Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नळदूर्ग किल्ला - एक पर्यटन स्थळ

Webdunia
ऐतिहासिक पार्श्वभूमी :
 
नळदूर्ग किल्ल्याचं संबंध पुराणकाळातील नल-दमयंतीशी जोडला जातो. नळ राजाने हा किल्ला बांधला. त्याच्या नावावरुन या किल्ल्यास नळदुर्ग हे नाव रुढ झाले. नळदुर्ग हा किल्ला राजा नळ याने आपल्या मुलासाठी बांधला याचा उल्लेख तारीख-ए-फरिश्ता या ग्रंथात आहे. त्यावरुन नळदुर्ग हे नाव रुढ झाले. आदिलशाही राजवटीत शहादुर्ग असे नाव ठेवण्यात आले. परंतू हे नाव प्रचलित होऊ शकले नाही.
 
नळदूर्ग हे ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे संस्मरणीय आहे. ऐतिहासिकदृष्ट्या या दुर्गाची नोंद इ.स. ५६७ पासून सापडते. चालुक्य राजा कीर्तीवर्मन याने इ.स. ५६७ मध्ये हा किल्ला नल राजवटीच्या ताब्यातून जिंकला होता. त्यानंतर अनेक राजघराण्यांनी राज्य केले. इ.स. १३५१ मध्ये नळदूर्ग किल्ला बहामनी राज्याच्या ताब्यात गेला. इ.स. १३५१ ते १४८० या काळात मातीच्या भिंतीऐवजी मजबूत दगडी तटबंदीचे बांधकाम करण्यात आले. 
 
बहामनी राज्यांच्या विघटनानंतर इ.स. १४८२ मध्ये नळदुर्ग किल्ल्याचा समावेश विजापुरच्या आदिलशहाने त्याच्या राज्यात केला. इ.स. १६८६ साली औरंगजेबाने विजापुरची आदिलशाही नष्ट केली. त्यानंतर आदिलशाही राज्यातील नळदुर्गसह इतर किल्ले मुघल साम्राज्यात समाविष्ट केले. आसिफजहॉं (निजाम-उल-मुल्क) याने इ.स. १७२४ मध्ये दक्षिणेत सत्ता स्थापन केल्यानंतर नळदुर्ग किल्ल्याचे महत्व वाढले. इ.स. १७५८ मध्ये नानासाहेब पेशव्यांनी हा किल्ला जिंकला होता. इ.स. १७९९ मध्ये निजामाने इंग्रजांबरोबर तह केला. त्यानुसार फ्रेंच सैनिकांऐवजी इंग्रजांचे सैनिक ठेवण्याचे ठरले. या तहाने इंग्रजांचे वर्चस्व हैद्राबादेत प्रस्थापित झाले आणि निजामाचे स्वातंत्र्य संपले. 
 
निजामाने ईस्ट इंडिया कंपनीबरोबर १२ ऑक्टोबर १८०० रोजी तैनात फौजेचा तह करुन स्वत:च्या स्वातंत्र्याचे बलिदान केले. या तहाने हैद्राबाद संस्थानचे रुपांतर नेहमीसाठी संरक्षित राज्यामध्ये झाले. निजामाच्या वर्चस्वाखाली बसलेला मराठवाड्यातील उस्मानाबादचा प्रदेशही संरक्षित राज्याचा घटक बनला. हैद्राबाद राज्याला सन १८५० मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या कवायती फौजेच्या पोटी ६४ लाख रुपयांचे कर्ज झालेले होते. या कर्जापोटी १८५३ मध्ये निजामाने तहान्वये वर्हाड, नळदुर्ग व रायचूर हे जिल्हे इंग्रजांना तोडून दिले. या सर्व जिल्ह्यांचे एकूण महसूली उत्पन्न ५० लाख रुपये होते. इ.स. १८५७ च्या उठावाच्या वेळी निजामाने इंग्रजांना प्रचंड सहाय्य केले. त्याचे बक्षीस म्हणून इ.स. १८५३ च्या तहात सुधारणा करुन १८६० चा तह करण्यात आला. त्यानुसार नळदुर्ग व रायचूर हे २१ लाख रुपये उत्त्पन्नाचे जिल्हे निजामास परत देण्यात आले. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर १९४८ साली भारत सरकारने निजामाविरुध्द पोलिस कारवाई करुन मराठवाडा भारतात समाविष्ट करुन घेतला.(संदर्भ:१-लातूर जिल्हा गॅझेटिअर,२-मध्ययुगीन मराठवाडा, ३-गुलशने इब्राहिमी).
 
