प्रत्येक ठिकाणी व्होट बॅंक वेगवेगळी असते. ही व्होट बॅंक जातीपातीच्या, धर्माच्या समीकरणावर बनते. पण हरियाणात मात्र ही व्होट बॅंक आहे, सैनिकांची. राज्यातील दहा जागांवर सैनिक व त्यांच्याशी संबंधित असलेल्यांची जवळपास साडेतीन लाख मते महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
राज्यात सैनिक, माजी सैनिक व सैनिकांच्या विधवांची मिळून संख्या सव्वा तीन लाखाहून अधिक आहे. याशिवाय त्यांचे कुटुंबिय व या सर्वांचा प्रभाव पडणारी कुटंबे यांची संख्या बरीच होते. सहाजिकच ही सगळी एक व्होट बॅंक बनली आहे. त्यामुळे ही मंडळी कुणाकडे झुकतात, त्यावर बरेच काही अवलंबून आहे. देशातील सैन्यदलांत सर्वाधिक सैनिक हरियाणातील आहे, हेही इथे लक्षात घ्यायला हवे.
राज्यातील लढतीत, मुख्य लढत इंडियन नॅशनल लोकदल व भाजप यांची युती व कॉंग्रेस यांच्यात आहे. याशिवाय बहूजन समाज पक्ष व हरियाणा जनहित कॉंग्रेसही काही ठिकाणी प्रबळ आ हे. त्यामुळे काही जागी चौरंगी लढत आहे. सत्तारूढ कॉग्रेसने सैनिकांच्या विधवांसाठी व माजी सैनिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. त्यांना पेन्शन, घर आदी मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे सैनिकांची मते आपल्यालाच मिळतील, असे कॉंग्रेसला वाटत आहे.