Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एका डिझायनर हँडबॅगनं या देशाचं राजकारण ढवळून का निघालं?

Webdunia
शुक्रवार, 12 जुलै 2024 (10:02 IST)
एक तास लांबीच्या एका व्हीडिओमुळे दक्षिण कोरियाच्या राजकारणात भूकंप झाला. गुप्तपणे रेकॉर्ड केलेल्या या व्हीडिओची क्वालिटी काही फार खास नव्हती. त्यात काय चाललं आहे हे धड समजतही नव्हतं.
 
पण त्यात एक पुरुष एका महिलेला एक महागडी बॅग देताना दिसतो. वरवर पाहिलं तर यात काही विशेष आहे असं वाटणार नाही.
 
मात्र दक्षिण कोरियाची राजधानी सोलमध्ये छुप्या कॅमेऱ्यानं रेकॉर्ड केलेल्या या व्हीडिओनं या देशाच्या राजकारणात उलथापालथ झाली. काहींच्या मते याचा देशातल्या सार्वत्रिक निवडणुकांवरही प्रभाव पडला.
 
कारण या व्हीडिओत कुणी सामान्य महिला नाही तर देशाची फर्स्ट लेडी म्हणजे राष्ट्राध्यक्षांची पत्नी किम क्योन आहेत.
 
51 वर्षीय किम क्योन एक फॅशनेबल महिला असून त्यांचे अनेक व्यापार आहेत.
 
पण त्यांना देऊ केलेल्या डिझायनर हँडबॅगवरुन दक्षिण कोरियाच्या राजकारणात गेले काही महिने वादळ उठलं आहे. नेमकं काय झालं.
 
हँडबॅग आणि छुपा व्हीडिओ
सप्टेंबर 2022 मध्ये ख्रिश्चन पाद्री चोई जे यूंग यांनी दक्षिण कोरियाच्या फर्स्ट लेडी किम क्योन यांची त्यांच्या खासगी निवासस्थानी भेट घेतली.
 
चोई जे यूंग चर्चचे प्रमुख होते आणि किम क्योन यांना आधीपासून ओळखत होते. ते एक धार्मिक नेता आहेत आणि दक्षिण कोरियाच्या राजकारणावर धर्माचा प्रभाव मोठा आहे, असं राफेल राशिद सांगतात. राफेल सोलमध्ये मुक्त पत्रकार म्हणून काम करतात.
 
ते सांगतात, “दक्षिण कोरिया ख्रिश्चन देश नाहीये पण ख्रिश्चन धर्माच्या नेत्यांचा इथे राजकारणावर प्रभाव आहे. हे पाद्री अनेक महिने मेसेज अपद्वारा फर्स्ट लेडींच्या संपर्कात होते, त्या दोघांमध्ये मैत्री होती.
 
दोघं त्याआधीही अनेकदा भेटले होते. चोई जे यूंग यांनी दावा केला आहे की एका भेटीदरम्यान फर्स्ट लेडी वरिष्ठ सरकारी पदांवर नियुक्तीविषयी बोलत असताना त्यांनी ऐकलं होतं.
 
फर्स्ट लेडीची सरकारमध्ये कोणतीही अधिकृत भूमिका नाही. त्यामुळे अशा विषयावर किम यांनी कुणाशी बोलणं धर्मगुरुंना योग्य वाटलं नाही.
 
या कथित हस्तक्षेपाविषयी बोलणं जनतेच्या हिताचं ठरेल, असं वाटल्यानं त्यांनी किम यांना पुन्हा भेटायला जाताना सोबत एक छुपा कॅमेरा नेला. त्यांच्या मनगटाला बांधलेल्या घड्याळात हा कॅमेरा लपवला होता.
 
पण एक वर्षानंतर तो व्हीडिओ सार्वजनिक करण्यात आला, तेव्हा फर्स्ट लेडींच्या हस्तक्षेपावरुन नाही तर दोन हजार डॉलर्सच्या एका डिझायनर हँडबॅगवरुन वाद झाला.
 
