आपल्या देशाच्या सीमा कोणाच्या हातामध्ये सुरक्षित आहेत हे ठरविणारी ही लोकसभा निवडणूक होत आहे. भारत मोदींच्या हातामध्ये पूर्ण सुरक्षित असून, देशद्रोहाचे कलम रद्द करण्याची भाषा करणार्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या या महाखिचडीच्या आघाडीला धडा तुम्ही शिकवा. निवडणुकीमध्ये बारामतीसह माढा हादरला असून, बारामतीचे पार्सल तुमच्याकडे आले आहे ते परत पाठवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेल येथे प्रचार सभेत केले आहे.
पनवेल येथे मावळ मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी सभा होती. या सभेवेळी मुख्यमंत्री पुढे म्हणाले की देआपल्या देशाला कोण सुरक्षित ठेवू शकतो याचा विचार करणारी ही निवडणूक होत असून, पूर्वी देशावर अतिरेकी हल्ले झाल्यानंतर फक्त बघ्याची भूमिका घेत होते. नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आले आणि देशावर झालेल्या हल्ल्याचे जशास तसे उत्तर देण्यात येत आहे. आपण पाकिस्तानमध्ये घुसून अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त केले. देशाच्या सैनिकांमध्ये यापूर्वीही ताकद होती; पण तेव्हाच्या सरकारमध्ये कारवाई करण्याची अजिबात ताकद नव्हती, अशी टीका त्यांनी युपीए शासनावर केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची महाखिचडी आघाडी राष्ट्रद्रोहाचे कलम रद्द करण्याची भाषा करत असून, विरोधकांची अवस्था फार बिकट आहे. शरद पवारयांनी माढाच्या पिचवरून पळ काढला आहे. जर खेळत कॅप्टनच पळ काढत असेल तर चिल्ले-पिल्ले कसे लढणार, या वेळी माढासह बारामतीही हादरणार आहे असे ते म्हणाले आहेत.