किल्ल्यातील स्मारकांची थोडक्यात माहिती
 
पाणी महाल :
 
मुख्य किल्ला आणि रणमंडख हे किल्ल्याचे दोन भाग पाणी महलने जोडलेले आहेत. इब्राहिम आदिलशहा दुसरा याने बोरी नदीवर दगडी धरण बांधून त्यात पाणी महालाची योजना केलेली आहे. हे धरण व महाल बेसाल्ट दगडात बांधलेले आहे. पावसाळ्यात बोरी नदीला पूर आल्यावर पाणी महालावरुन पडते. हे पाणी दोन ठिकाणांहून खाली पडते. हे दोन धबधबे नर व मादी या नावाने ओळखले जातात. यामुळे किल्ल्याच्या नैसर्गिक सौंदर्यात खूपच भर पडली आहे. धरण बांधून बोरी नदी अडविल्यामुळे पाणी अडून या पाण्याचा उपयोग किल्ल्यात पाणी पुरविण्यासाठीही करुन घेतल्याचे दिसते.
 
याठिकाणी असणारा पाणी महाल कठीण अशा काळ्या बेसाल्ट दगडात बांधलेला आहे. हे धरण त्याकाळातील अभियांत्रिकीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. या धरणाची लांबी ५७२ फुट इतकी आहे. दस्ताऐवजातील नोंदीनुसार हे धरण पाणी महाल इब्राहिम आदिलशहा दुसरा यांच्या काळात हिजरी १०२२ इ.स. १६१३ मध्ये बांधण्यात आले. याठिकाणी एक संगमरवरी दगडात चार ओळींचा शिलालेख आहे. 
 
बुरुज :
 
नळदूर्ग किल्ल्याची तटबंदी अतिशय मजबूत असून ती काळ्या बेसाल्ट दगडात बांधलेली आहे. या तटबंदीत एकूण ११४ बुरुज आहेत. या तटबंदीत परांडा बुरुज, उपळा बुरुज आण्णाराव बुरुज, बंदा नवाज बुरुज, नव बुरुज इत्यादी नावे आहेत. परांडा बुरुज हे किल्ल्याच्या उत्तर-पूर्व बाजूस असून परांडा किल्ल्याच्या दिशेस आहे. या बुरुजावरुन त्याकाळी मोठा झेंडा किंवा मशालीच्या सहाय्याने परांडा येथील किल्ल्यातील लोकांना संदेश दिला जाई असे म्हणतात. बंदा नवाज हे या बुरुजाच नाव कशावरुन दिले गेले याविषयी माहिती मिळत नाही. हा बुरुज दक्षिण-पश्चिम बाजूच्या कोपऱ्‍यात आहे.
 
नवबुरुज हा स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना आहे. या बुरुजास नऊ छोटे-छोटे कंगोरे अशी रचना केलेली आहे, म्हणून या बुरुजास नवबुरुज म्हणून ओळखले जाते. किल्ल्याच्या अगदी दक्षिण-पूर्व बाजूस एक बुरुज असून तो आण्णाराव बुरुज या नावाने ओळखला जातो. नळदुर्ग किल्ल्याच्या पूर्वेकडील बाजूच्या तटबंदीत तुर्ऱ्या बुरुज असून येथून मच्छली तटकडे जाण्यासाठी पायऱ्यांची योजना केलेली आहे, त्याचप्रमाणे किल्ल्याच्या उत्तरेकडील बाजूच्या तटबंदीत संग्राम बुरुज नावाचा एक बुरुज आहे.
 
उपळा बुरुज हा सर्वात उंच असून या बुरुजाची उंची १५५० फूट इतकी आहे. या बुरुजावर जाण्यासाठी एकूण ७७ पायज्यांची योजना केलेली आहे. या बुरुजावरुन नळदूर्ग किल्ल्याच्या चारही बाजूंच्या प्रदेशावर नजर ठेवता येते. या बुरुजावर एक मोठी तोफ ठेवलेली आहे. या बुरुजाच्या पाठीमागील बाजूस एक हौद आहे. या बुरुजाजवळ दारुगोळा ठेवण्यासाठी बारुदखाना आहे. या बारुदखान्याची रचनेमध्ये भिंतीत कमानींची योजना केलेली आहे. तसेच लहान-लहान कमानींची योजनाही केलेली दिसून येते.
 
