नाशिकमधील अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांनी ईव्हीएम यंत्रामध्ये फेरफार केले जातील या भीतीने मतमोजणी केंद्राबाहेर खासगी सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये असलेल्या माणिकराव कोकाटे यांनी बंडखोरी केली होती. युती होणार नसल्याचे गृहीत धरुन त्यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी केली होती. पण ऐनवेळी युती झाल्याने कोकाटेंना माघार घेण्यास सांगण्यात आले. मात्र, पक्षादेश न मानता कोकाटे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले. त्यामुळे आता मतदान झाल्यानंतर माणिकराव कोकाटे कोणताही धोका पत्कारायला तयार नाहीत. त्यासाठी कोकाटे यांनी स्वखर्चाने ईव्हीएम यंत्रे असलेल्या स्ट्राँग रुमबाहेर खासगी सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. आपल्याला सरकारी सुरक्षेवर विश्वास नाही. या निवडणुकीसाठी माझ्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली होती. त्यांचे हे श्रेय हिरावून घेतले जाऊ नये, यासाठी हे पाऊल उचलल्याचे कोकाटेंनी सांगितले.