Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘तुमच्यावर मनी लाँडरिंगची केस आहे, पैसे भरा नाहीतर...’ असा फोन मला आला आणि

‘तुमच्यावर मनी लाँडरिंगची केस आहे  पैसे भरा नाहीतर...’ असा फोन मला आला आणि
Webdunia
बुधवार, 11 जानेवारी 2023 (16:03 IST)
'तुमच्या नावाचं एक पाकीट आम्ही पकडलंय, त्यात ड्रग आहे. आत्ताच मुंबईला या नाही तर इतके पैसे भरा, अन्यथा तुमच्यावर मनी लाँडरिंगची केस होईल’असा एक फोन तुम्हाला आल्यावर तुम्ही काय कराल?
तुम्ही सर्वांत आधी घाबरून जाल. पण मग आपण विचार करू की हे सगळं खोटं आहे, असले फेक कॉल्स येतच असतात.पण नंतर तुम्हाला कुणी योग्य त्या कागदपत्रांचा पुरवठा करून, आपण मुंबई पोलीस असल्याचं खात्री पटवून सांगत असेल तर काय कराल?
 
असाच काहीसा किस्सा दिल्लीस्थित एका पत्रकारासोबत घडला, जेव्हा मंगळवारी 10 जानेवारीला सकाळच्या मीटिंगच्या गडबडीत त्यांना फोन आला.
 
अनोळखी नंबरवरून आलेला तो फोन त्यांनी सकाळच्या मीटिंगच्या गडबडीत अनावधानाने उचलला आणि त्यामध्ये त्या अशा गुरफटल्या की त्यातच पाऊण तास गेला आणि दिवसभराचा मनःस्ताप झाला. आणि दिवसाअंती त्या लाख रुपये जवळजवळ गमावता गमावता राहिल्या.
 
नेमकं काय घडलं? ऐकू या गीतिका रुस्तगी यांच्याच शब्दांत...
आज सकाळी 09:45 च्या सुमारास मला 964675397 या नंबरवरून एका फेडएक्स (कुरिअर कंपनी) च्या कस्टमर केअरचा फोन आला.
 
मला सांगण्यात आलं की माझा आधार क्रमांक जोडलेला एक पॅकेज त्यांच्याकडे आलेलं आहे, पण त्यात काही अवैध वस्तू आहे, त्यामुळे आम्ही त्याची तपासणी करतोय.
 
ते म्हणाले की मी ते कथित पॅकेज 13 डिसेंबर 2022 रोजी मुंबईहून तैवानला पाठवलं होतं. त्या कथित पॅकेजमध्ये 3 किलो कापड, 5 क्रेडिट कार्ड, 11 पासपोर्ट, 2 जोडी बूट आणि तब्बल 800 ग्राम गांजा होता. माहितीसाठी सांगते की मी असं कुठलंच पार्सल पाठवलं नव्हतं आणि मी मुंबईमध्ये राहतसुद्धा नाही.
 
पण ते नंतर म्हणाले की इतक्या अवैध वस्तू या पॅकेजमध्ये आढळल्याने आता पोलीस याचा तपास करत आहेत.
 
त्या कस्टमर केअरवाल्याने आधी मला त्या पॅकेजची संपूर्ण माहिती दिली, अगदी शांतपणे, आणि मग म्हणाला, “चिंता करू नका. आम्ही तुमची मदत करू. आम्ही तुमचा कॉल मुंबई पोलिसांच्या सायबर सेलशी जोडतोय.”
इथेच मला पहिल्यांदा शंका आली – एका फेडएक्स कस्टमर केअरवाल्याकडे थेट पोलिसांची हॉटलाईन कशी असू शकते?
 
थोड्या वेळाने माझा कॉल सबइन्स्पेक्टर नरेश गुप्ता बॅनर्जी यांच्याकडे वर्ग करण्यात आला. त्यांनी माझी खात्री पटवायला माझ्या व्हॉट्सॲपवर त्यांचा आयडी पाठवला.
 
इथे शंकेची दुसरी पाल चुकचुकली – त्यांनी असं का करावं? कुठलाही अधिकारी असं का करेल? त्यांच्या मागे वायरलेस यंत्रांचा आवाज येत होता, जसा की आपण पोलीस स्टेशनमध्ये अनेकदा ऐकू शकतो. सगळं खरं आहे, असंच वाटत होतं.
 
