Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

5G म्हणजे काय? तुम्हाला पडलेल्या 5 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या

Webdunia
शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (20:45 IST)
मुकेश अंबानी यांनी आज रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एक घोषणा केली आहे. दिवाळीपर्यंत देशातल्या महानगरांमध्ये 5 जी सेवा पोहोचणार आहे असे ते म्हणाले. दिवाळीपर्यंत दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकातामध्ये 5 जी सेवा सुरू होणार आहे. तर डिसेंबर 2023 पर्यंत देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात ही सेवा पोहचेल असं अंबानी यांनी म्हटलं आहे.
 
5 जी स्पेक्ट्रम लिलावावेळी काय घडलं होतं?
भारतात 5जी स्पेक्ट्रमच्या लिलावाची प्रक्रिया आज (1 ऑगस्ट) संपली. 26 जुलैपासून 5 जी स्पेक्ट्रमची लिलाव प्रक्रिया सुरू होती. देशातील विविध टेलिकॉम कंपन्या यात सहभागी झाल्या होत्या.
 
यातून सरकारला 1 लाख 50 हजार 173 कोटींचा एकूण निधी मिळालाय. एकूण 71 टक्के 5 जी स्पेक्ट्रमसाठी बोली लागली.
 
यापैकी अडानी समूहानं 26 GHz बँडमधील 400 MHz चं स्पेक्ट्रम घेतलंय, तर भारती एअरटेलनं वेगवेगळ्या बँड्समधील 19,867 MHz चं स्पेक्ट्रम घेतलं आहे, अशी माहिती दूरसंचारमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
 
यात सगळ्यात मोठी बोली रिलायन्स जिओनं लावली. त्यांनी 27 हजार 740 MHz चं स्पेक्ट्रम घेतलं असून, व्होडाफोन आयडियानं 2668 MHz पर्यंत स्पेक्ट्रम घेतलंय.
 
4 जीच्या लिलावापेक्षा दुप्पट, तर 2010 मध्ये थ्रीजीच्या लिलावापेक्षा तिप्पट रक्कम 5 जीच्या लिलावातून मिळालीय.
 
5जी सेवा सुरू झाल्यानंतर इंटरनेटचा स्पीड 10 पटीनं वाढणार असल्याचं म्हटलं जातंय. पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे तंत्रज्ञान नेमकं काय आहे, हेचं माहीत नाहीये.
 
किंबहुना 5G आल्यानंतर आपल्या आयुष्यात काय फरक पडू शकतो? याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आता बरेच जण करत असतील. या सगळ्या शंकांचं निरसन करण्यापूर्वी 5G तंत्रज्ञान म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊ.
 
1. 5G तंत्रज्ञान नेमकं काय आहे?
5G चं तंत्रज्ञान जगातल्या काही मोजक्या देशांमध्ये वापरायला सुरुवात झालेली आहे. तसं बघायला गेलं तर भारतात 3G आणि 4G तंत्रज्ञान यायला तुलनेनं जास्त वेळ लागला होता. मात्र आता भारतात ही 5G तंत्रज्ञान आणण्याची तयारी सुरू आहे.
 
5G ही मोबाइल नेटवर्कची 5 वी पिढी (5th Generation) आहे. या नेटवर्कमध्ये मिलीमीटर वेव स्पेक्ट्रम 5G मध्ये महत्वाची भूमिका बजावतं. या मिलीमीटर वेव्हची लांबी 1 पासून 10 एमएम इतकी असते. त्यामुळे नेटवर्क हायस्पीड वर चालतं.
 
पण इतकंच पुरेसं नाही, तर 20Gbps चा स्पीड देणारे हे नेटवर्क 4G मोबाइलच्या 20 पट जास्त वेगवान आहे. असं समजा, तुमच्या खिशातचं फायबर ऑप्टिक कनेक्शन आहे.
 
