Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज ठाकरे अमित शाहांशी चर्चेसाठी दिल्लीत, पण भाजपला मनसेची गरज का भासतेय?

Webdunia
मंगळवार, 19 मार्च 2024 (13:25 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे हेही आहेत.राज ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं. आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यातल्या सत्ताधारी भाजप-शिवसेना (शिंदे गट) नवा घटक पक्ष बनण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, राज ठाकरे दिल्लीत पोहोचल्यानंतर एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, “माझे वेळापत्रक काय आहे हे मला अजून माहिती नाही. मला फक्त दिल्लीला येण्यास सांगितलं होतं. बघूया काय आहे ते."
 
दिल्लीत 'राज'कीय हालचालींना वेग
भाजपच्या कोअर कमिटीची आज (19 मार्च) संध्याकाळी दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आधीच दिल्लीत दाखल झाले आहेत.त्यापाठोपाठ राज ठाकरे हेही दिल्लीत पोहोचले आहेत.
राज ठाकरे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत बैठक होणार आहे.आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं भाजप आणि मनसे या दोन पक्षांमधल्या युतीच्या हालचालींना वेग आला आहे.
 
मनसेला लोकसभेच्या दोन जागा मिळणार?
शनिवारी (16 मार्च) लोकसभा निवडणूक जाहीर झाली. त्यानंतर राज ठाकरेंनी दिल्लीला जाणं हे सूचक मानलं जात आहे.राज ठाकरे महायुतीत सहभागी झाले तर जागावाटपातला आणखी एक घटक पक्ष वाढणार आहे.राज ठाकरे यांनी महायुतीमध्ये प्रवेश केल्यास त्यांचा पक्ष मनसेला 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 2 जागा मिळण्याची शक्यता बोलली जात आहे.राज ठाकरे हे दक्षिण मुंबई आणि शिर्डी या मतदारसंघावर दावा सांगू शकतात, अशी चर्चा आहे.दरम्यान, मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “राज ठाकरे दिल्लीला गेले आहेत. कशासाठी गेलेत, कुणाला भेटणार आहे, ते येणाऱ्या काही तासात स्पष्ट होईल. ते जो काही निर्णय घेतील तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल, हिंदुत्वाच्या हिताचा असेल. तसंच पक्षाच्या हिताचा असेल.“बाळा नांदगावकर हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते दिल्लीत खासदार म्हणून गेले तर आम्हाला आनंदच होईल
 
भाजपला मनसेची गरज का?
2024 ची लोकसभा निवडणूक ही भाजपसाठी अत्यंत महत्वाची आहे. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी बसवणं हे भाजपचं एकमेव लक्ष्य आहे. त्यासाठी भाजप कोणतीही रिस्क नको आहे. जर महाराष्ट्रातल्या मतांचा पॅटर्न बघितला तर बाळासाहेब ठाकरे हयात असल्यापासून भाजप आणि शिवसेनेच्या युतीत शिवसेनेला मोठा भाऊ अशी ओळख होती. याचं कारण मोठा मराठी मतदार हा शिवसेनेच्या पाठीशी होता.
 
2014 नंतर नरेंद्र मोदी यांच्या लाटेत भाजप ही राज्यात मोठी होत गेली. पण तरीही मुंबईतल्या वर्षानुवर्ष शिवसेनेच्या पाठीशी असलेल्या मतदारासाठी भाजपला शिवसेनेची गरज भासत होती. 2019 साली चित्र बदललं. महाविकास आघाडी अस्तित्वात आली. ‘बाळासाहेब ठाकरे यांची हिंदूत्वाची भूमिका उद्धव ठाकरेंनी सोडली आणि कॉंग्रेसचा हात धरला’ हे रूजवण्याचा प्रयत्न भाजपने राज्यात केला. पण एकनाथ शिंदेंचं बंड, त्यानंतर त्यांना मिळालेला मूळ शिवसेना पक्ष या घटना घडल्या.यातूनही हिंदूत्वासाठी एकनाथ शिंदेंना ही भूमिकी घ्यावी लागली याचा वारंवार प्रचार करण्यात आला. पण मुंबईतल्या मराठी मतदारांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली. ती सहानुभूती निवडणूकीच्या सर्वेक्षणातही दिसून येत आहे. ही सहानुभूती कमी करण्याचा भाजपचा पुरेपूर प्रयत्न आहे.
 
