Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विराट कोहली- गौतम गंभीर भिडले; लखनौत मॅचनंतर काय झालं?

Webdunia
मंगळवार, 2 मे 2023 (09:50 IST)
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि लखनौ सुपरजायंट्स संघाचा मेन्टॉर गौतम गंभीर या दोन दिल्लीकरांमध्ये जोरदार हमरीतुमरी झाली.
 
सोमवारी लखनौ इथे अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर या दोन संघांमध्ये झालेल्या मुकाबल्यात बंगळुरूने 18 धावांनी विजय मिळवला. सामन्यानंतर हस्तांदोलनावेळी हा प्रकार घडला.
 
सामनाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून, दोघांच्याही या सामन्याच्या मानधनावर दंड ठोठावण्यात आला आहे.
 
दहा वर्षांपूर्वी कोहली बंगळुरूचा संघाचा आणि गंभीर कोलकाता संघाचा कर्णधार असतानाही अशाच स्वरुपाचा वाद पाहायला मिळाला होता.
 
सामन्या संपल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करत होते. त्यावेळी लखनौतर्फे खेळणारा गोलंदाज नवीन उल हक आणि कोहली यांच्यात वाद झाला.
 
यानंतर लखनौचा काईल मेयर्स आणि कोहली यांच्यातल्या बोलण्याला वादाचं स्वरुप येण्याआधीच लखनौचा मेन्टॉर गंभीरने मेयर्सला रोखलं.
 
काही सेकंदातच गंभीर रागाने कोहलीच्या दिशेने जाताना दिसला. लखनौचा कर्णधार के.एल.राहुलने गंभीरला रोखण्याचा प्रयत्न केला.
 
बंगळुरूतर्फे कर्णधार फाफ डू प्लेसिसने कोहलीला थांबवण्याचा प्रयत्न केला. पण गंभीर थेट कोहलीच्या दिशेने गेला. कोहलीने त्याच्या खांद्यावर हात ठेवत आपलं म्हणणं सांगण्याचा प्रयत्न करताना दिसला.
 
ही वादावादी वाढत गेल्याने लखनौचा अनुभवी गोलंदाज अमित मिश्राने मध्यस्थी केली. बंगळुरूच्या खेळाडूंनी कोहलीला तर लखनौच्या खेळाडूंनी गंभीरला बाजूला केलं.
 
दरम्यान सामनाधिकाऱ्यांनी याची दखल घेतली असून कोहली आणि गंभीर यांच्या यासामन्यासाठीच्या मानधनातून 100 टक्के रक्कम कापून घेण्यात येणार आहे.
 
लखनौचा गोलंदाज नवीन उल हकच्या मानधनातून 50 टक्के रक्कम कापून घेण्यात येणार आहे.
 
सामन्यादरम्यान विराट कोहली अतिशय आक्रमक पद्धतीने हातवारे करताना दिसला. लखनौच्या कृणाल पंड्याला बाद केल्यानंतर कोहलीने प्रेक्षकांच्या दिशेने तोंडावर बोट ठेऊन शांत राहण्याची खूण केली.
 
काही दिवसांपूर्वी लखनौच्या संघाने बंगळुरूत विजय मिळवला होता. त्यावेळी गंभीरने अशाच पद्धतीने शांत राहण्याची खूण केली होती.
 
17व्या षटकादरम्यान नवीन उल हक आणि कोहली यांच्यात बाचाबाची झाली होती. त्यावेळी अमित मिश्रा आणि पंचांनी मध्यस्थी करत दोघांना शांत केलं.
 
कमी धावसंख्येच्या लढतीत बंगळुरूची सरशी
रविवारी धावांचा पाऊस पडणाऱ्या लढतीनंतर सोमवारची ही लढत कमी धावसंख्येची ठरली. फलंदाजीला कठीण अशा खेळपट्टीवर बंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने नाणेफेक जिंकून फलंदाजीचाच निर्णय घेतला.
 
विराट कोहली आणि डू प्लेसिस यांनी 62 धावांची सलामी दिली. युवा रवी बिश्नोईने फिरकीच्या जाळ्यात कोहलीला अडकवलं.
डाऊन द ट्रॅक येत बिश्नोईला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात कोहली यष्टीचीत झाला. त्याने 30 चेंडूत 31 धावांची खेळी केली. शाहबाझ अहमदच्या जागी संधी मिळालेल्या अनुज रावत झटपट तंबूत परतला.
 
बिश्नोईच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीप करण्याचा ग्लेन मॅक्सवेलचा प्रयत्न फसला. तो केवळ 4 धावा करु शकला.
 