माझा कॉल नंतर थेट त्यांच्याशी व्हॉट्सॲपवर जोडण्यात आला आणि त्यांनी मला तातडीने मुंबईला येऊन माझा जबाब नोंदवायला सांगितलं. हे सध्या शक्य नाही, असं मी म्हटल्यावर त्यांनी माझा जबाब व्हॉट्सॲपवरच नोंदवून घेतला.
 
मला त्या कस्टमर केअरवाल्याने दिलेली सर्व माहिती मी त्यांना दिली. SI नरेश गुप्ता बॅनर्जी यांनी माझा जबाब नोंदवून घेतल्यासारखं केलं... मला अनेक प्रश्न विचारण्यात आले - मी कुठे काम करते? मला या पार्सलबद्दल कसं कळलं? मला कुणावर संशय आहे का? माझं आधार कार्ड चोरीला गेलं होतं का?
त्यानंतर माझं बोलणं अपर्णा कृष्णाया (कर्मचारी आयडी A15911) यांच्याशी करवून देण्यात आलं. (इथे मला तिसऱ्यांदा शंका आली. पोलिसांनी तिसऱ्याच एका व्यक्तीकडे कॉल का द्यावा?)
 
पण अपर्णा खूप शांतपणे माझी मदत करत होती. असं वाटत होतं जणुकाही अशी प्रकरणं हाताळणं तिचं रोजचंच काम आहे. तिचा आत्मविश्वास बघण्यासारखा होता. SI नरेश म्हणाले की त्यांनी जिथे हे पार्सल सोडण्यात आलं होतं, तिथलं CCTV फुटेजही मिळवलं आहे. पण त्यात दिसणाऱ्या महिलेची ओळख पटवू शकले नाहीत, कारण तिने मास्क घातलेला होता.
 
हे अगदीच पटण्याजोगं होतं. मी त्यांच्याशी बोलत असताना मागे अजूनही आवाज ऐकू येत होतं – एखाद्या सरकारी कार्यालय किंवा पोलीस स्टेशनमधले आवाज – लोक वायरलेसवर बोलताना वगैरे. सगळं अगदीच विश्वास बसण्याजोगं वाटत होतं... नरेश यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना चेक करायला लावलं की माझ्या आधार कार्डचा कुठे गैरवापर तर झाला नाहीय ना. मला दुसऱ्या व्यक्तीचा अगदीच सहज असा आवाज ऐकू येत होता.
 
त्याने सांगितलं की माझ्या आधार कार्डवरून SBI, येस बँक आणि सिटीबँकमध्ये अनेक खाती उघडण्यात आली आहेत. एवढंच नव्हे तर माझ्या या कथित खात्यांमधून लाखो डॉलर्सची देवाणघेवाणे झाली आहे. हे सगळे हवाला व्यवहार होते, ज्यासाठी माझा आयडी वापरण्यात आला.
इथे मला जरा घाम फुटू लागला. मी घरी असल्याने माझे आईबाबाही मागून विचारू लागले की कशाचं टेन्शन आहे. मी फोन लाऊडस्पीकरवर ठेवला होता.
 
नरेश आणि त्यांच्या सहकाऱ्याने सांगितलं की जेरोल्ड नावाची एक व्यक्ती या सगळ्याचा मास्टरमाइंड आहे, ज्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.
 
मला व्हॉट्सॲपवर लगेचच त्याच्याशी संबंधित बातम्यांचे स्क्रीनशॉट पाठवण्यात आले. मला याविषयी समजावून ताकीद देण्यात आली – "हा तपास अजूनही सुरू आहे, आणि तुम्ही पूर्ण सहकार्य करावं, अशी आमची अपेक्षा आहे."
 
इतक्यात माझ्या बाबांनी मागून इशारा केला, “काहीतरी गडबड आहे.” त्यांचं हे म्हणणं नरेश आणि त्यांच्या सहकाऱ्याने ऐकलं आणि ते म्हणाले की या प्रकरणी आणखी कुणाशीही चर्चा करू नका. कारण जर आणखी कुणी हे ऐकलं तर तेही या गुन्ह्यात सहभागी होतील.
 
