अनकेदा मोबाईल वर नेटवर्क नसल्याने ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो यासाठी नंबर पोर्ट करण्याची सुविधा दिली होती. मात्र त्यात अनेक दिवस वाट पहावी लागे मात्र आता असे होणार नाही. एमएनपी अर्थात मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीच्या नियमांमध्ये दूरसंचार नियामक प्राधिकरण ट्रायनं सुधारणा केल्या आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया आता आणखी जास्त वेगवान आणि सोपी होणार आहे. एकाच सेवा क्षेत्रात आपला मोबाईल क्रमांक कायम ठेवून सेवा पुरवठादार बदलण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी निर्धारित केला आहे.
त्याचप्रकारे एका परिमंडळातून दुसऱ्या परिमंडळात स्थानांतर करण्याच्या मागणीवर प्रक्रिया करण्यासाठी पाच दिवसांचा कालावधी निर्धारित केला आहे. १६ डिसेंबरपासून हे नवे नियम लागू होणार आहेत. तसंच यापूर्वी यूपीसी अर्थात युनिक पोर्टिंग कोडसाठी असलेला पंधरा दिवसाचा कालावधी कमी करून तो चार दिवसांवर आणला आहे.
जम्मू आणि काश्मीर, आसाम आणि ईशान्येकडच्या तीस दिवस पोर्टिंग कोड कायम राहणाऱ्या भागांव्यतिरिक्त ही सुविधा सर्व परिमंडळात लागू असेल. सध्याच्या नियमानुसार एमएनपी च्या मागणीवर ९ डिसेंबरपर्यंत प्रक्रिया होईल आणि सदरहू यंत्रणा नव्या नियमांच्या अंमलबजावणीत व्यस्त असल्यानं १० ते १५ डिसेंबर दरम्यान ही सुविधा उपलब्ध असणार नाही.