2. 5G तंत्रज्ञान 4G पेक्षा चांगलं आहे?
हे तंत्रज्ञान 4G पेक्षा वेगळं आहे. 5G मुळे नव्या रेडियो टेक्निकवर काम करता येऊ शकतं. सध्या 4G वर आपल्याला हायस्पीड हा 45 एमबीपीएस पर्यंत मिळतो. पण प्रोसेसर चीप बनवणाऱ्या क्वालकॉम कंपनीच्या मते, 5G मुळे हा 45 एमबीपीएस पर्यंतचा स्पीड 10 ते 20 एमबीपीएसने वाढू शकतो.
 
पुर्वीच्या इतर सेल्युलर तंत्रज्ञानाप्रमाणेच 5G नेटवर्कदेखील रेडियोलहरींच्या सिग्नलवर अवलंबून आहे. हे सिग्नल अॅँटिना किंवा मास्टवरून तुमच्या मोबाईलवर पाठवले जातात. आपण कायम विद्युतचुंबकीय किरणांनी (electromagnetic radiations) वेढलेलो आहोत. टिव्ही, रेडियो याच लहरींवर चालतात. इतकंच नाही तर मोबाईल फोनसारख्या तंत्रज्ञानातही यांचा उपयोग होतो. अगदी सूर्यप्रकाशासारखा नैसर्गिक स्रोतही त्याला अपवाद नाही.
 
शहरी भागांमध्ये या लहरी कमी अंतर कापू शकतात. त्यामुळे 5G नेटवर्कला पूर्वीच्या नेटवर्कपेक्षा अधिक ट्रान्समीटर्स मास्टची गरज असते. ते तुलनेने जमिनीच्या अधिक जवळ उभारले असतात.
 
3. आता यासाठी तुम्हाला तुमचा फोन बदलावा लागेल का?
याचं उत्तर आत्ताच देता येणं कठीण आहे. बहुतेक बदलावा लागेल. कारण जेव्हा 4G आलं तेव्हा फोन बदलावा लागला होता. ही सेवा सिमकार्डशिवायही चालू शकेल असंही असू शकतं. अनेक कंपन्या या तंत्रज्ञानावर काम करत आहेत. हे तंत्रज्ञान गावांगावांत पोहोचू शकतं पण सगळ्यांना हे परवडणारं असेल की नाही हे आत्ताच सांगणं कठीण आहे.
 
4. यूजर्सना 5G तंत्रज्ञानाचा काय फायदा मिळेल?
या तंत्रज्ञानामध्ये हायस्पीड नेटवर्क, एचडी सर्फिंग अशा बऱ्याच गोष्टी यूजर्सना अनुभवायला मिळतील. या तंत्रज्ञानामुळे हायस्पीड इंटरनेट सेवा मिळेल आणि त्यामुळे युजर्स एखादी फिल्मही अगदी काही सेकंदांत डाऊनलोड करु शकतील. आतापर्यंत सेल्युलर तंत्रज्ञान कनेक्टिव्हिटीवर लक्ष केंद्रित करायचं, पण 5G सेल्युलर तंत्रज्ञान एक पाऊल पुढे जाईल आणि क्लायंटला थेट क्लाउडशी कनेक्ट करेल.
 
4G मोबाईल एखादी माहिती पाठवण्यासाठी 70 मिलीसेकंदांचा वेळ घेतात. मात्र 5G मोबाईल आल्यानंतर एका मिलीसेकंदांपेक्षाही कमी वेळात माहितीची देवाणघेवाण करता येईल.
 
पूर्वीच्या मोबाईल नेटवर्कच्या तुलनेत 5G तंत्रज्ञानात दीर्घ लहरींचा वापर करण्यात येतो. त्यामुळे एकाचवेळी अधिकाधिक उपकरणांना इंटरनेट मिळू शकतं. शिवाय, इंटरनेटचा स्पीडही जास्त असतो.
 
