणता आहे, तो कुठून आला आहे, हे बघणार नाही. मला वाटतं ऋषी एक योग्य व्यक्ती आहे. त्यामुळे ते एक उत्तम पंतप्रधान ठरतील, असा विश्वास मला वाटतो."
 
आणखी एकाने म्हटलं, "माझ्या मते अल्पसंख्याक असल्याकारणाने युकेच्या नवीन पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून ऋषी एक उत्कृष्ट उमेदवार आहेत."
 
पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांचं समर्थन
पाकव्याप्त काश्मीरमधील मीरपूर या शहरातून ब्रिटनमध्ये येऊन स्थायिक झालेल्या एका व्यक्तीने सांगितलं, "माझ्या मते ऋषी सुनक यांनी पंतप्रधान व्हायला हवं. कारण केवळ गोरेच पंतप्रधान बनतात, हे आपण गेल्या अनेक वर्षांत बघतोच आहोत. त्यामुळे एका भारतीय किंवा आशियाई वंशाच्या व्यक्तीने पंतप्रधान व्हावं. यामुळे अनेक बदल घडतील, अशी अपेक्षा आहे."
ऋषी सुनक हिंदू आहेत आणि धार्मिक पद्धतीही पाळतात. 2015 साली पहिल्यांदा संसदेत निवडून गेल्यानंतर त्यांनी गीतेवर हात ठेवून शपथ घेतली होती. भारतीय वंशाचे लोक त्यांच्या विजयासाठी प्रार्थना सभा घेत आहेत. मात्र, ते खरंच पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार आहेत का?
 
12 मे 1980 साली साउथैम्पटन शहरात ऋषी सुनक यांचा जन्म झाला. त्यांचं बालपणही तिथेच गेलं. त्यांचे आई-वडील आजही याच शहरात राहतात.
 
त्यांचे वडील डॉक्टर आहेत आणि आई आता-आातापर्यंत केमिस्ट दुकान चालवायच्या. ऋषी यांचे पूर्वज पूर्व आफ्रिकेतून येऊन साउथैम्पटनमध्ये स्थायिक झाले. त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे वैदिक सोसायटी 'हिंदू मंदिराशी' घनिष्ठ संबंध आहेत.
 
भारतीय वंशाचे असल्याचा तोटा?
बीबीसीची टीम मंदिरात गेली तेव्हा तिथे आमची भेट 75 वर्षांच्या नरेश सोनचाटला यांच्याशी झाली. सोनचाटला ऋषी सुनक यांना लहानपणापासून ओळखतात.
 
ते म्हणाले, "मला तरी वाटतं की तेच पंतप्रधान बनतील. पण, तसं झालं नाही तर त्यांचा रंग हे त्याचं कारण ठरू शकेल."
 
संजय चंदाराणा या मंदिराचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या मते ऋषी सुनक यांच्याशी भेदभाव होईल, असं वाटत नाही. ते म्हणतात, "या देशात कुणाचं धोरण चांगलं आहे, कुणाचा दृष्टिकोन योग्य आहे, कोण हा देश पुढे घेऊन जाईल, हे बघतात. रंगाला फार महत्त्व नाही."
 
समाजात ऋषी यांची लोकप्रियता प्रतिस्पर्धी लीज ट्रस यांच्या तुलनेत खूप जास्त दिसत असली तरी जय-पराजयाचा निर्णय त्यांच्या पक्षातील सदस्य करतील. हुजूर पक्षाची तरुण पिढी ऋषींच्या बाजूने दिसते. मात्र, वरिष्ठांमध्ये ऋषींविषयी वेगळी मतं आहेत.
 
पक्षांतर्गत वातावरण
पक्षातर्फे देशातील वेगवेगळ्या शहरात या दोन नेत्यांच्या वादविवाद कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमांना 'हस्टिंग्ज' म्हणतात.
 
सर्व्हेमध्ये लीज ट्रस स्पष्टपणे आघाडीवर आहेत. मात्र, हस्टिंग्ज कार्यक्रमांमध्ये पक्षातील सदस्यांचा कल लीज ट्रस यांच्याऐवजी कृषी सुनक यांच्याबाजूने आहे. संपूर्ण वातावरण ऋषी सुनक यांच्याबाजूने असल्याचं दिसतं.
 
ऋषी यांची प्रचार टीम लीज यांच्या टीमच्या तुलनेत अधिक संघटित वाटते. शिवाय, ऋषी यांच्या टीममध्ये तरुणांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे त्यांच्या गोटात उत्साहसुद्धा जास्त आहे.
 
लीज यांच्या टीममध्ये पक्षातील अनुभवी सदस्य अधिक दिसतात. मात्र, ऋषी यांच्या प्रचार मोहिमेत सगळीकडे सकारात्मक दृष्टीकोन पाहायला मिळतो.
 
हुजूर पक्षाचे ग्लॉस्टर मतदारसंघातून खासदार असलेले रिचर्ड ग्राहम हे ऋषी सुनक यांचे जाहीर समर्थकही आहेत.
 
ऋषींसाठी सज्ज
आम्ही त्यांना लोक ऋषी यांना स्वीकारण्यासाठी तयार आहेत का, असा प्रश्न विचारला. ते म्हणाले, "मी तयार आहे आणि इतरही अनेकजण तयार आहेत. हुजूर पक्षातील बहुतांश खासदारही यात आहेत. आणि मला वाटतं की देशभरात मोठ्या प्रमाणावर आमचे सदस्यही तयार आहेत. मात्र, आम्ही सदस्यांच्या मतांची वाट बघत आहोत. आम्ही सगळेच ऋषी यांच्याकडे योग्य पर्याय म्हणून बघतो. या सामन्यात उमेदवार कुठल्या रंगाचा आहे, याला काही स्थान असेल असं मला वाटत नाही."
 