लोकमतचे सहाय्यक संपादक संदिप प्रधान सांगतात, “एकनाथ शिंदेंचा चेहरा मराठी मतदारांसाठी समोर आणला पण शिंदेंना ठाण्यापलिकडे त्यांचा प्रभाव निर्माण करता आला नसल्याचं दिसून येत आहे. भाजपने 400 पारचा नारा दिला असला तरी महाराष्ट्र हे राज्य त्यांच्यासाठी आव्हानात्मक आहे. कोणतीही जोखीम नको म्हणून दोन पक्षाच्या नेत्यांना फोडून त्यांना बरोबर घेऊन जाण्याचा भाजपने प्रयत्न केला आहे. पण त्यातही मराठी मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी ठाकरे या आडनावाची गरज असल्याचं भाजपच्या नेत्यांना वाटतंय.
 
“जर राज ठाकरे यांना सोबत घेतलं तर ठाकरे गटाची मतं कापण्यात भाजपला फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर राज ठाकरे हे उत्तम वक्ते आहेत. ज्या गोष्टी भाजपला या निवडणूकीत बोलता येणं कठीण असेल त्या गोष्टी राज ठाकरे यांच्याकडून बोलून घेतल्या जाऊ शकतात. त्यामुळे मुंबईत मराठी मतदार, ठाकरे कुटुंबातील सदस्य, उद्धव ठाकरेंविरूध्द भूमिका यासाठी भाजपला राज ठाकरेंची गरज भासतेय. पण त्याचा फायदा होईल का ? हे निकालानंतर कळेल.”
 
राज ठाकरेंचे यूटर्न
राज ठाकरेंनी यांनी महाराष्ट्र दौरा केला आणि 9 मार्च 2006 रोजी मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये नव्या पक्षाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची घोषणा केली.
या घटनेला 18 वर्षे पूर्ण झाली. मात्र, यशवंतराव चव्हाण सेंटरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मंत्रालयापर्यंत मनसेला अद्याप उडी घेता आली नाहीये.
‘जगाला हेवा वाटेल’ असा महाराष्ट्र घडवू पाहणाऱ्या राज ठाकरेंना 18 वर्षांनंतरही सत्तेचा सूर का गवसत नाहीये? असा प्रश्न पडतो.2006 साली पक्षानं घेतलेल्या भूमिका आता 18 वर्षांनंतर एकतर सौम्य रूप धारण करून शांत बसलेल्या दिसतात किंवा पडद्याआड जाऊन नव्या भूमिकांसह पक्ष पुढे चाललेला दिसून येतो.
 
पक्षास्थापनेनंतर मराठी अस्मितेचा मुद्दा राज ठाकरेंनी अजेंड्यावर घेतला. मराठी भाषेला दैनंदिन व्यवहारात प्राधान्य, स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य इत्यादी मुद्द्यांसाठी प्रसंगी हिंसक आंदोलनं मनसेनं केली. पण मुंबई-ठाण्यासारख्या शहरांमध्ये मर्यादित राहिलेल्या मनसेला टोलबंदी आंदोलनानं निमशहरापर्यंत पोहोचवलं.मात्र, आंदोलन करून त्याचं श्रेय मिळेपर्यंतही थांबायचं नाही, अशी धरसोडवृत्ती मनसेची झाल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. परिणामी आंदोलनं शेवटापर्यंत मनसे नेत नाही, अशी प्रतिमा मनसेच्या आंदोलनांची होऊ लागली.
 
 
दरम्यानच्या काळात राज ठाकरेंनी पक्षाच्या वैचारिक भूमिकांमध्येही बदल करत नेले. मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी उत्तर भारतीयांविरोधात आक्रमक झालेले राज ठाकरे उत्तर भारतीय मंचाच्या व्यासपीठावर दिसू लागले. कधीकाळी महाराष्ट्राच्या विकासाची ‘ब्ल्यू प्रिंट’ मांडणारे राज ठाकरे आता तर हिंदुत्त्वाच्या मुद्द्यापर्यंत पोहोचून भाजपच्या मदतीने धार्मिक राजकारणाची खेळी खेळू पाहतायेत.
 