सुयश प्रभूदेसाईला अनुभवी अमित मिश्राने कृष्णप्पा गौतमकडे झेल देण्यास भाग पाडलं. एका बाजूने किल्ला लढवणाऱ्या फाफ डू प्लेसिसची एकाग्रता भंगली आणि कृणाल पंड्याकडे त्याचा झेल टिपला. फाफने 44 धावांची खेळी केली.
 
बंगळुरूच्या एकाही फलंदाजाने खेळपट्टी समजून घेत संयम दाखवला नाही. सगळे हंगाम खेळण्याचा अनुभव गाठीशी असणाऱ्या दिनेश कार्तिक धावचीत झाला.
 
महिपाल लोमरुर आणि वानिंदू हासारंगा डिसिल्व्हा यांनाही धावसंख्येत मोठी भर घालता आली नाही. 20 षटकात बंगळुरूला 126 धावांचीच मजल मारता आली.
 
लखनौतर्फे नवीन उल हकने 3 तर रवी बिश्नोई आणि अमित मिश्रा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स पटकावल्या. बंगळुरूचा डाव संपला त्यावेळी लखनौचं पारडं जड वाटत होतं.
 
राहुल दुखापतग्रस्त असल्याने काईल मेयर्सच्या साथीला अयुश बदोनी सलामीला आला. मोहम्मद सिराजने पहिल्याच चेंडूवर मेयर्सला बाद केलं.
 
पत्यांचा बंगला कोसळावा त्यापद्धतीने लखनौचाही डाव घसरत गेला. कृणाल पंड्याला मॅक्सवेलनं बाद केलं. यंदाच्या हंगामात धावांसाठी झगडणाऱ्या दीपक हुड्डाला हासारंगाने तंबूत धाडलं.
 
प्रदीर्घ काळानंतर पुनरागमन करणाऱ्या जोश हेझलवूडने बदोनीची खेळी संपुष्टात आणली.
 
मार्कस स्टॉइनस आणि निकोलस पूरन या जोडीकडून लखनौला अपेक्षा होत्या पण करण शर्माने दोघांना तंबूचा रस्ता दाखवत बंगळुरुचा विजय सुकर केला. कृष्णप्पा गौतमने 23 धावांची खेळी करत बंगळुरूचा विजय लांबवला.
 
पण बंगळुरूने शिस्तबद्ध गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या बळावर 18 धावांच्या फरकाने विजय मिळवला. लखनौला 108 धावाच करता आल्या. बंगळुरूकडून हेझलवूड आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. फाफ डू प्लेसिसला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
 
राहुल दुखापतग्रस्त
बंगळुरूची फलंदाजी सुरु असताना दुसऱ्याच षटकात डू प्लेसिसने स्टॉइनसचा चेंडू तटवून काढला. चेंडू वेगाने सीमारेषेच्या दिशेने जात होता.
 
धावता धावता लखनौचा कर्णधार राहुलच्या पायाला दुखापत झाली. तातडीने फिजिओ मैदानात आले. राहुल वेदनेने कळवळत होता. राहुलला फिजिओ आणि सहकाऱ्यांच्या साथीने बाहेर नेण्यात आलं.
 
त्याच्यावर उपचार करण्यात आले. छोट्या लक्ष्याचा पाठलाग करताना संघ अडचणीत सापडल्याने राहुल अकराव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. राहुलला चालताना वेदना होत असल्याचं दिसत होतं.
 
राहुल लखनौचा पराभव टाळू शकला नाही. त्याच्या दुखापतीचं स्वरुप कसं आहे याबाबत लखनौने अद्याप पत्रक जारी केलेलं नाही.
 
आयपीएल स्पर्धेनंतर इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. राहुलची भारतीय संघात निवड झाली आहे.
 
जयदेव उनाडकतला गंभीर दुखापत
लखनौचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकत सरावादरम्यान दुखापतग्रस्त झाला. सरावाच्या वेळी जाळीचा काही भाग बाहेर आला होता.
 
डावखुरा जयदेव रनअपमध्ये असताना त्याचा पाय जाळीत अडकला आणि तो कोसळला. त्याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली असून उपचारांसाठी त्याला मुंबईला पाठवण्यात आलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

मोहम्मद शमी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात सामील होणार

बीसीसीआयच्या आक्षेपानंतर आयसीसीने ट्रॉफी टूरचे वेळापत्रक बदलले

भारतीय कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्यांदा एका गोंडस मुलाचे बाबा बनले

IND vs SA : भारताने दक्षिण आफ्रिकेचा 135 धावांनी पराभव केला,मालिका 3-1 ने जिंकली

टीम इंडियाने चौथ्या टी-20 सामन्यात विक्रमांची मालिका रचली

पुढील लेख
Show comments