Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्टारलायनरमधून 8 दिवसांच्या मोहिमेसाठी गेलेले अंतराळवीर अजून का परतले नाहीत?

Webdunia
सोमवार, 1 जुलै 2024 (17:42 IST)
भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना घेऊन बोईंग स्पेस कंपनीचं 'स्टारलायनर' 5 जून रोजी अंतराळात झेपावलं. 'बोईंग' ही अशी कामगिरी बजावणारी दुसरी खासगी कंपनी ठरली. पण 8 दिवसांच्या मोहीमेसाठी गेलेले हे अंतराळवीर अजूनही परतू शकलेले नाहीत.
 
स्टारलायनरमध्ये बिघाड झालाय का? अंतराळवीर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये अडकलेयत का?
 
थ्रस्टर्स (Thrusters) मध्ये निर्माण झालेल्या अडचणी आणि अंतराळयान पुढे ढकलणाऱ्या यंत्रणेत (Propulsion System) वापरण्यात येणाऱ्या हेलियम गॅसची गळती यामुळे बोईंग स्टारलायनरची पृथ्वीवर परतण्याची तारीख अजून ठरलेली नाही.
या अंतराळवीरांना घरी कधी परत आणायचं हे ठरवण्यासाठी आता नासा या सगळ्या तांत्रिक अडचणींचा उच्चस्तरीय आढावा घेतलंय.
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना सध्या कोणताही धोका नाही. पण त्यांचा अंतराळातला मुक्काम मात्र वाढलेला आहे.
 
हेलियम वायू का महत्त्वाचा?
हेलियम वायूचा वापर हा यानाच्या अंतराळातल्या वावरामध्ये, यानाला दिशा देण्यासाठी केला जातो. सोबतच पृथ्वीवर परतताना वातावरणात शिरतानाची यानाची गती कमी करण्यासाठीही हेलियम वायू महत्त्वाचा असतो.
 
या यानाच्या लाँचच्यावेळीही एक लहानशी गळती झाली होती, पण त्याचा फारसा परिणाम होणार नाही असं इंजिनियर्सना वाटलं आणि त्यामुळेच हे उड्डाण करण्यात आलं.
पण या मोहिमेदरम्यान आणखी 4 वेळा हेलियमची गळती झाली. आणि इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला पोहोचेपर्यंत यानाला दिशा देणारे 28 पैकी 5 थ्रस्टर्स बंद पडले. यापैकी 4 पुन्हा सुरू करता आले.
 
आता हाच बिघाड तपासेपर्यंत यानाचा परतीचा प्रवास थांबवण्यात आलाय.
 
अंतराळवीर धोक्यात आहेत का?
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अंतराळात अडकलेले नाहीत, त्यांचा जीव धोक्यात नाही, असं नासाने शुक्रवारी 28 जूनला घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं.
 
नासाच्या कमर्शियल क्रू प्रोग्रामचे मॅनेजर स्टीव्ह स्टिच म्हणाले, "अंतराळयान सुस्थितीत आहे. मला हे स्पष्ट करायचंय की, बुच आणि सुनी अंतराळात अडकलेले नाहीत. त्यांना स्टारलायनरमधूनच योग्य वेळी घरी आणण्याचा आमचा विचार आहे."
स्पेस स्टेशनमध्ये आणीबाणीची परिस्थिती आली तर या दोन अंतराळवीरांना स्टारलायनरमध्ये बसून पृथ्वीवर परतता येईल असंही स्टिच यांनी स्पष्ट केलंय.
 
गेल्या आठवड्यात रशियाच्या वापरात नसलेल्या उपग्रहाचे अचानक तुकडे तुकडे झाले, त्यावेळी या दोन अंतराळवीरांनी काही काळासाठी स्टारलायनरचा आसरा घेतला होता. आणि या तुटलेल्या यानाचा एखादा तुकडा स्पेस स्टेशनवर आदळला असता, तर त्यांना स्टारलायनरचा वापर करावा लागला असता.
 