ऋषी सुनक यांच्या प्रचार टीमच्या एका सदस्याने भेदभावाच्या मुद्यावर सांगितलं, "हा चर्चेचा विषय आहे, असा विचारही करू नका. मला वाटतं आम्ही ज्या विषयावर चर्चा करतोय तो आहे उमेदवाराची धोरणं."
 
टीममधील एका तरुण सदस्याने सांगितलं, "मला नाही वाटत की ऋषी यांची पार्श्वभूमी चिंतेचा विषय आहे. लोकांना त्यांच्या कामगिरीवरून ओळखलं जातं, त्यांच्या पार्श्वभूमीमुळे नव्हे. महामारीच्या काळात ऋषी यांच्या 'फर्लो'सारख्या एका योजनेमुळे लाखों लोकांच्या नोकऱ्या टिकल्या. लाखो छोट्या व्यापाऱ्यांना अर्थसहाय्य पुरवलं आणि अर्थव्यवस्थेला सावरलं."
 
या चर्चेत लीज ट्रस यांच्या बाजूने बोलणारेही अनेक होते. एकजण म्हणाले, "मला वाटतं की लीज प्रत्यक्षात कॉन्झरव्हेटिझम दाखवत आहेत आणि या देशात याचीच गरज आहे. ऋषी आमच्या बहुतांश लोकांपेक्षा वेगळे आहेत. हो ना? त्यांच्या पार्श्वभूमीची मला अडचण नाही. 2010 नंतर आणि गेल्या पाच वर्षांपासून मी खरंच खूप बदललो आहे आणि मला वाटतं की आता मला काळ्या रंगाचा प्रॉब्लेम नाही."
 
मार्सिया जॅको निवृत्त शिक्षिका आहेत. आम्ही त्यांना विचारलं की ऋषी सुनक पंतप्रधान बनले तर त्यांना काही फरक पडेल का?
 
त्या म्हणाल्या, "थोडाफार फरक तर पडतो. पण, हेच सगळं नाही ना. माझ्या पतीचा जन्म युकेमधला नाही. त्यामुळे हे माझ्यासाठी सगळं नाही. मात्र, मतदान करताना मी याचाही विचार केला."
 
एवढं बोलल्यानंतर पंतप्रधान म्हणून त्यांची पसंती कुणाला, हेदेखील त्यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या, "मला ऋषी आवडतात. मला वाटतं ते स्मार्ट आहेत. मात्र, माझ्या नव्या पंतप्रधान लीज आहेत."
 
आता नाही तर 2024
बोरीस जॉन्सन यांनी याच वर्षी जुलै महिन्यात पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर नव्या पंतप्रधानाच्या निवडीच्या पहिल्या फेरीत 8 उमेदवार होते. शेवटच्या फेरीच्या आधीच्या सर्व फेऱ्यांमध्ये पक्षाच्या खासदारांना मतदान करायचं होतं. यात ऋषी आणि लीज यांना निवडण्यात आलं.
 
आता शेवटच्या फेरीत पक्षाच्या सर्वच्या सर्व 1 लाख 60 हजार सदस्यांना मतदान करायचं आहे.
 
मिडलसेक्स विद्यापीठातील डॉक्टर नीलम रैना यांच्या मते बिगर-गोऱ्यांसाठी या देशाचा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
त्या म्हणतात, "तुम्ही हे पाहा की कवाड उघडलं आहे. तुमची पात्रता असेल तर क्रमांक एकच्या पदाचा दरवाजा खुला आहे. मात्र, हे दार सध्या एका श्रीमंत भारतीयासाठी उघडलं आहे."
 
ऋषी सुनक पंतप्रधान बनले तर हा ऐतिहासिक क्षण असेल. एका अर्थाने याची तुलना 2008 साली अमेरिकेत बराक ओबामांच्या राष्ट्रपतीपदाशी केली जाऊ शकते.
 
डॉ. रैना म्हणतात, "त्या संदर्शभात बघितल्यास हे ऐतिहासिक असेल. कारण, यातून हे सिद्ध होईल की गेल्या 20 वर्षांत ज्या विविधतेविषयी आणि सर्वसमावेशकतेविषयी बोललं जात आहे ते खरोखरीच प्रत्यक्षात घडत आहे. ते जिंकले तर हा खूप मोठा विजय असेल."
 
पक्षाच्या सदस्यांची मतं वेगवेगळी आहेत. मात्र, यात मुळीच शंका नाही की यावेळी शक्य झालं नाही तरी 2024 च्या निवडणुकीत भारतीय वंशाची व्यक्ती पंतप्रधान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

भारत आघाडी अस्तित्वात आहे की नाही हे काँग्रेसने सांगावे,संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला

पुण्यात तोल गेल्याने पेंटिंग कामगाराचा मृत्यू,कंत्राटदारावर गुन्हा दाखल

अहमदाबादमध्ये 9 वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

LIVE: सावरकरांवरील टिप्पणी प्रकरणी राहुल गांधींना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

सावरकरांवरील टिप्पणी प्रकरणी राहुल गांधींना मोठा दिलासापुणे न्यायालया कडून जामीन मंजूर

पुढील लेख
Show comments