राफेल राशिद सांगतात की धर्मगुरूंना, ती हँडबॅग मैत्रीपूर्ण भेट म्हणून फर्स्ट लेडीना द्यायची होती. त्यांना लाच द्यायची नव्हती किंवा किम क्योन लाच घेतायत असं दाखवायचं नव्हतं. ते फक्त सरकारी नियुक्तींमधल्या त्यांच्या भूमिकेवर प्रकाश टाकणार होते.
 
“फर्स्ट लेडींना ही बॅग द्यायची इच्छा असल्याचं ते बोलतायत असं त्यात ऐकू येतं, पण ते बॅग देताना दिसत नाहीत. तर फर्स्ट लेडी बोलतात की तुम्ही नेहमी महागड्या भेटवस्तू का आणता, असं करू नका. व्हिडियोत त्यांच्यासमोर टेबलावर बहुदा डियोरची हँडबॅग ठेवल्याचं दिसतं. पण फर्स्ट लेडी ती हातात घेताना किंवा घरी नेताना दिसत नाहीत.”
 
अशी संदिग्धता असतानाही वाद निर्माण झाला.
 
कारण ज्या पाद्रींना रेकॉर्डिंगसाठी तो कॅमेरा पुरवणाऱ्या मीडिया व्हॉईस ऑफ सोल नामक संस्थेनं जवळपास वर्षभरानं नोव्हेंबर 2023 मध्ये हे रेकॉर्डिंग परदेशी मीडियासाठी आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केलं.
 
त्यानंतर सर्व परदेशी माध्यमांमध्ये आगीसारखी ही बातमी पसरली आणि दक्षिण कोरियात राजकीय वादळ उठलं. काही महिन्यांतच तिथे सार्वत्रिक निवडणुका होणार होत्या.
 
निवडणुकांवर हँडबॅगचा परिणाम?
सारा सोन युकेच्या शेफील्ड विद्यापीठात सेंटर फॉर साऊथ कोरियन स्टडीजच्या संचालक आहेत.
 
त्या सांगतात की, दक्षिण कोरियात एकेकडे सामान्य लोकांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि दुसरीकडे नेतेमंडळी ऐशोआरामात जगण्यासाठी आपल्या पदाचा वापर करतात अशी भावना सामान्य लोकांच्या मनात आहे.
 
अशात डियॉर बॅग एखाद्या ठिणगीसारखी ठरली. त्या हेही स्पष्ट करतात की दक्षिण कोरियात भेटवस्तू देणं घेणं हा सामाजिक प्रथेचा भाग आहे. “आपल्यापेक्षा वरिष्ठ किंवा मोठ्या व्यक्तीनं दिलेली भेटवस्तू नाकारणं कठीण असतं. पण भेटवस्तूंची देवाणघेवाण भ्रष्टाचाराचं दार ठरू शकते. कारण एखादं गिफ्ट कधी लाच बनेल हे सांगता येणं कठीण असतं.”
 
यावर उपाय म्हणूनच 2016 साली दक्षिण कोरियात एक लाचखोरीविरोधी कायदा बनवण्यात आला.
 
या कायद्याअंतर्गत एखाद्या सरकारी पदाधिकारी किंवा त्याच्या पती वा पत्नीला किती किंमतीपर्यंतची भेटवस्तू स्वीकारता येईल, हे निश्चित करण्यात आलं.
 
जी हँडबॅग फर्स्ट लेडींना देण्यात आली, ती निर्धारित मर्यादेपेक्षा बरीच महाग होती.
 
आपल्या आणि सरकारी पदाधिकाऱ्यांच्या जीवनशैलीतला फरक पाहून सामान्य लोक बरेच नाराज असतात आणि त्यात या वादानं त्यांच्या मनातल्या रागाच्या आगीत तेल ओतलं.
 