विल्यम्स आणि विल्मोर हा अंतराळातला अधिकचा काळ स्पेस स्टेशनमध्ये महत्त्वाची गोष्टी करण्यासाठी वापरत असून ते स्पेसवॉक्स, वैज्ञानिक संशोधनासाठी मदत करत आहेत, सोबतच ग्राऊंड टीमला ते महत्त्वाची माहिती गोळा करण्यासाठीही मदत करत असल्याचं नासाने बोईंग स्टारलायनरच्या मिशन ब्लॉगमध्ये म्हटलंय.
एखाद्या फुटबॉल मैदानाच्या आकाराएवढ्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये विविध अंतराळ संस्थाची यानं Dock होऊ शकतात. म्हणजे जोडली जाऊ शकतात आणि तिथे राहून अंतराळवीर वेगवेगळे प्रयोग करतात. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये तिथे राहण्यासाठी आवश्यक सर्व गोष्टींचा साठा असतो. आणि यामुळेच अंतराळवीर सुरक्षित आहेत.
 
सध्या बोईंग स्टारलायनरकडे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला 45 दिवसांसाठी 'डॉक' होण्याची परवानगी आहे. स्टारलायनरच्या सध्याच्या बॅटरीजच्या रचनेमुळे ही मर्यादा आहे.
 
पण यानाच्या बॅटरीज व्यवस्थित काम करत असून गरज पडल्यास 45 दिवसांपेक्षा अधिक काळही राहता येईल असं स्टिच यांनी स्पष्ट केलंय.
 
लाँच थांबवायला हवं होतं का?
गळती असतानाही यान लाँच का करण्यात आलं, हे उड्डाण थांबवण्यात यायला हवं होतं का असे सवाल आता उपस्थित करण्यात येत आहेत.
 
रॉकेट्सना पुढे ढकलणारी यंत्रणा Propulsion System तयार करणाऱ्या युकेमधल्या रॉकेट इंजिनियरिंग या कंपनीचे प्रमुख डॉ. अॅडम बेकर सांगतात, "हा लाँच का करण्यात आला हे मी समजू शकतो, पण या गळतीचं कारण शोधून ते दुरुस्त करण्यात यायला हवं होतं. सगळ्या गोष्टी अगदी अचूक करण्याच्या प्रयत्नांमध्ये प्रचंड वेळ लागून सगळीचं खूप खर्चिक होण्याचा धोका असतो. या परिणाम म्हणजे लोकांचा आणि राजकीय पाठिंबा या काळात कमी होतो. मला असं वाटतं की लाँच नंतर ही गळती वाढू शकते याचा त्यांनी पुरेसा विचार केला नसावा. नासा आणि बोईंगने हे करायला हवं होतं."
 
पण असं करणं प्रचंड खर्चिक ठरलं असतं कारण त्यासाठी हे रॉकेट त्याच्या लाँच पॅडपासून दूर करून या अंतराळयानाची प्रोपल्शन सिस्टीम वेगळी काढावी लागली असती.
स्टारलायनरच्या यापूर्वी दोन वेळा मानवरहित चाचण्या घेण्यात आल्या होत्या. त्यावेळी या गोष्टी लक्षात कशा आल्या नाहीत असा प्रश्न ओपन युनिव्हर्सिटीचे अंतराळ वैज्ञानिक डॉ. सिमियन बार्बर विचारतात.
 
ते म्हणतात, "गेल्या काही आठवड्यांत ज्या अडचणी आल्याचं पाहिलंय, त्या स्टारलायनर प्रोग्रॅमच्या या टप्प्यात येणं अपेक्षित नाही. या मोहीमेचं उद्दिष्टं होतं अंतराळवीरांना पाठवून यानाचा परफॉर्मन्स तपासणं. पण त्याऐवजी अगदी सुरुवातीच्या टप्प्यातल्या ज्या अडचणी येतात, त्यावर लक्ष द्यावं लागतंय. आतापर्यंत या गोष्टी निस्तरल्या जाणं अपेक्षित होतं."
 