मशिद क्र. १ :
 
ही मशिद किल्ल्यात प्रवेश केल्यानंतर आपल्या नजरेस पडते. सध्या या मशिदीची पडझड झालेली आहे. ही मशिद आयताकृती असून एक मजली आहे. या मशिदीचे प्रवेशद्वार पूर्वेस असून पुढील दर्शनी बाजूस तीन कमानीयुक्त भाग आहे.
 
जामा मशिद :
 
मुन्सीफ कोर्टच्या समोरील बाजूस एक मशीद असून ती जामा मशीद या नावाने ओळखली जाते. ही मशीद दगडी चौथऱ्यावर बांधलेली आहे. या मशिदीच्या समोरील दर्शनी बाजूस तीन कमानी असून वरच्या बाजूस चार मिनार व मध्यभागी घुमट आहे. या मशिदीवर भौमितीक, पाने-फुले यांचे नक्षीकाम केलेले दिसते. 
 
अंबरखाना :
 
अंबरखाना ही इमारत एक मजली असनू ती आयताकृती आकाराची आहे. ही इमारत उत्तराभिमुख आहे. या अंबरखाना इमारतीच्या दर्शनी बाजूस ती कमानीयुक्त प्रवेशद्वार असून त्यापैकी दोन सध्या बांधकाम करुन बंद केलेली दिसतात. याचा हॉल आकाराने मोठा व उंच आहे. या ठिकाणचा वापर हत्तींच्या विश्रांतीसाठी करण्यात येत असे.
 
अंबरखान्याच्या समोरील बाजूस पाण्याचे हौद असून सध्या ते पडझड झालेल्या स्थितीत आहेत. या पाण्याच्या हौदाशिवाय याठिकाणी विहीर पाणी साठविण्याच्या टाकी, पाण्याचे पाट आणि इतर संरचनाही आहेत. या पाणी साठविण्याच्या टाक्यांमधून हे पाणी किल्ल्यात असणारे रहिवाशी घरे, सरकारी कचेऱ्या, किल्ल्यातील बाग इत्यादींना पुरविण्यात येत असे. या सर्व संरचना पडझड झालेल्या अवस्थेत आहेत.
 
मुन्सिफ कोर्ट :
 
ही इमारत चौरस आकाराची आहे. यात अनेक दालने आहेत. या मुन्सिफ कोर्ट इमारतीच्या मध्यभागी मोकळे प्रांगण आहे. या इमारतीचा वापर या विभागाचा कमिश्नर (मुन्सिफ) याचे कार्यालय म्हणून होत असे. नंतरच्या काळात या ठिकाणच्या काही खोल्यांचे तुरुंगात रुपांतर करण्यात आले होते.
 
रंग महाल :
 
बारा इमाम इमारतीच्या पुढेच रंग महाल ही इमारत आहे. या रंग महालातही अनेक दालनांचा समावेश आहे. याठिकाणी संगीत, नृत्य इ. कार्यक्रम होत असे. या महालातच गोवळकोंड्याच्या राजकन्येशी दुसरा इब्राहिम आदिलशहाचा विवाह सोहळा थाटात झालेला होता.
 
हमामखाना :
 
रंग महालाच्या दक्षिणेकडे दोन इमाम आहेत. या हमामखान्याचा उपयोग राजघराण्यातील स्त्रियांच्या अंघोळीसाठी करण्यात येत असे. सध्या या हमामखान्यांची पडझड झालेली आहे.
 
थडगे :
 
हमामखान्याच्या जवळच दोन ब्रिटीशांची दोन लहान आकाराची थडगी आहेत. यातील उत्तरेकडील थडगे हे कर्नल मिडोज टेलर यांचे आहे. ही थडगी पूर्व-पश्चिम अशी असून आयताकृती आहेत. ही थडगी दगडी सीमाभिंत बांधून बंदिस्त केलेली आहेत.
 
हत्ती तलाव :
 
हत्ती तलाव हा आयताकृती आकाराचा आहे. या तलावाच्या दक्षिण, पश्चिम व उत्तबाजूची भिंत दगडांनी बांधलेली आहे. पूर्वेकडील बाजूस हत्तींना तलावात उतरण्यासाठी उतार ठेवलेला आहे. पश्चिम बाजूंच्या दगडी भिंतीत पायऱ्यांची योजना केलेली आहे. या हत्ती तलावाचा उपयोग हत्तींना स्नान घालण्यासाठी करीत असत.
 
