Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शनी शिंगणापूर : गावातील घरांना कुलपे नाहीत कारण येथे चोरी होत नाही

Webdunia
शनिवार, 23 जुलै 2022 (10:12 IST)
महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जागृत क्षेत्र म्हणून शनि शिंगणापूर हे अत्यंत प्रसिद्ध देवस्थान आहे. शनी मंदिरामुळे गावाच्या नावात शनी जोडले गेले. अहमदनगरपासून ३० किलोमीटर अंतरावर नेवासा तालुक्यात सोनई गावापासून जवळच शनीचे शिंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे शनीदेव स्वयंभू पाषाण रूपात विराजमान आहेत. येथे श्रीशनैश्वराचे स्वयंभू जाज्वल्य देवस्थान असून शनैश्वराची मूर्ती ५ फूट ९ इंच उंचीची आहे. 
 
या मंदिरात असलेला दगडी स्तंभास शनिदेवाची मूर्ती मानली जाते. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी एका पुरात ही शिळा वाहत सोनई गावाजवळ आली. या स्तंभाला तसा वेगळा आकार नाही. त्या रात्री शनिदेवाने एका गावकर्‍याला दृष्टांत देऊन 'मामा-भाच्यांनी मिळून माझी स्थापना करा', असा दृष्टांत दिला आणि गावकर्‍यांनी ती शिळा उभी करून तिची पूजा करण्यास प्रारंभ केला. 
 
हा देव उघड्यावरच एका चौथऱ्यावर आहे. देव आहे पण देऊळ नाही असे या देवाचे वैशिष्ट्य होय. एका व्यापार्‍याने नवस बोलल्यानंतर त्याला शनिदेव प्रसन्न झाल्याने त्याने शिळेभोवती चौथरा बांधला आहे. मूर्तीच्या डोईवर वृक्ष पण नाही. नजिकच्या लिंबाच्या वृक्षाची फांदी डोईवर आली तर ती गळून पडते. शनिदेवास निवारा आवडत नसल्याने या पाषाण शिळेवर कोणताही निवारा नाही. 
 
वर्षप्रतिपदा आणि वर्षातील प्रत्येक महिन्याचे चारही शनिवार येथे यात्रा भरते. शनीदेवाला खूश करण्यासाठी येथे तेल वाहिले जाते. रोज हजारो लीटर तेल शनिदेवाला अर्पण केले जाते. शनि अमावास्या व गुढीपाडवा या दिवशी येथे मोठी यात्रा असते. शनि जयंतीस (वैशाळी अमावस्या) येथे उत्सव साजरा होतो.
 
या स्वयंभू मूर्तीबद्दल अनेक आख्यायिका भाविकात प्रचिलित आहेत. येथील कथाही रोचक आहे. शनी देव येथेच वास्तव्य करतात, असे मानले जाते. त्यामुळे येथे चोरी होत नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे गावातील घरांनाही कुलपे नाहीत. एवढ्या वर्षांत घरातून कधी एक खिळाही चोरीला गेलेला नाही, असे येथील लोक गौरवाने सांगतात. या लहानशा गावाची लोकवस्ती सुमारे ३००० असेल पण येथील घरांना दरवाजे नाहीत याचे आश्चर्य वाटते. शनीच्या या नगरीची रक्षण खुद्द शनी देव करतात असे लोक मानतात. चोरी केल्यावर,कोणीही चोर या गावाची सीमारेषा जिवंत अवस्थेत पार करूच शकत नाही असेही सांगितले जाते. तेथे चोरी केल्यास अंधत्व येत असल्याची आख्यायिका भाविकांमध्ये प्रचलित आहे. येथे पर्यटक मोठ्या संख्येने असतात.वाच्या मूर्तीजवळ घेऊन गेल्यास विष उतरते, असे येथे सांगतात. अगदी जगावेगळे असलेले हे देवस्थान चमत्कारांमुळे खूप प्रसिद्ध पावले आहे.
 
येथील मंदिरात दर्शनाचे नियम अतिशय कडक आहेत. देव दर्शन दिवसातून कोणत्याही वेळेस घेता येते. शनी बाल ब्रह्मचारी असल्याने महिला दूरूनच दर्शन करतात. स्त्रियांना मात्र चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेण्यास मनाई आहे. दुरून दर्शन घेता येते. दर्शनापूर्वी आंघोळ करून शुचिर्भूत होणे आवश्यक असते. आंघोळीची व्यवस्था देवस्थानाच्या आवारात कायम आहे. पुरूष स्नान करून, ओल्या कपड्यांनीच दर्शन घेतात. त्यानंतर शनीच्या मूर्तीवर तीळाचे तेल वाहून प्रदक्षिणा घालतात. दर्शन घेतल्यानंतर भाविक तिथे असलेल्या दुकानातून घोड्याची नाल तसेच काळ्या कपड्यांनी बनलेली शनी देवाची बाहुली खरेदी करतात. घोड्याची नाल घराच्या बाहेर लावल्याने दृष्ट लागत नाही, असे मानले जाते. शिवाय घरात सुख-समृद्धी नांदते.
 
कसे पोहचाल
हवाई मार्ग : शनी शिंगणापूरपासून सर्वांत जवळचे विमानतळ शिर्डी आहे आणि पुणे येथून 160 किमी अंतरावर आहे.
 
रेल्वेमार्ग : येथील सर्वांत जवळील रेल्वे स्टेशन श्रीरामपूर आहे.
 
रस्ता मार्ग : नाशिकहून या ठिकाणासाठी बस, टॅक्सी या सुविधा आहेत. मुंबई, पुणे, अहमदाबाद येथूनही या सुविधा आहेत. शिर्डीला दर्शन घेतल्यानंतर अनेक भक्त येथून शनी शिंगणापूरला दर्शनासाठी जातात.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

हरमन बावेजा पुन्हा बाबा झाला, पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

रांजणगावाचा महागणपती

आमिर, शाहरुख आणि सलमान एकत्र काम करणार?कपिलच्या शो मध्ये खुलासा!

Funny Summer Camp Joke विवाहित पुरुषांसाठी समर कॅम्प

पुढील लेख
Show comments