Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई-महाराष्ट्राच्या फौजेनेच केला मुंबई इंडियन्सचा गड खालसा

Webdunia
रविवार, 9 एप्रिल 2023 (10:10 IST)
मुंबई इंडियन्स-चेन्नई सुपर किंग्स मुकाबला म्हणजे आयपीएलमधल्या सर्वोत्तम सामन्यांपैकी एक.
फुटबॉलमधली एल क्लासिको ही उपमा या लढतीला दिली जाते. चेन्नई आणि मुंबई या दोन्ही संघांना प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. शनिवारी वानखेडे अर्थात मुंबई इंडियन्सच्या बालेकिल्ल्यात झालेल्या सामन्यात चाहत्यांचा निळा सागर अवतरला होता पण चेन्नईने सरस खेळ करत बाजी मारली. आयपीएल स्पर्धेत चेन्नईच्या वर्चस्वाला आव्हान देत जेतेपदांवर हुकूमत राखण्याचं काम मुंबईने केलं आहे.
 
शनिवारी मात्र चेन्नईचा संघ अव्वल ठरला. विशेष म्हणजे चेन्नईच्या विजयात मुंबई-महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दिलेलं योगदान मोलाचं ठरलं.
अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड, तुषार देशपांडे, शिवम दुबे, राजवर्धन हंगारगेकर हे सगळे शिलेदार चेन्नईच्या संघात आहेत. या सगळ्यांनी मुंबईला त्यांच्याच गडावर चीतपट करण्यात सिंहाची भूमिका वठवली.
 
अजिंक्य रहाणे
मोईन अली फिट असता तर अजिंक्यला या सामन्यात खेळण्याची संधीच मिळाली नसती. नाणेफेकीपूर्वी मोईन खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं. त्याच्याऐवजी अजिंक्य रहाणेला संधी देण्यात आली. अजिंक्यचं हे सीएसके पदार्पण.
 
भारतीय क्रिकेट संघाच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये अजिंक्यचं नाव नाहीये. काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने खेळाडूंसाठीची वार्षिक करार सूची जाहीर केली. त्यातूनही अजिंक्यला वगळण्यात आलं. दिल्ली कॅपिटल्स संघानेही अजिंक्यला रिलीज केलं होतं.
भारतीय कसोटी संघाचं कर्णधारपद भूषवलेल्या अजिंक्यला आयपीएल स्पर्धेचाही प्रदीर्घ अनुभव आहे. अजिंक्यला या महत्त्वपूर्ण लढतीत खेळवण्याचा निर्णय चेन्नई संघव्यवस्थापनाने घेतला. तडाखेबंद अर्धशतक झळकावत अजिंक्यने हा विश्वास सार्थ ठरवला.
 
35 वर्षीय अजिंक्यने या खेळीसह आपल्यातलं क्रिकेट संपलेले नसून, भारतीय संघात पुनरागमनासाठी तय्यार असल्याचं दाखवून दिलं. सामन्यानंतर बोलताना वानखेडेवर अद्याप कसोटी खेळलेलो नाही. इथे कसोटी खेळायला आवडेल असं सांगत रहाणेने पुनरागमनाचे संकेतही दिले.
 
ऋतुराज गायकवाड
महाराष्ट्राकडून खेळणारा ऋतुराज हा चेन्नईचा हुकूमी एक्का झाला आहे. 2018 मध्ये चेन्नईने 20 लाख रुपये खर्चून ऋतुराजला ताफ्यात समाविष्ट केलं. 2021 हंगामात ऋतुराजने सर्वाधिक धावांची कमाई करत ऑरेंज कॅपवर नाव कोरलं.
 
याच हंगामात ऋतुराजने खणखणीत शतकही झळकावलं. आपल्या सहजसुंदर आणि कलात्मक खेळाने ऋतुराजने जगभरातल्या क्रिकेट चाहत्यांना जिंकून घेतलं आहे. चेन्नईने 6 कोटी रुपये मानधनासह ऋतुराजला आपल्या ताफ्यातच राखलं.
धोनीच्या निवृत्तीनंतर ऋतुराजकडे चेन्नईचा भविष्यातील कर्णधार म्हणून पाहिलं जात आहे. यंदाच्या हंगामातही ऋतुराजने उत्तम सुरुवात केली आहे.
 