रण मंडळ :
 
पाणी महालाच्या पश्चिमेस हा भाग आहे. हा भाग रणमंडळ या नावाने परिचित आहे. हा किल्ल्याचा अंतिम भाग आहे. रणमंडळाचा भाग त्रिकोणाकृती असून याच्या बाजूस बोरी नदी वाहते. स्थानिक बोली भाषेत रणमंडळ म्हणजे युद्धाचे ठिकाण. बहुधा याठिकाणाचा वापर युद्धाचा सराव करण्यासाठी केला जात असावा. या रणमंडळात कोणतेही वास्तु अवशेष नाहीत. रणमंडळ परिसरात सैन्यांची छावणी असावी. या जागेचा वापर युद्धविषयक प्रशिक्षण देण्यासाठी होत असावा.
 
हत्ती दरवाजा :
 
किल्ल्याच्या वायव्य बाजूस एक दरवाजा असून तो हत्ती दरवाजा या नावाने ओळखला जातो. हा हत्ती दरवाजा भव्य व मजबूत आहे. याठिकाणी हत्ती, स्तंभ इ. प्रतिमा आहेत. मुख्य किल्ला व रणमंडख, हत्ती दरवाजा व तटबंदी यामधीरल दगडी बांधकामात भिन्नता दिसते.
 
हलमुख दरवाजा :
 
नळदुर्ग किल्ल्याचे सर्वात मोठे व मुख्य प्रवेशद्वार हलमुख दरवाजा या नावाने ओळखले जाते. हे प्रवेशद्वार खूप मजबूत आहे. प्रवेशद्वारापर्यंतची वाट नागमोडी वळणाची ठेवलेली आहे. ही नागमोडी वळणे ओलांडल्याशिवाय महाद्वार दिसत नाही. या प्रवेशद्वारास लाकडी दरवाजा असून त्यावर लोखंडी खिळे बसविलेले दिसतात. यामुळे हत्तीच्या धडकेने दरवाजा फोडणे शक्य नाही असे दिसते. अशी या हलमुख दरवाजाची रचना आहे.
 
नळदुर्ग किल्ला येथे करण्यात येणाऱ्‍या सोयी सुविधा
ध्वनी व प्रकाश शो : नळदुर्ग किल्ला व परिसराची ऐतिहासिक माहिती या ध्वनी व प्रकाश शोद्वारे देण्याचे प्रस्तावित आहे.
 
बोटींग व वॉटर स्पोर्ट : नळदुर्ग किल्ला येथे असणाऱ्‍या बोरी नदीच्या पात्रात पर्यटकांसाठी बोटींगची सुविधा करण्यात येणार आहे. तसेच वॉटर स्पोर्टची सोयही उपलब्ध असणार आहे.
 
बाग-बगीचा : किल्ल्याच्या आतील भागात बाग-बगीचा तयार करण्यात येणार आहे. यात रोझ गार्डन, मुघल गार्डन इ. चा समावेश आहे.
 
पर्यटकांसाठी विविध खेळांच्या सुविधा : नळदुर्ग किल्ल्याला भेट देणार्या पर्यटकांसाठी याठिकाणी बॅडमिंटन, बास्केटबॉल, फुटबॉल, क्रिकेट, वॉल क्लायम्बिंग इ. खेळांची सुविधा देण्यात येतील.
 
सँड बाईक राईड : किल्ल्याच्या आतील एका भागात सँड बाईक राईडची सोयही पर्यटकांना उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित आहे.
 
इलेक्ट्रिक बग्गी कार : नळदुर्ग किल्ला हा जवळ जवळ १२५ एकर परिसरात पसरलेला असल्यामुळे किल्ला पाहण्यासाठी इलेक्ट्रिक बग्गी राईड ही पर्यटकांसाठी उपलब्ध असणार आहे. 
 
संग्रहालय : या ठिकाणी ऐतिहासिक संग्रहालय, रॉक म्युझियमही तयार करण्यात येणार असून याद्वारे पर्यटकांना भारतातील विविध संस्कृतीची, भारतातील दगड (रॉक) यांची माहिती या संग्रहालयात मिळेल.
 
दख्खनची सात आश्चर्ये : दख्खनमधील सात वास्तू, मंदिर, मशिद उदा., वेरुळची कैलास लेणी, चार मिनार, बिबीका मकबरा, गोलघुमट इत्यादींच्या प्रतिकृती पर्यटकांना याठिकाणी पहावयास मिळतील.
 
