Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लता मंगेशकर यांना आदरांजली: लतादीदींच्या जाण्यानं बाळासाहेबांनंतरचा मोठा आघात- रश्मी ठाकरे

Webdunia
रविवार, 6 फेब्रुवारी 2022 (12:28 IST)
ख्यातनाम गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लतादीदींच्या जाण्याने झालेला शोक शब्दात व्यक्त केला आहे.
 
"लतादीदींचं जाणं हे माझ्याप्रमाणे त्यांच्या जगभरातील कोट्यवधी चाहत्यांसाठी अतिशय दु:खद आहे. त्यांच्या गाण्यातील वैविध्य, दैवी सूर यांनी अनेक पिढ्यांना आनंद दिला. त्यांनी आवाजातून भारताचं सौंदर्य मांडलं. भारतरत्न लतादीदींची कारकीर्द कालातीत आहे. शतकातून एकदा असा कलाकार जन्म घेतो. माणूस म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व भारावून टाकणारं होतं. दैवी आवाज आपल्याला सोडून गेला आहे पण त्यांची गाणी चाहत्यांच्या मनात रुंजी घालत राहतील. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत", असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे.
 
लतादीदी म्हणजे भारतीय संस्कृतीचा मानबिंदू- पंतप्रधान नरेंद्र मोदी
"लतादीदींचं जाणं शब्दातीत आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून न येणारी आहे. भारतीय संस्कृतीच्या पाईक म्हणून येणाऱ्या पिढ्या त्यांना स्मरणात ठेवतील. चाहत्यांच्या मनावर गारुड घालणारा त्यांचा मंत्रमुग्ध आवाज स्तिमित करतो. लतादीदींची गाणी आपल्या मनात विविध भावनांची रुंजी घालतात. भारतीय चित्रपटांचं स्थित्यंतर त्यांनी अनुभवलं. चित्रपटांच्या पल्याड, भारताच्या विकासासाठी त्या सदोदित आग्रही असत. विकसित आणि सक्षम भारत त्यांना पाहायचा होता. लतादीदींचा वैयक्तिक स्नेह मला मिळाला हे मी माझं भाग्य समजतो. त्यांच्याशी झालेलं बोलणं मी कधीच विसरू शकणार नाही. लतादीदींच्या जाण्याने देशवासीयांना झालेल्या दु:खात मी सहभागी आहे. त्यांच्या कुटुंबीयांशी बोललो आणि शोकभावना व्यक्त केल्या", अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
 
"देशाची शान आणि संगीत जगताच्या शिरोमणी स्वरकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचं निधन अतिशय दु:खद आहे. पुण्यात्माला माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांचं जाणं देशाची अपरिमित हानी आहे. संगीत साधकांसाठी त्या सदैव प्रेरणास्थान राहतील" असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
"पिढ्यानपिढ्या त्यांची गाणी लोक ऐकतील. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो ही प्रार्थना. त्यांचं जाणं धक्का आहे. त्याला सहन करण्याची आपल्याला शक्ती मिळो. लता मंगशेकर जगातलं सातवं आश्चर्य. 70व्या वर्षी दिलेला आवाज 22 वर्षाच्या तरुणीचा वाटत असे. आमचा आधार गेला", असं गडकरी यांनी म्हटलं आहे.
 
स्वरयुगाचा अंत; मातृतुल्य आशिर्वाद हरपला-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
"लता दीदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला", अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "स्वरसम्राज्ञी लतादिदी आज आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत, विश्व व्यापून राहिल्या आहेत. त्या अर्थाने त्या आपल्यातच राहतील. अनादि आनंदघन म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील", अशा शोकमग्न भावनांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात की, "आपल्या लाडक्या लतादीदी आज आपल्यात नाहीयेत, हे सून्न करणारं आहे. पण त्या स्वरांनी, सुरेल गाण्यांनी, चिरपरिचित आवाजाने त्या अजरामर आहेत आणि राहतील. आपल्या आयुष्यातील जवळपास सर्वच प्रसंग,क्षण लतादिदींनी आपल्या सुमधुर सुरावटींनी जिवंत केले आहेत. त्यांच्या स्वरांनी मंगल क्षण सजले. दुःखद क्षणी याच स्वरांनी सगळ्यांच्या मनाचा ठाव घेतला. लढाई, संघर्षात याच स्वरांनी उर्मी,स्फुर्ती जागवली. जगाचा क्वचितच एखादा कोपरा असेल,जिथे त्यांचा स्वर पोचला नसेल, ऐकला गेला नसेल. भाषा, सीमा-प्रांत, वंश-धर्म असे अनेक बंध तोडून त्यांच्या स्वरांचाच एक प्रदेश, भवताल निर्माण झाला आहे"."ठाकरे आणि मंगेशकर कुटुंबियांचे जुने स्नेहबंध आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे लतादीदी, हृदयनाथ, आशाताई यांच्यासह सर्वांशीच जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे. त्या निष्णात छायाचित्रकार होत्या. उत्तम कॅमेरे, वेगवेगळ्या लेन्सेस यांचा त्यांचा अभ्यास होता. त्यांच्याशी मध्यंतरी कधीमधी फोटोग्राफी, कॅमेरे याबाबत चर्चा व्हायची. माझ्या दोन्ही छायाचित्र संग्रहांविषयी त्यांनी आवर्जून दाद दिली होती. काही निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी, काही कारणांनी चौकशी करण्यासाठी, त्यांचा फोन येत असे. मध्यंतरी मी रुग्णालयात असतांना त्या सातत्याने माझी विचारपूस करून आशीर्वाद देत असता. त्यांचा तो आपुलकीचा सुमधुर स्वर आता पुन्हा कानी पडणार नाही. त्यांचा तो स्वर हे आमच्यासाठी परमसौख्य होते. हे सौख्य नियतीने हिरावून घेतले आहे. ही त्यांची उणीव जाणवत राहील", असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
 