इथे मला पुन्हा शंका आली की काहीतरी गडबड नक्कीच आहे.
 
मला लगेचच त्यांनी पुन्हा व्हॉट्सॲपवर एक डॉक्युमेंट पाठवला, ज्यात मला या प्रकरणात प्रवादी (पार्टी) करण्यात आलं. मी याविषयी कुणाशीच काहीही बोलू नये, असं ते वारंवार सांगत होते.
 
इथे माझी शंका वाढतच गेली, पण मला हा कॉल निकाली लावूनच संपवायचा होता. कारण मनी लाँडरिंगची भीती कुणी दाखवली तर आजकाल नेते मंडळीही घाबरतात.
पुढे SI नरेश आणि त्यांच्या सहकाऱ्याने मला आणखी काही प्रश्न विचारले – तुमची किती बँक खाती आहेत? त्यात किती रक्कम आहे? तुम्हाला इतक्यात काही मोठी रक्कम आली होती का? तुम्हाला इतक्यात कुणी बँक खातं उघडायला फोन केला होता का? वगैरे.
 
त्यांनी मला आश्वस्त केलं की हे प्रकरण 20-30 मिनिटात मार्गी लागेल, जर मी पूर्ण सहकार्य केलं तर. जवळजवळ माझा अर्धा तास इथवर तसाही गेला होता, पण धास्ती आणि अनिश्चितता अशी की काय सांगू.
 
नंतर नरेश म्हणाले की ते माझं बोलणं त्यांच्या वरिष्ठांशी करून देतील. नंतर ते दुसऱ्या एका खोलीत गेले आणि एका केबिनमध्ये शिरण्याचा आवाज मला आला. सारंकाही एखाद्या व्यवस्थित कार्यालयात पार पडतंय, असं मला भासवण्यात येत होतं, आणि सगळं पटण्यासारखंही होतं.
 
तिथे दुसऱ्या खोलीत बसले होते कथित पोलीस इनचार्ज प्रकाश कुमार गुंटू. ते कुणीतरी महत्त्वाचे अधिकारी असल्याचं आणि आपल्याकडे फार वेळ नाही, असं भासवत होते. नरेश त्यांना म्हणाले, “सर हे तेच हवाला प्रकरण आहे, त्यात आता एक मॅडम अडकल्या आहेत, त्या तुमच्याशी बोलतील.”
 
त्या अधिकाऱ्याने माझ्याशी थोडं बोलल्यावर तेच वाक्य उच्चारलं, “तुम्ही सहकार्य करा आणि 20-30 मिनिटात याचा सोक्षमोक्ष लागेल.
 
“जवळजवळ 150 लोक या प्रकरणाचा तपास करत आहेत. यात बँकांचे अधिकारी, काही कॉर्पोरेट कर्मचारी आणि अनेक हतबल झालेले लोक गुंतले आहेत. काही लोक स्वतःहून हे करत आहेत तर काही तुमच्यासारखे आहेत, ज्यांना गोवण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे यातून वाचण्याचा एकमेव मार्ग आहे – सहकार्य करा आणि आम्हाला तुमची बँक खाती हाताळू द्या.”
 
हा माझ्यासाठी सर्वांत मोठा रेड फ्लॅग होता.
 
ते पुढे असंही म्हणाले, “मॅडम तुम्ही निर्दोष आहात हे मी मान्य करेन, पण वरच्या तपास संस्था नाही. तुमच्या खात्यांमध्ये खरंच कुणी घुसलंय की नाही, हे तपासण्यासाठी तुम्ही आम्हाला 95,499 रुपये ट्रान्सफर करा. आम्ही याद्वारे तपासू की हे खातं तुमचंच आहे. आम्ही अवघ्या 15 मिनिटात तुमचे पैसे परत करू. तुम्ही कॉलवरच राहा आणि आम्ही तुम्हाला सर्वतोपरी मदत करू.”
 