नासा इतकी खबरदारी का घेतंय?
नासाच्या मोहीमांच्या इतिहासातले दोन क्षण अंतराळ मोहिमांमधला मोठा धोका दाखवणारे होते.
 
पहिली - 1986 मधली चॅलेंजर दुर्घटना. लाँच झाल्याच्या काही सेकंदांमध्ये चॅलेंजरचा स्फोट झाला आणि त्यातले सातही अंतराळवीर मारले गेले.
तर 2003 साली कोलंबिया अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत शिरताना त्याचे भाग वेगवेगळे झाले आणि यातलेही सात अंतराळवीर मारले गेले.
 
भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला याच दुर्घटनेत मारल्या गेल्या.
 
यानंतरच मोहीमेतली एखादी गोष्ट नीट होत नसली तर नासामधले मिशन मॅनेजर्स अधिक काळजीपूर्वक पावलं उचलताना दिसतात.
 
स्टारलायनरच्या या मोहीमेत नासाकडे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनसारखी सुरक्षित जागा असल्याने या वेळेचा वापर केला जातोय. या मोहीमेसाठीचे बोईंग कंपनीचे प्रोग्रॅम मॅनेजर मार्क नॅपी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं, "सखोल विश्लेषण करण्यासाठी वेळ वापरणं महत्त्वाचं आहे. आमच्याकडे वेळ असून आणि अधिक तपासणी करण्याची इच्छा असूनही जर ते आम्ही केलं नाही, तर ते बेजबाबदारपणाचं ठरेल."
 
स्टारलायनरमध्ये असणाऱ्या थ्रस्टर्ससारख्याच दुसऱ्या थ्रस्टर्सचा अभ्यास नासाच्या न्यू मेक्सिकोमधल्या व्हाईट सँड्स प्रकल्पातले इंजिनियर्स आता करतील. अंतराळात असताना ज्या क्रिया केल्या जातात, तशाच करून पाहिल्या जातील आणि मग त्यातून निष्कर्ष काढला जाईल.
 
पण अंतराळात असणाऱ्या स्टारलायनरमधल्या बिघडलेल्या थ्रस्टर्सची थेट पाहणी इंजिनियर्सना करता येणार नाही. कारण हे थ्रस्टर्स अंतराळ यानाच्या सर्व्हिस मॉड्यूलमध्ये असतात. आणि हा भाग यान पृथ्वीवर परततानाच यानातून बाहेर येईल (Jettisoned) आणि यान वातावरणात आल्यावर कार्यरत होईल.
 
नासाने असंही म्हटलंय की या अंतराळयानातल्या बिघाडांचा फ्लाईट इंजिनियर्सना आताच सखोल अभ्यास करायचा आहे कारण पृथ्वीच्या वातावरणात परत शिरताना अंतराळवीर असलेली कॅप्सूल पॅराशूटच्या मदतीने जमिनीवर येईल, तर स्टारलायनरचं सर्व्हिस मॉड्यूल अंतराळात शिरल्यानंतर जळून जाईलं. याच मॉड्यूलमध्ये सध्या बिघाड आहे, पण तेच जळून जाणार असल्याने नेमकं काय बिनसलं याचा अभ्यास इंजिनियर्सना तेव्हा करता येणार नाही.
 
सर्व अभ्यासाअंती स्टारलायनर सुरक्षित नसल्याचं आढळलं, तर ISSमधल्या अंतराळवीरांना स्पेसएक्स (SpaceX)च्या ड्रॅगन कॅपस्युलने परत आणणं हा नासा आणि बोईंगकडचा शेवटचा उपाय असेल, पण बोईंगसाठी ही मोठी नामुष्की ठरेल.

Published By- Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता नसणार चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेस वर टोला

IPL 2025: श्रेयस अय्यर लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला

IND vs AUS: 16 कसोटी डावांनंतर विराटचे शतक, सचिनचा विक्रम मोडला

LIVE: अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपद साठी निवड, राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

अजित पवार यांची विधीमंडळ पक्षनेतेपद साठी निवड, राष्ट्रवादीच्या बैठकीत निर्णय

पुढील लेख
Show comments