लतादीदींचे जाणे केवळ मंगेशकर कुटुंबियांवरच नव्हे तर त्यांच्या करोडो रसिक चाहत्यांवर आघात आहे. कुणी कुणाचं सांत्वन करायचं? असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
 
लतादीदींच्या जाण्यानं बाळासाहेबानंतरचा मोठा आघात- रश्मी ठाकरे
लतादीदी आज आपल्यात नाहीत ही कल्पनाच सहन होत नाही. बाळासाहेबांनंतर त्या जणू आमच्या आधारच होत्या, सगळ्या सुख दुःखाच्या क्षणी आवर्जून पाठीशी राहणाऱ्या दीदींच्या जाण्यानं आमच्या परिवारावर मोठा आघात झाला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
 
"बाळासाहेब असताना आणि नंतर देखील लतादीदी ठाकरे परिवाराचा एक अविभाज्य भाग होत्या. प्रसंग कुठलाही असो, दीदींचा फोन नेहमी असायचा. त्यांनी अनेक प्रसंगात आम्हाला मार्गदर्शन केलं आहे. एक वडीलधारी व्यक्ती म्हणून सतत पाठीशी उभ्या राहणाऱ्या दीदी आज आपल्यात नाहीत, माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली", असं रश्मी ठाकरे यांनी म्हटलं आहे.
"जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले. लतादीदींच्या आवाजाच्या परिसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर अनंतकाळ आपल्या मनामध्ये गुंजन करत राहील. गानसम्राज्ञई लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली", असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे.
 
कसा आहेस देवेंद्र? हे त्यांचे शब्द मोठ्या बहिणीची उणीव भरून काढणारे- देवेंद्र फडणवीस
 
"लतादीदी मंगेशकर यांच्या निधनाने केवळ स्वर नाही, तर भारतीय संगीताचा आत्मा हरपला आहे. भारतीय संगीताचे हे दैवत आज आपल्यात नाही, ही कल्पनाच करवत नाही. ईश्वराने भारताला दिलेली अमूल्य देणगी हिरावून घेतली आहे. आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक हरपला आहे", असं विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
 
ते पुढे लिहितात, "त्यांची विविध कार्यक्रमांमध्ये अनेकदा भेट व्हायची. प्रत्येकवेळी आपुलकीने विचारपूस असायची. भेट झाली नाही, तर फोन करून 'कसा आहेस देवेंद्र' हे शब्द मोठ्या बहिणीची उणीव भरून काढणारे असायचे. त्यांचे जाणे, ही माझी सुद्धा वैयक्तिक आणि मोठी हानी आहे".
 
"लतादीदींचे स्वर हे कायम आपल्यासोबत राहणार आहेत, हेच सांगत स्वत:ची समजुत करून घ्यायची, एवढेच आता आपल्या हाती आहे. त्या स्वर्गातूनही सुरांची बरसात नक्कीच करतील. भारतरत्न लतादीदींना माझी भावपूर्ण श्रद्धांजली! मंगेशकर कुटुंबीय, संपूर्ण भारतवासियांच्या दु:खात मी सहभागी आहे. ॐ शांती", अशा शब्दात फडणवीस यांनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.
 
"भारताचा आवाज हरपला, संगीत अमर रहे. ओम शांती", अशा शब्दांत गायिका कौशिकी चक्रवर्ती यांनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.
"अनेक दशकं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा भारताचा लाडका आवाज हरपला. त्यांचा मखमली आवाज चाहत्यांच्या मनात चिरंतन गुंजत राहील. त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, चाहते यांच्या दु:खात सहभागी आहे", असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
 
युग संपलं, एक सूर्य, एक चंद्र, एकच लता अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
"गहिरं दु:ख. भारताचा मानबिंदू असलेल्या लतादीदी आपल्यात नाहीत. तुम्ही गायलेली गाणी, आठवणी सदैव स्मरणात राहतील. तुम्ही आमच्यासाठी अभिमानास्पद राहाल", असं क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी म्हटलं आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मी स्वतःला बाथरूममध्ये बंद करून खूप रडायचो ,शाहरुख खान अपयशावर बोलले

War 2 :हृतिक रोशनच्या 'वॉर 2 मध्ये या प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री!

Baaghi 4: बागी 4' चा फर्स्ट लूक आऊट, चित्रपट या दिवशी रिलीज होणार

चित्रपटातील प्रसिद्ध खलनायकाचे निधन, या चित्रपटात शेवटचे दिसले होते

अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2: द रुलचा धमाकेदार ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टची तिकिटे काही मिनिटांतच विकली,मुंबईत या तारखेला आहे कॉन्सर्ट

अनुपमा'च्या सेटवर विजेचा धक्का लागल्याने कॅमेरा असिस्टंटचा मृत्यू, निर्माता म्हणाले-

प्राचीन भीष्मकनगर किल्ला अरुणाचल प्रदेश

धनुष-ऐश्वर्या रजनीकांत होणार वेगळे, घटस्फोटाचा निर्णय या दिवशी येणार

भारतात असलेले महाभारतातील खलनायकांचे मंदिर

पुढील लेख
Show comments