Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या संशयित थॉमस क्रुक्सबद्दल कोणती माहिती समोर आली आहे?

Webdunia
सोमवार, 15 जुलै 2024 (12:45 IST)
अमेरिकेची राष्ट्रीय तपास संस्था असलेल्या एफबीआयने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचं नाव सांगितलं आहे. या हल्लेखोराचं नाव थॉमस मॅथ्यू क्रुक्स होतं आणि तो 20 वर्षांचा होता.
 
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पेन्सिल्वेनियातील बटलर शहरात आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत बोलत असताना थॉमस क्रुक्सने त्यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप आहे. या गोळीबारात उपस्थितांपैकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर इतर दोन जण जखमी झाले आहेत.
 
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सिक्रेट सर्व्हिसच्या स्नायपरने 20 वर्षीय थॉमस क्रुक्सला तिथेच ठार केले.
 
एफबीआयने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या हत्येच्या प्रयत्नात थॉमस क्रुक्स सहभागी होता आणि या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे.
 
एफबीआयने सांगितलं की थॉमस क्रुक्सकडे त्याचं ओळखपत्र नव्हतं, त्यामुळे डीएनए चाचणीचा वापर करून त्याची ओळख पटवण्यात आली.
 
थॉमस क्रुक्स हा पेन्सिल्वेनियातील बेथेल पार्कचा रहिवासी होता. ज्या ठिकाणी हत्येचा प्रयत्न करण्यात आला त्या बटलर शहरातील सभास्थळापासून त्याचं शहर सुमारे 70 किलोमीटर अंतरावर आहे.
 
पिट्सबर्ग ट्रिब्यून-रिव्ह्यू या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार थॉमसने 2022 मध्ये बेथेल पार्क उच्च माध्यमिक शाळेतून शिक्षण घेतलं आहे.
 
अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारी नोंदींमध्ये क्रुक्स हा रिपब्लिकन पक्षाचा नोंदणीकृत सदस्य असल्याची माहिती आहे.
 
2021 मध्ये त्याने 'अ‍ॅक्ट ब्लू' नावाच्या लिबरल कॅम्पेनला त्याने 15 डॉलर दान केल्याची नोंद आहे.
 
हा हल्ला करण्यामागे काय प्रेरणा होती?
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या यंत्रणेने हल्लेखोराचा हेतू आणि इतर व्यक्तींच्या सहभागाबाबत चौकशी सुरू केली आहे.
 
एफबीआयचे पिट्सबर्गचे प्रभारी केविन रोजेक यांनी शनिवारी रात्री पत्रकार परिषदेत सांगितलं की, "सध्या हा हल्ला करण्यामागे त्याचा नेमका काय हेतू होता हे आम्ही शोधू शकलो नाही."
 
रोजेक म्हणाले की, घडलेल्या प्रकरणाच्या चौकशीचं काम अनेक महिने चालू शकतं आणि जोपर्यंत क्रुक्सचा हेतू शोधला जात नाही तोपर्यंत आम्ही अव्याहतपणे मेहनत करण्यास तयार आहोत.
 
थॉमस क्रुक्सचे वडील मॅथ्यू क्रुक्स यांनी सीएनएनला सांगितलं की, 'नेमकं काय सुरूय हे समजण्याचा प्रयत्न मी करत आहे.'
 
मुलाविषयी काहीही भाष्य करण्याआधी ते तपास अधिकाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे बघणार आहेत, असं त्यांनी सांगितलं.
 
या गोळीबारात कुणाचा मृत्यू झाला?
ट्रम्प यांच्या सभेत झालेल्या गोळीबारात 50 वर्षांच्या कोरी कॉम्परेटर यांचा मृत्यू झाला आहे तर इतर दोन जण जखमी झाले आहेत.
 
या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून लिहिलं की, "माझ्यावर झाडलेल्या गोळीने उजव्या कानाच्या वरचा भाग उडाला आहे."
 
ट्रम्प यांनी लिहिलं की, "मला आवाज ऐकू आला आणि मला लगेच कळलं की काहीतरी गडबड आहे. गोळी माझ्या कानातून आरपार गेल्याचं मला लगेच जाणवलं. माझ्या कानातून लगेच रक्त यायला लागलं आणि मग मला कळलं नेमकं काय झालंय ते."
 
सुरक्षा अधिकाऱ्यांनी ट्रम्प यांना घेराव घातला तेव्हा त्यांच्या कानातून रक्त राहत असल्याचं दिसत होतं, त्यांच्या चेहऱ्याचा एक भाग रक्ताने माखला होता.
 
रिपब्लिकन नॅशनल कमिटी (RNC)च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार ट्रम्प आता सुरक्षित आहेत आणि पोलीस आणि सुरक्षा यंत्रणेचे ते खूप आभारी आहेत.
 
हल्लेखोर डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून किती अंतरावर होता?
एका प्रत्यक्षदर्शीने बीबीसीला सांगितले की ट्रम्प यांच्यावर गोळीबार होण्यापूर्वी त्याने हल्लेखोराला त्या इमारतीवर रायफलसह पाहिले होते.
 
बीबीसी व्हेरिफायने या प्रकरणाच्या व्हीडिओ फुटेजची पडताळणी केली आणि हे समोर आलं की मंचापासून 200 मीटरपेक्षाही कमी अंतरावर असणाऱ्या एका वेअरहाऊसच्या इमारतीवरून ही गोळी झाडण्यात आली होती.
 
टीएमझेड या संस्थेकडून मिळालेल्या व्हीडिओमध्ये गोळीबार सुरू झाला तो क्षण दिसतो आहे.
 
बीबीसीचे अमेरिकेतील भागीदार सीबीएस न्यूजने दिलेल्या अहवालांनुसार हल्लेखोराने 'AR स्टाईल रायफल'चा वापर करून हा गोळीबार केला आहे.
 
मात्र एफबीआयने म्हटलं आहे की, आत्ताच या हल्लेखोराने कोणती बंदूक वापरली होती किंवा बंदुकीच्या किती फैरी झाडल्या गेल्या हे सांगणं कठीण आहे.
 
एफबीआयने सांगितलं की सिक्रेट सर्व्हिसच्या एका जवानाने या हल्ल्याचं लगेच प्रत्युत्तर दिलं आणि गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला ठार केलं.
 
व्हीडिओ फुटेजमध्ये सशस्त्र अधिकारी एका इमारतीवरील छतावर हल्लेखोराच्या शरीराकडे जाताना दिसत आहेत.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

महायुतीला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही,बेरोजगारीवर शरद पवारांची टीका

नितीन गडकरींचा मोठा आरोप, 'काँग्रेसने ग्रामीण भारताला प्राधान्य दिले

तरुणाने भाजप उमेदवाराला आश्वासनांबद्दल प्रश्न केला,रॅलीच्या ठिकाणाहून ढकलून बाहेर काढले

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पुण्यातील एक नेता बिश्नोई टोळीच्या निशाण्यावर असल्याचा मुंबई पोलिसांचा दावा

माजी खासदार सुभाष वानखेडे यांची शिवसेना युबीटीतून हकालपट्टी

पुढील लेख
Show comments