निवडणुकानिहाय भूमिका बदलत गेल्याचं दिसून आलं. कधी शिवसेनेविरोधात मात्र भाजपच्या बाजूनं, कधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात, तर कधी काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूनं, नि आता ठाकरे गटाच्या विरोधात नि भाजप-शिंदे गटाच्या बाजूनं... असा एकूणच गोंधळात टाकणारा नि भूमिकांची सातत्य गमावणारा प्रवास राज ठाकरेंनी गेल्या दीड दशकात केल्याचं ठळकपणे दिसून येतं.
 
एकेकाळी थेट 13 आमदार निवडून आणणाऱ्या राज ठाकरेंना गेल्या दोन्ही निवडणुकीत अनुक्रमे एक-एक आमदारच निवडून आणता आला, आणि तेही स्थानिक समीकरणांमुळे. राज ठाकरे किंवा मनसेची म्हणून तिथे ताकद किती उपयोगात आली, यावर राजकीय विश्लेषक प्रश्न उपस्थित करतात.
राजकीय विश्लेषक अभय देशपांडेंनी राज ठाकरेंच्या भूमिकांमधील सातत्यावर सखोल विश्लेषण बीबीसी मराठीशी बोलताना केलं.ते म्हणतात की, “मनसेच्या पर्यायानं राज ठाकरेंच्या भूमिकांमधील बदल (आयडियालॉजिकल शिफ्ट) बऱ्याचदा आणि तेही कमी कालावधीत बऱ्याचदा झाला. मराठीच्या मुद्द्यावरून मोदींना विरोध करून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बाजूनं. कधी इकडे कधी तिकडे.
 
“इतकंच नाही, 2014 साली सगळे पक्ष स्वतंत्रपणे लढले, त्या निवडणुकीनंतर मनसे भाजपच्या बाजूला झुकत होती, तोच शिवसेना-भाजप एकत्र आले. पर्यायानं भाजपचा मार्ग बंद झाला. मग 2019 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचार केला आणि विधानसभेनंतर शिवसेनाच काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेली. तिथेही मार्ग बंद झाले.”अभय देशपांडे पुढे म्हणतात की, “इतर पक्षांच्या समीकरणांनुसार स्वत:चं स्थान ठरवत राहिले. स्वत:ची स्पेस शोधण्याचा प्रयत्न चुकीचा नाही, पण त्यात ते आतापर्यंत ठाम दिसले नाहीत.”
 
राज ठाकरेंच्या भूमिकांमध्ये सातत्य नसण्याची तुलना सचिन परब बाळासाहेब ठाकरेंशी करतात. ते म्हणतात की, “बाळासाहेब सुद्धा काही वैचारिक सातत्य राखणारे नव्हते. पण प्रस्थापितविरोधी हा त्यांच्या भूमिकांचा धागा राहिला. राज ठाकरे प्रस्थापित व्यवस्थांसोबत राहण्याचा प्रयत्न केला.
 
परब पुढे म्हणतात की, “बरं अशा भूमिका बदलण्यातही चूक नाही. राजकीय पटानुसार बदलल्या असतील. पण त्या भूमिका बदलताना कार्यकर्त्यांना पटवून देता आलं पाहिजे होतं. पण ते राज ठाकरेंना शक्य झालं नाहीय. म्हणून पक्षाचा जनाधार कमी होत गेला आणि गेल्या 17 वर्षात झालेल्या निवडणुकांमधून ते दिसून आलं.”
 
Published By- Priya Dixit 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

LIVE: मतमोजणीपूर्वी नाना पटोलेंच मोठं वक्तव्य

मतमोजणीपूर्वी नाना पटोलेंच मोठं वक्तव्य, हरियाणात जे झालं ते महाराष्ट्रात होऊ देणार नाही

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला चेतन पाटीलला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

धुक्यामुळे झालेल्या भीषण अपघात 26 जण जखमी

हेअर ड्रायर चालू करताच स्फोट, महिलेची बोटे तुटली

पुढील लेख
Show comments