दक्षिण कोरियन समाजातली ही असमानता ऑस्कर पुरस्कार विजेती फिल्म पॅरासाइट आणि टीवी सिरीज स्क्विड गेममध्ये तुम्ही पाहिली असेल.
 
सारा सोन सांगतात, “पॅरासाइट आणि स्क्विड गेम ही सामाजिक असमतोलावरची टिप्पणी आहे. आपण पॅरासाइट आणि स्क्विड गेममध्ये पाहिलं असेल की जगणं थोडंसं सुधारण्यासाठीही किती संघर्ष करावा लागतो.
 
“एका चांगल्या जीवनाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सामान्य नागरिकांना आपला जीवही धोक्यात टाकायला तयार असतात. पण उच्च वर्गातले लोक मात्र आरामात जगत असतात.”
 
लोकांना वाटू लागलं की, सत्ताधारी नेते सामाजिक असमानता कमी करण्यासाठी, काही करणार नाहीत आणि आपल्या मर्जीनुसार नियमांचं उल्लंघन करत राहतील.
 
फर्स्ट लेडींवर त्याआधीही काही आरोप झाले होते, अशी माहिती सारा देतात.
 
“फर्स्ट लेडींनी त्यांच्या एम ए आणि पीएचडीच्या थिसीससाठी कॉपी केल्याचा म्हणजे वाङ्मयचौर्याचा आरोपही त्यांच्यावर केला गेला. अलीकडेच डॉईच मोटर्सच्या शेअर्सच्या किंमती प्रभावित केल्याचा आरोपही लागला होता.”
 
एकतर हे आरोप सिद्ध झाले नाहीत किंवा शेअर्सच्या किंमतींवर प्रभाव टाकण्याच्या आरोपाचा तपास झाला नाही.
 
सारा सोन माहिती देतात की किम क्योन यांचे पती राष्ट्रपति यून सिक कियोल यांनी काही प्रकरणांच्या तपासावर निर्बंध घातले होते, ज्यामुळे त्यांची लोकप्रियता घटली.
 
दोन वर्ष राष्ट्राध्यक्षपदावर राहिल्यानंतर, आपल्या पक्षाला आता संसदीय निवडणुकीत बहुमत मिळेल, अशी आशा त्यांना होती.
 
पण जनतेनं आपली नाराजी स्पष्टपणे दाखवून दिली आणि त्यांच्या पीपल्स पॉवर पक्षाला निवडणुकीत मोठं नुकसान झेलावं लागलं.
 
राष्ट्राध्यक्षांना निवडणुकीत धक्का
राष्ट्राध्यक्ष यून यांचा कार्यकाळ मार्च 2027 मध्ये संपेल आणि दक्षिण कोरियाच्या कायद्यानुसार ते पुन्हा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून येऊ शकत नाहीत.
 
संसदेच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या पराभवाचा अर्थ जोंग यून ली समजावून सागंतात. जोंग यून अमेरिकेच्या नॉर्थ ग्रीनविल विद्यापीठात राज्यशास्त्राचे असिस्टंट प्रोफेसर आहेत.
 
ते सांगतात की राष्ट्राध्यक्ष यून दक्षिण कोरियाच्या इतिहासातले असे पहिलेच राष्ट्राध्यक्ष आहेत ज्यांचं त्यांच्या कार्यकाळात कधीही संसदेवर नियंत्रण नव्हतं.
 
राष्ट्राध्यक्ष यून यांची पीपल्स पॉवर पार्टी आणि विरोधातील डेमोक्रेटिक पार्टी यांच्यात अनेक मुद्द्यांवर संसदेत मतभेद झाले आहेत. त्यात सर्वात महत्त्वाचा आहे उत्तर कोरियाचा मुद्दा.
 
दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस कोरियाची फाळणी झाली, उत्तर कोरिया वेगळा झाला आणि आज तो देश एक अणुशक्ती आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून यांना उत्तर कोरिया हा एक मोठा धोका वाटतो.
 