5. 5G तंत्रज्ञानाचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो का?
तर 2019 साली जेव्हा ब्रिटनमधल्या काही शहरांमध्ये 5G मोबाईल सेवा वापरायला सुरुवात झाली तेव्हापासूनच 5G तंत्रज्ञानाचा आरोग्यावर दुष्परिणाम होईल का, हा प्रश्न पुढं आला. भारतात सुद्धा अभिनेत्री जूही चावलाने अशीच टीका केली होती.
 
जून 2021 मध्ये तिने 5G च्या रेडिओफ्रिक्वेन्सी रेडिएशनच्या घातक परिणामांबद्दल आणि भारतातील वापराविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
 
5G चं नाही तर यापूर्वी देखील मोबाईल फोन टेक्नॉलॉजीमध्ये वापरण्यात येणाऱ्या विद्युतचुंबकीय लहरींचा आरोग्यावर परिणाम होतो का यावरून वाद सुरू झाले होते. या रेडिएशन मुळे काही विशिष्ट प्रकारचे कॅन्सर होण्याची भीती अनेकांना वाटते. पण 2014 साली जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) स्पष्टीकरण दिलं होतं की, "मोबाईल फोनच्या वापरामुळे आरोग्यावर कुठलेही दुष्परिणाम होत असल्याचं आढळलेलं नाही.
 
असं असलं तरी इंटरनॅशनल एजंसी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (IARC) या संस्थेसह जागतिक आरोग्य संघटनेने सर्व प्रकारच्या रेडियो फ्रिक्वेंसी रेडिएशनमुळे (ज्याचा मोबाईल सिग्नल हादेखील एक भाग आहे.) 'कॅन्सर होण्याचा धोका उद्भभू शकतो' असं म्हटलेलं.
 
2018 साली देखील असंच झालं होतं. अमेरिकेच्या आरोग्य विभागाने टॉक्सिकोलॉजीसंदर्भात प्रसिद्ध केलेल्या अहवालातही यावर चिंता व्यक्त करण्यात आली होती. या संशोधनात रेडियो फ्रिक्वेंसी रेडिएशनमध्ये ठेवलेल्या उंदरांच्या हृदयात कॅन्सरसारखी गाठ तयार झाल्याचं आढळलं होतं.
 
मात्र हे संशोधन करणाऱ्या एका जेष्ठ शास्त्रज्ञांनी सांगितलं की, एखादी व्यक्ती मोबाईलचा अतिवापर करत असली तरीदेखील त्याची थेट तुलना या रिसर्चशी करता येणार नाही.
 
आता सूर्याची अल्ट्राव्हायोलेट किरणं ही सुद्धा या घातक श्रेणीत येतात. त्यांच्यामुळे त्वचेचा कॅन्सरही होऊ शकतो. वैद्यकीय क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या एक्सरे, गॅमारे यांचं रेडिशन लेव्हल सुद्धा इतकी जास्त असते की याचा माणसाच्या शरीरावर घातक परिणाम होऊ शकतो.
 
यावर ब्रिटनचे डॉ. ग्रीम्स म्हणाले होते की, "कॅन्सरच्या धोक्याविषयी लोकांना काळजी आहे. मात्र हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे की, जो प्रकाश आपल्याला दिसतो, त्यापेक्षा रेडिओ लहरीची उर्जा खूप कमी असते. आणि मोबाईल फोन किंवा वायरलेस नेटवर्कमुळे आरोग्यावर परिणाम झाला आहे, यासाठीचे ठोस पुरावे अजून तरी उपलब्ध नाहीत."

Published By- Priya Dixit

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी संजय राऊतच्या आरोपांना उत्तर दिले म्हणाले-

Pan 2.0 project : PAN 2.0 लागू झाल्यानंतर जुने पॅन कार्ड अवैध होणार का?

LIVE: ठाणे : दोन दिवसांपासून बेपत्ता तरुण, झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला

महाराष्ट्रात शपथविधी सोहळा या दिवशी होऊ शकतो

गोल्डी बरार आणि रोहित गोदाराने नाईट क्लबबाहेर झालेल्या दोन बॉम्बस्फोटांची जबाबदारी घेतली

पुढील लेख
Show comments