Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाना फडणवीसांचा वाडा

Webdunia
शुक्रवार, 29 जुलै 2016 (11:36 IST)
नाना फडणवीसांचा 245 वर्षाचा मेणवलीचा वाडा भारावून टाकणारा आहे. वाईपासूनच 10 कि.मी. अंतरावर मेणवली हे ठिकाण आहे. या ठिकाणचा घाट आणि नाना फडणवीस यांचा वाडा पेशवेकालीन स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. आजच्या काळातही स्थापत्य कलेला प्रेरणा देणारा हा वाडा असल्याचे जाणवते.
 
नाना फडणवीसांनी मेणवली येथे बांधलेला वाडा आजही ऊन, वारा, पावसात दिमाखाने उभा आहे. दीड एकर परिसरात बांधलेल या वाडय़ात सहा चौक, दगडी फरशी, दगडी चौथर्‍यावर उत्तम प्रकारच्या सागवान लाकडाच्या साहाय्याने आणि भित्तीचित्राच अनोख्या शैलीने 1770च्या   दरम्यान बांधलेल्या या वाडय़ाची देखभाल त्यांचे खापरपणतू अशोक फडणवीस आजही करीत आहेत. 
 
वाडय़ामध्ये हळदीकुंकू समारंभ, विहिरीचा, मधला, मुख्य, कांडणसळीचा आणि स्वयंपाकाचा असे सहा चौक आहेत. प्रत्येक चौकाच्या   मध्यभागी एक मीटर खोल कुंड आहे. या कुंडात जमा होणारे पावसाचे पाणी बंदिस्त मार्गाने फिरवले आहे. त्याचबरोबर वरच्या मजल्यामधून निचरा होणारे पाणी वाडय़ाच्या पाठीमागील भिंतीमधून बंदिस्त पद्धतीने काढल्याचे दिसते. वाडय़ाच्या बाह्य तटबंदीवर खिडक्या  आहेत. तत्कालीन संरक्षण गरजेनुसार त्या बांधल्या आहेत. 
 
या वाडय़ाला उत्तराभिमुख असणारा दरवाजा सुमारे 15 फूट आहे. वाडय़ाच्या चुना-विटामध्ये बांधलेल्या भिंतीस आतील बाजूला जाड गिलावा दिलेला आहे. भाताचा पेंढा किंवा गवताचे कांड चिकट लाल मातीच्या चिखलात मिसळून ते मिश्रण लिंपून हा गिलावा तयार केला आहे. भित्ती चित्रणासाठी भिंत सुकविताना पॉलिश करून गुळगुळीत केली आहे. येथील चित्रांची मांडणी आणि रेखाटन मराठी शैलीचे आहे. यामध्ये दशावताराचा, अष्टविनाकाचा समावेश आहे.  
 
या वाडय़ाच्या मागे प्रशस्त, देखणा, रमणीय आणि उत्कृष्ट वास्तुशास्त्राचा नमुना असणारा कृष्णा घाटही नानांनी बांधलेला आहे. पूर्वाभिमुख असणारे लक्ष्मी-वासुदेव म्हणजे मेणेश्वर मंदिराच्या सभागृहाच्या छतावर आणि गलटय़ावर भित्तीचित्रे शिल्लक आहेत. फिकट पिवळ रंगाने छत रंगविले आहे. 
 
धकाधकीच राजकारणातून एकांतवास मिळावा म्हणून नानांनी हा वाडा बांधला. परंतु राजकारणाच्या व्यापामुळे फार अल्पमुदतीच्या भेटी त्यांनी मेणवलीला दिल्या. 
 
कृष्णाकाठी असलेला वाडा पूर्वाभिमुख असून त्याच्या पश्चिमेकडे म्हणजेच वाडय़ाच्या मागील बाजूने कृष्णेत उतरण्यासाठी पायर्‍यांचा घाट आहे. हा वाडा मराठा वास्तुशैलीत बांधला आहे. पर्यटक पाहण्यासाठी येतात. 
 
म. अ. खाडिलकर 
 

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

प्रसिद्ध अभिनेत्याच्या घराला आग, मौल्यवान वस्तू जळून खाक

प्रसिद्ध संगीतकार अमित त्रिवेदी मतदान केंद्रावर जाऊनही मतदान करू शकले नाहीत, सोशल मीडिया वर सांगितले

यदाद्री लक्ष्मी नृसिंह मंदिर, सर्वात भव्य मंदिर

यामी गौतम आई बनली, एका सुंदर मुलाला जन्म दिला, संस्कृतमध्ये हे विशेष नाव दिले

भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमारने पहिल्यांदाच मतदान केलं

पुढील लेख
Show comments