शनिवारी झालेल्या लढतीत रहाणेने जोरदार आक्रमण केल्याने ऋतुराजने मवाळ भूमिका स्वीकारली. अजिंक्यला अधिकाअधिक स्ट्राईक देण्याचा त्याचा प्रयत्न होता. अजिंक्य बाद झाल्यानंतर ऋतुराजने सूत्रधाराची भूमिका स्वीकारत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
 
तुषार देशपांडे
"आमचा त्याच्यावर विश्वास आहे. जेव्हा तुम्ही नवे असता, तेव्हा तुमच्यावर वेगळंच दडपण असतं. त्याने डोमेस्टिक हंगामात चांगली कामगिरी केली होती. योजनांची मैदानात अंमलबजावणी कशी करायची याबाबत आम्ही त्याच्याशी बोलत आहोत. पहिल्या काही सामन्यात त्याने नोबॉल टाकले. पण तो सुधारणा करतो आहे. आज त्याने रोहित शर्माला बाद करण्यासाठी टाकलेला चेंडू कमाल होता", कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सामना संपल्यानंतर बोलताना तुषारबद्दल काढलेले हे उद्गार.
रोहित शर्मा खेळपट्टीवर स्थिरावला तर काय करु शकतो याची चेन्नईला कल्पना होती. रोहितसारख्या अनुभवी फलंदाजांला त्रिफळाचीत करण्याची करामत तुषारने साधली. त्यातच दीपक चहर पहिल्याच षटकात दुखापतग्रस्त झाल्याने तुषारवर अधिक दडपण आणि जबाबदारी होती.
 
रोहित शर्मा आणि टीम डेव्हिड या धोकादायक फलंदाजांना तंबूत धाडत तुषारने ताकद दाखवली. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये मुंबईसाठी खेळणाऱ्या तुषारला वानखेडे म्हणजे घरचं मैदान. मैदानाची, इथल्या खेळपट्टीची, वातावरणाची सखोल माहिती असणाऱ्या तुषारने हे सगळं समजून घेत गोलंदाजी केली.
 
शिवम दुबे
खणखणीत फटकेबाजी आणि उपयुक्त मध्यमगती गोलंदाजी हे शिवम दुबेचं गुणवैशिष्ट्य. बंगळुरू आणि राजस्थान संघाकडून खेळलेल्या शिवमचं नैपुण्य चेन्नईने हेरलं. मुंबईकर शिवमसाठी वानखेडेचं मैदान म्हणजे दुसरं घरच. या मैदानाचा चप्पनचप्पा माहिती असलेल्या शिवम दुबेने 26 चेंडूत 28 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
 
अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर शिवमने ऋतुराजला चांगली साथ दिली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 38 चेंडूत 43 धावांची संयमी भागीदारी केली. या भागीदारीमुळेच मुंबईचे सामन्यात पुनरागमन करण्याचे रस्ते बंद झाले.
 
राजवर्धन हंगारगेकर
वेगवान गोलंदाज, फटकेबाजी करु शकणारा फलंदाज आणि उत्तम क्षेत्ररक्षक ही राजवर्धनची ओळख आहे. गेल्या वर्षी राजवर्धनला संधी मिळाली नव्हती. पण यंदा चेन्नई व्यवस्थापनाने राजवर्धनला अंतिम अकरात खेळवलं आहे.
 
राजवर्धनने गुजरातविरुद्धच्या लढतीत 3 विकेट्स घेत आपली निवड योग्य असल्याचं सिद्ध केलं होतं. शनिवारच्या लढतीत राजवर्धनचं नाव अंतिम अकरात नव्हतं पण इम्पॅक्ट प्लेयर्ससाठी निवड होऊ शकणाऱ्या पाच खेळाडूंमध्ये त्याचं नाव होतं.
Published By- Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

पर्थ कसोटीपूर्वी रोहित शर्मा या दिवशी संघात सामील होणार

वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरने लहान वयातच द्विशतक लावले

आयसीसी क्रमवारीत टिळक वर्माने सूर्य कुमार यादवला मागे टाकले

गंभीरला फसवणूक केल्याप्रकरणी दिल्ली हायकोर्टा कडून मोठा झटका

पाच महिला खेळाडूंचा कराचीत सुटका, सांघिक हॉटेलला आग

पुढील लेख
Show comments