जोंग यून ली सांगतात, “राष्ट्राध्यक्षांच्या काळात सरकारनं उत्तर कोरियाविषयी कडक धोरणं अवलंबिली आहेत. त्यांचं म्हणणं आहे की जोवर उत्तर कोरिया अण्वस्त्रांचा पूर्णपणे त्याग करत नाही, तोवर त्यांच्यावर अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय समुदायासोबत दक्षिण कोरियाही निर्बंध घालेल आणि दबाव कायम ठेवेल.
 
“विरोधी पक्ष असलेल्या डेमोक्रेटिक पार्टीला ही भूमिका चिंताजनक वाटते, कारण त्यांच्या मते अशा दबाव टाकल्यानं दोन्ही देशांतली दरी वाढत जाईल. उत्तर कोरियाशी संपर्क राखून चर्चा सुरू ठेवायला हवी, असं विरोधी पक्षाला वाटतं.
 
दक्षिण कोरियाचे पाश्चिमात्य देशांशी, विशेषत: अमेरिकेशी चांगले संबंध आहेत आणि हा दोन्ही कोरियांमधल्या वादाचा एक मुद्दा आहे. दक्षिण कोरियात तीस हजार अमेरिकन सैनिक तैनात आहेत.
 
2023 मध्ये अमेरिकेनं दक्षिण कोरियाशी एक सुरक्षा करार केला होता, पण त्यात जपानचाही सहभाग होता.
 
ही गोष्ट दक्षिण कोरियातल्या अनेकांना रुचली नाही, कारण गेल्या शतकाच्या सुरुवातीला जपाननं कोरियाई द्वीपकल्पावर कब्जा केला होता.
 
जपानसोबत संबंध सुधारण्याच्या राष्ट्राध्यक्ष यून यांच्या धोरणावर विरोधी पक्षानं टीकाही केली. जपान हा केवळ एकच कूटनीतीचा मुद्दा नाहीये.
 
तर चीननं तैवानवर केलेला दावा आणि युक्रेन युद्धाच्या मुद्द्यावरही पाश्चिमात्य देश आणि पूर्वेकडील देशांमध्ये मतभेद वाढत आहेत. अशात आपण कोणाची बाजू घ्यायला हवी, यावरही दक्षिण कोरियात चर्चा होते आहे.
 
जोंग यून ली सांगतात, “विरोधी पक्षाचं मत आहे की चीन हा दक्षिण कोरियाचा शेजारीच नाही, तर व्यापारातला सर्वात मोठा भागीदारही आहे. त्यामुळे पाश्चिमात्य देशांच्या अगदी निकट गेल्यास दक्षिण कोरियाचं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं, असं त्यांना वाटतं.”
 
मग राष्ट्राध्यक्ष यून हे आव्हान कसं पेलतील, असा प्रश्न निर्माण होतो. ते विरोधी पक्षाशी आणि माध्यमांशी फारसे बोलत नाहीत, अशीही टीका केली जाते.
 
राष्ट्राध्यक्षांनी आता ही टीका गांभीर्यानं घेतली आहे आणि ते लोकांना भेटण्याचा आणि माध्यमांशी संवाद साधण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करताना दिसतात. सध्य संसदेत विरोधी पक्षाकडे बहुमत आहे, ज्यामुळे आता ते विरोधी पक्षासोबतही सल्लामसलत करत आहेत.
 
पुढची वाट
अँड्र्यू येव अमेरिकेत ब्रूकिंग्ज इन्स्टिट्यूटमध्ये वरिष्ठ संशोधक आहेत. त्यांच्या मते राष्ट्राध्यक्ष यून यांच्यासमोर राजकीयच नाही तर वैयक्तिक आव्हानंही आहेत.
 