घोडेस्वारी : नळदुर्ग किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना घोडेस्वारीचा आनंद घेता यावा यासाठी घोडेस्वारीची सोयही उपलब्ध असणार आहे.
 
म्युझिकल फाऊंटन : नळदुर्ग किल्ल्याच्या आतील भागात ठिकठिकाणी कारंजे ही तयार करण्यात येणार आहेत. तसेच ही याठिकाणी पर्यटकांच्या मनोरंजनासाठी तयार करण्यात येणार आहे.
 
लहान मुलांसाठी खास योजना : लहान मुलांसाठी नळदुर्ग किल्ला येथे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळण्यासाठीची खास सोय करण्यात येणार आहे.
 
सांस्कृतिक कार्यक्रम : पर्यटकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमही नळदुर्ग किल्ला येथे आयोजित केले जातील. उदा. गोंधळ, वाघ्या-मुरळी इ.
 
खान-पान सुविधा : नळदुर्ग किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना विविध प्रकारची खान-पान सुविधाही उपलब्ध असेल.
 
सुरक्षा विषयक उपाय : नळदुर्ग किल्ल्यास भेट देणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी सिक्युरिटी गार्डची नियुक्ती करण्यात येणार आहे. याशिवाय सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. ध्वनिक्षेपकाद्वारे पर्यटकांना सूचना देण्याची, लाईफ गार्डची सोयही असणार आहे.
 
याशिवाय पर्यटकांना वाय-फाय झोन, मोबाईल चार्जिंग पॉईंट, पिण्याची पाणी इत्यादीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यापैकी बहुतांश कामे प्रगतीपथावर आहेत.
 
 
नळदुर्गला जाण्याचे मार्ग :
 
नळदूर्ग हे सोलापूर पासुन ४५ कि.मी. अंतरावर आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रं. २११ या रस्त्याने धुळे, औरंगाबाद, उस्मानाबाद, तुळजापूर मार्गे नळदुर्ग येथे जाता येते. हैद्राबाद-मुंबई या राष्ट्रीय महामार्गानेही हैद्राबाद-उमरगा-नळदुर्ग असेही नळदूर्ग येथे पोहचता येते. सोलापूर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गाद्वारेही कर्नाटकातून येणाऱ्या लोकांना विजापूर-सोलापूर-नळदुर्ग मार्गाद्वारे नळदूर्ग येथे पोहचता येते. नळदूर्ग हे ठिकाण राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग इत्यादीद्वारे विविध शहरांशी जोडलेले आहे. जवळचे रेल्वेस्थानक सोलापूर आहे. नळदूर्ग येथे असणारा ऐतिहासिक नळदूर्ग किल्ला हा स्थानिक बसस्थानकापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असून किल्ल्यात जाण्यासाठी पक्का रस्ता आहे.
 
इतिहासाची साक्ष असणाऱ्या या नळदुर्ग किल्ल्याला नक्कीच भेट द्यावी.
 
- शिवाजी नाईक 
सर्व पहा

नक्की वाचा

आयुष्मान खुरानाने त्याच्या पहिल्या लाईव्ह सिंगिंग परफॉर्मन्सचे श्रेय अरिजीत सिंगला दिले

भूल भुलैया 3 ने सिंघम अगेनला टाकले मागे, चार आठवड्यात 247 कोटींची कमाई

एआर रेहमानसोबतच्या नात्याच्या अफवांवर मोहिनी डे यांनी मौन सोडले

फोर्स ऑफ नेचर: द ड्राय 2 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला

अनुपमा'च्या सेटवर विजेचा धक्का लागल्याने कॅमेरा असिस्टंटचा मृत्यू, निर्माता म्हणाले-

सर्व पहा

नवीन

ब्रम्हाजी मंदिर पुष्कर राजस्थान

नागराज मंजुळे यांना महात्मा फुले समता’ पुरस्कार मिळणार

बिग बॉस फेम हिमांशी खुरानाच्या वडिलांना पाच वर्षे जुन्या प्रकरणात अटक

वायलेंट हिरो' चा काळ: ताहिर राज भसीन

जमिनीवर बसून चहा प्यायले, हातात झेंडा घेऊन चालले, Bageshwar Baba यांच्या यात्रेत Sanjay Dutt यांचा नवीन अवतार

पुढील लेख
Show comments