सहाजिकच मी म्हटलं की मी तुम्हाला पैसे कसे पाठवू? तुम्ही पैसे परत कराल, याची काय शाश्वती? मला हे पटवून द्यायला त्यांनी लगेचच एक पत्र पाठवलं, ज्या मुंबई पोलीस आणि CBI अशा दोन्ही संस्थांचं नाव होतं. हे अगदीच फेक डॉक्युमेंट होतं.
 
या क्षणी मी ठरवलं की मी काही पैसे पाठवणार नाही. तर ते म्हणाले “आम्ही दोन-तीन वर्षांसाठी तुमची खाती गोठवू शकतो. मग तुम्ही काहीच नाही करू शकाल. नाहीतर मुंबईला या आणि पैसे भरा.”
 
मी त्वरित उत्तरले, “येते मी मुंबईला. आत्ता पैसे नाही भरणार.” तर त्यांनी लगेचच फोन ठेवून दिला.
 
तो फोन कॉल तब्बल 44 मिनिट 29 सेकंद चालला.
 
आणि त्याअंती मी जरा धक्क्यातच गेले होते. मला काळजी वाटतेय की माझ्या नकळत माझी आधारची माहिती असं कोण कुठे वापरतंय का? मी जरा गोंधळलेच होते, स्पष्ट विचार करत नव्हते, त्यामुळे इतक्या वेळ या कॉलमध्ये आणि त्यांच्या या चक्रव्ह्यूहात अडकले.
 
आणि एक नक्की की मी घरी, कुटुंबीयांसोबत नसते तर नक्कीच भीतीपोटी आतापर्यंत ते पैसे पाठवून दिले असते किंवा ते मुंबईचं तिकीट बुक करून टाकलं असतं.
 
पण यातून एक धडा नक्कीच घेण्यासारखा आहे, की हे स्कॅम कॉल किती खरे असू शकतात, याचा आज मला अनुभव आला. त्यामुळे कुणीही याला बळी पडलं तर त्यांची टर उडवू नका. कारण मेहनतीने कमावलेले पैसे असे जाणं कुणालाच आवडत नाही.
 
हा कॉल संपल्यानंतर मी तातडीने माझे सर्व पासवर्ड अपडेट केले. एका IPS मैत्रिणीशी सर्व माहिती शेअर केल्यावर तिने सांगितलं की सगळं कसं खोटं होतं. पण यावर पोलिसात तक्रार करण्यात अर्थ नव्हता, कारण प्रत्यक्षात चोरी कुठलीच झालेली नव्हती. पैशांची देवाणघेवाण सुदैवाने मी टाळली होती.
 
पण तुम्हाला असा कुठलाही फोन आला तर सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, पॅनिक होऊ नका (जे माझ्याबाबतीत झालं). शांतपणे विचार करा की यातलं काय खरं असू शकतं आणि काय नाही. प्रसंगावधान राखलं की तुम्ही स्वतःला वाचवू शकता.

Published By - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

12 Jyotirlingas: १२ ज्योतिर्लिंग आणि १२ राशींचा काय संबंध आहे? तुम्ही कोणत्या ज्योतिर्लिंगाशी संबंधित आहात हे जाणून घ्या?

घरात तुळशीचे रोप स्वतःच उगवले तर शुभ की अशुभ जाणून घ्या

स्वामी विवेकानंदांचे शिकागो येथील ऐतिहासिक भाषण, जे ऐकून टाळ्यांचा कडकडाट होत होता

ढपोरशंख म्हणजे काय? मनोरंजक कथा, मुलांना नक्की ऐकवा छान गोष्ट

जर हिवाळ्यात तुमचे हात पाय थंड पडत असतील तर या युक्त्या करा

सर्व पहा

नवीन

भारत आघाडी अस्तित्वात आहे की नाही हे काँग्रेसने सांगावे,संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला

पुण्यात तोल गेल्याने पेंटिंग कामगाराचा मृत्यू,कंत्राटदारावर गुन्हा दाखल

अहमदाबादमध्ये 9 वर्षीय मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

LIVE: सावरकरांवरील टिप्पणी प्रकरणी राहुल गांधींना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

सावरकरांवरील टिप्पणी प्रकरणी राहुल गांधींना मोठा दिलासापुणे न्यायालया कडून जामीन मंजूर

पुढील लेख
Show comments