ते सांगतात, “राष्ट्राध्यक्ष यून सुरुवातीपासून राजकारणात नाहीत, तर ते आधी एक वकील होते. त्यामुळे लोकांसोबत मिसळणं किंवा लोकांना आकर्षित करणं त्यांना सहज जमत नाही. त्यांचा स्वभाव लवचिक किंवा मनमिळाऊ नाही तर अहंकारी वाटतो. त्यामुळे एक व्यक्ती म्हणून ते फारसे लोकप्रिय नाहीत.”
 
लोकांसोबत जोडलं जाण्यात असमर्थ असल्यानं त्यांच्यासमोरचं आव्हान आणखी वाढलं आहे. अशात पुढच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला यश मिळण्याच्या आशा कमी दिसतात.
 
धोरणांचा विचार केला, तर त्यांचे विरोधी पक्षाशी मोठे मतभेद आहेत, जसं उत्तर कोरियासोबत नात्याच्या बाबतीत दिसून आलं आहे.
 
अँड्र्यू येव सांगतात, “अण्वस्त्र सज्ज उत्तर कोरियासोबत कसं वागायचं, हे कुणालाच माहिती नाही. हीच समस्या आहे. त्यात उत्तर कोरियाला अमेरिकेशी किंवा दक्षिण कोरियाशी बातचीत करायची इच्छा नाही आणि त्यामुळे हा पेच आणखी कठीण बनला आहे.”
 
अर्थात, दक्षिण कोरियामध्ये निवडणुका होण्याआधी जगातल्या इतर देशांमध्ये जे बदल होत आहेत, त्यांचाही राष्ट्राध्यक्ष यून आणि त्यांच्या पक्षाच्या भवितव्यावर परिणाम होऊ शकतो.
 
अँड्र्यू येव माहिती देतात, “दक्षिण कोरियात तैनात असलेल्या अमेरिकन सैनिकांची संख्या कमी करण्याचा विचार असल्याचं डोनाल्ड ट्रंप यांनी स्पष्ट केलं होतं. तसं घडणं राष्ट्राध्यक्ष यून आणि त्यांच्या अमेरिका समर्थक पक्षाला रुचणार नाही.
 
“परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होऊ शकते, कारण उत्तर कोरियावर अंकुश ठेवण्यासाठी दक्षिण कोरियानंही अण्वस्त्रं तयार करायला हवीत, असा विचार पुढे येतो आहे. कारण लोकांना वाटतं की जर अमेरिका लष्करी मदत देणार नसेल तर आपल्याकडे स्वतःची अण्वस्त्रं असायला हवीत.”
 
शेवटी, एक डिझायनर हँडबॅग दक्षिण कोरियाच्या राजकारणाविषयी काय सांगते? तर बरंच काही.
 
एक ख्रिश्चन पाद्री आणि दक्षिण कोरियाच्या फर्स्ट लेडी यांच्यातल्या भेटीच्या त्या गुप्तपणे रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमुळे लोकांमध्ये नाराजी पसरली. त्या महागड्या बॅगमुळे कोरियन समाजातली असमानता लोकांना पुन्हा जाणवली. त्याचा परिणाम निवडणुकांवर झाला आणि यापुढेही तो कायम राहू शकतो.
 
त्या घटनेनंतर काही महिन्यांनी राष्ट्राध्यक्ष यून यांनी आपल्या पत्नीच्या वागणुकीविषयी माफी मागितली. तर त्यांची पत्नी किम क्योन गेल्या काही महिन्यांपासून सार्वजनिक ठिकाणी दिसलेल्या नाहीत.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मोठी बातमी ! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जीवघेणा हल्ला

LIVE: शिंदे सरकारची नवी योजना करते महिला मतदारांना आकर्षित

शिंदे सरकारची नवी योजना करते महिला मतदारांना आकर्षित

मुंबईसह अनेक शहरांमध्ये चार दिवस ड्राय डे जाहीर

एनसीपी नेता छगन भुजबल यांचा बटेंगे तो कटेंगे घोषणेला विरोध

पुढील लेख
Show comments